डिजिटल युगात कौटुंबिक सहजीवनाचा परीघ आकुंचित होत आहे. दैनंदिन जीवनातल्या कित्येक गोष्टींमधला कौटुंबिक संदर्भदेखील नष्ट होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासासोबत भंगत चाललेल्या सहजीवनावर विवेक सावंत यांनी प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात दृष्टीक्षेप टाकला आहे. या कौटुंबिक विसंवादामागची नेमकी कारणं काय आहेत? भंग पावत चाललेले हे कौटुंबिक सहजीवन 'सही'जीवन होऊ शकेल का? याचाही वेध त्यांनी लेखाच्या उत्तरार्धात घेतला आहे.
ऐंशीचे दशक सरत असताना शीतयुध्द संपले. बर्लिनची भिंत जमीनदोस्त करण्यात आली. त्यापाठोपाठ खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरणाचे (‘खाउजा’चे) वारे जगभर वाहू लागले, व्यक्तीवाद फोफावू लागला. आणि मग सामाजिकता, सामुहिकता, सामुदायिकता यांचा अवकाश संकोच पावू लागला. मी, माझे, माझ्यासाठी अशी आत्मकेंद्री वृत्ती वाढू लागली. “We are, therefore, I am” या धारणेला तडे जाऊ लागले.
‘खाउजा’मुळे आधीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतीवर बाजारपेठीय अरिष्ट आले. ग्रामीण भागातील सामाजिक व कौटुंबिक सहजीवनालाही तडे जाऊ लागले. लक्षावधी लोकांचे शहरांकडे सक्तीचे स्थलांतर वाढू लागले. शेतीतून बाहेर फेकले गेलेले बहुसंख्य स्त्री-पुरुष शहरात बांधकाम मजूर/कामगार बनले, स्थिर कौटुंबिक सहजीवनाऐवजी भटके व अस्थिर आयुष्य त्यांच्या वाटयाला आले.
कृषी क्षेत्रातून शहराकडे होणाऱ्या अशिक्षितांच्या सक्तीच्या स्थलांतराबरोबरच, सेवा क्षेत्रातील रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षितांचे ऐच्छिक स्थलांतरही वाढीस लागले. त्यामुळे शहरीकरणाने अफाट वेग घेतला. परिणामी एकाच कुटुंबातील व्यक्ती निरनिराळ्या शहरात किंवा देशात स्थायिक व्हायला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. आणि मग कौटुंबिक सहजीवनाचा परीघ अधिकच आकुंचित झाला.
नियोजनशून्य वाढीमुळे शहरे कितीही बकाल झाली तरी, वाढत्या व्यक्तीवादाच्या प्रभावामुळे शहरांच्या या प्रचंड अनोळखी गर्दीत मिळू लागलेल्या प्रायव्हसीचे आकर्षण ग्रामीण युवांमध्येही वाढू लागले. याचा परिणाम, ग्रामीण व शहरी कौटुंबिक सहजीवनावर होणे अपरिहार्य होते.
ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस वाढीस लागलेल्या व्यक्तीवादी जीवनशैलीला अधिक व्यक्तीकेंद्री बनवणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाची (पुढल्या तीन दशकात) भर पडत गेली. त्या दशकाच्या अखेरीस समुदायाने मिळून परस्पर सहकार्याने सामाईकपणे वापरण्याच्या ‘टाईम शेअरिंग’ संगणकांचा अस्त सुरू झाला. आणि पूर्णपणे एकाच व्यक्तीच्या खासगी वापरासाठी बनवण्यात आलेल्या ‘व्यक्तीगत संगणकांचा’ (Personal Computers म्हणजेच PC चा) जमाना आला. एका दशकानंतर त्यात ‘व्यक्तीगत सेलफोन’ची भर पडली आणि त्यानंतरच्या दशकात त्याची जागा इंटरनेट-रेडी ‘व्यक्तीगत स्मार्टफोन’ने घेतली.
पुढल्या दशकात अक्षरश: कोट्यवधी लोकांच्या हातात स्मार्टफोन आले. त्यावर उपलब्ध झालेली हजारो apps, भूमिती श्रेणीने वाढणारा मल्टीमिडिया स्वरुपातील कंटेंट (माहिती/आशय) आणि आता बहुपरिचित झालेला समाजमाध्यमांचा माहोल, या सर्वांमुळे जगात डिजिटल युगाचा महाप्रवाह अवतरला. व्यक्तीवादाच्या वाढत्या प्रभावाला तंत्रज्ञान व मुक्त बाजारपेठ यांनी अधिक चालना दिली. अर्थातच, त्या तंत्रज्ञानाचे सर्वसामान्यांना विलक्षण फायदे झाले. पण त्याच्या अवाजवी वापरामुळे व्यक्तीकेंद्री व आभासी वास्तवातील जीवनशैलीचा अतिरेक सुरू झाला.
पूर्वी पोस्टमनने घरात टाकलेली पत्रे हा कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा विषय असायचा, घरी येणाऱ्या वर्तमानपत्राचे सहवाचन नित्याचीच बाब असायची. रेडिओ व टेपरेकॉर्डरचेही सहश्रवण व्हायचे. घरी कॅमेरा असलाच तर तो व त्याच्या सहाय्याने काढलेले फोटो, वर्षानुवर्षे जपून ठेवण्याची व मधून मधून अख्या कुटुंबाने बघून नोस्टाल्जिक होण्याची गोष्ट असायची. लँडलाईनचा फोन (व क्वचित त्यावरील संवादसुद्धा!) आणि टीव्ही तर केवळ कौटुंबिक नव्हे तर जणू काही अख्या चाळीची/वाड्याची किंवा छोट्या सोसायटीचीच मालमत्ता असायची! घरी आणलेली पुस्तके व नियतकालिके यांचेही तेच. सिनेमा, नाटक किंवा गाण्याची मैफिल ही तर कुटुंबाने किंवा मित्र-मंडळींनी सहआनंद घेण्याची पर्वणी. मनीऑर्डरचे पैसे स्वीकारणे किंवा बँकेतून पैसे काढून आणणे हे घरातच नव्हे तर वाड्यातही सर्वज्ञात असायचे. कौटुंबिक व सामुदायिक सहजीवनात रंग भरण्यासाठी निमित्त ठरणाऱ्या, कटू-गोड प्रसंगांनी नातेसंबंधांची वीण घट्ट करणाऱ्या या आणि अशा कितीतरी (वरकरणी साध्या वाटणाऱ्या) गोष्टी आता स्मार्टफोननामक बहुगुणी यंत्राने पूर्णपणे व्यक्तीगत, अतिजलद व सोयीस्कर आणि म्हणूनच कदाचित निरस करून टाकल्या आहेत.
पूर्वी परस्परांच्या प्रत्यक्ष भेटीत (अर्थात सिंक्रोनस मोडमध्ये) संवाद घडायचे. आता त्यांची जागा ज्याला त्याला वेळ आणि मूड असेल तेव्हा मिळणाऱ्या असिंक्रोनस प्रतिसादांनी घेतली. आता तर असिंक्रोनस प्रतिसाद हीच जणू संवादाची एकमेव पद्धत आहे असा समज दृढ झाला आहे. त्यामुळे एकमेकासमोर बसलेल्या व्यक्तीही परस्परांशी सर्रास Whatsappवर चॅट करताना दिसतात आणि त्यात त्यांना काहीच अनैसर्गिक वाटत नाही!
परस्परांच्या भावभावनांविषयी संवेदनशील असणे, परस्परांना समजून घेणे, जुळवून घेणे, तडजोड करणे, परस्परांचा वेळ हक्काने मागणे, परस्परांचे सहकार्य/ सहभाग गृहीत धरणे, इतरांच्या आनंदासाठी त्याग करणे, मन मोकळे करणे, ‘सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती दु:खे डोळा पाणी’ अशा बोरकरी अनुभूतीने सहज जगणे या कौटुंबिक जीवनातील व मैत्रीतील अध्याहृत गोष्टी दुरापास्त होत चालल्या आहेत.
इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे अवतरलेल्या डिजिटल युगात आणि क्लाउडच्या जगात आता अनेक गोष्टी व्यक्तीगत होत आहेत. कुटुंबातील इतरांचा सहभाग अनावश्यकच नव्हे तर अडचणीचा वाटू लागला आहे. प्रत्येकजण दिवसातला बराच काळ स्मार्टफोनवरचे आभासी जगातले क्षणभंगुर अनुभव घेण्यात व्यस्त, ग्रस्त किंवा क्वचित मस्त आहे. तो आणि त्याच्या भोवतीचा समाज वयाचे भान विसरून ‘टीनएजर’ आणि ‘स्क्रीनएजर’ होत आहेत. विभक्त कुटुंबांप्रमाणे आता ‘विभक्त व्यक्ती’चा उदय होत आहे. आपण आत्ता ज्या स्थानी आहोत तिथे नसावे आणि ज्या स्थानी या क्षणी असू शकत नाही तिथे असायलाच पाहिजे ही आर्त इच्छा सर्वांना ग्रासते आहे. घरात आजारी आईशी चार प्रेमाचे शब्द बोलण्याऐवजी आणि तिला आश्वासक स्पर्शाचा आधार देण्याऐवजी दूर आफ्रिकेतील कुपोषित मुलाच्या समाजमाध्यमातील केविलवाण्या प्रतिमेवर कोरडी इमोजी करुणा व्यक्त करून पुढच्या क्षणी पुढच्या पोस्टवर जाणे हे संवेदनशीलतेचे समाजमान्य लक्षण ठरत आहे.
वर सांगितलेल्या दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टीमधील हरवलेल्या कौटुंबिक सहभागाची आणि सह्भावाची जागा तितक्याच प्रभावीपणे घेऊन, परस्परसंबंधातील ओलावा व ऊब टिकवू शकतील असे नवे अवकाश निर्माण होताना दिसत नाहीत. त्यामुळे सहजीवनाचा संकोच होऊन माणसे यंत्रवत व एकाकी होत आहेत.
डिजिटल युगामुळे अर्थातच काही स्वागतार्ह बदलही होत आहेत. अनेक शहरांत किंवा देशांत कामानिमित्त गेलेल्या किंवा स्थायिक झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांशी सहज संपर्क/संवाद साधता येत आहे. याला डिजिटल विश्वात ‘रिमोट टुगेदरनेस’ म्हणजे ‘दूरस्थ एकोपा’ असे संबोधले जाते. शिवाय माहितीच्या सर्वदूर उपलब्धतेमुळे बाह्य जगाशी संपर्काची व्यापक संधी मिळणाऱ्या पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. तुलनेने अधिक काळ घरात व्यतीत करणाऱ्या स्त्रिया व मुलांनादेखील निवडीचे व निर्णयाचे स्वातंत्र्य मिळत आहे.
मात्र दुसरीकडे, इतरांना आपल्यासाठी वेळ नसल्याची, आपल्याला महत्व मिळत नसल्याची भावना पुरुष, स्त्रिया व मुले यांच्यामध्येही निर्माण होते आहे. तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे व दबावामुळे व्यक्तींमधील परस्परसंबंधांचे व संवादांचे संकेत बदलत आहेत. आता घरात समोर असलेल्या व्यक्तीला हाक मारली तर प्रतिसाद येईलच याची खात्री नाही. कारण ती शरीराने समोर असली तरी मनाने स्मार्टफोनवरील तिच्या आवडत्या दूरदेशी असू शकते!
‘सुखी कुटुंब’ किंवा फार तर ‘सुखी कुटुंबातील व्यक्ती’ या उद्दिष्टाकडून ‘कुटुंबातील सुखी व्यक्ती’ अशा व्यक्तीकेंद्री उद्दिष्टाकडे आपला प्रवास वेगाने होत आहे. कुटुंबाची म्हणून असणारी संस्कृती, संस्कार, मूल्ये नामशेष होत आहेत. कुटुंबाने एकत्र राहण्यातला भावनिक आशय लोप पावत असून , केवळ भौतिक किंवा ऐहिक गरज त्याची जागा व्यापत आहे. म्हणजे प्रेमळ सहवास देणाऱ्या ‘होम’चे सहअस्तित्वाची जबरदस्ती असलेल्या ‘हाउस’मध्ये क्षुल्लकीकरण होत आहे.
डिजिटल युगाने ‘शेअरिंग’चे बाह्य पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, पण कुटुंबात मिळणारे ‘केअरिंग’ बाहेर कसे मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कुटुंबातील चार जणांची तोंडे आपापल्या स्मार्ट फोनवरील चार भिन्न जगांच्या चार दिशांना असतील, तर कुटुंबाच्या सांस्कृतिक ओळखीच्या केवळ बाह्य आणि तकलादू आवरणाखालची परस्पर-असंबद्ध या अर्थाने ‘स्व-तंत्र’ व्यक्तिमत्त्वे ही त्यांची नवी ओळख आहे. अर्थात त्यामुळे कुटुंबातील प्रस्थापित पितृ अथवा मातृसत्ता लोप पावून तेथे या ‘स्व-तंत्र’ व्यक्तिमत्त्वांची ‘मिली-जुली’ सत्ता तयार होत आहे आणि हे कुटुंबाच्या लोकशाहीकरणासाठी उपयुक्तच आहे.
मात्र व्यक्ती घरात व कुटुंबात जो वेळ व्यतीत करते तेव्हा ती नक्की काय करते हे कुटुंबातील इतरांना कळेनासे झाले आहे. व्यक्तीचे खासगी जीवन आणि तिचे कौटुंबिक खासगी जीवन या आता दोन भिन्न वास्तवता आहेत. त्यामुळे परस्पर विश्वासाची जागा अविश्वासाने घेतली आहे. कुटुंबातील व्यक्ती परस्परांचे चारित्र्य-परीक्षण आता समाजमाध्यमांच्या सहाय्याने करत आहेत. कुटुंबाची एकात्मता आणि अखंडता कशी राखायची हा चिंतेचा विषय बनत आहे.
(प्रस्तुत लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा )
विवेक सावंत, पुणे
(डिजिटल तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या 'महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित' (MKCL) या संस्थेचे विवेक सावंत हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
वाचा या लेखाचा उत्तरार्ध : डिजिटल युगातले सहजीवन ‘सही’जीवन होईल? (उत्तरार्ध)
Tags: विवेक सावंत Load More Tags
Add Comment