(उत्तरार्ध) डिजिटल युगातले सहजीवन सही जीवन होईल

कर्तव्य साधना

डिजिटल युगात कौटुंबिक सहजीवनाचा परीघ आकुंचित होत आहे. दैनंदिन जीवनातल्या कित्येक गोष्टींमधला कौटुंबिक संदर्भदेखील नष्ट होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासासोबत भंगत चाललेल्या सहजीवनावर  विवेक सावंत यांनी प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात दृष्टीक्षेप टाकला आहे. या कौटुंबिक विसंवादामागची नेमकी कारणं काय आहेतभंग पावत चाललेले हे कौटुंबिक सहजीवन 'सही'जीवन होऊ शकेल का? याचाही वेध त्यांनी लेखाच्या उत्तरार्धात घेतला आहे.

ऑल्विन टॉफ्लर यांनी अनेक ऐतिहासिक संदर्भांतून हे दाखवून दिले आहे की, सामाजिक संवादांचे आकृतीबंध हे अनेक कारणांमुळे बदलत गेले आहेत. उदाहरणार्थ : स्त्रियांचे समाजातील स्थान व स्वातंत्र्य, समाजाची मूल्यव्यवस्था, युद्धे - पूर- दुष्काळ अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे ओढवलेले लोकसंख्येतील चढ-उतार, वेळोवेळी झालेले धार्मिक परिवर्तने, पर्यावरणीय बदल इत्यादी. या व अशा अनेक कारणांनी  कुटुंबाचे ढाचेही बदलत गेले आहेत. मात्र टॉफलर असेही दाखवून देतात की, हे बदल निश्चित करण्यात ‘कामाचे स्वरूप/आकृतीबंध’ हा घटक सर्वांत प्रभावी राहिला आहे. म्हणजे एकत्र कुटुंब ते विभक्त कुटुंब हा आपला प्रवास,  कृषीप्रधान सभ्यतेकडून उद्योगप्रधान सभ्यतेकडे आपला समाज संक्रमित झाला त्याचा परिपाक आहे. आजही कृषिप्रधान व उद्योगप्रधान या दोहोंना समाजमान्यता आहे. पण पहिला लोप पावत आहे आणि दुसरा  कसाबसा टिकून आहे.

हा मुद्दा नीट लक्षात यावा यासाठी,  कामाच्या ठिकाणांचा व कामाच्या स्वरूपाचा इतिहासक्रम दाखवणारे F हे आद्याक्षर असलेले शब्द पाहूया- Forest, Farm, Fishery, Forces, Field, Factory, Fleet, Facility, Flat, Freelancing Portals. म्हणजे जंगल, शेत / शिवार, मासेमारी, सैन्य, युद्धक्षेत्र ,  खाणक्षेत्र , कार्यक्षेत्र, कारखाने, व्यापारी किंवा व्यावसायिक वाहनांचे तांडे, कार्यालये, इस्पितळे, संशोधनसंस्था, उपहारगृहे, शाळा, दुकाने, विमानतळ, बँका, इ. नानाविध सेवा क्षेत्रातील कामाच्या जागा (facilities) आणि घर (flat) वा घरबसल्या कमाई  करण्यासाठी ऑनलाईन फ्रीलान्सिंग पोर्टल्स. 

या कामांच्या जागा व त्यांचे स्वरूप यातील संक्रमणानुसार , कुटुंबाचे केवळ ढाचेच बदलले असे नाही तर कौटुंबिक सहजीवनाचे स्वरूपही बदलले. वस्तुतः को-लिव्हिंग हा सहजीवनाचा पाया नसून , को-वर्किंग किंवा को-क्रिएटिंग हा पाया आहे. म्हणजे को-वर्किंग या साध्याचे को-लिव्हिंग हे साधन आहे.

याचाच अर्थ, सहवास किंवा सहअस्तित्व यातून मानसिक गरजांची परिपूर्ती करणारी व्यवस्था म्हणजे कुटुंब ही संकल्पना फार काळ टिकू शकत नाही. बाह्यत: जरी अशी कुटुंबे टिकून असल्याचे दिसले तरी त्यातील सहजीवन शुष्क, निरस आणि निर्जीव होत जाते. मग नात्यांमध्ये रसरशीतपणाचा अभाव आणि वाढत जाणारा थंडपणा हाच त्या कुटुंबांचा स्थायीभाव बनतो. म्हणजे केवळ सहवास, साथसंगत, मानसिक आधार, केअरिंग-शेअरिंग, प्रेम, प्रणयरम्यता, लैंगिक समागम, संततीप्राप्ती यावर आधारलेले (भावनिक एकक - इमोशनल युनिट म्हणून उभे राहिलेले) कुटुंब  दीर्घकालीन सुखी सहजीवनाची हमी देऊ शकत नाही. कारण या सर्व भावनिक आशयांसह त्या कुटुंबात सहनिर्मिती करणाऱ्या लोकांचे आर्थिक एककही (इकॉनॉमिक युनिटही) असावे लागते. 

ही ताटातूट कधी झाली? डिजिटल युगापूर्वी अस्तित्वात आलेल्या उद्योगप्रधान समाजात ती झाली. त्यावेळी काम शेतावरून कारखान्यात व कार्यालयात हलले आणि कुटुंबाचे को-वर्किंग थांबले. आणि मग हळूहळू ताण-तणाव वाढायला सुरुवात झाली, त्याचीच परिणती घटस्फोटांचे प्रमाण वाढण्यात होऊ लागली. हा बदल समजून घेतला तर या लेखाच्या पूर्वार्धात वर्णन केल्याप्रमाणे डिजिटल युगात कौटुंबिक सहजीवन का भंग पावत आहे हे लक्षात येईल.

आजही कृषक समाज हा को-वर्किंगच्या भक्कम पायावर उभा आहे, पण त्यात कामावरील भर केंद्रस्थानी आहे. त्यामुळे त्यातील व्यक्तींना विशेषत: स्त्रियांना मानसिक आधार, संवेदनशीलता व स्वातंत्र्य अभावानेच मिळाले. परिणामी, कृषक समाजातल्या नातेसंबंधांमध्ये परस्परप्रेमाचा अंश कमी राहिला. आणि उद्योगप्रधान व सेवाप्रधान समाजात को-वर्किंग शक्य नसल्याने, त्यांच्यातील नातेसंबंध व सहजीवन खुरटणार हे उघड होते. कारण कारखाना किंवा कार्यालय घरात आणता येत नव्हते, त्यामुळे पती-पत्नी जणू दोन भिन्न ग्रहांवर राहत होते! 

त्यांची कामे, त्यांचे भावविश्व, विचारविश्व पूर्णपणे भिन्न होऊ लागले. त्यातही पैसे मिळवण्याची मक्तेदारी पुरुषांची झाली, मग घरकामाला औपचारिक कामाचा दर्जा मिळाला, प्रतिष्ठा नाही मिळाली. त्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त होऊ लागले. स्वातंत्र्य आणि विकासाच्या संधींचा अभाव निर्माण होऊ लागला. स्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याची आज सर्वदूर आढळणारी विकृत मनोवृत्ती वाढू लागली. त्यांना इक्वल पार्टनरचे स्थान द्यायला सर्वत्र नकार मिळू लागला. 

पण आता हळूहळू कारखान्यातील माणसांचे काम रोबोंकडे हस्तांतरित होत जाईल, मग माणसे सेवा क्षेत्रातील कामांकडे अधिकाधिक वळू लागतील. म्हणजे डिजिटल युगात माहिती व ज्ञानप्रधान व्यवस्थेमधील काम, तसेच कल्पकता व नवोन्मेषप्रधान व्यवस्थेमधील सेवाक्षेत्र वाढीस लागेल. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना  अधिकाधिक काम शहरापासून दूरवरच्या व प्रदूषणमुक्त वस्तीतील घरातून करणे शक्य होणार आहे. या शक्यता संगणक, इंटरनेट, 3D प्रिंटींग, यांच्या सहाय्याने विस्तारणार आहेत. सेवाक्षेत्रातील या ऑनलाईन फ्रीलान्सिंग स्वरूपाच्या कामाच्या जोडीनेच हीच माणसे घरालगतच्या शेतातही काम करू शकतील. मग  Decent and dignified work in low carbon world असे नव्या कामाचे स्वरूप तयार होत जाईल. कदाचित एका ‘ग्रीनएजर’ समाजाची ही सुरुवात असेल. त्यामुळे स्त्रियांनाही औपचारिक क्षेत्रातील ( बौद्धिक स्वरूपाच्या उत्पादक व  सर्जनशील ) कामाच्या समान संधी घरबसल्या मिळू शकतील.

मग पुरुषांना असे काम स्त्रियांबरोबर परस्पर सहकार्याने करण्यासाठी नव्या संहिता शोधाव्या लागतील. सहवासाचा उपयोग करून एकमेकांच्या कामात ती दोघे सर्जनशील सहभाग घेऊ शकतील. त्यांची मुलेही त्यात काही प्रमाणात सहभागी होतील. आज लिव्हिंग आणि वर्किंग भिन्न जागी असल्यामुळे मुलांना औपचारिक काम काय असते, याचा आज अजिबात नसलेला परिचय नव्या स्वरूपामुळे घरीच होईल, अर्थातच पुढे त्यांचा  बेकारीपासून बचाव करता येईल. यामुळे मोठी माणसे परस्परात अधिकाधिक गुंतागुंतीच्या बौद्धिक देवाण-घेवाणीत रमू शकतील, त्यातून परस्परांविषयीची संवेदनशीलता वाढेल, भावनिक जवळीकही वाढेल. घरात व्यतीत होणाऱ्या परस्परांच्या वेळेची पारदर्शकता वाढेल, विश्वासाचे वातावरण तयार होईल. सहनिर्मितीत रममाण झाल्यामुळे त्यांची सुख-दु:खे एकरूप होतील, म्हणजेच ते समसुखी आणि समदु:खी होतील. मग जीवनातील अर्थपूर्णतेचा त्यांना सातत्याने प्रत्यय येईल. म्हणजे आता सहजीवनाला तडा देत असणारे डिजिटल तंत्रज्ञान, नव्या सहजीवनात सहनिर्मितीचा आनंद देईल, समाधान निर्माण करण्याचे साधन बनेल.

ज्या कुटुंबांना हे जमणार नाही, त्यांना सुखी सहजीवनासाठी सहनिर्मितीचे इतर आयाम शोधावे लागतील. म्हणजे सहजीवनातील विसंवाद हे ‘को-वर्किंग विरहित को-लिव्हिंग’ मुळे आहेत, हे लक्षात घेऊन त्यांना स्वत:मध्ये दुरुस्ती करावी लागेल. त्यासाठी घराघरातील स्त्री-पुरुषांमधील कामाची नव्याने विभागणी करावी लागेल. आणि मग स्त्रियांना केवळ शारीरिक व मानसिक गरजा भागवणारे यंत्र म्हणून न वागवता, भावनिक व बौद्धिक भागीदार अशी प्रतिष्ठा द्यावी लागेल.

सारांश- सहवास, सहप्रवास, सहभाव, सहअध्ययन, सहविचार, सहकार्य, सहनिर्मिती, सहअनुभव, सहअनुभूती, सहआनंद, समप्रतिष्ठा यातून फुलते तेच खरे सहजीवन;  सह्य जीवन, सुसह्य जीवन, 

सही जीवन ! 

विवेक सावंत, पुणे

md@mkcl.org

(डिजिटल तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या 'महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित' (MKCL) या संस्थेचे विवेक सावंत हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

वाचा या लेखाचा पुर्वार्ध  : डिजिटल युगातले सहजीवन ‘सही’जीवन होईल? (पूर्वार्ध)  

Tags: Vivek Sawant Digital Technology डिजिटल तंत्रज्ञान Load More Tags

Comments:

सुभाषचंद्र खरे

आचार्य अत्रे यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे हे डिजिटल युग प्रचंड आहे. त्याला सामोरे जायलाच पाहिजे.

Ravi Jagtap

अप्रतिम, नवी दिशा देणारे लेख आहेत.

देवेंद्र पचंगे

दोन्हीही लेख अतिशय सुंदर !

भुजंग बोबडे

अप्रतिम, आजच्या जगाचे वास्तव अत्यंत थोड्या व योग्य शब्दात मांडले आहे

Add Comment