मार्च 2024 मध्ये साधना साप्ताहिकाच्या वतीने युवा अभ्यासवृत्तीसाठी अर्ज मागवले होते. 124 अर्ज आले होते. त्यातून सात जणांची निवड केली होती. त्यांपैकी तिघांचे अभ्यास विषय आरोग्याशी संबंधित होते. त्यांनी पुढील सहा महिने लायब्ररी वर्क व फील्ड वर्क करून रिपोर्ताज सादर केले. ते लेखन जानेवारी महिन्यात कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टलवरून प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये तनुजा हरड हिने घेतलेला विषय होता, एंडोमेट्रिओसिस या आजाराची आव्हाने, रेणुका कल्पनाचा विषय 'ग्रामीण भागातील मानसिक आरोग्य' आणि डॉ. पूजा नांगरे हिने घेतलेला विषय होता, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची आहार पद्धती. प्रत्येकी पाच ते सात हजार शब्दांचे हे लेख प्रत्येकी तीन भागांमध्ये कर्तव्यवर क्रमशः प्रसिद्ध होतील.
त्यापैकी दुसरा लेख रेणुका कल्पना हिचा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत अनेक लोकांना मानसिक आरोग्याबाबत तक्रारी असतात परंतु त्याविषयी माहिती नसते, निदान होणे सोपे नसते आणि उपचार मिळणे तर अत्यंत दुरापास्त असते. रेणुकाने दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांतील चार क्षेत्रांत पाहणी करून हा लेख लिहिलं आहे. पुणे हा मोठे शहर असलेला जिल्हा, त्यातील खानापूर आणि मावळखानापूर आणि मावळ भाग विचारात घेतला आहे. तर नांदेड हा मराठवाड्यातील दुर्लक्षित आदिवासी भाग असलेला जिल्हा असल्याने तेथील किनवट, सार्खणी या भागाचाही अभ्यास केला आहे. ग्रामीण मानसिक आरोग्यविषयक सरकारी योजनांच्या परिणामकारकतेवर तिने या लेखातून मोठे प्रश्नचिह्न उपस्थित केले आहे.
(लेखातील कंसात लिहिलेले इंग्रजी आकडे तळटीपांचे आहेत)
“बरी झाले तर आजही परत कामाला लागून माझ्यासारख्या मानसिक आजाराने त्रासलेल्या लोकांची सेवा करेन,” नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुकल्यातल्या पात्री गावात राहणारी २६ वर्षांची दुर्गा जुमनाके हिमतीने सांगते. गेली चार वर्षं दुर्गा गंभीर नैराश्याशी झगडत आहे.
“हातात पुस्तक घेऊन गावभर मी फिरते आणि लोकांना दगड मारते तेव्हा मला काही समजत नसते. माझी कोणतीच गोष्ट माझ्या नियंत्रणात नसते” हातापायाच्या काड्या झालेली दुर्गा दिवसभर अंगणातल्या खाटेवर पडून तिच्या आजारपणाचा असा अर्थ लावत राहते. शेंगदाणे, तूप, गूळ असे उष्ण (पण रक्त वाढवणारे पदार्थ) खाल्ले तर जखमा लवकर भरणार नाहीत, अशा खाण्या पिण्याच्या अनेक चुकीच्या समजुतींमुळे डाळ आणि भाकरी याच्याशिवाय तिच्या ताटात दुसरं काहीही नसतं.
आश्रम शाळेत शिकताना तिथल्याच एका मुलाच्या प्रेमात पडल्यावर दुर्गाने बी.एस.सी नर्सिंग करून स्वतः ठरवलेल्या जोडीदाराशी हुंडा देऊन आदिवासी परंपरेनुसार रीतसर लग्न केलं होतं. पण दीड महिन्यातच नवऱ्याला तालुक्याला कामाला पाठवून, दुर्गाला मारहाण करून सासू-सासऱ्यांनी घरी परत पाठवलं. नवराही कधी परत पहायला, घ्यायला आला नाही.
तेव्हापासून शेती करणाऱ्या तिच्या आजी-आजोबांसोबत दुर्गा राहते. तिच्या गावात आरोग्य उपकेंद्रही उपलब्ध नाही. जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास 15 किमी दूर. तिच्या गावापासून साधारण १०० कि.मी. प्रवास केल्यावर नांदेड जिल्ह्याची सीमा ओलांडून यवतमाळमध्ये, विदर्भात, जाता येतं. नैराश्याचे झटके सुरू झाल्यावर यवतमाळला खासगी गाडीतून जाऊन एका खासगी मानसोपचारतज्ज्ञाकडून दुर्गावर उपचार सुरू केले गेले. डॉक्टरची काही हजारांची फी आणि काही हजारांच्या गोळ्या.
अशातच जानेवारी महिन्यात शेकोटीजवळ बसलेली असताना तिचं अंग भाजलं. तिचा नैराश्याचा झटका इतका तीव्र होता की आपलं अंग भाजून निघतंय हेही तिला समजलं नाही. त्या अपघातातून दुर्गा अजूनही पूर्ण बरी झालेली नाही. जखमा न भरण्याचं कारण - क्षयरोगाची लागण. पैशांची चणचण आणि तीन आजारपणं यामुळे दुर्गाला कोणतीही औषधं मिळणं जून महिन्यापासून बंद झालेलं आहे.
दुर्गाची परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण, आदिवासी भागात राहणाऱ्या आणि गंभीर मानसिक आजारासोबत जगणाऱ्या जवळपास सगळ्याच रुग्णांची कैफियत आहे.
आपल्या समाजमनामध्ये मानसिक आजाराबद्दलची माहिती, समज आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित झालेला नाही, हे वेगळं सांगायला नको. आजही अनेक भागांत, अनेक लोकांमध्ये मानसिक आजारी असणं म्हणजे ‘वेड’ लागलेलं असणं असाच समज आहे. मानसिक आजारांबद्दलचे गैरसमज, त्यातील अंधश्रद्धा आणि टॅबू म्हणजे कलंकाची भावना कमी झालेली नाही.
त्यातही पुण्या-मुंबईसारख्या शहरांत मानसिक आजारांबद्दलची समज एका विशिष्ट वर्गात वाढलेली दिसते. मानसिक आरोग्याच्या बहुतेक सेवा खासगी स्वरूपात, जास्त करून शहरात उपलब्ध असतात. त्यामुळे तुलनेने शहरातल्या लोकांना उपचार घेणं सोपं जातं. पण ग्रामीण भागात एकूणच आरोग्य सेवांपर्यंतची पोहोच कमी असते. त्यातही मानसिक आजारांच्या उपचारांची परिस्थिती जास्त बिकट आहे. मानसिक आरोग्याबद्दलच्या गैरसमजांसोबतच तज्ज्ञांचा आणि उपचारांचा अभाव असे तिहेरी ओझे ग्रामीण भागातल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना उचलावे लागते. या अडचणींचे स्वरूप पुढे तपशीलात सांगितले आहे.
मानसिक आजाराच्या रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी सरकारकडून ‘जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम’ हा प्रकल्प चालवला जातो. ग्रामीण भागांतील रुग्णांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन पोहोचणारा देशभरातला हा एकमेव प्रकल्प सध्या सरकारी पातळीवर कार्यरत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मानसिक आजाराची परिस्थिती समजून घेताना रुग्णांची वाढती संख्या, रुग्णांना आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सामोरं जाव्या लागणाऱ्या आव्हानांसोबतच जिल्हा मानसिक आरोग्याच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी होते, हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे.
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे मूल्यमापन करणारा कोणताही स्वतंत्र आणि सखोल अभ्यास संपूर्ण भारतात झालेला नाही. महाराष्ट्रात हा कार्यक्रम कसा चालतो, त्यात कोणत्या त्रुटी आहेत, कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत याबद्दलचा कोणताही अभ्यास यापूर्वी मराठी किंवा इंग्रजीत झालेला नाही. त्यातही या कार्यक्रमाची माहिती बहुतेक इंग्रजीत उपलब्ध असून ज्या खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी या सेवा महत्त्वाच्या आहेत त्यांना त्याची माहितीही नाही.
म्हणूनच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मानसिक आजारांसह जगणाऱ्या रुग्णांची परिस्थिती काय आहे, आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमामुळे या रुग्णांपर्यंत उपचार पोहोचणे सोपे झाले आहे का, हे समजून घेणे हा या अभ्यासाचा विषय होता. त्यासाठी महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली. पुणे हा एक महत्त्वाचे आणि मोठे शहर असलेला जिल्हा म्हणून या अभ्यासासाठी तो विचारात घेतला गेला. तर नांदेड हा मराठवाड्यातील दुर्लक्षित आदिवासी भाग असलेला जिल्हा असल्याने त्याचाही विचार करण्याचे ठरवले. त्यातही, रुग्णांचे खरे प्रश्न कळावेत, कार्यक्रमाची पोहोच कुठेपर्यंत आहे हे समजावे आणि अभ्यासाला ठराविक दिशा मिळावी यासाठी पुण्यातील खानापूर आणि मावळ तर नांदेडमधील किनवट, सार्खणी या भागावर या अभ्यासात जास्त लक्ष दिले आहे.
सगळ्यात पहिले ग्रामीण भागातल्या मानसिक आरोग्याचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची गरज समजून घेण्यासाठी या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यानंतर पुणे शहरातील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे काम कसे चालते यावर भर देण्यात आला आहे. तर तिसऱ्या भागात नांदेड जिल्ह्यातून चालणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे.
त्याआधी भारतातल्या मानसिक आरोग्याचं नेमकं स्वरूप काय, ग्रामीण भागातल्या लोकांचे मानसिक आरोग्याचे प्रश्न कोणते, त्या प्रश्नांचं वेगळेपण आणि ग्रामीण भागातल्या मानसिक आरोग्याच्या सेवांची नेमकी गरज काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
ग्रामीण भागातले मानसिक आरोग्याचे प्रश्न समजून घेताना...
२०१५-२०१६ च्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतातल्या १,५०० लाख लोकांना मानसिक आजाराच्या उपचारांची गरज आहे(1). भारताची लोकसंख्या आहे १४२ कोटी (म्हणजे १४,२०० लाख). म्हणजे एकूण लोकसंख्येच्या १४.३ टक्के लोकं कोणत्या न कोणत्या मानसिक आजाराशी झुंज देतायत. याशिवाय, १० टक्के लहान आणि किशोरवयीन मुलं वेगळी(2). आता लोकसंख्या वाढल्याने आणि विशेषतः कोविड-१९ साथरोगानंतर ही आकडेवारी आणखी वाढली असल्याचा अंदाज आहे. लॅन्सेन्ट सायकियाट्रीने २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार भारतात प्रत्येक सात पैकी एक व्यक्ती मानसिक आजाराशी झगडते आहे(3).
सद्यःस्थितीत २०१५-२०१६ चं राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण ही सगळ्यात ताजी आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार, शहरी भागात १३.५ टक्के लोकांना मानसिक आजाराच्या उपचारांची गरज आहे. ग्रामीण भागात साधारणपणे ६.९ टक्के मानसिक आजाराचे रुग्ण आढळतात. तर निमशहरी भागात ४.३ टक्के रुग्ण निमशहरी भागात आहेत (4). मात्र, व्यसनाधीनतेचे रुग्ण ग्रामीण भागात जास्त असल्याची नोंद राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणासोबतच इतर अनेक सरकारी अहवालांत केलेली आहे.
(मानसिक रुग्ण आढळण्याचे प्रमाण - ग्रामीण, निमशहरी, शहरी)
(वेगवेगळ्या स्थानी आढळणारे मानसिक आजारांचे प्रकार)
शिवाय, ग्रामीण भागातल्या आजारी रुग्णांना प्रत्यक्ष उपचारापर्यंत पोहोचण्यासाठी सरासरी ३.१५ वर्षांचा काळ लागतो. याचाच अर्थ असा, की मानसिक आजारी रुग्णांची संख्या कागदावर कमी असली तरी उपचारातली दरी (treatment gap) ग्रामीण भागात जास्त आहे. उपचार उपलब्ध असतानाही रुग्ण त्यापासून दूर रहात असेल तर त्याला उपचारातली दरी असं म्हटलं जातं. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, वेगवेगळ्या मानसिक आजारांसंदर्भात उपचाराची दरी २३ ते ९७ टक्के इतकी आहे. सगळ्यात जास्त उपचाराची दरी ही दारू आणि तंबाखूचे व्यसन असणाऱ्या (८० ते ९० टक्के), म्हणजेच ग्रामीण रुग्णांमध्ये दिसून येते, असे राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणात सांगितले आहे.
उपचाराची दरी एवढी मोठी असण्यामागे मानसिक आजारांबद्दलची माहिती कमी असणं, गरिबी ही कारणं आहेतच. पण इतर आजारांच्या उपचारांमध्ये सहसा दिसत नाही असं कारण म्हणजे भारतात मानसिक आजारावर उपचार करणाऱ्या कर्मचारी आणि तज्ज्ञांचा गंभीर अभाव असणं. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे भारतात मानसिक आरोग्याच्या ०.२० खाटा, ०.०७ चिकित्सक मानसशास्त्रज्ञ, ०.८ मनोविकृती परिचारिका, ०.०६ समाजसेवक आहेत. प्रत्येक एक लाख लोकसंख्येसाठी तीन मानसोपचारतज्ज्ञांची गरज असताना भारतात फक्त ०.२९ मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध आहेत. बालमानसोपचारतज्ज्ञांचा दर तर शून्य आहे (5).
राज्यसभेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या मानसिक आरोग्यसेवा आणि त्याचे समकालीन व्यवस्थापन या २०२३ च्या अहवालात भारतात सद्य:स्थितीत ९००० मानसोपचारतज्ज्ञ असल्याचे म्हटलं आहे. ही आकडेवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस या बंगलोरमधल्या संस्थेकडून तोंडी घेतली असल्याचं म्हटलं आहे (6). प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे तीन मानसोपचारतज्ज्ञ हा आकडा गाठायचा असेल तर भारताला एकूण ३६,००० मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे. भारतात दरवर्षी जवळपास एक हजार मानसोपचारतज्ज्ञ तयार होतात असंही अहवाल सांगतो. या वेगाने अपेक्षित आकडा गाठायला भारताला पुढची २७ वर्षं लागतील.
महाराष्ट्रात १२०० पेक्षा जास्त नोंदणीकृत मानसोपचारतज्ज्ञ असल्याचे टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आरोग्य सेवा सहसंचालक साधना तायडे या २०१९ मध्ये म्हणाल्या होत्या (7). यातले बहुतेक मानसोपचारतज्ज्ञ शहरात खासगी सेवा पुरवतात. सरकारी व्यवस्थेत असणारेही शहरातील जिल्हा रुग्णालयात किंवा मोठ्या सर्वोपचार रुग्णालयातच असतात.
मानसिक आजारांचं वर्गीकरण सामान्य मानसिक आजार (Common Mental disorders) आणि गंभीर मानसिक आजार (Severe Mental Disorders) असं केलं जातं. नेहमी दिसणारे, रुग्णांची संख्या जास्त असणारे साधे आजार हे सामान्य मानसिक आजारात मोडतात. नैराश्य, व्यसनाधीनता, अति काळजी अशी याची काही उदाहरणं आहेत. तर स्क्रिझोफेनिया, बायपोलर डिसॉर्डर असे आजार गंभीर या श्रेणीत येतात.
ग्रामीण भागात गंभीर मानसिक आजारांपेक्षा सामान्य आजारांचे रुग्ण जास्त असल्याचं राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणातून समोर येतं. जवळपास १० टक्के लोकांवर त्याचा परिणाम होतो (8). पण हे आजार आरोग्य सेवांचं नियोजन करताना लक्षात घेतलेल्या नाहीत. कुटुंब आणि रुग्णांकडूनही या आजाराची लक्षणं दुर्लक्षित केली जातात आणि आजार गंभीर स्वरूप धारण करतो. आजाराच्या सुरुवातीलाच त्याची लक्षणं समजून घेऊन, वैद्यकीय मदत घेण्यासाठी लागणाऱ्या सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध व्हायला आणखीनच अडचण येते.
(ग्रामीण भागातील मानसिक अजरांची तीव्रता)
“शहरी आणि ग्रामीण भागातल्या रुग्णांमध्ये आता फारसा काही फरक राहिला नसल्याचं दिसून येतं,” असं नांदेड शहरात काम करणारे मानोसपचारतज्ज्ञ डॉ संदीप देशपांडे सांगतात. हा फरक फक्त आजाराच्या समजुतीमध्ये दिसून येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
ग्रामीण भागातल्या लोकांची अभिव्यक्ती बुजलेली असते. आपल्या भाव भावना मोकळेपणाने मांडण्याचं वातावरण विशेषतः स्त्रियांना मिळत नसल्याचे नैराश्याचे प्रमाण ग्रामीण भागात लक्षणीय दिसून येतं, असं डॉ देशपांडे सांगतात. शहरी भागात नैराश्यग्रस्त माणूस एकटेपणा जाणवतोय, दुःखी वाटतंय अशा शब्दांत त्याचा त्रास सांगू शकतो. मात्र ग्रामीण भागात नैराश्य हे अचानक संवेदनांवरचं नियंत्रण जाण्यातून व्यक्त होतं. त्यालाच सर्वसामान्य भाषेत भानामती, अंगात येणं असं म्हटलं जातं. हे पुरुषांमध्येही दिसतं, असं डॉ. देशपांडे पुढे सांगत होते.
गावामध्ये मानसिक आजारांच्या लक्षणांची जनजागृती करत असताना लक्षणांबद्दलची ही समजूत वेगळी असते, हे सहसा लक्षात घेतलं जात नाही असं हा अभ्यास करताना प्रकर्षाने जाणवत होतं. पुण्यातल्या खानापूर जवळच्या एका गावातल्या मालती साठे (नाव बदललं आहे) यांचं उदाहरण यासाठी फार महत्त्वाचं ठरतं. मनाविरुद्ध घडल्यावर हिंसक होणाऱ्या मालती साठेंना बायपोलर डिसॉर्डर असल्याचं निदान व्हायला जवळपास १५ - २० वर्षं लागली. त्यांच्या घरी भेट देऊन आणखी विचारपूस केली तेव्हा मालती यांच्या सख्ख्या थोरल्या भावाच्या अंगात खंडोबा देव येत असल्यानं त्यांच्या घरी मासिक पाळीतली अस्पृश्यता फार कठोरपणे पाळली जात असल्याचं समजलं. अशी अस्पृश्यता पाळली जाते तेव्हा मालती जास्त चिडचिड करतात, हिंसक होतात असंही मालतींच्या आईच्या बोलण्यात आलं. मालती यांच्या आजाराच्या निदानासाठी इतके डॉक्टर, औषधोपचार केले असूनही त्यांचा थोरला भाऊही नैराश्यासोबत जगत आहे याबद्दलची कोणतीही माहिती कुटुंबीयांना नव्हती.
ग्रामीण भागात नेहमी दिसणारा दुसरा मानसिक आजार म्हणजे व्यसनाधीनता. व्यसनाकडे पाहण्याचा ग्रामीण, विशेषतः आदिवासी भागातल्या लोकांचा दृष्टीकोन वेगळा असतो. शहरातल्या लोकांप्रमाणे अनेकदा आनंदाचा भाग म्हणून दारू प्यायली जात नाही. तर संस्कृतीचा भाग म्हणून, अनेकदा कर्मकांड म्हणूनही अनेक जण व्यसनाकडे वळतात. शिवाय, अतिकष्टाची कामे करणाऱ्यांमध्येही व्यसनाची सवय खूप मोठ्या प्रमाणावर दिसते. दारू दुखणं विसरायला मदत करते या समजातून ही सवय लागते. “इतर मानसिक आजार असल्याने अनेकजण व्यसनाकडे वळतात तर व्यसन करत असल्याने अनेकांना मासनिक आजार सुरू होतात,” असं डॉ. देशपांडे सांगतात. व्यसनात खूप अडकलेल्या लोकांकडे मानसशास्रात डिप्रेसिव्ह इक्विव्हॅलेंट म्हणजे नैराश्याच्या जवळ असणारे म्हणूनच पाहिलं जातं. “खेड्यात काम करत असताना काही रुग्ण असे सापडतात जे खूप १०-१५ दिवस सलग दारू पितात. आणि अचानक २ ते ४ महिने दारूला शिवतही नाहीत. अशा लोकांना बायपोलर डिसॉर्डर असू शकतो,” डॉ. देशपांडे सांगतात.
आजार काहीही असो, ग्रामीण भागातल्या रुग्णांवर उपचार करणं हे जास्त सोपं असतं, असंही डॉ. देशपांडे पुढे सांगत होते. ग्रामीण भागातल्या रुग्णांमध्ये कलंकाची भावना कमी असते, किंवा नसते. मनाचा आजार झालाय असं माहीत असेल तर डॉक्टरकडे गेल्यावर लोक काय म्हणतील ही भावना मनात येत नाही. “रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचतच नाहीत कारण आजाराबद्दलची माहितीच त्यांच्याकडे नसते,” असा डॉ. देशपांडे यांचा अनुभव आहे.
आजाराची माहिती नसताना तो ओळखला कसा जातो? तर गावातल्या इतर लोकांचं पाहून! शेजारपाजारी किंवा गावात कोणाला तसाच आजार असेल तर माहितीची देवाणघेवाण होते आणि डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतल्यावर बरं वाटतं ही माहिती घेतल्यावर रुग्ण येतात. फार कमी वेळा ग्रामीण भागातल्या रुग्णांना पुर्नवसन केंद्रात ठेवायची गरज पडते. कारण, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातल्या रुग्णांना आधार चांगल्या पद्धतीने मिळतो. फक्त कुटुंबीयच नाही तर संपूर्ण गाव आजारी माणसाला सांभाळून घेतं, त्याच्या औषधपाण्यावर लक्षं ठेवतं. त्यामुळे शहरी भागातल्या रुग्णांच्या तुलनेत ग्रामीण भागातल्या रुग्णांचा आजार भविष्यात वाढत जात नाही, असं डॉ. देशपांडे सांगतात.
२००२ ते २०२१ अशी वीस वर्षं डॉ. देशपांडे स्वतः नांदेड जिल्ह्यातल्या किनवट या आदिवासी भागात जाऊन रुग्णांना सेवा देत होते. किनवटच्या साने गुरूजी रुग्णालयात त्यांची दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ओपीडी असायची. एका ओपीडीला किनवट, सार्खणी या तालुक्यातील गावांमधून जवळपास ५० ते ६० रुग्ण येत, असं डॉ. देशपांडे सांगतात.
किनवट भागात केलेले सर्वेक्षण काय सांगते?
गेली दोन वर्षं त्यांची सेवा बंद असल्याने या सगळ्या रुग्णांना उपचारासाठी नांदेडला १५० किलोमीटर प्रवास करून जावे लागते असं अभ्यासांतर्गत या भागात केलेल्या एका छोट्या सर्वेक्षणातून समोर आले. किनवटमधल्या साने गुरुजी रुग्णालयाकडून मल्टी युटीलिटी मोबाईल व्हॅन या नावाचा एक फिरता दवाखाना आसपासच्या गावांमध्ये मोफत औषधे आणि माफक दरात डॉक्टरची घरपोच सेवा पुरवण्यासाठी फिरत असतो. जून महिन्यात ४ दिवस या फिरत्या दवाखान्यासोबत जाऊन किनवट आणि सार्खणी या तालुक्यात प्रवास करून एकूण १३ गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन हे छोटे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या गावांची नावे अशी - राजगड, चिंचखेड, पात्री, पात्री तांडा, दहेदाव, आंधबोरी, कहिरा गुडा, पडोदा बुद्रुक, जवरला, काजीपोड, शिवरामखेड, अंबाडी आणि अंबाडी तांडा.
एका दिवसात दोन ते तीन गावांना भेट दिली गेली. गावात जाऊन आशा सेविका, सहायक परिचारिका प्रसाविका (एएनएम), सरपंच किंवा गावकऱ्यांना भेट देऊन गावातल्या मानसिक आरोग्याच्या रुग्णांची माहिती घेण्यात आली. तसेच, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम किंवा इतर सरकारी सेवांच्या उपलब्धतेबद्दलही प्रश्न विचारण्यात आले.
निकष | मूल्य |
सर्वेक्षण केलेली एकूण गावे | १३ |
रुग्ण असलेली गावे | ९ |
रुग्ण नसलेली गावे | ४ |
यावेळी १३ पैकी जवळपास ९ गावांमध्ये मानसिक आरोग्याचा निदान एक तरी रुग्ण आढळला. ज्या चार गावांत मानसिक आरोग्याचा एकही रुग्ण आढळला नाही त्यापैकी दोन गावे म्हणजे तुरळक वस्ती असलेली होती. मूळ गावांचाच विस्तार असलेल्या बंजारा वस्तीचे हे दोन तांडे होेते. काझीपोड या कोलाम लोकसंख्या जास्त असलेल्या गावात दुपारी १२ च्या सुमारास भेट दिली होती. पण जवळपास गावातले बहुतेक लोक शेतमजूरीला गेले असल्याने कोणालाही भेटून सविस्तर चर्चा करता आली नाही. विचारपूस करूनही एकही रुग्ण सापडला नाही असं चिंचखेड हे साधारण १३०० लोकसंख्येचं एकच गाव होतं. सकाळी ९:३० वाजता चिंचखेडमधलं प्राथमिक उप आरोग्य केंद्र बंद होतं.
उरलेल्या ९ गावांमध्ये मिळून चार दिवसांत जवळपास १६ रुग्णांची नोंद झाली. यात १२ पुरुष तर ४ स्त्रिया होत्या. एकाच घरात दोन रुग्ण आहेत अशी दोन कुटुंबे सापडणारं जवरला हे एकमेव गाव होतं. जवरलात राहणाऱ्या दृप्तीबाई दुर्वे यांच्या नवऱ्याने आत्महत्या केल्यावर त्याचा गंभीर परिणाम मुलगा प्रवीण दुर्वे यांच्यावर झाला. मुलाचं आजारपण आणि घरातली हालाखीची परिस्थिती याने दृप्तीबाई दुर्वे यांनाही मानसिक आरोग्याच्या सेवांची गरज भासू लागली आहे. मात्र आत्तापर्यंत त्या कोणतेही उपचार घेतलेेले नाहीत.
निकष | मूल्य |
आढळलेले एकूण रुग्ण | १६ |
पुरुष रुग्ण | १२ |
स्त्री रुग्ण | ४ |
दृप्तीबाईं यांच्याप्रमाणे कोणतेही उपचार न घेतलेले एकूण ६ रुग्ण होते. अनेकांना आपल्याला मानसिक आजार आहे याचीही कल्पना नव्हती. बाकीच्यांनी यवतमाळ किंवा नांदेड शहरात किंवा जवळच्या खासगी मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेत आहेत, अशी माहिती दिली. उपचार घेत असलेल्या रुग्णांना स्क्रिझोफेनिया किंवा नैराश्य यापैकी एक आजार असल्याचे निदान झाले आहे. उर्वरित रुग्णांचे निदान झाले नसले तरी बहुतांश लक्षणे ही कानात आवाज येणे, कुणीतरी बोलत असल्याचे भास होणे किंवा अखंड बडबड करत बसणे अशा गंभीर मानसिक आजारांचीच होती. काही रुग्ण हिंसकही होते.
महत्त्वाचे असे की सर्वेक्षणातल्या सर्व १२ गावांत व्यसनाधीन असणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय होती. “तसं पहायला गेलं तर गावात सगळेच व्यसन करतात असं म्हणावं लागेल,” हे आंधबोरी गावच्या सुनंदा केंद्रे आशा सेविका यांचं विधान सार्वत्रिक आणि फार महत्त्वाचं होतं. आत्महत्येच्या, विशेषतः मराठवाड्यातील भाग असल्याने काही शेतकरी आत्महत्येचे प्रसंगही गावकऱ्यांनी सांगितले. मात्र त्याबद्दल सखोल माहिती घेता आली नसल्याने त्याचा उल्लेख इथे केलेला नाही.
या सर्वेक्षणात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती असल्याचे एकाही रुग्णाने सांगितले नाही. हा कार्यक्रम काय आहे याबद्दल कोणालाही कसलीही माहिती नव्हती. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातून किंवा इतर कोणत्याही सरकारी आरोग्य केंद्रातून मानसिक आरोग्याविषयी कोणतेही उपचार कधीही घेतले नसल्याचे जवळपास सर्वच रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. उपचारच काय तर कोणताही सल्ला, तात्पुरती औषधे यासाठीही रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक सरकारी आरोग्य केंद्रात जात नाहीत.
गावातल्या जाणत्या माणसाने सांगितल्यावर किंवा गावातल्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून समजल्यावर हे रुग्ण नांदेड, यवतमाळ किंवा तेलंगणातल्या आदिलाबाद जिल्ह्यात खासगी उपचारासाठी जातात. किनवट तालुका केंद्रापासून नांदेड जवळपास १५० किमी, यवतमाळ साधारण १२० किमी तर अदिलाबाद ५० किमी इतक्या अंतरावर पडतं. गावानुसार हे अंतर कमी जास्त होत असलं तरी सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय किनवटवरूनच तेही मर्यादीत प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेकदा विशेषतः जवरल्यातल्या विलास लिंगमपल्लेवार सारख्या हिंसक होणाऱ्या रुग्णांना प्रत्येकवेळी खासगी वाहनाने नेणं हे फार खर्चात पाडणारं असतं असं त्यांचे मेव्हणे बाळू त्रिकमुदार सांगतात. जवरला गावात मानसिक रुग्णालयात भरती करण्याची गरज असणारे जवळपास तीन रुग्ण होते.
मुळातच डॉक्टरची फी, औषधांचा खर्च यासाठी पैसे नसतात. त्यात मानसिक आजाराचे खासगी उपचार फार महागडे असतात. डॉक्टरांची फी आणि कुठेही सहज न उपलब्ध होणारी औषधे असा एकावेळेचा खर्च २ ते ३ हजार रूपये इतका होतो. आजाराच्या तीव्रतेनुसार १५ दिवस ते एक महिन्याने डॉक्टरांकडे जावं लागतं. एकर शेतीत कापूस, तूर पिकवणाऱ्या आंधबोरीच्या नागोराव गुंडागुळेंना हा खर्च परवडत नाही. तरीही गेली २० वर्षं सातत्याने ते स्क्रिझोफेनियावरची औषधे घेत आहेत.
मराठवाड्यातल्या मागासलेल्या, जिल्हा केंद्रापासून दूर असणाऱ्या किनवट या भागातल्या लोकांना जाणावणारे प्रश्न पुण्यासारख्या विकसित शहराच्या आसपासच्या खेड्यात राहणाऱ्या लोकांनाही जाणवतात.
खानापूरजवळच्या खामगाव गावात राहणारे रिक्षा चालक शंकर भिंगारे यांच्या दोन्ही मुलींवर गंभीर मानसिक आजारासाठी पुण्यातील ससून या सरकारी इस्पितळात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तब्येत खालावल्याने एकीचा चार महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. गेली २० वर्षं भिंगारे रिक्षेतून दोन्ही मुलींना घेऊन ससून रुग्णालयात जाऊन औषध आणत. “मुली एवढ्या आजारी होत्या की एकेकीला कपड्याचंही भान नसायचं. तशा अवस्थेत त्यांना रिक्षेतून ससूनला न्यायचं, तपासण्या, औषधं करायची आणि परत खामगावला आणून सोडायचं यात इतका वेळ जायचा की, रिक्षेचा एक दिवस बुडायचा,” भिंगारे सांगतात.
खासगी सेवांपेक्षा कमी असले तरी ससूनमधून औषध घेतानाही पैसे लागायचे. मोफत मिळतात म्हणून जिल्हा मानसिक कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णायातूनही त्यांनी दोन महिने औषधे आणली. पण रुग्णालय इतकं आत आणि निरस ठिकाणी आहे की त्यापेक्षा ससूनला जाणंच सोपं वाटू लागली. आता गेल्या दहा महिन्यांपासून त्यांना खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मानसोपचारतज्ज्ञ आणि औषधे मिळू लागली आहेत. “आता मुलगी अगदी ९० टक्के बरी झाल्यासारखी वाटते,” ते म्हणतात.
आवश्यक संसाधनं नसताना उपचारासाठी लांब अंतर कापावं लागणं हा ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी मानसिक आरोग्याच्या सेवांपर्यंत पोहोचण्यात येणारा सगळ्यात मोठा अडथळा आहे. मानसिक आरोग्याच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे. “आमच्या गावात दर रविवारी सकाळी जनावरांच्या औषधासाठी गाडी येते. तशीच माणसांच्या औषधांसाठी का येत नाही?” खानापूरजवळ राहणाऱ्या बायपोलर डिसॉर्डरसोबत जगणाऱ्या मालती यांची आई विचारते.
घरापर्यंत नाही तर जमेल तितक्या जवळ मानसिक आजारांची औषधं नियमितपणे मिळावीत यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम महत्त्वाचा आहे. त्याची ओळख करून घेताना भारतातल्या मानसिक आरोग्याच्या सेवांचा ऐतिहासिक आढावा घेणं क्रमप्राप्त आहे.
- रेणुका कल्पना
renuka.kalpana98@gmail.com
तळटीपा -
[1] राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण, संक्षिप्त 2015-16. बेंगळुरू: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (NIMHANS), 2016. पृष्ठ क्र. 15.
[2] राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण, संक्षिप्त, 2015-16. बेंगळुरू: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (NIMHANS), 2016. पृष्ठ क्र. 20.
[3] The burden of mental disorders across the states of India: the Global Burden of Disease study 1990 – 2017
[4] गुरुराज, जी., वर्गीज, एम., बेनेगल, व्ही., राव, जी., पाठक, के., सिंह, एल., इत्यादी. भारतीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण, २०१५–१६. प्रकाशित क्रमांक १३०. मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्स राष्ट्रीय संस्था, २०१६.
[5] जागतिक आरोग्य संघटना (WHO). मानसिक आरोग्य ऍटलास 2017 सदस्य राज्य प्रोफाईल: भारत
[6] भारतीय संसदीय स्थायी समिती (आरोग्य व कुटुंब कल्याण). (2023). समकालीन काळातील मानसिक आरोग्य आणि त्याचे व्यवस्थापन. भारत सरकार. पान क्र. 25.
[7] टाईम्स ऑफ इंडिया.. (२०१९, १४ सप्टेंबर). महाराष्ट्राचा ₹६ कोटींचा मानसिक रुग्णालयांसाठी योजना.
[8] राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण, Summary 2015-16. बेंगळुरू: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (NIMHANS), 2016. पृष्ठ क्र. 15.
2024 या वर्षात साधना साप्ताहिकाच्या वतीने दिलेल्या तांबे रायमाने अभ्यास वृत्तीतून तीन लेख आकाराला आले आणि अनिल अवचट अभ्यास वृत्तीतून तीन लेख आकाराला आले. यासाठीची काही आर्थिक तरतूद श्रीकांत तांबे व ल. बा. रायमाने यांच्या कुटुंबीयांनी केली होती , तर काही आर्थिक तरतूद विवेक केले यांच्या टीम ग्लोबल या कंपनीने केली होती. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
- संपादक, साधना
Tags: साधना युवा अभ्यासवृत्ती २०२४ तांबे रायमाने अभ्यासवृत्ती अनिल अवचट अभ्यासवृत्ती ग्रामीण आरोग्य मानसिक आरोग्य ग्रामीण मानसिक आरोग्य जीहल मानसिक आरोग्य कार्यक्रम Load More Tags
Add Comment