मागील अर्धशतकात सर्वाधिक गाजलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या मराठी लेखांची यादी करायची ठरवली तर पहिल्या दहांमध्ये समावेश करावा लागेल असा एक लेख साधना साप्ताहिकात 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हाच तो लेख. 15 ऑगस्ट 1972 च्या साधना अंकात तो प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाने साधनाच्या आत आणि बाहेर प्रचंड गदारोळ माजवला होता. भारतीय स्वातंत्र्याला 25 वर्षे पूर्ण होणे आणि साधना साप्ताहिकाने 25 व्या वर्षात पदार्पण करणे, असे दुहेरी औचित्य साधून काढल्या गेलेल्या ‘स्वतंत्र भारतातील दलितांची 25 वर्षे’ या विषयावरील तो विशेषांकातील तो लेख होता. त्या अंकाचे संपादन केले होते अनिल अवचट यांनी. आणि त्यावेळी साधनाचे संपादक होते यदुनाथ थत्ते.
त्यानंतर आलेल्या 9 सप्टेंबरच्या अंकात ‘तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही!’ हा एस.एम. यांचा लेख आहे. वैचारिक स्पष्टता, प्रामाणिकता, पारदर्शकता आणि तर्कनिष्ठ व विवेकी भूमिका यांचा (ऑल टाईम) अप्रतिम नमुना म्हणून या लेखाचा उल्लेख करावा लागेल.
15 ऑगस्ट 1972 चा तो अंक निघाला, त्या घटनेला आता 50 वर्षे पूर्ण होत आहेत आणि देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हे निमित्त साधून तो संपूर्ण अंक आणि त्यावरील सर्व वादसंवाद यांचे संकलन असलेले हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून येत आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी साधना साप्ताहिक अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने सायंकाळी साडेपाच वाजता एस. एम. जोशी सोशलिस्ट फौंडेशनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर एस.एम. जोशींचा तो लेख ऑडिओ स्वरूपात प्रसारित करत आहोत.
Tags: राजा ढाले स्वातंत्र्यदिन साधना विशेषांक साधना प्रकाशन नवे पुस्तक एस. एम. जोशी दुर्गा भागवत Load More Tags
Add Comment