सर्वसमावेशक, झुंजार लढवय्या : प्रा. शेखर सोनाळकर

देशातील लोकशाही वाचवण्याच्या सर्वंकष लढ्यात सोनाळकरांची उणीव नक्कीच भासणार आहे.

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि जळगाव येथील एम. जे. महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक शेखर सोनाळकर यांचे 4 ऑगस्ट 2023 ला वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. सत्तरच्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून जडण-घडण झालेल्या सोनाळकर यांनी आणीबाणीत कारावास पत्करला होता. जयप्रकाशांनी 'छात्र युवा संघर्ष वाहिनी'चा महाराष्ट्र राज्याचा पहिला संयोजक म्हणून त्यांची नेमणूक एस. एम. जोशी यांच्या शिफारशीने केली होती. पत्नी वासंती दिघे यांच्यासह गेली चाळीसहून अधिक वर्षे त्यांचा महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग होता. रझिया पटेल यांनी त्यांच्या जीवनकार्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप. 

शेखर सोनाळकर हे नाव डोळ्यांसमोर येतं ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील सामाजिक, राजकीय चळवळींवर ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून. पुण्या-मुंबईबाहेर ग्रामीण महाराष्ट्रात या चळवळींचं वैचारिक नेतृत्व शेखर सोनाळकर यांनी आयुष्यभर केलं. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच समतावादी चळवळींशी त्यांचा संपर्क होता.

माझा त्यांच्याशी संपर्क आला, तो मी घर सोडून चळवळीत आले तेव्हा. ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’च्या जळगावच्या कार्यालयात मी आधी गेले. हे कार्यालय शेखर सोनाळकरांच्या वाड्यातील एका खोलीत होतं. मी सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या घरी राहिले. घरी त्यांच्या आई कुसुमताई सोनाळकर आणि शेखर हे दोघेच होते. पण दिवसभर कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. खूप तरुण मुलं-मुली त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन त्यांच्याशी जोडली गेली होती. त्यांच्या कामाची पद्धत म्हणजे मी नेता आणि तुम्ही अनुयायी अशी कधीच नव्हती. त्यामुळे त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणारे आम्ही त्यांना ‘शेखर’ अशी हाक मारत असू. दुसरं म्हणजे, त्यांच्याशी असलेले मतभेद कुठली भीती न बाळगता त्यांच्याशी बोलता यायचे. एकीकडे अन्यायाविरुद्ध चीड आणि आक्रमकता तर दुसरीकडे एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व असं त्यांचं रूप होतं. त्यांच्याभोवती जमा झालेल्या आमच्या सर्वांची आयुष्यं त्यांनी बदलून टाकली. मुख्य म्हणजे वैचारिक बैठक त्यांनी पक्की केली. राजकीय, सामाजिक विश्लेषण करायची सवय लावली, तीही ‘लोकल टू ग्लोबल’ पातळीपर्यंत. वासंती दिघे, रत्ना रोकडे, अरुणा तिवारी या आणि जळगाव शहरातील तसेच आसपासच्या तालुका भागातील तरुण-तरुणी - रमेश बोरोले, शैला सावंत, कुंजबिहारी, नितीन तळेले, राजेंद्र मानव, हमीद शेख, दिलीप सुरवाडे, कुऱ्हे गावातील हेमराज बारी, विकास, सुधाकर बडगुजर, उषा पाटील, पाचोरा येथील खलील देशमुख अशी असंख्य मंडळी त्यांनी जोडली. या सर्वांचे अनौपचारिक पालकत्व त्यांच्याकडे होते. अरुणा तिवारी आणि अन्वर राजन यांच्या विवाहात त्यांची हीच पालकत्वाची भूमिका होती. आणि आमचे आई-वडील आणि घरच्यांनाही त्यावर काही आक्षेप नव्हता. इतका आदर आणि विश्वास त्यांच्याबद्दल सर्व समाजात होता. त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर माझी बहीण - जी फार कधी घराबाहेर पडली नाही - तीही म्हणाली, ‌“एक अच्छा इन्सान चला गया, अब ऐसे इन्सान कम होते जो रहे है!” 

वासंती दिघे अणि शेखर सोनाळकरांचा विवाह झाला, त्यानंतर ते पूर्णपणे कार्यकर्ता कुटुंबच बनले. वासंती दिघे यांनी जवळपास पूर्णवेळ चळवळीला दिला आणि कार्यकर्ते म्हणून एकमेकांना समजून घेतले. कार्यकर्त्यांसाठी त्यांचं घर कायम खुलं राहिलेलं आहे ते आजतागायत.

पण त्यांना आठवताना, त्यांच्या कार्यशैलीबद्दल विशेषत्वानं नमूद करणं मला आवश्यक वाटतं, एकीकडे ते चळवळीचे कार्यकर्ते म्हणून अनेक तरुण-तरुणींची वैचारिक बैठक पक्की करत होते, तर दुसरीकडे ते आम्हाला कार्यक्रमही देत होते. शिबिरं, आंदोलनं तर होतीच पण जळगाव जिल्ह्यात जेव्हा जेव्हा सांप्रदायिक दंगली झाल्या, तेव्हा वाहिनीच्या सदस्यांचे अभ्यासगट बनवून त्यांनी त्या त्या ठिकाणी पाठवले. ते स्वत:ही सोबत असायचे. दंगलीत पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा खोटेपणा प्रत्येक वस्ती - मोहोल्ल्यात जाऊन ते सांगायचे. दंगल पसरू नये यासाठी त्यांची ही कृती असायची.

हा एक माणूस असा होता जो निधड्या छातीने शांततेसाठी रस्त्यावर उतरू शकत होता. हिंदू, मुसलमान आणि इतर सर्व समाजामध्ये त्यांच्याबद्दल आदर होता, विश्वास होता. महाराष्ट्रातील समतावादी चळवळीत कितीतरी संघटनांसोबत त्यांनी काम केलं. ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’मध्ये ते सक्रिय होते, तसेच ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात सहभागी होते. 

‘सामाजिक कृतज्ञता निधी’साठीही त्यांनी काम केलं. ‘फॉरेन्सिक ऑडिट’द्वारे आर्थिक गुन्हे आणि गुन्हेगारांच्या प्रकरणांच्या तपासणीतून गुन्हेगारांना समोर आणण्यासाठी पोलिसांची मदत करून शासनाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली. अर्थातच, यातून त्यांचे काही शत्रू निर्माण झाले. त्यांनी सोनाळकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ व निष्कलंक चारित्र्य आणि त्यांनी सादर केलेले पुरावे यामुळे त्यांच्यावर आरोप करणारेच उघडे पडले. 

शेखर सोनाळकरांवर गांधीजी आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा प्रभाव होता. स्वतंत्रपणे चळवळींसोबत जात त्यांनी हा वैचारिक वारसा विकसित करत नेला. आणीबाणीसारख्या प्रसंगी ते राजकीय पक्षासोबत गेले, पण ते सत्तेच्या खुर्चीसाठी नाही तर हुकूमशाही आणि फॅसिझमच्या विरोधात लोकशाही आणि समतेच्या मूल्यांसाठीच.

शिरपूर-शिंदखेडा भागात ‘संघर्ष वाहिनी’ने चालवलेल्या आदिवासींच्या जंगल जमिनीच्या लढ्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि तो लढा न्यायासाठी असल्याचे सांगणारे अनेक लेख लिहिले. राष्ट्रीय पातळीवरही ते सक्रीय राहिले. ‘छात्र-युवा संघर्ष वाहिनी’ची स्थापना त्यांनी जळगाव आणि महाराष्ट्रात इतरही अनेक ठिकाणी केली. भारतात गाजलेल्या बोधगया येथील मठाने तिथल्या आदिवासींच्या जमिनी हडपल्या होत्या, त्याविरोधातील लढ्यातही ते सक्रिय राहिले. सिनेमाबंदीच्या लढ्यात त्यांचा आम्हाला सर्वप्रकारे पाठिंबा व आधार मिळाला आणि हा सत्याग्रह यशस्वी झाला. हे झालं जमिनीवरचं काम पण यासोबतच देशात उद्भवणाऱ्या आणि अस्वस्थ करणाऱ्या अनेक प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केलं आणि समाजाला या प्रश्नांमागचं राजकारण कळावं म्हणून अनेक सभा, कार्यकर्त्यांसाठी चर्चा घेतल्या. त्यांची मांडणी इतकी तर्कशुद्ध असायची की, ती खोडून काढणं विरोधकांना शक्य होत नसे आणि निर्भयता इतकी की विरोधकांना भीती वाटावी. सत्याची ताकद काय असू शकते, हे त्यांनी आम्हाला अनेकदा दाखवून दिलं.

1990 या दशकात बाबरी मशिदीचा प्रश्न उग्र झाला. त्यानंतर तो समजून घेण्यासाठी त्यांनी इतिहास तर धुंडाळलाच, पण ते अनेकदा अयोध्येलाही जाऊन आले. ‌‘अयोध्या विवाद एक सत्यशोधन’ या शास्त्रीय शिस्तीने आणि वस्तुनिष्ठपणे लिहिलेल्या पुस्तकात लेखकाच्या भूमिकेत ते म्हणतात, ‌‘इतिहासाचा अभ्यास करताना सत्याचे भान ठेवले पाहिजे. खोटे पुरावे तयार करून उज्ज्वल इतिहासाचे सोंग आणता येते, पण ते अनुचित आहे. हिटलरच्या जर्मनीने खोटा इतिहास तयार केला होता, पण त्या श्रेष्ठत्वाच्या उन्मादाने अखेरीस जर्मनीलाच मान खाली घालावी लागली होती.’ या पुस्तकासाठी ज्या संदर्भसाहित्याचा त्यांनी आधार घेतला, ती यादी खूप मोठी आहे. पण त्याहीपेक्षा या पुस्तकासाठी त्यांनी घेतलेली मेहनत प्रचंड मोठी आहे. 

अलीकडच्या काळात जेव्हा ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ आणि ‘नागरिक नोंदवही’ आणि ‘राष्ट्रीय जनसंख्या नोंदवही’ (CAA, NRC आणि NRP) याबाबत सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने निर्णय जाहीर करून कृती करायला सुरुवात केली तेव्हा आसाम पाठोपाठ देशभरातील तरुण, विद्यार्थी, महिला यांनी आंदोलनं सुरू केली. त्यावेळी त्यांच्यावर पोलिसांकडून हिंसेचा वापर केला गेला. या अस्वस्थ करणाऱ्या चिंताजनक प्रश्नावर शेखर सोनाळकरांनी लगेच ‌‘नागरिकत्व सुधारणा आणि नागरिकता नोंदवहीचे महाभारत’ ही अभ्यासपूर्ण पुस्तिका लिहिली. यात त्भायांनी रताचा विविधतेचा इतिहास, भारताच्या घटनेचे निर्देश, सद्य सरकारचा खोटेपणा याचा अभ्यासपूर्ण परामर्श घेतला आहे.

तुरुंगवास भोगलेल्या शेखर सोनाळकरांनी CAA, NRC आणि NRP बद्दल बोलताना अशी चिंता व्यक्त केली होती की, ‌‘हा लढा समाजवादाविरुद्धचा आहे, बहुसंख्याकांचे मन दूषित करून त्यांना अल्पसंख्याकांच्या विरोधात उभा करणारा आहे. देश दुभंगवण्यासाठी कदाचित सरकार धर्मांतर विरोधी कायदा, समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा यांच्या आडून मुस्लीम द्वेष वाढविण्याचा प्रयत्न करेल, प्रसारमाध्यमं ताब्यात असल्याने त्यांचं काम सोपं आहे. पण प्रेम, करुणा आणि बंधुता या मार्गाने उदारमतवादी परंपरा जपावी लागेल. महावीर, सिद्धार्थ, येशू, कबीर, ज्ञानोबा, तुकाराम, गुरूनानक अशी संतपरंपरा आणि विवेकानंद, गांधी यांच्या मार्गाने जावं लागेल.’ 


हेही वाचा : महात्मा फुलेंचा आजचा सत्यशोधकीय वारसा : प्रा. हरी नरके - राजा शिरगुप्पे


शेखर सोनाळकरांनी काश्मीरच्या प्रश्नावर, ‘कलम 370’वरही लिखाण केले. अगदी एक-दोन वर्षांपूर्वी, प्रकृती बरी नसतानाही ते काश्मीरला जाऊन आले. चळवळीतील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना समतोलपणे या प्रश्नांच्या सर्व बाजू आणि सत्य कळावं यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. सत्यशोधनाची महात्मा फुलेंची परंपरा त्यांनी तेवत ठेवली. सांप्रदायिकतेच्या प्रश्नावर जशी त्यांना चिंता वाटायची, तशी या देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दलही वाटायची. नवीन गुंतवणूक नाही, बँका अडचणीत आहेत, क्रयशक्ती घटली आहे, नवीन कारखाने, नवीन उद्योग नाहीत, (सध्याचे राज्यकर्ते सुशिक्षित बेरोजगारांना ‘पकौडे तलो’ असं सांगत आहेत), नवीन नोकऱ्या नाहीत, तरुणांच्या भवितव्यासाठी आर्थिक मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्याऐवजी ‘हिंदूराष्ट्रा’ची कल्पना पुढे करून आर्थिक अराजक, अनिश्चित भवितव्य, दुर्बल केलेल्या लोकतांत्रिक संस्था, समाजा-समाजांमध्ये अविश्वास, द्वेषाने दूषित मने, संशयी सामाजिक मानसिकता, असुरक्षित दुबळे नेतृत्व आणि अध:पतित राजकारण असा भारत आपण तरुणांसाठी तयार करत आहोत का? ही त्यांची चिंता होती.

शेखर सोनाळकर यांचे वडील डॉ. मधुकर शांताराम सोनाळकर हे महात्मा गांधी यांच्या चळवळीतील सक्रीय सत्याग्रही. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. त्या वेळी पोलिसांकडून प्रचंड मारहाण आणि तुरुंगवास त्यांनी सोसला, पण ते आपल्या निश्चयापासून आणि गांधी विचारांपासून ढळले नाहीत. सविनय कायदेभंगाच्या चळवळीतही ते सहभागी राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद त्यांनी अस्पृश्य, मेहतर आणि चर्मकार समाजातील लोकांना बोलवून त्यांना चांदीच्या ताटाभोवती रांगोळ्या काढून समारंभपूर्वक जेवू घातले. शेखर सोनाळकरांच्या आई कुसुमताई सोनाळकर यांनी हेच विचार पुढे नेले. आयुष्यभर धर्मनिरपेक्षता जोपासली आणि शेखर सोनाळकरांच्या सामाजिक संघर्षाला नेहमी पाठिंबा दिला. मी त्यांच्याकडे जेव्हा राहिले, तेव्हा मुस्लीम कुटुंबातील मुलगी हिंदू कुटुंबात राहते, असा फरक कधी जाणवला नाही. पुढे वासंती दिघे आणि शेखर सोनाळकरांचं लग्न झाल्यावर वासंती दिघे, त्यांचा मुलगा कबीर आणि सून रत्ना हे हाच वारसा पुढे चालवत आहेत. 

घरातून हा वारसा शेखर सोनाळकरांना मिळाला. पण त्याचसोबत अगदी तरुणपणी आणीबाणीविरोधी लढ्यात ते उतरले आणि केवळ उतरलेच नाही, तर तुरुंगवास सोसला. या देशातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचं, लोकशाहीतील संस्थांचं आपण प्राणपणाने रक्षण केलं पाहिजे, तरच देशाला भवितव्य आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता.

शेखर सोनाळकरांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक चालतंबोलतं आंदोलन होतं. त्यांनी लढलेले लढे आणि सामाजिक, राजकीय जागृतीसाठी केलेलं लेखन हा एक वस्तुपाठ आहे. आज भारताचं, सर्वसामान्यांच्या जगण्याचं जे उध्वस्तीकरण सुरु आहे, अशा काळात सोनाळकर यांचं असणं आधार देणारं ठरलं असतं. देशातील लोकशाही वाचवण्याच्या सर्वंकष लढ्यात त्यांची उणीव नक्कीच भासणार आहे. साथी शेखर सोनाळकरांना क्रांतिकारी सलाम!

- रझिया पटेल, पुणे
raziap@gmail.com 
(लेखिका, मागील चाळीस वर्षे सामाजिक कार्यात असून, मुस्लीम समाजाचे प्रश्न, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समता या तीन क्षेत्रांत त्या विशेष सक्रिय आहेत.)

Tags: सामाजिक आणीबाणी स्मृतीलेख जयप्रकाश नारायण शेखर सोनाळकर समता छात्र युवा संघर्ष वाहिनी Load More Tags

Comments:

Ratna dhorey

रजिया खूप अभ्यासपूर्ण आणि सर्व समावेश पूर्ण लेख आहे . 40 वर्षापासून घटना जागृत झाल्यात. तुझे लिखाण मनापासून आवडतं. जुने दिवस तरळून गेलेत.खरंच शेखर अजून हवा होता. तो एक अजातशत्रू होता. पण.... आता फक्त आठवणी राहिल्यात. नागपूरला आला असता धावता आईला भेटायला आला होता.

Add Comment