7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization - WHO)संविधान लागू झाले आणि कामकाज सुरू झाले. त्यानिमित्त 7 एप्रिल हा दिवस दर वर्षी जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. समाजातील वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर उपाय शोधणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधन आणि उपलब्धी यांच्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा हेतू आहे. 2025 मध्ये जागतिक आरोग्य दिनाची थीम "निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य" अशी आहे. गर्भवती महिला, नव्या माता आणि नवजात शिशु यांचा मृत्यूदर कमी करणे हे या वर्षीच्या आरोग्य कार्यक्रमाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
या निमित्त आज छत्तीसगडमधील दुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भागात स्त्री-रोगतज्ज्ञ म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांवर आधारलेल्या, डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांच्या 'बिजापूर डायरी' या लेखमालेतील (आणि पुढे याच शीर्षकाच्या पुस्तकातील) एक प्रकरण 'इसलिये राह संघर्ष की हम चुनें' हे ऑडिओ स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत. स्वतः ऐश्वर्या यांच्याच आवाजातला हा 17 मिनिटांचा ऑडिओ आहे. यात स्त्रियांचे प्रजनन-आरोग्य, अशक्तपणा, गर्भावस्थेतील कुपोषण यासारख्या समस्या, आणि त्या समस्यांशी संघर्ष करण्यासाठीची डॉक्टरांची धडपड यांचे दर्शन घडेल.
डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांची 'बिजापूर डायरी' ही लेखमाला 2018-19 या वर्षभरामध्ये साधना साप्ताहिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली. त्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये त्या लेखमालेचे त्याच नावाने पुस्तकही प्रकाशित झाले. त्याच वर्षी त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा ताराबाई शिंदे ललित गद्य पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार लेखकाच्या पहिल्या पुस्तकाला दिला जातो. तसेच या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण युवा लेखक (2021) हा मानाचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. प्रामाणिक निवेदन, विलक्षण अनुभव आणि लेखिकेची डोळ्यासमोर प्रसंग जिवंत करण्याची लेखनशैली यामुळे हे पुस्तक वाचकप्रिय ठरले आहे. या पुस्तकाचे ऑडिओबुक खुद्द लेखिकेच्याच आवाजात 2019 मध्ये स्टोरीटेलवर प्रसिद्ध झाले आहे. 2024 च्या जून महिन्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे.
हे संपूर्ण पुस्तक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
हे पुस्तक छापील स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: ऐश्वर्या रेवडकर' 'बिजापूर डायरी award winning book urban naxal sadhana prakashan महिला आरोग्य छत्तीसगड बस्तर बिजापूर आदिवासी audio स्टोरीटेल ऑडिओबुक स्टोरीटेल ऑडिओबुक मराठी storytel audiobook marathi Load More Tags
Add Comment