‘बिजली’तून त्यांच्या कवितेने समकालीन वास्तवाला भिडण्याची जी खूणगाठ बांधली ती कायमस्वरूपी तशीच राहिली. तिशीत असलेल्या बापटांच्या ‘बिजली’ने आपला मराठी कवितेतला पडाव दीर्घकाळ राहणार असल्याचे सूचन केले होते. बापटांपेक्षा दहा वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या कवी कुसुमाग्रज यांनी ‘बिजली’साठी प्रस्तावना लिहिली होती. त्यात त्यांनी बापटांच्या काव्यप्रयोजनाची चर्चा केली आहे. त्यांना लिहिलेल्या पत्रात वसंत बापट लिहितात, ‘माझी कविता फारशी लोकप्रिय झालेली नाही व ती कोणत्याही अर्थानं युगप्रवर्तक, नवी इत्यादी नाही; ती कविता असली म्हणजे पुरे असे मी मानतो,’
वसंत बापट हे मराठीतले निसर्ग-प्रेम आणि राष्ट्रभक्तीच्या रसाने ओथंबलेले शाहीर-कवी होते. संस्कृत-इंग्रजी या भाषेचे जाणकार राहिलेल्या बापटांच्या पहिल्याच, ‘बिजली’ या कवितासंग्रहात त्यांच्या पुढील सर्व काव्यवाटचालीच्या खुणा दिसून येतात. निसर्ग-प्रेम कविता, शृंगारपर गीते/कविता, गवळणी, लावण्या, चळवळीची गाणी, समरगीते, स्फूर्तीगीते, नाट्यपदे, मुक्तकविता असे बहुविध काव्यप्रकार त्यांनी पुढील आयुष्यात हाताळले असे त्यांचे सर्व कवितासंग्रह पाहिल्यास लक्षात येते.
वसंत बापटांच्या बालपणापासून तरुणवयापर्यंतचा काळ हा राष्ट्रीयदृष्ट्या धामधुमीचा राहिला. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, साने गुरुजींचा प्रत्यक्ष सहवास, इंग्रज राजवटीच्या विरोधात पुणे आणि परिसरात केलेले क्रांतीकार्य, ‘चले जाव’च्या चळवळीत घडलेला कारावास, प्रत्यक्ष स्वातंत्र्यप्राप्तीचे दर्शन आणि पुढे पाहिलेला भारतीय स्वातंत्र्याचा रौप्य आणि सुवर्णमहोत्सव, दरम्यानच्या काळातली आणीबाणी आणि दोन हजार या सहस्त्रकाच्या शेवटच्या अस्वस्थ दशकातील नव्वदीचे वास्तव हे सर्व त्यांना अनुभवता आले. त्यांच्या आयुष्यातील हा कालपट त्यांच्या कवितेत समांतर आलेला दिसतो. वसंत बापटांच्या काळावर केशवसुत, बालकवी, भा.रा.तांबे, गोविंदाग्रज अशा भावसौंदर्यवादी परंपरा असलेल्या कवींचा मोठा प्रभाव होता. त्यातून आपल्या स्वतंत्र कवितालेखनाची वाट पुढे चालविणारे कुसुमाग्रजही वसंत बापटांना समोर दिसत होते. प्रत्यक्ष स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतल्यावर त्यांच्या तोवरच्या भूमिकेत सर्वसमावेशकता येणे साहजिक होते. ‘बिजली’ कवितासंग्रहात त्यांच्या एकूण 61 कविता आहेत. आणि त्यात ते भविष्यात लिहिणार असलेल्या सर्व कवितांच्या आशय-विषय-रचना परंपरांची बीजे दडली असल्याचे दिसते.
‘बिजली’तून त्यांच्या कवितेने समकालीन वास्तवाला भिडण्याची जी खूणगाठ बांधली ती कायमस्वरूपी तशीच राहिली. तिशीत असलेल्या बापटांच्या ‘बिजली’ने आपला मराठी कवितेतला पडाव दीर्घकाळ राहणार असल्याचे सूचन केले होते. बापटांपेक्षा दहा वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या कवी कुसुमाग्रज यांनी ‘बिजली’साठी प्रस्तावना लिहिली होती. त्यात त्यांनी बापटांच्या काव्यप्रयोजनाची चर्चा केली आहे. त्यांना लिहिलेल्या पत्रात वसंत बापट लिहितात, ‘माझी कविता फारशी लोकप्रिय झालेली नाही व ती कोणत्याही अर्थानं युगप्रवर्तक, नवी इत्यादी नाही; ती कविता असली म्हणजे पुरे असे मी मानतो,’ (‘बिजली’,पृ.3) ही अगदी त्यांची सुरुवातीची काव्यभूमिका होती. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने बापट म्हणतात, ‘अकरावी दिशा या माझ्या तृतीय संग्रहाची प्रथमावृत्ती निघत आहे; या घटनेवरूनच रसिकांनी मजवर ठेविलेल्या कृपेची कल्पना येते. एरवी वाढत्या संघर्षाच्या धुमाळीत कवितेला पुसतो कोण?’ असा प्रश्न बापट विचारतात. यात ते वाचकाला ‘रसिक’ म्हणतात. ‘रसिक’ म्हणण्याची ही भूमिका एखाद्या शाहिराचीच असू शकते.
पुढे ते असेही लिहितात, ‘माझी कविता माझ्यासाठी असे मनात येणेही पाप ठरावे एवढे हे औदार्य आहे.’ बापटांच्या मनात कवितेची भूमिका ही सामाजिकतेच्या अंगाने असल्याचे दिसते. विद्यार्थीदशेचा काळ ते वयाच्या तिशीपर्यंत त्यांची तयार झालेली मनोभूमिका ही सामाजिक कवितेच्या बाजूने झुकली असल्याचे दिसते. चले जाव चळवळ, त्यात घडलेला कारावास, भारतीय स्वातंत्र्य आणि त्यानंतरची पाच वर्षे हा काळ ‘बिजली’साठी होता. ‘बिजली नाचेल गगनांत वादळ होईल जोसांत’ अशी त्यांची या कवितेतली गर्जना होती. आणि त्यातच ‘स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य?’ अशी चीड आणि विषादाने भरलेली विचारणाही होती.
ह्या उभ्या झोपड्या येथे साडेतीन
पसरली गाडकी-मडकी तेजोहीन
दो हजार वर्षे हाच इथे देखावा
दारिद्र्य तयांना नाही आज नवीन
परळात वाळले तुकडे दो दिवसांचे
ते पोरं खाली आश्रूतच भिजवून
वाडगा भरोनी आई आणील पाणी
गावात कुणाचे उंबरठे झिजवून
स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य?
जो महारवाडे हरेक गावांतून...
(‘बिजली’ पृ.29)
हा समस्त स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी हेरला होता. गोरगरीब आणि धनिक यांच्यातील दरी तशीच वाढत जाते आहे. जातपात आणि वर्गाचे किल्ले अधिक जोशात उभे राहत आहेत. बहुजन-वंचितांना न्याय नाकारला जात आहे, यावर बापट या कवितेतून त्वेषाने तुटून पडले आहेत. संपूर्ण संग्रहात इतरही कविता असल्या तरी सामाजिकतेचा पुरस्कार करणाऱ्या कविता अधिक उठून दिसतात. आणि तीच त्याकाळाची त्यांची प्रधान काव्यभूमिका असल्याचे दिसते. किंबहुना ‘बिजली’नंतर तशी प्रखर कविता त्यांच्या हातून लिहिली न गेल्याने ‘त्यांच्यातील ‘बिजली’ पुन्हा दिसली नाही’ अशीही पुस्ती अभ्यासक जोडत असत. बापटांच्या मनातील अन्यायाविषयीची चीड स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेत इतर सर्व कवींच्या तुलनेत सर्वांत अगोदर त्यांच्या ‘बिजली’मध्ये ग्रथित झाली असे म्हणण्याशिवाय प्रत्यवाय नाही. ‘बिजली’मधील सामाजिक उपहास अत्यंत टोकाचा आणि मर्मभेदी आहे. ‘बिजली’तली ‘झेलमचे अश्रू’ ही अखिल मानवतेला आपल्या कवेत घेणारी आहे. झेलमसारखे रूपक मराठी कवितेत पुन्हा झाले नाही. ‘पहाटेचे स्वप्न’सारख्या अनेक कविता त्यांच्या कवित्वशक्तीचा प्रत्यय देतात.
पुढे 1957मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सेतू’ कवितासंग्रहात त्यांनी आपला वेगळा सूर लावला आहे. त्यातील बापटांची भूमिका विशुद्ध कवितेला न्याय देण्याकडे, कलावादी भूमिकेच्या बाजूने जाताना दिसते. त्यामुळे पूर्वी सामाजिकतेच्या अंगाने आपण जे लिहिले ते ‘प्रचारकी’ असल्याचे त्यांना वाटू लागल्याचेही दिसते. स्वतःची भूमिका मांडताना ते म्हणतात, ‘मी कविता का लिहितो ह्याचे एकच एक उत्तर मला देता येणार नाही. ह्याचाच अर्थ असा की, माझी काव्यविषयक भूमिका वारंवार बदलत आलेली आहे. इतकेच नव्हे, तर एका वेळी एक भूमिका ठेवण्याचेही मला जमलेले नाही.’ अशी प्रांजळ कबुलीच त्यांनी दिलेली आहे.
पुढे ते म्हणतात, “आजच्या माझ्या काव्याची भूमिका स्पष्ट होण्यासाठी हा पूर्वेतिहास व हे विवेचन आवश्यक आहे. काव्याच्या ह्या प्रथमावस्थांतून बाहेर पडताना मला प्रयास पडले असले तरी आता मी बाहेर पडलो आहे असे मला वाटते. माझ्या विकासाच्या मार्गावरील काही टप्पे मी मुद्दाम दिग्दर्शित केले आहेत. माझ्या कवितेच्या बाल्यावस्थेबद्दल मला कधी पश्चात्ताप होत नाही. कारण त्यातून जे घेण्यासारखे होते, टिकवण्यासारखे होते ते मी जगवले आहे, टिकवले आहे. असे मला वाटते. पद्यरचनेचा हव्यास सोडून शब्द वाकवण्याची शक्ती शिल्लक ठेवली. प्रचारकी साहित्याकडे पाठ फिरवली; निदान त्याची काव्यक्षेत्रातून माझ्यापुरती हकालपट्टी केली. प्रचार हेही साहित्याचे एक दालन असले तरी ते काव्यापासून फार निराळे आहे हे शिकलो.” समाजाच्या दु:खाला मी कधी अव्हेरणार नाही अशी आपली बाजू त्यातच पुढे त्यांनी मांडली आहे.
यातील प्रचारकी म्हणतात ते साहित्य नक्की कोणते असावे? कदाचित ते आज वाचकांसमोर उपलब्ध नसावे. कारण राष्ट्र सेवा दल आणि त्या संदर्भाने लिहिलेल्या कवितेला ते प्रचारकी म्हणणार नाहीत असे वाटते. जे त्यांनी प्राणपणाने केले त्याला ते कधीही कमी लेखणार नाही अशी खुणगाठ आपण बांधायला हरकत नाही. पुढे ‘अकरावी दिशा’ (1962), ‘सकीना’ (1972), ‘मानसी’ (1977), ‘तेजसी’ (1991), ‘राजसी’ (1991) अशी उतरंड त्यांनी रचलेली आपल्याला दिसते. यात शाहिरी बाण्याची ओळख करून देणारी ‘गवळणी आणि लावणी’ने युक्त अशी ‘रसिया’ (1993) ‘प्रवासाच्या कविता’ अशा निरनिराळ्या छंद-बंधांत बांधलेल्या संग्रहाची निर्मिती झाली असल्याचे दिसते.
बहुविध प्रकारचे लेखन त्यांनी केले असले तरी त्यांची एकूण भूमिका कधी फारशी बदलली नाही. असेच पुढील दीर्घकाळाने आलेल्या ‘शिंग फुंकिले रणी’ आणि ‘शूर मर्दाचा पोवाडा’ या पुस्तकांवरून दिसते. त्यांनी सेवादलासाठी म्हणून लिहिलेली गीते अजरामर अशी ठरली आहेत. सेवादलाच्या तिन्ही पिढ्यांनी ती आता आतापर्यंत उच्चरवात म्हटल्याचे सर्वांनी बघितले आहे. त्यांच्या त्या गीतात समूहाला प्रेरित करण्याची मोठी जादू होती. शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या, श्रमिकांच्या हाती केवळ कष्ट करणेच लिहिले आहे. ते बदलायचे तर त्यासाठी,
कोणाचे दास्य नको, परक्यांचे धनिकांचे
सर्वांचे राज्य असो, देशातील श्रमिकांचे
तोवरी रुचणार नसे सोन्याचा घास जयां
सोन्याने उल्लेखिल भावी इतिहास तयां...
(‘शिंग फुंकिले रणी’,पृ.79)
या ओळी केवळ वसंत बापट लिहू शकले आहेत. या गीताचे धागे बिजलीतल्या ‘सावकारशाही ठेवायची नाही ठेचायची आता हाय हो’ या उद्गारापाशी जोडलेले आहे.
स्वातंत्र्योत्तर निराशेचे ढग दाटून आलेले होते. समाजासाठी सर्वस्व झोकून दिलेल्या लोकांच्याभोवतीची माणसे खूपच बदलून गेली. ती सत्तेच्या नादी लागून भ्रष्ट झाली. याच भूमिकेला धरून ‘सावंत’ नावाची लिहिलेली कविता त्याचेच निदर्शक आहे.
दरकाळात त्यांनी आपल्या शाहिरी मगदुराप्रमाणे कविता लिहिली. एखाद्या कार्यकर्त्याने आपली काव्यभूमिका जाहीर करावे असे त्यांचे ते विवेचन होते. विचार आणि आशय यांची लयीतली सांगड म्हणजे वसंत बापट यांची कविता होय. कदाचित त्यांच्या या काव्यभूमिकेवर साने गुरुजींच्या साहित्याबाबतच्या लोकभूमिकेचा परिणाम झाला असावा. कारण प्रत्यक्ष चळवळीत गुरुजींचे सान्निध्य त्यांना लाभले होते. बापट यांच्या कवितेत रचनेचा उणेपणा कुठेच नसण्याचे कारण म्हणजे छंदांवर त्यांची हुकुमत होती. बालपणापासून विविध छंदांत कविता लिहिल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले आहेच.
शिवाय त्यात कोणतीही वृत्त-मात्रेची चूक कुणाला काढण्याची संधी त्यांनी कधी कुणाला मिळू दिली नाही; हेही त्यांनी आवर्जून नोंदले आहे.
वसंत बापट यांच्या एकूणच काव्यप्रवासात त्यांनी मराठी कवितेच्या मध्ययुगीन अवताराला विसाव्या शतकातील कवितेचा आवाज प्राप्त करून दिला. शाहिरी कवितेच्या बाबतीत शाहीर परसराम, प्रभाकर, होनाजी तसेच एकूण शाहीर परंपरेचा त्यांना आदर असल्याने एकूणच व्यक्त होण्यावरही मोठा प्रभाव दिसतो. ‘रसिया’ हा लावणीसंग्रह त्याची साक्षच आहे. त्यातील आठ गौळणी आणि उर्वरित 39 लावण्या या नर्म/उत्तान अशा शृंगाररसाने परिपूर्ण आहेत. परदेश प्रवासात डॉल्फिनने सुंदरीसोबत केलेली लीला पाहून जसे ते आधुनिक जलपरीची लावणी लिहून गेले, तसे लोकशाहीत नव्याने अस्तित्वात आलेल्या आमदार पतीचीही लावणी त्यांनी लिहिली. जाता जाता शेतकरी, कष्टकरी माणसाला धरून ‘लावणी जागर्तीची’देखील त्यांनी लिहिली. त्यांची ‘लावणी निरोपाची’ ही शाहीर प्रभाकरापासून चालत आलेली निरोपाची परंपरा वसंत बापट चालवत असताना दिसतात. अशी अन्वयाची परंपरा वसंत बापटांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या आधुनिक मराठी कवीने सांभाळली आहे असे आढळत नाही.
मराठी मातीचे व माणसाचे रांगडेपण, रगेल आणि रंगेलपण अशा सर्व बाबतीत वसंत बापट यांची कविता पुढाकार घेते. त्यांच्या आधीची भावसौंदर्यवादी परंपरेची कविता त्यांनी संपूर्ण आत्मसात तर केली होतीच पण तिला नवनवे आयाम त्यांनी आपल्या प्रेम आणि निसर्ग कवितांनी बहाल केले. ‘फुंकर’सारख्या कवितेची चर्चा गेली 60 वर्षे विद्यमान आहे. आशय-विषय मांडण्याची मोठीच लकब त्यांच्याकडे होती. मायकेलअँजेलो या जगप्रसिद्ध शिल्पकाराच्या कलासक्त वृत्तीचा परिचय त्यांनी आपल्या कवितेतून करवून दिला. भजने, आरत्या, कटाव, फटके यांच्या सोबतीने त्यांनी श्लोक, उपनिषद, संस्कृत वेचे यांच्या लकबी मराठी कवितेला आणून जोडल्या. हे त्यांचे कवितेतील मोठेच योगदान होय. कविता सादर करून त्यांनी आपल्या ओजस्वितेचा मराठी रसिकतेला प्रत्यय दिला. मराठी कविता, गीते ते ठासून सादर करत. त्यांच्या देशभक्तीपर, चळवळीच्या गाण्याविषयी एक असे विधान करता येण्यासारखे आहे. ते म्हणजे, एरवी बापटांनी ज्या कविता लिहिल्या त्या कदाचित कुणीही लिहिल्या असत्या पण ही चळवळीची आणि कला पथकाची गाणी फक्त बापटच लिहू शकणार होते. ज्यांनी त्यांचे प्रत्यक्ष कवितावाचन ऐकले/पाहिलेले नाही, त्यांना आता त्यांच्या काही उपलब्ध ध्वनीमुद्रिकांवरच समाधान मानावे लागेल.
जसा त्यांनी भाव-सौंदर्यवादी कवितेचा काळ बघितला तसेच त्यांच्या कवितेच्या उंचीच्या काळातच मर्ढेकर आणि एकूण नव्या साठोत्तरी पिढीच्या सुरु झालेल्या नवकवितेच्या काळाचेही ते साक्षीदार होते. चित्रे, कोलटकर, नेमाडे, डहाके अशी साठोत्तरी पिढी किंवा दलित साहित्य चळवळीच्या पहिल्या काळाचेही ते जवळून निरीक्षण करत होते. सामाजिक कवितेच्या त्यांच्या अनुषंगामुळे वसंत बापट कधी पिछाडीवर गेले नाहीत. उलट त्याच काळात त्यांनी मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या सोबतीने कवितेच्या कार्यक्रमाची धमाल उडवून दिली. कविता केवळ गायनस्वरुपात असताना त्यांनी समाजात तिचे वाचनरूप प्रस्थापित करून येणाऱ्या नव्या पिढीची मोठी सोय करून ठेवली असे म्हणायला जागा आहे. साठोत्तरी पिढीच्या कवींनी या कार्यक्रमांची टवाळीदेखील केली. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तर अशा कवितावाचनाच्या कार्यक्रमांतून मराठीत कवितांचे ‘बघे’ निर्माण झाल्याचे म्हटले. तसेच ‘भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा’ या कवितेतल्या मराठी प्रतीकांची भलावण हा संकुचितपणाचा भाग असल्याचेही तेव्हा चर्चिले गेले. त्याकडे त्यांनी कधीही फारसे गांभीर्याने बघितले नाही. आज त्याच मराठी प्रतीकांना आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात केवढा मोठा अर्थ प्राप्त झाला आहे हे आपण पाहत आहोतच. त्यांना त्यांच्या कवितेबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. तो इतका होता की, ‘नाजूक रुपडे’ या कवितेत आज भेटणाऱ्या सुंदरीचे त्यांनी अगदी शृंगारिक वर्णन केले आहे. त्यातच ते एक ओळ लिहून जातात.
‘सन अठराशेमधी पुण्याला भेट जर का असती घडली
धडगत नव्हती तुझी साजणी! हुकली गं s संधी हुकली!! ‘ (‘सेतू’ पृ.80)
ही ओळ पेशवेकाळ आणि त्यासंदर्भातील स्त्रियांबाबत घडणाऱ्या अपघटनांची साक्षीदार मानायची की कवीच्या अंतर्मनात असलेल्या पेशवेकालीन जीवनाची चाह म्हणून बघायची हा मोठा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहत नाही. यानिमित्ताने समाजवादी विचारधारा आणि पारंपरिक विचारसरणी यांचा मेळ कसा घालावा हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कवीचे व्यक्तित्व किती लवचिक असते याचे उदाहरण म्हणूनच बापट यांच्या एकूण काव्यप्रवासाकडे बघावे लागते.
शाहिरी कवितेच्या बाबतीत त्यांना अण्णाभाऊ साठे, अमर शेख, किंवा वामनदादा कर्डक असे एकसेएक समकालीन होते. वसंत बापट यांनी तिथेही आपली नाममुद्रा वेगळी राखली असे म्हणावे लागते. मात्र सेवादल आणि त्यातील कलापथकाच्या माध्यमातून सांस्कृतिक आघाडीवर वसंत बापट यांनी कायमच स्वातंत्र्य, समता, बंधुता या समाजवादी विचारांची जपवणूक करून उजव्या शक्तीला या प्रांतात येण्यापासून रोखून धरले असे म्हणता येऊ शकते. हे त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निवडक मनोगतांतून आणि पुस्तकांतून त्यांचा कवितालेखनाच्या भूमिकेमागचा दृष्टीकोनही शोधता येतो. त्यांच्या स्मृतिशताब्दीवर्षात त्यांच्या कवितेचा विचार यादृष्टीने केला जायला हवा.
संदर्भ -
बापट, व. (1952 ). बिजली. पुणे : साधना प्रकाशन .
बापट, व. (1993). रसिया. मुंबई : मौज प्रकाशन .
बापट, व. (1991). शिंग फुंकिले रणी. पुणे : साधना प्रकाशन .
बापट, व. (1988). शूर मर्दाचा पोवाडा. पुणे : साधना प्रकाशन .
बापट, व. (2004). सेतू. मुंबई : पॉप्युलर प्रकाशन.
- संतोष पद्माकर पवार, श्रीरामपूर
santoshpawar365@gmail.com
(कबुली, कविता मला भेटली, भ्रमिष्टाचा जाहीरनामा, पिढीपेस्तर प्यादेमात, बहादूर थापा आणि इतर कविता या कवितालेखनाकरता संतोष पवार मुख्यत्वे ओळखले जातात.)
(25 जुलै 1922 ते 17 सप्टेंबर 2002 असे 80 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष आज संपले, परवा (23 जुलै 2022) यानिमित्ताने साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांनी एका समारंभाचे आयोजन केले होते. त्यात केलेले हे भाषण आहे.)
Tags: मराठी साहित्य साहित्यिक कविता शाहिरी वसंत बापट जन्मशताब्दी Load More Tags
Add Comment