एंडोमेट्रिओसिस: ओळख, निदान आणि अडथळे (3/3)

उपचार करून घेण्यातील अडथळे

लेखाचा दुसरा भाग येथे वाचा

एंडोमेट्रिओसिस असलेल्यांना सामान्य जीवन जगण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे शारीरिक, मानसिक, लैंगिक जीवन तसेच सामाजिक जीवनावर परिणाम होतो. एंडोमेट्रिओसिस असेल त्यांना तसेच त्यांचे जोडीदार, कुटुंब यांनासुद्धा मानसिक तसेच आर्थिकदृष्ट्या आव्हानांचा सामना करावा लागतो. एंडोमेट्रिओसिसच्या लक्षणांमध्ये जीवनाच्या विविध टप्प्यांवर बदल होऊ शकतो किंवा लक्षणांची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे जीवनात मोठे निर्णय घेताना याचा परिणाम होऊ शकतो जसे की विशिष्ट ठिकाणी शिक्षण घेणे, करियर, लग्न करणे, इत्यादी. महिलांना होणार्‍या वेदना गांभीर्याने न घेतल्याने तसेच उपचार घेऊन सुद्धा त्याचा काही परिणाम होत नसल्याने नैराश्य येते तसेच असहायता आणि एकटेपणाची भावना निर्माण होते.


एंडोमेट्रिओसिसचे उपचार आर्थिकदृष्ट्या महागडे

माझ्या शस्त्रक्रियेसाठी सहा लाख पेक्षा जास्त खर्च येईल असे सांगितले होते. इतका खर्च माझ्यासाठी परवडणारा नव्हता म्हणून मी मुंबई, कलकत्ता, दिल्ली यासारख्या शहरांमध्ये कमी खर्चात शस्त्रक्रिया होऊ शकते का यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी मी कलकत्त्यात जॉब करत होती. दुसरीकडे शस्त्रक्रिया करवून घेण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती कारण इतक्या वर्षांनी मी योग्य डॉक्टर शोधले होते. याच डॉक्टरांकडे उपचार घ्यावे असे मला वाटत होते. डॉ. अभिषेक मंगेशीकरांना विनंती केली असता त्यांनी शस्त्रक्रियेचा खर्च कमी केला व त्यामुळे माझी शस्त्रक्रिया होऊ शकली, यासाठी त्यांचे आभार मानावे ते कमीच.

एंडोमेट्रिओसिसचा उपचार घेणे खूप खर्चिक असते. यामागे वर नमूद केल्याप्रमाणे डॉक्टरांची संख्या कमी असणे, महागड्या चाचण्या (सोनोग्राफी, एमआरआय, इ.) गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, एंडोमेट्रिओसिसच्या शस्त्रक्रियांसाठी/उपचारांसाठी हॉस्पिटलांची कमतरता, तसेच वर्षानुवर्षे वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटी देणे इत्यादींमुळे येणारा खर्च हा जास्त असतो. यावरुन आपणाला कल्पना आली असावी की सामान्य माणसाला एंडोमेट्रिओसिसचा खर्च परवडण्यासारखा आहे का, ते. तसेच ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया एकापेक्षा जास्त वेळा होत असेल अशा रुग्णांचा खर्च किती होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. एंडोमेट्रिओसिसची शस्त्रक्रिया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणे चांगले असते कारण अशा हॉस्पिटलांमध्ये शस्त्रक्रियेसाठी योग्य ती साधनसामग्री असते. बर्‍याच वेळा पैसे वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया साध्या हॉस्पिटल मध्ये किंवा नर्सिंग होममध्ये करतात. परंतु अशाने पुढे जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. 

भारतात एंडोमेट्रिओसिसकडे सार्वजनिक आरोग्यात चिंताजनक आजार म्हणून प्राधान्य नाही तसेच हा आजार खाजगी तसेच सार्वजनिक विमा कंपन्यांच्या नियमांमध्ये समाविष्ट नाहीये. त्यामुळे रुग्णांना विमा मिळणे अवघड जाते. सारा म्हणतात की “मला शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांकडून विशेष पत्र लिहून घ्यावे लागले. त्यामध्ये होणारी शस्त्रक्रिया ही वेदनांवर उपचार व्हावेत यासाठी करण्यात येत आहे असे नमूद करावे लागले आणि त्यानंतरच मला विमा मिळू शकला.” भारतात विमा कंपन्या एंडोमेट्रिओसिसकडे प्रजनन क्षमतेसंबधी अडथळा असणारी परिस्थिती असं बघतात आणि यावर उपचार करणे किंवा शस्त्रक्रिया करणे म्हणजे प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी किंवा वंध्यत्वावर उपचार घेणे अशाप्रकारे पाहिले जाते. यामुळे बहुतांश वेळा रुग्णांना विमा नाकारला जातो. नफा तत्वावर उभ्या असलेल्या विमा क्षेत्रातसुद्धा स्त्रियांच्या अवयवांचा समावेश असलेली कोणतीही गोष्ट अनेकदा चुकीची वर्गीकृत केली जाते. तसेच स्त्रियांच्या शरिराविषयी किंवा त्यांना होणार्‍या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात दूर्लक्ष केले जाते. असह्य प्रमाणात वेदना आणि त्रास होऊनसुद्धा त्याकडे अशाप्रकारे पाहिले जात असेल तर हे नक्कीच संतापजनक आहे. एंडोमेट्रिओसिसचा उपचार घेत असताना बहुतांश रुग्ण हे असह्य वेदना कमी होण्यासाठी उपचार घेतात व प्रजनन क्षमतेसंबधी उपचार घेणारे रुग्ण खूप कमी असतात. 

माझ्या आई वडिलांनी कुटुंबासाठी किंवा त्यांच्या स्वतःसाठी कधी विमा पॉलिसी घेतली नाही म्हणून मोठेपणी मी विमा घेण्याचा विचार केला. त्यासाठी फॉर्म भरताना मी गर्भाशयासंबधित आजार एंडोमेट्रिओसिसची लक्षणे असल्याचे नमूद केले होते. असे फॉर्ममध्ये लिहिले असले तरी अजूनपर्यंत कोणत्या डॉक्टरांनी असे सांगितले नव्हते यामुळे मला जाणवत असलेली लक्षणे एंडोमेट्रिओसिसचीच आहेत असा काही पुरावा नव्हता. या कारणामुळे मला विमा पॉलिसी देणे नाकारले गेले. मला विमा पॉलिसीचे भरलेले पैसे परत दिले गेले परंतु माझी विमा पॉलिसी काही केली नाही. म्हणजेच जर विमा पॉलिसी चालू केली आणि भविष्यात ट्रीटमेंट किंवा शस्त्रक्रिया झाली तर विमा कंपनीला त्याचा भार उचलावा लागेल आणि त्यासाठी कंपनीला विमा खरेदी करताना जास्त पैसेही आकारता येणार नव्हते. 

शस्त्रक्रियेच्या वेळीही विम्याचा लाभ मला नाकारला गेला. यावेळी माझी विमा पॉलिसी माझ्या ऑफिसकडून होती. मला असलेल्या आजाराची लक्षणे दहा - पंधरा वर्षांपासूनची आहेत व माझी पॉलिसी नवीन असल्याने त्याचा लाभ मिळणार नाही असे कारण दिले गेले. या ठिकाणी विमा पॉलिसी असूनसुद्धा काहीबाही कारणे देऊन विमा कंपनीने शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्यास नकार दिला. एका ठिकाणी लक्षणे आहेत पण पुरावा नाही तर दुसर्‍या ठिकाणी पुरावा आहे पण लक्षणे काही वर्षांपासूनची आहेत म्हणून विमा नाकारला गेला. यावरून भारतातील विमा कंपन्या आणि विमा पॉलिसीचे नियम समाजाच्या भल्यासाठी आहेत की फक्त नफा कमावण्यासाठी आहेत याची कल्पना येईल, मग ते सरकारी असो की खाजगी. 

तर माझा संघर्ष इथेच संपत नाही. या विमा कंपनीच्या मुख्य ऑफिसला, की जे दिल्लीला आहे, त्यांना मी शस्त्रक्रियेसंबंधित आवश्यक कागदपत्रे पोस्टाने पाठवली होती आणि जेव्हा विमा नाकारला गेला तेव्हा मी त्यांना विनंती केली की ती कागदपत्रे मला पोस्टाने परत पाठवा. त्यांनी त्यास नकार दिला. पोस्टाने कागदपत्रे पाठवली तर ती मधल्या मध्ये हरवली जाऊ शकतात असे कारण दिले गेले तसेच ती कागदपत्रे मी स्वतः त्यांच्या ऑफिस येऊन घ्यावीत असे सांगितले गेले. त्यांनी दिलेल्या कारणामागचं मला लॉजिकच समजलं नाही. जर मी पोस्टाने पाठवलेली कागदपत्रे त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहचू शकत असतील तर त्यांनी मला पाठवलेली का नाही पोहचणार? महाराष्ट्रातून दिल्लीला फक्त कागदपत्रांसाठी कोण का जाईल? त्याचा आर्थिकदृष्ट्या विचार केला असता काही समतोल वाटतो का? यावरून विमा कंपन्या सर्वसामान्यांचा किती विचार करतात हे लक्षात येईल. याला आता वर्ष होऊन गेले असले तरी ती कागदपत्रे अजून आणली नाहीयेत.

एंडोमेट्रिओसिसचे निदान लवकर व्हावे आणि रुग्णांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) मध्ये एंडोमेट्रिओसिसचा सहभाग करणे तसेच खासगी क्षेत्रातील विमा संबंधित नियम बदलणे गरजेचे आहे. एंडोमेट्रिओसिस तज्ज्ञांची संख्या वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक आणि खाजगी एंडोमेट्रिओसिस सेवा केंद्रे स्थापन करण्याची आवश्यक आहे. याचबरोबर डॉक्टर, कुटुंब आणि आपल्या समाजाने मासिक पाळीतील वेदना गांभीर्याने घेणे महत्वाचे आहे. 

एंडोमेट्रिओसिसमुळे गुणवत्तापूर्ण जीवनावर होणारा परिणाम 

एंडोमेट्रिओसिस गुणवत्तापूर्ण जीवनावर परिणाम करते. एंडोमेट्रिओसिस असलेल्यांना सामान्य जीवन जगण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागतो. यामुळे शारीरिक, मानसिक, लैंगिक जीवन तसेच सामाजिक जीवनावर परिणाम होतो. एंडोमेट्रिओसिस असेल त्यांना तसेच त्यांचे जोडीदार, कुटुंब यांनासुद्धा मानसिक तसेच आर्थिकदृष्ट्या आव्हानांचा सामना करावा लागतो. एंडोमेट्रिओसिसच्या लक्षणांमध्ये जीवनाच्या विविध टप्प्यांवर बदल होऊ शकतो किंवा लक्षणांची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे जीवनात मोठे निर्णय घेताना याचा परिणाम होऊ शकतो जसे की विशिष्ट ठिकाणी शिक्षण घेणे, करियर, लग्न करणे, इत्यादी. महिलांना होणार्‍या वेदना गांभीर्याने न घेतल्याने तसेच उपचार घेऊन सुद्धा त्याचा काही परिणाम होत नसल्याने नैराश्य येते तसेच असहायता आणि एकटेपणाची भावना निर्माण होते. फक्त मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास इतर वेळी सुद्धा होऊ लागतो. कधी त्रास इतका होतो कि साधे बिछान्यातून उठणे किंवा साधी हालचाल करणे कठीण होते. कालांतराने हे दुखणे वाढत जाऊन वेदना इतक्या असह्य होतात की डोक्यात आत्महत्या करण्याचेही विचार येतात. असह्य वेदना कमी करण्यासाठी दिवसाला दोन ते तीन वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्याची गरज भासते. यामुळे नकारात्मक भावना, स्वतःविषयी दुर्बल वाटणे अशा भावना तीव्र होतात. 

मासिक पाळीतील दुखणे इतके सामान्य समजले जाते की त्यासाठी प्रत्येक महिन्याला सुट्टी घेण्याची काय गरज असे कामाच्या ठिकाणी वाटते. नेहमीच पोट दुखत असते असे कारण देणेसुद्धा योग्य वाटत नाही. यामागे प्रत्येक वेळी काय तेच तेच कारण द्यायचे अशी भावनासुद्धा असते. तसेच आपल्या समाजात मासिक पाळीविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे त्रास होत असेल तरी कामाच्या ठिकाणी सुट्टी घेणे टाळले जाते. किंवा सतत सुट्टी घेतल्याने काम आवडत नसल्याची किंवा अकार्यक्षम असल्याची भावना निर्माण होऊ शकते. मासिक पाळीदरम्यानच्या वेदनांची कल्पना नाही अशा लोकांना मासिक पाळी ही क्षुल्लक बाब वाटते आणि उगाचच महिलांना यानिमित्ताने सुट्टी मिळते असेही वाटतं. बीडमधील ऊस कामगार महिलांनी कामामध्ये खाडा होऊ नये म्हणून गर्भाशये काढून टाकण्याचा धक्कादायक प्रकार असो किंवा कामाच्या ठिकाणी मासिक पाळीची सुट्टी असावी की नाही यावरून चाललेल्या चर्चेवरून आपल्याला अंदाज येईलच की मासिक पाळीतील वेदना किंवा महिलांचे आरोग्य विशेषतः त्यांच्या गर्भाशयासंबधित आरोग्याकडे किती गांभीर्याने पाहिले जाते. मासिक पाळीची सुट्टी दिली तर महिलांचा कार्यक्षेत्रातील सहभाग कमी होवू शकतो असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले. याउलट मासिक पाळीची सुट्टी दिली तर महिलांची कार्यक्षमता वाढेल असे संशोधनातून समोर आले आहे. 

एंडोमेट्रिओसिस असणाऱ्या स्त्रियांना लक्षणांमुळे अकार्यक्षम असल्याची भावना येऊ शकते आणि त्यामुळे अपराधी वाटू शकते. असह्य वेदना आणि इतर लक्षणांमुळे काम करण्यास अडचणी येतात अशावेळी एंडोमेट्रिओसिस असलेल्यांना त्यांच्या कामाचा ताण कमी करण्यास अर्धा वेळ (part time) काम बघणे किंवा प्रसंगी काम सोडणेही भाग पडते. तसेच महत्त्वाची कामे किंवा प्रवास करणे पुढे ढकलावे लागते किंवा त्याचे व्यवस्थितरीत्या नियोजन करावे लागते. यामध्ये मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेण्यासारखे मार्गसुद्धा अवलंवले जातात. जव्हार तालुक्यातील यशोदा ताई म्हणतात “कितीही महत्त्वाचे काम असले तरी मला प्रवास करणे अजिबातच शक्य होत नाही. जरी एखाद्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तरी मी जात नाही.” इतक्या जास्त प्रमाणात त्यांना त्रास होतो. जर एखादी व्यक्ती वेदनांमुळे शाळा, काम चूकवत असेल किंवा कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नसेल तर ते गांभीर्याने घेणे खुपच महत्त्वाचे आहे. 

एंडोमेट्रिओसिसचे उशीरा निदान किंवा चुकीचे निदान झाल्यामुळे महिलांच्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो. एंडोमेट्रिओसिसचे निदान होण्यास साधारणतः दहा वर्षे लागतात. या कालावधीत हा आजार पसरण्यास मुभा मिळते ज्यामुळे विविध अवयव आणि मज्जातंतूंचे लक्षणीय नुकसान होते तसेच या आजाराची व्याप्ती इतकी वाढते की, उपचार (शस्त्रक्रिया) करणे गुंतागुंतीचे होते. तसेच एंडोमेट्रिओसिस मुळे अंडाशय, गर्भाशय, किडनी, मूत्रमार्ग आणि इतर अवयवांचे गंभीर नुकसान होते तसेच ते निकामी होण्याचीही शक्यता असते. प्रसंगी ते अवयव काढून टाकण्याचीही वेळ येते. किडनीचे नुकसान होणे हे जास्त करून दिसून येते. 

डॉ. श्वेता यांचा एंडोमेट्रिओसिस सिस्ट इतका पसरला होता की त्यामुळे एक अंडाशय पूर्णतः निकामी झाले होते व शस्त्रक्रियेच्या वेळी ते काढून टाकावे लागले. त्यांची शस्त्रक्रिया होऊन एक वर्ष झाले असले तरी त्यांना शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या अजून पूर्णपणे बरे झाल्यासारखे वाटत नाही. त्यांना मासिक पाळीत वेदना होणे, अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्स होणे, थकवा येणे, कमजोर वाटणे अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा जीवन सुरळीत होण्यासाठी काही काळ जाऊ शकतो. ज्यांची शस्त्रक्रिया एकापेक्षा जास्त वेळा होते त्यांना अशा प्रक्रियेतून अनेक वेळा जावे लागते. त्यांना होणार्‍या त्रासाचा विचार करणेही अशक्य वाटते. या कालावधीत मदतीची आणि पाठिंब्याची खूप गरज असते. मला शस्त्रक्रियेनंतर खूप नैराश्य आले होते व पहिल्यांदा मला समुपदेशन अर्थात काऊन्सलिंगची गरज वाटली होती.

मला शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा खूपच जास्त रक्तस्त्राव झाला. एका वेळी दहा सॅनिटरी पॅड कमी पडतील इतका रक्तस्त्राव व्हायचा. बाथरूमला गेलं तरी चक्कर यायची. त्यामुळे आठवडाभर फक्त अंथरुणात पडून राहण्याव्यतिरीक्त पर्याय नव्हता. डॉक्टरांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की असे दोन तीन महिने मासिक पाळी आल्यावर होऊ शकते. याची कल्पना त्यांनी शस्त्रक्रिया होण्याच्या आधी दिली नव्हती. यामागे कदाचित रुग्ण घाबरून जाऊ नये हे कारण असू शकते. आपल्या शरीरात झालेल्या बदलांची शरीराला सवय होण्यास वेळ लागतो म्हणून असे होते असे डॉक्टरांनी सांगितले. सुदैवाने मला असा त्रास फक्त एकदाच झाला. शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे ठीक होण्यासाठी काही महिने लागू शकतात किंवा वर्षसुद्धा लागू शकते. आता यावरून ज्यांची शस्त्रक्रिया दोनपेक्षा जास्त वेळा होते त्यांना होणारा त्रास किती असेल याची कल्पना करू शकतो. शस्त्रक्रियेनंतर मला होणार्‍या वेदनांचा त्रास खूपच कमी झाला असला तरी तो पूर्णपणे बरा झालेला नाहीये. अजूनही मासिक पाळी आली की मला वेदनाशामक गोळी घ्यावी लागते. हा एक न संपणारा संघर्ष आहे. 

फोटो ४. एंडोमेट्रिओसिसमुळे गुणवत्तापूर्ण जीवनावस परिणाम करणारे घटक 

मला या प्रवासात आलेल्या अनुभवांवरून असे वाटते की एंडोमेट्रिओसिस किंवा अशाप्रकारच्या गर्भाशयासंबंधित वेदनादायी समस्यांवर योग्य डॉक्टर शोधणे, या वेदना गांभीर्याने घेणे, प्रत्यक्षात उपचार घेणे आणि त्यानंतरसुद्धा संघर्ष करावा लागतो. म्हणजेच प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षांमागे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक कारणे मोठ्या प्रमाणात आहेत. याकडे सहानुभूतीने लक्ष देण्याची गरज आहे. एंडोमेट्रिओसिस ही केवळ स्त्रीरोगविषयक किंवा फक्त गर्भाशयासंबधित समस्या नाही तर हा एक बहुप्रणाली आजार आहे व त्यास गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मासिक पाळी, लैंगिक शिक्षण व प्रजनन आरोग्य आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता वाढण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. एंडोमेट्रिओसिसला संबोधित करण्यासाठी सरकारने प्रभावी धोरणे आखणे याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी करून जनजागृती करणे गरजेचे आहे. एंडोमेट्रिओसिस प्रतिबंध, निदान, उपचार यासाठी प्रभावी मॉडेल उभारण्यासाठी संशोधनास प्राधान्य देण्यात यावे. 

एंडोमेट्रिओसिससोबतच आपल्या समाजात मासिक पाळीबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे. मासिक पाळीबाबत असलेल्या गैरसमजुती व पुरुषप्रधान समाजामुळे मासिक पाळीशी संबंधित गंभीर समस्या, जसे की पीसीओएस/पीसीओडी, एंडोमेट्रिओसिस याकडे योग्य ते लक्ष दिले जात नाही. अमेरिकेसारख्या देशातही मासिक पाळीवर सार्वजनिक चर्चा करणे निषिद्ध मानले जायचे. १९७२ पर्यंत ‘पीरियड’ हा शब्द जाहिरातीमध्ये वापरण्यास बंदी होती. अमेरिकन सरकारने बंदी हटवल्यानंतर १९८५ मध्ये पहिल्यांदा टॅम्पानच्या जाहिरातीमध्ये हा शब्द वापरला गेला. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रकिया आहे आणि ते अगदीच सामान्य आहे अशाप्रकारे मासिक पाळीकडे पाहिले पाहिजे. आपल्या समाजात मासिक पाळीकडे अपवित्र, लज्जास्पद आणि जाहीरपणे बोलता न येणारी गोष्ट म्हणून पाहिले जाते. घरातील पुरुष व्यक्तींना मासिक पाळीतील त्रासाबद्दल काही माहीत नसते किंवा त्यांच्याशी याविषयी बोलले जात नाही. विज्ञान एवढे पुढे गेले असले तरी सुद्धा मासिक पाळीबद्दल अजूनही आपल्या समाजात अनेक रूढी परंपरा पाळल्या जातात. मग ते शहरात असो की खेड्यात असो, मासिक पाळीबाबत मोकळेपणाने बोलले जात नाही. साधे मेडिकलमधून पॅड खरेदी करण्यात लाज बाळगली जाते किंवा ते मागितले तरी काळ्या पिशवीमध्ये गुंडाळून दिले जाते. 

मासिक पाळी महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असला तरी पाळीसंबंधीच्या गैरसमजांमुळे महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि प्रसंगी जीवही गमवावा लागतो. मासिक पाळीकडे अशुद्ध तसेच अस्पृश्य म्हणून पाहिले जाते. मासिक पाळी आल्यानंतर पाण्याला स्पर्श करणे, स्वयंपाक करणे किंवा धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभांमध्ये सहभागी होण्यास मनाई केली जाते. नेपाळमध्ये किंवा महाराष्ट्रातील गडचिरोली भागात अजूनही महिलांना मासिक पाळीच्या काळात ४-५ दिवस घरापासून लांब असलेल्या स्वतंत्र झोपडीत रहावे लागते त्याला 'कुर्माघर' असे म्हणतात. ह्या झोपड्यांमधे सोयीसुविधांची कमतरता असते त्यामुळे प्रसंगी म्रृत्यू ओढवण्याचीही शक्यता असते. 

मार्च २०२३ मध्ये मुंबईतील मालवणी भागातील १४ वर्षीय मुलीने नैराश्य आल्यामुळे आत्महत्या केली कारण तिला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती आणि तिला आपल्याला काय होत आहे हे समजेलच नाही. तर मे २०२३ मध्ये उल्हासनगर भागात १२ वर्षीय मुलीची तिच्या ३० वर्षीय भावाने हत्या केली. त्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. तिच्या भावाने कपड्यांवर असलेल्या रक्ताच्या डागांमुळे ती लैंगिकरित्या सक्रिय असल्याच्या संशयावरून असे पाऊल उचलले. २०२० च्या युनिसेफच्या सर्वेनुसार भारतात अजूनही ७१% मुलींना मासिक पाळीविषयी तोपर्यंत कल्पना नसते, जोपर्यंत त्यांना पहिली मासिक पाळी येत नाही. यावरून कल्पना आली असावी की आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मासिक पाळीभोवती असणाऱ्या कलंकांमुळे आणि लैंगिक शिक्षणाच्या कमतरतेमुळे मासिक पाळीबाबतचे ज्ञान मर्यादित राहते. त्यामुळे मुलींना सामाजिक व मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. ज्यामुळे त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. मासिक पाळीबरोबरच लैंगिक शिक्षणसुद्धा महत्वाचे आहे आणि तेही प्रत्येक घटकासाठी. त्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.  

**या लेखात सहभागींची नावे बदलली आहेत. 

- तनुजा हरड
tanuja.harad@gmail.com

 


संदर्भ :

Links to Articles 
https://www.endometriosis-india.com/ 

https://theprint.in/health/endometriosis-dismissed-as-period-pain-must-be-prioritised-as-womens-health-issue-says-study/1968976/ 

https://www.bbc.com/news/uk-wales-68533803  

https://scroll.in/article/1045568/how-the-medical-system-gaslights-women-who-have-endometriosis 

https://www.thehindu.com/sci-tech/science/menstrual-products-tested-blood-misleading-advertisements/article67259290.ece 

https://www.theguardian.com/global-development/2023/may/01/indias-taboos-around-womens-pain-leave-endometriosis-sufferers-in-agony-acc 

https://www.nature.com/articles/s41598-021-99681-3 

https://www.theguardian.com/society/2023/nov/20/two-thirds-women-uk-work-periods-menstruation-symptoms-survey-report 

https://bmcwomenshealth.biomedcentral.com/articles/10.1186/s12905-024-03369-5 

YouTube Videos
https://www.youtube.com/watch?v=gUzCUvrjMbc 

https://youtu.be/mpUMoiMvdB8?si=99PPU2ZqENcPUpQO 

https://youtu.be/UU11WzuzGCc?si=Guimqtbu4VEraLus 

https://youtu.be/lqOhzx_NWpY?si=sRxmbVVLtd3dejTH 

Podcast
https://open.spotify.com/show/60pXr3tShkFiDwh3XTFNJ2?si=AsuNfWdkTrSbVpmcaOtZNQ 

Tags: स्त्रियांचे आरोग्य प्रजनन आरोग्य एंडोमेट्रिओसिस साधना युवा अभ्यासवृत्ती 2024 अनिल अवचट अभ्यासवृत्ती तांबे रायमाने अभ्यासवृत्ती endometriosis Load More Tags

Add Comment