महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा मागोवा घेणारे पुस्तक... 

'सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे' या पुस्तकाविषयी 

सत्यशोधकी विचारवंत रा. ना. चव्हाण यांच्या लेखांचे संकलन असलेले ‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हे ऐतिहासिक संदर्भमूल्य असलेले पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा-सत्यशोधक चळवळीचा-मागोवा घेणाऱ्या लेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. यातील सर्व लेख एकोणिसाव्या शतकातील महात्मा फुले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचा लेखाजोखा घेणारे आहे.

‘पुरोगामी सत्यशोधक’ (संपादक - बाबा आढाव) या त्रैमासिकातील रा. ना. चव्हाणलिखित पूर्वप्रसिद्ध जुन्या लेखांच्या शीर्षकांचे कोलाज असलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ अगदी आशयाभिमुख झाले आहे. पुस्तकाला प्रा. डॉ. अरुण शिंदे यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. ‘हे पुस्तक नवे संदर्भ देण्यास उपयुक्त असून ते संशोधकांना दिशा देणारे ठरेल’ असे मत त्यांनी प्रस्तावनेत व्यक्त केले आहे. 

पुस्तकाचे संपादक रमेश चव्हाण आपल्या मनोगतात म्हणतात, “ही सर्व कागदपत्रे डॉ. बाबा आढाव कार्यकारी संपादक असलेल्या ‘पुरोगामी सत्यशोधक’ या त्रैमासिकात ‘जुनी कागदपत्रे’ या सदरात प्रसिद्ध झाली आहेत.” (पृ. 9) 

हे पुस्तक पुण्यातील ज्येष्ठ विचारवंत व असंघटित कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव यांना अर्पण केले आहे. पुस्तकातील या लेखांची पूर्वप्रसिद्धी जरी नमूद केलेली असली तरी हे सर्व लेख पुस्तकरूपाने एकत्रितपणे दिल्याने कामगार चळवळ, सत्यशोधक चळवळ, स्त्री-शूद्रातिशूद्र शिक्षण चळवळ, स्त्री-पुरुष समता विचार व कृती तसेच राजकीयदृष्ट्या बदलणारे तत्कालीन वातावरण यांविषयीच्या मूळ कागदपत्रांच्या आधारे तपशील पाहता एकोणिसाव्या शतकातील विचारवेध व तत्कालीन शोध घेण्यास हे पुस्तक  पूरक ठरते.

पुस्तकात एकूण चाळीस प्रकरणे असून ती छोटेखानी आहेत. महात्मा फुले यांच्याविषयी व त्यांच्या सहकाऱ्यांवर तसेच तत्कालीन घडामोडींबद्दल जे-जे म्हणून मिळेल ते नोंदवून ठेवून अतिशय निष्ठेने रा. ना. चव्हाण यांनी हे लेखन केले आहे त्यामुळे हे लेख वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. त्यामुळे सहजच इथे प्राचीन मराठी वाङ्‌मयातील श्री चक्रधर स्वामी यांच्या आठवणी गोळा करणाऱ्या म्हाइंभटांची (13वे शतक) आठवण येते... कारण म्हाइंभटांनी गोळा केलेल्या आठवणींचा मराठीतील आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ म्हणून आज अभ्यासला जातो. महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या सामाजिक परिवर्तनाच्या काळाचे संशोधनदेखील महानुभावांच्या अनुयायांच्या वाटेने केले गेले हा एक आजचा योगायोग म्हणता येईल.

या पुस्तकात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या हळव्या करून टाकणाऱ्या अनेक आठवणी वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, वडिलांनी घराबाहेर काढल्यावर त्यांनी शोधलेले घर. नंतर त्यांनी स्वतःचे उभारलेले घर. (पृ. 120) महात्मा फुले व त्यांचे सहकारी, उदाहरणार्थ डॉ. संतुजी रामजी लाड, डॉ.विश्राम रामजी घोले, गंगारामभाऊ म्हस्के, नारायण मेघाजी लोखंडे, जावजी दादाजी चौधरी, बाबुराव यादव, वा. रा. कोठारी, नारायण बळवंत चव्हाण या सर्वांचा सुबोध व नेटके कर्तृत्व सांगणारा परिचय पुस्तकातून रां. ना. चव्हाण यांनी उपलब्ध करून दिला आहे. 

पुस्तक अनेक बाबतींत समतोल साधणारे आहे. महात्मा फुले परिवर्तनाच्या लढ्यात सर्वांना एकत्र घेऊनच पुढे गेले. पुण्यातील सुधारक मंडळींशी महात्मा फुलेंची मैत्री होती. त्यांपैकी मोरो विठ्ठल वाळवेकर हे फुलेंचे शालेय जीवनापासूनचे मित्र होते व त्यांची ही मैत्री अखेरपर्यंत कायम होती. मोरो विठ्ठल यांच्याविषयी खूप कृतज्ञतापूर्वक लेखन रा. ना. चव्हाण यांनी केले आहे. महात्मा फुलेंच्या निधनानंतर मोरो विठ्ठल यांनी सुबोधपत्रिकेत जो मृत्युलेख लिहिला त्यात त्यांनी 28 तारीख, शुक्रवार असा बिनचूक उल्लेख केला होता. पुढे तो संदर्भ महत्त्वाचा ठरला. म. फुले यांचा विश्वसनीय फोटोदेखील वाळवेकरांनी प्रथम छापला. (पृ. 51) “मोरोपंतांनी म. फुलेलिखित ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकाच्या दोन हजार प्रती काढल्या होत्या. ही आवृत्ती खूप लवकर संपली.” (पृ. 52) अशा अनेक घटनांचा व म. फुले यांचे सहकारी असलेल्या ब्राह्मण सुधारक मंडळींचा पुस्तकात उल्लेख केलेला आहे. 

चव्हाण पुढे लिहितात, “जोतीरावांनी मोरोपंतांचा परममित्र म्हणून उल्लेख केला आहे तसा मोरोपंतांनी जोतीरावांचा परममित्र म्हणून उल्लेख केला आहे. जिवलग मित्र व अशी आमरण सार्वजनिक कार्यातील मैत्री व सख्य आणि सहकार्य आजकाल सापडणे कठीण आहे. वाळवेकर, परांजपे, वि. बा. भांडारकर, गोवंडे, परांजपे स. य. व जोतीराव हे शाळासोबती. त्यांनी अंत्यजांच्या व स्त्रियांच्या उद्धाराच्या कार्यास 1857च्या उठावाच्या अगोदर प्रारंभ केला होता.” (पृ. 53)

महात्मा फुलेलिखित छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा व गुलामगिरी या पुस्तकांच्या छपाईसाठी वि. बा. भांडारकर यांनी मदत केल्याचा संदर्भ देताना पुस्तकात आणखी काही संदर्भ नोंदवले आहेत. वि. बा. भांडारकर यांनी आपली विधवा कन्या गंगूताई भांडारे यांचा पुनर्विवाह 1874मध्ये घडवून आणला. ब्राह्मण समाजातील हा पहिला पुनर्विवाह होता. विनायक भांडारकर हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. (पृ. 153)

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज खूप उत्साहाने साजरा केला जात आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या वेळी जमणाऱ्या गर्दीची तुलना चंद्रभागेच्या तीरावर जमणाऱ्या वारकऱ्यांच्या श्रद्धेशी केली होती. त्यावर राजारामशास्त्री भागवतांनी व अनेक सुधारकांनी टीका केली होती. त्याविषयीचे दीनबंधुकार लोखंडे यांचे जहाल लेखन पुस्तकात सविस्तरपणे वाचायला मिळते. “...पंढरपूरच्या आषाढी–कार्तिकी दिंड्यांची व ताबुताच्या जागी केलेल्या गणपतीपुढे नाचणाऱ्या मेळ्यांची समता दाखवून लोकांच्या डोळ्यांत धूळ टाकणे केसरीसच शोभते. पंढरीस जाणाऱ्या लोकांचे भक्तिप्रेम व गणपतीसमोर त्याच्या नाना प्रकारच्या मूर्तींची हिंदू प्रेक्षक आपापसात थट्टा करत असताततो प्रकार या दोहोंत महदंतर आहे! (दीनबंधू – 30/09/1894) (पृ. 48)

पुस्तकात महात्मा गांधी यांच्या मराठीतील पहिल्या चरित्राचा उल्लेख व मूळ संदर्भ दिलेला आहे. अवंतिकाबाई गोखले यांनी 1918मध्ये लिहिलेले महात्मा गांधी यांचे चरित्र हे मराठीतील पहिले चरित्र असल्याची नोंद असली तरी पुस्तकातील संदर्भांनुसार – ‘नारायण बळवंत चव्हाण’ यांनी ‘ज्ञानमित्र पुस्तकमाला’ सुरू केली होती. ते स्वतः याचे मुद्रक, प्रकाशक व लेखकदेखील होते. या पुस्तकमालेतून ‘सरस्वतीनंदन’ या टोपणनावाने एका लेखकाने 1914मध्ये बॅ. मो. क. गांधी यांचे चरित्र लिहिले होते.’ म्हणजे महात्मा गांधी यांचे मराठीतील हेच पहिले चरित्र आहे पण ‘सरस्वतीनंदन’ नावाने लिहिणारे हे मूळ लेखक कोण असावे याचा शोध घेणे अवघड होते. सातत्याने प्रयत्न करून हा शोध घेतल्याचा संदर्भ देताना चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे की,  “जोशी लक्ष्मण नारायण हे ‘सरस्वतीनंदन’ या टोपणनावाने लिहीत असत. त्यांनी ‘बॅ. गांधी यांचे चरित्र, विनोदलहरी, जर्मनीचे महत्त्वाकांक्षी कैसर, शांतिनिकेतन माला, सुगंधी शिक्षक इत्यादी पुस्तके लिहिली आहेत.” (पृ. 99) अशा अनेक अन्य संदर्भांचे तपशीलदेखील इथे मिळतात.

अशाच लेखांपैकी ‘फुल्यांच्या काळातील पुणे’ हा लेखदेखील वाचण्यासारखा आहे. “पुणे शहर पेशवाई 1818मध्ये नष्ट झाल्यावर केवळ एखाद्या दुर्दैवी विधवेसारखे निस्तेज झाले... 1827मध्ये पेशवाई नष्ट झाल्यानंतर म्हणजे सातआठ वर्षांनी शनिवारवाड्याने आपला प्रचंड देह अग्निनारायणास अर्पण केला.” (पृ. 141) “पण इंग्रजी अंमल सुरू झाल्याने मिशनरी आले, येथील लोकांसाठी जुने व नवे असे शिक्षण देणे सुरू झाले. पहिली इंग्लीश शाळा रेव्ह. जेम्स मिचेल यांनी काढली. सरकारने ती ताब्यात घेऊन नंतर बुधवारवाड्यात चालवली... या इंग्लीश शाळेतून जे पहिले विद्वान झाले त्यात गोपाळ हरी देशमुख, सोन्याबापू मांडे, विष्णू मोरेश्वर भिडे वगैरे गृहस्थ प्रसिद्धीस चढले. हे बहुतेक जोतिबांचे मित्र व साह्यकारी होते.” (पृ. 143)

महात्मा फुले यांच्या कर्तृत्वाचा परिचय व तत्कालीन सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनातील बदलांची जाणीव हे पुस्तक करून देते. संपादक रमेश चव्हाण यांनी प्रचंड कष्टाने या पुस्तकातील लेखांची मांडणी व संपादन केले आहे. ‘पुरोगामी सत्यशोधक’ या त्रैमासिकातून पूर्वप्रसिद्ध झालेले हे लेखन एकोणिसावे शतक व त्याच्या उत्तरार्धातील सत्यशोधक चळवळ यांचा उलगडा करण्यास उपयुक्त ठरणार आहे. 

 - डॉ. लतिका जाधव, पुणे 
latajadhav47@gmail.com


सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे 
लेखक – रा. ना. चव्हाण 
संपादक व प्रकाशक – रमेश चव्हाण, 
रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई, अक्षर श्रद्धांजली पुष्प - 42 
एकूण पृष्ठे – 304, मूल्य – 350 रुपये  

Tags: परिचय लतिका जाधव सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे  रा ना चव्हाण महात्मा फुले सत्यशोधक समाज सावित्रीबाई फुले महात्मा गांधी लोकमान्य टिळक दीनबंधू बाबा आढाव पुरोगामी सत्यशोधक Book Introduction Latika Jadhav Satyashodhak Samaj Mahatma Phule R N Chavan Savitribai Phule Mahatma Gandhi Lokmanya Tilak Deenbandhu Baba Adhav Purogami Satyashodhak Load More Tags

Comments:

Adv pradeepsinh Gangane

Mam plz available this book

सत्येंद्र सिंह

समीक्षा उत्कृष्ट है। डॉ लतिका जाधव जी को बहुत बहुत बधाई।

Add Comment