दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने साठ लाख ज्यूंची अगदी पद्धतशीर कत्तल केली गेली त्या 'होलोकॉस्ट' या योजनेविषयी असंख्य साहित्यकृती, चित्रकृती, चित्रपट निर्माण केले गेले. रोमन पोलन्स्कीचा 'द पियानिस्ट' हा चित्रपट त्यातली एक महत्त्वाची कलाकृती आहे. पियानिस्टचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ युद्धाविषयी तिरस्कार आणि बळी गेलेल्यांविषयी सवंग आणि सोपी सहानुभूती निर्माण करण्यात रमत नाही तर तटस्थपणे युद्धात मानवतेची जी परवड होते त्याचे चित्रण करतो.
युद्धाचे ढग जेव्हा आकाशात जमा होतात तेव्हा केवळ युद्धात गुंतलेले सैनिकच नव्हे तर सर्वसामान्य माणसांचे जगणे देखील होरपळून निघते. सध्या चालू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्या पाहताना आणि विदारक दृश्ये बघताना मोठी माणसे, मुले, स्त्रिया यांच्यासह सगळ्याच सामान्य माणसांचे हाल बघवत नाहीत. अशा वेळी कलावंताचे मन तर अधिकच विद्ध होणे साहजिक आहे. जगाच्या इतिहासात दोन महायुद्धांनी मानवजातीला जितके घायाळ केले तितके दुसऱ्या कशाने केले नसेल. आणि युरोप ही तर कलावंतांची राजधानी. दोन महायुद्धात मुख्यत: होरपळून निघाला तो युरोप. साहजिकच कलासक्त युरोपने चित्रकला, संगीत, चित्रपट, साहित्य अशा अनेक कलांच्या माध्यमातून युद्ध आणि युद्धखोरी यांचा यथेच्छ निषेध केला, संताप व्यक्त केला आणि अश्रू देखील ढाळले. प्रत्येक कला माध्यमातून. पिकासोने ‘ग्वेर्निका’सारखे अजरामर चित्र केले तर स्टीव्हन स्पीलबर्गने ‘शिंडलर्स लीस्ट’ सारखा अप्रतिम सिनेमा केला. चित्रपटाचा विचार करायचा तर मनात अशा विषयावरचे खूप खूप अप्रतिम चित्रपट गर्दी करतात आणि सगळेच चित्रपट 'मला घे आता, माझी ओळख करुन दे ना' असा लकडा लावत असतात.
दर वेळी मनात काहीएक भावना जोर धरते आणि एखादा चित्रपट निवडला जातो. आता सध्याच्या या युद्धजन्य वातावरणात मी 'पियानिस्ट' हा चित्रपट ओळख करून द्यायला निवडला असला तरी नेमके आत्ताच मनात गर्दी करत असलेले पॅटन (Patton), सेव्हिंग प्रायव्हेट रायन वगैरे अनेक चित्रपट नाइलाजाने मागे ठेवावे लागत आहेत. पियानिस्टच का निवडला यामागे अनेक कारणे आहेत. चित्रपट अतिशय सुंदर तर आहेच, शिवाय त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार (3 ऑस्करसह) मिळालेले आहेत, जगभरातील रसिक आणि जाणकारांनी डोक्यावर घेतलेला आहे हे सारे तर आहेच. पण मनात एक वेगळेच कारण देखील आहे. या निमित्ताने रोमन पोलन्स्की या जबरदस्त दिग्दर्शकाविषयी लिहायला मिळावे हा एक महत्त्वाचा हेतू आहे. अत्यंत वादग्रस्त आयुष्य जगलेला हा पोलिश फ्रेंच दिग्दर्शक. अगदी अलिकडेच (2011) आलेला त्याचा 'द कार्नेज' हा एक अफलातून चित्रपट तुम्हाला आठवत असेल. (आणि त्यातला केट विन्स्लेट, जुडी फोस्टर आणि ख्रिस्तोफ वॉल्ट्झचा अफलातून अभिनय) 18 ऑगस्ट 1933 ला जन्मलेल्या पोलन्स्कीने ‘द नाइफ इन द वॉटर’ या पहिल्याच चित्रपटासाठी ऑस्कर नॉमिनेशन मिळवले, पण फेलिनी या महान इटालियन दिग्दर्शकाच्या 'एट अँड हाफ' या चित्रपटाला ऑस्कर मिळाले. पुढे अर्थातच पोलन्स्कीला अनेक वेळा ऑस्कर नामांकन आणि 'द पियानिस्ट' साठी दिग्दर्शनाचे ऑस्कर मिळाले. रोजमेरीज बेबी, कार्नेज, मॅकबेथ, चायनाटाउन, नाइफ इन द वॉटर, पियानिस्ट, घोस्ट रायटर असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट त्याच्या नावावर आहेत.
(द पियानिस्ट - बिहाईड द सिन्स)
चरित्रपट किंवा ज्याला इंग्रजीत ‘बायोपिक’ म्हणतात त्या प्रकारचे चित्रपट हे एक अवघड काम असते. मोठेच आव्हान असते. बँडिट क्वीन (शेखर कपूर) आणि गांधी (रिचर्ड ॲटेंबरो) ही त्याची दोन लखलखीत उदाहरणे. (फसलेली अनेक उदाहरणे सांगायची देखील गरज नाही, आपण सगळे ती बघत आलो आहोत.) पियानिस्ट हा व्लॅडिस्लॉ स्पिलमन (Wladyslaw Szpilman) या पोलिश संगीतकाराच्या जीवनावर आधारित चित्रपट त्यानेच लिहिलेल्या 'पियानिस्ट' या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर आधारित आहे. रोनाल्ड हार्वुड या लेखकाने या पुस्तकावर आधारित अतिशय बांधेसूद आणि घट्ट विणीची पटकथा लिहिली आणि हार्वुडला त्याबद्दल ऑस्कर मिळाले.
चित्रपटात मुख्यत: चित्रित केलाय तो 1939 ते 1947 हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ. 1939 साली जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले तिथे चित्रपटाची सुरवात होते. स्पिलमन रेडिओवर पियानो वादनाचा कार्यक्रम सादर करत असतानाच जर्मन विमाने बेछूट बॉम्बस्फोट वर्षाव करतात आणि रेडिओ स्टेशन उध्वस्त होते. स्पिलमन कसाबसा तिथून निसटतो आणि तिथूनच चित्रपट सुरू होतो. त्यानंतरची सहा वर्षे हा श्रेष्ठ कलावंत कधी निव्वळ नशीबाने, कधी अनपेक्षितपणे दिसलेल्या माणुसकीने तर कधी आपल्या कलेमुळे कसा जिवंत राहतो त्याची ही अद्भुत कहाणी आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण आणि अर्थातच संगीत अशा सर्व अंगांनी आयुष्यातला एक अद्वितीय अनुभव देणारा हा चित्रपट आहे. अगदी पाहायलाच हवा या कॅटेगरीतला. युद्धाची भयावहता मनावर बिंबवतानाच माणुसकीचे अद्भुत दर्शन घडवतो हा चित्रपट.
(व्लॅडिस्लॉ स्पिलमन यांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ)
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने साठ लाख ज्यूंची अगदी पद्धतशीर कत्तल केली गेली त्या 'होलोकॉस्ट' या योजनेविषयी असंख्य साहित्यकृती, चित्रकृती, चित्रपट निर्माण केले गेले. रोमन पोलन्स्कीचा 'द पियानिस्ट' हा चित्रपट त्यातली एक महत्त्वाची कलाकृती आहे. पियानिस्टचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ युद्धाविषयी तिरस्कार आणि बळी गेलेल्यांविषयी सवंग आणि सोपी सहानुभूती निर्माण करण्यात रमत नाही तर तटस्थपणे युद्धात मानवतेची जी परवड होते त्याचे चित्रण करतो. खरे तर यापूर्वीच 'शिंडलर्स लिस्ट' या याच विषयावरच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करायची संधी पोलन्स्कीला आली होती, पण ती त्याने नाकारली. (मग तो चित्रपट स्टीव्हन स्पिलबर्गने दिग्दर्शित केला आणि तोही अतिशय यशस्वी ठरला हा सर्वज्ञात इतिहास आहे.) स्वतः पोलन्स्की अशाच ज्यूंच्या बंदिवान वसाहतीतून (घेटो) आईच्या मृत्यूनंतर पळून आलेला होता. त्यामुळे स्वतः पोलन्स्की या विदारक अनुभवातून गेला असल्याने कधी ना कधी तो या विषयावर चित्रपट बनवणे अपरिहार्यच होते. केवळ जिवंत राहणे हेच मोठे आव्हान ठरते तेव्हा माणुसकीच पणाला लागते याचे विदारक दर्शन हा चित्रपट घडवतो.
नाझी जर्मनीचे आक्रमण झाल्यावर पोलंडमधल्या नागरिकांचे जे हाल झाले ते चित्रपटाच्या सुरवातीलाच अतिशय भीषण स्वरूपात दाखवले आहेत. दिवसा- रात्री कधीही जर्मन अधिकारी घरात घुसतात आणि थोडा जरी संशय आला तरी थेट यमसदनाला पाठवतात ती दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. (सध्याच्या युक्रेन युद्धाची ‘बुचा’ मधली दृश्ये त्याचीच आठवण करून देतात.) पियानोवादक स्पिलमनचे कुटुंब देखील या अत्याचारातून भरडले जातेच. जर्मन अधिकारी असे काही अत्याचार करतात की, त्या ज्यूंचे हाल बघवत नाहीत. अशाच एका प्रसंगात छोड्याशा वाडग्यात काहीतरी खायला घरी नेणाऱ्या एका म्हातारीच्या हातातला तो वाडगा एक भिकारी हिसकावून घेतो आणि त्या गोंधळात सगळे सूप रस्त्यावर सांडते. तेव्हा तो भिकारी रस्त्यात आडवा पडून ते सगळे चाटत खातो आणि ती म्हातारी नुसतीच त्याला क्षीण हाताने बडवत राहते, ते दृष्य तर अंगावर काटा आणणारे आहे.
हेही वाचा : शिंडलर्स लिस्ट - नीलांबरी जोशी
स्पिलमनच्या संदर्भात आणि त्याच्याच नजरेने आपण हे सारे बघतो. इथे एक गोष्ट उल्लेखनीय आहे. काही जर्मन वाईट काही चांगले, काही ज्यू चांगले तर काही वाईट अशी वास्तववादी भूमिका पोलन्स्कीने घेतली आहे. त्यामुळे माणसाचे माणुसपण अधोरेखित होते. एकीकडे नाझी जर्मन अधिकारी ज्यूंवर अनन्वित अत्याचार करत असतानाच काही जर्मन ज्यूंचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात तर आपल्या बांधवांवर इतके अत्याचार होत असताना काही ज्यू त्यातही आपला फायदा बघतात. आधी शहरातल्या सर्व ज्यूंना ओळख म्हणून हाताच्या बाहीवर कापडी निशाणी बांधायला लावली जाते, मग खास ज्यूंसाठी निर्माण केलेल्या वसाहतीत (म्हणजेच घेटो) त्यांना जबरदस्तीने हलवले जाते आणि जर्मन वस्ती आणि हे घेटो यात भिंत उभारली जाते. एका रात्री तर स्पिलमनच्या समोरच्याच इमारतीत जर्मन अधिकारी घुसतात आणि एका कुटुंबाला निर्घृणपणे मारून टाकतात. घरातले दिवे बंद करून खिडकीतून हे पाहताना हादरलेले स्पिलमनचे कुटुंब ही वेळ कधीही आपल्यावर येऊ शकते हे जाणतेच.
अचानक गावातल्या बहुतेक ज्यूंना ट्रेनमध्ये बसवून अज्ञात ठिकाणी रवाना केले जाते. अर्थात तो बिनपरतीचा (म्हणजे कत्तलखान्याकडे जाणाराच) रस्ता असतो. पण ऐनवेळी पोलीसात असलेल्या एका ज्यू मित्रामुळे स्पिलमन तेवढा वाचतो आणि गावातच गुलाम मजुर म्हणून ठेवला जातो. तिथे त्याला हे ज्यू गुलाम क्रांतीच्या तयारीत असल्याचे समजते आणि काही शस्त्रास्त्रे चोरून आणण्यात तोही सहभागी होतो. एकदा तर या प्रकारात तो अगदी नशीबाने वाचतो. संधी मिळताच तो एका जर्मन मित्राच्या मदतीने तिथून निसटतो आणि गुप्त ठिकाणी राहायला जातो. हा जर्मन मित्र आणि त्याची पत्नी जेनिना अगदी मोठ्या मनाने जीवावर उदार होऊन त्याला मदत करतात, पण तिथेही जर्मन अधिकाऱ्यांचा बॉम्बहल्ला होतो. स्पिलमनला पुन्हा आपले लपण्याचे ठिकाण बदलावे लागते. या सर्व काळात कोणत्याही क्षणी स्पिलमन पकडला जाईल ही धास्ती असतेच. स्पिलमनबरोबरच आपणही जीव मुठीत धरुन चित्रपट बघत असतो. आणि नंतर जर्मन बॉम्बहल्यात बेचिराख झालेले शहर आणि त्यात भुकेने पिसा झालेला स्पिलमन अन्नाच्या शोधात हिंडत शेवटी एका पडक्या इमारतीत अक्षरश: उंदरासारखा लपत जगतो. आणि तिथे असलेल्या एका जुन्या पियानोमुळेच त्याचे प्राण वाचतात. होसेनफिल्ड नावाचा एक कलाप्रिय जर्मन अधिकारी अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवतो आणि हा चमत्कार घडतो. ते सारे पडद्यावरच बघायला हवे.
पुढे स्वतंत्र राष्ट्रात स्पिलमनने श्रेष्ठ पियानोवादक म्हणून नाव मिळवले आणि 88 वर्षांचे यशस्वी दीर्घायुष्य मिळवून 2000 सालापर्यंत तो आनंदाने जगला. देवदूत बनून आलेला होसेनफिल्ड मात्र रशियन युद्धकैदी म्हणून 1952 सालीच तुरुंगात मेला. स्पिलमनचा हा चित्तथरारक प्रवास अँड्रियन ब्रूडी या अभिनेत्याने जिवंत केला आहे आणि त्याबद्दल त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला हे योग्यच झाले. मनस्वी कलावंत ते जगण्यासाठी लाचार झालेला दयनीय माणूस हा प्रवास त्याने विलक्षण प्रत्ययकारी केला आहे. विलक्षण बोलका चेहरा अणि कमालीचा प्रभावी शारीर अभिनय यामुळे ब्रूडीने उभा केलेला स्पिलमन बघणे हा उच्च प्रतीचा आनंद आहे. विशेषत: उत्तरार्धात भुकेने पिसाट झालेला आणि शारीर वेदनांनी पिळवटलेला स्पिलमन त्या उध्वस्त घरात ज्या तऱ्हेने खुरडत खुरडत चालतो त्यावेळचा ब्रूडीचा शारीर अभिनय अप्रतिम आहे. पियानो वाजवताना संगीतात पूर्णपणे बुडून गेलेला ब्रूडीचा चेहरा त्याचे मनस्वी कलावंतपण अधोरेखित करतो. एकूणातच ब्रूडीने उभा केलेला स्पिलमन ऑस्कर न मिळवता तरच नवल. लक्षात घ्या, त्या वर्षी या पुरस्कारासाठी ब्रूडीची स्पर्धा निकोलस केज, जॅक निकोल्सन आणि मायकेल केनशी होती.
(अँड्रियन ब्रूडी याची द पियानिस्ट या सिनेमाला केंद्रस्थानी ठेवून घेतलेली मुलाखत)
संगीत हा अर्थातच चित्रपटाचा प्राण आहे. चॉपिन, बीथोवीनच्या उत्कृष्ट संगीतरचनांचा चपखल वापर करून संगीतकार वॉशिएख किलरने फार सुंदर परिणाम साधला आहे. (त्या त्या प्रसंगात पियानोवादनाचा अभिनय जिवंत वाटावा म्हणून ब्रूडीने कित्येक महिने सराव केला होता!) आणि पॉवेल एडलमनचे छायाचित्रण हे तर चित्रपटाचे मोठेच बलस्थान आहे. त्यासाठी एडलमनला ऑस्कर नामांकन मिळाले होते. विशेषतः बॉम्बवर्षावानंतरचे करड्या रंगातले उध्वस्त शहर एडलमनने डोळ्यासमोर जिवंत केले आहे.
‘पियानिस्ट’चे वेगळेपण म्हणजे मध्यवर्ती व्यक्तिरेखा पियानोवादक स्पिलमन हा रूढार्थाने हीरो नाही. बहुतेक वेळा नशीब आणि इतरांच्या माणुसकीने तो जिवंत राहतो. परिस्थितीच माणसातले चांगले आणि वाईटपण ठरवते याचे दर्शन आपल्याला घडत राहते. पोलन्स्कीच्या दिग्दर्शनाचे वेगळेपण असे की, तो युद्ध काय किंवा आयुष्य काय, आहे तसे आपल्यासमोर ठेवतो. त्यातल्या अनपेक्षित वळणांसकट. त्यामुळे अतिशय नाट्यमय प्रसंगात संगीत किंवा क्लोजअप वगैरेचे सहाय्य न घेता तो नाट्यमय प्रसंग थेट आपल्यासमोर येतो. उदाहरणार्थ, सुरवातीला जर्मन अधिकारी स्पिलमनच्या घरासमोरच्या इमारतीत घुसून एका कुटुंबाला मारतात तो प्रसंग. हा सगळा शॉट स्पिलमन आणि त्याचे कुटुंबीय त्यांच्या खिडकीतून पाहात असल्याने लाँग शॉटमध्ये घेतला आहे. जर्मन अधिकारी त्या कुटुंबातल्या सर्वांना उभे राहायची आज्ञा करताच सगळे उभे राहतात पण एक म्हातारा व्हीलचेअरमध्ये असल्याने तो उठणे शक्य नाही. तर दोन जर्मन अधिकारी सरळ त्याला उचलतात आणि बाल्कनीतून खाली फेकून देतात. उंचावरून खाली रस्त्यावर कोसळलेला तो म्हातारा फुटपाथवर डोके आदळून गतप्राण होतो. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग पोलन्स्की उत्कट संगीत, क्लोजअप वगैरे न दाखवता क्रूर तटस्थपणे चित्रित करतो. युद्ध आणि त्याचे परिणाम तो आपल्यासमोर असे क्रूर तटस्थतेने मांडत जातो. आपण अधिकाधिक बधिर होत जातो. भावुक किंवा उत्तेजित होण्याच्या पलिकडची ही भावना आहे.
चित्रपटजगतात फ्रान्समधील कान फिल्म फेस्टिव्हल अतिशय महत्त्वाचा समजला जातो आणि दरवर्षी कान चित्रपट महोत्सवात दिले जाणारे 'गोल्डन पाम' (पाम डॉर) हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दिला जाणारा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो. 2002 सालचा हा पुरस्कार ‘द पियानिस्ट’साठी रोमन पोलन्स्कीला मिळाला! हा आणि त्या वर्षीचे असे अनेक मानाचे पुरस्कार मिळवणारा हा चित्रपट अगदी आवर्जून पाहायला हवा.
भाषा: इंग्लिश, जर्मन, पोलिश, रशियन (सबटायटल्स उपलब्ध)
लेखक: मूळ आत्मचरित्र : व्लाडेस्लॉ स्पिलमन
पटकथा : रोनाल्ड हावूड
दिग्दर्शक: रोमन पोलन्स्की
संगीत: वोशिएख किलर
छायाचित्रण : पॉवेल एडलमन
कलावंत : अॅड्रियन ब्रूडी, एमिला फॉक्स
- संजय भास्कर जोशी, पुणे
sanjaybhaskarj@gmail.com
(लेखकाने कथा, कादंबरी असे साहित्यप्रकार हाताळले असून अनेक प्रथितयश कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. लेखन आणि साहित्यप्रेमापोटी तिथून ऐन चाळीशीत निवृत्ती घेऊन सध्या ते 'पुस्तक पेठ' या स्वतःच्या पुस्तकविक्रीच्या दुकानाचे काम पाहतात.)
युद्धपट लेखमालेतील सर्व लेख वाचा या लिंकवर..
'द पियानिस्ट' हा सिनेमा पाहण्यासाठी :
Tags: युद्ध चित्रपट लेखमाला सिनेमा जागतिक सिनेमे युद्धावरील सिनेमे हॉलोकॉस्ट हिटलर नाझी जर्मनी ज्यू हॉलोकॉस्टवरील सिनेमे Load More Tags
Add Comment