रवींद्रनाथांना समजून घेण्यासाठी लिहिलेले चरित्र

पुस्तक प्रकाशन समारंभातील प्रमुख वक्त्यांचे भाषण 

प्रा. डॉ. विलास खोले हे कथासाहित्याचे व्यासंगी, आस्वादक समीक्षेचा वस्तुपाठ घालून देणारे समीक्षक, आणि साक्षेपी संपादक म्हणून विचारविश्वाला परिचित आहेत. रवींद्रनाथ टागोर यांचे चरित्र लिहिण्याचे नियोजन ते करत होते, लेखनाचे कामही सुरू केले. परंतु काम पूर्ण होण्यापूर्वीच 2022मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी कुंदाताई यांच्या विनंतीवरून विलास खोले यांनी सुरू केलेले हे चरित्र त्यांचे साडू - लेखक प्रदीप कुलकर्णी - यांनी तडीस नेले. त्या 'प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर' या पुस्तकाचे प्रकाशन 5 डिसेंबर 2024 रोजी मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे झाले. प्रदीप कुलकर्णी यांना पूर्वीचा चरित्रलेखनाचा अनुभव होताच, मात्र रवींद्रनाथांचा अभ्यास खास या पुस्तकासाठी त्यांनी केला. कुतूहल आणि समजून घेण्याच्या भावनेने, रवींद्रनाथांची जडणघडण, त्यांचे विचार आणि कार्य यांची सुबोध मांडणी केली. प्रा. डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी यांनी या प्रकाशनप्रसंगी पुस्तकाविषयी विवेचक भाषण केले. त्या भाषणाचे त्यांनी स्वतःच केलेले शब्दांकन वाचकांसाठी देत आहोत.


आज विलास खोले सरांचा जन्मदिवस. सरांच्या आठवणीनं मन भरून आलं आहे. त्यांनी सुरु केलेलं टागोर चरित्र आजच्याच दिवशी प्रसिद्ध होतंय, हा योग जुळवून आणल्याबद्दल मॅजेस्टिक प्रकाशन आणि अशोक कोठावळे यांचे मनःपूर्वक आभार.

खोले सर माझे गुरु, मार्गदर्शक. ते एकाच वेळी अनेक कामं करत असत. सर आणि मी नाट्यकोशाच्या संपादनाचं काम करत होतो. त्या दहा वर्षांत समांतरपणे त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच वेळी त्यांचं गोविंदाग्रजांच्या वाग्वैजयंतीवर काम सुरु होतं. टागोर-चरित्र लिहायचं म्हणून पुस्तकांची जमावजमव सुरु होती. दुर्दैवानं हे काम पूर्ण होण्याआधीच अनपेक्षितपणे त्यांचं निधन झालं. त्यानंतर वाग्वैजयंती मॅजेस्टिकनं प्रकाशित केलं. नाट्यकोशाचं काम मी यथाशक्ती पुरं करुन तोही कोश यंदाच्या नाट्यसंमेलनात प्रकाशित झाला आणि आता हे टागोरचरित्र. सरांचे साडू ,लेखक प्रदीप कुलकर्णी यांनी मनावर घेतलं म्हणून आज सरांचं हेही काम पुरं झालं.

आज इथे खूपच मोठ्या विचारवंतांच्या आणि अभ्यासकांच्याबरोबर ह्या  विचारपीठावर बसण्याचं धाडस मी गोळा केलंय याचं कारण माझ्यावर असलेलं गुरुऋण आणि माझं टागोरप्रेम. या टागोरप्रेमानं तरुण वयात बंगाली भाषा शिकायला उद्युक्त केलं. हिमालय, कन्याकुमारी आणि शांतीनिकेतन ही स्वप्नं मनात पेरली. कधीही केव्हाही टागोरांचं गितोबितान वाचावं, ऐकावं. टागोरांनी बंगाली मुळाक्षरांची ओळख करुन देणारी छोटी गाणी लिहिली आहेत. सलिल चौधरी यांनी स्वरबद्ध केलेली ती गाणी ऐकावीत,टागोरांच्या कथा-कादंबऱ्या वाचाव्यात... हे चालूच असतं. याबरोबरच ‘रसज्ञ ऋषींच्या सहवासात’ आणि ‘रवींद्र प्रतिभेचे कोवळे किरण’ हे  टागोरांवरचे अभिवाचनाचे प्रयोग करत मी माझ्या परीने टागोर पचवत-पोचवत राहिलेय. 

चरित्र या लेखन प्रकाराचं स्वरूप दुहेरी असतं. एका बाजूनं ज्या व्यक्तीचं चरित्र असतं तिचा तो इतिहास असतो. त्या व्यक्तीच्या जीवनातल्या प्रसंगांची निवड चरित्रकाराला करावी लागते. त्यासाठी काही एक आशयसूत्र ठरवून घ्यावं लागतं. अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे सदानंद मोरे यांनी लिहिलेलं ‘कर्मयोगी लोकमान्य’ हे लोकमान्य टिळकांचं चरित्र. त्याच्या शीर्षकावरून सहज बोध होतो लेखकानं कोणतं सूत्र धरुन लोकमान्यांच्या जीवनाकडे पाहिलं आहे, त्याचा. त्याची मांडणी कोणत्या दृष्टीने केली आहे, त्याचा.

व्यक्तीच्या जीवनाचा इतिहास आणि त्या व्यक्तीचं सामाजिक-सांस्कृतिक वास्तव आणि तृतीय पुरुषी निवेदन पद्धती यांमुळे कोणत्याही चरित्राला वस्तुनिष्ठा येते. तशी ती अपेक्षितच आहे. मात्र त्याच वेळी चरित्रनायकाविषयी आस्था, आत्मीयतादेखील त्यात असावी लागते. नाहीतर ते अगदी कोरडे, रुक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळं चरित्रलेखन ही लेखकासाठी कसरत असते. 

एकीकडे चरित्र हा व्यक्तिजीवनाचा इतिहास असं म्हटलं खरं, पण तो पूर्णार्थानं इतिहास नसतो. कारण इथे व्यक्तीची कथा सलगपणे निवेदन केलेली असते. चरित्राच्या केंद्रस्थानी व्यक्ती असते. इतिहासात व्यक्तीच्या भावजीवनाला स्थान नसतं. चरित्रात मात्र चरित्रनायकाच्या आयुष्यातल्या घटनांच्या अनुषंगानं व्यक्तीच्या भावजीवनाला स्थान असतं. चरित्रनायक हा प्रत्यक्षात होऊन गेलेला असल्यामुळे त्याच्या जीवनकथेत सत्यकथन असावंच लागतं. त्यासाठी चरित्र लेखकाकडे  संशोधकीय दृष्टी आणि वृत्ती असावी लागते. विवेक असावा लागतो. 

व्यक्ती, तिचं कर्तृत्त्व आणि  तिचा कालखंड यांचा अन्वयार्थ लावण्याची जबाबदारी चरित्रलेखकावर असते. तो त्या कसोटीला किती उतरतो, यावर चरित्राची गुणवत्ता ठरते. विविध प्रकारची विखुरलेली माहिती, पत्रं, भाषणं, दैनंदिनी, लेख, इतरांच्या आठवणी यांतून म्हणजे खंडितामधून अखंडित चित्र उभं करण्याचा खटाटोप असतो तो. आणि तो प्रामाणिकपणे, वस्तुनिष्ठपणे तरीही कोरडा होऊ न देता लिहिण्याची  धडपड चरित्रलेखकाला करावी लागते. 

चरित्रलेखनामागे अनेक हेतू असतात. म्हणूनच मोठ्या व्यक्तीची एकापेक्षा अनेक चरित्रे लिहिली जातात. त्यात गौरव असतो , समर्थन असतं, चरित्रनायकाने विविध क्षेत्रात कर्तृत्त्व गाजवलं असेल तर त्यांपैकी एखाद्याच क्षेत्रातील योगदान केंद्रस्थानी ठेवूनही चरित्र लिहिता येतं. चरित्रात वास्तवात होऊन गेलेल्या व्यक्तीच्या जीवनकथेची  पुनर्मांडणी असते. त्यात काल्पितला वाव नसतो पण लेखकाच्या कल्पनाशक्तीला मात्र वाव असतो. कारण उपलब्ध तपशिलांची छाननी करुन त्याची मांडणी करताना लेखकाची  कल्पनाशक्ती उपयोगी पडते. 

चरित्रामध्ये अन्य अनेक व्यक्तिरेखा येतात. निवेदनाची शैली, व्यक्तिरेखाचित्रण यांमुळे चरित्राला ललित साहित्याचं रूपही येत असतं. इतिहास आणि साहित्यकृती यांची सरमिसळ असते चरित्रात. चरित्राचं स्वरूप दुहेरी असतं, ते या अर्थानं. 

या दृष्टीनं प्रस्तुत टागोर चरित्राकडे पाहिलं तर लेखकाचे प्रामाणिक प्रयत्न दिसतात. मुळात खोले सरांनी सुरू केलेलं काम पूर्ण करायचं आणि त्यातूनच सरांना श्रद्धांजली वाहायची, ही प्रदीप कुलकर्णी यांची भावना महत्त्वाची आहे. सध्याच्या काळात मोलाचीदेखील आहे. टागोरांची अनेक चरित्रं लिहिली गेली असताना हे चरित्र वाचकाला वेगळं काय देतं, तर अत्यंत सुबोधपणे टागोरांच्या कार्याचा, त्यांच्या जडणघडणीचा परिचय देतं. टागोरांसारखा विश्वमानव सहसा पूर्णपणे आवाक्यात येणारा नाही. शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला किती पैलू. (ते सारे सविस्तरपणे मांडायचे तर टागोर-चरित्राचे अनेक खंड करावे लागतील.) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यातील बहुतेक सर्वांचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. रवींद्रनाथांची जडणघडण या भागावर लेखकानं लक्ष केंद्रित करुन तो भाग सविस्तरपणे रेखाटला आहे. म्हणजे त्यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांच्या पासून या लेखनाची सुरुवात होते. त्या काळातलं उद्यमशील, श्रीमंत ,जमीनदार कुटुंब. कला, विज्ञान, साहित्य, पुरोगामी विचार  या सगळ्यांमुळे टागोर हे कलकत्ता शहरातलं चांगल्या अर्थानं प्रस्थ म्हणावं असं घराणं. टागोर कुटुंबाचा हा संक्षिप्त पट लेखकानं नीटसपणे उभा केला आहे. पुढेही रवींद्रनाथांच्या लेखनाविषयी लिहिताना त्या संस्कारांचा धागा जोडून दिला आहे.

मनोगतात लेखक लिहितात, “रवींद्रनाथ टागोर हा विषय निघाला की शांतिनिकेतन, आणि त्यांना मिळालेलं नोबेल पारितोषिक एवढ्याच गोष्टी मराठी लोकांना माहिती असतात. आपलं राष्ट्रगीत ‘जन गण मन’ टागोरांनी लिहिलंय, हेदेखील अनेकांना ठाऊक नसतं. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी  मलाही टागोरांबद्दल एवढीच त्रोटक माहिती होती. हे पुस्तक लिहायला घेतल्यावर मला त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वातील अपरिचित आणि विलोभनीय पैलूंचं दर्शन घडलं.” म्हणजे एका अर्थानं प्रदीप कुलकर्णी यांनी स्वतः टागोर समजून घेण्यासाठी हे पुस्तक लिहिलं, असंही म्हणता येईल. आपलं विचारविश्व त्यामुळे समृद्ध झालं, असं त्यांनी म्हटलं आहे. टागोरांबद्द्ल फारशी माहिती नसणाऱ्या वाचकांना हे पुस्तक ती माहिती देतं. त्यांचे अनेक पैलू दाखवतं. या प्रतिभासूर्याच्या निर्मितीची आभा दाखवतं. 

टागोरांचे आजोबा ते अखेरचे दिवस या ३८ प्रकरणांतून हे चरित्र मांडले आहे. त्यात टागोरांच्या चार कथा पुनर्मुद्रित केल्या आहेत. पुस्तकाला जोडलेली ३ परिशिष्टे फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
- रथीन्द्रनाथ टागोरांनी आपल्या वडिलांविषयी लिहिलेला लेख
- रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र हे नातं 
- आणि लोकमान्य आणि रवींद्रनाथ या परिशिष्टामधून पूरक माहिती मिळते.
टागोरांच्या  लेखनाची यादी आणि भली मोठी संदर्भ ग्रंथांची सूची दिली आहे. या लेखनासाठी कुलकर्णी यांनी  भरपूर संदर्भसाधने वापरली आहेत. ती कोणती यांवर लेखनाचा कस अवलंबून असतो. कुलकर्णी यांनी अनेक  इंग्रजी पुस्तके आधारासाठी उपयोगात आणली आहेत. कारण टागोरांचे अभ्यासक जगभर आहेत. टागोरांच्या अभ्यासक कृष्णा कृपलानी आणि उमा दासगुप्ता आणि इ. जे. थॉम्प्सन यांच्या संदर्भग्रंथांचा वापर त्यांनी केला आहे.  

मराठीत गं. दे. खानोलकर यांनी लिहिलेलं चरित्र प्रसिद्ध आहे. शिवाय टागोरांच्या अनेक साहित्यकृती भाषांतराच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्या साऱ्याचा यथायोग्य उपयोग त्यांनी करुन घेतला आहे. 

टागोर कुटुंबात अनेक जिनिअस होते.  रवींद्रनाथांचे सर्वात मोठे बंधू द्विजेंद्रनाथ हे बंगाली लघुलिपीचे short hand चे जनक. गांधीजी भारतातले महान नेते होतील, हे ओळखणारेही तेच पहिले. सत्येंद्रनाथ टागोर हे आय. सी. एस.झालेले  पहिले भारतीय. 

जमीनदारी कुटुंब, आर्थिकदृष्ट्या समृद्ध वातावरण, साहित्य, कला, विज्ञान, संगीत, चित्रकला, भाषांतर अशा अनेक क्षेत्रात पहिलेपणाचा मान टागोर कुटुंबात मिळालेला दिसतो. 

टागोर लहान असताना तत्कालीन शाळा शिक्षणात त्यांचे मन अजिबात रमत नसे. त्याच काळात त्यांना त्यांच्या वडिलांबरोबर हिमालयात प्रवास करण्याची संधी मिळाली. ‘शाळेतल्या कंटाळवाण्या अभ्यासापेक्षा वडलांबरोबर हिमालयात घालवलेल्या चार महिन्यात आपलं खरखुर शिक्षण झालं’ असं त्यांना वाटत असे. निसर्गरम्य वातावरणात शिक्षण देण्याचं कल्पनाबीज त्यामुळेच त्यांच्या मनात रुजलं असावं. 

तत्कालीन कलकत्ता शहर, तिथलं वातावरण, साहित्य, संगीत, बंकिमचंद्रांसारखे साहित्यिक, राजकीय चळवळी यांचा उचित संदर्भ लेखकाने घेतला आहे.

टागोरांच्या साहित्यावर लिहिताना त्यावर तयार झालेले चित्रपट - उदा. क्षुधित पाषाण’ ही कथा, तिची निर्मिती उलगडताना १९६० मध्ये या कथेवर चित्रपट निघाला. त्याला उस्ताद अली अकबर खा यांचं संगीत होतं, त्याला नॅशनल अवार्ड मिळालं, अशी पूरक माहिती ते देतात. तरीही ती आटोपशीरपणे आली आहे. 

जमीनदारी सांभाळणारे रवींद्रनाथ हे टागोरांचं रूप नव्याने उलगडते. १८९१ ते ९८ या काळात त्यांचं वास्तव्य मुख्यतः शिलाइदाह इथे होतं. पद्मा नदी आणि पद्मा बोट यांचा टागोरांच्या लेखनाशी असणारा संबंध कुलकर्णी यांनी समजावून घेतला आहे. शेतकरी, खेडूत यांच्याशी रवींद्रनाथांचा संपर्क येई. त्यांचं जगणं आणि जीवनसंघर्ष त्यांनी जवळून पाहिला. पुढे याच ठिकाणी त्यांनी जमीन तपासणी करणं,चांगलं बियाणं तयार करणं  यासाठी प्रयोगशाळा स्थापन केली.  आपल्या मुलाला रथींद्रनाथ यांना शेतकीशास्त्राचं शिक्षण घ्यायला अमेरिकेत पाठवलं. त्याकाळी ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज इथे शिकायला जाण्याची प्रथा असून त्यांनी आपल्या मुलाला अमेरिकेत पाठवलं. ट्रक्टरसारख्या आधुनिक  सुधारणा त्यांनी तिथे करवल्या. आपल्या मित्रांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी अॅग्रीकल्चरल बँक सुरु केली. शांतिनिकेतनप्रमाणेच श्रीनिकेतन ही संस्था सुरु केली.  ग्रामविकास, कुटीरोद्योग यांना चालना दिली.  इथल्या पारंपरिक कला आणि व्यवसाय यांचं पुनरुज्जीवन केलं. 

या काळात आजूबाजूच्या जीवनातून, माणसांच्या बोलण्यातून नवी कथाबीजं त्यांना सापडली. संगमरवरी मनोऱ्यात  बसून लिहिणारे लेखक नव्हते ते, मला इथे गदिमांची आठवण येते. ते माणदेशी – आपल्या गावी जात तेव्हा बामणाच्या पत्र्यात त्यांचा मुक्काम असे. शेतकरी येत. गप्पा करत. गदिमांनी  लिहिलं आहे की त्यांच्या बोलण्यातून असंख्य कथाबीजं मिळत. शेतकरी काही बियाणं पुढच्या मृगासाठी राखून ठेवतो तसं मी ते पुढच्या कथांसाठी, चित्रपटांसाठी साठवून ठेवी.

अतिथी, समाप्ती, काबुलीवाला, पोस्ट मास्तर अशा कितीतरी कथांत रविन्द्रनाथांनी ग्रामीण जीवन रंगवलं. त्यांचे प्रश्न, भावविश्व यांचं दर्शन घडवलं. त्याचा उगम त्यांच्या जमीनदार म्हणून ग्रामीण भागात केलेल्या वास्तव्यात आहे. बंगाली लघुकथेचे जनक असं त्यांना म्हटलं गेलं आहे. जमीनदार टागोरांचा हा कळवळा, प्रेम, आपुलकी पुढे शांतीनिकेतनमध्ये सर्व मुलांना समान वागणूक देण्यातही दिसतं.  

बांगला देशाचं राष्ट्रगीत आणि आपलं, अशी दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिणारे ते कदाचित एकमेव गीतकार असावेत, असे अनेक बारकावे लेखकाने टिपले आहेत. 

गीतांजली, नोबेल पारितोषिक याची साद्यंत हकीकत लेखकाने दिली आहे. गांधीजी आणि टागोर भेट, त्यांचा विचारमिनिमय यांची माहिती दिली आहे. शांतीनिकेतनमध्ये झालेल्या त्या भेटीत १९१५ साली रवींद्रनाथांनी त्यांचा उल्लेख महात्मा असा केला. आणि याच भेटीत गांधीजींनी त्यांचा गुरुदेव म्हटलं. दोन महान व्यक्ती एकमेकींना कशा गाभ्यातून ओळखत होत्या, ते दिसतं.

टागोरांची विश्वभ्रमंती, अमेरिका ते जपान प्रवास ,या सगळ्या प्रवासाची फलितं, तिथे घडलेल्या महत्त्वाच्या घटना लेखकाने साक्षेपाने नमूद केल्या आहेत. रवींद्रनाथ आणि त्यांची वहिनी कादंबरीदेवी, अ‍ॅना तर्खडकर आणि व्हिक्टोरिया ओकाम्पो याविषयी लेखकाने संयम बाळगून लिहिले आहे. त्यात सूचकता आहे. या तिघींची व्यक्तिचित्रंदेखील थोडक्यात पण नेमकेपणाने उभी केली आहेत.

शांतीनिकेतन मध्ये विचारस्वातंत्र्य कोणत्या पातळीवरचं होतं याचा एक रंजक किस्सा लेखकानं दिला आहे. तिथे खुद्द टागोरांच्या विचारांचा प्रतिवाद होऊ शकत असे. आणि त्यावर त्यांचं म्हणणं होतं की शांतिनिकेतन हे माझ्या विद्यार्थ्यांना विचारस्वातंत्र्य आणि धैर्य सदैव देवो. टागोरांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू लेखकानं दाखवले आहेत. 

नाटककार रवींद्रनाथ या प्रकरणात त्यांनी पुरुषपात्र विरहित नाटक लिहिल्याचा उल्लेख येतो. १८९० लक्ष्मीर परीक्षा या नावाचं नाटक त्यांनी लिहून त्याचे प्रयोगही केले. जर्मनीत घेट्टोमध्ये त्यांच्या डाकघर नाटकाचा प्रयोग यानुस कॉरजॅक या ज्यू बालरोगतज्ञाने  केला होता, अशा रोचक कहाण्या पुस्तकात आहेत, त्या रंगत वाढवतात. 

रवींद्रसंगीतानं तत्कालीन बंगाली संगीताला वेगळं वळण दिलं. ३००० पेक्षा अधिक गीतं त्यांनी लिहिली, संगीतबद्धही केली. 
वयाच्या ६३ व्या वर्षी ते चित्रकलेकडे वळले आणि मृत्यूपर्यंतच्या १७ वर्षांत त्यांनी २००० चित्रे केली. नृत्यकलेबद्दल त्यांना मनस्वी प्रेम होतं म्हणूनच अनेक   नृत्यनाटिका त्यांच्या लेखणीतून उतरल्या.

“ज्या साधेपणात माझं बालपण गेलं त्याच साधेपणात मला परत जायचं आहे.” असं ते म्हणत. यातला साधेपणा म्हणजे श्रीमंत असूनही नम्र, संवेदनशील, स्वावलंबी, मंडतीस तत्पर असण्याचा साधेपणा आहे. साधा स्वभाव आहे. आर्थिक परिस्थिती अखेरच्या काळात श्यामली या साध्याशा मातीच्या कुटीत त्यांचं बरयच काळ वास्तव्य होतं.असे टागोरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पुस्तकातून उलगडतात.

काही भाग अधिक सविस्तर यायला हरकत नव्हती, असं वाटलं. विल्यम जोन्सचा उल्लेख आला आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना त्यानं केली. रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ टागोर तिचे आश्रयदाते होते. त्याच्याविषयी दोन ओळी देता आल्या असत्या. उदा. तो प्राच्यविद्यापंडित होता. अनेक भाषा त्याला अवगत होत्या. शाकुंतल नाटकाचे पहिले इंग्रजी भाषांतर त्याने केले होते. 

चरित्रं प्रेरणा देतात, विचार देतात. अनेकदा आपल्या सामान्य जगण्यातले सामन्य पेच सोडवतात. मार्ग दाखवतात. उत्तम चरित्रं एखादी ललित कृती वाचल्याचा आनंद देतात. हे तर ‘प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर’ हे चरित्र करतंच पण “धर्म आणि वंश यांच्या उन्मादाने झपाटलेल्या व्यक्ती जर राष्ट्राच्या प्रमुख पदी आल्या तर राष्ट्राचं अतोनात नुकसान होतं” ..असं मत परखडपणे व्यक्त करणारे रवींद्रनाथ या पुस्तकात भेटतात. विश्वमानव ही संकल्पना मांडणारे, संकुचित राष्ट्रवादाला विरोध करणारे टागोर आज फारच आवश्यक आणि प्रस्तुत वाटतात. 

प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर
लेखक: विलास खोले, प्रदीप कुलकर्णी 
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
पृष्ठे: २७३ 
किंमत रु. ४५० 

Tags: प्रतिभासूर्य रवींद्रनाथ टागोर भाषण पुस्तक Load More Tags

Comments:

Anup Priolkar

Introductory speech is inspiring to the reader to read the book in details. It will be appropriate to express your comment after reading the book better. Very nice article.

विष्णू दाते

"चरित्रा" विषयी खूप छान विवेचन वंदना मॅडमनी केल आहे, त्यातून त्यांची अभ्यासी वृत्ती कळून येते, आणि श्री.प्रदीप कुलकर्णींनी विलास सरांचं अपूर राहिलेलं काम अगदि आत्मियतेने केल्याबद्दल त्यांचही अभिनंदन! पुस्तक वाचण्यातची अर्थातच खूप ऊत्सुकता आहेच!

Add Comment