जातीनं घडवलेल्या आत्मतत्त्वाची एकविसाव्या शतकातील रूपं

सूरज येंगडे यांच्या ‘कास्ट मॅटर्स’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. 

डॉ. सूरज येंगडे हे नाव राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रांतील, नियतकालिकांतील त्याच्या लेखनामुळे बहुतेकांना परिचयाचे झाले आहे. जातिव्यवस्था, वंशभेद, मानवी हक्क हे त्याच्या अभ्यासाचे विषय राहिलेले आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत असलेल्या सूरजचे बालपण नांदेडमधल्या जनता सोसायटीत अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्याचा प्रेरक प्रवास मांडणारी ‘नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका’ ही विस्तृत मुलाखत साधना साप्ताहिकाच्या युवा दिवाळी अंकात 2020मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याला निमित्त होते 2019 मध्ये आलेल्या त्याच्या ‘कास्ट मॅटर्स’ या इंग्रजी पुस्तकाचे. पेंग्विनसारख्या प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले. प्रियांका तुपे आणि प्रणाली एंगडे यांनी केलेला त्याचा मराठी अनुवाद नुकताच मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकातील काही भाग येथे प्रसिद्ध करत आहोत. 

माझी आई (आजी- वडिलांची आई) मला तिच्या मऊशार कुशीत घेऊन, म्हणत असे, ‘म्हवं लेकरू, किती नादर हाये. अशे इतके सुंदर डोळे कुणाचे तरी हायेत का? मज्या बाळा, तुज्यात इतके गुणं हायेत की मज्यासारख्या येडीला कुठं मोजता यायलंय?' रात्रीच्या वेळी माझ्याशी बोलताना, घरातल्या झिरो बल्बच्या जवळपास नसलेल्या उजेडातही तिचा काळवंडलेला चेहरा आणि रापलेली त्वचा चमकायची. मी आजीचा जीव की प्राण होतो, याची ती सतत जाणीव करून द्यायची.

अंधूक अंधूक प्रकाश असणारा, स्वस्तात मिळणारा झिरो बल्बच आमच्या घरातला उजेडाचा एकमेव स्रोत. तो बंद होता. आजी मला धीर देत होती, समजावत होती. आमचं घर टोयोटाच्या मिनीबसएवढं! त्या एवढ्याशा घरात आजी, माझे आई-वडील, बहीण-भाऊ असे आम्ही सगळे राहत होतो. घरातल्या खाटेखालच्या जागेत माझे आजारी वडील, मी आणि भाऊ झोपायचो. आई आणि बहीण खाटेला लागूनच काटकोनात एका नायलॉनच्या चटईवर झोपत.

आजी माझ्या गालावरून हात फिरवत होती. आता ती डोक्याला मालीश करू लागली. तिच्या त्या मऊ हातांनी सारं काही सोसलं होतं. अस्पृश्यता, न्यूनगंड लादणाऱ्या परंपरा, तिच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी शेतात, खाणीत भूमिहीन मजूर म्हणून राबण्याचा तिचा निग्रह किंवा एखाद्याच्या घरी नाही तर मिलमध्ये नोकर म्हणून राबणं. तिच्यासारख्याच चेहरा नसलेल्या, कसलीही ओळख निर्माण करू न शकलेल्या; पण तरीही खूप महत्त्वाच्या लोकांचं ती प्रतिनिधित्व करते. 

हिंदू धार्मिक संरचनेने काही लोकांना गावगाड्याबाहेर ढकललं. या लोकांची निर्भर्त्सना केली जाते, द्वेष केला जातो. कसलीही मानवी प्रतिष्ठा, मोल नसलेलं जगणं यांच्या वाट्याला येतं. सार्वजनिक अवकाशात दलितांनी इतरांकडे साधा कटाक्ष टाकला तरी संपूर्ण समाजावर त्याचा राग काढला जातो, त्यांच्यावर हिंसेची बरसातच केली जाते. त्यांच्या जिवाला कसलीही किंमत नाही, माझी आजी अशा लोकांचं प्रतिनिधित्व करते.

कोट्यवधी लोक हे असं आयुष्य जगतात. भारतात जातीप्रश्नाचा संबंध 135 कोटी लोकांशी आहे. 100 कोटी लोकांच्या आयुष्यावर जातीव्यवस्थेचा परिणाम होतो. त्यापैकी 80 कोटी लोकांवर जातीचा वाईट परिणाम होतो. 50 कोटी लोकांची मानवी प्रतिष्ठा हिरावून घेतली जाते आणि त्यांच्यावर गुलामीचं जगणं लादलं जातं. 30 कोटी अस्पृश्यांचं भयंकर शोषण केलं जातं. माणसाला करावीशी वाटणार नाहीत, अशी कामं त्यांच्याकडून करून घेतली जातात. दलित वस्त्या उद्ध्वस्त करणं, त्यांच्यावर गुलामी- दास्यत्व लादणं, सक्तमजुरी, बलात्कार, हत्याकांड, जाळपोळ, लुटालूट, तुरुंगवास, पोलिसी अत्याचार, जातीय शिवीगाळ - शेरेबाजी, अपमान, अवहेलना, त्यांचं नैतिक खच्चीकरण हे 30 कोटी भारतीय अस्पृश्यांचं जगणं आहे.

लहानपणी शाळेची फी वेळेवर भरता न आल्याने मला अवहेलना सहन करावी लागायची. शाळेचा कारकून टोनी दर तीन महिन्यांनी वर्गांमध्ये फेरी - मारायचा आणि माझं नाव पुकारुन मला उभं राहायला सांगायचा. मी उभा राहिलो की तो माझी किती महिन्यांची फी भरायची बाकी आहे, हेही वाचून दाखवायचा. फीचा आकडा जेवढा जास्त तेवढं जास्त अपमानित वाटायचं. त्यात माझे वर्गमित्र थंडपणे माझ्याकडे पाहत एक तुच्छ कटाक्ष टाकायचे. त्यावेळी शरमेने मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं. हे नेहमीचंच होतं. जेव्हा जेव्हा टोनी वर्गात यायचा तेव्हा मला शाळा सोडून पळून जावंसं वाटायचं. आमच्या वस्तीतल्या, रोजंदारीवर खपणाऱ्या मजूर लोकांसोबत काम करावं असं वाटायचं. समोर दिसेल त्या मार्गाने पोट भरणारे आणि जगण्याची भ्रांत नसलेले हे लोक त्यांच्या मर्जीने जगत. जगण्यासाठी त्यांना कुणाकडून अपमानित तरी व्हावं लागत नव्हतं.

सहाव्या इयत्तेत जाईपर्यंत मी त्यामानाने अतिशय गरिबीत जगलो. त्याच दरम्यान सरकारदरबारी दारिद्र्यरेषेखालील गरिबांमध्ये आमचा समावेश झाला. दारिद्र्यरेषा हे वंचिततेचं मोजमाप करण्याचं राज्यानं ठरवलेलं एक परिमाण आहे. दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार त्याचे सात निकष ठरवलेले आहेत. केरळमध्ये अशा प्रकारचे नऊ तर हरयाणामध्ये पाच निकष आहेत. कुटुंबांच्या मालकीची शेतजमीन, रोजगार, शैक्षणिक स्तर, मुलांची परिस्थिती, स्वच्छता, घरावरचं छप्पर, जमीन, पिण्यायोग्य पाणी, वाहतूक व्यवस्था, अन्न, घरात रंगीत टीव्ही, फ्रिज असणं... अशा प्रकारचे हे निकष आहेत. यामध्ये कुटुंबाचं उत्पन्न हा एक निकष असा होता, की जो एखाद्याकडे वरील सर्व घटक उपलब्ध आहेत की नाही,त्यावरून ठरत असे आणि राज्याराज्यांत त्याबाबत भिन्नता होती. महाराष्ट्रात दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या 13 निकषांवर आधारित आहे. असे 46 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. (ही संख्या 1990 मधल्या दारिद्र्यरेषेखालील एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के आणि 2000 मध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येच्या प्रमाणात 39 टक्के इतकी आहे.)  2012 मध्ये जागतिक बँकेच्या अहवालात एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली होते. या अहवालात महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये गरिबीचं प्रमाण वाढलेलं आहे, यावर भर देण्यात आला होता. नांदेड जिल्ह्यात 18 ते 24 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत होती. त्यातही अनुसूचित जातींतील कुटुंबं आणि इतर जातींतील कुटुंबं अशी वर्गवारी केलेली नव्हती. शहराच्या परिघावर असलेलं माझं कुटुंब 'दारिद्र्यरेषेखाली' या प्रवर्गात चपखल बसलं होतं.


हेही वाचा : आकर्षक पोषाखातील वर्णद्वेष - सुरज येंगडे


जातीचा प्रश्न एखाद्या लोलकाच्या विविध मितींमधून पाहिला जातो. त्यामुळेच खरं तर भारतात अधिक चर्चा संवाद करण्याची आवश्यकता असलेला 'जात' - हा विषय अनेक गैरसमजुती आणि चुकीच्या धारणांनी वेढलेला आहे. 'जात' हा एक असा शब्द आहे, जो आरक्षण, दलित, आदिवासी, मानवी मैला, दलित भांडवलशाही, रोजंदारीने काम करणारे मजूर, क्रूर हिंसा, गुन्हेगारी, तुरुंगवास, राजपूत, ब्राह्मण, वाणी बनिया, कायस्थ, ओबीसी अशा विविध शब्दांसाठी - समानार्थी म्हणून विचारात घेतला जातो. जातीच्या नग्नतेच्या अशा अनेक रूपांना आपल्याला रोज सामोरं जावं लागतं. तरीही या सगळ्यामध्ये जात तिचं पावित्र्य बहुविध मार्गांनी जपते आणि मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूमधून आपला अजेंडा बळकट करत राहते ही बाब दुर्लक्षितच राहते. त्यावर चर्चाच केली जात नाही. सार्वजनिक आणि खासगी आयुष्याच्या विविध पैलूंमध्ये जात ज्याप्रकारे महत्त्वाची भूमिका निभावत असते, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

आमची शेतजमीन नव्हती आणि आमच्याकडे रंगीत टीव्ही, फ्रिजही नव्हता. वडीलही नोकरी करत नव्हते. (आयुष्यातला बराच मोठा काळ आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळून होते.) त्यामुळे आमचं उत्पन्नही कमीच होतं. वडिलांच्या मालकीचं घर नव्हतं. वारसाहक्काने त्यांना मिळालेल्या जमिनीवर आम्ही राहत होतो. 30 बाय 40 फुटांची, बास्केटबॉल कोर्टपेक्षाही निम्म्या आकाराची जमीन. या जमिनीची तीन कुटुंबांत समसमान वाटणी झाली होती. तिन्ही कुटुंबांची मिळून सोळा माणसं राहत होतो, त्यामुळे घरात स्वच्छतेच्या सोयी-सुविधांच्या नावानं बोंबच होती. एकच मोरी आणि संडास होता. सकाळच्या वेळेला आम्हा भावंडांची, चुलत भावा-बहिणींची शाळा साधारण एकाच वेळेला असायची, त्यामुळे संडासला, आंघोळीला जाण्यासाठी प्रत्येक जण रांगेत असायचा. घरात दहावीच्या पुढे कोणी शिकलेलं नव्हतं. आमचं छप्पर म्हणजे कच्च्या विटांवर तोलून धरलेले, गंजलेले, घळ्यांचे लोखंडी पत्रे. ते उडू नयेत म्हणून त्यावर दहा-वीस किलो वजनाचे मोठे दगड ठेवले जात. लोखंडी पत्र्यांतून वीज वाहते आणि पावसाळ्यात छपरावरचे दगड घसरून पडण्याचीही मोठी भीती होती.

लोखंडी पत्र्यांमुळे हवामानात बदल होण्याचा अवकाश की, आम्हाला आधी चाहूल लागत असे. हे पत्रे आमच्यासाठी हवामानाचा अंदाज सांगणारे जिवंत स्रोत होते. बारीक थेंबांचा शिडकावा पाऊस येण्याची वर्दी द्यायचा. पत्र्यांमुळे त्या थेंबांचा जोरदार आवाज आम्हाला आधी कळायचा. उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उन्हामुळे पत्रे असे तापायचे की खाली बसलेला माणूस गुदमरायचा, श्वास घेणंही मुश्कील व्हायचं. मजबूत आणि जाडजूड छपराअभावी थंडीच्या दिवसांतही त्रास व्हायचाच. तशा परिस्थितीत निर्दयी हवामानाचा सामना करत आम्ही त्या घरात झोपलो. लोखंडी पत्र्यांपासून कशी तरी आपली सुटका व्हावी, यासाठी आम्ही रोज प्रार्थना करायचो, चोवीस तास तोच विचार मनात असायचा. दुर्दैवानं ती प्रार्थना कधी फळाला आलीच नाही. आजोळी गेल्यावर मात्र सकाळी उठल्यावर, काल रात्रभर पाऊस पडून गेलाय हे कळायचंसुद्धा नाही. याचं मला आश्चर्य वाटायचं. आजोळच्या घराचं छप्पर जाडजूड आणि सिमेंटचं होतं, त्यामुळे पाऊस पडण्याचा आवाज ऐकू येत नसायचा. आमच्या घरी मात्र मुसळधार पावसाच्या आवाजाने रात्रभर झोप लागत नसे, अशी परिस्थिती होती.

त्यावेळी जगण्यासाठी मी मिळेल ते काम करत होतो. आई वडिलांनी - विरोध केला तरी त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरता मी अधीर झालो होतो. एकदा मी बुटांच्या कारखान्यात कामाला जाण्याचा विचार केला. आमच्या वस्तीतला एक मित्र तिथे मजूर म्हणून काम करत होता. तसेच एकदा माझ्या आजोळच्या नातेवाइकांसोबत विदर्भातल्या एका बागायती पट्ट्यात भुईमुगाच्या शेतावर कामाला गेलो होतो. वडिलांच्या वर्तमानपत्रासाठीही मी व्यवस्थापक म्हणून काम केलं. ट्रकचालकासोबत क्लीनर म्हणून काम केलं. वखारीत काम केलं. हातातोंडाची गाठ पडावी, याकरता हे सगळे प्रयत्न केले होते. मिसरुड फुटायच्या आतच मी मिळतील ती जोखमीची सगळी कामं केली होती.

आजही माझं कुटुंब एकत्र राहतं, त्याच वन रुम किचनच्या घरात. अगदी आता आता पत्रा तुटलेल्या छपराचा त्रास असह्य झाल्यानं आई तात्पुरती आमच्या काकांकडे राहायला गेली. दारिद्र्यरेषेखालील लोकांना सरकारी योजनेतून मिळतं तसं घर आपल्यालाही मिळेल, अशी तिला आशा आहे. सहा वर्षांपूर्वी सरकारनं दिलेल्या ‘घरकुल योजने'च्या आश्वासनामुळे ती अजूनही 'सरकारी घरकुल' मंजूर होण्याची वाट बघतेय. दरवर्षी सरकारी माणसं दारावर सर्व्हे करायला आली की तिला आनंद होतो आणि त्याच नेमाने दरवर्षी तिची आशा धुळीला मिळते. तिला सरकारी घराची अपेक्षा आहे कारण तिचा सरकारवर विश्वास आहे असं नाही, तर वारंवार सरकारनं केलेल्या अपेक्षाभंगाच्या नैराश्यातून पुन्हा पुन्हा तिची आस जन्म घेते.

मी एका दलित वस्तीत वाढलो. भारतातल्या प्रत्येक दलित वस्तीप्रमाणे माझीही वस्ती अतिशय दुर्लक्षित आणि सत्तासंरचनेच्या परिघावर असलेली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने, सरकारने आमच्याकडे, आमच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली होती. ते आमच्या वस्तीकडे शक्य तितक्या घृणेने बघत. त्यामुळे वस्तीत शासकीय जबाबदारीची स्वच्छतेची कामंही क्वचित कधीतरी केली जात. प्रत्येक घराबाहेर एक घाणेरडं गटार होतं. त्यातून उघड्यावरच मैला वाहत असे. बऱ्याचदा त्या घाणीवर घोंगावणाऱ्या माशा आमच्या घरात आणि किचनमध्येही येत. गटार उघडं आणि उथळ असल्यामुळे त्यातल्या माशा उडून अन्नावरही बसायच्या. तेच आम्हाला खावं लागायचं. वस्तीतली बाकी बाया-माणसं कामाला गेल्यावर त्यांची पोरं रस्त्यावर खेळायची. बारकी पोरं रांगायची. त्यांच्या तोंडावर माशा बसायच्या.

मच्छरांमुळे होणारा मलेरिया, माशांमुळे होणारा टायफॉईड तर आमची पाठ सोडतच नव्हते. या आजारांनी बेजार करून टाकलं होतं. आमच्या अस्तित्वाकडेच दुर्लक्ष, आरोग्याबाबतीत शासनाचा निष्काळजीपणा याचा थेट परिणाम म्हणून या विषाणूंशी आमचा संबंध यायचा. आठवड्यातून एकदा नगरपालिकेचा सफाई कर्मचारी यायचा. तो एकतर महार, मेहतर किंवा मांग जातीचा असायचा. नगरपालिकेत ब्राह्मण, बनिया उपकंत्राटदारांच्या हाताखाली नेमणूक केलेले हे कर्मचारी. ते सगळे हातानं गटारं साफ करायचे. लोकांनी फेकलेलं खरकटं, मैला, सांडपाणी, सगळ्या प्रकारची माणसांची आणि प्राण्यांची घाण गटारात सडत पडलेली असायची. या सगळ्याचा एक बुळबुळीत शेवाळलेला थर कर्मचारी हाताने वर काढून ठेवायचे. तो कधी दोन दिवस तर कधी आठवडाभर उघड्यावरच असायचा. ही सगळी घाण एवढी कडक व्हायची, की ती हलवणं मुश्कील व्हायचं आणि अशा बाहेर काढून ठेवलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांशी रांगणारी पोरं खेळायची.

अनेकदा क्रिकेट खेळताना आमचा बॉल गटारात जायचा. गटारात हात घालून तो काढायला लागत असे. आम्ही त्या घाण आणि काळ्याकुट्ट, घट्ट रेंद्यात उघडेवाघडे हात घालून बॉल शोधत तसंच गटाराच्या आडव्या दिशेने पुढे पुढे जायचो. अनेकदा हाताला भलतंच घाण काही तरी लागायचं. कधी मानवी मैला, कधी केस तर कधी नखं ते सगळं बघून मळमळायला व्हायचं. आमच्या वस्तीशेजारी ज्या वस्त्या होत्या, त्याही आमच्यासारख्याच बदनाम होत्या. पश्चिमेला 'आंबेडकरनगर' आणि 'पूर्वेला जयभीमनगर' होतं. या वस्त्यांची काही चांगली ख्याती नव्हती. मी या अशा प्रकारच्या वस्तीत राहतो, अशी जराशीही शंका बाहेर कुणाला आली तरी लोक सावध होत. त्यांच्या डोक्यातली घंटी वाजू लागे. माझ्याप्रमाणेच या वस्तीत राहणाऱ्या लोकांवर, आमच्याबाबतच्या अनेक चुकीच्या धारणा आणि पूर्वग्रहांचा भडिमार केला जायचा. मला जेव्हा आमच्या एरियाबद्दल (किंवा मी कुठे राहतो याबद्दल) शाळा-कॉलेजात विचारलं जायचं, तेव्हा मी वस्तीत राहतो ही गोष्ट लपवून शेजारच्या ब्राह्मणबहुल भागात राहतो, असं मुद्दाम सांगायचो. पण माझी लबाडी पकडली जायची आणि लोक माझ्याकडे तुच्छतेने बघायचे. त्यामुळे मला जास्तच लाजिरवाणं वाटायचं; कारण आमच्या वस्तीत राहणारे लोक म्हणजे केवळ 'माणसं' नव्हती, तर त्यांना त्यांच्या कामावरून ओळखलं जायचं... उदा. मोलकरीण, नोकर, मजूर, कारखान्यातले कामगार, हॉटेलमधल्या बशा धुणारी पोरं, इ.

आधुनिक कामगारवर्गाच्या व्याख्येत ही वस्ती आणि आसपासचा परिसर बसतच नव्हता. वस्तीत कुशल, अर्धकुशल आणि किती तरी कौशल्यं अंगी असलेले लोक बहुसंख्येने राहत होते तरीही. नोकरी म्हणावी, असं काहीही त्यांच्या आयुष्यात कधीच नव्हतं. जे काही होतं ते फक्त दास्य... योग्य मोबदला मिळण्याच्या शाश्वतीशिवाय पत्करलेलं. ते सतत कोणत्या तरी समस्यांमध्ये गुरफटलेले असायचे, या समस्या त्यांनी निर्माण केल्याच नव्हत्या. सुरक्षित कामगारवर्गाचा दर्जा त्यांनी कधी अनुभवलाच नाही. हे लोक म्हणजे जातीबाहेर फेकलेला एक वर्ग होता; ज्याच्याकडे फक्त दोन वेळचं पोट भरता येईल एवढीच मालमत्ता होती. क्वचित कधीतरी त्यातल्या कुणाकडे स्थिर नोकरी होती किंवा ज्याला ‘आयुष्य’ म्हणता येईल, अशी स्थिती होती. पैशाची प्रचंड चणचण असल्यामुळे, ड्रग्ज विकणं ही अनेकांना पैसे कमावण्याची एकमेव संधी वाटायची. बाकी भांडणं, मारामारी, वेश्याव्यवसाय, लैंगिक अत्याचार, दारू, ड्रग्ज घेणं हे सगळं खूप सामान्य आणि सहज होतं तिथे या अशा परिस्थितीत मी वाढलो.

एकदा जात आणि वर्ण या विषयावरच्या 'येल विद्यापीठ' येथील आफ्रिकन आणि भारतीय कॅम्पसमध्ये माझ्या व्याख्यानाच्या दरम्यान, पदवीला शिकणाऱ्या एका इंडो-आफ्रिकन विद्यार्थ्यानं प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, तुम्ही एखाद्याची जात कशी ओळखता? हे विचारून तो एक क्षणभर थांबला, शांत राहिला आणि त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्याकडे टाकलेल्या नजरेने त्याला अपराधी वाटलं. तो खजील झाला; त्यानं क्षणार्धात माझ्याकडे पाहिलं, त्याच्या नजरेत अपराधभाव होता.


हेही वाचा : दलितांचे दुःख व अश्रू मध्यमवर्गीय भारतीयांचे होत नाहीत - सुरज येंगडे


जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दुसऱ्या एका कार्यक्रमात माझं व्याख्यान होतं. 'वर्ण-एक मध्यमवर्गीय विशेषाधिकार,' या विषयावरील त्या व्याख्यानानंतर मला माझ्या एका भारतीय मैत्रिणीने - शेनीने (ती भारतीय दक्षिण आफ्रिकन समूहाची होती) विचारलं, 'तुम्ही एखाद्याची जात कशी ओळखता?' त्यावर तिच्या आजूबाजूला असणारे सगळेच म्हणजे भारतीय मुस्लीम, हिंदू थबकले, त्यांनी तिच्या प्रश्नावर सहमतीदर्शक मान डोलावली... त्यांनाही माझ्याकडून उत्तर जाणून घ्यायचं होतं.

हार्वर्ड विद्यापीठात एकदा जातीव्यवस्थेवर चर्चा करताना एका आफ्रिकन अमेरिकन प्राध्यापिकेनं मला यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तिच्या कार्यालयात बोलावलं होतं. ती कायद्याची प्राध्यापिका होती. “अरेरे... आम्हाला हे माहीतच नव्हतं, ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि मी खूप महत्त्वाचं काही तरी शिकलेय.” विद्यापीठातल्या त्या प्रसिद्ध व्यक्तीनं जाहीरपणे हे मला सांगितलं.

जात सामाजिक संरचना म्हणून एक फसवा घटक आहे, जो त्याच्या मूळ अस्तित्वाच्या मुद्यापासून भरकटून दूर जाण्याची मूलभूत क्षमता राखून असतो. जुन्या काळापासून चालत आलेली शोषण व्यवस्था, माणसाला दिलेलं हीनत्व आणि त्याचं अवमूल्यन जातीच्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवतं. मूलतः जात ही हिंदू समाजरचनेचा भाग असली तरी आता ती भारतीय उपखंडातील सर्व धर्मांमध्ये भिनली आहे. मानवी क्षमता, सृजनशीलता आणि श्रम नियंत्रित करण्याची संकल्पना सिंधुसंस्कृतीइतकीच पुरातन असून ती जातीच्या वैचारिक गाभ्याशी कठोर कायद्यानं (तत्कालीन नीतीनियम) जोडलेली आहे. भारतात जात म्हणजे वर्चस्ववादी वर्गाला, दबल्या गेलेल्यांवर राज्य करण्यासाठी मिळालेली अधिमान्यता आहे. आडव्या स्वरूपात मांडल्या गेलेल्या पाच श्रेणींमध्ये झालेलं जातीचं कठोर विभाजन म्हणजे अधिमान्यता मिळालेल्या जातीभेदाचा मूळ साचा आहे. भारतात जात पाहायची झाली तर ती वरील पाच भागांतल्या एखाद्याच्या स्थानावरुन पाहता येते. जातीवरील संवाद संबंधित व्यक्तीच्या व्यवस्थेतील सहभागाच्या दिशेनं जातो.

माझं आयुष्य माझ्या भवतालाने नियंत्रित केलं होतं आणि त्याचा माझ्यावर लक्षणीय परिणाम झाला होता. माझं स्वतःचं माणूस म्हणून समान असणं अधोरेखित करण्याचं सामर्थ्यच माझ्याकडे नव्हतं. हिंसा, कठोरता या दोनच गोष्टींनी मी माझं अस्तित्व जाणवून देऊ शकत होतो. याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीला माझ्या वस्तीतल्या इतरांची दलितांचीही मान्यता नव्हती. अन्याय आणि गैरवर्तणूक यांनी माझं आयुष्य भरलेलं होतं. अत्याचारांचे अनेक प्रसंग माझ्यासोबत घडत गेल्यावर मी कडवट होत गेलो. जसजसा मोठा होत गेलो, तसा मी अधिक संवेदनशील झालो. मग मी अन्याय-अत्याचार किंवा मला कुणी चिडवतंय, हिणवतंय का, याकडे सतत लक्ष देऊ लागलो. मला कुणी अन्यायीपणे वागवल्याचं लक्षात येताच मी दुःखी होत असे. मला अन्यायाविरोधात तीव्र संताप येत असे, त्याला विरोध करावासा वाटे. असं काही झालं की त्याआधी घडून गेलेले अन्यायी प्रसंग वीज चमकावी तसे माझ्या डोक्यात गर्दी करत. त्यामुळे डोक्यात तिडीक जायची आणि अन्याय झुगारुन द्यावा, बंड करावं असं वाटत असे. अभ्यासात, अभ्यासेतर बाबींत माझी कामगिरी खूप चांगली राहिली. तशी ती कायमच राहील हे मी काळजीपूर्वक पाहत होतो, तरीही मला वस्तीतल्या एखाद्या अशिक्षित मजुरासारखं वागवलं जायचं. हतबल, हताश आणि असुरक्षित वाटायचं. एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून मला जो किमान आदर आणि मान्यता मिळणं अपेक्षित होतं, तोसुद्धा लोकांनी नाकारला. मी कोणीही नव्हतो पण माझ्या गुणवत्तेला आणि महत्त्वाकांक्षेला, इच्छेलाही तिथं मान नव्हता.

दलितांची एक साचेबद्ध प्रतिमा आहे, त्यातच मला जबरदस्तीनं कोंबलं जायचं. दलित म्हणजे हिंसक, अकार्यक्षम, कोणतीही गुणवत्ता नसलेले, गुन्हेगारी वृत्तीचे अशीच ती साचेबद्ध प्रतिमा होती. जात आणि धर्माच्या आधारावर झालेलं विभाजन या घटकांचं संपूर्ण पावित्र्य टिकवून ठेवतं. हा पावित्र्याचा खेळ 'खालच्या' म्हणवल्या गेलेल्या बाटलेल्या किंवा गुणवत्ताहीन दलितांचं 'माणूस' असणं, त्यांची मानवीयता समजून घ्यायला वावच देत नाही. त्यामुळे दलित सतत आपली मानुषताच धिक्कारली जाईल, या भीतीच्या छायेत जगत असतात. वर्चस्ववादी जातींमधील मुलांचे पालक सतत त्यांच्या मुलांच्या मनात दलितांच्या गुन्हेगारी वृत्तीबद्दल काहीबाही भरवत असतात. दलित गुन्हेगारी वृत्तीचे असतात, या दलितांबद्दल सर्वदूर पसरलेल्या धारणेचाच उत्तम वापर ते त्यांच्या जातीभेदाच्या वर्तणुकीचं समर्थन करण्यासाठी करतात. यामुळे दलित व्यक्तीला एका विशिष्ट वर्तुळात (जवळपास बंदिवासातच) राहावं लागतं किंवा आपली ओळख लपवून जगावं लागतं. शहरात राहणाऱ्या आणि आवडत्या उद्योग व्यवसायात स्थिरावलेल्या दलितांना आपल्या जातीची ओळख लपवूनच राहावं लागतं. एकदा एक प्रथितयश जाहिरात कंपनीचा मालक मला काही मोठ्या जाहिरात कंपन्यांची नावं सांगत होता. त्यानं सांगितलं, "या क्षेत्रातल्या सर्वांत यशस्वी ठरलेल्यांपैकी पहिल्या तीन क्रमांकांवर असलेल्या व्यक्ती दलित आहेत, पण त्यांना आपण दलित म्हणून ओळखलं जावं, असं वाटत नाही." 

- सूरज येंगडे, अमेरिका
suraj.yengde@gmail.com

(लेखक, हार्वर्ड केनेडी स्कूलमधील ‘इनिशिएटिव्ह फॉर इन्स्टिट्युशनल अँटि-रेसिझम अँड अकाउन्टेबिलिटी’मध्ये पहिलेच पोस्टडॉक्टरल फेलो म्हणून कार्यरत आहेत.)


साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले सूरज येंगडे यांचे सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: मराठी पुस्तक नवे पुस्तक आत्मचरित्रात्मक हार्वर्ड दलित साहित्य आंबेडकरी चळवळ विचारवंत इंग्रजी पुस्तके Load More Tags

Comments:

मधुकर रामचंद्र पांडव

फारच परखड व वस्तुनिष्ठ विवेचन आहे. नांदेडला मी १९८२ मध्ये नौकरीला लागलो.माझी जात चांभार, तिथे भाड्याने खोली बाबतीत चौकशी करताना मलासुद्धा अडचणी आल्या.

लतिका जाधव

भारतीय व्यवस्थेचे विदारक सत्य..

Add Comment