समाजासहित (म्हणजे समाजाच्या संगतीने) जाते ते साहित्य आणि समाजाला पुढे नेते ते नेतृत्व. द्रष्टे नेतृत्व असे मानते की, समाजाची ओळख ही केवळ त्याच्या भूतकाळात किंवा वर्तमानात शोधण्याची गोष्ट नसून विशिष्ट उद्दिष्टांसाठी भविष्यकाळात विचारपूर्वक घडवण्याची गोष्ट आहे. प्रदीर्घ काळ चाललेल्या आपल्या स्वातंत्र्य चळवळीतून जी मूल्ये व जे आदर्श आपल्यासमोर आले, त्यातून भारताची भविष्यातील ओळख काय असावी याचे स्वप्नचित्र हळूहळू स्पष्ट होत गेले आणि अखेर सर्वमान्य स्वरूपात आपल्या राज्यघटनेमध्ये ते सुस्पष्ट शब्दांत व्यक्त झाले.
आपली भविष्यातील ओळख काय असावी याचे असे सुस्पष्ट चित्र घटनात्मक स्वरूपात आपल्या भावी पिढ्यांपुढे ठेवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आपला देश आहे, हे आपले भाग्य आहे. ते चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे, त्या ध्येयपूर्तीसाठी समाजाला दिशा देणे, समाजाची जडण-घडण करणे, त्या चित्रातील तत्त्वांच्या विरोधी तत्त्वांशी अहिंसक संघर्ष करणे आणि ते चित्र प्रत्यक्षात आणल्यानंतर ते प्राणपणाने अबाधित राखणे, संवर्धित करणे हे आपल्या भावी नेतृत्वाचे इतिहासदत्त कर्तव्य आहे आणि तेच त्याच्यापुढील आव्हानही आहे.
आपल्या देशाचा विकास म्हणजे वरील घटनात्मक स्वप्नाची परिपूर्ती. या स्वप्नपूर्तीला खीळ घालणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्यात - पराकोटीची विषमता, गरिबी, कुपोषण, उपासमार, बेकारी, व्यसनाधीनता, सार्वजनिक सुविधा व विकासातील असमतोल, आर्थिक मंदीचे सावट, भ्रष्टाचार, अस्वच्छता, प्रदूषण, रोगराई, अज्ञान, निरक्षरता, निकृष्ट दर्जाचे शिक्षण-आरोग्यव्यवस्था-जीवनमान, पराधीनता, अवैज्ञानिकता, दैववाद, सामाजिक अन्याय, शोषण, लिंगभेद, जातीयवाद, धर्मांधता, हिंसाचार, अत्याचार, झुंडशाही, शत्रुभाव, असहिष्णुता, अल्पसंख्याकांमधील असुरक्षितता, लोकशाही संस्थांचा ऱ्हास, सामाजिक अशांतता, दहशतवाद, सांप्रदायिकता, सांस्कृतिक मागासलेपण, बेशिस्त, सुजाण नागरिकत्वाचा अभाव, नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी, पर्यावरणीय अरिष्ट अशा अनेक जटील समस्या आपल्या देशात दीर्घ काळ टिकून राहिल्या आहेत. या समस्या पारंपरिक उपायांनी सुटण्यासारख्या असत्या तर अद्याप शिल्लक राहिल्याच नसत्या.
पण यापैकी बहुतेक समस्या तर दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करत आहेत. म्हणूनच त्यांच्या निर्मूलनासाठी आपल्याला अपारंपरिक आणि कल्पक अशा नवोन्मेषी उपायांची (non-conventional, imaginative and innovative solutions) गरज आहे. असे उपाय इतरत्र कमालीचे यशस्वी होत आहेत. असे अपारंपरिक उपाय शोधू शकणाऱ्या कल्पक व सर्जनशील नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आपला देश आहे. सातत्याने नवोन्मेष (innovations) करून, जटिल समस्यांचे समूळ उच्चाटन करणारी नेतृत्वाची नवी पिढी निर्माण करण्यासाठी एक पर्यायी नेतृत्व विकासनीती आवश्यक आहे.
गेल्या दहा हजार वर्षांत मानवी समाज शेतीप्रधान, उद्योगप्रधान आणि माहितीप्रधान अवस्थांमधून संक्रमित होत-होत आता ज्ञानप्रधान व बुद्धिमत्ताप्रधान अवस्थेत प्रवेश करत आहे. पूर्वीच्या तीनही अवस्थांपेक्षा ही अवस्था मुळातच खूप वेगळी आहे. पूर्वीच्या अवस्थांमध्ये मानवी समाज ज्ञान वापरत नव्हता असे नाही, पण त्याच्या जीवनात ज्ञानाला मध्यवर्ती स्थान नव्हते. निसर्गसंपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, प्राण्यांचे व माणसांचे शारीरिक श्रम, आर्थिक भांडवल, माहिती आणि तिच्यावर वेगाने व स्वस्तात संगणकीय प्रक्रिया करण्याची क्षमता इत्यादींना मध्यवर्ती स्थान होते.
या स्रोतांची मालकी किंवा उपलब्धता असल्याशिवाय स्वत:चा किंवा समाजाचा विकास घडवून आणणे शक्य नव्हते. या अवस्थांमध्ये कुठल्याही वस्तू किंवा सेवेचे मूल्य हे त्यातील ज्ञानाच्या अंशापेक्षा त्यातील जड पदार्थांचे स्वरूप व प्रमाण, ऊर्जा, श्रम, आर्थिक भांडवल किंवा माहिती यांच्या अंशावरून ठरत असे. त्यामुळे इतिहासक्रमात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रथम शेती उत्पादनाचा, मग औद्योगिक उत्पादनाचा आणि त्यानंतर कालांतराने माहितीवर आधारित सेवाक्षेत्राचा वाटा वाढत गेल्याचे दिसते.
एकविसाव्या शतकापासून मात्र नव्या कर्मशील ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होताना आपण बघतो आहोत. या शतकात निसर्गसंपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, शारीरिक श्रम करणारी मोठी प्रशिक्षित लोकसंख्या, आर्थिक भांडवल इत्यादी घटक पुरेसे नसूनही केवळ ज्ञानाच्या, बौद्धिक संपदेच्या बळावर काही समाज, काही देश, काही उद्योग विलक्षण विकास करताना दिसू लागले आहेत. हे पूर्वी कधीही झाले नव्हते. कर्मशील ज्ञान आणि संपत्ती हे शब्द या शतकात समानार्थी होत आहेत.
ज्ञानाधिष्ठित उद्योग, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था व ज्ञानाधिष्ठित समाज हे या शतकाचे परवलीचे शब्द होत आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी व्यक्तींना, समूहांना, राष्ट्रांना नवनवीन ज्ञान आत्मसात करण्याची पूर्वी कधीही नव्हती एवढी नितांत आवश्यकता या शतकात भासत आहे. व्यक्तींच्या, समूहांच्या, राष्ट्रांच्या आणि एकंदर मानवी समाजाच्या 'अस्तित्वासाठी ज्ञान, कल्याणासाठी ज्ञान, विकासासाठी ज्ञान आणि आत्मसन्मानासाठी ज्ञान' अशी ज्ञानाची चतु:सूत्री या शतकात सिद्ध होत आहे.
गेल्या दोन शतकांत श्रीमंत देश अधिकाधिक श्रीमंत होत गेले, ते त्यांनी केलेल्या नव्या कर्मशील ज्ञानाच्या प्रचंड निर्मितीमुळे. केवळ विज्ञान-तंत्रज्ञानच नव्हे, तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या ज्ञानशाखांमध्ये अत्याधुनिक ज्ञानाच्या निर्मितीचा त्यांनी ध्यास घेतला. हे नवे ज्ञान समाजातल्या भेदाभेदांना पार करत सर्व स्तरांपर्यंत सतत वेगाने वितरित करण्याचा महाप्रयास त्यांनी केला. हे नवे ज्ञान जुन्या उपयुक्त ज्ञानाशी जोडत, जुन्या-नव्याचे एकात्मिक व्यवस्थापन त्यांनी केले. सर्वसामान्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत, या नव्या ज्ञानाचा आर्थिक व सामाजिक विकासासाठी सतत परिणामकारकपणे वापर केला. नव्या ज्ञानाची इंटरनेटद्वारे जोडलेल्या लोकसमूहांच्या सहभागातून सहनिर्मिती, वितरण, व्यवस्थापन व सर्वसमावेशक विकासासाठी उपयोजन अशा विशिष्ट विकासनीतीतून वर उल्लेखिलेल्या चतु:सूत्रीने आकार घेतला. आता या ज्ञानाधिष्ठित प्रक्रियेला विकासाच्या क्षेत्रात मध्यवर्ती स्वरूप प्राप्त झाले आहे आणि ज्ञानप्रधान सभ्यता किंवा ज्ञानाधिष्ठित समाज आकाराला येत आहेत.
ज्ञानाधिष्ठित अशा या विलक्षण संरचनेमध्ये मुख्य कच्चा माल आहे ज्ञान आणि पक्का मालही ज्ञानच. आणि नवी उत्पादने व नव्या सेवांचा मुख्य आशयही ज्ञानच! त्यातील भौतिक आशय कमी होत जाऊन त्याची जागा ज्ञान घेत आहे आणि तीही कमालीच्या वेगाने. त्यामुळे या ज्ञानकेंद्री प्रक्रियेमुळे नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी आणि पर्यावरणाचा विनाश उत्तरोत्तर टाळून, अधिकाधिक लोकसंख्येला चांगले जीवनमान मिळण्याच्या शक्यता वाढत आहेत. विकासक्षेत्रात ‘पर्याय’ या शब्दाचा ‘पर्यावरणाच्या दृष्टीने यथार्थ’ असा नवा अर्थ लावणे शक्य होत आहे.
स्मार्ट फोनची जी किंमत आपण मोजतो ती त्याच्यातील जड पदार्थांच्या वजनासाठी नसून त्यामागील निसर्गविज्ञान, मनोविज्ञान, समाजविज्ञान, तंत्रज्ञान आणि कलात्मक आविष्कार यांच्या बौद्धिक संपदेसाठी (म्हणजेच मुख्यत्वे नवकल्पनांच्या आणि ज्ञानाच्या आशयासाठी) आहे. जशी कच्च्या मालाची आणि ऊर्जेची जागा ज्ञान घेत आहे, तशीच शारीरिक श्रमाची जागाही बौद्धिक श्रम घेत आहेत. आर्थिक भांडवलाची जागा कर्मशील स्वरूपातील ज्ञान-भांडवल घेत आहे आणि भौतिक किंवा आर्थिक मालमत्तेपेक्षा बौद्धिक संपदेला महत्त्व प्राप्त होत आहे. कंपन्यांचे बाजारमूल्य निश्चित करताना आता त्यांच्याकडील जमीनजुमला, प्लांट व मशिनरी किंवा आर्थिक मालमत्तेपेक्षा त्यांच्याकडील तज्ज्ञ मनुष्यबळ व त्यांची पेटंट्स आणि कॉपीराईट्स इ.च्या स्वरूपातील नोंदणीकृत बौद्धिक संपदा व त्यांचे बौद्धिक स्वामित्व हक्कच प्रामुख्याने विचारात घेतले जात आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्रीय उत्पन्नातील बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या मानधनापोटी जगभरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा ३५ टक्क्यांवर गेला असून, त्याद्वारे ४ कोटी रोजगार उपलब्ध झाले आहेत. अमेरिकेतील एकंदर रोजगारांच्या ते २८ टक्के आहेत. अमेरिकेची संपूर्ण अर्थव्यवस्था झपाट्याने ज्ञानप्रधान होत आहे. जुन्या जड पदार्थकेन्द्री किंवा ऊर्जाकेन्द्री किंवा श्रमकेन्द्री प्रक्रिया वेगाने कालबाह्य होत आहेत आणि नव्या ज्ञानकेन्द्री प्रक्रिया त्यांची जागा घेत आहेत.
इ.स. २०१२ पासून अमेरिकेतील कुठलाही उद्योग एक तर नोंदणीकृत बौद्धिक संपदा निर्माण करत आहे आणि/किंवा ती वापरत तरी आहे. बौद्धिक संपदा हा त्या अर्थव्यवस्थेचा श्वास होऊ पाहत आहे. ज्ञानप्रधान अवस्थेचा हा विकास यापुढील काही दशके केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतात आणि जगभर वेगाने होत राहणार, हे निश्चित. त्यामुळे शेती, उद्योग आणि सेवा इत्यादी सर्वच क्षेत्रे वाढत राहतील; पण त्यांना वेगाने ज्ञानप्रधान होणे भाग पडेल!
ज्ञानाचा चहूबाजूंनी आणि सेकंदा सेकंदाला विस्फोट होत आहे. ज्ञानयुगाचे ते एक व्यवच्छेदक लक्षण आहे. अभिजनांची मक्तेदारी संपवत समाजाच्या अनेक स्तरांतील लोक आता ज्ञानाची निर्मिती करत आहेत. एकविसावे शतक सुरू होताना जन्मलेले विकिपेडिया आणि तत्सम मुक्त ज्ञानस्रोत हे सर्वसामान्य लोकांच्या ज्ञानक्षेत्रातील असामान्य अशा सामूहिक कृतीचे पहिलेवहिले नमुने आहेत. इंटरनेटमुळे भौगोलिक बंधने दूर सारून माहितीची सर्वदूर उपलब्धता आणि ज्ञानाची सहनिर्मिती विलक्षण वेगाने वाढत आहे. मानवी समाज जणू काही एका चिरायू अशा वैश्विक मेंदूची निर्मिती करत आहे आणि समाजातला प्रत्येक जण त्या मेंदूचा बव्हंशी मुक्त वापर करणार आहे.
या पार्श्वभूमीवर, आता आपल्या देशाला गरज आहे - कोट्यवधी गरीब जनतेच्या जीवनातील वर उल्लेखलेल्या जटिल समस्या सोडवू शकणाऱ्या सर्जनशील, नवोन्मेषी ज्ञानकर्मींची. आणि अशा असंख्य संवेदनशील व लोकाभिमुख ज्ञानकर्मींची चळवळ कशी निर्माण करायची व कार्यरत ठेवायची, हे भावी काळातील युवा नेतृत्वासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.
अक्राळविक्राळ स्वरूप धारण करणाऱ्या वरील समस्यांची अशी अपारंपरिक सोडवणूक न केल्यास प्रगत देशांचा व बहुराष्ट्रीय कंपन्यांचा नवा ज्ञानाधिष्ठित साम्राज्यवाद आपले शोषण करेल आणि मग आपल्या स्वातंत्र्याला ग्रहण लागेल. अशा साम्राज्यवादाला पूरक अशी भ्रष्ट व संधिसाधू (सत्ताधारी वर्ग, नफेखोर कॉर्पोरेट्स, विकाऊ मीडिया) यांची युती राज्यघटनेत अभिप्रेत असलेला आदर्श समाज प्रत्यक्षात आणू देणार नाही. असंघटित सामान्य जनतेच्या मागासलेपणाचा गैरफायदा उठवून अशा शक्तींनी केलेल्या आपल्या शोषणाचा इतिहास फार जुना नाही. आजही त्यांच्याकडून ते मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्या देशातील ८० कोटी लोकांच्या भीषण दारिद्र्याचे ते मुख्य कारण आहे.
आता तसेच शोषण नव्या ज्ञानाची मक्तेदारी मिळवणाऱ्या शक्तींकडून होईल. आत्महत्येचा दुर्दैवी मार्ग निवडणाऱ्या आपल्या शेतकऱ्याला केवळ आर्थिक पॅकेज देऊन त्याची आत्महत्या टळणार नाही. त्याला संजीवक व स्वावलंबी शेतीसाठी (त्याचे केवळ उत्पादनच नव्हे तर उत्पन्नही वाढवणाऱ्या) नव्या कर्मशील आणि किफायतशीर ज्ञानाच्या व बंधुभावी संवादाच्या सातत्यपूर्ण पॅकेजची गरज आहे.
दारिद्र्यमुक्त, विषमतामुक्त, सर्जनशील, नवोन्मेषी, स्वतंत्र वृत्तीच्या, आधुनिक नैतिक/जीवन-मूल्ये जपणाऱ्या, पर्यावरणसंवर्धक आणि लोकशाही समाजाच्या निर्मितीची जबाबदारी नवे ज्ञानाधिष्ठित समाजविकासकेन्द्री नेतृत्वच पेलू शकेल. ‘भारत’ या शब्दाची संस्कृतातील व्युत्पत्ती 'भा नाम आभा, आभा नाम प्रभा, प्रभा नाम ज्ञानम्, तत्र रत:' अशी आहे. अर्थात (लोककल्याणकारी) ज्ञानाच्या साधनेत रत असलेला (देश/समाज) म्हणजे भारत. आपल्या देशाचे ‘भारत’ हे नाव या अर्थाने सार्थ करून दाखवणे, हे भावी युवा नेतृत्वासमोरील एक मोठे आव्हान आहे.
Tags: विवेकसावंत युवा तरुण विज्ञान तंत्रज्ञान MKCL vivek sawant knowledge नेतृत्व leadership लेख Load More Tags
Add Comment