यस्टरडे : प्रतिकूलतेशी खंबीरपणे लढण्याची प्रेरणा देणारा चित्रपट

1 डिसेंबर : जागतिक एड्स दिनानिमित्त...

यस्टरडे चित्रपटातील एक दृश्य | सौजन्य - www.imdb.com/

1988 पासून 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो... या दिवशी या रोगासंदर्भात अनेक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. या रोगाला केंद्रस्थानी ठेवलेला एक सुंदर साऊथ अफ्रिकन चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला ऑस्कर नामांकनही मिळाले होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘यस्टरडे’...

कोरोनाने आजच्या काळात जसा जगभर हाहाकार माजवला आहे अगदी तसाच  अनुभव साधारण तीस वर्षांपूर्वी एड्स या रोगाबाबत जगाने घेतला होता. तोही एक व्हायरसच. माणसाची प्रतिकारशक्ती खिळखिळी करून त्याला मरणाच्या दारात नेऊन पोहोचवणारा. हा आजार आजही आपलं भयंकर अस्तित्व टिकवून आहे. आता तो सर्वपरिचित आहे इतकंच..

1988 पासून 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो... या दिवशी या रोगासंदर्भात अनेक उपक्रम, जनजागृती कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. या रोगाला केंद्रस्थानी ठेवलेला एक सुंदर साऊथ अफ्रिकन चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला ऑस्कर नामांकनही मिळाले होते. त्या चित्रपटाचे नाव होते ‘यस्टरडे’...

यस्टरडे हे या चित्रपटाच्या नायिकेचे नाव आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला ही नायिका आणि तिची 5 - 6 वर्षांची मुलगी धुळीने भरलेला रुक्ष रस्ता चालताना दिसतात. मुलगी चालायला कंटाळली आहे तर आई मुलीच्या प्रश्नांना कंटाळली आहे. तरीही दोघी हसतमुख, संमजसपणाने चालत आहेत. कुठे चालल्यात दोघी? तर दवाखान्यात... तिथे खूप मोठी रांग असते. चौकशी करता दोघी रांगेत उभ्या राहतात. आज काही आपला नंबर लागणार नाही हे कळल्यावर परत माघारी येतात.

त्या दुसऱ्या दिवशी थोडं लवकर निघतात. दवाखान्यात पुन्हा भलीमोठी रांग. एक माणूस येऊन रुग्ण मोजतो व अगदी नायिकेपर्यंत येऊन थांबतो आणि सांगतो," इथपासून सगळ्यांनी परत जा. आज एवढ्याच माणसांना डॉक्टर तपासू शकतील. उरलेल्यांनी थेट पुढच्या आठवड्यात या." आता तिच्याप्रमाणे आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. एवढं मोठं चालून परत जाणं आणि पुन्हा एक आठवडा वाट पाहत राहणं...

रॉयहूक नामक झुलू समाजाची वस्ती असलेल्या छोटाशा गावात यस्टरडे राहत असते. छोटंसं घर व पोटापुरती शेती. नवरा जोहान्सबर्गमध्ये कुठल्यातरी खाणीत कामगार आहे.पदरात ब्युटी नावाची छोटी, चुणचुणीत मुलगी. यस्टरडे गेले कित्येक दिवस खोकतेय. तशीच कामं करतेय. रडत कुढत नाही तर शांतपणे, हसतमुखाने. खूप दिवस खोकला अंगावर काढून दवाखान्यात जायचं ठरवलं तर तिकडे ही अशी परिस्थिती. 

नाईलाजाने ती गावातल्या मांत्रिक बाईकडे जाते. तिचे अघोरी उपाय यस्टरडेच्या पचनी पडत नाहीत. दुखणं बळावतंच आहे. अखेर एक दिवस चक्कर येऊन ती घरात पडते तेव्हा तिची शिक्षिका मैत्रीण तिला गाडी करून दवाखान्यात पाठवते. अखेर तिचा नंबर लागतो. गोरी डॉक्टरीणबाई तिला प्रेमाने तपासते. नाव-गाव विचारते. यस्टरडे या नावाचे तिला भारी आश्चर्य वाटतं. ती गमतीने म्हणते, "मला उद्या आहे आणि आजही आहे, पण 'काल' मात्र नाही. तुझं हे असं नाव कोणी ठेवलं?" यावर यस्टरडे मंदस्मित करत उत्तरते, "माझ्या वडिलांनी ठेवलं. ते म्हणायचे आजच्यापेक्षा कालच्या गोष्टी चांगल्या होत्या."

डॉक्टरीणबाई तिला तपासते. तिचं रक्त तपासणीसाठी काढून घेतलं जातं. अशा काही आठवड्यांच्या खेपांनंतर डॉक्टरीण तिला तिच्या गंभीर आजाराची कल्पना देते. एड्स हा आजार या अशिक्षित, गरीब बाईला कसा समजावून सांगणार? तरी डॉक्टरीण ते समजावून देते व तिच्या नवऱ्याचीही लवकरात लवकर तपासणी करणं गरजेचं असल्याचं सांगते.

मरणाच्या दारात नेऊन पोहोचवणारा, यातनामय शेवट असणारा हा आजार आहे व नवऱ्यामुळे आपल्याला त्याचा संसर्ग झाला आहे... तिला हे सारं काही कळून चुकतं. मग ती नवऱ्याला भेटण्यासाठी शहरात जाण्याचं ठरवते. तो कुठल्या खाणीत काम करतो हे तिला माहीत नसतं. ती पत्ता शोधत फिरते. अखेर तिची नवऱ्याशी भेट होते. 

काचेआड सुरु असलेला त्या दोघांचा संवाद आपल्याला दिसतो, ऐकू येत नाही. पुढच्याच दृश्यात तो तिला बेदम मारहाण करताना दिसतो. मारहाणीमुळे सुजलेला चेहरा घेऊन यस्टरडे परतीच्या प्रवासाला निघते. भूतकाळातील सुखी संसाराच्या आठवणी सध्या डोळ्यात तरळणाऱ्या पाण्यात विरघळत जातात.

दिवस सरतात, ऋतू बदलतात. तिचं औषधपाणी सुरु असतं. डॉक्टरीण तिला म्हणते ,"तुझं शरीर कणखर आहे." ती म्हणते ,"माझं शरीर नव्हे तर मन कणखर आहे. माझी मुलगी शाळेत जायला लागेपर्यंत मी मरणार नाही."

आणि एके दिवशी तिचा नवरा गलितगात्र अवस्थेत घरी परततो. त्याचा आजार शेवटच्या टप्प्यात आलेला असतो. त्याला झालेला पश्चात्ताप व रोगाने केलेली भीषण अवस्था पाहून हिचं हृदय द्रवतं. भूतकाळ विसरून ती त्याची सेवा - शुश्रूषा करू लागते. मात्र गावकऱ्यांना त्याच्या आजाराबद्दल कळताच ते त्याला गावात ठेवू देण्यास विरोध करतात. 

दवाखान्यात जागा नसते. अखेर ती कंबर कसते. मुलीच्या मदतीने गावाबाहेरच्या शेतात त्याच्यासाठी पत्र्याची झोपडी बांधते. त्याला कसंबसं तिथे आणून टाकते. नवऱ्याची सेवा, स्वतःचा बळावत चाललेला आजार, शेतीची कामं... या सर्वात तिची  होणारी ओढाताण पाहून तिची शिक्षक मैत्रीण तिला म्हणते, " तू शूर आहेस" त्यावर ती उत्तरते, " मी शूर नव्हे, परिस्थितीच अशी आहे इतकंच..."

आजार बळावतो आणि नवरा अखेर मरतो. त्याचं क्रियाकर्म करून झाल्यावर ती कष्टाने बांधलेली त्याची पत्र्याची झोपडी हातोड्याने तोडून टाकते आणि मनसोक्त रडते. तिने उरात कोंडलेल्या साऱ्या व्यथा, वेदना त्या अश्रूंतून वाहून जातात. आता ती नेहमीची शांत, संयत स्त्री उरते.

मुलीची जबाबदारी शिक्षिका मैत्रीण उचलण्यास तयार होते. तिच्यासाठी तो खूप मोठा दिलासा असतो. मुलगी शाळेत जाईल, शिकेल, मोठी होईल... दोघी मैत्रिणी हितगुज करतात. नवऱ्याबद्दल तिच्या मनात अढी नसते. तो चांगला होता असंच ती म्हणते. मुलगी शाळेत जाण्याचा दिवस उजाडतो. मुलीला शाळेत सोडून ती माघारी फिरते व त्या धुळभरल्या लांबलचक रुक्ष रस्त्यावरून चालू लागते. ती लांब जात असताना तिचा एक ठिपका तेवढा आपल्या डोळ्यात उरतो.

खिन्न करणारा शेवट असूनही या चित्रपटात काही आश्वस्त करणारी बीजं आढळतात. दारिद्रय, आजार, वेदना, परिस्थितीची प्रतिकूलता इत्यादी गोष्टी असूनही एका सर्वसामान्य, अशिक्षित स्त्रीने जीवनाशी केलेला हसतमुख संघर्ष दाखवणारी ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे.

एड्स या आजाराची भीषणता, या आजाराविषयी असलेल्या नैतिक - अनैतिकतेच्या कल्पना, त्यामुळे पती - पत्नीच्या नात्यात निर्माण होणारा तणाव, पतीच्या चुकीमुळे निर्दोष पत्नीला झालेला संसर्ग, आफ्रिकेच्या मागास भागातील वैद्यकीय सुविधांचा अभाव, दारिद्र्य, वंचित समूहाला असणारी शिक्षणाची आस अशा विविध मुद्द्यांना हा चित्रपट स्पर्श करतो.

चित्रपटात हे सगळं साध्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे. त्यात कुठेही भडकपणा नाही की मेलोड्रामा नाही. विषय संयत व संक्षिप्त पद्धतीने मांडूनही अपेक्षित परिणाम साधणे हे कौतुकास्पद आहे. यस्टरडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या लिलेटी खुमालो या अभिनेत्रीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. खूप छान काम केलंय तिने.

आजाराने खंगत चाललेली, निर्मळ मनाची, बाहेरून प्रेमळ पण आतून कणखर, सोशिक, क्षमाशील, आशावादी स्त्री यस्टरडे... ती भारतीय मनाला अजिबात परकी वाटत नाही. ती आपल्याला आपल्या मातीतली वाटते. मातीसारखीच खूप काही झेलून, पेलून निर्लेप राहणारी...

 - राजश्री बिराजदार, दौंड, जि. पुणे. 
rajshrib17@gmail.com


 

 


हेही वाचा :

कॅपरनॉम : मुलांच्या अस्वस्थ भावविश्वाचा संवेदनशील वेध घेणारा चित्रपट 

कूर्मावतार : गांधीजींचं जीवनदर्शन मांडणारा विलक्षण चित्रपट 

अदामिंते माकन अबू : आपल्या नेणिवेचे उदात्त जाणिवेत रूपांतर करणारा चित्रपट

Tags: सिनेमा राजश्री बिराजदार एड्स यस्टरडे आफ्रिकन सिनेमा चित्रपट Rajashri Birajdar Cinema African Cinema AIDS Yesterday Load More Tags

Comments:

Ashok Hendre

... अनपेक्षित पणे उभ्या ठाकलेल्या संकटाशी सुद्धा दोन हात करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट आणि त्यावर केलेलं भाष्य वाचनीय वाटलं. रोगांवर सर्वात प्राथमिक उपचार काय असेल तर आपली त्या रोगांवर मात करण्याची इच्छाशक्ती हा आहे. औषधे सुद्धा क्षीण इच्छाशक्ती असताना आपला प्रभाव कमीच दाखवतात हे बर्याचदा आपल्याला कोरोना काळात पहायला मिळाले. दारीद्र्य , विषमता , अनारोग्य, लिंग भेद इ.तून उद्भवणार्या संकटांच्या मुळाशी जो सनातन संघर्ष आहे त्या मागे अज्ञान हेच प्रधान कारण आहे. चित्रपटातून संकट काय आहे हे जसे समजते तसेच नायिकेने अभावग्रस्त परिस्थितीत देखील संकटाशी कशी झुंज दिली हे देखील कळते. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती मुल्ये आज ही सुसंगत वाटत आहेत आणि हीच बाब या चित्रपटाचे महत्व अधोरेखित करत आहे. लेखिकेने यावर भाष्य करुन एका संघर्ष कथेला उजाळा दिला आहे. लेखिकेने धन्यवाद ! अशोक हेंद्रे ... पुणे ४११०६१ ९८८१२४४९१०

Vaishali Agaskar

सुंदर कथा आणि उत्कृष्ट विश्लेशण

Manjiri deshmukh

आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत लेख मनाला जाऊन भिडला.. यस्टरडे कडून खुप शिकण्यासारखे आहे.. तिची उदारता मनाला खुप भावते.. प्रेमळ, शांत, पण कणखर वृत्तीची यस्टरडे.. तिला मरणाची भिती वाटत नसेल का??? पण मुलीच्या भवितव्यासाठी शेवटपयॅंत लढली.... तिला मनापासून सलाम!!

sandhya chougule

एड्ससारख्या जगण्याचा आत्मविश्वास घालवणा या आजारावर जगण्याचे बळ देणारी ही एक सुंदर फिल्म आहे . अतिशय सहज साध्या सोप्या शब्दांतून लेख उतरला आहे .

Add Comment