नागू

'बहादूर थापा आणि इतर कविता'मधील बाविसावी कविता

इ.स. 2000 नंतरच्या दोन दशकांतील मराठीतील आघाडीचे कवी म्हणून यादी करायची ठरली, तर त्यात संतोष पद्माकर पवार यांचे नाव घ्यावे लागते. थोड्याच पण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कविता लेखनासाठी संतोष ओळखला जातो. 1997 च्या अहमदनगर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, 'कविता मला भेटली' ही शैली विडंबन असलेली कविता सादर केल्यावर, हशा आणि टाळ्यांच्या गजरात वन्स मोअर मिळवणारा संतोष अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाला.

त्यानंतर 2001 मध्ये अभिधानंतर या नियतकालिकाने, मराठीतील सर्वोत्तम कविता निवडण्यासाठी एक स्पर्धा जाहीर केली, त्या स्पर्धेतून एकच कविता निवडली जाणार होती आणि तिला 25 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार होते. कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे त्या निवडसमितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी मराठी काव्यविश्वाला कुतूहल होते, तो भाग्यवान कवी कोण ठरेल? त्यावेळी संतोषच्या 'भ्रमिष्टाचा जाहीरनामा' या दीर्घ कवितेला ते पारितोषिक मिळाले. त्या दीर्घकवितेचे नंतर पुस्तकही आले. त्यानंतरच्या काळात महिलांचे जीवनचित्रण करणाऱ्या अनेक कविता लिहिल्या, त्यातील निवडक कवितांचा संग्रह 'पिढीपेस्तर प्यादेमात' या नावाने पॉप्युलर प्रकाशनाकडून आला.

आणि मग 2014 मध्ये अगदी अचानक एखादी खाण सापडावी तसे झाले, अवघ्या सहा महिन्यांत संतोषच्या डोक्यातून 25 कविता बाहेर आल्या, त्या साधना साप्ताहिकातून क्रमशः प्रसिद्ध झाल्या. त्यांना विविध स्तरांतील लहान-थोरांची तर दाद मिळालीच, पण अनिल अवचट बेहद्द खुश झाले. नंतर साधना प्रकाशनकडून तो कवितासंग्रह 'बहादूर थापा आणि इतर कविता' या नावाने आला. तेव्हा अनिल अवचट यांनी त्याला प्रस्तावना तर लिहिलीच, पण प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणूनही ते आले. 

या सर्व 25 कविता आता संतोषच्याच आवाजात रेकॉर्ड केल्या आहेत आणि अडीच तासांचे हे ऑडिओबुक आज 21 मार्च (जागतिक कविता दिवस) पासून Storytel वर उपलब्ध केले आहे. प्रत्येक कविता पाच ते सहा मिनिटांची आहे. प्रत्येक कविता एकेका माणसावर आहे. वस्तुतः अशी माणसे आपल्या प्रत्येकाच्या सभोवताली असतात, पण ही माणसे आपण बहुतेक सर्वजण बाहेरून पाहतो, संतोषने ही माणसे आतून पाहिली आहेत. म्हणून असे वाटते की, या कविता खूप मोठ्या श्रोता-समूहापर्यंत पोहोचाव्यात आणि प्रत्येकाला आपल्या सभोवतालची अशी माणसे आतून पाहण्याची इच्छा उत्पन्न व्हावी. कर्तव्यवरून क्रमश: एक दिवसाआड या प्रमाणात या 25 कविता ऑडिओ स्वरूपात प्रसिद्ध करण्याचे तेच प्रयोजन आहे!

अडीच तासांचे संपूर्ण ऑडिओबुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.

साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर हे पुस्तक छापील स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Tags: कविता स्टोरीटेल साधना प्रकाशन कवितासंग्रह बहादूर थापा ग्रामीण संतोष पवार कविता वाचन Load More Tags

Add Comment