पृथ्वीवरील जीवसृष्टीत नरमादी असा प्रमुख भेद अस्तित्वात आहेत. या फरकाचा प्रभाव वैद्यकीय क्षेत्रातही दिसून येतो. हा वरकरणी ढोबळमानाने जाणवणारा फरक पेशी-उतीय, जनुकीय, जैवरासायनिक व शरीरशास्त्रीय (रचना, क्रिया) अशा सूक्ष्म पातळीवरही असतो. किंबहुना संशोधन क्षेत्रावरही त्याचे प्रतिबिंब पडते.
स्त्री-पुरुष यांच्यातील हा फरक वैद्यकीयदृष्ट्या अधिकच महत्त्वाचा ठरतो. काही आजार स्त्रियांमध्ये तर काही पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. काही व्याधींचे गांभीर्य लिंगानुसार बदलते. केवळ लैंगिकच नव्हे तर लिंगावलंबी जीवनशैलीमुळेही असे होते. उदाहरणार्थ, वाहन चालवणार्या पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा कितीतरी अधिक असल्याने अपघातामुळे होणार्या इजा वा मृत्यू यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असते.
स्त्रीपुरुष यांच्यातील या फरकामुळे वैद्यकीय संशोधनात या दोहोंचा सहभाग समप्रमाणात असायला हवा. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. या सहभागाची दोन अंगे आहेत. एकतर संशोधकांत पुरुषांचा वरचश्मा आहे... तोही दोन अर्थांनी. संख्येने तर ते जास्त आहेतच शिवाय प्रत्यक्ष संशोधक चमूतही त्यांचे स्थान महिलांहून वरचे आहे.
दुसरे अंग आहे ते स्त्रीलैंगिकांच्या संशोधनातील प्रत्यक्ष (पेशीय, उतीय, प्राणीय वा मानवी) सहभागाचे. सदर संशोधनात वैद्यकीय अभ्यासांचे वर्गीकरण तीन प्रकारे करण्यात आले. पहिला जैववैद्यकीय. यात मानवेतर प्राण्यांवरील तसेच मानवाच्या वा प्राण्यांच्या शरीराबाहेर काढलेल्या वा प्रयोगशाळेत निर्मिती / वाढ केलेल्या पेशी, उती, इंद्रिये आदींचा समावेश होतो. पूर्वापार असा समज आहे की, अशा प्रयोगात शक्यतो नर प्राणी वा भागाचा समावेश करावा कारण मादीच्या प्रजनन संस्थेसंबंधित घटकांमुळे प्रयोगावर विचित्र प्रभाव पडू शकतो.
दुसरा वर्ग आहे मानवावरील (स्वस्थ वा रुग्ण) चाचण्यांचा. यांत स्त्री-पुरुष, दोघांचा समावेश केला जात असला तरी तो सहसा विषम प्रमाणात असतो. मूत्रमार्ग, प्रजनन संस्था यांच्यात संबंधित स्त्रीविशेष अवयवांच्या विकारांवरील संशोधन वगळता इतर संशोधनांत पुरुषांचा अंतर्भाव संख्येने अधिक केला जातो. याचा अर्थ असा की, वापरात येणारे निष्कर्ष हे बहुसंख्य पुरुषांच्या सहभागावर अवलंबून असतात व ते तसेच महिलांनाही लागू पडतील असे गृहीत धरले जाते... त्यामुळे काही वेळा पुरुषांसाठी उपयुक्त ठरलेले काही उपचार, औषधे व निष्कर्ष महिलांवर प्रतिकूल परिणाम करणारे ठरू शकतात.
उदाहरणार्थ, गेल्या काही दशकांत महिलांच्या अल्पप्रमाणातील सहभागावर आधारित संशोधनातील निष्कर्षांना मान्यता देण्यात आली आणि त्यावर आधारित औषधे बाजारात आणण्यास परवानगी दिली गेली. मात्र या औषधांचा स्त्रियांवर दुष्परिणाम झाल्याचे आढळून आल्याने ती बाजारातून काढून घेण्यात आली. हे लक्षात घेऊन चिकित्सा अभ्यासात तरी ज्यांच्यावर चाचण्या केल्या जातात अशा रुग्णांची स्त्री-पुरुष संख्या समसमान असावी. जेणेकरून पुन्हा अशी परिस्थिती ओढवणार नाही. यासाठी चिकित्सा चाचणी नियमांत व मार्गदर्शकतत्त्वांत काही बदल करावे लागतील असे या शोधनिबंधात सुचवण्यात आले आहे.
हे बदल वा या सुधारणा दोन पातळ्यांवर होणे आवश्यक आहे. एक म्हणजे अभ्यासांना शासकीय वा तत्सम निधीवजा आर्थिक सहकार्य करताना दोन्ही लिंगांच्या समसमान वा स्त्रीलिंगाच्या शक्य तेवढ्या जास्त समावेशाची अट लागू करणे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे शोधनिबंध प्रस्तुत करणाऱ्या संशोधकांमध्ये लिंगनिहाय समसहभाग असल्याची खातरी संपादकांनी प्रकाशनापूर्वी करून घेण्याची.
संशोधनांमध्ये स्त्रीलिंगी समावेशाचे प्रमाण गेल्या चार दशकांत वाढत गेलेले दिसते. ही समाधानाची बाब असली तरी अद्यापही हा सहभाग अधिक अचूक निष्कर्षासाठी आवश्यक त्या प्रमाणात वाढलेला नाही. सार्वजनिक आरोग्यविषयक संशोधनात सदर संख्या बरीच वाढली आहे. मात्र चिकित्सा अभ्यासात बरेचदा दुर्लक्षित राहिलेला मुद्दा म्हणजे चिकित्सापूर्व (पेशी, उती वा इंद्रिये (मानवी वा इतर प्राण्यांची) वा मानवेतर प्राणी) प्रयोगात मात्र स्त्रीलिंगी समावेशाची अद्यापही बरीच वानवा आहे. वैद्यक संशोधनात असे प्रयोग सर्वप्रथम करण्यात येतात व या प्राथमिक प्रयोगात यश मिळाले तरच पुढील चिकित्सा अभ्यास केले जातात. त्यामुळे ही बाब महत्त्वाची आहे.
बरेचदा प्रयोगामध्ये भिन्नलिंगी बाबीचे समप्रमाण राखले जात नाही. काही वेळा तर पेशींची / उतींची / इंद्रियांची लैंगिक ओळख तपासली जात नाही वा तिची नोंदही केली जात नाही. प्रयोगात बहुधा पुल्लिंगी जैवसमावेश केलेला असतो. त्यामुळे अशा नरसमावेशी प्रयोगांचे निष्कर्ष दोन्ही लिंगांना सारखे लागू पडतात असे गृहीत धरून पुढील चिकित्सा-अभ्यास सुरू केले जातात.
वैद्यकीय संशोधनाचे क्षेत्र आज आघाडीवर असले तरी त्यातील अभ्यासात स्त्रीलिंगी बाबीच्या, प्राण्यांच्या वा व्यक्तींच्या कमी समावेशाची त्रुटी या निबंधातून प्रकर्षाने पुढे आली आहे. यापूर्वीही स्त्रीलिंगी समावेशाच्या कमतरतेचा आढावा वारंवार घेण्यात आला आहे. मात्र तो विषयनिहाय, संकीर्ण व अल्पसंख्येत घेतला गेला.
या सगळ्या गोष्टी चर्चेत आल्या त्या एका शोधनिबंधाने. लॅन्सेट या जागतिक प्रतिष्ठेच्या वैद्यक नियतकालिकाने महिलांच्या संशोधनातील सहभागाचे विस्तृत विश्लेषण करणारा एक शोधनिबंध प्रकाशित केला. त्यात दोन मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. विविध प्रकारच्या वैद्यकीय संशोधनांत स्त्री-संशोधकांचे कमी प्रमाण हा त्यातील एक भाग. दुसरा भाग म्हणजे संशोधनासाठी स्त्रीलिंगी पेशी, प्राणी किंवा मुली, महिला, स्त्रीरुग्ण यांचा समावेश किती कमी आढळतो; तो कमी का आढळतो या बाबींचा उहापोह केला आहे.
प्रस्तुत निबंधात लेखकांनी सुमारे सव्वा कोटी शोधनिबंध तपासले. वर वर्णन केलेल्या तीन प्रकारच्या वैद्यक संशोधन प्रकारांत त्यांचे वर्गीकरण केले. नंतर वैद्यकीय विषयवार त्यांचा आढावा घेतला. प्रत्येक प्रकाशित निबंधात समाविष्ट नमुन्यांच्या वा व्यक्तींच्या / प्राण्यांच्या लैंगिकतेचा उल्लेख केला आहे किंवा नाही, तसे असल्यास त्यांतील नर-मादी प्रमाणाचा आढावा घेतला व त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढले. किती प्रयोगात फक्त स्त्री, फक्त पुरुष वा दोन्ही लिंगी बाबी समाविष्ट होत्या; त्याची विषयवार, देशनिहाय कोष्टके मांडली; आलेख काढले आणि त्यावर चर्चा करून सदर समस्येचे नेमके रूप स्पष्ट करत त्यावर उपाययोजनाही सुचवल्या.
आणखी एका बाबीचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. तो म्हणजे या सर्व शोधनिबंध लेखक-संशोधकांमधील स्त्री-पुरुष प्रमाणाचा तसेच त्यांतील स्त्री-लेखकांच्या संशोधन चमूतील स्थानाचा. यासाठी त्यांनी प्रत्येक शोधनिबंधाचा लेख प्रथम व अंतिम लेखकांच्या नावावरून स्त्री-पुरुष ओळखण्याच्या तंत्राचा वापर केला. अर्थात यात काही अडचणी येणे साहजिकच होते. जिथे लेखकाचे प्रथम नाम न देता आद्याक्षरे नमूद केली होती त्या नोंदी सोडून द्याव्या लागल्या. प्रथम लेखक हा ज्येष्ठ व अंतिम लेखक कनिष्ठ यांनुसार त्यांचे स्थान ठरवण्यात आले.
याचे निष्कर्षही या क्षेत्रातील लिंगभेद दर्शवणारे आहेत. जगभर जरी स्त्री-शिक्षण वाढत असले आणि वैद्यकीय शिक्षणातील व संशोधनातील स्त्रियांचा वाटा लक्षणीय असला तरी स्त्री-पुरुष याही बाबतीत समप्रमाणात नसल्याचे दिसून आले. प्रथम व अंतिम दोन्ही लेखक पुरुष असणार्या निबंधांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्या खालोखाल प्रथम लेखक पुरुष व अंतिम लेखक स्त्री असणार्या निबंधांचे. त्याउलट स्त्री प्रथम लेखक वा दोन्ही लेखक स्त्रिया असण्याचे प्रमाण सर्वांत कमी होते. वैद्यक संशोधन प्रसिद्ध करणार्या नियतकालिकांमध्ये स्त्री-संपादक अल्प प्रमाणात आढळतात. तिथेही सुधारणेस वाव आहे.
या संशोधनातील विषयनिहाय विश्लेषणावर नजर टाकली असता काही अभ्यासांत स्त्रियांचा समावेश अधिक असल्याचे दिसते. तसे असणे अपेक्षितही आहे कारण महिलांच्या आजारांबाबत होणाऱ्या संशोधनात त्यांचाच समावेश असणार हे उघड आहे.
सदर संशोधनातून काही अनपेक्षित निष्कर्षही समोर आले आहेत. अधिक वाचक असणार्या नियतकालिकांतील संशोधक लेखकांमध्ये स्त्रियांचे प्रमाण कमी व कमी वाचक असणार्या नियतकालिकांत ते जास्त आहे. दुसरा धक्कादायक निष्कर्ष म्हणजे अफ्रिकेसारख्या अविकसित राष्ट्रातील प्रकाशनात स्त्री-संशोधक-लेखिकांची संख्या अमेरिकेसारख्या पुढारलेल्या राष्ट्रांच्या तुलनेत जास्त आहे!
या शोधनिबंधातील निष्कर्षावरून पुढील संशोधनाच्या दिशा स्पष्ट होतात. संशोधन प्रायोगिक, चिकित्सक असो वा सार्वजनिक आरोग्यविषयक असो... शक्य तिथे अधिकाधिक स्त्रीलिंगी पेशी, उती, इंद्रिये, प्राणी वा व्यक्ती यांचा समावेश व्हायला हवा. जेणेकरून बहुसंख्य नर नमुन्यावरील चाचण्यांचे निष्कर्ष स्त्रियांनाही सरसकट लागू केल्यामुळे होणारे तोटे टाळता येतील.
प्रत्येक संशोधनातील समाविष्टांची संख्या / प्रमाणनिहाय उल्लेख अनिवार्य करणे उपयुक्त ठरेल. वस्तुतः एखाद्या स्वास्थ्य-स्थितीतील वा आजारातील त्या-त्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांच्य सद्य प्रमाणात भिन्नलिंगी समावेश हा अधिक विज्ञानाभिमुख ठरावा. याचसोबत वैद्यकाभ्यासातील संशोधक महिलांची संख्या व प्रमाण तसेच त्यातील त्यांचे स्थान व दर्जाही वाढवणे आणि उंचावणे गरजेचे आहे. वैद्यक संशोधक महिलांवर संपादकीय जबाबदारीही अधिक मोकळेपणाने सोपवायला हवी.
ज्या विषयात व प्रदेशात स्त्री-संशोधक तसेच स्त्रीलिंगी नमुन्यांच्या समावेशाची कमतरता आढळून आली आहे, त्या विषयातील / विभागातील धुरिणांनी याची विशेष दखल घेत हे प्रमाण समाधानकारक पातळीपर्यंत वाढेल याची प्रयत्नपूर्वक खातरजमा केली पाहिजे. यासाठी संशोधनाच्या नियोजनातील याबाबतच्या तरतुदीचा आढावा घेऊनच प्रकल्पास मान्यता व आर्थिक सहयोग आदी देणे रास्त ठरेल. संस्था पातळीवर काम करणार्या संशोधनाशी संबंधित समित्यांनी तशा प्रकारचे नियम ठरवून त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे.
लॅन्सेटच्या या शोधनिबंधामुळे येत्या काळात वैद्यक संशोधनातील स्त्री टक्का सर्व प्रकारे वाढेल अशी अपेक्षा करू या.
- डॉ. पद्माकर पंडित
ptpandit@gmail.com
(डॉ. पद्माकर पंडित औषधशास्त्र व वैद्यकीय शिक्षण-संशोधनातील तज्ज्ञ आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक व अधिष्ठाता होते.)
Tags: विज्ञान तंत्रज्ञान लॅन्सेट स्त्री महिला लैंगिक समानता डॉ. पद्माकर पंडित संशोधन आरोग्य marathi Science Technology Lancet Women Gender Equality Dr. Padmakar Pandit Research Health Load More Tags
Add Comment