जगज्जेत्यांच्या सुसंस्कृतपणाला सलाम

ज्या मातीवर भारतीय संघाने वर्ल्डकप मिळवला, तेथील माती रोहित शर्माने आदराने चाखली. मातीला आईच्या ठिकाणी मानणाऱ्या आपल्या संस्कृतीचं दर्शन त्याने घडवलं..

सामन्यातला शेवटचा चेंडू टाकला गेला आणि भारत विजयी झाला. त्यावेळी भारतीय आणि प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या डोळ्यांतदेखील अश्रू होते परंतु त्यामध्ये जमीन-आसमानाचा फरक होता. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातला घास हिरावून भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होते. यावेळी पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाविषयीदेखील भारतीयांना वाईट वाटलं असावं. कारण यावेळचा भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान-बांगलादेशसारखा माजोरडा आणि शत्रुत्व राखणारा नव्हता किंवा इंग्लंड-ऑस्ट्रेलियासारखा उन्मादीदेखील नव्हता. तर क्रिकेटचं ‘जेंटलमन्स गेम’ हे नाव सार्थ करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ होता.

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचा फायनलचा दिवस (किंवा रात्र म्हणा), प्रत्येक भारतीयासाठी आणि क्रिकेट चाहत्यासाठी अविस्मरणीय होती. कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, त्यावेळी ती मिळत नाही; पण कालांतराने एखाद्या अधिक योग्य वेळी ती मिळते. असंच काहीसं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या बाबतीत झालं. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केली आणि भारताला टी-ट्वेन्टी विश्वचषक 2024चा विजेता बनवलं. मागील 11 वर्षांपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांना आयसीसी ट्रॉफीची प्रतीक्षा होती. हा दुष्काळ हिटमॅन रोहित शर्माने संपवला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-ट्वेन्टी वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करत इतिहास रचला. अतिशय उत्तम खेळ करत भारताने हा सामना जिंकला आणि टी-ट्वेन्टी वर्ल्डकपवर नाव कोरलं. या विजयामुळे फक्त भारतीय खेळाडूच नव्हे तर प्रशिक्षक राहुल द्रविडसह कोट्यवधी क्रिकेट चाहते भावूक झालेले दिसले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडूंच्या डोळ्यांत कृतार्थतेने अश्रू तरळले. या सर्वांच्या सेलिब्रेशनचे आणि अगदी रडण्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आपल्या आवडत्या खेळाडूंचं हे रूप पाहून चाहतेही भावनिक झाले.

भारतीय संघ चॅम्पियन बनल्यावर रोहितने जे केलं, त्याचा व्हिडीओही समोर आला असून तो पाहिल्यावर त्याच्याबद्दल तुमच्या मनातील आदर कदाचित वाढेल. आयसीसीनेही (ICC) त्याचा व्हि़डीओ शेअर केला आहे. विजयानंतर रोहितने खेळपट्टीवर जाऊन तेथील माती चाखली. विजयाचा क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी रोहितने हे केलं. रोहितच्या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स आल्या आहेत. विशेष म्हणजे बार्बाडोसच्या मैदानावर त्याने आपल्या देशाचा तिरंगाही लावला. या सामन्यातील विजयानंतर रोहित आणि विराट हे दोघेही टी-ट्वेन्टी (आंतरराष्ट्रीय) मधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे हा क्षण या दोन खेळाडूंसाठी अधिक संस्मरणीय ठरला. त्याचीच आठवण ठेवण्यासाठी रोहितने सामना झाला त्या ‘पीच’वरील माती चाखली. रोहितचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असंख्य भारतीय चाहत्यांना ‘क्रिकेटचा देव‘ अशी ख्याती असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या निवृत्तीचीही आठवण झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना खेळला. तो सामना संपल्यानंतर सचिन खेळपट्टीवर गेला आणि त्याने वाकून नमस्कार केला होता. 

टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिक पांड्या रडताना दिसला. रोहितने या सामन्यातील शेवटचं षटक पांड्याकडे सोपवलं होतं. त्याने आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आणि भारताला विजय मिळवून दिला. पांड्यासोबतच सूर्यकुमार यादवनेही टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने शानदार झेल घेतला. हा झेल भारताच्या विजयात अतिशय महत्त्वपूर्ण ठरला.

टीम इंडियाच्या विजयानंतर मैदानावर तिरंगा अभिमानाने फडकत होता. प्रत्येक खेळाडूच्या हातात देशाचा सुंदर ध्वज होता आणि ते मोकळेपणाने आपल्या भावना, आपला आनंद व्यक्त करत होते. याच वेळी मैदानावर काही खेळाडू टूर्नामेंट ब्रॉडकास्टरशी संवाद साधत होते. त्यावेळी हार्दिकदेखील ‘स्टार स्पोर्ट्स’च्या प्रतिनिधीशी बोलत होता. मात्र त्याच इंटरव्ह्यूदरम्यान जे घडलं ते पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. हार्दिकचा इंटरव्ह्यू सुरू असतानाच रोहित अचानक मध्ये घुसला आणि त्याने कोणताही संकोच न बाळगता सरळ हार्दिक पांड्याला घट्ट पकडलं, त्याच्या गालावर किस करून आनंद व्यक्त केला आणि त्याला मिठी मारली. रोहितच्या या कृतीने हार्दिकच्या चेहऱ्यावरही हसू फुललं. हा व्हिडीओ समोर येताच बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला, हिट झाला आणि तो पाहून सगळेच आनंदले. 

म्हणतात ना, ‘ज्यांच्याकडे असतं त्यांना कदर नसते आणि ज्यांना मिळत नाही ते प्रार्थना करत असतात’. हेच बहुधा 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे विजेते ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं झालं असावं. ऑस्ट्रेलिया संघाचा टी-ट्वेंटी विश्वचषकाचा कर्णधार मार्श (Mitchell Marsh) याचा ट्रॉफीसोबतच एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल पुन्हा होत आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या ट्रॉफीवर त्याने स्वतःचे दोन्ही पाय ठेवले आहेत असा तो फोटो आहे. या फोटोवरून त्याला त्यावेळीही बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. परंतु यंदाच्या विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला सुपर-8 मध्ये पराभूत करून सेमीफायनलमधून बाहेर काढलं. 

सामन्यातला शेवटचा चेंडू टाकला गेला आणि भारत विजयी झाला. त्यावेळी भारतीय आणि प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या डोळ्यांतदेखील अश्रू होते परंतु त्यामध्ये जमीन-आसमानाचा फरक होता. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातला घास हिरावून भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होते. यावेळी पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाविषयीदेखील भारतीयांना वाईट वाटलं असावं. कारण यावेळचा भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान-बांगलादेशसारखा माजोरडा आणि शत्रुत्व राखणारा नव्हता किंवा इंग्लंड-ऑस्ट्रेलियासारखा उन्मादीदेखील नव्हता. तर क्रिकेटचं ‘जेंटलमन्स गेम’ हे नाव सार्थ करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ होता.

मागच्या कित्येक वर्षांपासून मोक्याच्या क्षणी मान टाकणारा अर्थात ‘चोकर्स’ म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघाची अपख्याती होती. यावर्षी त्यांना त्यांच्यावरील हा डाग पुसण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांना विजय पताका फडकवता आली नाही. अर्थात, एवढ्याने या संघाचं आणि त्यांच्या सांघिक कामगिरीचं महत्त्व कमी होत नाही. भारतीय संघाप्रमाणेच त्यांनीदेखील पूर्ण विश्वचषकात शंभर टक्के यश मिळवलं. पण अंतिम क्षणी विजेता आणि उपविजेत्यामध्ये काही इंचांचंच अंतर राहून गेलं.

दक्षिण आफ्रिका संघाला विजयी होत आलं नाही, याचं संवेदनशील क्रिकेट रसिकांनादेखील वाईट वाटलं. कारण नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीयांच्यादेखील याच भावना होत्या. त्यामुळे आपण त्यांचं दुःख आपण निश्चितच समजू शकतो. एक उत्तम प्रतिस्पर्धी म्हणून दक्षिण आफ्रिका संघाचा भारतीय क्रिकेट रसिकांना निश्चितच आदर आहे. क्रिकेट या खेळाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. विश्वचषकातील एका पराभवामुळे त्यांचं महत्त्व निश्चितच कमी होत नाही. त्यांच्या आजवरच्या कामगिरीला मनापासून सलाम. त्यांच्या या पहिल्याच अंतिम सामन्याच्या अनुभवातून बोध घेऊन ते पुढील विश्वचषकात याहीपेक्षा चांगली कामगिरी करतील, अशी आशा करू.

एकदिवसीय विश्वचषकामध्ये ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रोहित सेनेचा खेळ चुकला होता. जगज्जेता होण्याचं स्वप्न भंगल्याने भारतीय खेळाडूंना मोठा धक्का बसला होता, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे विजयाचा अहंकार दिसत होता. तेव्हा एकीकडे मिचेल मार्श ट्रॉफीवर पाय ठेवून फोटो देत होता तर आता या सामन्यातील विजयानंतर भारताच्या कर्णधाराने ट्रॉफीला हृदयाला लावून घेतलं आहे. हे दोन्ही फोटो सध्या प्रचंड चर्चेत आहेत. सन 1983, 2007, 2011 आणि आता 2024 मध्ये भारत विश्वविजेता झाला आहे. त्याचबरोबर 2013 मध्ये भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि तेव्हापासून भारतीय संघ आयसीसी विजेतेपदासाठी झगडताना दिसत होता. त्यानंतर टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आणि 2024 मध्ये भारताचं स्वप्न पूर्ण झालं. वास्तविक, आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार बार्बाडोसच्या खेळपट्टीची माती खाताना दिसत आहे. रोहित शर्माच्या या हृदयस्पर्शी व्हिडिओला चाहत्यांनी जबराट पसंती दिली आहे, ज्याला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे बार्बाडोसच्या मैदानावरही त्याने तिरंगा लावला होता. ज्या मातीवर भारतीय संघाने वर्ल्डकप मिळवला, तेथील माती कर्णधार रोहित शर्माने आदराने चाखली. आपल्या देशात मातीला आईच्या ठिकाणी मानलं जातं आणि रोहितने त्याच संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडवलं. टीम इंडियाने खेळाबरोबरच जपलेल्या या माणुसकी आणि सुसंस्कृतपणाला मनापासून सलाम.

- आशिष निनगुरकर
ashishningurkar@gmail.com
 


 

Tags: T-20 Cricket Indian Team Rohit Sharma Hardik Pandya Ashish Ningirkar Virat Kohali Indian Cricket ICC Load More Tags

Comments:

PARITOSH GODBOLE

उत्तम लेख. यथार्थ वर्णन. हा सर्व सोहळा रात्री १२ पर्यंत जागून पाहिला, तो क्षण अविस्मरणीय होता. प्रतिस्पर्धी संघ बांगलादेश किंवा पाकिस्तान सारखा शत्रुत्व किंवा माजरोड्या पद्धतीने खेळणारा नव्हता तसाच इंग्लंड-ऑस्ट्रिलयासारखा उन्मादी देखील नव्हता. हे वर्णन तंतोतंत पटले. दक्षिणा अफ्रिका खेळेलेही उत्तम अगदी शेवटच्या दोन-तीन ओव्हर आधीपर्यंत ते जिंकतील असेच वाटत होते. मिलर गेला (सूर्यकुमारचा अप्रतिम झेल) तिथे सामना फिरला. त्यात भूमराहची ओव्हर आणि शेवटची अर्शदीपची ओव्हर निश्चितच निर्णायक ठरली. शेवटी एक संघ जिंकणार एक हारणार हे नक्कीच पण शेवटी भारताचाच विजय नाही तर क्रिकेटचा विजय झाला असेच म्हणावेसे वाटते. जिंकल्यानंतर कुठेही उन्माद नाही की हुर्रे नाही. दोन्ही संघांच्या डोळ्यातील अश्रू सारे काही सांगत होते. रोहितचे अश्रू जणू हा पुसून काढला २०२३ विष्कचषक हरल्याचा डाग असेच जणू सांगत होते. ऑस्ट्रेलियाला सुपर ८ मध्ये खाली बसवताना केलेली रोहितची खेळी कोण बरे विसरू शकेल. ९२ धावांचा दिलेला तडाखा कदाचित २०२३ विश्वकपाचा फायनलचा वचपा काढवा तसा होता.

अशोक व्यवहारे

छान लेख . यथार्थ वर्णन '

Add Comment