'नीरज-अर्शद'च्या खिलाडूवृत्तीचा मैत्रीपूर्ण अध्याय

ऑलिंपिक ही सव्वाशे वर्षं सुरू असलेली एक चळवळ आहे. मैत्री, बंधुता आणि प्रेम हाच या स्पर्धांचा पाया आहे.

कोपर, गुडघा आणि पाठीच्या समस्यांशी झगडत असताना आणि इतर देशांच्या खेळाडूंप्रमाणे सुविधा नसतानाही नदीमने आतापर्यंत जे पराक्रम गाजवले, ते पाकिस्तानच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जातील. पाकिस्तानला ऑलिंपिकमध्ये मिळालेले हे चौथे सुवर्ण आहे. मात्र, वैयक्तिक स्पर्धेत पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकणारा नदीम हा पहिला खेळाडू आहे. यापूर्वी पुरुष हॉकी संघाने 1960 रोम ऑलिम्पिक, 1968 मेक्सिको ऑलिम्पिक आणि 1984 लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वेळी, वैयक्तिक स्पर्धेत, हुसैन शाहने 1960 च्या रोम ऑलिंपिकमध्ये, कुस्तीमध्ये कांस्य आणि 1988 सोल ऑलिंपिकमध्ये, बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. पाकिस्तानचे हे ऑलिंपिकमधील एकूण 11 वे पदक आहे.

खेळ म्हटले की हार-जीत आलीच. . . त्यामुळे कुणीतरी खुश होणार आणि कुणीतरी नाराज होणार हे ठरलेले. त्यात हे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर असतील तर त्याची व्याप्ती वाढतच जाते. त्यात भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर विरोधक. त्यामुळे त्यांच्यातील कुठलाही सामना हा अनेकांच्या चर्चेचा विषय असतो. परंतु पॅरिसच्या ‘स्टेड द फ्रान्स’ या स्टेडियमवर एक वेगळेच दृश्य बघायला मिळाले. क्रिकेट आणि हॉकी सामन्यांपेक्षा हे दृश्य वेगळे होते. इथे भारताचे आणि पाकिस्तानचे प्रेक्षक नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम या दोघांनाही तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित करीत होते. स्टेडियमकडे प्रवेश करताना भारत आणि पाकिस्तानचे ध्वज हातात घेऊन जाणाऱ्या अनेक प्रेक्षकांच्या मुलाखती ऐकल्या. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं. ‘पदकाचा रंग भले कोणताही असो – नीरज आणि नदीम या दोघांनाही पदक मिळाले पाहिजे.’ पदक जिंकल्यानंतर नीरजदेखील तेच म्हणत होता, “अर्शद आणि मी, आमच्यात 2016 पासून स्पर्धा सुरू आहे. तोही मेहनत पुष्कळ घेतो. त्याला कधी ना कधी त्या मेहनतीचे फळ मिळायला हवे.” नीरज आणि नदीम यांच्यात स्पर्धा आहे, भालाफेकीच्या अंतराची; मात्र वैर नाही. एरवी दोघं एकमेकांना सहाय्यही करीत असतात. नीरजचे म्हणणे होते, “जगातले अन्य देशांचे धावपटू, अन्य खेळाडू देशापलिकडेही पाहतात. खेळातील गुणवत्तेचा, कौशल्याचा आदर करून एकमेकांना सहाय्य करतात आणि प्रोत्साहित करतात. माझा थ्रो चांगला झाला नाही, की नदीम मला धीर देतो. मीदेखील त्याला प्रोत्साहन देत असतो.” नीरज- नदीमची हीच दोस्ती पॅरिसच्या अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर अनेकांनी पाहिली. मुळचे भारतीय किंवा पाकिस्तानी असणारे अनेक जण इंग्लंडहून खास ही भालाफेकीची अंतिम फेरी पाहायला आले होते. फ्रान्समध्ये राहणारे काही विद्यार्थी पदरमोड करून 125 ते 150 युरोचे तिकीट काढून भालाफेक स्पर्धा पाहायला आले होते.

राजेश नावाचा एक विद्यार्थी पॅरिसला सिनेमा क्षेत्रातलं शिक्षण घेतो आहे. तो सांगत होता, “माझे यंदाचे सहावे आणि शेवटचे वर्ष आहे. पैसा जपून खर्च करावा लागतो. या भालाफेक स्पर्धेसाठी मी वेगळे पैसे जमा केले होते. इतर स्पर्धा पाहणे परवडणारे नाही. ”एका दक्षिण भारतीय मुलाला पॅरिस ऑलिंपिकमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. तो म्हणत होता, “येथे पॅरिसमध्ये राहणारे माझ्यासारखे एकूण 20 भारतीय आहोत, ज्यांना स्वयंसेवक म्हणून स्वीकारले गेले आहे. स्वयंसेवक म्हणून मानधन मिळत नाही. मात्र स्वयंसेवकाला नियुक्त ठिकाणचे सामने, ‘ड्युटी’ नसताना पाहता येतात. राजेशची नियुक्ती टेनिस स्टेडियमवर केली आहे. त्यामुळे त्याला अ‍ॅथलेटिक्स खेळाची तिकिटे विकत घ्यावी लागली.

पाकिस्तानच्या ‘कराची एक्सप्रेस’ची पत्रकार नताशा, ऑलिंपिकमध्ये पाकिस्तानच्या वतीने कव्हरेजसाठी आलेली पहिली महिला. ती म्हणत होती, “आज संपूर्ण पाकिस्तान नदीमसाठी प्रार्थना करीत होता, त्याचबरोबर नीरजलाही यश मिळू दे अशी ‘दुवा’ करीत होता. भारत-पाकिस्तानचे दोन्ही स्पर्धक मेडल पोडियमवर पाहिजेत अशी प्रार्थना करीत होते. ”स्वतः नदीमची भावनाही हीच होती. पत्रकारांना तो सांगत होता, “नीरज भाई का पिछले सात-आठ साल से मुझे मदत हो रहा है. माझ्या प्रशिक्षकांबरोबरच मी नीरजचेही आभार मानेन. दुखापतीच्यावेळी नीरजने सांगितले, दुखापतीतून सावर. तुझाही थ्रो आणखी पुढे जाईल.” नीरज आणि अर्शद एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. दक्षिण आशियाई अ‍ॅथलीट्सची एक टीमच बनली आहे. स्पर्धेच्या वेळी, जेथे मार्गदर्शन करायला कुणीही जवळ नसते, त्या समरप्रसंगी हे दोघे अनेकदा एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करतात.

नीरजने एकदा जसा, नदीमला भाला हाती दिला होता तसेच नदीमनेही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नीरज काही वेळा भाला फेकताना करीत असलेल्या चुका त्याच्या लक्षात आणून दिल्या होत्या. नीरज म्हणत होता, “पदक हातून जाईल याची पर्वाही न करता आम्ही अनेकदा एकमेकांना अशी मदत केली आहे.” भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील वैराच्या गोष्टी ठाऊक असलेल्या काही पत्रकारांनी आणि यजमानांच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही एकमेकांविरुद्ध बोलण्यासाठी अनेक प्रश्न विचारून पाहिले. पण या दोघांच्या स्वच्छ निखळ मैत्रीपुढे त्या सर्वांचे प्रयत्न पत्रकार परिषदेत यशस्वी होऊ शकले नाहीत. दोघांनीही थेट सांगितले, “अन्य खेळाप्रमाणे आमचे दोघांचे नाही. आम्ही एकमेकांना पदक मिळावे यासाठी कायम मदत करीत आलो आहोत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोघांनाही पोडियमवर एकत्र पाहण्यासाठी ही तर सुरुवात आहे.”

नीरज चोप्राच्या आई सरोज देवी म्हणाल्या, “आमच्यासाठी नीरजचं रौप्यपदकही सुवर्णपदकासारखंच आहे. ज्या अर्शदने सुवर्णपदक जिंकलं, तोही आमच्या मुलासारखाच आहे.” दुसरीकडे अर्शदच्या आई म्हणाल्या, “नीरज माझ्या मुलाचा चांगला मित्र आणि भाऊही आहे. हार-जीत नशीबाने होते. नीरज मला माझ्या मुलासारखाच आहे. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली.” या दोन्ही आयांची विधानं किती दिलासादायक आहेत! त्यात प्रेम आहे, उदारता आहे, स्निग्धता आहे, मायेची ऊब आहे. धर्म आणि देश या सीमारेषा ओलांडून जाणारी ही आस्था आहेच; पण मुख्य म्हणजे त्याला एक तात्त्विक, आध्यात्मिक आयाम आहे. पु. शि. रेगे यांच्या 'सावित्री' कादंबरीत एक पत्र आहे. सावित्रीच्या पत्रातूनच कादंबरी पुढे जात राहते. हे पत्र एका पुरुषाला उद्देशून आहे. त्यांच्यात एक छान बंध तयार झालेला आहे. सावित्री त्या पत्रात म्हणते, ‘महायुद्धाच्या छाया गडद होत आहेत. मला तुमची काळजी वाटते. मग वाटतं की काळजी तर सर्वांचीच वाटायला हवी!’ किती साधं वाक्य आहे हे; मात्र आपल्या संवेदनशीलतेला, आस्थेला प्रश्न विचारणारं वाक्य आहे. आपलं आणि परकं हे ठरवणारं कसं? दुसरा माणूस वेगळा आहे, तो मी नाही, हे कशावरून? हा मूलभूत तात्त्विक आणि आध्यात्मिक प्रश्न आहे. या आयांनी आपल्या जन्मजात आस्थेच्या पलीकडं सुंदर प्रतिक्रिया दिल्यामुळं हे मनात आलं.

गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये नीरजने सुवर्णपदक कमावलं, तेव्हा अर्शद नदीमला रौप्यपदक मिळालं होतं. त्यावेळी पाकिस्तानात नदीमच्या वडिलांनी नीरजचं अभिनंदन केलं होतं आणि आता नीरजची आई नदीम मुलासारखा आहे असं सांगते आहे, ही गोष्ट मनाला भिडणारी आहे.

अनेकदा दोन देशांच्या टीम्समधलं वैर किंवा स्पर्धा विकोपाला जाते. पण खेळाच्या जगात अशीही अनेक उदाहरणं आहेत, जिथे एरवी शत्रूराष्ट्र असलेल्या देशांचे खेळाडू किंवा एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले खेळाडू यांच्यात प्रत्यक्षात मैत्रीपूर्ण नातं असतं. मैदानावरचे वैर, तेवढ्यापुरतेच म्हणजे त्या सामन्यापुरतेच, मर्यादित राहते. अमेरिकेचा कृष्णवर्णीय खेळाडू जेसी ओवेन्स आणि हिटलरच्या अधिपत्याखालील जर्मनीच्या लुझ लाँगमध्येही असेच मैत्रीपूर्ण संबंध होते, जे वर्णद्वेष आणि दोन देशांमधल्या स्पर्धेच्या पलीकडे होते. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल किंवा ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नावरातिलोव्हा यांनी एकमेकांविषयीचा आदर अनेकदा बोलून दाखवला आहे. हे मैदानावरचे प्रतिस्पर्धी एकमेकांची फोनवरून किंवा भेटल्यानंतर चौकशी जातीने करतात. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या खेळाडूंनी एकत्र काढलेल्या सेल्फीचीही चर्चा आहे. त्यांचे स्पर्धक मोठ्या स्पर्धांमध्ये एकत्र संवाद साधताना अनेकदा दिसले आहेत. याआधी काही क्रीडास्पर्धांमध्ये दोन्ही कोरियांचे खेळाडू एकत्रित एकाच ध्वजाखाली खेळले होते. 

लुझ लाँग आणि जेसी ओवेन्स

टेनिसच्या दुहेरीमध्ये भारताचा रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी ही जोडी ‘इंडो-पाक एक्सप्रेस’ म्हणून नावलौकिकाला आली. एकेकाळी पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी या दोन देशांत वैर होतं. मात्र तरीही एकाच खेळातील दोन्ही देशाचे स्पर्धक एकमेकांशी हितगुज करतानाही दिसासचे. चीन आणि तैवानलाही हे लागू पडते.

मैदानात या दोन्ही खेळाडूंमध्ये काट्याची टक्कर असली, तरी खेळाच्या मैदानाबाहेर ते चांगले मित्र आहेत. त्यांची मैत्रीही अनेकदा दिसून आली आहे. विशेष म्हणजे ज्या अर्शदने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं, त्याच्या मदतीसाठी नीरजने काही महिन्यांपूर्वी पुढाकार घेतला होता. नदीमला नवा भाला मिळावा, यासाठी त्याने विनंती केली होती. मार्च 2024 मध्ये नदीमने सांगितले होते की, तो सात ते आठ वर्षे एकच भाला वापरत आहे आणि आता त्याचा भाला खराब झाला आहे. त्याने राष्ट्रीय फेडरेशनकडे यासाठी मदतही मागितली होती. त्याच्या या खुलाशानंतर नीरजने नदीमला मदत केली जावी अशी विनंती केली होती. तसेच त्याने असेही म्हटले होते की, भाला बनवणाऱ्यांनीही त्याला स्पॉन्सरशिप द्यावी. यानंतर नदीमला आवश्यक ती मदत मिळाली होती आणि तो पॅरिस ऑलिंपिकमध्येही सहभागी झाला. त्याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये विक्रमही केला. त्याने अंतिम सामन्यात 92.97 मीटर लांब भाला फेकला. हा ऑलिंपिकमधील सर्वात लांब थ्रो ठरला. यापूर्वी हा विक्रम अँड्रियास थॉर्किलडसेनच्या नावावर होता. त्याने 2008 ऑलिंपिकमध्ये 90.57 मीटर लांब भाला फेकला होता. दरम्यान अंतिम फेरीत नीरजने त्याचा ‘सिझन बेस्ट’ देत 89.45 मीटर लांब भाला फेकत रौप्यपदक जिंकले. तसेच ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटर लांब भाला फेकला आणि कांस्य पदक पटकावले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की नीरज आणि नदीम गेल्या अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये एकत्र भाग घेतला असून आपापल्या देशांसाठी पदके जिंकली आहेत. नदीमने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 आणि 2023 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.

भालाफेकीचे चॅम्पियन नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांच्यातील बंध भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंमध्ये काही वेळा दिसलेल्या मैत्रीची आठवण करून देतात. नदीमने टर्फवर जल्लोषात ठोसा मारून त्याचा विक्रमी फेक साजरी केल्यानंतर चोप्राने – त्याचा पराभव झालेला असूनही – आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिठी मारली. यातून हेच दिसले की, जटिल राजकीय संबंध असलेल्या देशांतील खेळाडूंमध्येही स्पर्धात्मक भावना एकत्र येऊ शकते. क्रिकेटमध्येही हा मैत्रीचा वारसा सुरू आहे. 2013 पासून भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय मालिका खेळली नसली तरीही, मागील चकमकींनी सौहार्दाचे काही संस्मरणीय क्षण निर्माण केले आहेत. जावेद मियांदाद हे भारतीय क्रिकेटपटूंमध्ये एक प्रिय व्यक्ती होते. त्याचप्रमाणे, 2004 मध्ये मुलतान येथे खेळताना वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानी गोलंदाजांसोबत केलेली खेळी आजही स्मरणात आहे. रवी शास्त्री आणि वसीम अक्रम यांच्याशिवाय भारतात आणि पाकिस्तानात क्रिकेटचा उल्लेख पूर्ण होत नाही. ‘शाझ आणि वाझ’ ही टेलिव्हिजन मालिका विनोदातूनही सौहार्दाची भावना दाखवते. त्यांच्यातील मैत्री सीमा ओलांडते, भौगोलिक विभाजनांना नकार देणारी एकता दाखवते. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनचा खेळ पुन्हा बहराला येणे, त्यासाठी पाकिस्तानी क्रिकेटपटू झहीर अब्बासने त्याला दिलेला सल्ला, आणि अझहरने पुढील काळात पाकिस्तानी तरुण क्रिकेटपटू युनूस खानला केलेले मार्गदर्शन हाही सौहार्दाच्या इतिहासाचा भाग आहे. चोप्रा आणि नदीम यांच्यातील मैत्री हा या चिरस्थायी बंधांचा एक आधुनिक प्रतिध्वनी आहे. 

कोपर, गुडघा आणि पाठीच्या समस्यांशी झगडत असताना आणि इतर देशांच्या खेळाडूंप्रमाणे सुविधा नसतानाही नदीमने आतापर्यंत जे पराक्रम गाजवले, ते पाकिस्तानच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जातील. पाकिस्तानला ऑलिंपिकमध्ये मिळालेले हे चौथे सुवर्ण आहे. मात्र, वैयक्तिक स्पर्धेत पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकणारा नदीम हा पहिला खेळाडू आहे. यापूर्वी पुरुष हॉकी संघाने 1960 रोम ऑलिंपिक, 1968 मेक्सिको ऑलिंपिक आणि 1984 लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वेळी, वैयक्तिक स्पर्धेत, हुसैन शाहने 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये, कुस्तीमध्ये कांस्य आणि 1988 सोल ऑलिंपिकमध्ये, बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकले होते. पाकिस्तानचे हे ऑलिंपिकमधील एकूण 11 वे पदक आहे.

अर्शद नदीम हा बांधकाम कामगाराचा मुलगा, ज्याने अन्न खरेदी करण्यासाठी धडपड करावी लागत होती, तो आता पाकिस्तानचा ऑलिंपिक हिरो आहे. जेव्हा पाकिस्तानचे राष्ट्रीय क्रीडा मंडळ पॅरिस ऑलिंपिकसाठी तयार असलेल्या सात खेळाडूंपैकी कोणाला वित्तपुरवठा करायचा हे ठरवत होते, तेव्हा फक्त अर्शद नदीम आणि त्याचे प्रशिक्षक यांचीच त्यांनी निवड केली. गुरुवारी, पंजाब प्रदेशातील खानवाल गावातील या 27 वर्षीय तरुणाने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाची ऑलिंपिक विक्रमासह परतफेड केली आणि जगातील सर्वात मोठ्या क्रीडा मंचावर देशातील पहिले वैयक्तिक सुवर्ण जिंकले.

ऑलिंपिक ही सव्वाशे वर्षं सुरू असलेली एक चळवळ आहे. मैत्री, बंधुता आणि प्रेम हाच या स्पर्धांचा पाया आहे. ऑलिंपिकमध्ये खेळाडू, पदाधिकारी, स्वयंसेवक आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी हे सगळे मिळून एक कुटुंब मानलं जातं. खेळाडूंमधील स्पर्धा केवळ त्या क्षणापुरती असते. त्यानंतर 200 हून अधिक देशांचे लोक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वावरताना दिसतात. ॲालिंपिकचा समारोप होईल, त्यावेळीदेखील संचालनादरम्यान अनेक खेळाडू एकमेकांसोबत एकमेकांचे फोटो काढताना, सेल्फी काढताना आणि हितगुज करताना दिसतील. ऑलिंपिकचं स्पिरिट किंवा आत्मा हाच तर आहे. तेच नीरज आणि नदीम यांच्या मैत्रीपूर्ण खिलाडूवृत्तीतून दिसून आलं. त्यांच्या या मैत्रीला मनापासून सलाम व आभाळभर शुभेच्छा.

- आशिष निनगुरकर
ashishningurkar@gmail.com 

Tags: olympics 2024 Neeraj Chopra Arshad Nadeem Ashish Ningunkar Load More Tags

Comments:

S. T. Masal

Vyakti manun aapan Nadim aani Niraj la visaru hi pan tyani jo vicharancha aani aacharanacha Aadrsh yenarya pidisamor thevala aahe tynne nakkich bharpur badal hoil..

PANDURANG BAILKAR

अप्रतिम लेख आहे.वाचून डोळे भरून आले. लेखकाने उत्तम प्रकारे विवेचन केले आहे.हा लेख सर्वांनी आवर्जून वाचावा व त्यातून काहीतरी बोध घ्यावा.लेख इतर भाषेत आला तर आणखी अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल.धन्यवाद

संजय कासार

छान लेख आहे. शब्दांकन छान असल्यामुळं लेखकाचे मनापर्यंत भिडतात. या लेखाचा हिंदी -इंग्रजी अनुवाद झाला तर तो अमराठी भाषिका पर्यंत पोहचेल.

Waheeda

खूप सुंदर लेख वाचून खूप आनंद झाला

D T Barde

हा सुंदर लेख हिंदीत व इंग्रजीत उपलब्ध व्हावा . म्हणेज मराठी न समजणाऱ्या अनेक मित्रापर्यंत नीरज- अर्शद यांचे प्रेम पोहचवता येईल .

Add Comment