श्यामची आई एवढेच मातृप्रेमाचे,बंधूप्रेमाचे व निसर्गाचे स्तोत्र गाणारे हे लेखन आहे. योगायोगाने श्यामची आई आणि पथेर पांचालीमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. श्याम आणि अपू यांच्यात बरेचसे साम्य आहे. दोन्हीही नायक प्रेमळ आहेत. विशेषतः आपल्या आईशी त्यांचे विशेष नाते आहे. श्याम जसा आपल्या आईचे सावित्रीचे व्रत पूर्ण करतो, तसा अपू आपल्या आईचा सिद्धेश्वरी देवीच्या दर्शनाचा नवस पूर्ण करतो. दोन्ही कादंबऱ्यांमध्ये भरपूर निसर्गवर्णन आहे आणि प्रवासासाठी बैलगाडीला प्राधान्य दिलेले आहे. ज्यायोगे प्रवास करताना निसर्ग सहवास लाभतो. इतरही अनेक गोष्टी आहेत पण त्या प्रत्यक्ष वाचकाने धुंडाळाव्यात अशा आहेत. म्हणूनच मला ही कादंबरी समस्त मराठी बालकुमारवाचकांनी जरूर जरूर वाचावी अशी शिफारस मनःपूर्वक करावीशी वाटते.
हल्लीची मुलं फार चिडखोर आणि एकलकोंडी झालेली दिसतात. स्वमग्न म्हणता येतील अशी मुलंही बरीच आहेत. आताच्या पिढीचीच ही समस्या आहे. ही पिढी चिडखोर, रागीट, एकलकोंडी होण्याची कारणेही अनेक आहेत. पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसणे, घरात आजी- आजोबा यांचे नसणे, या आणि इतरही कारणांमुळे ही मुलं तशी वागतात.
या बाबतीत पालक आणि मुलं बऱ्याच अंशी एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होतात. आईवडिलांना वेळच नसल्यामुळे मुलं एकलकोंडी होतात. दूरदर्शन, मोबाईलच्या आहारी जातात. विशेष करून मनाला आणि हातांना योग्य वेळी योग्य वळण न मिळाल्याने बरीच मुलं हाताबाहेर जातात. आंतरजालीय मोहजालातील वेगवेगळ्या खेळांच्या आहारी जातात. प्रसंगी त्यातून अनेक चुकीच्या गोष्टी घडतात; अघटीतही घडते.
समाजमन अशा अनेक घटनांनी सुन्न झालेले आपण पाहिलेले आहे. कशी सुटका होईल बरं या पिढीची ह्या सगळ्या अघटीतातून? सूज्ञ पालकांना नेहमीच पडलेला हा प्रश्न! पण या सगळ्यात मुलांची तरी काय चूक? ती बिचारी अशा काळात जन्मलेली - ज्या काळात त्यांना खेळायला अंगण नाही, कुठे मैदानावर किंवा मोकळ्या माळरानावर जायची सोय नाही, नदीत डुंबणे नाही की सरसर झाडावर चढणे नाही, आंबट चिंचा, बोरे, आंबे, मधाची पोळी; कशाची म्हणून मजा नाही. सारंच आभासी जगणं त्यांच्या वाट्याला आलेलं.
पण या सगळ्या आभासी जगातील वावरामुळे सध्याच्या पिढीचं खूप मोठं नुकसान होतंय. ती खऱ्याखुऱ्या जगापासून, निसर्गापासून दुरावली आहे. खरंखुरं जग काय असतं, त्यातील जगण्याची मजा काय असते यापासून ही पिढी दुरावलीय. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झालेली दिसते. मुलांच्या मनाचा गाभारा रीतारीता वाटतोय. ज्या वयात त्यांच्या मनाचे भरण पोषण व्हायला हवे, त्या वयात ते होत नाही. त्यामुळेच भावनिक पोकळी तयार होते. मुलं सर्जनाच्या पातळीवर जातच नाहीत. निसर्गाचे दुसरे नाव ‘सृजन’ आहे. या सृजनाचा आणि त्यांचा संबंध तुटतो. त्यातून पोरकेपण, परकेपण जन्माला येतं व मुलं न्यूनगंडाच्या चक्रव्यूहात फसत जातात.
अशा या भयगंडाने पछाडलेल्या, न्यूनगंडाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या मनाची योग्य वेळी मशागत होणे आवश्यक वाटते. ही मशागत कोण करू शकणार आहे? तर अर्थातच शिक्षक- पालक यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडते. पुन्हा जबाबदारी झटकण्याचा प्रश्न समोर येऊ शकतो. अशावेळी शिक्षक आणि पालकांच्या मदतीला येऊ शकतात, ती चांगली पुस्तकं! आपण मुलांना वेळ देऊ शकत नसलो, त्यांना शेतारानावर, गावखेड्यात प्रत्यक्ष फिरायला नेऊ नाही शकलो तरी काही हरकत नाही; हा सगळा अनुभव आपण मुलांना पुस्तकांद्वारे देऊ शकतो. त्यासाठी पालक म्हणून काही चांगली पुस्तकं मुलांच्या हाती देणे आपले कर्तव्य ठरते. जेणेकरून मुलांचे भावविश्व समृद्ध होईल आणि त्यांच्या मनाचे योग्य असे भरणपोषण होईल. ज्यामुळे एक समाधानकारक संपन्नता प्राप्ती होईल!
हेही ऐका : कच्च्या कैऱ्या - विभूतीभूषण बंद्योपाध्याय
मराठीमध्ये मुलांसाठीच्या अशा अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची उपलब्धता आहे. अगदी इसापनीतीच्या गोष्टी, गोष्टीवेल्हाळ वेताळ, आजीबाईंच्या बटव्यातील गोष्टी, रामायण-महाभारतातील गोष्टी, बालकवी, भा.रा.तांबे, ना.धों.ताम्हनकर, दुर्गा भागवत, भा.रा.भागवत, साने गुरूजी यांसारख्या लेखकांनी मराठीमध्ये विपुल प्रमाणात बालकुमारवाङ्मयाची निर्मिती करून ठेवलेली आहे. सोबतच काही उत्तमोत्तम अनुवादित पुस्तकांचेही प्रमाण मोठे आहे. एकूणच भारतीय भाषांतील बालकुमारवाङ्मय समृद्ध आहे. त्याचा उत्तमोत्तम अनुवाद मुलांपर्यंत पोचवणे आपले कर्तव्यच ठरते. खास करुन आजच्या घडीला ही मोठी गोष्ट आहे.
अशाच एका अनुवादित बालकुमारसाहित्यकृतीची ओळख आपण येथे करून घेणार आहोत. त्या साहित्यकृतीचे नाव आहे, ‘मुलांसाठी पथेर पांचाली’. ‘पथेर पांचाली’ ही बंगाली लेखक विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांची विशेष गाजलेली कादंबरी. या कादंबरीने लोकप्रियतेची अनेकानेक शिखरे पार केलीत. तिच्यावर बेतलेला सिनेमाही अजरामर झाला. बंगालमध्ये अशी एकही सुशिक्षित व्यक्ती नसेल जिने विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांची अक्षर कलाकृती - पथेर पांचाली वाचलेली नसेल.
मराठीत ज्याप्रमाणे वाचनाची सुरूवात साने गुरूजी यांच्या ‘श्यामची आई’ने होते; तसा बंगाली मुलांना वाचनाचा रस्ता सापडतो तो पथेर पांचालीच्या वाटेवरुन! थोर उच्चतम जीवनमूल्य जोपासणारी ही कलाकृती आहे. बंगाली भाषेतील हा अनमोल खजाना खास मराठी बालकुमारवाचकांसाठी खुला करून दिला आहे, तो ‘साधना प्रकाशना’ने. ‘करेल मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे’ असे म्हणणाऱ्या पूज्य साने गुरूजींच्या ‘साधने’कडून हे पुस्तक मराठीमध्ये आले, याचे विशेष महत्त्व आहे. पथेर पांचालीचा मराठीतील अनुवाद केला आहे, ज्येष्ठ ललित लेखक विजय पाडळकर यांनी.
बंगाली सहित्याला श्रेष्ठ लेखकांची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. बंकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर, शरच्चंद्र चटर्जी, ताराशंकर बंद्योपाध्याय असे महान साहित्यिक या परंपरेतून निर्माण झाले. अशा महान साहित्यिकांत विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांचे अनन्यसाधारण स्थान आहे. प्रत्येक सहृदय मनात प्रवेश करून तेथे कायम स्थान मिळवणारी अशी पुस्तके फार दुर्मिळ असतात. त्यात पथेर पांचालीचा समावेश होतो. मूळ पथेर पांचाली ही सर्व स्तरातील वाचकांसाठी आहे; मात्र साधना प्रकाशनाने तिची खास मुलांसाठीची संक्षिप्त आवृत्ती बाजारात आणलेली आहे.
मूळ बंगाली कादंबरीचा आशय, तिच्यातील सौंदर्य अनुवादातही उतरावे यासाठी अनुवादक विजय पाडळकर यांनी विशेष प्रयत्न केलेले जाणवते. त्यामुळे आपण अनुवाद नव्हे, तर अस्सल मराठी वाङ्मयाचाच आस्वाद घेत आहोत अशी अनुभूती मिळते. पुस्तकाची निर्मिती करताना प्रकाशनाने मूळ बंगाली कादंबरीसाठी सत्यजित राय यांनी रेखाटलेली चित्रे खुबीने वापरली आहेत. स्वतः विभूतीभूषण बंद्योपाध्याय यांनी पथेर पांचाली या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती 1942मध्ये काढली, तिला त्यांनी 'आंब्याच्या कोयीची पुंगी' असे नाव दिले. त्या आवृत्तीसाठी राय यांनी काढलेली ही चित्रे आहेत.
पांचाली म्हणजे गाण्यांची मालिका. विभूतीभूषण यांचे वडील महानंद हे बुद्धिमान, व्यासंगी व अभ्यासू ब्राह्मण होते. ते गावोगावी फिरून रामायण, महाभारतावर कवने रचून गाऊन दाखवत. छोटा विभूतीभूषण तेव्हा त्यांच्यासोबत असायचा. या परंपरेच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या कादंबरीचे नाव पथेर पांचाली असे ठेवले.
पथेर पांचाली ही बंगालमधील एका खेडेगावात राहणाऱ्या गरीब ब्राह्मण कुटुंबाची कथा आहे. ही कथा विभूतीभूषण यांचे आत्मचरित्र नसले, तरी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे धागेदोरे यात गुंफलेले दिसतात.
बंगालमधील निश्चिंदीपूर या गावात ही गोष्ट घडते. गोष्ट साधीसुधीच पण रंजक आहे. सहज सुंदर निरागसता तिच्यात ठासून भरलेली आहे. हरिहर आणि त्याच्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. हरिहर कुटुंबवत्सल आहे. आपल्या कुटुंबावर त्याचे खूप प्रेम आहे. कुटुंबातील सगळ्याच सदस्यांची त्यांना काळजी आहे. सर्वजया ही त्यांची पत्नी फार सोशिक आहे. पतीला ती हरकामी मदत करते. गरीबीची परिस्थिती असूनही आपला फाटका संसार सावरण्याचा तिचा प्रयत्न असतो. त्यांच्या या प्रयत्नांची संघर्षमय कहाणी म्हणजे ही गोष्ट!
पण खरं तर ही कहाणी हरिहर-सर्वजया यांच्याहीपेक्षा दुर्गा आणि अपू यांची आहे. आपल्या मुलांच्या अन्न-वस्त्र-शिक्षण अशा गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या डोक्यावर चांगलं-चुंगलं छत असावं एवढीच माफक अपेक्षा हरिहर - सर्वजया यांची आहे. पण ह्या आवश्यक गरजाही ते पूर्ण करू शकत नाहीत. हरिहरला त्याबाबतीत वाईट वाटत असते. सतत तो कुटुंबासाठी पैसाअडका मिळवण्याच्या प्रयत्नात असतो; पण छोट्याशा त्या गावात त्याच्या हाताला पुरेसे काम मिळत नाही. हरिहर हा गावातील हुशार ब्राह्मण आहे. पूजाअर्चा, धार्मिक विधी अशी कामे तो करत असतो, पण तिही त्याला मिळत नाहीत. शेवटी याच कामाच्या शोधात हे कुटुंब गाव सोडण्याचा निर्णय घेते.
तसं तर निश्चिंदीपूर हे गाव निसर्गसंपन्न आहे. आपल्याकडील कोकणातीलच वाटावे, असे वर्णन या गावाचे आहे. गावाच्या आजूबाजूला निसर्ग, झाडेवेली, पशूपक्षी यांची रेलचेल आहे. खळाळणारी नदी व खवळलेला समुद्रही आहे. समुद्रावरची गारेगार हवा, रानमाळावरील अवखळलेला झाडझाडोरा, विविध फळांची रेलचेल, पशूपक्ष्यांचा वावर अशा हिरव्यागार बहूरंगी वेधक निसर्गाने वेढलेला, सजलेला, नटलेला हा गाव आहे. याच निसर्गात पशूपक्ष्यांप्रमाणे खेळणारी, बागडणारी हरिहर-सर्वजया यांची मुलं आहेत - अपू आणि दुर्गा.
अपू, दुर्गा व त्यांचे सवंगडी यांच्या लिलया वावरण्यातून लेखकाने एका निसर्गसंपन्न ललितकृतीची उभारणी केलेली आहे. हीच तर आहे मुलांसाठीची पथेर पांचाली. या कथेच्या माध्यमातून लेखक बालकुमारवाचकांना एका अद्भूत, निरागस, निसर्गसंपन्न दुनियेची सफर घडवण्यात यशस्वी झाले आहेत. आजच्या काळात सतत मोबाईल, अभ्यास, एकलकोंड्या, स्वमग्न अवस्थेतील बालकांना या अनोख्या विश्वाची सफर अवश्य घडवायला हवी. त्यासाठी हे पुस्तक सतत तत्पर आहे. या गोष्टीची सुरुवातच मुळी होते, ‘नीळकंठ पक्षी पाहण्यासाठी.’ या कथेपासून. अपूला निसर्ग निरीक्षणाची प्रचंड आवड आहे. ही आवड ओळखूनच हरिहर त्याला नीळकंठ पक्षी बघण्यासाठी रानात घेऊन जातो. नीळकंठ पक्षी दृष्टीस पडणे हे भाग्याचे लक्षण असते…
त्यानंतर अपूला निसर्ग निरीक्षणाचे वेडच लागते. मग कधी एकटा तर कधी मित्रांबरोबर तो निसर्गात जात राहतो. एवढा, की ही मुलं नेमकी कोणाची? त्यांच्या आईवडिलांची की निसर्गाची? असा प्रश्न पडावा. अपूची बहीण दुर्गाही तशीच आहे. तिला तर निसर्गातील अनेक खाणाखुणा तोंडपाठ आहेत. कुठल्या मोसमात कुठली फळे, कुठे मिळतील हे तिला चांगले ठाऊक आहे. आपल्या या निरीक्षणशक्तीचा फायदा ती नेहमीच करून घेते. घरात पुरेसे अन्न नसल्याने ही बहीणभावंडं आपला पोटोबा निसर्गातील रानमेव्यावरच थंडोबा करतात. कच्या कैऱ्या पाडण्यात ती माहीर आहे. सोबतच बोरं चाखण्यातही…
अपू या आपल्या भावावर तिचं खूप प्रेम आहे. अपूसाठी प्रसंगी ती आईच्या शिव्याही खाते. पण हीच प्रेमळ बहीण गरीबीची, आजारपणाची बळी ठरते.
बहीण-भावाच्या अनोख्या प्रेमाची वीण लेखकाने कौशल्याने वीणली आहे. ही वीण दुर्गाच्या मरणाने उसवते. कादंबरीतील नीळकंठ पक्षी व रेल्वे रूळांवरून धावणारी रेल्वे पाहण्याचं अपूचं स्वप्न लेखकाने इतक्या कलात्मक पद्धतीने मांडलेले आहे की, लेखकाची कलागत सर्जनता उच्चतम शिखरावर पोहचते व वाचक खोलखोल काव्यगत शोकसागरात ढकलला जातो. एका उच्चतम पातळीवर कलाकृती व रसिक पोहचतो. कादंबरीचा शेवट वाचकांच्या मनात घर करतो…
Read Also : Dr. Ajay Joshi in Conversation with veteran writer-translator Shanta Gokhale
खरं तर ही कादंबरी जेथे संपते तेथून वाचकांच्या मनात ती नव्याने सुरू होते. वाचक सद्गदित होतो. त्याचे मन भावभावनांनी उचंबळून येते. निश्चिंदीपूर येथील समुद्राच्या लाटांवर ते हेलकावत राहते. स्वप्नांच्या नव्या नव्या भराऱ्या घेण्यासाठी सज्ज होते. गाव सोडून जातांना रेल्वे रूळांजवळ भेटणारी दुर्गा मनात घर करते. नीळकंठ पक्षी फेर धरून नाचू लागतो. दरम्यानच्या काळातील सगळ्याच घटना मुळातून वाचण्यासारख्या आहेत. निसर्गाची वर्णनं तर अद्भुत आहेत. नदीतील मासेमारी, होळीतील नदीवरील प्रवास अनुभवण्यासारखा आहे.
मला ही गोष्टच मुळात आवडते, ती निसर्गवर्णनांसाठी आणि प्रेमळ कौटुंबिक सहवासासाठी. आज या दोन्ही गोष्टी मुलांसाठी दुरापास्त झालेल्या आहेत. मुलं निसर्गापासून आणि कुटुंबापासून दूर गेलेली आहेत. ज्यामुळे मुलांच्या आयुष्यात मोठीच पोकळी निर्माण झालेली आहे. ही पोकळी भरून काढण्याचे काम पथेर पांचाली करते. म्हणूनच आजच्या काळात तिचे महत्त्व आहे. ती मुलांना स्वप्न बघायला शिकवते, विचार करायला शिकवते व सर्जनशीलही बनवते. मला हे लेखन फारच मौलिक व उच्चतम प्रतिचे वाटते. मराठीतील अजरामर ‘श्यामची आई’शी तिची तुलना करावीशी वाटते.
श्यामची आई एवढेच मातृप्रेमाचे,बंधूप्रेमाचे व निसर्गाचे स्तोत्र गाणारे हे लेखन आहे. योगायोगाने श्यामची आई आणि पथेर पांचालीमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. श्याम आणि अपू यांच्यात बरेचसे साम्य आहे. दोन्हीही नायक प्रेमळ आहेत. विशेषतः आपल्या आईशी त्यांचे विशेष नाते आहे. श्याम जसा आपल्या आईचे सावित्रीचे व्रत पूर्ण करतो, तसा अपू आपल्या आईचा सिद्धेश्वरी देवीच्या दर्शनाचा नवस पूर्ण करतो. दोन्ही कादंबऱ्यांमध्ये भरपूर निसर्गवर्णन आहे आणि प्रवासासाठी बैलगाडीला प्राधान्य दिलेले आहे. ज्यायोगे प्रवास करताना निसर्ग सहवास लाभतो. इतरही अनेक गोष्टी आहेत पण त्या प्रत्यक्ष वाचकाने धुंडाळाव्यात अशा आहेत. म्हणूनच मला ही कादंबरी समस्त मराठी बालकुमारवाचकांनी जरूर जरूर वाचावी अशी शिफारस मनःपूर्वक करावीशी वाटते.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी, उद्याच्या सुंदर दिवसांसाठी, सुंदर स्वप्नांच्या प्रदेशासाठी, जगणं सुंदर करण्यासाठी सर्जनाचा हा अक्षर प्रवास आपण सर्वांनी जरूर अनुभवावा…
मुलांसाठी पथेर पांचाली
लेखक : विभूतीभूषण बंद्योपाध्याय
मराठी अनुवाद : विजय पाडळकर
साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 103, किंमत : 125
- अशोक कौतिक कोळी, जळगाव
ashokkautikkoli@gmail.com
मुद्रित आवृत्तीसोबतच मुलांसाठी पथेर पांचाली हे पुस्तक ई-बुक स्वरूपात Kindleवर उपलब्ध आहे.. आणि ऑडिओबुकच्या स्वरुपात Storytelवर आली आहे. दिपाली अवकाळे यांनी या कादंबरीचे वाचन केले आहे आणि यातील संगीत दिले आहे रिजू बॅनर्जी या दहा वर्षांच्या मुलाने. एकूण तीन तासांचे हे संपूर्ण पुस्तक ऐकता येईल, मात्र त्यासाठी Storytelचे Subscription आवश्यक आहे.
Tags: पथेर पांचाली बंगाली साहित्यिक बालवाङ्मय मुलांसाठीचे साहित्य वाचन अवांतर वाचन विभूतीभूषण साने गुरुजी आंतरभारती Load More Tags
Add Comment