ज्येष्ठ कवी, साहित्यिक ना. धों. महानोर यांचे 3 ऑगस्ट 2023 ला वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. 1967 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'रानातल्या कविता' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहापासूनच मराठी साहित्यात निसर्गकवी/रानकवी अशी त्यांची ओळख निश्चित झाली. निसर्गाशी अतूट नाते सांगणारी त्यांची कविता आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा वेध घेणारा हा लेख.
ना. धों. महानोर यांच्या माझ्या निवडक भेटी झाल्या. मी सातवीच्या वर्गाची वार्षिक परीक्षा दिली तेव्हा 1984 मध्ये पहिल्यांदाच ना. धों. महानोर यांची कविता मला प्रत्यक्ष ऐकता आली. तेव्हा कविता ऐकल्यानंतरचा आनंद अनेक दिवस टिकून राहिला होता. त्यावेळी केलेल्या भाषणात महानोरांनी स्वत:च्या कवितेच्या प्रवासाबाबत असे सांगितले होते की, दिल्लीवरून यशवंतराव चव्हाण जळगावी आले असता त्यांनी “जळगावचा एक कवी खूप चांगली कविता लिहितो.. मला त्याला भेटायचे आहे. तुम्ही त्याला शोधता का?” अशी विचारणा तिथल्या जिल्हाधिकाऱ्यापाशी केली. तेव्हा प्रशासनाने गावोगावच्या तलाठ्यांना शोध घेण्यास सांगितले, आणि जळगावात असणारे चार-दोन कवी चव्हाण साहेबांच्या भेटीकरता आणून उभे करण्यात आले. यशवंतराव त्या कवींशी त्यांच्या कवितांविषयी बोलले आणि त्यांना अपेक्षित असणारा कवी अखेर त्यांनी शोधला. तो कवी म्हणजे, नामदेव धोंडू महानोर! अगदी उमेदीच्या काळात महानोरांच्या ‘रानातल्या कविते’च्या जोंधळ्याला असे मान्यतेचे चांदणे लखडून गेले! अर्थात, त्यांचा पुढील प्रवासही सर्व प्रकारच्या राजमान्यता आणि लोकमान्यता यांनी भरलेला होता. या भेटीने ना. धों. महानोर हे नाव सर्वदूर पोचले. ते बीजवृत्तीचे कवी होते. त्यांच्या कवितेने नव्या पिढीतल्या अनेक कवींना नवे लिहिण्याचा आत्मविश्वास दिला.
अजिंठ्यातल्या अद्भुतरम्य लेण्यांच्या निर्मितीला काही शतके उलटल्यानंतर तिथल्याच मातीत असा एक लोककवी जन्माला यावा ही एक अपूर्व घटना होय. महानोर हे त्या मातीचा आवाज उजागर करणारे लोककवी होते. पळसखेडचा त्यांचा पत्ता ‘व्हाया अजिंठा’ असा कायमस्वरूपी राहिला. अजिंठा लेणी परिसरात बोलल्या जाणाऱ्या, तिथल्या खेडूतांच्या काव्यमय मराठीचा त्यांनी मुख्यधारेशी परिचय करून दिला. ‘रानातल्या कविता’(1967), ‘वही’(1970), ‘अजिंठा’ (1984) त्यानंतर ‘पावसाळी कविता’, ‘पानझड’, ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’ असे त्यांचे कवितासंग्रह आले. यातील ‘पानझड’ या गीतमयी कवितासंग्रहाला 2000 मध्ये ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार दिला गेला. ‘पळसखेडची गाणी’ किंवा ‘पक्षांचे लक्ष थवे’ ही स्थानिक लोकगीतांवर आधारित पुस्तकेही प्रकाशित झाली. त्यांनी केलेले गद्यलेखनदेखील तितकेच महत्त्वाचे होते, तेही गाजले. कविता, शेती, कविसंमेलने आणि सतत फिरती असे चौफेर सातत्याने कार्यरत राहून आपली शेतीमाती-रानाची बोली आपल्या शब्दांत जिवंत ठेवणारे ते मराठीचे दुसरे ‘नामदेव’ होते असे म्हटले तर वावगे ठरू नये.
‘गांधारी’ या कादंबरीतून दिसणारे खेडे किंवा ‘गावातल्या गोष्टी’मधून येणारे खेडे बघताना दुःख वाटते. विधायक बाबींना विरोध दर्शवणारे असे ते खेडे असल्याचे महानोर यांनी प्रकर्षाने मांडले. त्या जगण्याच्या प्रत्यक्ष झळा त्यांना बसल्या होत्या. महानोर यांना, त्यांच्या शेतीतल्या प्रयोगांना गावी कायम विरोध झाला. त्या संघर्षात ते भरडून निघाले. महानोर यांच्या कवितेत येणारा निसर्ग हा त्यांच्या शेतीतील आणि गावातील होता. त्याच्याशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती. मराठीतल्या इतर कवींच्या कवितेतील निसर्ग आणि स्वतःच्या कवितेतील निसर्ग यांची तुलना करताना त्यांनी असे म्हटल्याचे स्मरते की, ‘इतर कवींच्या कवितेतील निसर्ग म्हणजे प्रवासात दिसणारे सरकारी झाडी किंवा डोंगर.. पुन्हा दुसरी चक्कर टाकताना ती झाडी हिरवीगार राहिली काय किंवा जळून गेली काय याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. माझ्या कवितेतील झाडी मात्र, माझ्या शेतातील झाडी आणि हिरवाई यांचा माझ्या जीवनातील समृद्धीशी वा गरिबीशी असणारा संबंध दाखवणारी आहे. म्हणून मी त्याबाबत जास्त संवेदनशील आहे’. हा त्यांचा कळवळा ‘गुंतलेले प्राण ह्या रानात माझे’ या काव्यपंक्तीत प्रकर्षाने जाणवतो. महानोर असे मातीचा लळा लागलेले कवी होते. महानोरांची भ्रष्ट नक्कल करणारे अनेक कवी महाराष्ट्रात आले, पण त्यांना कुणालाही स्वतंत्र अशी नाममुद्रा उमटवता आली नाही.
‘येल्हाळ’, ‘लागीर’, ‘बाजिंदी’, ‘माल्हन’, ‘बिल्लोरी’, ‘खुळी पानजाळी’, ‘राजबन्शी पाखरू’, ‘केळ कमळण’, ‘वही’, ‘झाकड’, ‘गंधगर्भ’, ‘तिपीतिपी ऊन’, ‘काच बिंदोली’, ‘कथाई’, ‘चावळ’, ‘हिंदळ’, ‘पुनव उजट’, ‘लाखले’, ‘झिम्मड’, ‘सन्नाट’, ‘सैराट’, ‘मदालस डोळे’, ‘रिणाई’ यांसह तिथे बोलल्या जाणाऱ्या अनेक शब्दांना कवितेत आणून त्यांनी ते सर्वतोमुखी केले. दीर्घकवितेचा पैलू त्यांनी आपल्या परिसरात घडलेली ‘पारो-रॉबर्ट’ची कहाणी सांगून जगासमोर मांडला.
महानोरांचे गीतलेखन
महानोरांचे गीतलेखन हे स्वतंत्र कधीच नव्हते. त्यांच्या कविताच आपोआप गीते बनल्या. त्या अर्थाने सर्व स्तरांवर त्यांनी कवितालेखन केले. अत्यंत गाजलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटातली गाणी खऱ्या अर्थाने कविताच होत्या. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘मी रात टाकली’, ‘कोण्या राजानं राजानं’, ‘डोंगरकाठाडी ठाकरवाडी’, ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला’, ‘नभ उतरू आलं’, ‘वाडीवरल्या वाटा गेल्या’, ‘पीक करपलं’ या निमित्ताने लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी तयार झालेले त्यांचे नाते आजन्म चांगले नाते राहिले. पुढे ‘सर्जा’, ‘दोघी’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’ आणि इतर चित्रपटांतूनही आलेली गाणी प्रचंड गाजली. ‘एक होता विदूषक’ हा राष्ट्रीय पारितोषिकप्राप्त चित्रपट ठरला. त्यांची इतरही गाणी ‘अवेळीच केव्हा दाटला अंधार’, ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ’, ‘आज उदास उदास दूर’, ‘किती जिवाला राखायाचं’, ‘कुठं तुमी गेला व्हता’,
स्व-संशोधित सीताफळाला महानोर ‘लता’फळ म्हणत असत.
‘कोण्या राजानं राजानं’, ‘गडद जांभळं भरलं आभाळ’, ‘गाव कोसाला पाणतळ्याला’, ‘घन ओथंबून येती’, ‘चांद केवड्याची रात’, ‘चिंब पावसानं रान झालं’, ‘जाळीमंदी झोंबतोया गारवा’, ‘तुम्ही जाऊ नका हो रामा’, ‘त्या माझिया देशातले’, ‘दूरच्या रानात केळीच्या’, ‘पक्ष्यांचे लक्ष थवे’, ‘पूरबी सूर्य उदैला जी’, ‘बाळगू कशाला व्यर्थ कुणाची’, ‘भर तारुण्याचा मळा’, ‘भरलं आभाळ पावसाळी’, ‘भुई भेगाळली खोल’, ‘मन चिंब पावसाळी’, ‘मी काट्यातून चालून’, ‘मी गाताना गीत तुला’, ‘मी रात टाकली’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘लाल पैठणी रंग माझ्या’, ‘वळणवाटातल्या झाडीत’, ‘शब्दांचा हा खेळ मांडला’, ‘सुटलेला अंबाडा बांधू दे’, ‘सूर्यनारायणा नितनेमाने उगवा’ अशी मोजकीच पण एकसे एक गाणी त्यांनी मराठीला दिली. मात्र ही गीते ज्या चित्रपटांमध्ये होती त्या चित्रपटांची कथायोजना इतरांची होती. जब्बार पटेल यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी कथा आणि गीतांची ही जोडणी करून दिली होती. ते कायमच महानोर यांचे एक क्रियाशील श्रोते राहिले.
महानोरांची शेती आणि राजकीय-सामाजिक कार्य
महानोरांच्या कवितेत येणारे शेत हेच त्यांच्या सर्व कार्याची प्रेरणा होती. तिथे त्यांनी विविध पिके घेणे, ठिबक सिंचन करणे, लिफ्टइरिगेशन, वनसंगोपन असे सर्व उपक्रम एकाचवेळी राबविले. यशवंतराव चव्हाण ते शरद पवार असा त्यांचा राजकीय-वैचारिक मैत्रीचा प्रवास महाराष्ट्राने पाहिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यात ते कायम सहभागी असत. भू-जलस्तर वाढण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ कार्यक्रम गावात राबवताना गावातील सर्वजण त्यात सहभागी होतील अशी आशा त्यांनी बाळगली. शेतकरी दिंडीत त्यांनी प्रबोधनपर गाणी लिहिली आणि म्हटली. शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे आणि एकूणच शाहिरी कविता यांचा जागर त्यांनी त्या दिंडीत घातला. या सर्व सामाजिक-राजकीय कामांना काहीसे अपयश येताच ते उद्विग्न झाले. शेताची नासधूस करणे, धमकीची पत्रे येणे अशा प्रकारचे त्यांना त्रास देण्याचे हरेक प्रकार गावात केले गेले. पण महानोर डगमगले नाहीत. विधानपरिषदेवर आमदार म्हणून कार्य करताना त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखविली. त्यातूनच महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन आणि जलसिंचन धोरण निश्चित झाले. ठिबक सिंचन योजनेत त्यांचा मोठा वाटा होता. ‘जैन पाईप’सारखे उद्योजक त्यातून पुढे आले.
महानोरांच्या कवितेबद्दल मात्र एक असेही निरीक्षण नोंदविता येईल की, त्यांची कविता समजावून सांगण्यासाठी जो वर्ग पुढे आला त्याचा शेती-मातीशी फारसा संबंध नसावा. महानोरांच्या कवितेला त्यांनी एका रोमँटिक दृष्टीने कायम प्रक्षेपित केले. रामदास भटकळ आणि वा.ल. कुळकर्णी यांचा अपवाद वगळता इतरांचा महानोर यांच्या कवितेकडे बघण्याचा दृष्टीकोन संपूर्ण शहरी होता. दूरदर्शनवरील एक मुलाखत यासंदर्भात पाहण्याजोगी आहे. त्या मुलाखतीतले ‘तज्ज्ञ’ महानोरांची कविता त्यांच्याकडून समजावून घेण्याऐवजी, त्यांना अवगत असलेला शृंगाराचा अर्थच महानोरांना सांगत असल्याचे दिसते आहे. महानोर यांच्या साध्यासुध्या शब्दांतील कवितेला हे ‘रसिक’ अगदी भलत्याच बाजूला नेताना दिसत आहेत.
महानोरांची कविता उलगडून दाखवण्याची जबाबदारी ग्रामीण साहित्य चळवळीनेच पार पाडायला हवी होती. ते न करता चळवळीनेच त्यांना ‘शहरी लोकांची करमणूक करणारा कवी’ ठरवले. महानोरांची वस्तुनिष्ठ समीक्षा होण्यात दरवेळी अडचण आली. जे काही मोजके प्रयत्न झाले, त्यामागे महानोर यांच्याकडून काही प्राप्त करून घेण्याची अभिलाषाच अधिक दिसत होती. शिवाय 2000 नंतर गडद झालेल्या राजकीय अभिनिवेशात रंगलेल्या लोकांच्या लिहिण्याला काही अर्थ नव्हता. महानोर त्यांच्या पूर्वसुरींच्या पुढे किती गेले आणि त्यांनी कोणती नवी भर टाकली याबाबतचा निर्णय अद्याप बाकी असला तरी ‘निसर्गकवी’, ‘रानकवी’ अशी त्यांची ओळख जनसामान्यांच्या मुखी जाऊन बसली, हेच त्यांच्या जीवनाचे ‘कवी’ म्हणून साफल्य आहे असे म्हणता येईल.
रानात रमलेले महानोर
आपल्या शेतातील स्व-संशोधित सीताफळाला ते ‘लता’फळ म्हणून संबोधत असत. मंगेशकर कुटुंबियांविषयी त्यांनी दाखविलेली ही कृतज्ञताच होती. त्यांनी उत्तम प्रयोगशील शेती केली, अनेक नव्या लिहित्या हातांना प्रोत्साहित केले. माझा ‘पिढीपेस्तर प्यादेमात’ हा कवितासंग्रह मुंबईच्या सुप्रसिद्ध ‘पॉप्युलर प्रकाशना’ने काढावा याची शिफारस करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांनी अनेकांना कवितेत असा हात दिला. काही लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला तर काही लोक त्यांना विनाकारण शत्रू मानत राहिले. हे सर्व उणे-अधिक महानोरदादा आपल्या उरात साठवत राहिले. त्यांचे जगणे त्यांच्या रानातल्या कवितेच्या झाडासारखे कनवाळू होते. आपल्या डौलात जगणे त्यांनी पसंत केले. आता आपल्यापाशी केवळ त्यांच्या आठवणी शिल्लक आहेत. पावसाळी कविता लिहिलेले महानोर निसर्गाने हिरवी चादर पांघरलेली असल्याच्या काळातच हे जग सोडून गेले! त्यांच्या डोळ्यांत अखेरच्या क्षणी देखील हिरवाई असावी अशी काळजी जणू निसर्गाने घेतली, या भावनेने मन गलबलून येते. मराठी मातीत एक निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांचे नाव कायमस्वरूपी कोरले गेले आहे. त्यांच्याबाबत कवितेचाच आधार घेत म्हणावेसे वाटते...
‘कुण्या देशीच्या प्रवासाला पंख हे उडून जाती
रमल्या आठवणी जिथे ती हळहळते केवळ माती’
- संतोष पद्माकर पवार, श्रीरामपूर
santoshpawar365@gmail.com
(कबुली, कविता मला भेटली, भ्रमिष्टाचा जाहीरनामा, पिढीपेस्तर प्यादेमात, बहादूर थापा आणि इतर कविता या कवितालेखनाकरता संतोष पवार मुख्यत्वे ओळखले जातात.)
Tags: मराठी साहित्यिक स्मृतीलेख ना. धो. महानोर कविता संतोष पवार marathi poetry literature santosh padmakar pawar Load More Tags
Add Comment