गांधीजींचं जीवनदर्शन मांडणारा विलक्षण चित्रपट

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या 'कूर्मावतार' या कन्नड चित्रपटाविषयी...

'कूर्मावतार' या चित्रपटातील एक दृश्य

गांधी आणि भारतीय समाज यांचं नातं मोठं विलक्षण... अगदी द्वंद्वात्मक म्हणता येईल असं आहे. कुणी त्यांचा अनुयायी असतो, कुणी शत्रू तर कुणी नुसता अभ्यासक असतो. कुणी त्यांच्या नाममहात्म्याचा वापर करतो तर कुणी त्यांना अनुल्लेखानं मारतो. सामान्य माणसं असोत नाहीतर असामान्य व्यक्ती, विचारवंत असोत नाहीतर कलावंत... गांधींना वगळून कुणालाच पुढं जाता येत नाही. समाजमनावर गांधीजींचा पडलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव कुणाला आवडो नाहीतर न आवडो... तो असतोच... आहे... आणि राहील....

कलेच्या क्षेत्रातही गांधी अधूनमधून अवतरतात. कलावंत आपापल्या पद्धतीनं, वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांना आविष्कृत करत असतात. आपल्या चित्रपटांसाठी तेरा वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे गिरीश कासारवल्ली यांनी दिग्दर्शित केलेला 'कूर्मावतार' हा चित्रपट गांधी आणि आपण या विषयावरचा अभिजात आविष्कार आहे. या चित्रपटाला कन्नड भाषेतल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कुमार वीरभद्रप्पा यांनी लिहिलेली साधी, सोपी, प्रवाही कथा आणि त्या कथेला चित्रभाषेचा कलात्मक साज हा सुंदर योग या चित्रपटात जुळून आला आहे. 

'कूर्मावतार'ची कथा थोडक्यात अशी आहे... 

आनंद राव हे सरकारी कचेरीत कारकुनी करणारे, सेवानिवृत्तीच्या जवळ आलेले एक विधुर गृहस्थ. घरी मुलगा, सून आणि नातू. स्वतःच्या संसारापेक्षा सरकारी नोकरी जास्त मन लावून, सचोटीनं करणारी सरकारी कर्मचाऱ्यांची एक दुर्मीळ, अल्पसंख्य जमात असते. राव हे या जमातीचे प्रतिनिधी आहेत... त्यामुळे अर्थातच ते इतरांच्या चेष्टेचा आणि वैतागाचा विषय आहेत.

चंदन नावाचा तरुण दिग्दर्शक राव यांना शोधत त्यांच्या ऑफीसमध्ये येतो. तो गांधीजींच्या जीवनावर एक दूरचित्रवाणी मालिका करत असतो. गांधीजींच्या भूमिकेसाठी साधारण गांधीजींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधात चंदन असतो आणि त्यातून त्याला राव यांच्याविषयी कळलेलं असतं. राव यांना पाहता क्षणी चंदनचा शोध पूर्ण होतो आणि हेच आपल्या मालिकेचे गांधी यावर त्याचं शिक्कामोर्तब होतं. राव यांना चंदन हे सारं सांगतो आणि मालिकेमध्ये काम करण्याची ऑफर देतो. चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनय यांच्याशी दूरन्वयानेही संबंध नसलेले राव त्याची विनंती आणि ऑफर दोन्ही धुडकावून लावतात आणि आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ऑफीसचं काम, देवळातलं भजनबिजन करून उशिरा घरी परततात. घरी त्यांच्यासाठी वेगळंच ताट वाढून ठेवलेलं असतं.

राव ऐकत नाहीत हे पाहून चंदननं त्यांचं घर गाठलेलं असतं आणि राव यांच्या मुलाला या कामाचा आर्थिक आणि व्यावहारिक फायदा पटवून दिलेला असतो. राव यांचा मुलगा आळशी, ऐतखाऊ आणि विनासायास पैसे मिळवण्याची स्वप्नं पाहणारा असतो... त्यामुळे वडलांच्या आयुष्यात आलेल्या या संधीत आपलं कल्याण सामावलेलं आहे हे तो हेरतो आणि रावांच्या वतीनं परस्परच तो दिग्दर्शकाला आश्वासन देतो. राव यांचा मुलगा आणि सून त्यांना नातवाच्या भविष्याची गळ घालतात आणि एकदाचा त्यांचा होकार मिळवतात. 'अभिनय म्हणजे काही ब्रह्मविद्या नाही एवढं घाबरायला... जसं सांगू तसं करायचं.’ असं सांगत चंदन त्यांना घोड्यावर बसवतो... आणि रावांच्या सरळसाध्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येतं.

शूटिंगला सुरुवात होते तेव्हा रावांचा भावनाशून्य मुद्राभिनय पाहून दिग्दर्शक चंदन वैतागतो आणि त्यांना वैयक्तिक आयुष्यातल्या दुःखद प्रसंगांची उजळणी करायला सांगतो... मात्र त्यामुळं नवीनच क्लेश उद्भवतो. रावांचं सत्शील मन दुखावतं. या मालिकेत काम करायला ते नकार देतात... पण पैशाची चटक लागलेला मुलगा त्यांना तसं करू देत नाही. त्या भूमिकेशी समरस व्हायला मदत व्हावी म्हणून तो रावांना गांधींविषयीची पुस्तकं वाचायला आणून देतो. एका ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाची भेटही घडवून आणतो.

या प्रयत्नांमुळं कसे का होईना... राव त्या भूमिकेत शिरतात आणि त्यांचा अभिनयप्रवास मार्गी लागतो. त्यांच्या विचारांत आणि शरीरात गांधी हळूहळू भिनायला लागतात. समाजात राव यांना मान, आदर यांबरोबरच ओळखही मिळायला लागते. यामुळं ते सुखावतात. सुशीलानामक प्रसिद्ध अभिनेत्री या चित्रपटात कस्तुरबांची भूमिका साकारत असते. तिच्याशी राव यांचं निर्मळ मैत्र जुळतं... पण इतकं सरळसोपं काही नसतंच....

राव यांचा मुलगा आणि इतर परिचित राव यांच्या गांधीप्रतिमेचा अस्थानी आणि अयोग्य वापर करायला लागतात. मुलगा आणि सून पैसा उधळून चैन करायला लागतात. राव यांनी पैसे द्यायला नकार देताच ती दोघं राव यांच्यावर चिडतात, रुसतात आणि राव यांचं घर सोडून वेगळं राहायला लागतात.

राव यांच्या एका मुस्लीम सहकाऱ्याचा तरुण मुलगा इक्बाल याला गांधींवरच्या या मालिकेमध्ये काम करण्याची प्रचंड हौस असते. राव त्याच्यासाठी शब्द टाकून त्याला गोडसेची भूमिका मिळवून देतात... मात्र त्यामुळं समाजात नवीनच वादंग निर्माण होतो. त्याचं पर्यवसान गुंडांनी सेटवर येऊन धमकी देण्यात होतं... त्यामुळं इक्बालला काढून टाकलं जातं आणि गोडसेची भूमिका एका प्रसिद्ध अभिनेत्याला दिली जाते. झाल्या प्रकारानं इक्बाल आणि राव, दोघंही दुखावतात. दुसरीकडे राव यांचा मुलगा आर्थिक घोटाळा करून गजाआड जातो आणि त्याला सोडवण्यासाठी राव यांना लाच द्यावी लागते... त्यामुळं गांधीजींची भूमिका करण्याचा नैतिक अधिकारही आपण गमावून बसलो आहोत याचं रावांना अतीव दुःख होतं...आणि या मालिकेचा शेवटचा शॉट देऊन झाल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. 

राव साकारत असलेली गांधीजींची भूमिका, त्या निमित्तानं त्यांच्यात रुजत चाललेले गांधी... सोबतच त्यांच्या आयुष्यात व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर घडणाऱ्या घटना यांच्यातला विरोधाभास आणि द्वंद्वं यांमुळं राव मनानं आणि शेवटी शरीरानंही कसे खचायला लागतात हे या चित्रपटातून दाखवण्यात दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना यश आलं आहे.

राव आणि गांधी (आणि गांधींची भूमिका) यांचा समांतर चाललेला, एकमेकांत गुंतलेला हा प्रवास पडद्यावर पाहताना प्रेक्षक म्हणून आपल्यालाही अनेक अप्रिय गोष्टींची जाणीव होत राहते. गांधीजी आणि त्यांचे विचार यांबाबतचं आपलं आकलन किती बाळबोध, वरवरचं... प्रसंगी दांभिक आहे हे आपल्याला कळून येतं. गांधी न वाचलेला, राव यांच्यासारखा माणूस नकळत, सहजगत्या त्यांच्याच विचारांप्रमाणे आचरण करत होता... मात्र जीवनात गांधी अवतरताच सचोटीबरोबरच सत्यापासूनही भ्रष्ट होण्याची वेळ त्यांच्यावर येते हा विरोधाभास अंतर्मुख करून जातो.

आपल्याकडे प्रत्येकाचे गांधी निरनिराळे असतात. जो तो आपापल्या चश्म्यातून त्यांच्याकडे बघत असतो आणि आपापल्या पद्धतीनं गांधीवादाचा अर्थ लावत असतो. कलाकारही याला अपवाद नसतात. 'कूर्मावतार' हे या चित्रपटाचं शीर्षकही अर्थपूर्ण आहे. पुराणातल्या कूर्मावताराच्या कथेचा प्रतीकात्मक वापर केला इथं गेला आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वत बुडू लागताच परमेश्वरानं कासवाचं रूप धारण करत पर्वताला पाठीचा आधार दिला आणि त्याला बुडण्यापासून वाचवलं. कासवाच्या पाठीवर तडे गेल्यासारख्या खुणा त्यामुळेच दिसतात अशी दंतकथा आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या समुद्रमंथनात गांधीजींनीही तशीच भूमिका निभावली आहे असं दिग्दर्शकाला इथं सुचवायचं असावं.

राव यांचं जीवनही त्या कासवाप्रमाणेच आहे... मंद पण अथक गतीनं चालणाऱ्या राव यांना स्वार्थापायी धावायला भाग पाडलं जातं. आत्म आणि परात्म यांचं ओझं पेलत असताना त्यांच्या जीवनालाही तडे जातात. शीर्षकात असलेलं हे कासव चित्रपटातही भूमिका घेऊन अवतरतं. 

आशयदृष्ट्या समृद्ध असलेली ही कथा पडद्यावर मांडताना दिग्दर्शकानं चित्रपटाच्या सर्व तांत्रिक अंगांचा कलात्मक वापर केला आहे. तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. संकलन, संगीत, छायाचित्रण, संवाद, सारंच लक्षवेधी आहे. राव यांची भूमिका शिकारीपुरा कृष्णमूर्ती यांनी अप्रतिम साकारली आहे. त्यांना बाकी सर्व सहकलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह देश-परदेशातलेही अनेक पुरस्कार मिळाले आहेत... अभिजात प्रादेशिक चित्रपट पूर्ण भारतभर पोहोचण्याचं प्रमाण अद्यापही कमी असल्यामुळं असे चित्रपट अनेकांच्या नजरेतून हमखास सुटतात.

'कूर्मावतार' हा चित्रपट गांधीजींचं जीवनदर्शन आहे, राव यांच्या जीवनाचं दर्शन आहे. सोबतच तो आपल्या समाजाचं, पर्यायानं आपलं स्वतःचं दर्शन आहे. ही सगळी दर्शनं एकमेकांत मिसळून एक विराट दृश्य तयार होतं आणि त्या विराटाचं सूक्ष्म दर्शन आपल्याला होतं... त्यामुळं हा चित्रपट पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे.

 - राजश्री बिराजदार. दौंड, जि. पुणे.

Tags: सिनेमा राजश्री बिराजदार गिरीश कासारवल्ली महात्मा गांधी कूर्मावतार कन्नड सिनेमा Cinema Movie Kannada Cinema Rajashri Birajdar Girish Kasarvalli Mahatma Gandhi koormavatar Load More Tags

Comments: Show All Comments

Narendra Mahadeo Gambhire

लेखिकेने एवढ्या विराट विषयाचे एवढे सूक्ष्मरित्या केलेले निरीक्षण तिच्यात असणा-या वैचारीक प्रगल्भतेची साक्ष देतात. प्रत्येकाचा गांधी या प्रसंगानुरूप बदलत जातो हे तिचे म्हणणे सद्य सामाजिक परिस्थितीवर तिने ओढलेले ताशेरेच होय. वैयक्तिक पातळीवर व सामाजिक पातळीवर आपण वेगवेगळ्या मुखवट्यांनी वावरत असतो, हे सत्य तिने अधोरेखीत केले आहे. गांधी कळायला एक जन्म पुरेसा आहे परंतु आत्मसात करायला अनेक जन्म पुरेसे नाहीत हे ही स्विकारले पाहीजे. सदर चित्रपटाविषयी लेखिकेने केलेले वैचारीक अधिष्ठानाधिष्ठीत रसग्रहण तो चित्रपट पाहण्यासाठी सामान्यासही प्रवृत करते. यांचे परखड व सूक्ष्मतेने केलेले लेखन पुन्हापुन्हा वाचावयास आवडेल.

Narayan Samant

बहुतेक करून सिनेमा खुपचं संथ असल्यामुळे कदाचित हे नाव सुचले असेल.अशा सिनेमांची द्वारका झाली तरच कासव पळणार.

Ashok Hendre

आपलं वर्तमान जीवन इतकं गुंतागुंतीचं झालंय की आपल्याला अशा थोर विचारांवर मंथन करायला देखील त्या विभुतींना एकतर पुन्हा जन्मावं तरी लागतं नाहीतर मरावं तरी लागतं. आयुष्यातील आपल्या प्राधान्य क्रमास पुन्हा एक जोरदार धक्का मारण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे हे लेखिकेने केलेल्या समीक्षेवरुन जाणवत आहे. लेखिकेने मांडल्याप्रमाणे आज गांधी विचाराने कधी नव्हते इतके समाजमन ढवळून निघत आहे. गांधींनी वैयक्तिक आयुष्यात जे कमालीचे प्रयोग केले तशीच अपेक्षा विशाल समुदायाकडून ठेवली. आणि इथेच गफलत झाली असे वाटते. व्यक्तीची शिस्त समष्टीला लावण्याचा दुराग्रह इतिहासात जेव्हा जेव्हा झाला तेव्हा तेव्हा टोकाचा संघर्ष झाल्याचे दिसते. व्यक्ती जेव्हढी प्रगल्भ असते तेव्हढ्या प्रगल्भतेची अपेक्षा समाजाकडून ठेवणं अव्यवहार्य आहे. या अंतर्विरोधाची अपरिहार्य अशी परिणती शेवटी गांधींच्या हत्येत झाली. वैचारिक लढाई गांधी जिंकतात परंतु व्यवहारिक लढाई मात्र हरतात. हां सिनेमा देखील हाच संदेश देत नाही का ? समाजमनाच्या प्रगल्भ होण्याची गती ही कासवगती आहे आणि त्यामुळे ती वेळखाऊ आहे ; परंतु शेवटी कासवचं शर्यत जिंकणार आहे हा आशावाद दिलासा देणारा आहे. सिनेमा हे माध्यम अत्यंत प्रभावी असल्यामुळे कलेचा हा आविष्कार समाजमन परिष्कृत करण्याकामी फार मोलाची भुमिका बजावू शकतो हे वारंवार सिद्ध होत आहे. याच साखळीत अशा सकारात्मक विचारांचा नंदादीप सतत तेवत ठेवणार्या जाणत्या समीक्षकांची भुमिका प्रस्तुत लेखिकेने चोख वठवली आहे. लेखिकेस धन्यवाद ! अशोक हेंद्रे , पुणे ९८८१२४४९१०

Pratibha Tawde

Very well written review Rajashri. You have nicely put finger on 'Virodhabhas' and linked it to our day to day life. Very nice.

Neeta Barge

Rajashri nehami pramanech khup chhan analysis kel ahes Gandhiji kalayala khup avghad ahet acharnyala tar tyahun kathin Pan cinema pahun kalayala thodi tari madad hoil Thanks

Anjani Kher

Hoy. Lekhikene khoop chan lihile ahe. Chitrapatache rasagrahan karta karta Gandhihi samjavun dile ahet. Tiche ajun kahi lekhan vachayla milave.

Add Comment