मार्च 2024 मध्ये साधना साप्ताहिकाच्या वतीने युवा अभ्यासवृत्तीसाठी अर्ज मागवले होते. 124 अर्ज आले होते. त्यातून सात जणांची निवड केली होती. त्यांपैकी तिघांचे अभ्यास विषय आरोग्याशी संबंधित होते. त्यांनी पुढील सहा महिने लायब्ररी वर्क व फील्ड वर्क करून रिपोर्ताज सादर केले. ते लेखन जानेवारी महिन्यात कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टलवरून प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये तनुजा हरड हिने घेतलेला विषय होता, एंडोमेट्रिओसिस या आजाराची आव्हाने, रेणुका कल्पनाचा विषय 'ग्रामीण भागातील मानसिक आरोग्य' आणि डॉ. पूजा नांगरे हिने घेतलेला विषय होता, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची आहार पद्धती. प्रत्येकी पाच ते सात हजार शब्दांचे हे लेख प्रत्येकी तीन भागांमध्ये कर्तव्यवर क्रमशः प्रसिद्ध होतील.
त्यापैकी पहिला लेख तनुजा हरड हिचा आहे. या लेखात एंडोमेट्रिओसिस या महिलांच्या प्रजनन आरोग्याशी निगडीत समस्येचा आढावा घेतलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या २०२३ च्या सर्वेनुसार एंडोमेट्रिओसिस जगभरात सुमारे १९ कोटी महिलांना भेडसावणारा पण तरीही तुलनेने दुर्लक्षित आजार आहे. या आजारचा अनुभव स्वतः तनुजाने घेतलेला असून, त्यावर उपचार मिळवण्यासाठी तिला जे अनुभव आले, त्यातून या अभ्यासाची सुरुवात करून तिने हा आढावा घेतला आहे. याविषयी केवळ वाचणेही वेदनादायक आहे, परंतु या समस्येविषयी आणि उपाययोजनांविषयी 'अवेअरनेस' समाजात निर्माण होणेही अत्यावश्यक आहे.
मी गेल्या चार वर्षांपासून मासिक पाळी आणि प्रजनन आरोग्य या विषयावर जनजागृतीचे काम करत आहे. मी पालघर जिल्ह्यातील जव्हार सारख्या आदिवासी भागात तसेच कलकत्ता येथे तुरुंगातील महिलांच्या मासिक पाळी आरोग्य व व्यवस्थापन यावर काम केले आहे. या अभ्यासाच्या उद्देशाने मी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सहभागी आणि डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मी आठ महिलांच्या आणि दोन डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये एक स्त्रीरोगतज्ज्ञांची मुलाखत व एक एंडोमेट्रिओसिस तज्ञांची मुलाखत घेतली आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहभागींपैकी कोणाला एंडोमेट्रिओसिस असल्याचे निदान झाले नाहीये. शहरी भागातील महिलांना एंडोमेट्रिओसिसचे निदान झाले आहे किंवा ज्यांची शस्त्रक्रिया झाली आहे यांच्या मुलाखती घेतल्या. त्यामानाने ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांची कमतरता आणि जनजागृतीचा अभाव, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक कारणांमुळे सुद्धा ग्रामीण भागात एंडोमेट्रिओसिसबद्दल माहिती नाहीये आणि म्हणून मी ज्यांना भेटली त्यांचे निदान झाले नसावे.
मासिक पाळी आल्यावर ओटीपोटात खूप दुखत असल्याने व असह्य वेदना होत असल्याने मी कल्याणला स्त्रीरोगतज्ज्ञांकडे उपचार घेत होती. सहा महिने ट्रीटमेंट घेऊनसुद्धा मला काही फरक जाणवत नव्हता. मग त्यांनी म्हटले की एक रक्ताची चाचणी करूया आणि त्यामधे जर असे आढळले की तुला होणारा त्रास आनुवंशिक आहे तर मग तो लग्नानंतर किंवा मूल झाल्यानंतर बरा होईल. त्यांनी असे सांगितल्याने त्यांच्याकडे उपचार घेण्याचा माझा मूडच गेला. मी त्यांनी सांगितलेली रक्ताची चाचणीसुद्धा केली नाही आणि त्यांच्याकडे उपचार घेणेही सोडून दिले कारण अशाप्रकारची उत्तरे ऐकून मला कंटाळा आला होता. या अनुभवानंतर मी तीन वर्षे डॉक्टरांकडे जाणे टाळले होते. असे केल्याने माझा त्रास काही कमी झाला नाही. खरंतर तो अजून वाढला.
कल्याणलाच दुसर्या एका स्त्रीरोगतज्ज्ञांकडे तीन-चार महिने होऊनसुद्धा काही फरक वाटत नव्हता म्हणून नक्की काय करायचं ते सांगा म्हणून मी आग्रह धरला होता. सोनोग्राफी आणि एमआरआय रिपोर्ट नॉर्मल आले होते. तेव्हा त्यांनी म्हटले की लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीतून गर्भाशयाची तपासणी करून त्यात काही आढळले तर तुला नक्की कशामुळे त्रास होतो हे समजू शकते. याचा खर्च ५० हजार पेक्षा जास्त येईल असे सांगितले होते. परंतु तरीसुद्धा खात्रीपूर्वक आजाराचे निदान होईल किंवा तुझा त्रास कमी होईल असे नाही सांगता येणार. यावर मी म्हटले, “जर तुम्ही खात्री देत नाहीत तर मी लॅप्रोस्कोपी करण्याचा निर्णय का घेऊ? आणि त्याचा होणारा इतका खर्च का करू? यासाठी मी काय करू शकते?” असं त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “मग होणारा त्रास सहन कर.” याच डॉक्टरांकडे एकदा माझा नंबर येण्यासाठी वाट बघत असताना मला असह्य वेदना व्हायला लागल्या होत्या त्यावेळी नर्सला सांगून त्यांनी मला वेदनाशामक इंजेक्शन दिले होते व माझा नंबर येईपर्यंत वाट बघायला लावली होती.
वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटी देऊनसुद्धा एकसारखी उत्तरे ऐकून मी वैतागले होते. यानंतर मी एंडोमेट्रिओसिस तज्ञांशिवाय इतर कोणत्याही डॉक्टरांकडे जाणार नाही असे ठरवले होते, कारण तोपर्यंत मला एंडोमेट्रिओसिसविषयी थोडीफार माहिती झाली होती. मला होत असलेला त्रास आणि या आजाराची लक्षणे बरीच सारखी होती. मग मी याविषयीची अजून माहिती आणि याचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा इंटरनेटवर शोध घेणे सुरू केले. मी मुंबईतील एका एंडोमेट्रिओसिस तज्ञांची माहिती मिळवली आणि त्यांना भेट दिली असता एडेनोमायोसिसचे निदान झाले. तसेच डॉक्टर म्हणाले की पूर्वी काढलेल्या एमआरआय रिपोर्ट मध्येच हे निदान व्हायला हवं होतं. एडेनोमायोसिसमध्ये गर्भाशयात एंडोमेट्रियम सिस्ट (रक्ताच्या गुठळ्या असलेली गाठ) तयार होते.
माझा जन्म पालघर जिल्ह्यातील एका लहानशा गावात झाला. दोनशे अडीचशे घरं असलेलं माझं गाव आहे. मला वयाच्या सोळाव्या वर्षीपासून मासिक पाळी आल्यावर असह्य त्रास व्हायला सुरू झाला. मला शाळा, कॉलेजला सुट्टी घ्यायला लागायची. प्रत्येक महिन्याला दवाखान्यात नेले जायचे. माझ्या गावात डॉक्टर नसल्याने व वाहनांच्या सुविधा नसल्याने माझ्या आईची मला डॉक्टरकडे नेताना तारांबळ उडायची. मी माझ्या भागातील फिजिशियन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच कल्याण, मुंबई, हैदराबाद सारख्या शहरांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांकडे उपचार घेऊन सुद्धा योग्य तो फरक वाटला नाही. कालांतराने त्रास इतका वाढला की मासिक पाळी आल्यावर दुखायचंच पण इतर वेळी सुद्धा म्हणजे पाळी आली नसली तरी ओटीपोटात असह्य वेदना होऊ लागल्या. एकाच वेळी ओटीपोटात दुखणे, उलटी येणे, घाम येणे, शौचास वाटणे व त्याजागी वेदना होणे असा त्रास होत असे. अशावेळी नक्की काय करू आणि काय नको काही समजत नसायचे. मी रडायचे ओरडायचे आणि अक्षरशः वेदनांनी गडबडा लोळायची. माझी अवस्था पाहून माझ्या आईलाही रडू येत असे. प्रत्येक महिन्याला किमान दोन दिवस अंथरुणात पडून असायचे. यावेळी काही खात पीत नसायचे तसेच कोणतंही काम करायला जमत नसायचे किंवा साधारण हालचाली करायला जमत नसायचे. एका दिवसाला दोन ते तीन वेदनाशामक गोळ्या किंवा प्रसंगी वेदनाशामक इंजेक्शन घेण्याची वेळ यायची. तसेच सतत गरम पाण्याची पिशवी पोटावर लावून असायची. शेवटी खूप डॉक्टरांना भेटी दिल्यानंतर वयाच्या तिसाव्या वर्षी एडेनोमायोसिसचे निदान झाले व ऑपरेशन करावे लागले.
Personal is Political
माझे वैयक्तिक अनुभव महत्वाचेच. तसेच माझ्या या वैयक्तिक अनुभवांमागे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय कारणे आहेतच. मी उपचारांसाठी फिरत असताना माझे इतर रुग्णांशी बोलणे होत असे. त्यांचे अनुभवसुद्धा मला माझ्या अनुभवांसारखेच वाटले. तसेच मी याच विषयावर काम करत असल्याने कामाच्या निमित्ताने मी अशा महिलांना, मुलींना भेटली आहे ज्यांना अशाप्रकारचा त्रास होतो. एवढंच कशाला, तर आपल्या कुटुंबात, नातेवाईकांत, शेजारी पाजारी असे कोणीना कोणी असेलच ज्यांना मासिक पाळी आल्यावर त्रास होत असेल, भयंकर दुखत असेल. माझ्या आईलाही असा त्रास होत असे. तिची गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया झाली आहे. यामागे काय कारणे असावीत याचा शोध घेण्याची व अभ्यास करण्याची मला गरज वाटली म्हणून मी हा विषय निवडला. या अभ्यासाच्या निमित्ताने मी ज्यांना भेटली त्यांचे अनुभवसुद्धा मला आलेल्या अनुभवांपेक्षा वेगळे नाहीत. त्यापैकी काही अनुभव मी इथे मांडत आहे.
प्रिया सोळा वर्षांची आहे आणि सध्या दहावीत शिकत आहे. प्रिया आठवीला होती तेव्हापासून तिला मासिक पाळी यायला लागली. मासिक पाळी येणे सुरू झाल्यापासूनच तिला अतिशय त्रास होतो. प्रियाच्या ओटीपोटात खूप दुखते तसेच चक्कर येणे, उलटी होणे, पाय, कंबर दुखणे असा त्रास होतो. ती पाळीच्या पाहिल्या दिवशी शाळेत जात नाही किंवा शाळेत असेल तर तिला घरी यावे लागते. दिवसभर ती काही खात नाही आणि फक्त अंथरुणात पडून असते. तिला होणारा ञास इतका असह्य होतो की प्रियाला अगदी प्रत्येक महिन्याला डॉक्टरकडे घेऊन जायला लागते. प्रियाला मासिक पाळी आल्यावर एक दोन दिवस तिची आईसुद्धा कामावर जात नाही. प्रियाची आई मजुरीचे काम करते. त्यांना प्रियाची काळजी घ्यावी लागते. ओटीपोट गरम पाण्याने शेकवणे, हात पाय मळणे, जेवायला देणे, इ. अशी प्रियाची काळजी घ्यावी लागते. प्रिया पालघर जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहते.
अनुजाचं (वय २९ वर्ष) लहानपण आणि शिक्षण उल्हासनगर येथे झाले. ती पंधरा वर्षांची असल्यापासून मासिक पाळी यायला सुरू झाली. तिला मासिक पाळी सुरू झाल्याच्या दुसर्या ते तिसर्या वर्षीपासून पाळी आल्यावर त्रास व्हायला सुरू झाला. तिला मासिक पाळी आल्यावर ताप येणे, उलटी होणे, ओटीपोट दुखणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे (एकावेळी दोन पॅड लावायची गरज पडणे) असा त्रास सुरू झाला. कालांतराने हा त्रास वाढत जाऊन लघवी आणि मल विसर्जनावेळी त्रास होणे, वेदनादायी लैंगिक संबंध याचीही भर पडली. इतक्या वर्षांमध्ये तिने ठाणे, कल्याण, मुंबई मध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचार घेतले. तसेच तिने अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा सगळ्या प्रकारचे उपचार घेऊनसुद्धा नक्की कशामुळे इतका त्रास होतो हे समजत नव्हते. तिच्या अंडाशयाला सिस्ट/गाठ आहे आणि त्याला एंडोमेट्रिओसिस असे म्हणतात हे साधारणतः एका ते दोन वर्षांपूर्वी तिला समजले आहे.
साराला (वय ३० वर्षे) वयाच्या सोळा - सतराव्या वर्षापासून मासिक पाळी आल्यावर खूप जास्त रक्तस्त्राव होणे, पाळी सात दिवसांपेक्षा जास्त दिवस राहणे आणि ओटीपोटात दुखणे असा त्रास सुरू झाला. त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेल्या असता ही पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) ची लक्षणे आहेत असे सांगून गर्भनिरोधक गोळ्यांचा उपचार चालू केला गेला. परंतु उपचारांमुळे त्यांचा त्रास काही थांबला नाही. त्यांनी मुंबई, गोवा, दिल्ली यासारख्या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटी दिल्या तरीसुद्धा योग्य तो उपचार मिळाला नाही. कालांतराने त्यांचा त्रास वाढून लघवी आणि मल विसर्जनावेळी त्रास होणे, वेदनादायी लैंगिक संबंध असाही त्रास सुरू झाला. तसेच त्या दिवसाला दोन ते तीन जास्त पॉवर असलेल्या वेदनाशामक गोळ्यासुद्धा घेऊ लागल्या. अशा त्रासामुळे त्यांना वाटले की मूतखड्याचा आजार असू शकतो म्हणून त्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्या तेव्हा एमआरआय (MRI) मध्ये समजले की मुतखडा नसून अंडाशयावर सिस्ट (एंडोमेट्रियम टिश्यू/गाठ) आहे आणि हा गर्भाशयासंबंधी आजार आहे. दहा वर्षानंतर म्हणजेच वयाच्या २७-२८ व्या वर्षी जेव्हा एंडोमेट्रिओसिसचे निदान झाले तेव्हासुद्धा स्त्रीरोगतज्ज्ञांनी ते पीसीओएस/पीसीओडी सारखे आहे असे सांगून गर्भनिरोधक गोळ्यांची ट्रीटमेंट चालू केली होती. त्यांनासुद्धा एंडोमेट्रिओसिस तज्ञ शोधताना माझ्यासारख्याच अडचणी आल्या. दोन वर्षांपूर्वी त्यांची शस्त्रक्रिया झाली. यामध्ये गर्भाशयातील अंडाशयावर असणारे एंडोमेट्रियम टिश्यू रोबोटचा वापर करून काढण्यात आले. त्यांच्या शरीरात एंडोमेट्रियम टिश्यू अंतरंग भागात असल्याने शस्त्रक्रियेत रोबोटचा वापर करावा लागला. त्यांची शस्त्रक्रिया झाली असली तरी त्यांचा आजार पूर्णपणे बरा झालेला नाही. तज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढे जाऊन शक्यतो गर्भपिशवी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करायला लागू शकते. सारा मुंबईतील आहेत.
एंडोमेट्रिओसिस काय आहे ते समजून घेऊया
एंडोमेट्रिओसिस ही गर्भाशयासंबंधित अतिशय वेदनादायी समस्या आहे. यात वेदना काळानुरूप वाढत जातात. वेदना इतक्या असह्य होतात की अक्षरशः जीव जातोय की काय असा भास होतो. एंडोमेट्रियम (Endometrium) हे गर्भाशयाचे सर्वात आतील आवरण मासिक पाळीत रक्तस्त्रावात गळून पडते. एंडोमेट्रिओसिस तेव्हा उद्भवते जेव्हा एंडोमेट्रियल पेशी ज्यांनी एंडोमेट्रियम हे आवरण बनते, गर्भाशयाच्या व्यतिरिक्त अंडनलिका, अंडाशय किंवा काही दूरच्या अवयवांमध्ये वाढू लागतात. या एंडोमीट्रियम पेशींचे मुख्य कार्य वाढणार्या गर्भास पोषण देणे होय. जेव्हा गर्भधारणा होत नाही तेव्हा हे आवरण गळून पडते, म्हणजेच पाळी येते. परंतु, चुकीच्या ठिकाणी वाढलेल्या एंडोमेट्रियम सारख्या दिसणाऱ्या या पेशी मासिक पाळीदरम्यान एंडोमेट्रियम सारख्या शरीराबाहेर पडत नाहीत. अर्थात रक्त वाहून जायला वाटच नसल्याने त्या तिथल्या तिथेच राहातात. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या या प्रक्रियेमुळे घट्ट व मेदयुक्त पेशी तयार होतात. या तंतुमय पेशींचा उदराच्या आतील भागात थर तयार होतो. त्यामुळे गर्भाशय, अंडाशय, अंडनलिका आणि आतडे यांना त्या चिकटून बसतात. आणि या पेशींमुळे वेदना होतात.
एंडोमेट्रिओसिसमध्ये एंडोमेट्रिअल टिश्यू गर्भाशयाच्या व्यतिरिक्त अंड नलिका, अंडाशय किंवा काही दूरच्या अवयवांमध्ये वाढू लागतात तर एडेनोमायोसिसमध्ये हे टिश्यू गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतींमध्ये वाढतात. एंडोमेट्रिओसिस व एडेनोमायोसिस दोन्हींची लक्षणे शक्यतो सारखीच असतात व निदानासाठी काही वर्षे लागू शकतात.
एंडोमेट्रिओसिस मुळे अतिशय वेदनादायी मासिक पाळी आणि याचबरोबर पाळी दरम्यान चक्कर येणे, उलटी होणे, जास्त रक्तस्त्राव, अनियमित पाळी येणे, प्रजनन क्षमता कमी होणे, मल विसर्जनाच्या वेळी त्रास होणे, लैंगिक संबंधाच्या वेळी वेदना यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. नक्की काय कारणांनी हा आजार होतो हे अजून नेमके माहीत नाही. पण असे म्हणतात की, पाळीच्या वेळी थोडेसे रक्त नलिकांद्वारे उलटे वाहते आणि ओटीपोटात सांडते. यातल्या काही पेशी तिथेच घर करतात. एंडोमेट्रिओसिस पहिल्या पाळीपासून सुरू होऊन ते शेवटच्या पाळीपर्यंत असू शकते. एंडोमेट्रिओसिसचे आनुवंशिकता हेही एक कारण असू शकते. या आजारावर खात्रीशीर उपाय अजूनही माहीत नाही. त्यामुळे हा आजार पूर्ण बरा होईल अशी खात्री नाही पण या आजाराची लक्षणे नियंत्रणात ठेवता येण्यासाठी त्यावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करतात. काहींना एंडोमेट्रिओसिस असेल तरी काही त्रास होत नाही (याचे प्रमाण साधारणतः २०-२५% आहे) तर काहींना रजोनिवृत्ती नंतरही त्रास चालू राहू शकतो. कुठल्याही गंभीर विकाराचे जितके परिणाम मानवी शरीरावर होतात, तितक्याच पातळीचे परिणाम या त्रासांमुळे होऊ शकतात. तसेच डायबेटिस इतका हा आजार सर्वत्र आढळणारा आहे. असे असूनसुद्धा जगात कुठेही या आजाराची फारशी दखल घेतली जाते असं दिसून येत नाही.
जगभरात दहा पैकी एका महिलेला म्हणजेच १०% महिलांना हा आजार आढळतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या २०२३ च्या सर्वेनुसार एंडोमेट्रिओसिस जगभरात जवळपास १९ कोटी प्रजननक्षम (Reproductive age) म्हणजेच १५ - ४९ वर्षांमधील महिलांना आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ च्या २०२४ च्या सर्वे नुसार भारतात अंदाजे ४.३ कोटी महिलांना एंडोमेट्रिओसिस आहे. एंडोमेट्रिओसिस बद्दल जागरूकता इतक्या कमी प्रमाणात आहे की एंडोमेट्रिओसिस असलेल्या ५४% महिलांना माहीतही नाही की हे नक्की काय आहे.
फोटो १. एंडोमेट्रिओसिस असलेले स्त्री प्रजनन अवयवसंस्था
अमेरिकेतील एंडोमेट्रिओसिस असोसिएशनने १९९३ पासून मार्च महिना हा 'एंडोमेट्रिओसिस जनजागृती' महिना म्हणून साजरा करणे सुरू केले आणि आता तो दरवर्षी जगभरात साजरा केला जातो. एंडोमेट्रिओसिसविषयी असलेले गैरसमज दूर करणे, एंडोमेट्रिओसिसचे निदान लवकर व्हावे व याविषयी जनजागृती निर्माण व्हावी याउद्देशाने हा महिना साजरा केला जातो. तसेच २०१४ पासून २८ मे हा ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ म्हणून युनायटेड नेशन्सने (UN) चालू केला आहे. मासिक पाळीविषयी संवाद वाढावा व जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. परंतु माझ्या मते याबाबत बऱ्याच जणांना कल्पनाही नसावी.
**या लेखात सहभागींची नावे बदलली आहेत.
- तनुजा हरड
tanuja.harad@gmail.com
2024 या वर्षात साधना साप्ताहिकाच्या वतीने दिलेल्या तांबे रायमाने अभ्यास वृत्तीतून तीन लेख आकाराला आले आणि अनिल अवचट अभ्यास वृत्तीतून तीन लेख आकाराला आले. यासाठीची काही आर्थिक तरतूद श्रीकांत तांबे व ल. बा. रायमाने यांच्या कुटुंबीयांनी केली होती , तर काही आर्थिक तरतूद विवेक केले यांच्या टीम ग्लोबल या कंपनीने केली होती. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद!
- संपादक, साधना
Tags: साधना युवा अभ्यासवृत्ती 2024 तांबे रायमाने अभ्यासवृत्ती अनिल अवचट अभ्यासवृत्ती स्त्रियांचे आरोग्य प्रजनन आरोग्य endometriosis Load More Tags
Add Comment