खोडकर लज्जतदार मालवणी ‘कारटो’

कल्पना मलये यांच्या ‘कारटो’ या किशोर कादंबरीचा परिचय 

कारटो ही कादंबरी नितांतसुंदर तरल अनुभवविश्वाची मांडणी करते, सोबतच एका अलक्षित, दुर्लक्षित विषयाला हात घालते. नेहमीच जेत्यांचा, प्रगती करणाऱ्यांचा, हुशार असणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. उपेक्षित, तळागाळातील सामान्य जन नेहमीच अलक्षित राहतात. त्यांच्याकडे ना जेत्यांचं लक्ष असतं ना जेत्यांचा इतिहास लिहिणाऱ्यांचं. वास्तविक समाजातील ह्या सगळ्या खालच्या स्तरावर, तेथील कष्ट, यातना, दुःखावर, श्रमावर वरची सगळी इमारत उभी असते, पण पायाचा दगड झालेल्या ह्या खालच्या स्तराकडे कोणाचंही लक्ष नसतं. याच उपेक्षित गटातील पराभूताला नायकत्व प्रदान करण्याचे काम कल्पना मलये यांनी केलेलं आहे.

मराठी बालसाहित्य अनेक अंगांनी समृद्ध आहे. अगदी आजीबाईंच्या बटव्यातील गोष्टींपासून तर अलिकडच्या तेनालीरामापर्यंत… तसा तर भारत हा कथांचा प्रदेश आहे. येथे अनेकानेक उत्तमत्तोम कथांची मौखिक परंपरा आहे. ठगांच्या, शूर वीरांच्या साहसी कथांनी मराठी बालमनाला नेहमीच भुरळ घातलेली आहे. परीकथा, राजाराणीच्या कथा, युद्धकथा, रामायण, महाभारतातील पुराणकथांनी येथील बालमन संस्कारीत झालेले आहे.

भारतीय मौखिक कथन परंपरा संपन्न आहेच; त्याचबरोबर लिखित बालसाहित्यानेही येथे बऱ्यापैकी उभारी घेतलेली आहे. इसापनीती, चतुर बिरबल, पंचतंत्रातील गोष्टी, वेताळपंचविशी आदींनी ही कथन परंपरा संपन्न झालेली आहे. भा.रा. भागवत, साने गुरूजी यासारख्या लेखकांनी हीच परंपरा पुढे नेत फास्टर फेणे, हॅरी पॉटर, श्याम, बोक्या सातबंडे, ठोंब्या अशी बालसाहित्यातील नायकांची फळी उभारलेली आहे. याच फळीत यापुढे  ‘कारटो’ हा नायक जाऊन बसणार आहे.

कारटो ही कोकणातील लेखिका कल्पना मलये यांची किशोर कादंबरी! चैतन्य सृजन व सेवा संस्था, आजरा जि.कोल्हापूर यांच्याकडून ही वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी प्रकाशित करण्यात आलेली आहे. या कादंबरीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे, ती संपूर्णपणे कोकणातील मालवणी भाषेत अवतरलेली आहे. कोकणी भाषेचा लज्जतदार लेहजा व तेथील भू-प्रदेशातील निसर्ग वाचकांना नेहमीच हवाहवासा वाटत आलेला आहे. वाचकांची हीच ओढ अनेक कोकणी लेखकांनी पूर्णत्वास नेलेली आहे. सोबतच येथील कथन, नट परंपरेनेही कोकणी भाषेचा गोडवा सातासमुद्रापार पोहचविलेला आहे.

विशेष करून मच्छिंद्र कांबळी यांनी ‘वस्त्रहरण’च्या निमित्ताने मालवणी ठसका जगभर पोहचविलेला आहे. याच मालवणी भट्टीतून लेखिका कल्पना मलये यांनी ‘कारटो’चा बाण सोडलेला आहे. त्यामुळेच ‘कारटो’विषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. आजघडीला समस्त बालकिशोर साहित्यविश्वात ह्या कादंबरीने खळबळ उडवून दिलेली असून सर्वदूर तिचे उत्स्फूर्त स्वागत होतांना दिसत आहे. अवघ्या तीन महिन्यांत तीन आवृत्त्या निघालेली ही कादंबरी सगळ्यांनाच वाचाविशी वाटणे साहजिक आहे. काय आहे ‘कारटो’च्या या यशाचे कारण?

कल्पना मलये ह्या स्वतः शिक्षिका आहेत. बालमन आणि बालमानसशास्त्राचा त्यांना परिचय आहे. सततचा मुलांमधील वावर व कवयित्रीचे संवेदनशील मन ही या लेखनामागील प्रमुख प्रेरणा आहे. लेखिका या मुळात कवयित्री आहेत. बालसुलभ मनाला आवाहन करणाऱ्या, रिझवणाऱ्या अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. स्वतंत्र स्त्रीवादी अंगानेही त्यांचे लिखाण राहिलेले आहे. सतत मुलांसाठी, स्त्रियांसाठी, समाजासाठी काही ना काही करत राहणे, विविध उपक्रम राबविणे हा त्यांच्या स्वभावाचा मूल कंद राहिलेला आहे.

विविध व्यासपीठांवरून अन्याय अत्याचाराविरूद्ध आवाज उठवत राहाणे, सतत सकारात्मक विचार करत राहणे, व सर्जनाचा ध्यास मनाशी असणे हेच तर कल्पना मलये यांचे भावविश्व आहे. आपल्या भावविश्वात रमताना, ते अधिक समृद्ध कसं होईल, जास्तीतजास्त सकारात्मक विचारांची पेरणी कशी होईल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या सगळ्या विचारविश्वातून शोषितांची - वंचितांची - अलक्षितांची - उपेक्षितांची मांडणी कशी करता येईल याचाच ध्यास त्यांच्या मनाला असतो; नव्हे हेच त्यांचे चिंतनक्षेत्र आहे. त्यांच्या या आत्मिय चिंतनातूनच ‘कारटो’ची निर्मिती झालेली आहे.


हेही वाचा : शब्दांची नवलाई : विद्यार्थ्यांना मराठीचा लळा लावणारा कवितासंग्रह - उमेश घेवरीकर


कारटो ही कादंबरी नितांतसुंदर तरल अनुभवविश्वाची मांडणी करते, सोबतच एका अलक्षित, दुर्लक्षित विषयाला हात घालते. नेहमीच जेत्यांचा, प्रगती करणाऱ्यांचा, हुशार असणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. उपेक्षित, तळागाळातील सामान्य जन नेहमीच अलक्षित राहतात. त्यांच्याकडे ना जेत्यांचं लक्ष असतं ना जेत्यांचा इतिहास लिहिणाऱ्यांचं. वास्तविक समाजातील ह्या सगळ्या खालच्या स्तरावर, तेथील कष्ट, यातना, दुःखावर, श्रमावर वरची सगळी इमारत उभी असते, पण पायाचा दगड झालेल्या ह्या खालच्या स्तराकडे कोणाचंही लक्ष नसतं. याच उपेक्षित गटातील पराभूताला नायकत्व प्रदान करण्याचे काम कल्पना मलये यांनी केलेलं आहे.

काशिनाथ रघुनाथ टोपले हा या कादंबरीचा नायक! कोकणातील मालवणी प्रदेशात तो राहतो. कोकण म्हटले की, तेथील नितांतसुंदर निसर्ग, मनाला उभारी देणारी गारेगार हवा, समुद्राची गाज, उसळत्या लाटा, नारळी-पोफळीच्या बागा व तेथील पापभिरू समाज - सगळेच कादंबरीत भेटते. हा काशिनाथ रघुनाथ टोपले आहे ना? तो आपल्याला हे सगळं दाखवतो...

खरं तर त्याच्या जिवलग मित्रांसाठी तो ‘कॅश’ आहे. कादंबरीभर मात्र तो कारटो म्हणूनच वावरलेला आहे. लेखिकेचा अर्थातच तो आवडता आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे लेखिका शिक्षिका आहेत. केवळ शिक्षिका नव्हे तर उपक्रमशील शिक्षिका आहेत. त्यांचं सतत काही ना काही चाललेलं असतं. मुलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात त्या गुंतलेल्या असतात. त्यांच्या ह्या उपक्रमशीलतेतूनच कारटो त्यांच्या हाती लागलेला आहे हे उघड आहे.

कारटो हा वर्गातील अतिसामान्य मुलगा आहे. तो अभ्यासात हुशार वगैरे नाही. असलाच तर तो खोडकर आहे. उचापतखोर आहे. सतत कोणाची ना कोणाची खोडी काढत राहण्याच्या उद्योगात तो गुंतलेला असतो. स्वतःहून तो असल्या खोड्या करतो असंही म्हणता येणार नाही. तर त्याच्या हातून त्या चुका घडत जातात. करायला गेला गणपती- झाला मारुती! असं काहीसं त्याच्या बाबतीत घडत असतं. सतत पनवती लागलेला, उपेक्षित, अभागी, अलक्षित असाच तो आहे. सतत त्याच्या हातून चुका घडत असतात. घडून जातात.

काशिनाथला काम सांगणं म्हणजे जणू अवलक्षण करून घेण्यासारखे आहे. ‘आ बैल मुझे मार’ वगैरे… त्यामुळे कोणीही त्याला चांगलं म्हणत नाही किंवा त्याच्यावर विश्वास टाकत नाही. विश्वासाने कॅशवर एखादी जबाबदारी सोपवली आणि ती पूर्ण झाली असं कधीही झालेलं नाही. म्हणूनच सगळेच त्याच्यापासून चार हात लांब राहतात. अगदी त्याच्या घरचेसुद्धा !

कारटोचं कोकणातील एका वाडीत छोटसं घर आहे. घरची परिस्थिती जेमतेम अशीच आहे. थोडीशी खाचराची शेती आहे. त्यात भात वगैरे ते पिकवतात. घरच्या कामात, शेतीच्या कामात तो सतत मदत करत असतो. मित्रमंडळींमध्येही त्याचा वावर असतो. कोकणातील निसर्ग त्याचा सांगाती आहे. निसर्गाकडची सततची ओढ, मित्र, शाळा येथील त्याचा वावर - ह्यातून निर्माण होणारा विनोद, नाट्य, घटना घडामोडी ह्यातून ही कादंबरी घडत जाते व वाचकांच्या  मनाचा ताबा घेते.

‘नमस्कार!, मी काशिनाथ रघुनाथ टोपले. तसा माका मित्रमंडळी कारटो म्हणतंत. पण तुम्ही माझा तां नांव लक्षात ठेव नको. माझे जिवलग मित्र माका कॅश म्हणूनच हाक मारतंत. आजोबाचा नाव ठेवलेला असल्यामुळे माका घरात आदरानं काशिनाथ म्हणतंत. आजी फक्त नांव घेना नाय. सोन्या, बाबा, झिला, पुता जा तोंडाक येयत तां म्हनता. मी इयत्ता सहावीत आसंय…’ अशी या कादंबरीची सुरूवात आहे. म्हणजे कादंबरीचा नायक किशोरवयीन- सहावीत आहे. सहावीतून तो सातवीत जातो. शेवटी निरोपसमारंभ होतो व कादंबरी संपते.

सहावी ते सातवी या दोन वर्षांतील कालावधीतील कॅशच्या आयुष्यातील गमती जमती, त्याची मित्रमंडळी, शालेय परिसर व घरातील वातावरण ह्या सगळ्याचा पैस ही कादंबरी व्यापते !

कादंबरीत प्रथम पुरूषी निवेदन आहे. निवेदक अर्थातच कारटो आहे. आपलं वय आणि घरातील पार्श्वभूमी सांगितल्यानंतर तो थेट निवेदनाला सुरूवात करतो. म्हणजे काय करतो? आपल्या गतआयुष्यातील व वर्तमानातील घटना, प्रसंग, घडामोडी सांगत जातो. हे सगळं सांगताना आपल्याच पदरी नैराश्य का, उपेक्षा का’ असा सवाल उपस्थित करत जातो. वास्तविक काशिनाथ स्वतःला निरागस, हुशार समजत असतो. असतोही तसा तो, पण का कोण जाणे त्याच्या पदरी उपेक्षा येते जाते. प्रत्येक वेळी त्याचं हसं होतं. सुरवातीलाच आपल्या गतआयुष्यातील दोन आठवणी तो सांगतो.

एक आठवण पहिलीत असतानाची आहे. खेळता खेळता पाटीवरची पेन्सिल पठ्ठ्याच्या नाकात जाते व आडवी होते. एकच गलका ऊठतो. कोणी काही कोणी काही म्हणतो. कोणी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा सल्ला देतो. पण शेजारचा ढोरकी सदाकाका तपकीर सुंगवायचा सल्ला देतो व तो यशस्वी होतो. काशिनाथची एका अवघड प्रसंगातून सुटका होते.

दुसरा प्रसंग चौथीत असतानाचा आहे. आतेभावाच्या नांदी लागून एरंडाच्या बिया भरपूर खातो. त्यातून पोटफुगी आणि उलट्या चालू होतात. म्हणजे काशिनाथ करायला जातो एक आणि घडते भलतेच, अशी त्याची गत - फटफजिती नेहमीचीच. संपूर्ण कादंबरीभर ह्या गमती जमती विखुरलेल्या आहेत.  त्या सांगण्याची भारीच शैली लेखिकेला गवसलेली दिसते. त्यामुळेच तर वाचनाची खुमारी उत्तरोत्तर वाढत जाते.

ही कादंबरी वाचतांना कोकणचा खोडकर वारा व आंबा-फणसांची आंबटगोड चव जिभेवर रेंगाळत राहाते. आपणही त्या शाळकरी भावविश्वात रममाण होत जातो; नव्हे तसे चित्र रेखाटण्यात व उभे करण्यात लेखिका यशस्वी होते. आपणही खोडकर, खट्याळ होत जातो. वाचकांना स्वतःच्या बालपणात शिरायला ही कादंबरी भाग पाडते. हीच तर खरी लेखिकेची कसोशी आहे, त्यात ती यशस्वी होते. कारटोच्या ह्या सगळ्या घडामोडी, हालचाली आपल्या अवती भोवती घडत असल्याचा भास होतो. कारटोच्या विश्वात वाचक शिरत जातो.

कारटो आहेच तसा! लक्षात ठेवण्यासारखा. एकदा आई-बाबांच्या बोलण्यातील संवाद त्याच्या कानी पडतो. बाबा वैतागून म्हणतात, माझ्याकडे का पैशांचं झाड आहे का? झालं! यावरून कारटोला आयड्या सुचते… पैशांचं झाड होण्यासाठी तो चिखलात पैशांची लागवड करतो. हेतू प्रामाणिक आहे पण कृती अव्यवहार्य ठरल्याने येथेही त्याची फटफजिती होते. वडिलांकडून कानउघाडणी होते. या आणि इतर प्रसंगांतून मोठे-वडीलधारे लोक लहान मुलांवर विश्वास का ठेवत नाहीत? असा सवाल तो विचारतो. जगातील अनेक शोध यामुळे लागायचे राहिलेले असतील अशी शंका उपस्थित करतो.

भिंगरीच्या पंखाला दोरा बांधून उडवत असताना, तसे करण्याला विरोध करणाऱ्या नानाआज्याला तो असाच उडवतो, तुम्ही कोंबडी मारून खातांस तो मुका प्राणी नाय का? ह्या त्याच्या सगळ्या प्रवासात शाळेतील शिक्षिका, मित्र, मैत्रिण प्रणाली व वयाने थोडासा थोराड दीपकदादा यांचा त्याला काहीसा आधार वाटतो. दीपकदादासोबत तो रानात जातो. मधाची पोळी खातो. इतरही मजा करतात. शाळेतील शिक्षिका त्याला समजून घेते. विश्वास दाखवत त्याच्यावर उपकरण बनवण्याची जबाबदारी टाकते. ह्या सगळ्याने त्याला काहीसा दिलासा मिळतो.

शाळेतील वर्गमैत्रिण प्रणाली हीच्या विषयीचा हळवा कोपरा त्याच्या मनात आहे. पौंगंडावस्थेतील आकर्षण येथे संयतपणे चित्रीत झालेले आहे. खरे तर पूर्वार्धातील घटना,  प्रसंग, त्यातील गमती जमती एवढ्यापुरतीच ही कहाणी राहात नाही तर उत्तरार्धात तिला प्रणाली - काशिनाथच्या निरागस आकर्षणाची उत्तम झालर प्राप्त होते. ह्या संदर्भातील वर्णनं व प्रसंग खास करून वाचावित व अनुभवावीत अशीच आहेत. इथे खरं तर लेखिकेचं कसब पणाला लागलेलं आहे. कुठेही तिचा तोल तसूभरही ढळलेला दिसून येत नाही.

उचापतीखोर खोडकर कारटोच्या आयुष्यात प्रणालीच्या येण्याने जो समजूतदारपणा आलेला आहे, तो वाचण्यासारखा आहे. ह्या सगळ्या प्रकाराने एका उंचीवर जाऊन ही कलाकृती थांबते.


हेही वाचा : यश मिळवण्याचे हे चार मंत्र - दत्तप्रसाद दाभोळकर


मला ह्या कलाकृतीबाबत अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधावंसं वाटतं ते म्हणजे ह्या कादंबरीची भाषा. लेखिकेने एखाद्या कसबी कारागिराप्रमाणे सुंदर भाषेची वीण कादंबरीभर गुंफलेली आहे. ही कादंबरी ज्या भाषिक अवकाशात घडते तो भाषिक परीघ इतरही विविध माध्यमांतून विस्तारलेला आहे. कारटोच्या निमित्ताने हा परीघ अजून विस्तीर्ण होणार आहे यात शंका नाही.

कारटो ही बाल-किशोर कादंबरी असली तरी त्या वयातील मुलांना ही भाषा सहज समजेल अशीच आहे. आशयासोबत विषय समजून घेताघेता आपण एका नव्या भाषेलाही समजून घेतो. त्या भाषेतील गोडवा अनुभवत जातो. कोकणी-मालवणी भाषेतील अनेक शब्द आपल्याला नव्याने कळत जातात. हीच तर खरी मौज आहे.

तां, माका, आसंय, यकट्यान, तोंडाक, हवली, इल्ललो, काढतलो, आयशी, तुमका, घेवक, ईलय, वापरूची, झील, इली, खयं, थयं, बोमटाक, चडवा, गजाल, किरग्या, कोंबा, रवतो, सड्यार, वायच, गमता, बगूक, अवंदू, मिळान, चिकलधूनी यासारख्या  खास मालवणी शब्दांची लज्जत येथे अनुभवायला मिळते. येथील शब्दांची खुमारी न्यारीच आहे. ज्यामुळे आपली मराठी किती समृद्ध भाषा आहे हे कळण्यास मदत होते.

सोबतच ‘कोन्हाचे म्हशी कोनाक उटाबशी’, ‘शेंबडी बायको चलात पण चोपडी नाय’, ‘इकडे आड थकडे विहीर’, ‘माकडांच्या हातात कोलीत गावला’, ‘फुलू फुलू बेल्यात मुतू’, ‘मिटाक लावा नि माका खावा’, ‘खावाक नको पन सूचना आवर’, ‘वाकड्या मेडीक वाकडा नॅम’, ‘केला तुका झाला माका’, ‘जखम मांड्याक तूप शेंड्याक’, ‘मेल्या म्हशीक पाचशेर दूध’, ‘लिना लिना नी भिकार चिना’ यासारखे वाकप्रचार व म्हणी अर्थांचा, सांस्कृतिक परिवेशाचा अनोखा खजिना खुला करत जातात. ज्यामुळे भाषेची श्रीमंती वाचकांच्या नजरेत भरते.

प्रांता-प्रांतातील अशा बोली शिकण्याने - समजून घेण्यानेच आपली सांस्कृतिक उंची वाढत जाणार आहे; मराठीचे अभिजातपण ह्यातच तर दडलेले आहे!

कारटो (किशोर कादंबरी)
लेखिका - कल्पना मलये
प्रकाशक - चैतन्य सृजन व सेवा संस्था, आजरा
पृष्ठे - 96, किंमत - 15 रू

- अशोक कौतिक कोळी, जळगाव
ashokkautikkoli@gmail.com

Tags: मराठी साहित्य बालसाहित्य बालवाङ्मय किशोर कादंबरी साहित्य कोकण सिधुदुर्ग Load More Tags

Comments:

आरती काटीकर

पुस्तक परिचयच इतका सुरेख आणि बोलका आहे,तर मग संपूर्ण कादंबरी म्हणजे मेजवानीच असेल!

Poonam Bagwe

मला माझ्या मायबोलीचे खूप कौतुक आहे.

Add Comment

संबंधित लेख