पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ चा. आज त्यांच्या १२५व्या जयंती वर्षाची सांगता होत आहे. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असताना, साधनाने ‘जीवनगाथा साने गुरुजींची’ हे राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेले समग्र चरित्र सुधारित आवृत्तीच्या रूपात काढले.
साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम होते; पण, कवी, लेखक, अनुवादक, संपादक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशी त्यांची सप्तरंगी ओळख अधिक गडद आहे. त्यांनी लिहिलेली लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके आजच्या समाजमनाचाही ठाव घेणारी आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तित्वाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे वापरता येतील, पण त्यांच्या केवळ साहित्याचा विचार करता ‘मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’ हे संबोधन अधिक योग्य ठरेल.
अशा या गुरुजींची चरित्रे अनेक लहान-थोरांनी लिहिलेली आहेत, मात्र त्यांचे समग्र म्हणावे असे हे एकमेव चरित्र आहे. त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले राजा मंगळवेढेकर यांनी हे लिहिले आहे. कुमार व युवा अवस्थेत त्यांना गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यानंतरचे अर्धशतक त्यांनी गुरुजींचेच विचार-कार्य पुढे चालू ठेवले. राष्ट्रसेवादल, साने गुरुजी कथामाला, आंतरभारती इत्यादी सांस्कृतिक कार्य करणार्या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. गुरुजींच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका समजून घेण्यासाठी फक्त एकच पुस्तक वाचायचे असेल तर ते कोणते, या प्रश्नाचे उत्तर “साने गुरुजींची जीवनगाथा” हेच आहे.
योगायोग असा की नुकतेच ११ डिसेंबर २०२४ ला राजा मंगळवेढेकर यांचेही जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाले. साने गुरुजींचे १२५ वे जयंती वर्ष आणि राजा मंगळवेढेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष यांचे संयुक्त औचित्य साधून साधनाने ‘जीवनगाथा साने गुरुजींची’ आता ऑडिओबुक स्वरूपात स्टोरीटेलवर प्रसिद्ध केले आहे. हे ३३ तासांचे महत्त्वपूर्ण ऑडिओबुक आहे.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' चित्रपटात श्यामच्या आईची भूमिका करणारी युवा अभिनेत्री गौरी देशपांडे हिच्या आवाजात हे ऑडिओबुक रेकॉर्ड केले आहे.
गांधीजींच्या हत्येनंतर १४ व्या दिवशी साने गुरुजींनी 'कर्तव्य' नावाचे दोन पानांचे सायंदैनिक सुरू केले. ते चार महिने चालवले आणि बंद केले. त्यानंतर त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. पहिल्या अंकाच्या संपादकीय निवेदनात 'सर्व काही जुळून आले तर कर्तव्य पुन्हा जन्माला येईलही कदाचित', असे गुरुजींनी लिहिले होते. साधनेची वाटचाल अखंड राहून एक्काहत्तर वर्षांनंतर 8 ऑगस्ट 2019 रोजी 'कर्तव्य' पुन्हा जन्माला आले - डिजिटल पोर्टलच्या रुपात. एका मर्यादित अर्थाने यालाही सायंदैनिक म्हणता येईल.
कर्तव्य-साधना या पोर्टलवर रोज संध्याकाळी एक किंवा दोन लेख किंवा व्हिडिओ/ऑडिओ अपलोड केले जातात. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला व क्रीडा, साहित्य, संस्कृती, शैक्षणिक विषय, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील लेख, मुलाखती, रिपोर्ताज व अन्य प्रकारांतील मजकूर लिखित किंवा चित्र, ऑडिओ/ व्हिडिओ स्वरूपात या पोर्टलवर असतो. शिवाय, आठवड्यातून दोनदा इंग्रजी भाषेतील लेखन प्रकाशित होते. हे प्रमाण गेल्या पांच वर्षात वाढत राहिले आहे, आणि पुढे आणखी वाढत जाईल.
कर्तव्य-साधनावरून 'कर्तव्य' आणि 'साधना' चे संपादक साने गुरुजी यांना १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना 'साने गुरुजींची जीवनगाथा' या ऑडिओबुकमधील 'कर्तव्याची हाक' हा १५ मिनिटांचा अंश आज आम्ही प्रकाशित करत आहोत.
हे ऑडिओबुक स्टोरीटेलवर उपलब्ध आहे.
पुस्तक साधना प्रकाशनाच्या वेबसाइटवर आणि अमेझॉन वर उपलब्ध आहे.
साधना प्रकाशन -
अमेझॉन -
Tags: कर्तव्य साने गुरुजी साने गुरुजींची जीवनगाथा राजा मंगळवेढेकर कर्तव्याची हाक ऑडिओबुक गौरी देशपांडे Load More Tags
Add Comment