मनातल्या पूर्वग्रहांतूनच जगाकडं पाहायला लोकांना आवडतं...

तनिष्कच्या 'वादग्रस्त' जाहिरातीच्या निमित्तानं...

‘हिंदू सुनेचं डोहाळजेवण करणारी मुस्लीम सासू’ अशी थीम असलेली तनिष्क या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची जाहिरात इंटरनेटवर नुकतीच व्हायरल झाली आणि त्यावर विवाद उभा राहिला. ही जाहिरात ‘लव्ह-जिहाद'चा पुरस्कार करते असा आरोप करून या जाहिरातीविषयी सोशल मिडियावर वादळ उठवण्यात आले. जाहिरातीविरुद्ध उसळलेला जनक्षोभ पाहून तनिष्कला ही जाहिरात मागे घ्यावी लागली. जाहिरात मागे घेतली गेली असली तरी आपल्या समाजात आंतरधर्मीय विवाह होतात हे वास्तव बदलणार नाही. हा सगळा गदारोळ सुरू असताना रसिका आगाशे यांनी आपल्या पतीसमवेतचा- मोहम्मद झिशान अयुब यांच्यासोबतचा- डोहाळजेवण कार्यक्रमाचा फोटो सोशल मिडियावर शेअर करत ‘लव्हजिहाद’वरून गजहब माजवणाऱ्या ट्रोल्सना चोख उत्तर दिलं.    

रसिका आगाशे अभिनेत्री-दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे तर मोहम्मद झिशान अयुबला रांझणा, तनू वेड्स मनू, फँटम, रईस, शाहिद आणि अलीकडेच आलेल्या आर्टिकल 15 या हिंदी सिनेमांमध्ये अभिनय करताना आपण पाहिलंय. 

रसिका आणि मोहम्मद झिशान अयुब यांची भेट दिल्लीतल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडीमध्ये) झाली. झिशान हा रसिकाचा एनएसडी मधला ज्युनियर. एसएनडीत नाटकांच्या तालमी झाल्यावरही अनेकदा ते उशिरापर्यंत थांबायचे. आजूबाजूच्या परिस्थितीवर गप्पा, चर्चा व्हायच्या. एकमेकांच्या आणि इतरांच्या कविता ऐकता-वाचताना त्यांची घनिष्ठ मैत्री झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभर एकत्र राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

पुढे दोघांनी स्पेशल मैरेज एक्ट अंतर्गत कोर्टात जाऊन लग्न केलं. त्यामुळे त्यांच्या मुलीला राहीला दोघांपैकी कुणाचाही धर्म चिकटवलेला नाही. वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यांनतर ती तिला योग्य वाटेल तो धर्म स्वीकारू शकते. 

रसिका आणि जिशान यांच्या लवस्टोरीला वैचारिक बैठक होती. त्यांच्या सहजीवनाला सामाजिक, राजकीय अधिष्ठान आहे. सामाजिक प्रश्नांवर दोघेही कायमच भूमिका घेताना दिसतात. आपल्या विचारशीलतेला कृतीची जोड देण्यासाठी ते  कलेचा वापर करताना दिसतात. यासाठी त्यांनी Being Association हा थियटर ग्रुपही सुरु केला आहे.

तनिष्कच्या जाहिरातीमुळे ही जोडी पुन्हा चर्चेत आली. आपल्या समाजात आंतरधर्मीय विवाहांबाबतची बहुतेकांची मतं ही अज्ञान आणि पूर्वग्रह यांवर आधारलेली असतात हे या घटनेमुळं पुन्हा प्रकर्षानं समोर आलं. याच पार्श्‍वभूमीवर आंतरधर्मीय विवाह आणि त्याबद्दलचे गैरसमज यांविषयी रसिका आगाशे यांनी व्यक्त केलेल्या भावना... 

आपल्याकडे मुलांमध्ये लहानपणापासूनच हिंदू-मुस्लीम धर्मांबाबत नकारात्मक पेरणी केली जाते. एकीकडे शाळेत हिंदू-मुस्लीम भाई-भाई म्हणायचं आणि दुसरीकडे ते एकमेकांचे विरोधक असल्यासारखी मांडणी करायची. आपण अशा विरोधाभासातच जगत राहतो. 

‘मुसलमान लोक हिंदूना बाटवतात’ असं विधान करत त्याभोवती सगळी द्वेषपूर्ण मांडणी केली जाते. मग द्वेषभावनेतूनच इतिहास शिकवताना त्यातली तथ्यं वगळून, ‘मुघलांनी येऊन राज्य केलं आणि त्यांनी इथल्या हिंदूंचं धर्मांतर केलं.’ असा एकांगी सूर लावला जातो. 

हिंदू घरांमध्ये मुसलमानांविषयीचे जसे चुकीचे समज असतात तसंच मुसलमान घरांतही हिंदूविषयी असणार. आपलंच तेवढं श्रेष्ठ म्हणणारी माणसं दोन्ही धर्मांमध्ये असणारच. सगळ्याच धर्मांत काही माणसं चांगली आणि काही माणसं वाईट असतात. विशिष्ट जातिधर्माची आहेत म्हणून ती चांगली किंवा वाईट ठरत नसतात. अगदी माझ्या लहानपणीपण माझा असा समज होता की, मुसलमान लोक आपल्या अन्नात थुंकतात आणि ते अन्न इतरधर्मीयांनी खाल्लं की ते बाटतात. माझा हा समज कित्येक वर्षं कायम होता. कुणीही असं का थुंकेल असा साधा प्रश्‍न मोठं होताना आपल्याला पडायलाच हवा... पण प्रश्‍न पडण्याची, चिकित्सा करण्याची ऊर्मी आपल्या शिक्षणातूनच वजा-वजा होत जाते. 

लहानपणापासूनच बिंबवलेल्या अशा प्रकारच्या गोष्टींचा प्रभाव आपल्या मनावर कायम राहतो आणि मग एक दिवशी आपण कुणाच्या तरी आंतरधर्मीय विवाहाचा निर्णय ऐकतो तेव्हा आपले हेच पूर्वग्रह आपली त्याबाबतची ‘नजर’ ठरवून मोकळे होतात.

आंतरधर्मीयच नाही... तर आंतरजातीय विवाहांच्याबाबतही आपण अशाच पुष्कळशा पूर्वग्रहांचे बळी ठरतो. आपल्या मनाची जडणघडणच जर सातत्यानं चुकीच्या समजांवरच आधालेली असेल तर तेच वास्तव आहे असं साहजिकच वाटणार. मी जेव्हा माझ्या घरी लग्नाचा निर्णय जाहीर केला तेव्हा ‘अरे बापरे! मुसलमान!’ असे उद्गार निघाले. 

‘अरे बापरे! मुसलमान!’ हे उद्गार घरच्यांकडून सहजपणे येत नसतात. त्यामागं वर्षानुवर्षांचा पूर्वग्रह असतो. सुदैवानं माझ्या आईवडलांना झिशान मुळातच पसंत होता, त्यामुळं त्यांच्याकडून विरोध झाला नाही... मात्र कित्येक नातेवाइकांनी विरोध केला. लग्नाच्या 12 वर्षांनंतरही कित्येकांची अजूनही नाराजी आहेच. त्यांचं एकच म्हणणं असायचं... ‘कुणीही चालेल, पण मुसलमान नको.’ या म्हणण्यामागे तसं काहीच लॉजिक नसतं किंवा त्यांचे जे काही समज-गैरसमज असतात ते दूर करण्यासाठी पुढं येण्याची तयारी नसते. 

कित्येक जणांना तर मुसलमान मित्रमैत्रिणीही नसतात. मैत्री तर लांबची गोष्ट साधे ओळखीचेही नसतात... शिवाय गावशहरांची रचनाच आता अशी होऊ लागलीये की, धर्माधर्मातल्या भिंती अधिकच वाढतील. अशा स्थितीत तुमचे समज कधी आणि कसे गळून पडणार?

‘मुसलमान मुलाशी लग्न केलं की मुलगी आपली राहतच नाही, तिला कन्व्हर्ट केलं जातं, कम्पलसरी बुरखा घालण्यास भाग पाडलं जातं, घरातच डांबलं जातं... थोडक्यात तिच्यावर अगणित, अनन्वित अत्याचार केले जातात’ अशी सगळी मांडणी असते. अशा वेळी मी जेव्हा स्वतःचं उदाहरण द्यायला जाते, ‘मी कुठं धर्मातर केलंय किंवा माझ्या आयुष्यात काय फरक पडलाय?’ असं सांगायला जाते तेव्हाही लोक सोयीनं हे तथ्य नजरेआड करतात. अशा विवाहांत सगळं काही बरं चाललंय हे जणू लोकांना ऐकायचंच नसतं. त्यांच्या मनातल्या पूर्वग्रहातूनच त्यांना जगाकडं पाहायला आवडत असतं. 

याचं आणखी एक कारण म्हणजे सध्या प्रचंड प्रमाणात वाढत असलेलं ‘कम्युनिटी स्टिरिओटाईप.’ ‘मुसलमान म्हणजे टोपी घालणारे, मारझोड, गुंडागर्दी करणारे’, अशीच प्रतिमा मनात तयार होते आणि माध्यमांतूनही तसंच खतपाणी मिळत जातं.. आणि याच प्रतिमांना वास्तव मानण्याची चूक केली जाते.

माझं लग्न आंतरधर्मीय असलं तरी माझा नवरा मुस्लीम आहे.... म्हणजे एका वेगळ्या धर्मातला आहे याची माझ्या रोजच्या व्यवहारात मला जाणीवसुद्धा नसते... कारण माणूस म्हणून आम्ही एकमेकांसोबत कसे आहोत हेच महत्त्वाचं असतं. 

तनिष्कच्या जाहिरातीत मुस्लीम घरात गर्भवती हिंदू सुन दाखवल्यामुळे गोंधळ झाला, पण माझंही डोहाळजेवण झालं तेव्हा ‘हे काहीतरी वेगळं घडतंय हं आपल्याबाबत बुवा’ अशी कुठलीच भावना नव्हती. आपण हे लक्षात घ्यायला हवं की, आपल्याकडे संस्कार-संस्कृती यांची घुसळण आणि मिसळण झालेली आहे. 

आम्ही अगदी नॉर्मल आयुष्य जगत असतो. आपल्या  आहाराच्या, राहण्यावागण्याच्या पद्धतींत भिन्नता आहे. माझी महाराष्ट्रीय संस्कृती आणि सासरची उत्तर भारतीय संस्कृती यांमध्ये फरक आहे हे समजून घ्यायला आम्हा दोघांच्याही कुटुंबांना लग्नानंतर  सुरुवातीला थोडा अवकाश लागला ते तितकंच. 

आंतरधर्मीय असो किंवा आंतरजातीय लग्नं... त्या जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यात जगावेगळं काहीही घडत नसतं. फक्त आपल्याला आपली नजर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. अशा विवाहांबाबत लोकांचं सतत प्रबोधन करत राहणं आवश्यक आहे.

या संदर्भात तरुण मुलामुलींकडून मोठ्या आशा आहेत. जास्तीत जास्त तरुणांशी बोलत राहायला हवं. अगदी दलित, मुस्लीम, हिंदू अशा कुणाहीविषयी द्वेष असणार्‍या तरुणांशी बोलत राहायला हवं. त्यांच्याशी चर्चा झडायला हव्यात. त्यांचे भ्रम दूर करायला हवेत. 

आपली मुलं काय शिकताहेत, पाहताहेत आणि त्यांची वैचारिक बैठक कशी तयार होत आहे याकडे प्रत्येक पालकानं आवर्जून लक्ष द्यायला हवं. मुघलांनी येऊन राज्य केलं असं जर इतिहासात शिकवलं जातं तर मुघल साम्राज्यविस्तारासाठी, पैशांसाठी आले होते हे ठळकपणे सांगायला हवं. ‘चलाऽ आपल्याला लोकांना बाटवायचं आहे...’ या उद्देशानं ते आले नाहीत. इथल्या साम्राज्यविस्तारासाठी त्यांना ज्या-ज्या नीतींचा स्वीकार करावा लागला तो त्यांनी केला... पण आपण इतिहास द्वेषाला आधारभूत ठेवून शिकवतो. 

...त्यामुळं आपलं मुल काय शिकतंय, त्यातून काय घेतंय आणि जगाकडं कसं पाहतंय याचं सजग भान प्रत्येकच नागरिकानं ठेवायला हवं. तरच आपण वैविध्यपूर्णतेचा स्वीकार करायला शिकू.

(शब्दांकन - हिनाकौसर खान-पिंजार)

- रसिका आगाशे 

Tags: जाहिरात लव जिहाद तनिष्क रसिका आगाशे मुहम्मद झिशान अयुब हिंदू मुस्लीम जमातवाद ट्रोल्स सोशल मिडिया Rasika Agashe Mohammad Zeeshan Ayub Tanishq Hindu Muslim Love Jihad Trolls Society Communalism Load More Tags

Comments: Show All Comments

आसावरी

खूप प्रगल्भतेने व्यक्त केलेले साधे विचार... आपण सगळेच जन्माला माणूस म्हणून येतो, मग आपल्याला शिकवलं जातं स्त्री पुरुष भेदभाव करायला.. मग जातीय भेदभाव ..आणि मग धार्मिक भेदभाव करायला... ते परंपरेनुसार पाळण्यात माणसं आयुष्ययाची माती करतात. माणूस हाच लिंग,जाती,धर्म भाव बाळगणारा समाज निर्माण होणे खूप गरजेचं आहे...ही जाणीव नसेल तर निसर्ग व इतर प्राणी ,पक्षी यांच्या विषयी सहानुभाव तरी कसा वाटेल...अजून किती वर्षे जातील माणूस जात शहाणी व्हायला असे साधे विचार कुणाही साध्या माणसांच्या मनात यायलाच हवेत न...

Suchita

किती छान शब्दांकन केलं आहेस हिना. बाळाचा स्वागत सोहळा हा त्या बाळासाठी आणि त्या मातेसाठी एक सर्वांग सुंदर आनंद सोहळा असतो.. त्या बाळाला तर चौकटीतल्या या गोष्टींची जाणीवही नसते. आणि भविष्यात कधी त्याला ती करुनही देऊ नये. चौकटी लांघून त्याला त्याचे मोकळे अवकाश द्यावे.. उंच भरारी घ्यायला. नाहीतर धर्माच्या भिंतीखाली त्याचे पंख दबून जातील.

अशोक गायधनी

पूर्वी माणसाची जात ही त्याच्या जन्मावरून नाही तर कामावरून ठरवली जात असे तसाच प्रकार धर्माबाबत ही आहे. मुसलमान व्यक्तीची जोपर्यंत सुंता होत नाही तोपर्यंत त्याला सच्चा मुसलमान मानत नाहीत.

Sanjay

जातियता अशीच नामशेष होवून जाईल. कट्टरता सर्वांननिच सोडली पाहिजे.

Vishal ghante

खुप छान... आपण युवा बद्दल, उल्लेख केलात, त्यांच्या वर जबाबदारी आहे . पुर्वाग्रह दुर करण्याची

Anand

All seems good Tanishq should reverse the same Muslim Girl and Hindu family. One boy was killed and we should not forget. Good write indeed but it is one way

लतिका

आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय लग्न केलेल्या जोडप्यात दोघांपैकी एक ब्राह्मण असेल, तर बिलकुल अडचण येत नाही. हे देखील वास्तव नजरेआड करता येत नाही.

AVINASH YAMGAR

अप्रतिम लेखन... प्रागतिक विचार

Deepa pillay pushpakanthan

Khup chan Heena, mi hi samnya kutumbat ashi anek udahrne pahili ahet chan mandlys

Shrikishan kale

लहानपणी मुलांना चांगली शिकवण दिली तरच भविष्यात या जातीभेदाच्या भिंती किलकिल्या होतील.

Add Comment