निमशिरगावची रौप्यमहोत्सवी साहित्य परंपरा

साहित्य सुधा मंचचे रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन डॉ. आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 28 व 29 मे रोजी निमशिरगाव येथे होत आहे.

साहित्य सुधा मंचच्या नवव्या साहित्य संमेलनातील एक दृश्य

निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे 28 व 29 मे, 2022 रोजी साहित्य सुधा मंचचे रौप्यमहोत्सवी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे 32 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आंतरराष्ट्रीय किर्तीचे तुलनाकार डॉ. आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. निमशिरगावला लोक सहभागातून साहित्य संमेलनाची आगळी-वेगळी परंपरा आहे. तिच्याविषयीचा हा लेख.

पाच नद्यांच्या संगमावर वसलेल्या आणि शेतीच्या दृष्टीने संपन्न असलेल्या शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव हे छोटे गाव. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील इथल्या किमान शंभराहून अधिक तरूणांनी सहभाग घेतला होता. देशप्रेमाचा जाज्ज्वल अभिमान असणाऱ्या या गावाने रत्नाप्पाण्णा कुंभार, पी. बी. पाटील यांच्यासारखे अग्रणी स्वातंत्र्यसैनिक देशाला दिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घटना समिती नियुक्ती केली गेली त्यामध्ये रत्नाप्पा कुंभार यांचा समावेश होता. पुढे राजकारण, समाजकारण, सहकारामध्ये कुंभार-पाटील यांनी दीर्घकाळ जिल्ह्याचे नेतृत्व केले. कोल्हापूर जिल्ह्यात रत्नाप्पा कुंभार हे केवळ एक नाव नव्हते तर ती एक चळवळ होती. घरोघरी त्यांना दैवतासमान मानले जात होते. त्यांची जडण-घडण या छोट्याशा गावात झाली. काळाबरोबर बदलत या गावाने आता ग्रामीण साहित्य संमेलनाचे गाव अशी आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही धुरा या गावातील मंडळी अतिशय प्रामाणिकपणे सांभाळतात. आज त्याचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे.

स्वातंत्र्याच्या चळवळीपासून साहित्य, कला यामध्येही रत्नाप्पाणांना विशेष रस होता. जिल्ह्याचे नेतृत्व करता करता त्यांनी अनेक साहित्यिकांना, कलाकारांना मदतीचा हात दिला. तर पी. बी. पाटील हे कादंबरीकार, कथाकार, नाटककार, कवी आणि चित्रपट दिग्दर्शक तसेच सहकारातील ज्येष्ठ विचारी कार्यकर्ते. दोघेही दीर्घकाल एकाच संस्थेत काम करीत होते आणि शेवटी राजकीय इर्ष्येपोटी दोन टोकांवरून एकमेकांशी संघर्ष करीत राहिले, या दोघामधील महत्त्वाचा दुवा होते, ज्येष्ठ विचारवंत वि. स. पागे आणि तासगावचे माजी आमदार गणपती कोळी. याच गावात विजय वेळंके हे एक उगवते कवी तयार झाले. सुंदर गळा, कवीचा पिंड पण नोकरी सांभाळून ते आपली कला जपत होते. रेल्वेच्या प्रवासातून काव्यवेडे काही सवंगडी जोडत-जोडत आपल्या कवितांचे सादरीकरण त्यांनी सुरू केले. यातून त्यांचा असा एक गट तयार झाला. त्यांनी 'साहित्य सुधा मंच'ची स्थापना केली.

कवितेविषयी आस्था असणारे रेल्वेतील काही सहकारी, शाळा-महाविद्यालयातील पोरे यांच्यासह त्यांनी साहित्य सुधा मंचचे पहिले संमेलन विजय बेळंके यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरच्या महावीर गार्डनमध्ये घेतले. तिथे 35-40 सहकाऱ्यांनी कविता सादर केल्या आणि पहिले साहित्य संमेलन (कवी संमेलन) साजरे झाले. येथून या चळवळीची सुरूवात झाली. छाया लक्ष्यापती, अलका शिंगाडे या ग्रुपमधील उत्साही कवियत्री होत्या. त्यांनी पुढचे संमेलन आमच्या गावात (तमदलगे) घ्यायचे ठरवले आणि ते लक्ष्यापती यांच्या माडीवर, कवियत्री मैथिली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्याच्या पुढचे संमेलन या ग्रुपचा एक उत्साही कार्यकर्ता राजू पोतदार यांनी आपल्या नेज या गावी घेतले. त्यावेळी कुंडकेकार शंकर खंडू पाटील संमेलनाध्यक्ष होते. यावेळी त्याला कविसंमेलन, चर्चासत्र असे थोडे व्यापक स्वरूप आले. पुढचे साहित्य संमेलन विजय वेळंके, भरत पाटील, शांताराम कांबळे, रावसाहेब पुजारी यांनी निमशिरगावला घेण्याचे ठरविले. पी. बी. पाटील त्याचे अध्यक्ष होते. पद्माकर पाटील, डॉ. जे. ए. पाटील, शिवाजी कांबळे, डी. डी. सावंत, मिरासाहेब कांबळे ही मंडळी सोबतीला होती. यावेळी सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब कुंभोजकर, अरूण नाईक, नागनाथअण्णा नायकवडी, प्राचार्य सुभाषचंद्र आक्कोळे, आचार्य शांताराम गरूड ही मंडळी संमेलनात सहभागी झाली होती. त्यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. जयसिंगपूर कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे ते सचिव होते. त्यांनी कॉलेजची सगळी यंत्रणा कामाला लावली. आणि पहिल्यांदा त्याला एका साहित्य संमेलनाचे स्वरूप आले.

त्यानंतरच्या प्रत्येक संमेलनात क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी अखेरपर्यंत न चुकता या संमेलनात आपला सहभाग नोंदविला. ग्रंथदिंडीला ते आवर्जून हजर असत. पालखीचा पहिला मान त्यांनी पुढे कित्येक वर्षे सांभाळला. घरातून बाहेर पडताना स्वतःचा डबा घेऊन ते येत. ग्रंथदिंडी संपली, की तो डबा ते खात आणि काही वेळ संमेलनात थांबून जात. निमशिरगावच्या संमेलनाला कारखान्याचा मांडव व इतर आर्थिक मदत आण्णांनी कधीच चुकवली नाही. त्यांच्याबरोबर पी. बी. पाटील, डॉ. एस. के. पाटील, आचार्य शांताराम गरूड, प्राचार्य सुभाषचंद्र आक्रोळे ही सर्व जाणती मंडळी सहभागी होत राहिली. यामुळे निमशिरगावकर, आजू-बाजूच्या गावातील अनेक लोक संमेलनात उत्स्फूर्त सहभागी होत होते. कथा-कथनाला व कवी संमेलनाला तुडूंब गर्दी होऊ लागली. कार्यकर्त्यांचा जोश वाढत गेला.

पुढच्या वर्षी प्रा. डॉ. राजन गवस संमेलनासाठी आले. उद्घाटन, चर्चासत्र, कथाकथन, काव्य मैफल असे त्याचे स्वरूप बनत गेले. त्याच्या पुढच्या वर्षी ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना बोलवण्याचे ठरले. पण आपण त्यांना किती मानधन देणार, एवढ्या लांब ते येतील की नाही, अशी शंका आम्हा सगळ्यांना वाटत होती. त्यावर पुरस्काराची मात्रा चांगली चालली. यावेळी सगळ्यांनी विचार केला आणि समाजकारण, साहित्य आणि शेती-पाणी-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना तीन पुरस्काराची योजना आखण्यात आली. रत्नाप्पाण्णांच्या कन्या सौ. रजनीताई मगदूम यांनी यासाठी मदत करण्याचे मान्य केले. ना. धों. महानोर यांना निमशिरगावचा पहिला समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. दादांच्या येण्याने निमशिरगावच्या साहित्य संमेलनाची उंची खूपच उंचावली. दादा अजूनही सांगतात की, मी कुठेच निमशिरगावसारखं फुलून बोललो नाही. समोर आबा म्हेत्रे, नामदेवबापू माने, गणपतराव पाटील, अरूण नरके, माजी आमदार गणपती कोळी, दौलतराव निकम, सदुभाऊ पाटील, डॉ. एस. के. पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, पी. बी. पाटील अशी साहित्याची जाण असणारी मंडळी उपस्थित होती. त्यानंतर निमशिरगावच्या साहित्य संमेलनाला एक दिशा सापडली.

पुढे अशोकराव माने (बापू), गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, अनिल यादव, प्रकाशअण्णा आवाडे, बोरगावकर पाटील या मंडळींनी मदतीचा हात सतत पाठिशी ठेवला. जयसिंगपूर परिसरातील वैद्यकीय, वकिलीच्या क्षेत्रातील मंडळींनी दरवर्षी मदतीचा हात दिला. त्यांची संमेलनाला लक्षणीय उपस्थिती राहू लागली. त्यामुळे सतत 25 वर्षे साहित्य संस्काराची शिदोरी नीटपणे चालू राहिलेली आहे. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि संयोजकांची चिकाटी यातून एक चांगली परंपरा निर्माण झाली आहे. दुपारी निमशिरगावकरांचे गावरान पद्धतीच्या जेवणामुळे बाहेरून येणारे रसिक, साहित्यप्रेमी आणि साहित्यिक भारावून जातात.


हेही पाहा : अ. भा. म. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची दासू वैद्य यांनी घेतलेली मुलाखत 


वेगवेगळ्या विषयावरची चर्चा, भारदस्त कथा-कथन तसेच परिसरातील अनेक कवींचे व्यासपीठ झालेले हे संमेलन दरवर्षी अधिकाधिक चांगले होते गेले. अनेक मान्यवर साहित्यिकांनी यासाठी योगदान किले. मधल्या कोरोना महामारीच्या काळातही ऑनलाईन पद्धतीने संमेलन झाले. पण साहित्य संमेलनात खंड पडू दिला नाही. विजय बेळके, मैथिली पाटील, शंकर खंडू पाटील, पी. बी. पाटील, राजन गवस, ना. धों. महानोर, रा. रं. बोराडे, अशोक भोईटे, वैजनाथ महाजन, आनंद यादव, महादेव मोरे, भास्कर चंदनशिव, वामन होवाळ, रंगनाथ पठारे, अनिल अवचट, द. ता. भोसले, महावीर जोंधळे, मोहन पाटील, इंद्रजित भालेराव, राजन खान, सुनिलकुमार लवटे, कृष्णात खोत अशा अनेक मान्यवर साहित्यिकांनी आपले योगदान या संमेलनासाठी दिलेले आहे. ही परंपरा आता रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत आहे आणि यंदा आंतरराष्ट्रीय किर्तीचे तुलनाकार आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे रौप्यमहोत्सवी साहित्य संमेलन होत आहे. यंदा ते एक ऐवजी दोन दिवस आपण साजरे करणार आहोत.

समाजकारण, साहित्य, शेती, पाणी आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात वेगळी कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची परंपरा गेली 15-16 वर्षे सुरू आहे. अगदी ना. धों. महानोर, अण्णा हजारे, मेधा पाटकर, नरेंद्र दाभोळकर, रा. कृ. कणबरकर, सुरेश शिपूरकर, शंकरराव पुजारी, एस. डी. सावंत अशा अनेकांना या व्यासपीठावर सन्मानित करण्यात आले आहे. रत्नाप्पाण्णा, पी. बी. पाटील यांच्या कार्याची स्मृती जपणे आणि विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे या उद्देशाने हे पुरस्कार सुरू केले आहेत. त्यालाही आता व्यापक स्वरूप आलेले आहे.

निमशिरगावच्या या संमेलन परंपरेचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो. संयोजक नेटाने आणि चिकाटीने काम करत संमेलनाला गती देतात. संमेलनाची तारीख जाहीर झाली की, येथील एक बहाद्दर शेतकरी आपल्या शेतात संमेलनासाठी कोंथिबीर टोकतात, बरोबर संमेलनापर्यंत ती काढणीला येते. तेथील काही शेतकरी आपल्या रानातील वांगी, मिरची, टोमॅटो, आले, साहित्यिकांच्या, पाहुण्यांच्या जेवणासाठी बेगमी म्हणून मोफत आणून देतात. गावातील दूधसंस्था आपला सहभाग म्हणून संमेलनाच्या आदल्या दिवशी प्रत्येकी पाच लिटर दूध मोफत देतात. त्याचे दही, ताक केले जाते. कुणालाही कसलाही निरोप न देता महिला पाहुण्यांच्या जेवणासाठी भाकरी पोहच देतात. संमेलनाला महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. हे संमेलन म्हणजे या परिसराचा सांस्कृतिक सोहळाच असतो. एका दिवसाकरता रोजचे सारे नित्यव्यवहार विसरून येथील गावकरी, रसिक आणि साहित्यिक यामध्ये सहभागी होतात. मराठी साहित्यविश्वातील डोळे दिपविणाऱ्या महागड्या सोहळ्यापेक्षा निमशिरगावचे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अनेक अर्थाने संस्मरणीय आणि भावणारे आहे.

- रावसाहेब पुजारी, तमदलगे
मोबा. – 9322939040

Tags: मराठी साहित्य ग्रामीण साहित्य साहित्य संमेलन कोल्हापूर वाचन साहित्य संस्कृती कविता कविसंमेलन Load More Tags

Comments:

विष्णू दाते

छान! एक आदर्श संमेलन!

Add Comment

संबंधित लेख