‘दीड दमडी’ हे आणि हेच पुस्तक का निवडलं?

जयवंत दळवी स्मृति पुरस्कार’ प्रदान करताना परीक्षकांच्या वतीने  अवधूत परळकर यांनी केलेले भाषण

मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दिला जाणारा ‘जयवंत दळवी स्मृति पुरस्कार’ यंदा विनोदी लेखनासाठी देण्यात आला. तंबी दुराई या टोपणनावाने लेखन करणारे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना  ‘दीड दमडी’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार कुमार केतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रा. दीपक घारे, प्रा. जयप्रकाश लब्दे, अवधूत परळकर यांच्या निवड समितीने या पुस्तकाची दळवी पुरस्कारासाठी एकमताने निवड केली. 16 सप्टेंबर रोजी ठाणे येथे झालेल्या या समारंभात परीक्षकांच्या वतीने अवधूत परळकर यांनी मांडलेली भूमिका...

मुखपृष्ठावर व्यंगचित्र रेखाटलेलं आहे म्हणून विनोदी म्हणायला हरकत नाही अशी बरीच पुस्तकं अलिकडे यायला लागली आहेत. हे चांगलं की वाईट मला माहीत नाही. पण मला एक माहीत आहे, खूप सिनेमे निघाले म्हणून सिनेमा ही कला विकसित होत चाललीय असं म्हणता येत नाही. दर्जा आणि संख्या चा तसा काही संबंध नाही. पण माणस़ं लिहायला लागली आहेत, व्यक्त व्हायला लागली आहेत हे चांगलं आहे. लिहिणारी माणसं हळूहळू वाचायलाही लागतील अशी आशा करूया. हे मी विनोदानं म्हणत नाही, मी पाहिलंय की लिहिणारी माणसं वाचतात कमी. इतरांचं लिखाण वाचणं सोडा; अनेक लेखक स्वतः लिहिलेलंही प्रकाशनाला देण्यापूर्वी वाचत नाहीत.

विनोदी लेखन हा सोपा वाडम़य प्रकार आहे अशी एक समजूत आहे. त्यामुळे विनोदी लेखनाकडे आजकाल नवलेखकांचा अधिक कल दिसतो. सोशल मिडियातही तुम्हाला विनोदी लिहिण्याची धडपड करणारे बरेच आढळतील. प्रत्यक्षात विनोदी लिहायला बसलं की विनोदी लेखन हा किती कठीण प्रकार आहे हे कळू लागतं. शाब्दिक कोट्यांची खैरात, पीजेचा वर्षाव, दहा बारा चुटके म्हणजे विनोदी लेखन नाही. विनोदी लेखनातला ‘विनोद’ मानवी जीवनातल्या विसंगतीवर आधारलेला असतो असं नेहमी बोललं जातं. पण विसंगतीचं दर्शन घडवणारं लेखन सुसंगत असावं लागतं. विनोदी मजकुराला विशिष्ट फॉर्म असावा लागतो. आकृतीबंध असावा लागतो. विज्ञानकथा जशी मुळात कथा असावी लागते नंतर विज्ञान वगैरे. तसा विनोदी साहित्य लिहिणारा मुळात उत्तम साहित्यिक असावा लागतो. केवळ वृत्ती विनोदी आहे म्हणून विनोदी साहित्य निर्माण करता येत नाही.

तुम्ही म्हणाल, हे सगळं आम्हाला ठावूक आहे. काय म्हणजे विनोदी साहित्य नाही; विनोदी साहित्य कसं नसावं हे सांगण्यापेक्षा दर्जेदार विनोदी साहित्य कसं असावं हे सांगा. चांगल्या विनोदाची तुमची व्याख्या सांगा. 'दीड दमडी' हे पुस्तक तुम्ही जयवंत दळवी पुरस्कारासाठी का निवडलं ते सांगा. पहिल्या प्रश्नाचं (दर्जेदार विनोदी साहित्य तुम्ही कशाला म्हणता या प्रश्नाचं) उत्तर शब्दात देण्याऐवजी मी तुम्हाला दीड दमडी हे श्रीकांत बोजेवारांचं पुस्तक दाखवेन. वाचा, वाचता वाचता प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. दुसरा प्रश्न- विनोदी साहित्याची व्याख्या. एखाद्या वाडम़य प्रकाराची व्याख्या वगैरे करणं हा प्राध्यापकी आणि समीक्षकी बिझनेस आहे. आणि मी इथं दीड दमडी या पुस्तकाची समीक्षा करण्यासाठी उभा नाही. दीपक घारे, लब्धे आणि मी अशा तिघांनी श्रीकांत बोजेवार यांचं दीड दमडी हे आणि हेच पुस्तक का निवडलं, या तिस-या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मात्र मी प्रयत्न करतो.

असं आहे की, आपला मुलगा हुशार आहे; वर्गात आपल्या मुलाचा पहिला नंबर आला पाहिजे, असं सर्व पालकांना वाटत असतं. प्रॉब्लेम असा की, वर्गात पहिला नंबर येण्यासाठी आपला मुलगा नुसता हुशार असून उपयोगी नसतं, तर वर्गातली इतर मुलं कमी हुशार असावी लागतात. इतर मुलं ढ असायला पाहिजेत असं मी म्हणत नाही. शाळेबाहेरच्या सर्व स्पर्धांत हेच मुख्य असतं. धावण्याच्या शर्यतीत पी. टी. उषा पहिली येण्याचं कारणही तेच असतं. पुस्तक निवडीच्या पहिल्या फेरीत आम्हा परीक्षकांची थोडी पंचाईत झाली. ज्या चार - सहा पुस्तकांची शॉर्टर लिस्ट आम्ही बनवली; ती पुस्तकंही गुणवत्तापूर्ण होती. मग आम्ही त्या पुस्तकांचं पुनर्वाचन केलं. सगळ्या पुस्तकांतल्या लेखन ऐवजावर पुन्हा नजर टाकली. अधिक चिकित्सकपणे त्यातल्या लेखनाची शैली आणि आशय तपासला, तेव्हा इतर पुस्तकांपेक्षा दीडदमडी हे अधिक सरस, अधिक गुणवत्तापूर्ण असल्याचं सर्वांचं मत झालं. श्रीकांत बोजेवारांच्या विनोदी लेखन आविष्कारात एकप्रकारची सहजता आहे हे जाणवलं.

मी विनोदी लेख लिहायला बसलो आहे. माझ्यावर वाचकांना हसवण्याची जबाबदारी आहे, असा अभिनिवेश या लेखकापाशी नाही. विनोदी प्रसंगांच्या हाताळणीतला त्याचा हा लेखनगुण आणि त्यांच्या मांडणीतली सहजता वाखाणण्याजोगी आहे. बोजेवार पत्रकार आहेत. त्यांच्या व्यवसायात सातत्यानं लेखन करावं लागतं. परिपक्वता आणि लेखनातला सफाईदारपणा हे गुण त्यांनी त्यातून कमावले असावेत. ते जेवढया सातत्यानं सदर लेखन करत होते, तितक्याच सातत्यानं मी त्यांचं सदर वाचत आलोय. पाट्या टाकणं हे या लेखकाच्या स्वभावात नाही हे मला तेव्हाच जाणवलं होतं.

वृत्तपत्र व्यवसायात प्रदीर्घ काम केल्यामुळे आणखीही काही लाभ बोजेवारांना मिळत गेले. त्यातला सर्वांत महत्वाचा लाभ म्हणजे निरीक्षणासाठी समाजाचा मोठा पट त्यांना उपलब्ध झाला. कमी अधिक बौद्धिक, नैतिक उंची असलेली माणसं त्यांच्या पाहण्यात आली. या सा-या एक्स्पोजरमुळे त्यांच्या जीवनानुभवाच्या कक्षा रूंदावल्या. दीड-दमडी लिहितांना हे सगळं कामी आलं असणार. या पुस्तकातले विनोद माणसांच्या हालचालीतून, बोलण्यातून निर्माण झालेल्या घटनांभोवती फिरणारे आहेत. फार्सिकल शैलीत त्यांनी हे मांडलं आहे. अनेक जागी फॅण्टसीचा सढळ वापर करून त्यांनी आपल्या अनुभवांना, आपल्या समाजनिरीक्षणांना साहित्यरूप दिलं आहे. या त्यांच्या प्रयत्नातून दीड दमडीतलं समकालीन राजकीय आणि सांस्कृतिक सामाजिक वास्तव साकारलं आहे. कदाचित, त्यांच्याही नकळत त्यांच्या लेखन आविष्कारातून हे घडलं असेल. मी माझ्या लेखनातून भोवतालचं सामाजिक वास्तव उभं करतो, अशा भूमिकेतून बोजेवारांनी हे केलं असेल असं वाटत नाही. कुणीही साहित्यिक या आवेशानं कधी लिखाण करत नाही.

व्यावसायिक गरजेतून कराव्या लागलेल्या भटकंतीतून त्यांच्यापाशी गोळा झालेल्या अनुभवांचं प्रतिबिंब या पुस्तकभर विखुरलेलं दिसेल. विनोदाचा आस्वाद घेताना हे प्रतिबिंब न्याहाळणं हा वाचकांच्या दृष्टीनं एक आगळा अनुभव ठरावा. दीड दमडी हसवता हसवता एक समाजचित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभं करतं. विनोदाकडे कसं बघावं हे लेखकानं ठरवायचं असतं. विनोदी पुस्तकाकडे कसं बघावं हे वाचकांनीही ठरवायचं असतं. खेळकर भाषेत विनोदी साहित्यिक गंभीर आणि अर्थपूर्ण असं काही मांडू पाहात असतात. एक टाईमपास करमणूक म्हणून न पाहता आपण त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे.

साहित्यातला विनोद ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही, असं मला नेहमी वाटत आलंय. बोजेवारांचं दीड दमडी माझ्या या विधानाला दुजोरा देणारं निघालं. विनोदातून लेखकाला खूप काही साधायचं असतं. गंभीर आणि थेट निवेदन शैलीतून साधता येणार नाही असं बरंच काही.

'राजकीय' आणि 'अराजकीय' अशा दोन पुस्तकांत दीड दमडीचा साहित्यिक ऐवज विभागला आहे. मला स्वतःला वेगळ्या अर्थानं दोन्ही पुस्तकं राजकीयच वाटतात. राजकीय नेत्यांभोवती, राजकीय पर्यावरणाभोवती गुंफलेल्या विनोदी लेखनात एक धोका नेहमी असतो म्हणतात. तो म्हणजे राजकीय वास्तव बदलत असल्यानं लिखाण अल्पावधीत कालबाह्य होऊन जातं. दीड-दमडीबाबत हे झालेलं नाही. लेखकाच्या सुदैवानं आपल्या देशातलं राजकीय वास्तव बदललेलं नाही आणि नजिकच्या भविष्यात ते बदलेल असं वाटत नाही. राजकारण्यांची नावं बदलतात, तरी वृत्ती तीच. जीवनव्यवहार तेच, तोच दुटप्पीपणा, तीच बेपर्वाई, उक्ती आणि कृती यात कायम तफावत. राजकीय नेते बदलले, सत्ताधारी बदलले तरी हे सारं चालू राहातं. उद्या राजकीय नेते आदर्श जीवन जगायला लागले तर आपल्याकडल्या व्यंगलेखकांचं काय होईल;  व्यंगचित्रकारांचं काय होईल. त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल याची चिंता मला भेडसावते.

दीड दमडी च्या लेखकानं आपल्या लेखनात एक लहानसं धाडसही केलं आहे. राजकीय नेत्यांवर विनोद वा शेरेबाजी करताना त्यांची नावं बदलायच्या प्रथेला फाटा देऊन लेखकानं पुस्तकभर त्यांची खरी नावं वापरली आहेत. आाणि त्यांची यथेच्छ टवाळी केली आहे. ती करताना त्यांनी तिला असभ्यतेचं रूप येऊ दिलं नाही. प्रत्यक्ष घडलेल्या घटनेला फॅण्टसीची जोड देऊन लेखकानं विनोदनिर्मिती साधली आहे. लेखकाच्या सर्जनशीलतेची चुणुक इथं दिसते. फॅण्टसी आणि राजकीय वास्तव याची सरमिसळ बोजेवारांनी किती सफाईनं केली आहे, याचा प्रत्यय घेण्यासाठी हे पुस्तकच वाचावं लागेल.

लेखक श्रीकांत बोजेवार हे पूर्वसूरींच्या विनोदी लेखनाचा वारसा चालवणारे साहित्यिक नाहीत. त्यांच्यावर पु.ल. अत्रे, दत्तू बांदेकर या लेखकांचे संस्कार शोधूनही सापडणार नाहीत. त्यांच्या विनोदाची जातकुळी आणि लेखनशैली त्यांची स्वतःची आहे. त्यांची विषयनिवड आणि साध्या दिसणा-या विषयवस्तुचं विनोदात रुपांतर करण्याची त्यांची किमया इतर विनोदी साहित्यिकांहून वेगळी आहे. वेगळेपणात एक सौंदर्य असतं. मुद्दामहून सांगावी अशी गोष्ट म्हणजे मराठी विनोदी वाडम़याची मध्यमवर्गीय कौटुंबिक पर्यावरणातून, चाळीतून आणि फ्लॅटमधून सुटका करण्याची महत्त्वाची कामगिरी बोजेवार यांनी केली आहे. विनोद समाजाभिमुख केला आहे. विनोदी साहित्यातील बोजेवार यांच्या या लक्षणीय योगदानाबद्दल त्यांचा उचित गौरव व्हायला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही परीक्षकांनी त्यांच्या दीड दमडी या पुस्तकाची यंदाच्या जयवंत दळवी पुरस्कारासाठी निवड केली.

शहाण्या वक्त्यानं बोलणं थांबवण्यासाठी प्रेक्षकांच्या जांभयांची वाट पाहू नये म्हणतात. समोरचा माणूस काही बोलत असेल तर ऐकणा-यानं जांभई देऊ नये, हा मॅनर्सचा भाग झाला. पण ऐकणारा माणूस जांभई देत असेल तर बोलणा-यानं बोलूही नये.

एका गुणवान लेखकाची जयवंत दळवी पुरस्कारासाठी निवड करण्याची संधी दिल्याबद्दल आम्हा तिघा परीक्षकांच्या वतीनं अशोक कोठावळे यांचे आभार. आणि मराठी विनोदविश्वात नवता आणणा-या श्रीकांत बोजेवार या जयवंत दळवी पुरस्कार विजेत्या लेखकाला त्याच्या पुढील लेखनप्रवासासाठी शुभेच्छा!

- अवधूत परळकर
awdhooot@gmail.com

('दीड दमडी' हे सदर म.टा.मध्ये  2012 ते 2016 या काळात प्रसिद्ध होत होते. या सदरात एकूण 180 लेख प्रसिद्ध झाले. त्यातील निवडक लेखांची राजकीय व अ-राजकीय अशी दोन पुस्तके आहेत. ही दोन्ही पुस्तके रोहन प्रकाशन, पुणे (Ph-020 24480686) यांनी प्रकाशित केली असून, त्यांची प्रत्येकी किंमत 175 रुपये आहे. )

Tags: जयवंत दळवी पुरस्कार तंबी दुराई विनोदी लेखन अवधूत परळकर Shrikant Bojewar Jayawant Dalvi Award Tambi Durai Book पुस्तक Load More Tags

Comments: Show All Comments

Gajanan Adenkiwar

Mast

Dr.Anuja Joshi,Goa

"दीड दमडी " ची उत्सुकता..

Dr.Anuja Joshi,Goa

तंबी दुराई ने विनोदी वाड्.मयाची मध्योयमवर्गीय कुटुंबातून चाळीतून फ्लॅटमधूम सुटका केलीय हे काम अतिशय महत्वाचं! परीक्षकांनी केलेली अतिशय योग्य निवड .. अत्यंत उचित सन्मान .. हार्दिक अभिनंदन !

sandhya chougule

दिड दमडी पुस्तक वाचण्याची उत्कंठा वाढली.

देवेंद्र पचंगे

अतिशय सुंदर! सध्याच्या विनोदी साहित्यावर केलेले भाष्य अगदी योग्य आहे.श्रीकांत बोजेवार सरांचे अभिनंदन !

प्रभा पुरोहित

'दीड दमडी ' च्याच शैलीत केलेले खुसखुशीत भाष्य ! बोजेवार सरांचेही भाषण वाचायला आवडेल.

Add Comment