बाजारू आणि समांतर सिनेमाचा सुवर्णमध्य

श्याम बेनेगल यांच्या सिनेप्रकृतीचा वेध

‘समाजभान पेरणारा दिग्दर्शक’, ‘आपल्या समाजाची स्थिती गती मांडणारा दिग्दर्शक’ असे बेनेगल यांचे मोजक्या शब्दात अचूक वर्णन पत्रकारांनी केले. अंकुर या पहिल्या सिनेमापसून श्याम बेनेगल यांच्रा सिनेमा मुख्यत्वे स्त्री प्रधान राहिला. समाजाच्या संवेदना सर्वसामान्य लोकांपर्यंत भिडाव्यात म्हणून बेनेगलांनी प्रेक्षकसुलभ संवाद वापरले.  कथनशैली सरळ सोपी राहावी, पटकथेत गुंतागुंत असू नये याची दक्षता घेतली. समांतर सिनेमाची सौंदर्यमूल्ये, तिरकस बुद्धिगम्य मांडणी आपल्या सिनेमापासून बुद्ध्याच दूर ठेवली. टाळ्या मिळाव्यात अशा  सौंदर्यपूर्ण चौकटी देण्याचा मोह टाळला. दृश्यरचनेची उत्तम समज असलेला गोविंद निहलानींसारखा कुशल कॅमेरामन मिळावा हे बेनेगल यांचं भाग्यच म्हणायला हवं. बेनेगली सिनेमाच्या यशात निहलानी याचंही मोलाचं योगदान आहे. कुशल तंत्रज्ञांची एक टीम बेनेगल यांनी बाळगली होती त्यामुळे त्यांच्या सर्वच सिनेकृती प्रेक्षणीय बनल्या.


“श्याम बेनेगल यांच्यासारखा दिग्दर्शक भेदक चित्रपट बनवतो, तरी त्यांचं स्थान सत्यजित रे यांच्या खालोखाल आहे हे जाणकार रसिक ओळखतात. लोकप्रिय माध्यमात काम करूनही, सामान्य प्रेक्षकाची दृष्टी सखोल करणं त्यांना जमलं नाही.”
- हे एका समीक्षक मित्राचं श्याम बेनेगल यांच्या सिनेकारकिर्दीची प्रतवारी ठरवणारं विधान! 

बेनेगल यांचं निधन झाल्यावर बेनेगल आणि त्यांचा सिनेमा यावर वृत्तपत्रात लेखांचा पाऊस पडला. कलाक्षेत्रातील व्यक्ती काळाच्या पडद्यावर गेल्यावर प्रसारमाध्यमातून घडणारी ही साहजिक कृती. अशा प्रतिक्रिया सर्वसाधारणपणे कलावंताचा गौरव करणाऱ्या असतात. सुरवातीला नोंदलेली प्रतिक्रिया मात्र बेनेगल यांच्या दिग्दर्शकीय गुणवत्तेवर  प्रश्न उपस्थित करणारी आहे.

आता मुद्दा असा की, सिनेमासारख्या कलाक्षेत्रात खरोखर अशी काही वर्णव्यवस्था असते का ? 

व्यावसायिक सिनेमा ... समांतर सिनेमा ... न्यू वेव्ह सिनेमा ... . असे विभाग आपल्या सिनेमात आहेत. दिग्दर्शकाच्या सिनेमा या माध्यमाकडे पाहण्याच्या दृष्टीवर, हाताळणीवर हे विभाग निर्माण झाले आहेत. बेनेगलचा सिनेमा या विभागात कुठे बसतो हे ठरवता येईल पण तो अमुक प्रकारचा आहे म्हणून कमी दर्जाचा असं म्हणता येईल का? किंवा विशिष्ट वर्गात मोडत असल्याने एखादा सिनेमा श्रेष्ठ व कनिष्ठ मानता येईल का? बरेच प्रश्न आहेत. पण सत्य हे की, बेनेगलच्या सिनेमाची  किंवा इतर कोणत्याही दिग्दर्शकाची गुणवत्ता एका विशिष्ट गटाचे निकष लावून  तपासता येणार नाही. 

बेनेगल यांचा सिनेस्वभाव, सिनेमाध्यमातील हे सर्व प्रकार समजून घेणारा आहे. स्वशैलीचा  सुयोग्य वापर करू पाहणारा, त्यातून स्वतःचा असा सिनेमा निर्माण करायला धडपडणारा हा कलाकार आहे. जाहिरातपट निर्मितीतून पूर्ण लांबीच्या सिनेमानिर्मितीकडे उत्क्रांत झालेला हा सिनेदिग्दर्शक आहे.

सिनेमा हा व्यवसाय आहे पण धंदा नाही - ही समज मनात बाळगून बेनेगल यांनी या करमणूकक्षेत्रात पाऊल ठेवलं. करमणूक हा काही फक्त पाच अक्षरी शब्द नाही. बौद्धिक करमणूक म्हणून एक करमणुकीचा प्रकार आहे. तो समोर ठेवून बेनेगल यांनी सिनेनिर्मिती केली. तसं पाहिलं तर बेनेगल यांचा सिनेमा आधी उल्लेखलेल्या तिन्ही विभागात न बसणारा सिनेमा म्हणावं लागेल. मूक सिनेमाचं युग संपलं आणि ध्वनी वापरून पडद्यावरील पात्रांना बोलकं करणारा सिनेमा आला. सिनेमासाठी बोलपट हा शब्द वापरला जाऊ लागला. नंतरच्या काळात भारतीय सिनेमा नको इतकी बडबड करायला लागला. चित्रपट म्हणजे पडद्यावरली नाटकं होऊन गेली. सिनेमा सायलेंट होता तेच ठीक होतं असं म्हणायची पाळी प्रेक्षकांवर आली. आजही आपल्याकडले बहुतांश सिनेमे ‘बोलपट’ या विशेषणाच्या बाहेर येताना दिसत नाहीत. मात्र ज्याला जाणीवपूर्वक ‘चित्रपट’ म्हणता येईल असे सिनेमे काढणाऱ्या सिनेदिग्दर्शकात  बेनेगल यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.

बेनेगल यांच्या सिनेनिर्मितीच्या काळात चित्रचौकटी आणि दृश्यातून अधिकाधिक संवाद साधू पाहणारा ‘न्यू वेव्ह सिनेमा’ डोकं वर काढत होता. त्याला सिनेजगतात प्रतिष्ठादेखील प्राप्त झाली होती. सिनेमाचं हे नवं दृश्यप्रधान रूप चांगलं की वाईट ही गोष्ट वेगळी, पण सिनेमाचं हे रूप बेनेगल यांच्या सिनेप्रकृतीला मानवणारं नव्हतं. प्रेक्षकांना कोड्यात टाकणाऱ्या, दृश्यप्रधान चित्रणाने संवाद साधू पाहणाऱ्या ‘इंटलेक्चुअल’ वर्तुळापासून दूर राहणंच त्यांनी पसंत केलं. संवाद, ध्वनी आणि दृश्य या घटकांचा शहाणा संगम घडवून आणणारा सत्यजित राय यांचा सिनेमा बेनेगल यांना जवळचा वाटला. आता याला तुम्ही मध्यममार्गी म्हणा किंवा आणखी काही.

सत्यजित राय यांच्या तोडीचा सिनेमा श्याम बेनेगल बनवू शकला नाही हे माझ्या मित्राचं विधानं पूर्णपणे खोटं नाही. पण न्यायाधीश बनून असा निवाडा करण्याआधी सिनेनिर्मिती ही एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा नव्हे हे आपण समजून घेतलं पाहिजे. सिनेमा हा सिनेमा असतो. विशिष्ट जातकुळीचा आहे म्हणून तो चांगला किंवा वाईट नसतो.

सत्यजित राय सिनेविश्वातल्या अनेकांचा गुरू. तसा तो बेनेगल यांचाही होता. पण म्हणून त्यांनी सत्यजित रायच्या शैलीची कॉपी करणारे सिनेमे काढले नाहीत. आपला सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करेल असा प्रयत्न ते करत राहिले. बेनेगल यांच्या यशस्वी कालखंडात देखील त्यांच्या सिनेमाची तुलना सत्यजित राय यांच्या कलाकृतीशी कोणी केली नाही. मात्र आज ती होते आहे. दोन विभिन्न पातळीवरच्या कलाकारांमध्ये डावे उजवे ठरवायची ही सवय आपण कधी सोडणार...? अशी तुलना करू पाहणाऱ्यांना ना सत्यजित राय समजले ना श्याम बेनेगल! तसं पाहता, श्रेष्ठ कनिष्ठ ही वर्गवारी वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून असते. दिग्दर्शक त्याच्या मनातला सिनेमा पडद्यावर आणू पाहतो. आपल्या मनातल्या ट्रेसिंग पेपरशी दिग्दर्शकानं रेखाटलेली चित्रकृती जुळली की ती चित्रकृती आपल्याला आवडते. इतकं साधं आहे हे.

कोणत्याही तडजोडी न करता प्रेक्षकस्नेही सिनेमा निर्माण करायचा बेनेगल यांचा मानस होता. चित्रपटांच्या बाबतीत प्रेक्षणीयता आणि प्रेक्षकशरणता ही दोन भिन्न विशेषणे आहेत. बेनेगल यांनी कायमच प्रेक्षणीयता महत्त्वाची मानली. त्यांच्या सुदैवाने भारतीय प्रेक्षकांचा एक गट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाहून बराच प्रगल्भ झालेला होता. आणि तो नव्या प्रवाहातले चाकोरीबाहेरचे सिनेमे पाहण्यासाठी आसुसलेला होता. ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला आणि श्याम बेनेगल नावाच्या दिग्दर्शकाकडे या नवप्रेक्षकांचं आणि समीक्षक मंडळींचं लक्ष वेधलं गेलं. ‘अंकुर’च्या सादरीकरणातला नेमकेपणा, कमी शब्दांत कथा मांडू पाहणारी भक्कम पटकथा यामुळे नवप्रेक्षकांनाच नव्हे तर नाचगाणीवाल्या व्यापारी हिंदी सिनेमाला विटलेल्या सुजाण प्रेक्षकांना देखील तो वेधक वाटला.

बॉक्सऑफिसवर आपला सिनेमा हिट व्हावा अशी बेनेगल यांची अपेक्षा नव्हती. पण जाणकार मंडळीत आणि सिनेसमीक्षक वर्तुळात अंकुर सिनेमाचा बऱ्यापैकी गाजावाजा झाला. या अनुभवामुळे सिनेक्षेत्रात आपण आपण काही  करू शकतो असा आत्मविश्वास  बेनेगल यांना वाटला तर नवल नाही. नव्या उत्साहाने त्यांनी सिनेनिर्मितीत झोकून काम केलं. अंकुरनंतरच्या त्यांच्या निर्मितीला देखील देशात चांगला प्रतिसाद मिळत गेला, आणि विदेशातल्या महोत्सवांतही पुरस्काराने त्यांचा सिनेमा गौरवला गेला. बाजारू हिंदी सिनेमा आणि बुद्धिवादी रसिकांसाठी बनवलेला समांतर लाटेतला सिनेमा यांच्यातील सुवर्णमध्य वाटावा असा बेनेगली सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत प्रतिष्ठेने वावरू लागला. समीक्षक डोळसपणे त्यांच्या सिनेमाची चिकित्सा करू लागले. आपल्या वैशिष्टपूर्ण सिनेकृतींनी चित्रपटसृष्टीत श्याम बेनेगलनी अल्पावधीत लक्षणीय स्थान निर्माण केलं.

बेनेगल यांच्या निर्मितीआलेखावर नजर टाकली तरी लक्षात येईल की, त्यांनी वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत. प्रत्येक वेळी नवा विषय  नवे वातावरण हाताळताना त्यांनी आपली चित्रणशैली फिरती ठेवली. नट मंडळींचा संच मात्र बहुतांशी कायम ठेवला. त्या काळी तुलनेने अपरिचित असलेल्या कलाकारांना त्यांनी मोठं केलं. त्यांचे कलावंतदेखील हे मान्य करतात. पण खुद्द बेनेगलांना हे मान्य नव्हतं. ते म्हणायचे, “त्यांच्या अभिनयाने माझ्या सिनेमाला वजन प्राप्त झालं. हे कलावंत जात्याच गुणवान होते. मी माझ्या सिनेमात त्यांना संधी दिली हे खरं, पण ती नसती दिली तरी आपल्या अभिनयकलेने या अभिनेत्यांनी सिनेक्षेत्र गाजवलेच असते.”

नम्र स्वभावाच्या या दिग्दर्शकानं प्रेक्षक अभिरुचीच्या, आकलनाच्या मर्यादा ओळखून सिनेमाध्यम  समर्थपणे हाताळलं. ते करताना प्रेक्षक हा घटक त्यांच्या लेखी महत्त्वाचा होता मात्र ते या घटकाच्या आहारी गेले नाहीत. सेक्स, हिंसा, संघर्ष, नृत्य यांची रेलचेल असलेल्या बाहेरच्या बाजारू हिंदी सिनेमापासून त्यांनी आपला सिनेमा दूर ठेवला. परिणामी हिंदी सिनेमातील सवंगपणाला विटलेला चोखंदळ प्रेक्षकवर्ग त्यांच्या सिनेमाला गर्दी करू लागला. सिनेमा असाही असतो हे त्यांनी आपल्या सिनेआविष्कारांनी सिनेजगताला दाखवून दिलं. कलेशी प्रामाणिक असलेला निर्माता मुख्य प्रवाहात राहून लोकांना भावेल असा सिनेमा काढू शकतो, सामाजिक समस्यांना गंभीरपणे पडद्यावर आणू शकतो हे हिंदी सिनेमातील दिग्गज निर्मात्यांना आणि समीक्षकांना दाखवून दिलं. मुख्य प्रवाहातच राहून लोकांना भावेल असा सिनेमा काढणे; तोही करमणुकीच्या रूढ संकल्पना झुगारून; ही सहजसाध्य गोष्ट नाही. विशेष म्हणजे सामाजिक विषयावरला सिनेमा पाहणारा प्रेक्षक देशात अस्तित्वात आहे हा संदेश निर्मात्यांपाशी आणि वितरकांपाशी पोहोचवणं महत्त्वाचं होतं. बेनेगलच्या सिनेमानं अप्रत्यक्षपणे या वास्तवाकडे लक्ष वेधलं. सेमी-कमार्शियल सिनेउद्योजकांना आकर्षित केलं.

सत्तरीनंतर श्याम बेनेगल यांचा सिनेमा विशिष्ट प्रेक्षकथरांत आणि घरांत अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. गंभीर विषयावरले सिनेमे पाहण्यासाठी उत्सुक असलेला तरुणांचा  एक समूह  बेनेगल यांच्या सिनेमाचा आज फॅन बनला आहे. भोवतालच्या सामाजिक समस्यांबद्दल आस्था असलेला, सिनेसोसायट्यांनी शिक्षित केलेला, वेगळं काहीतरी पाहायची तहान असलेला, असा लहान का होईना एक प्रेक्षकसमूह आज समाजात निर्माण झाला आहे. त्यांची संख्या नगण्य नाही. गरज आहे, ती त्यांना प्रेक्षागृह आणि इतर सुविधा पुरवण्याची.

सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक यांच्या सिनेशैलीच्या नकला करण्याचं नाकारून बेनेगल यांनी स्वतःचा लक्षणीय सिनेमा उभा केला. बासू चटर्जी यांनी आधी असा प्रयत्न केला होता. पण त्यांचा सिनेमा मुख्यत्वेकरून कौटुंबिक वातावरणातल्या स्त्री-पुरुष नात्यातल्या हलक्याफुलक्या तणावांशी खेळत राहिला. मध्यमवर्गीय विषयाची कक्षा रुंदावण्याचे फारसे प्रयत्न त्यांच्याकडून झाले नाहीत. बेनेगलनी एक पाऊल पुढे टाकून कौटुंबिक कलहातून समाजाचा विस्तृत पट मांडायला सुरवात केली. सामाजिक विषयाची नवी दालने उघडली. वंचित समाजात सर्वाधिक वंचित स्त्रिया असतात. त्यांची घरीदारी होणारी कुचंबणा, मानसिक, शारीरिक छळ, ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ समाजातला संघर्ष हे श्याम बेनेगल यांच्या चित्रपटाचे विषय झाले. सिनेप्रेक्षकांना त्यांनी बाहेरील विश्वाची दखल घ्यायला लावली. पांढरपेशा सुखवस्तू समाजाला सामाजिक पिळवणुकीचं दर्शन घडवून त्यांनी अस्वस्थ केलं. समाज हा एका परीने त्यांच्या सिनेमाचा नायक बनला, पात्रे निमित्तमात्र होती. प्रत्येक वेळी नवा विषय, नवे वातावरण पडद्यावर साकारण्याचे उद्योग केले. विषयानुसार चित्रणशैली बदलती  ठेवली.


हेही वाचा - सामाजिक स्थित्यंतरे आणि हिंदी चित्रपट (लेखक - मेघनाद कुळकर्णी)


‘समाजभान पेरणारा दिग्दर्शक’, ‘आपल्या समाजाची स्थिती गती मांडणारा दिग्दर्शक’ असे बेनेगल यांचे मोजक्या शब्दात अचूक वर्णन पत्रकारांनी केले. अंकुर या पहिल्या सिनेमापसून श्याम बेनेगल यांच्रा सिनेमा मुख्यत्वे स्त्री प्रधान राहिला. समाजाच्या संवेदना सर्वसामान्य लोकांपर्यंत भिडाव्यात म्हणून बेनेगलांनी प्रेक्षकसुलभ संवाद वापरले. कथनशैली सरळ सोपी राहावी, पटकथेत गुंतागुंत असू नये याची दक्षता घेतली. समांतर सिनेमाची सौंदर्यमूल्ये, तिरकस बुद्धिगम्य मांडणी आपल्या सिनेमापासून बुद्ध्याच दूर ठेवली. टाळ्या मिळाव्यात अशा  सौंदर्यपूर्ण चौकटी देण्याचा मोह टाळला. दृश्यरचनेची उत्तम समज असलेला गोविंद निहलानींसारखा कुशल कॅमेरामन मिळावा हे बेनेगल यांचं भाग्यच म्हणायला हवं. बेनेगली सिनेमाच्या यशात निहलानी याचंही मोलाचं योगदान आहे. कुशल तंत्रज्ञांची एक टीम बेनेगल यांनी बाळगली होती त्यामुळे त्यांच्या सर्वच सिनेकृती प्रेक्षणीय बनल्या.

बेनेगलांचा सिनेमा प्रामुख्यानं कथनात्मक अंगाने प्रवास करतो. ‘सांगत्ये ऐका’ या पुस्तकावर बेतलेला ‘भूमिका’ हा अपवाद. ‘एका रेषेत कथन केल्यानं सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यातील सामाजिक आशय थेटपणे भावेल’ असा विचार यामागे असायचा, असं बेनेगल यांनीच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

पार्श्वसंगीत या प्रकाराकडे बेनेगल यांनी फार चिकित्सकपणे पाहिल्याचं आढळत नाही. मंथन चित्रपटात मात्र त्यांनी संगीताचा सर्जनशील वापर केला. संगीतकार वनराज भाटिया याचंदेखील यात लक्षणीय योगदान आहे. बेनेगल यांच्या समग्र कलाकृतींकडे पाहिलं की आपल्या मनातले विचार प्रभावीपणे पडद्यावर उतरवण्यासाठी त्यांनी घेतलेले  विशेष परिश्रम जाणवतात. त्यांच्या सिनेमाची वितरण मर्यादा लक्षात घेता किमान बजेटमध्ये त्यांना हे साधावं लागलं असणार.

बेनेगल यांच्या सर्वच निर्मिती उत्तम होत्या असं म्हणता येणार नाही. त्यांचे काही प्रामाणिक प्रयत्न हे सदोष पटकथा किंवा इतर कारणांमुळे गोंधळलेले वाटले आणि अपेक्षित परिणाम साधण्यात कमी पडले. प्रत्येक चित्रपटातून सामाजिक विधान करण्याची त्यांची धडपड मात्र  दाद देण्याजोगी असायची. भारतीय समाजाचं वास्तव त्यांनी ज्या जोरकसपणे आपल्या कलाकृतीतून  सादर केलं तो दृश्यानुभव अस्वस्थ करून सोडणारा आहे.

केव्हातरी कुणीतरी श्याम बेनेगल यांच्या सिनेमाविषयक विचारांचा आणि त्यातून प्रदर्शित झालेल्या सामाजिक दायित्वाचा सांगोपांग वेध घ्यायला हवा.

- अवधूत परळकर
awdhooot@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, सिनेसमीक्षक आणि लेखक आहेत.)

Tags: shyam benegal parallel cinema समांतर सिनेमा श्याम बेनेगल सामाजिक सिनेमा सिनेमा Load More Tags

Comments:

राज शिंगे

एक तटस्थ पणे सिनेमा काळ, प्रेक्षक, रसिक यांच्यातील वाढणारी समज, तंत्र,विचार,मांडणी,परिणाम साधताना स्वतःचा सिनेमा तयार करण्याची मानसिकता,निर्मिती ची रचना या सर्व परिस्थितीचे अवलोकन,चिंतन या समग्र लेखातून व्यक्त झाले आहे

विष्णू दाते

थोर दिग्दर्शक!

Add Comment