समाजाभिमुख चित्रपट, लघुपट, माहितीपट यांची पर्वणी

आठव्या 'कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'च्या निमित्ताने...

पुण्यात गेल्या आठ वर्षापासून होत असलेला "कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव" ही एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक पर्वणी म्हणावी लागेल. 2017 मध्ये या चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात सांस्कृतिक जडणघडण करण्याचे काम अनेकांनी केले.त्यापैकी एक महत्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णाभाऊ साठे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या अण्णाभाऊंनी दुर्लक्षित व शोषितांच्या बाजूने सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला. लोकनाट्यजनक, शाहीर, कलावंत-साहित्यिक, दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करून दुर्लक्षित समाज व परिस्थिती आत्मीयतेने उलगडून दाखवली. साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे होते. संकुचित झालेल्या मराठी साहित्याला सर्वसमावेशक करण्याचे काम त्यांनी केले. अन्यायाचे बळी ठरणाऱ्या समाजघटकांना तसेच जीवनसंघर्षाला साहित्यात मानाचे स्थान देऊन साहित्याचे मापदंड बदलून मराठी साहित्य प्रभावी व समृद्ध केले. त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा, कादंबरी यातून वास्तववादी चित्रण आजही काळाशी सुसंगत वाटणारे व सामाजिक आशय असणारे आहे.अण्णाभाऊ चित्रपटसृष्टीत अग्रणी होते. 1940 च्या दशकामध्ये अण्णाभाऊंनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हातात डफ घेऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीच्या माध्यमातून जनमानसात पोहचवण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. अशा थोर कलावंतांच्या नावाने मीडिया सोल्युशन व अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव समिती यांच्या संयुक्त आयोजनातून व महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा चित्रपट महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो. हा फेस्टिव्हल होण्यामागे संस्थापक- अध्यक्ष संदीप ससाणे यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या कल्पक व धाडसी विचारांना या महोत्सवाच्या निमित्ताने एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वतः दिग्दर्शक असलेले संदीप ससाणे उत्तम जाणकार असून त्यांनी या महोत्सवाची एक आगळीवेगळी मांडणी केली आहे. त्यामुळे हा सिनेमा महोत्सव इतर फिल्म महोत्सवांपेक्षा वेगळा व मैलाचा ठरत असून सर्वांना आपलासा वाटतो व भावतो.
 
महाराष्ट्रात व देशात जागोजागी अनेक चित्रपट महोत्सव भरतात.पण त्यांच्यात आणि अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सवात सर्वात महत्वाचा असा फरक आहे.ग्लोबलायझेशननंतर भारतीय मनोरंजन उद्योगात प्रचंड तांत्रिक विकास झाला परंतु आशय नष्ट झाला आहे. तो नष्ट झालेला आशय पुरविण्याचे काम या फेस्टिव्हलच्या माध्यमातून होताना दिसत आहे. देश- विदेशातून अनेक वेगवेगळ्या विषयावरच्या लघुपट व माहितीपट या महोत्सवात मोठ्या संख्येने दाखल होतात. बड्या प्रस्थापित चित्रपट महोत्सवांत मोजके अपवाद वगळता आता तशी विश्वासार्हता राहिलेली नाही, त्यामुळे नव्या कलाकार, दिग्दर्शकांसाठी हा महोत्सव एक नवी उर्जा देणारा ठरतो आहे. इतर प्रस्थापित महोत्सवांत केवळ चित्रपटांचे सादरीकरण होवून त्यावरच चर्चा होते परंतु या महोत्सवात सामाजिक, राजकीय विषयांवर चिंतन केले जाते व त्यावर उपलब्ध झालेल्या प्रश्नांना प्रखर अशी वाचा फोडून त्यावर उपाययोजना शोधण्याचे उत्तम असे काम करते. हे या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अतुल पेठे, राजकुमार तांगडे, सयाजी शिंदे, उमेश कुलकर्णी, ज्योती सुभाष, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, नागराज मंजुळे, मेघराज राजेभोसले, राज काझी, प्रतिमा, विनायक, उमेश कुलकर्णी, हेमांगी कवी, अंकुश मांडेकर व विनायक लष्कर अशा कितीतरी दिग्गजांनी या महोत्सवात याअगोदर हजेरी लावली आहे आणि यावेळीदेखील अनेक मान्यवर कलावंत या महोत्सवाला आवर्जून उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या महोत्सवाची एक वेगळी उंची नावाप्रमाणेच वाढली आहे. या महोत्सवात पूर्ण लांबीचे पण चित्रपट आहेत.

यंदा या महोत्सवात एकूण 150 लघुपट व माहितीपट आले होते. त्यापैकी दर्जेदार असलेल्या 70 लघुपट व माहितीपटांचे स्क्रीनिंग या वर्षीच्या महोत्सवात होणार आहे व त्यावर विवेचनात्मक चिंतन होणार आहे. त्यापैकी दर्जेदार असलेल्या लघुपट व माहितीपट यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. तसेच कलाकार व तंत्रज्ञ यांना वैयक्तिक वेगवेगळी पारितोषिके दिली जाणार आहेत.  या महोत्सवातून अण्णाभाऊंच्या सांस्कृतिक योगदानाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. 'चित्रपट ही सर्व कलांची जननी आहे', असे लेनिन यांनी म्हटले होते व या कलेचे समाजपरिवर्तनातील महत्वपूर्ण योगदान अधोरेखित केले होते. भारतासारख्या जातवर्गीय  देशात चित्रपटांसारख्या सामान्य लोकांवर प्रभाव गाजविणा-या माध्यमाकडे परिवर्तनवाद्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन या महोत्सवाने चित्रपट साक्षरतेचा व त्याअनुषंगाने या कलेतील परिवर्तनवादी आशयाला जनतेसमोर आणण्याचे मोठे काम सुरु केले आहे. एखादा महोत्सव पुण्यासारख्या महानगरात भरविणे हे काम ध्येयवेड्या तरुणांशिवाय कोण करु शकतो? संदीप ससाणे यांनी प्रचंड कष्टातून हे अवघड काम साध्य केले आहे यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. सलग आठ वर्षे सातत्याने धडपड करणाऱ्या या चित्रपट कलाप्रेमी असलेल्या माणसाचे हे यश आहे. या महोत्सवाचे दिग्दर्शक संदीप ससाणे, प्रतिमा परदेशी, सहसंयोजिका नेहा भुकण, निलेश रसाळ यांना मनापासून सलाम.

यंदा आठव्या अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ लेखक व संपादक महावीरभाई जोंधळे व ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पार पडणार आहे. सध्याच्या घडीला अत्यंत चर्चेत असलेला राही अनिल बर्वे यांचा 'मायासभा' हा सिनेमा पुण्यातील रसिकप्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी असणार आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक राही बर्वे यांच्यासोबत अभिनेत्री वीणा जामकर, अभिनेते दीपक दामले, निर्माते गिरीश पटेल, निर्माते अंकुर जे. सिंग, क्रिएटिव्ह कन्सल्टंट व फिल्म समीक्षक आशिष निनगुरकर, पिकल एंटरटेनमेंटचे प्रमुख वितरक समीर दिक्षित व ऋषिकेश भिरंगी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सिनेमात जावेद जाफरी हे मुख्य भूमिकेत असून जानेवारी 2026 मध्ये हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. उद्घाटनानंतर लगेच जिरकॉन फिल्मसची निर्मिती असलेल्या 'मायासभा' या हिंदी चित्रपटाचे भव्य स्क्रिनिंग होणार असून याच चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर महोत्सवासाठी निवडल्या गेलेल्या अनेक दर्जेदार लघुपट व माहितीपट यांची विशेष पर्वणी असणार आहे. 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील एकूण 70 निवडक चित्रपटांचे प्रदर्शन सकाळी 9 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. जुगनुमा, घात, साबर बोंडं व वाघाची पाणी आदी दर्जेदार चित्रपटांचे विशेष प्रदर्शन या महोत्सवात होणार आहे. चित्रपट स्क्रीनिंगसोबतच विशेष चित्रपट चर्चा, दिग्दर्शकांशी संवाद सत्रे आणि वैचारिक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात ऋत्विक घटक यांच्या ‘सुबर्णरेखा’ या चित्रपटावर विशेष संवाद सत्र होणार असून. महोत्सवाचा समारोप नितेश हेगडे दिग्दर्शित ‘वाघाची पहाणी' (Tiger’s Pond)’ या चित्रपटाने होणार असून 'सुलतान' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग देखील होणार आहे. या वर्षीचा ‘निळुभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार – 2025’ प्रसिद्ध अभिनेते व सामाजिक भान जपणारे कलाकार मकरंद अनासपुरे यांना जाहीर झाला असून, पुरस्कार वितरण सोहळा 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. हा पुरस्कार प्रसिध्द नाटककार, लेखक व प्राध्यापक, अभिनेते प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित AI चित्रप्रदर्शन, भरवण्यात आले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, संघर्ष आणि परिवर्तनाचा विचार मांडणारा हा महोत्सव पुण्यातील चित्रपटप्रेमींसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे पुणे व राज्यातील सिनेमाप्रेमींनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा. यातील स्क्रिनिंगसाठी निवडला गेलेला प्रत्येक लघुपट व माहितीपट स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा असून अनेक महोत्सवांमध्ये पुरस्कारप्राप्त आहे. पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या स्क्रीनिंग थिएटरमध्ये येत्या 26 ते 28 डिसेंबर रोजी हा चित्रपट महोत्सव रंगणार आहे. त्यावेळी अनेक दिग्गज कलाकार व तंत्रज्ञ यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

तुम्हाला देशातील प्रश्न व समस्या जाणून घ्यायच्या असतील तर या फेस्टिव्हलमधून त्याची उकल प्रकर्षाने होते. कारण या महोत्सवात निवडले गेलेले लघुपट व माहितीपट आपले वास्तव प्रश्न अतिशय गंभीररीत्या मांडतात. जणूकाही त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात. जख्खड झालेल्या मनाला विचाररुपी थप्पड मारण्याचे काम करतात. त्यामुळे पुण्यात दरवर्षी होत असलेला 'अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' भविष्यकाळाची गरज असून नव्या हरहुन्नरी कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठीचे एक हक्काचे व्यासपीठ आहे. तीन दिवसांचा होणारा हा चित्रपट महोत्सव रसिकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. या महोत्सवासाठी राज्य व देशातील अनेक कलाकार, तंत्रज्ञ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असा सकस व दर्जेदार चित्रपट महोत्सव उभे करणाऱ्या या महोत्सव टीमचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. या चित्रपट महोत्सवाला आभाळभर शुभेच्छा....

- आशिष निनगुरकर
ashishningurkar@gmail.com
(लेखक चित्रपट अभ्यासक व समीक्षक आहेत.)

Tags: अण्णाभाऊ साठे फिल्म फेस्टिव्हल मायासभा ऋत्विक घटक जावेद जाफरी माहितीपट चित्रपट लघुपट Load More Tags

Add Comment