हमीद दलवाई यांच्या कथात्म साहित्यातील कोकण

हमीद दलवाईंचे साहित्य आणि समाजकार्य या विषयावर दिनांक 13 व 14 डिसेंबर 2019 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, साधना साप्ताहिक व हमीद दलवाई रिसर्च इन्स्टिट्युट यांच्यातर्फे घेण्यात आलेले हे चर्चासत्र एकूण सहा सत्रांमध्ये पार पडले. त्यामध्ये रझिया पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दलवाईंच्या कथात्म साहित्यावरील सत्रातील प्रवीण बांदेकर यांचे हे भाषण. 

कोकणात राहून लिहिणारा एक समकालीन मराठी लेखक म्हणून मी जेव्हा माझ्या संवेदनविश्वाला जवळ जाणाऱ्या कोकणाशी संबंधित असलेल्या पूर्वसूरींचा विचार करतो, तेव्हा किमान तीन नावांचा मला प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. त्यांमध्ये 'शेलूक' आणि 'रेडग्रीन' यांसारखे कथासंग्रह लिहिणारे आ. ना. पेडणेकर, 'शबय' हा कथासंग्रह लिहिणारे मनोहर कदम आणि 'इंधन' सारखी अप्रतिम कादंबरी आणि अनेक उत्तम कथा, तसेच प्रामुख्याने भारतीय मुस्लिम समाजाला केंद्रस्थानी ठेवून चालवलेल्या आपल्या प्रबोधनपर चळवळींना पूरक ठरणारे वैचारिक साहित्य लिहिणारे हमीद दलवाई यांचा समावेश करावा लागेल. या लेखकांचे अन्य कोकणी लेखकांहून असलेले वेगळेपण प्रामुख्याने त्यांच्या लेखनातून जाणवत राहणाऱ्या बहुजनाभिमुख आणि वास्तववादी भूमिकेत आहे. त्याच प्रमाणे या लेखकांना असलेले त्यांच्या काळाचे भान ही गोष्टही मला त्यांचे वेगळेपण अधोरेखित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची वाटते. 

हे तीनही लेखक कमीअधिक प्रमाणात पुरोगामी विचारांच्या चळवळींशी संबिंधत होते. हमीद दलवाई हे तर थेटपणे मुस्लिम सुधारणावादी चळवळींशी जोडले गेले होते. त्यांचे सर्जनशील कथात्म लेखन आणि वैचारिक लेखन परस्परांना आणि दलवाई यांच्या सामाजिक, राजकीय भूमिकेला पूरक ठरणारेच होते. त्यामुळेच दलवाईंच्या कथात्म साहित्याचे वेगळेपण स्पष्ट करताना त्यांच्या वैचारिक लेखनामधून दिसणारी भूमिका आणि कोकणातील अन्य पूर्वसूरी लेखकांपेक्षा त्यांना वेगळे ठरवणाऱ्या - बहुजनाभिमुख दृष्टिकोन, वास्तववादी जाणिवा, लेखनांतर्गत नैतिकता, लेखकाचे स्वतःचे असे सामाजिक तत्त्वज्ञान आणि या लेखकाला असलेले आपल्या काळाचे भान यांसारख्या काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील, असे वाटते.

हमीद दलवाई यांचे कथात्म लेखन कोकणातील अन्य लोकप्रिय लेखकांपेक्षा वेगळे ठरण्याचे पहिले महत्त्वाचे कारण अर्थातच दलवाई यांच्या लेखनातील वास्तववादी जाणिवा हेच आहे. मराठी साहित्यात महत्त्वाचे गणले गेलेले कोकणातील पेंडसे, खानोलकर, दळवी, कर्णिक यांच्यासारखे लेखक प्रामुख्याने रोमँटिक जाणिवांनी लिहिणारे, वाचकाला त्याच्या दैनंदिन जगण्यातील वास्तवापासून दूर नेणारे, गूढ, अगोचर, अतार्किक स्वरूपाचे असे लेखन करणारे होते. या लेखकांच्या भावविश्वामध्ये प्रामुख्याने उच्चवर्णीयांचे लिंगपिसाट स्वैर वर्तन, स्त्रीकडे भोगवादी वस्तू म्हणून पुरुषप्रधान, वर्चस्ववादी नजरेतून पाहणे, नियती, दैववादी दृष्टिकोन यांच्या आहारी जात वैज्ञानिक व विवेकनिष्ठ जाणिवांकडे दुर्लक्ष करणे, रंजनवादी मूल्यांना प्राधान्य देत समाजवास्तव, भाषेचे गंभीरपणे केलेले उपयोजन, कालावकाश यांकडे दुर्लक्ष करणे अशा काही प्रवृत्ती दिसत राहतात.

या पार्श्वभूमीवर दलवाईचे कथात्म साहित्य पाहिले असता काय दिसते? दलवाईंनी लिहिलेली 'इंधन'सारखी एकमेव कादंबरी असो वा त्यांच्या 'लाट' वा 'जमिला जावद' यांसारख्या कथासंग्रहांमधील कथा असोत, हे लेखन कुठेही वास्तवाच्या भूमीवरून ढळत नाही. या साहित्यातील पात्रे, त्यांच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या घटना, त्यांच्या तोंडची भाषा, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, इच्छा, विकार, वासना, आकांक्षा, सगळं काही आपल्या आसपासच्या वास्तवातील माणसांशी घट्टपणे जोडलं गेलेलं आहे हे सतत जाणवत राहतं. दलवाईंच्या कथात्म साहित्यात आढळणारी काही प्रमुख आशयसूत्रे पाहिली, तरी हे लक्षात येऊ शकतं.
 
'इंधन' या कादंबरीमध्ये तत्कालीन कालावकाशाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्वसामान्य मुस्लिम समाजातील ताणेबाणे, गावगाड्यातील सामाजिक वा सांस्कृतिक व्यवहार दलवाईंनी रंगवले आहेत. कोकणातील गावगाड्यातील मुस्लिम समूहाचे इतके तपशीलवार वास्तवचित्रण त्या आधी वा नंतरही मराठी साहित्यात आलेले दिसत नाही. आपल्या रोजमर्रा जीवनामध्ये पावलोपावली संघर्ष कराव्या लागणाऱ्या कोकणातील मुस्लिम खोतांचे दलवाईनी त्यांच्या साहित्यातून केलेले चित्रण आणि कामवासनांनी पाछाडलेले पेंडसे-खानोलकर यांनी रंगवलेले रंगेल खोत यांची अभ्यासकांनी तुलना करून पाहायला हरकत नाही. यासोबतच कोकणातील गावगाड्यातील कुटुंबव्यवस्थेतील ताणेबाणे, नातेसंबंध, रूढीपरंपरांची बंधने, पुरुषी मानसिकता आणि एकंदर स्थितीशील समाजव्यवस्था यांमुळे स्त्रियांची होणारी घुसमट, कुचंबणा यांचे दलवाईंनी केलेले चित्रणही पाहता येईल. 

'इंधन'मधील भाबी, सुदामाची बायको, परटीण, सुमती, वाण्याची बायको यांसारख्या स्त्रिया या कोकणात आजही कुठल्याही गावात समाजव्यवस्थेला बळी पडणाऱ्या, कुटुंबव्यवस्थेच्या काटेकोर चाकोरीत पिचल्या जाणाऱ्या स्त्रिया आहेत हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. दलवाई यांच्या कथांमधूनही अशाच रुढीपरंपरा, अंधश्रद्धा, कुळाचार, लिंगव्यवहार, पुरुषी वासना यांच्या बळी ठरणार्या स्त्रिया भेटतात. उदा० ‘छप्पर’ कथेतील आई, 'कळ'मधील शरीरविक्रय करून बापाचे घर चालवणारी ती, 'पराभूत'मधील मसुदखानची बायको, 'लाट'मधील सुमित्रा गोखले, 'आमच्या घरची गोष्ट'मधली सुरेय्याआपा, 'नर'मधली लॉड्रीतली मुलगी, 'जमिला जावद'मधली जमिला या स्त्रिया पाहता येतील. 

तत्कालीन कोकणी खेड्यापाड्यांतील दारिद्र्य, तिथल्या लोकांच्या अंधश्रद्धा, जातीपातींअंतर्गत सामाजिक व सांस्कृतिक व्यवहार, देवस्थानपद्धती, निसर्ग व ऋतुमानांतील बदल व त्या बदलांचा लोकमानसावर व परस्परसंबंधांवर होणारे सूक्ष्म परिणाम इत्यादी अनेक वास्तववादी तपशील दलवाईंच्या या कथात्म साहित्यात दिसून येतात. 'छप्पर' कथेतील आईला घराच्या छप्परामुळे आपल्या कुटुंबाची भरभराट झाली असे वाटते, त्यामुळे त्या काळोख्या घरामुळे क्षयाची बाधा होऊन घरांतली माणसे डोळ्यांदेखत मरत असतांनाही ती आपल्या मुलाला उजेडासाठी ते छप्पर तोडण्याच्या विचारांपासून परावृत्त करते. अशीच अंधश्रद्धाळू मानसिकता ‘तळपट’ या कथेतील गावगाड्यातील माणसांमध्येही दिसते. गवताच्या गंजीला लावलेल्या आगीचा सोक्षमोक्ष लावताना अण्णा बामणानं नारळ उचलून खोटी शपथ घेतल्यामुळेच त्याचा मृत्यू ओढवला असं लोक समजतात. 

'इंधन' कादंबरीमध्ये आलेला पालखी सोहळा, ढोल वाजवण्याची प्रथा, महालक्ष्मी देवीची गावातल्या हिंदू व मुस्लिम स्त्रियांकडून उलफे देऊन ओटी भरण्याची प्रथा, अशा कोकणी जनसमूहाच्या देवदेवस्कीच्या मानिसकतेशी जोडल्या गेलेल्या पारंपरिक गोष्टी आणि बदलत्या सामाजिक वास्तवात त्यांचा हिंदू-मुस्लिम संबंधांवर होणारा परिणाम दलवाईनी समाजसंस्कृती अभ्यासाच्या अंगाने टिपल्या आहेत. याच कादंबरीमध्ये विविध ऋतूंचा कोकणातील त्या कृषीसंस्कृतीशी संबंधित असलेल्या गावावर, तिथल्या निसर्गावर आणि गावातल्या लोकांच्या मानसिकतेवरही होणारा परिणाम अत्यंत सूचक शब्दांतून चित्रित करण्यात आला आहे. दलवाईंना एक सृजनशील लेखक म्हणून असलेले कलात्मक भानही त्यातून अधोरेखित होते. उदाहरणार्थ, या कादंबरीतील एक पात्र सुमती कादंबरीच्या नायकाला, सगळं गाव बदललं, जग बदललं, तू मात्र आचाराने, विचारांने होतास तसाच राहिलास, याची जाणीव करून देते. हे ऋतुमानातील बदलानेही लेखकाने कसे सुचवले आहे, ते पाहता येईल. “...त्या अवधीत पडलेल्या वाऱ्याला जीव आलेला मी पाहिला आणि तरंगणाऱ्या धुक्याला उडवून तो मैलच्या मैल वाहून नेत असल्याचे रोज पाहू लागलो; वाशिष्ठीचे पात्र तेव्हाच अनेकदा तट्ट फुगले आणि रोडावले. पात्रातील वाळूच्या थरांनी अनेकदा जागा बदलल्या: त्यांचे कधी डोंगर रचले गेले आणि नाहीसे झाले. ते पाहताना मला कष्ट वाटू लागले की, मी एके ठिकाणीच बसून राहिलो आणि जगच पुढे चालले आहे. गेली पंधरा वर्षे हे असेच चालते आहे. इतरांबरोबर चालायचे त्यांना गाठायचे त्राणही आपल्यात राहिलेले नाही.” ('इंधन', पृ. 54)

'दहा रुपयांची नोट'सारख्या कथेमध्ये कोकणातील साठ-सत्तरच्या दशकातील हिंदू, मुस्लिम समाजातील दारिद्र्याचे अत्यंत वास्तववादी स्वरूपाचे चित्रण आले आहे. इथे आर्थिक बाबतीत हिंदू वा मुसलमान दोहोंतही काही फरक नाही. ही रोजच्या जगण्यासाठी काबाडकष्ट उपसणारी सामान्य माणसे आहेत, याचे भान लेखकाला आहे. त्यामुळेच गौरी-गणपतीच्या सणासाठी हिंदू लोक कर्ज काढतात किंवा कसाबसा सण साजरा करतात तसाच मुसलमानही ईदचा सण पैसे उसने घेऊन वा काटकसरीत कसा तरी साजरा करतात, इथे पैसे उसने मागणारी माणसे आहेत, तरीही त्या तशा गरिबीतही आपला स्वाभिमान जपणारी, सामूहिक हीत जपू पाहणारी, तत्त्वाने वागणारी माणसेही आहेत. या कथेतील रामचे पात्र अशा कोकणी माणसांचे प्रतिनिधित्व करते, असे दिसते. 

या कथेप्रमाणेच कोकणातील विविध प्रवृत्तींचे दर्शन दलवाई यांच्या कथात्म साहित्यातून दिसून येते. अनेक कथांमध्ये नायक वा नायिका मुसलमान समाजातील असल्या तरी त्या प्रवृत्तींमध्ये फारसा फरक पडलेला नाही हेही लक्षात येते. दलवाईंना असलेले काळाचे अचूक भानही यातून अधोरेखित होते. साधारणतः 1950 नंतरच्या काळातील माणसांचे सामाजिक, आर्थिक स्तर, विचार करण्याची पद्धती, विविध जातीधर्माच्या लोकांशी असलेले संबंध यांविषयी दलवाईंइतक्या नेमकेपणाने दुसऱ्या कुठल्याही कोकणातील लेखकाने लिहिलेले दिसत नाही. 

हमीद दलवाई यांच्या कथात्म साहित्याबाबत विचार करताना माझ्यासारख्या लेखकाला त्यांच्याशी जोडून घेणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे लेखकाची लेखनांतर्गत नैतिकता. समाजात रूढ असलेल्या, परंतु कालबाह्य, अविवेकी, पुरुषसत्ताक, अशास्त्रीय, समाजातील काही घटकांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या अशा स्वरूपाच्या काही रूढी, परंपरा, चालीरीती इ.च्या विरोधात लेखकाने त्याच्या लेखनामधून भूमिका घेणे अभिप्रेत असते. मात्र समाजातील बहुसंख्य लोक हे पारंपरिक मानसिकतेला घट्टपणे जखडलेले असतात. त्यांच्या पचनी न पडणाऱ्या, परंपरेमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या, तिची मोडतोड करू पाहणाऱ्या गोष्टी स्वीकारण्याकडे सर्वसामान्य वाचकांचा कल नसतो. एका अर्थी लेखकाने आपल्या परंपराप्रिय समाजातील जात, धर्म, ईश्वर, संस्कृती यांसारख्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू नये, असे सर्वसामान्य वाचकाला वाटत असते. वाचकांची ही मानसिकता ओळखून वाचकांचा अनुनय करणारे लेखन करणेच बहुसंख्य लेखक पसंत करतात. असे करण्यामुळे संबधित लेखकांचे लेखन वाचकप्रिय ठरण्याची जास्त शक्यता असते. कोकणातील बहुसंख्य लोकप्रिय लेखकांचे लेखन या प्रकारचेच आहे. कोकणातील पारंपरिक श्रद्धा, लोकरुढी, कुळाचार, देवदेवस्की, यांना बळकटी देणारे, कसलीही चिकित्सा करण्याऐवजी परंपराप्रिय लोकमानस गोंजारणारे लेखन या लेखकांनी केलेले दिसून येते.

कोकणातील या अन्य लेखकांच्या लेखनाच्या पार्श्वभूमीवर हमीद दलवाई यांचे लेखन पाहिले असता काय दिसते? इंधन या कादंबरीचा नायक हा लेखकाचा व्यक्‍तिगत विचार आणि भूमिकेचे प्रतिनिधित्व करणारा protagonist म्हणून येतो. या नायकाच्या कृती आणि विचार यांमधून लेखक आपली भूमिका व्यक्‍त करताना दिसतो. लेखकाप्रमाणे कादंबरीचा नायकही कोकणातील एका गावात, मुस्लिम समाजात जन्माला आलेला आणि वाढलेला आहे. त्याच्यावर साहजिकच या धर्माच्या आचार, विचार, संस्कारांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आहे. तसे करण्यातच त्याचे भले आहे. 

अर्थात, दलवाई यांचा हा नायक या समाजमान्य चाकोरीला आव्हान न देता जगत राहिला असता तर तो अन्य लोकप्रिय कादंबऱ्याच्या नायकांप्रमाणे रूढ आणि समाजमान्य नैतिकतेचे पालन करणारच ठरला असता. त्याऐवजी तो आपल्या धर्मातील अनिष्ट रूढीपरंपरांना विरोध करतो. मुस्लिम धर्मातील प्रचलित कालबाह्य समजुती, सुधारणाविरोधी रूढी, अशास्त्रीय, मानवताविरोधी गोष्टी त्याला त्याज्य वाटतात. त्याविरोधात तो बोलतो, वर्तमानपत्रांतून लेखन करतो. त्यामुळे साहजिकच तो त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, गावातील माणसे यांची नाराजी ओढवून घेतो. (“इंधन', पृ. 9)
 
तो नमाज पढायला नकार देतो, धर्मनिरपेक्षता आणि नास्तिकतेचा जाहीर पुरस्कार करतो, मुस्लिम लिगसारख्या धर्मांध संघटनेला विरोध करतो, पारंपरिक मुस्लिम टोपीऐवजी गांधी टोपी घालतो, अशा छोट्या मोठ्या असंख्य उदाहरणांतून लेखकाने धोका पत्करून स्वीकारलेली ही नवनैतिकता दाखवून देता येते. ही नवनैतिकता लेखकाला अन्य वाचकानुनयी लेखकांपासून वेगळं ठरवते. दलवाई यांचे लेखक म्हणून प्रामाणिक असणे, स्वतःच्या पूर्वायुष्यातील काही चुकांविषयीही बोलण्याचे धारिष्ट्य दाखवणे, हेही लेखकाच्या नैतिकतेचाच भाग आहे. (उदा. आम्हा चौघांची बाई', 'बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट' यांसारख्या कथा) दलवाई यांच्या कथात्म साहित्यात येणारे त्यांच्या खासगी आयुष्यातील काही तपशील, त्यांच्या वैचारिक भूमिकेत व लेखनांतर्गत भूमिकेत अंतर नसणे यातूनही ही नैतिकता जाणवू शकते.

लेखकाने एखादया सामाजिक प्रश्नाविषयी लिहिलं की त्याची जबाबदारी संपते का? की, त्याने गरज पडली तर रस्त्यावर उतरून लढण्याचीही तयारी ठेवली पाहिजे? मराठी साहित्याच्या संदर्भात तर लेखक कसलीही बांधिलकी मानत नाहीत, कुठल्याही सामाजिक प्रश्‍नावर ठोस भूमिका घेत नाहीत, मराठी लेखकांकडे स्वतःचा असा राजकीय विचार नसतो, सामाजिक तत्त्वज्ञानाचा अभाव असतो, असे नेहमीच बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर दलवाईंसारख्या - लेखन आणि जगणे यात जराही अंतर नसलेल्या लेखकाचे लेखन म्हणूनच वेगळे ठरणारे आहे. 

मुळात भारतासारख्या परंपराप्रिय देशात एखाद्या सामाजिक, राजकीय वा सांस्कृतिक विषयावर सुधारणावादी हेतूने लेखन करणे, हीच एक अत्यंत जोखमीची गोष्ट बनली आहे. असे लेखन करणे म्हणजे एक प्रकारे समाजव्यवहारात हस्तक्षेप करणेच आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक स्थितिप्रिय बनू पाहणाऱ्या या समाजाला, ही गोष्ट अर्थातच नको आहे. यातून लेखकापुढे अनेक नवे प्रश्‍न उभे राहताना दिसत आहेत. धर्मचिकित्सा, इतिहास अशा विषयांवर लिहू पाहणाऱ्या लेखकांचे या समाजाने काय केले, त्यांना कसे निकालात काढले हे आपण पाहतोच आहोत. अशा पार्श्वभूमीवर दलवाईंसारख्या लेखकाची 'इंधन'सारखी कादंबरी किवा 'कफनचोर', 'धर्म', खुदा हाफिज', 'आम्हा चौघांची बाई' यांसारख्या कथा वाचतांना या लेखकाने अशा स्फोटक विषयांवर लिहिताना, किती प्रकारची जोखीम पत्करली असावी, याचा अंदाज येऊ शकतो.

या कथात्मलेखनामध्ये दलवाईंनी जाणीवपूर्वक वापरलेली, कोकणातील मुस्लिम समाजाशी संबंधित भाषा हेही त्यांच्या साहित्याचे एक वैशिष्ट्य म्हणून नोंदवता येते. 'आमच्या घरची गोष्ट’ या कथेमध्ये, पात्रांच्या संवादासाठी संपूर्णपणे दख्खनी भाषिक प्रयोगांचा वापर केलेला आहे. तर, इंधन ही कादंबरी आणि अन्य अनेक कथा यांमध्ये अनेकवेळा त्यातील मुसलमान समाजाच्या पात्रांचे संवाद वास्तववादी वाटावेत यासाठी त्यांत मुस्लिम समाजाच्या दैनंदिन जगण्याशी - विशेषत: सांस्कृतिक जगण्याशी संबंधित अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्दसमूह, वाक्यांश वगैरेंचा वापर केलेला दिसून येतो. उदा. मकतबमधली सबक, ग्यारवी पढना, मिठ्ठा खाना, कबरस्तानाततली पिराची तुरबत, हिदायत करणे, ताज्जुब वाटणे, जन्नत, परवरदिगार, बोसा, इत्यादी. काही वेळा निवेदनामध्ये मुसलमानी बोलीशी संबंधित अनेक शब्द वापरले जातात. उदा. हसनखानची शादी होऊन दहा वरसं झाली, अजून त्याना अवलाद होत नव्हती. त्याच्या विसाव्या उमरीत बापानं त्याची शादी करुन दिली; आणि तीन वर्षांनी हसनखानची अवलाद न बघताच तो इन्तेकाल झाला (शेरणं 'लाट', पृ. 48) 

काही विस्मरणात जाऊ लागलेले, नव्या पिढीला ठाऊकही नसलेले, खास कोकणी कृषीसंस्कृतीशी संबधित शब्द – उदा. फाणस (कंदिल), हळदोनी (माशांना हळद मीठ लावून केलेली कोकणी पद्धतीची आमटी, तिखलं), गवताच्या वरंडी (गवताचे भारे, पेंड्या), तिरदळ (कुळाने द्यायचे एक तृतीयांश धान्य), पर्‍हर्या (ओढा, वाहाळ) दलवाईंनी वापरून या प्रादेशिक लेखनाला अधिक वास्तववादी बनवले आहे. 

एकूणच, असे म्हणता येते की, कार्यकर्त्याचा पिंड असलेला हा लेखक आपल्या वैचारिक भूमिका, जीवनविषयक तत्त्वज्ञान, समाजनिष्ठा, बांधिलकी, नैतिकता यांसारख्या गोष्टी आपल्या लेखनामधूनही व्यक्‍त करतो. यामुळेच हा लेखक अन्य रंजनवादी लेखकांपेक्षा वेगळा ठरतो. विशिष्ट विचारांनी भारावलेली, ध्येयाने पछाडलेली माणसे, त्यांच्या आयुष्याची होरपळ आपण अनुभवलेल्या कोकण व महानगराच्या पार्श्वभूमीवर दलवाई मांडतात. या सगळ्याच कथात्म साहित्यामधून दिसणारे मानवी नातेसंबंधांचे चित्रण, भावभावनांचा गुंता, विविध वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन विलक्षण आहे. 'इंधन'मधले कादंबरीकार हमीद दलवाई कथाकार दलवाईंपेक्षा अधिक परिपक्व वाटत राहत असले आणि दलवाईंमधला कार्यकर्ता, लेखकापेक्षा वरचढ वाटत राहिला तरी, मराठी समाजसंस्कृतीच्या या टप्प्यावरील काळ आणि प्रदेश समजून घेण्याच्या दृष्टीने दलवाईंच्या साहित्याचे महत्त्व नक्कीच आहे, हे मान्य करावे लागते.

प्रवीण दशरथ बांदेकर, सावंतवाडी
pravinbandekar1969@gmail.com

Tags: book Pravin Bandekar प्रवीण बांदेकर हमीद दलवाई साहित्य कथा हमीद दलवाई चर्चासत्र Load More Tags

Comments:

Pravin

१२३

Gayatri

माणूस आणि गाढव या कथेचा नायक कोण

Arun tingote

आवडलं. छान लिहिले आहे.

डॉ अनिल खांडेकर

हमीद दलवाई यांच्या कथा आणि इंधन कादंबरी मधील वेगळेपण मार्मिकपणे अधोरेखित केले आहे. हे वेगळेपण , दलवाई यांच्या स्पष्ट वैचारिक बैठकीतून आले आहे.

बि. लक्ष्मण

अभ्यासपूर्ण मांडणी, वास्तवदर्शी लेखन नवोदित आणि साहित्यातील प्रवाह मर्यादेपलीकडे मान्य करणाऱ्या पंडीतांनी वचावा असा लेख.

Add Comment