भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिवस राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने लहान मुलांचे भावविश्व उलगडून दाखवणाऱ्या ‘कॅपरनॉम’ या लेबनिज चित्रपटाचा परिचय करून देणारा हा लेख.
सध्याच्या काळात कुणाचं जगणं सगळ्यात कठीण असेल? या प्रश्नावर आपली उत्तरं वेगवेगळी असतील... पण काही संवेदनशील कलाकारांच्या मते आजच्या घडीला लहान मुलांचं आयुष्य सगळ्यात कठीण झालं आहे. ग्रेटा थुनबर्ग असो की मलाला युसुफजाई... मुलांमध्ये असलेली खदखद व्यक्त होताना दिसते आहे आणि काही अपवाद वगळता मुलांच्या या अभिव्यक्तीला मोठ्यांची प्रतिक्रिया दुर्दैवानं निर्मम म्हणता येईल अशीच असल्याचं दिसतं. लहान मुलांचं भावविश्व उलगडवून दाखवणारा कॅपरनॉम (अर्थ - गोंधळ) हा 2018 मध्ये प्रसिद्ध झालेला लेबनिज चित्रपट लहान मुलांच्या जगण्याचा भीषण संघर्ष आपल्यापुढे मांडतो.
बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या झैन या बारावर्षीय मुलाच्या कोर्टातल्या सुनावणीनं चित्रपटाची सुरुवात होते. विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत निर्मम उत्तरं थंडपणे देणारा झैन कोर्टात एक खळबळजनक विधान करतो. त्याला आपल्या आईबापांवर खटला भरायचा असतो. कोणत्या कारणासाठी असं विचारल्यावर ‘मला जन्म दिला म्हणून...’ असं तो सांगतो... तेव्हा सर्व जण अवाक होतात...
एवढं काय घडलेलं असतं त्याच्या आयुष्यात की, त्याला इतक्या लहान वयात एवढं वैफल्य यावं...? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो आणि चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये झैनची गोष्ट सांगतो.
बैरुत शहरातल्या झोपडपट्टीत झैनचं कुटुंब राहत असतं... आई, बाप आणि चारपाच भावंडं. घरातले सगळे जण पोटासाठी काहीतरी काम करून जगत असतात. मुलांना कामाला जुंपून काही अपराध करतोय याची किंचितशीही जाणीव त्या अशिक्षित आईबापांना नसते. मुलांचा वापर करून ड्रग्ज पुरवण्याचं काम ते करत असतात.
सहर या पाठच्या बहिणीवर झैनचा खूप जीव असतो. परिस्थितीमुळे अकाली प्रौढ झालेला झैन तिची सतत काळजी घेतो. ती वयात आली आहे हे प्रथम त्यालाच कळतं आणि पाळी आल्यावर काय करायचं हेही तोच तिला सांगतो. प्रौढ घरमालकाचा सहरवर डोळा आहे हे झैनला माहिती असतं आणि सहर वयात आल्यावर आईबाप तिचं लग्न त्या थोराड माणसाशी लावून देणार आहेत याचाही त्याला अंदाज असतो आणि घडतंही तसंच. या निर्णयाविरुद्ध झैन आक्रमक आणि सरंक्षक पवित्रा घेतो खरा... पण आईबाप त्याला मारहाण करून घराबाहेर हाकलून देतात.
सैरभैर झालेला झैन भुकेल्या पोटी शहरात फिरत राहतो. एका जत्रेत तो पेंगळून बसलेला असताना त्याला राहील नावाची इथिओपिअन निर्वासित स्त्री भेटते. ती झैनला तिच्या घरी नेते. तिची कर्मकथा झैनपेक्षा वाईट असते.
राहीलला चारपाच महिन्यांचा छोटा मुलगा असतो... योनास. त्याच्या जन्माचा वा अस्तित्वाचा कोणताही कायदेशीर पुरावा तिच्याजवळ नसतो. ती स्वतःच बेकायदेशीरपणे बैरुतमध्ये राहत असते. छोट्या योनासला लपवून, मिळेल ते काम करून ती आपला उदरनिर्वाह चालवत असते. त्यात आता झैनची भर पडते. योनासला सांभाळण्याची जबाबदारी झैनवर टाकून ती कामावर जायला लागते. या नवीन घरात, नवीन जबाबदारीत झैन हळूहळू रुळतो....
राहीलला नागरिकत्वाचा दाखला पाहिजे असतो. तो मिळवून देणाऱ्या एजंटनं मागणी केलेल्या रकमेची जुळवाजुळव तिला करता येत नाही. तो तिच्याकडे तिच्या बाळाची- योनासची मागणी करतो. त्या मोबदल्यात तो दाखला आणि पैसे देणार असतो.
बेकायदेशीर नागरिक म्हणून पोलीस राहीलला पकडून तुरुंगात टाकतात. इकडे घरी झैन आणि छोटा योनास तिची वाट बघत बसतात. झैनवर पुन्हा मोठी जबाबदारी येऊन पडते. त्याला पुन्हा एकदा मोठं व्हावं लागतं. अंगावरचं दूध पिणाऱ्या बाळाला जगवण्यासाठी झैन जी काही धडपड करतो ती पाहून कुणाचंही काळीज पिळवटून जावं. पूर्वी करत असलेला ड्रग्ज विकण्याचा धंदासुद्धा तो करून पाहतो.
एकदा त्याला रस्त्यावर एक सिरिअन निर्वासित मुलगी भेटते. ती त्याला निर्वासितांच्या छावणीत घेऊन जाते. तिथे त्याला खाण्यापिण्याचं थोडं साहित्य मिळतं. भाडं न दिल्यामुळे त्याची मालकीण राहत्या झोपडीतलं सामान बाहेर फेकून देते. झैन खूप धडपडतो... पण थकून जातो. पैशाची जुळवाजुळव न झाल्यामुळे अखेर त्या एजंटला शरण जातो आणि योनासला जड अंतःकरणानं त्याच्या हवाली करतो.
दुसऱ्या देशात जाण्यासाठी त्याला काही कागदपत्रं हवी असतात. एजंटनं सांगितलेली कागदपत्रं आणण्यासाठी तो आपल्या घरी जातो. घरातून निघून येऊन त्याला कितीतरी दिवस झालेले असतात... पण त्याला शोधण्यासाठी आईबापानं कसलीच हालचाल केलेली नसते. तो परत आल्याचंही सोयरसुतक त्यांना नसतं.
त्याला हव्या असलेल्या कागदपत्रांचा शोध तो घेत असताना त्यांची बोलणी खातो, मार खातो. या बाचाबाचीदरम्यानच लहान बहीण सहर बाळंतपणात मरण पावल्याचं त्याला कळतं. हे ऐकताच त्याचा संताप अनावर होतो. घरातला सुरा घेऊन तो जवळच राहत असलेल्या त्या प्रौढ इसमाच्या म्हणजे सहरच्या नवऱ्याच्या घरी जातो आणि त्याच्यावर सुरीनं हल्ला करतो. त्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात होते.
तिथे शिक्षा भोगत असताना टीव्हीवरच्या एका प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात तो त्याची कैफियत जगासमोर मांडतो आणि आईबापावर खटला भरायचा असल्याचं सांगतो. या मागणीमुळे तो प्रकाशझोतात येतो आणि कोर्टात त्याची सुनावणी होते. दरम्यान त्याची आई पुन्हा कितव्यांदा तरी गरोदर असते. ते पाहून झैनला तिची घृणा वाटते.
नीट सांभाळता येत नसतील तर मुलं जन्माला घालण्याचं पाप करू नका असं तो कोर्टातसुद्धा निक्षून सांगतो. त्याबद्दल कोर्टात युक्तिवाद करताना आईबाप अशिक्षितपणाची, दारिद्र्याची आणि धर्माची कारणं सांगतात... पण आयुष्य हा शाप आहे आणि तो शाप या आईबाप म्हणवणाऱ्या लोकांनी त्याला दिला आहे हे झैननं अनुभवलेलं असतं.
सुनावणीदरम्यान झैन कोर्टाला योनास, राहील आणि तो दलाल यांच्याबद्दलही सांगतो. त्यावरून त्या दलालाला पकडण्यात येतं. योनासची सुटका होते आणि आईमुलाची भेट होते.
झैनला आता कायदेशीर ओळखपत्र मिळणार असतं. त्यासाठी फोटो काढताना तो नेहमीप्रमाणे खिन्न उभा राहतो. पलीकडून त्याला सांगितलं जातं... आता तरी हास... आणि तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर बालसुलभ हसू उमटतं... पहिल्यांदाच....
झैन, राहील आणि योनास यांचं जीवन पडद्यावर बघणं हा यातना देणारा अनुभव होता. नदीन लबाकी ही या चित्रपटाची दिग्दर्शिका. तिनं झैन आणि योनास या भूमिका वठवणाऱ्यांकडून जो अभिनय करवून घेतला आहे... त्याला तोड नाही. या लहानग्यांचं भावविश्व शूट करण्यासाठी तिला अपार कष्ट घ्यावे लागले.
मुलांकडून आपल्याला हवं ते काढून घेण्यासाठी संयम आणि धीर यांची कसोटी लागते आणि दिग्दर्शिका त्यात पूर्णपणे यशस्वी झाली आहे. छोट्या बाळाचा आणि झैनचा अभिनय (आणि अर्थातच दिग्दर्शिकेचं काम) बघण्यासाठी तरी कॅपरनॉम बघायलाच हवा.
पश्चिम आशियातला लेबेनॉन हा देश म्हणजे सतत अशांत असणारा प्रदेश. तिथली अशांतता, तिथलं दारिद्र्य, अशिक्षितपणा आणि धर्माच्या पगड्यामुळे तिथे होणारी लोकसंख्यावाढ, वाढलेली बकाली, निर्वासित आणि स्थलांतरित समूहांचे प्रश्न आणि एकूणच मानवी समूहाला वेढून असलेली अस्वस्थता यांचा वेध दिग्दर्शिकेनं घेतला आहे आणि तो तिनं मुलांच्या नजरेतून घेतला आहे हे विशेष. कान्स चित्रपट महोत्सवात पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचे ऑस्कर नामांकन मिळवणारा हा चित्रपट त्यामुळेच महत्त्वाचा आहे.
मुलं ही देशाचं किंवा समाजाचं भविष्य असतात. भविष्यालाच काही भविष्य उरलं नाही, आपण ते नष्ट करत चाललो आहोत हेच जणू तिला सुचवायचं आहे.... कान्स महोत्सवात विजेता ठरलेल्या आणि सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचे ऑस्कर नामांकन मिळवलेला हा चित्रपट त्यामुळेच महत्त्वाचा आहे.
आपण आणि सर्व जग यातून काय बोध घेणार आणि त्यावर काय उपाय योजणार यावर आपणा सर्वांचं भविष्य अवलंबून असणार आहे... अन्यथा झैनसारख्या बालकांची उगवती पिढी आपल्या सर्वांना एक-ना-एक दिवस आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार... हे नक्की....
- राजश्री बिराजदार, दौंड, जि. पुणे.
rajshrib17@gmail.com
Tags: सिनेमा राजश्री बिराजदार कॅपरनॉम Rajashri Birajdar Capernaum Load More Tags
Add Comment