बिजापूरचा आठवडी बाजार

छत्तीसगडमधील आदिवासीबहुल प्रदेशात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी तिथल्या वास्तव्यावर आधारित काही अनुभव, काही निरीक्षणे नोंदविणारे लेखन केले आहे. त्याचे संकलन 'बिजापूर डायरी' या नावाने पुस्तकरूपाने 27 ऑगस्ट 2019 रोजी येत आहे. त्यातील हा एक लेख.  

बिजापूर भागातील आठवडी बाजार ही एक पाहण्यासारखी गोष्ट असते. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या गावांत बाजार लागतो, आणि मग आजूबाजूच्या खेड्यांतून बाजारात जाण्यासाठी लोकांची एकच गडबड उडते. रविवारी बिजापूर आणि कुटरूचा बाजार, सोमवारी नेमेडचा, मंगळवारी बासागुडा, शुक्रवारी गंगालूर, शनिवारी चेरपाल असे किती तरी विविध बाजार मी हौसेने पालथे घातले आहेत. बाजाराची सोप्या पद्धतीने मांडणी सांगायची तर, सुरुवातीच्या दर्शनी भागात भाज्या, फळे, चणेफुटाणे, सुके मासे, झिंगे, भजे-पकोडे यांची गर्दी उडालेली दिसते. जसजसे आत जाऊ तसतशा मग रोजच्या आयुष्यात गरज भासणाऱ्या सर्वच वस्तू मिळतात. त्यात मग सर्वच प्रकारचे कपडे, साबण-तेलापासून टॉर्च, तंबाखूपर्यंत सर्व, चपला, स्टील-जर्मनची भांडीकुंडी, प्लॅस्टिकच्या निरनिराळ्या वस्तू, बकेट, घड्याळे व इलेक्ट्रॉनिक वस्तू, किराणा, इमिटेशन ज्वेलरी, काचेच्या बांगड्या,  बांबूच्या टोपल्या, मासे पकडण्याचे जाळे, मातीची विविध भांडी, त्यात तांदूळ शिजवायला झाकण असलेले मडके, महुआ बनवण्यासाठी लागणारी भांडी, इत्यादी. एका टोकाला शिवणकाम करणारे टेलर्सही बसलेले असतात. बांबूच्या, मातीच्या वस्तू या आजूबाजूच्या ठरावीक गावात बनतात. कोणी स्वतः बनवलेल्या या वस्तू विकायला आणतो, तर कोणी कारागिराकडून या वस्तू विकत घेऊन बाजारात विकायला आणतो.

येथील विशेष वस्तू म्हणजे चापडा. वृक्षांच्या मोठ्या आकाराच्या पानांवर मुंग्याचा एक जथा वास करतो. त्यात लाल मुंग्या आणि त्यांची छोटी-छोटी अंडी असतात. स्त्रिया अशी अख्खी पाने तोडून आणतात आणि १० रुपयाला एक पान अशा पद्धतीने हे विकतात. या मुंग्यांची चटणी इथे सर्व आवडीने खातात. तसेच हा चापडा खाल्ल्याने मलेरियापासून बचाव होतो, असेही येथे समजले जाते. यात फॉलिक असिड असते, असे म्हणतात. या दोन्ही कारणांनी गर्भवती स्त्रियांनाही हे खाऊ घातले जाते. काही भागात ‘कोसा’ विकले जाते. या भागातील रेशीमकिड्यांपासून हे झाडावर मिळते. आदिवासी जंगलातून आणून एखाद्या व्यापाऱ्याला विकतात. तसेच महुआच्या सिझनमध्ये महुआची सुकवलेली फुले, इमलीच्या सीझनमध्ये बिया काढून गराचे केलेले गोळे, सीझननुसार मिळणारी त्या भागातील औषधी जडी-बुटी अशाही निरनिराळ्या गोष्टी पाहायला मिळतात. 

चेरपालच्या बाजारात तेथील डॉ. पटेल यांनी मला भोईलिंब किंवा चिरैतय्या या नावाची जंगली वनस्पती दाखवली, जिच्यापासून मलेरियावर औषध म्हणून वापरले जाणारे ‘क्लोरोक्वीन’, तसेच ‘क्विनीन’ हे औषध बनवले जाते.  गाववाले ही वनस्पती जंगलातून आणून सावकाराला किंवा एखाद्या व्यापाऱ्याला विकतात. तो पुढे ते कारखान्याकडे पाठवतो. विकणारा आदिवासी स्वतःच मला सांगू लागला, “हम इतने सस्ते मे ये वनस्पती बेचते है. फाक्टरी मे जाके, इस से दवा बनती है, जो प्लास्टिक मे पॅक होने के बाद हम फिर वो खरीदते है.”

अशा आतील गावात बाजारात मिळणाऱ्या भाज्या या गाववाल्यांनी घरच्या घरीच उगवलेल्या असतात. कोणत्याही रसायनाच्या वापराविना आणि शुद्ध देशी. छोटीशी गोड केळी, पपई, छोटीशी मोसंबी, देशी दुधी भोपळा, तेंदूची फळे, जंगली दिसणारी कोथिंबीर, पिटुकले लालेलाल टमाटर, वेगवेगळ्या प्रकारचा हिरवा भाजीपाला, अंबाडीची लाल भाजी, कंदमुळे अशा भाज्या बघूनच मन खूश होते. ज्या भाज्या व फळे स्थानिक पातळीवर मिळत नाहीत, ती सारी जगदलपूरहून आणली जातात. फुलकोबी, मोठ्या आकाराची वांगी अशा भाज्या ओडिशातून मोठ्या प्रमाणात येतात. दैनंदिन उपयोगाच्या सर्वच वस्तू जगदलपूरमधील व्यापाऱ्यांकडून आणल्या जातात. एका बाजूला कोंबड्या, बदक विक्रीही चालू असते. देशी आणि ब्रॉयलर - दोन्ही प्रकारच्या कोंबड्या मिळतात. एकदा मी बसमधून जात असताना कोंबडीचा आवाज ऐकू आला, पाहिले तर शेजारील सीटवरील बाईने बाजारातून घेतलेली कोंबडी पिशवीत लपवून पायाजवळ ठेवली होती.

पूर्वी प्रत्येक बाजारात ‘मुर्गा लडाई’ चालायची. सध्या बिजापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद झालेली आहे. एकदा दंतेवाडा जिल्ह्यात मला ‘मुर्गा लडाई’ पाहण्याचा योग आला. लाकडाचे मोठे गोल कुंपण केले होते. सर्व लोक प्रचंड गर्दी करून कुंपणाभोवती उभे होते. त्या गोल कुंपणाच्या आत थोड्याच लोकांना आणि फक्त कोंबड्याच्या मालकांना प्रवेश होता. कुंपणाच्या दरवाजात दोघे अडवायला उभे होते. त्या गर्दीत मी एकमेव स्त्री होते, मला त्यांनी अदबीने आत जाऊ दिले, “मॅडम, फोटो काढू नका,” हेही विनवले. आदिवासींसाठी ही येथील एकमेव मोठी करमणूक आहे. दोन जण एकमेकांत पैज लावतात, की कोणता कोंबडा जिंकेल. १० रुपयांपासून ते काही हजार रुपयांपर्यंत पैज लागते. तिकडे कोंबड्याचे मालक आपापले कोंबडे घेऊन रिंगणात सामोरे येतात. कोंबड्यांच्या नखाला धारदार पाते लावले असते. कोंबडे झुंजायला लागले की त्या पात्याने जखमी होऊन एक कोंबडा हरतो. रक्ताची धार वाहते. मी १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ ते पाहू शकले नाही. जिंकलेल्या मालकाला हरलेला कोंबडा बक्षीस मिळतो, वर त्या दोघांत  ठरलेले असतील, तसे पैसे मिळतात.

या बाजाराचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे येथे ‘वस्तुविनिमय’ चालतो. पैशांऐवजी कधी बटाटे देऊन, तर कधी मिठाची देवाण घेवाण होऊन व्यवहार केला जातो.  गावागावात पिकणारे सर्वात महत्त्वाचे धान्य म्हणजे तांदूळ, ज्याला स्थानिक लोक ‘धान’ म्हणतात. धान, तसेच चिंचा हे सारे येथून मधले खरीददार लोक विकत घेऊन, जगदलपूरला व्यापाऱ्याला जाऊन विकतात. बाजाराच्या सुरुवातीलाच हे लोक बसलेले दिसतात. तांदळाच्या, चिंचेच्या राशी लागलेल्या दिसल्या की समजावे की हे व्यापारी लोक. गाववाल्यांकडून चिंचा विकत घेऊन, जगदलपूरमध्ये व्यापाऱ्याला विकणाऱ्या मधल्या  माणसाला ‘कुचिया’ म्हटले जाते. बहुतेकदा हा कुचिया जगदलपूरएवढीच किंमत येथे गावात देतो. यात आदिवासींची अनेकदा फसवणूक होते. कारण ते गणितात कच्चे. हिशोब करणारा कुचिया. त्याचा हिशोब चूक की बरोबर, आदिवासीना कसे समजणार? बोलता-बोलता ठरलेल्या किमतीचा चुकीचा हिशोब करून, आदिवासीच्या हातात कमी पैसे टेकवले जातात. वर तो कुचिया १०-२० रुपये दारूला म्हणून मेहेरबानीने आदिवासीच्या हाती टेकवतो. 

‘तिकुर’ नावाचे एक कंदमूळ आहे, जे बिजापूर भागात विपुल प्रमाणात मिळते. याच्यावर स्थानिक भागातच प्रक्रिया करून पावडर बनवली जाते. त्यापासून पांढऱ्या रंगाच्या गोड वड्या बनवल्या जातात. उन्हाळ्यात  थंड पदार्थ म्हणून तिकुरच्या या गोड व थंड वड्या खाल्ल्या जातात. मी बाजारातून घेतल्या,  तेव्हा १० रुपयात मोठाल्या ५-६ वड्या मिळाल्या. इतका स्वस्त पदार्थ पाहून मला आश्चर्य आणि कौतुक वाटले. शहरात आरोग्याला अपायकारक असणाऱ्या, निकृष्ट प्रतीच्या पदार्थापासून बनवलेली मिठाई किती महाग मिळते आणि ही नैसर्गिकरीत्या बनवलेली मिठाई इतकी स्वस्त! उत्तर भारतीय लोक- खासकरून बिहारचे- त्यांच्या भागातील गोड मिठाई बनवतात. ओड़िसाहूही अनेक लोक येऊन येथे वसलेले आहेत. सर्वच जण येथे सामावून गेले आहेत. जडी-बुटी, ताईत, कस्तुरी असे काय काय विकणारे बंगाली लोकही भेटतात.

बाजाराचा एक मुख्य भाग म्हणजे स्थानिक मद्यपेये, लांदा, ताडी, महुआ, छिंदरस, सल्फी. झाडांपासून काढलेली सल्फी, ताडी, छिंदरस ही पेये ताजी ताजी मिळतात. सकाळी प्यायली तर गोडसर लागतात, जितकी उशिरा पिऊ तितकी आंबट होत जातात. गावात फिरताना ही झाडे पहायला मिळतात आणि पेये गोळा करण्यासाठी उंचावर अडकवलेली मातीची मडकीही नजरेस पडतात. लांदा (ज्याला उत्तर छत्तीसगड भागात हडिया, तर आसाममध्ये अपोंग म्हटले जाते)कसा बनवला जातो, हे ऐकायला मजा येते. तांदूळ भिजवून त्याला मोड आणायचे, ते दळून घ्यायचे, १५ दिवस पाण्यात भिजवून ते नासवायचे, त्याचे बनणारे पेय म्हणजे लांदा. यात दळलेला तांदूळही गाळासारखा असतो, त्यामुळे नशा चढण्यासोबतच पोट भरण्याचेही काम होते. महुआसाठी फुले गोळा करून सुकवली जातात. जाळावर मातीचे भांडे ठेवून त्यात फुले टाकली जातात. भांडे घट्ट झाकलेले असते आणि झाकणाच्या बाजूने एक नळी निघालेली असते. त्या नळीतून वाफेने जमणारे पाणी दुसऱ्या भांड्यात गोळा केले जाते. ही महुआची दारू. यात चवीसाठी कधी द्राक्षे, कधी पपईही टाकली जाते. याच पद्धतीने, जिथे ऊस मिळतो तिथे उसाची, नाहीतर साखरेचीही दारू बनवली जाते. अवघ्या १० रुपयापासून विक्री सुरू होते. हिरव्या पानाच्या द्रोणात दिली जाते. सोबत रेशनच्या उकडलेल्या चण्यापासून खायला बनवलेले असते. नाहीतर भजी, अंडी हे असतातच. अख्खे कुटुंबच्या कुटुंब गोलाकार निवांत बसून द्रोणातून पित असते. लहान लेकरापासून म्हाताऱ्या बाईपर्यंत सर्वच आस्वाद घेतात. कधी जास्त पिऊन झिंगलेल्या लोकांची मस्ती चाललेली दिसते. मोठ्याने गप्पा, हसणे, हातवारे, नाचणे सारेकाही. मी स्वतः ठरवून, यातील प्रत्येक मद्य द्रोणामध्ये घोट-दोन घोट चाखले आहे. ही ताजी पेये इतकी सुंदर लागतात की, मला खरेच प्रश्न पडला- आपल्याकडे स्थानिक पातळीवर इतकी सुंदर मद्ये असताना, इतकी महागाची कशाला पितात लोक ?  मी एका व्यक्तीशी चर्चा केली तेव्हा कळले की, ही स्थानिक मद्ये ताजीच प्यायली तर ठीक. त्यांचा साठा करणे अजून तरी अशक्य आहे. कोणी एक व्यक्ती महुआच्या दारूचे ब्रॅण्डिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ही मद्येही नशा चढणारी, सर्वच दारूंसारखी आरोग्याला अपायकारक असल्याने आणि याचेही काही काळानंतर व्यसनात रूपांतर होत असल्याने लहान मुलांनी, गर्भवती महिलांनी हे पिणे अहितकारकच आहे. खरेतर सर्वांसाठीच अहितकारक आहे.  आजकाल यातही भेसळ होऊ लागली आहे. गावात शुद्ध मिळते; परंतु मोठ्या प्रमाणावर साठा करून विकणारे लोक महुआच्या दारूमध्ये युरिया, छिंदरसामध्ये सोडा असे पदार्थ मिसळून जास्त दिवस विकतात.

विविध वस्तू, भांडीकुंडी, ज्वेलरी, बांगड्या विकणारे दुकानदार आपल्या भागाच्या आजूबाजूचे सारे बाजार फिरतात. जसे की- नेमेडवाले कुटरू, बेदरे, फरसेगड अशा सर्व गावी त्या त्या दिवशी, गाड्यांमध्ये माल घेऊन जाऊन दुकाने लावतात. बांगड्या विकायला, मापानुसार स्त्रियांच्या हातात घालून द्यायला महिला विक्रेताच असतात. बाजारात स्कोर्पियो, जीप, छोटा हत्ती अशा प्रकारच्या खासगी गाड्या भरभरून लोक येतात. काही ठिकाणी गाडीच्या टपावर, मागे-पुढे सर्वत्र लोक बसलेले दिसतात. ड्रायव्हर गाडी चालवतोय, त्यासाठी त्याच्या बाजूच्या काचेसमोरची जागा तेवढी रिकामी असते बाकी गाडीसमोर  डॅश बोर्डवरही लोक निवांत बसून येणे-जाणे करतात.

बिजापूर जिल्ह्यात पूर्वी बासागुडा या गावचा बाजार या भागातील सर्वात संपन्न बाजार म्हणून खूप प्रसिद्ध होता. परंतु सलवा जुडूममध्ये बासागुडाही उद्ध्वस्त मला मोठा वाटला नाही. त्यामानाने बिजापूरचा बाजार, भोपालपट्टणम बाजार सध्या त्यातल्या त्यात मोठे वाटतात.

बिजापूरहून जगदलपूरला आल्यावर शकील रिझवी ही व्यक्ती भेटली. पूर्वी सरकारी व्हॅटर्निटी विभागात काम करणारे, तसेच  सामाजिक संस्थामध्ये काम केलेले शकीलभाई सध्या जगदलपूर प्रभागातील छोटे कव्वाली या गावात राहून आजूबाजूच्या ५२ गावांत व्यक्ती या खेड्यांमध्ये आदिवासी कुटुंबासोबत येऊन राहतात. या कामासोबतच लोकांचे विविध प्रश्न सोडवणे, आरोग्यसमस्याकडे लक्ष देणे, कुपोषित मुलांना दूध पुरवणे, अशी सामाजिक बांधिलकीतून येणारी कामेही ते पार पाडतात. ते दोन दिवस मला त्या भागातील खेडी पाहायला घेऊन गेले. नान्गूर या जगदलपूरपासून २२ किमीवर असणाऱ्या खेड्यातील आठवडा बाजार आम्ही पाहत होतो. येथे धुरवा आणि भद्रा हे लोक प्रामुख्याने आहेत आणि हे माझ्या बिजापूरच्या गोंड आदिवासीपेक्षा बरेच सुस्थितीत, चांगल्या पेहरावामध्ये दिसत होते. येथील बाजारही बिजापूर जिल्ह्यातील बाजारापेक्षा पुष्कळ मोठा आणि वैविध्याने नटलेला दिसत होता. आदिवासी संस्कृतीचे इमिटेशन असलेले दागिने पाहायला मिळत होते, वैशिष्ट्यपूर्ण वस्तू दिसत होत्या. या बाजारासमोर माझा बिजापूरकडील खेड्यांतील बाजार अगदीच गरीब वाटत होता. याचे मुख्य कारण हेच की बिजापूरकडील गोंड, माडिया आदिवासी हे येथील धुरवा, भद्रापेक्षा जास्त मागासलेले आहेत. तसेच ही गावे बस्तर जिल्ह्यातील आणि राजधानीपासून जवळ असल्याने जास्त संपन्न आहेत.

बस्तर भागातील काही खेडयांत  ऊस पिकतो. स्थानिक लोक त्याचा गूळ बनवतात. तो काळसर लाल गूळ दोन मुठीएवढ्या गोळ्याच्या रूपात बाजारात विकायला येतो. चवीला छान लागतो आणि शुद्ध, रसायनविरहित असतो.

शकीलभाईनी धुरवा आणि भद्रा या दोन समाजांमधील फरक, त्यांच्या पेहरावावरून, नाकातील नथीवरून समजावून सांगितला. तसेच आदिवासींच्या जीवनशैलीबद्दल बरीच माहिती त्या दोन दिवसात मला नव्याने समजली. मडिया पेज हा यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ही मडिया पेज उन्हाळ्यामध्ये तांदूळ, नाचणी, मिलेटपासून बनवली जाते. (मडिया हा शब्द नाचणी या धान्यासाठीही वापरला जातो.) दिवसभर भूक लागली की पोट भरायला म्हणून पेज पीत राहतात. येथे प्रसूतीनंतर आईला चापडा चटणी, पपई, कोरडा बास्ता, मसूर डाळ खाऊ घातली जाते, या पदार्थांनी दूध वाढते असा समज आहे. पहिले ७ दिवस जेवणखाण कमी ठेवले जाते, कारण आई जास्त जेवली तर बाळाला अपचन होईल असा समज. जास्तकरून आईला मडिया पेज दिली जाते. रेशनमध्ये चना दाळ मिळते. सर्वांत जास्त खाल्ली जाणारी डाळ म्हणजे मसूर, बाकी राहल डाळ, उडीद खाल्ले जातात. उडीद स्वतः लावतात, पण तेही नियमित नाही. बस्तरमध्ये मूग कोणीच खात नाही. सध्या तेंदूचा मोसम आहे. तेंदूचे फळ सुकवून ठेवतात आणि इतर महिन्यात गोड म्हणून खातात.

येथील सर्वसाधारण जीवनशैली म्हणजे सकाळी उठले की रात्रीचे शिळे खायचे. म्हणून रात्रीच जास्त तांदूळ शिजवून ठेवले जातात. आंबलेली पेज प्यायची. मग शेतीकामासाठी जायचे. ११-१२ वाजता भात, सोबत डाळ किंवा भाजी. रात्री पुन्हा तशाच प्रकारचे जेवण. दिवसातून दोनदा तांदूळ, तोही प्रत्येक वेळी फक्त एक पाव. भाजीमध्ये फुलकोबी, वांगे, आलू प्याज आठवड्यातून एक-दोन वेळा. हिरव्या भाज्या अगदीच नावाला. अंबाडीची लाल भाजी त्यामानाने जास्त खाल्ली जाते. पावसाळ्यात चरोटा ही हिरव्या रंगाची, गवतासारखी दिसणारी पालेभाजी सर्वत्र उगवते. कधी सुकवलेले मासे. वास आणि चवीसाठी एक-दोन मासे आमटीत टाकायचे. महिन्यातून फक्त ३-४ वेळा मांसाहार. त्यात मासळी, अंडे, चिकन, मटण.

येथे गाईचे दूध काढायची पद्धत नाही, त्यामुळे आहारात दूध-दही नाही. एका विक्रेत्याशी गप्पा मारताना मी विचारले, दूध का पीत नाही ? पण ते त्यांच्यात आधीपासूनच पीत नाही, त्यामुळे त्या ‘का’ला उत्तर नाही. तो विक्रेता जगदलपूरमध्ये नियमित जात असल्याने त्याने सांगितले, “कभी शहर मे हम जाते है, तो पी लेते है कभी दूध, कभी लस्सी. यहा गाव मे लोग तो १००-२०० की शराब पी लेंगे, लेकिन दूध नही.”

शकीलभाईनी तेव्हा एक किस्सा सांगितला. पूर्वी एकदा शासनाने खेड्यात सर्वाना मोफत गाई दिल्या. हेतू हा की, गावकऱ्यांनी दूध काढून व्यवसाय करावा, स्वतःही प्यावे. परंतु नुसत्या गाई देऊन शासन थांबले; दूधव्यवसायासाठी लागणारी बाकी जरुरी व्यवस्था मात्र केली नाही. गावकऱ्यांकडे दूध पिण्यासाठी ना काही कारण होते, ना इच्छाशक्ती, ना गाईला पोसायला लागणारी माहिती, ना चारा पाण्याची सोय. वर या गाईंचे दूध गावात तर कोणी पीत नाही. म्हणजे दूध काढून ते विकायला जायचे शहरात. जंगलातील त्या गावातून जगदलपूरला कसे कोण जाणार दूध विकायला? परिणामी योजना चालली नाही. त्या गाई हुशार लोकांनी गाववाल्यांकडून  विकत घेतल्या आणि प्रश्न मिटला.

आमच्याशी खुलून गप्पा मारणाऱ्या त्या मटार विक्रेत्याला मी विचारले, “अभी आपको गाय दी जाये मुफ्त मे, तो पालोगे ?”

“नहीं.” त्याचे ताबडतोब उत्तर.

आदिवासींना आळशी, मागासलेले म्हणून घोषित करण्याआधी त्यांच्या गरजा, सवयी, पद्धती, चालीरीती, समस्या हे सर्व समजून घेऊन, त्यानुसार योजना राबवणे योग्य नाही का ?

हा विक्रेता मटार ६० रुपये किलोने विकत होता. इतके महाग कोण विकत घेणार?

गरीब गाववाले  बाजारात भाजीपाला घेताना, स्वस्त मिळते म्हणून बाजार संपताना उशीर झाल्यामुळे स्वस्त मिळणारा भाजीपाला घेतात;  कधी सडलेलासुद्धा घेतात.

सध्या जगदलपूरच्या आजूबाजूच्या गावात रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर सुरू झाला आहे.

चणेवाला कुरकुर करत होता की, आजकाल लोक चणे-फुटाणे कमी खरेदी करतात. कारण भजी, वडे हे तळलेले पदार्थ जास्त खपतात. “ तळण्याचे तेल पुन: पुन्हा उकळले जाते ते ग्रीस बनेपर्यंत.” शकीलभाईंची त्यावरची टिप्पणी.  

मला हा बाजार पाहून प्रश्न पडत होता की, या बाजारात सर्व काही आहे- भाज्या, गावरान फळे, डाळी, मासळी, मोसमी भाज्या, गूळ;  पण तरीही कुपोषण, रक्तक्षय याचे इतके प्रमाण का ? जीवनशैली आणि आहारपद्धती ऐकून  लक्षात येत होते की, वरवर दिसणारा बाजार संपन्न असला तरी  पोषक भाज्या, फळे, डाळी विकत घेणाऱ्यापैकी स्वतः आदिवासी किती आहेत की गाववाले आहेत, की गरीब आदिवासी फक्त विक्रीच करत आहेत, तेल-मीठ-कपड्याला पैसे जोडण्यासाठी ?

मला आठवले की डॉ. गोडबोले म्हणतात, “श्रीमंत कोणाला म्हणायचे? जो पैसे देतो त्याला. आदिवासी लोक बाजारात जाऊन पैसे देऊन येतात, म्हणून ते श्रीमंत. व्यापारी लोक सारा पैसा गोळा करतात, ते उलट कंजूष ठरले पाहिजेत.”

आदिवासींचे शोषण हा प्रश्न  येतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने विचार करून पोटतिडिकीने बोलतो. प्रत्येकाची तळमळ अगदी खरीच असते. परंतु चुकीचे वाद-प्रतिवाद करून, आपण मूळ मुद्द्यापासूनच भरकटत नाहीत ना, हे सतत तपासत राहिले पाहिजे. शोषण तर सर्वत्रच होते, महाराष्ट्रातील खेड्यांतही होते. पण येथील आदिवासी मात्र इतर देशाच्या मानाने पिछाडीवर का आहेत ? कारण त्यांना संधीच उपलब्ध केल्या गेल्या नाहीत. शासनानेही त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत सुविधा पोहोचवायला दिरंगाई केली. डॉ. अय्याज तांबोळी सरांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले,  “आदिवासींचे शोषण यावर एकच उपाय आहे की त्यांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे. त्यांनाही विकासाच्या समसमान संधी देणे. त्यांचेही प्रतिनिधी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेतले पाहिजेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन, तेही अर्थव्यवस्थेचा भाग बनले पाहिजेत.”

हे सर्व घडताना आपणच दुसरीकडे आदिवासींची संस्कृती संपतेय, असेही म्हणतो. संस्कृती जपली जावी म्हणून आदिवासींना विकासापासून दूर ठेवणे, हेही चूक आहे. शिक्षण, रोजगाराच्या संधी मिळून विकास घडणे आणि संस्कृती जपणे या दोन्ही गोष्टी सामाईकरीत्या घडायला हव्यात.

-डॉ. ऐश्वर्या रेवडकर, बिजापूर (छत्तीसगढ)

zerogravity8686@gmail.com

Tags: travel बिजापूर Load More Tags

Comments:

Panchshil Dawkar

हा लेख बारकाईने आदीवासींच्या जीवनावरती भाष्य करतो, तसेच केवळ समस्या सांगत नाही तर योग्य उपायही सूचवतो डॉ.ऐश्वर्या मन:पूर्वक अभिनंदन

आसावरी

खूप आवडला लेख. कृपया तुमचा सम्पर्क मेल id पाठवाल का

मेघना भुस्कुटे

लेख फार आवडला. तुम्ही आणखी कुठे काही लिहिलं आहे का?

Add Comment