सांगाती काळ!

अनंतराव भालेराव यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या 'कैवल्यज्ञानी' या स्मरणग्रंथाच्या प्रस्तावनेतील काही भाग 

14 नोव्हेंबर 1919 ते 26 ऑक्टोबर 1991 असे 72 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अनंतराव भालेराव यांची प्रमुख ओळख 'मराठवाडा' चे संपादक म्हणून राहिली आहे. 1948 ते 1986 अशी तब्बल 38 वर्षे ते मराठवाडामध्ये होते, त्यातील आधीची पाच वर्षे सहसंपादक आणि नंतरची 33 वर्षे संपादक. मराठवाडा हे 1963 पर्यंत साप्ताहिक/ अर्धसाप्ताहिक होते, नंतर दैनिक झाले. राजकारण, समाजकारण व साहित्य या तीनही प्रमुख क्षेत्रांत मराठवाडा आणि अनंतराव यांनी बजावलेली भूमिका, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासातील विशेष महत्वाचे पर्व मानले जाते. अशा या अनंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा 'कैवल्यज्ञानी' हा गौरवग्रंथ, प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केला आहे. त्यात 24 मान्यवरांचे लेख असून, अरविंद व्यं. गोखले यांची प्रस्तावना आहे. अभंग प्रकाशन नांदेड, यांच्याकडून येत असलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन 14 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे होत आहे. त्या निमित्ताने या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील पूर्वार्ध येथे प्रकाशित करीत आहोत.

कोणत्याही लेखनाचा प्रारंभ हा 'कोणे एके काळी' अशा वाक्याने केला तर तो संदर्भ त्या लेखाची रया घालवतो, असं आपलं माझं मत. तरीही मला आज या निमित्ताने कोणे एके काळी काय अवस्था होती ते सांगायची इच्छा होते आहे. तेव्हा वृत्तपत्रांचे संपादक एका विशिष्ट ध्येयवादातून हे क्षेत्र निवडायचे. त्यांना समाजकार्य करायचे असे. स्वातंत्र्याची तळमळ त्यांच्याकडे होती. लोकशिक्षण आणि लोकजागृती हे त्यांचे काम असल्याने त्यांच्यात समाजाला दिशा द्यायची ऊर्जा असे. बाहेरच्या विश्वातल्या प्रगतीच्या खाणाखुणाही त्यांना सर्वसामान्यांपर्यंत न्यायच्या होत्या. या क्षेत्रात फार पैसा नाही हे त्यांना माहिती होते. पैसा हा त्यांच्या दृष्टीने दुय्यम होता. ते कधीच पैशासाठी काम करत नव्हते. लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर असोत, गोपाळ गणेश आगरकर असोत की, महात्मा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर; त्यांना समाजमन जागवायचे होते. त्यांच्यापासून सुरू झालेली ही विचारधनाची पखरण अगदी अलीकडेपर्यंत चालू होती. जे काही द्यायचे ते मुक्तहस्ते दिले जायचे. पण तो काळ गेला.

मधल्या काळात काम करणाऱ्या माझ्या पिढीनेही कधी फार पैसा पाहिलेला नाही, पण वृत्तपत्रांच्या मालकांनी तो पाहिला. आम्हाला पैसा नको असायचा असे नाही, पण तेव्हा तो बेताचाच असणार, हे गृहीतक होते. त्यावेळी शिक्षकांचे पगार तरी काय होते? आज ते सांगायला लाज वाटणार नाहीत, असे आहेत. एका पिढीपर्यंत मूल्याधिष्ठित पत्रकारिता जपणाऱ्यांची संख्या भरपूर होती, आज हे मूल्य नेमके कोणत्या पायरीवर उभे आहे असे विचारावे लागते. तेव्हाचे मूल्य हे किमतीत मोजले जात नव्हते. त्याला नैतिकतेची जोड होती. आज ती शोधावी लागते आहे. माझे हे विधान सरसकट घेण्यात येऊ नये. काही वाईट मंडळी जिथे असतील तिथे त्यापेक्षा जास्त चांगली मंडळीही असू शकतात. पण नैतिकतेचा वारसा जपणाऱ्यांची मांदियाळी शोधायची म्हटले तर त्यातले शेवटचे शिलेदार कदाचित अनंतराव भालेराव असतील. त्यांनी आपल्या कालखंडात पाहिले काय, तर हालअपेष्टा आणि प्रसंगी कुचेष्टासुद्धा. तरीही अनंतरावांनी 'मराठवाडा' अशा उंचीवर नेऊन ठेवला की, पुण्या-मुंबईच्या प्रतिष्ठित दैनिकांच्या छातीत धस्स व्हावे. आज एक-दोघा वृत्तपत्रांचे अग्रलेख वाचले जात असतील, पण तेव्हा वृत्तपत्रांचे अग्रलेख हा चर्चेचा विषय असे आणि त्यात 'मराठवाडा' अग्रस्थानी होता. त्याआधीच्या काळात अग्रलेख म्हणजे 'मराठा' हे समीकरण झाले होते. त्यानंतरच्या काळात गोविंद तळवलकर किंवा त्यानंतर कुमार केतकर यांचे नाव घेतले गेले.

साठीच्या उत्तरार्धात आचार्य अत्र्यांचा 'मराठा' शेवटच्या कालखंडात मार्गक्रमण करत होता. दैनिक 'मराठवाडा' मात्र याच काळात महाराष्ट्र व्यापायला निघाला होता. 'मराठवाडा' दैनिक होत असताना इतर अनेक लहानमोठी पत्रे आपआपल्या परीने बेडरपणाने काम करीत असत, पण यातल्या प्रत्येकालाच शाबासकीची थाप मिळत असे, असे नाही. तेव्हा माझ्यासारख्यांना आपल्याला चांगले लिहिता यावे एवढेच वाटत असे. चांगले लिहिता यायचे असेल तर आपल्याला पत्रकारितेतच स्थान कमवावे लागेल, एवढी साधीसुधी इच्छा. माझ्यासारख्यांचे आदर्श आचार्य अत्रे होते. माझ्यासारख्यांना अत्रे ऐकता आले, वाचता आले आणि पाहताही आले. संयुक्त महाराष्ट्राचा प्रत्यक्ष संघर्ष अनुभवता आला नाही, कारण तेव्हा मी खूपच लहान होतो. तरी तो अभ्यासता आला. मराठवाड्याचे प्रश्न समजून घेण्याएवढी समज तेव्हा नव्हती. ती नंतर आली म्हणून तर अनंतराव भालेराव कळले. एस. एस. जोशी यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या जवळ जाता आले. आज मागे वळून पाहताना लक्षात येते की, अनंतराव भालेराव यांच्यासारख्यांसमोर तेव्हा खूपच मोठ्या समस्या होत्या. मराठवाड्यात वृत्तपत्र काढायची परवानगी नव्हती आणि निजामाच्या राजवटीत बंधने इतकी होती की कोणत्याही चळवळीला उभे राहूच दिले जात नव्हते. सतत तुरुंगवास आणि छळवणूक यांचे रहाटगाडगे चालू असे.

'मराठवाडा' वृत्तपत्र तेव्हाच्या मराठवाड्यात नव्हते. त्याची छपाई 1938 च्या सुमारास मराठवाड्यातून सुरू झाली. त्याची पहिली जाहिरातच मुळी 'साप्ताहिक मराठवाडा आता संपूर्ण मराठवाडाभर येणार, निजामी सत्तेवर घणाघाती प्रहार करणार' अशा पद्धतीची होती. आ. कृ. वाघमारे हे संपादक होते. अनंतराव हे 'मराठवाडा' साप्ताहिकात कामाला लागले, तेव्हा त्यांचा पगार होता केवळ 35 रुपये, पण रुपयास किंमत असणारा तो काळ होता. निजामाच्या विरोधातल्या साऱ्या चळवळीचे 'मराठवाडा' हे केंद्र बनले. त्यातच उमरीचे बँक लुटीचे प्रकरण झाले. अनेकांवर पकड वॉरंट्स निघाली. अशा वेळी 'मराठवाडा' साप्ताहिकावर टाच येणे अकल्पित नव्हते. त्यामुळे 'मराठवाडा' तिथून हलला आणि त्याची छपाई आचार्य अत्रे यांच्या छापखान्यात मुंबईतून होऊ लागली.

'मराठवाडा' या नावाला खूप मोठे वलय प्राप्त झाले ते तो या सर्व चळवळीच्या केंद्रस्थानी आला तेव्हा. मराठवाड्याचे प्रेम, मराठवाड्याचे प्रश्न, मराठवाड्याचे महत्त्व आणि मराठवाड्याची लढाई हे सगळे या एकाच शब्दात ठासून भरले असल्याचे सर्वांचे मत पडले. 'मराठवाडा' दैनिक झाले 1968 मध्ये. माझी पत्रकारितेची कारकीर्द त्यापुढल्या वर्षात सुरू झाली. इतर नवख्यांप्रमाणे मीही तेव्हा थोडासा चाचपडत होतो, पण मग लिखाण जमायला लागले. मी आधीच्या काळात समाजवादी पंथाचा होतो आणि नंतर पत्रकार झालो. म्हणजे समाजवाद्यांपासून बेताबेताने अंतर ठेवून चालायला लागलो. नंतर थोडा दूर गेलो, पण याला काही खास कारण नाही. समाजवाद्यांमधला टोकाचा काँग्रेसद्वेष माझ्या मनाला भावत नसे. तो काळ इंदिरा गांधींच्या राजकीय उत्कर्षाचा होता आणि त्यांची छाप मनावर पडणे स्वाभाविक होते. त्यावेळी मला 'मराठवाडा' दैनिकात काम करायची संधी घेता आली नाही, अन्यथा काय झालो असतो ते नाही सांगता येत. तेव्हा मला 'मराठवाडा' दैनिकाचे निमंत्रणही होते. 'मराठवाडा'च्या संपादकांचे मुलाखतीसाठी पाचारण करणारे पत्र आजही माझ्या संग्रही आहे.

मला त्यावेळी 'केसरी ने बोलावून घेतल्याने मी औरंगाबादेला जाण्याचे टाळले आणि पुण्यात आपला बाइबिस्तरा टाकला. औरंगाबादेला न जाण्याचे कारण ते शहर तेव्हा फार परिचयाचे नव्हते. पुण्यात तेव्हा माझे बरेच नातेवाईक होते, हे त्याचे खरे कारण. 1969 च्या सुमारास माझ्या नजरेसमोर दिग्गज अशी समाजवादी नेतेमंडळी होती. एस. एम. हे त्यातल्या त्यात अधिक लाडके, त्यानंतर क्रमांक होता तो प्रधानमास्तरांचा, पुढल्या काळात तर प्रधानमास्तरांचा लाडका संपादक मी होतो. एस. एम. काय किंवा प्रधान सर काय, दोघेही अतिशय सत्शील आणि प्रामाणिक. त्यांच्याकडे माझे जाणेयेणे असे. औरंगाबादचे डॉ. बापूसाहेब काळदाते हे आमच्या पिढीचे हीरो होते. मात्र त्यांना भेटायची वा त्यांच्याशी बोलायची संधी कधी साधता आली नाही.

असो, सांगायचा मुद्दा तो नाही, मी ज्या पत्रकारांना पाहिले किंवा अनुभवले त्यातलेच एक नाव अनंतराव भालेराव. पत्रकारितेच्या कारकिर्दीत माझे तेव्हाचे संपादक जयंतराव टिळक यांच्यासमवेत मी अनंतरावांना भेटलो होतो. तेही त्यांच्या औरंगाबादेतल्या निवासस्थानी. मला त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रसन्न आणि प्रभावी वाटले. त्यांचे अग्रलेख आक्रमक आणि वैचारिकदृष्ट्या दर्जेदार असत. 'केसरी'त असताना मला 'मराठवाडा' वाचायला मिळत असे. 'मराठवाडा' टपालाने येत असल्याने तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हातात पडे. पोस्ट खाते तेव्हा बरेच चांगले होते. तेव्हा पोस्टाने येणाऱ्या बातम्याही ताज्या वाटायच्या, आज अगदी काही क्षणांपूर्वीची बातमीही शिळी वाटते. अनेक मार्गांनी ती आपल्यापर्यंत येऊन 'किती वेळा तीच ती', असे तिचे स्वरूप होऊन जाते. तेव्हा संपादकीय खात्यात रोजच्या तीन वेळच्या टपालाचा ढीग पडायचा. आमचे संपादक जयंतराव टिळक हे अनंतरावांच्या लेखनाचे चाहते होते. कधीकधी तेही 'मराठवाड्या'चे अग्रलेख खुणा करून आम्हां उपसंपादकांकडे पाठवत. आजचे संपादक अशी काही बाहेरची वृत्तपत्रे वाचत असतील, अशी शक्यता नाही.

'मराठवाडा' आणि 'केसरी' यांच्यात साम्यस्थळेही भरपूर होती. दोन्ही वृत्तपत्रे ही विश्वस्तनिधीमार्फत चालणारी, म्हणजेच ती ट्रस्टच्या मालकीची. 'केसरी' त्रिसाप्ताहिकातून दैनिक झाला, तर मराठवाड्याचा प्रवास अर्धसाप्ताहिकाकडून दैनिकाकडे. मराठवाड्याला निजामी जुलूमशाहीचा जाच, तर 'केसरी'ला आधीच्या ब्रिटिश सत्तेचा. 'केसरी'ने अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतलेला, तर 'मराठवाड्या ने अनेक चळवळींना जन्म दिलेला. नामांतर चळवळीमध्ये 'मराठवाडा' दैनिकाने एक स्वतंत्र भूमिका स्वीकारलेली होती. ती चुकीची होती की बरोबर हा वाद आता घालण्यात अर्थ नाही, पण तेव्हा 'मराठवाडा' होरपळून निघाला. ज्यांना आपली जुनी वसुली करायची होती, त्यांनी 'मराठवाड्या'वर चहूबाजूंनी हल्ले चढवून ती पदरात पाडून घेतली. केसरी ने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वत:ला झोकून दिले होते. त्या आणि गोवा मुक्तिसंग्रामाचे मुख्य केंद्रच 'केसरी' होते. नंतरच्या काळात नवे तंत्रज्ञान स्वीकारणारे 'केसरी' हे महाराष्ट्रातले पहिले दैनिक ठरले. 'मराठवाड्या'ने काही काळानंतर ते स्वीकारले. काळानुरूप राहायची ही प्रक्रिया अशीच चालू राहिली असती तर 'मराठवाडा' आजही टिकून राहिला असता. तो राहायला हवा होता, अशी हळहळ व्यक्त करणारे अनेकजण मी पाहिले आहेत. मीही त्यांच्यातला एक आहे.

चहूबाजूंच्या हल्ल्यांचे म्हणाल तर 'मराठवाड्या'ची पार्सले वेळेवर त्या त्या गावी पोहोचू न देणे, पार्सल पळवणे, देणेकऱ्यांना ती न देण्यास भाग पाडणे, बाजारात अफवा, कंड्या पिकवणे, जाहिरातदारांना धमक्या देणे आणि 'मराठवाडा' दैनिकाला जाहिरात दिल्यास आपल्या वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध न करण्याची तंबी देणे, असे प्रकार सर्व संबंधितांनी केले, ही गोष्ट खरीच आहे. अशाच तऱ्हेच्या कारवाया त्यांनी 'केसरी' विरुद्धही केल्या होत्या. त्यावेळी मी 'केसरी'चा कार्यकारी संपादक होतो आणि अग्रलेखांचा बहुतांश बाज मीच सांभाळत होतो. या भांडवलधारी वृत्तपत्रांच्या खपवाढीच्या आक्रमकतेविरुद्ध मी एकदोनदा लिहिलेही आहे. एकदा तर मी त्या साखळी वृत्तपत्रावर अग्रलेखातून कडाडून हल्ला चढवला होता. अनंतरावांचे चिरंजीव निशिकांत यांनी यासंदर्भात लिहिलेलेच आहे. माझ्या अशाच एका वृत्तपत्राविषयी अग्रलेखाद्वारे घेतलेल्या भूमिकेविषयी मला माझ्या तेव्हाच्या संपादकांनी 'हे लिहायचे काय कारण?', असा प्रश्नही केला होता. पण मला जे काही उत्तर तेव्हा सुचले ते मी देऊन मोकळा झालो.

गांधीजी आज असते तर, किंवा टिळक असते तर, अशा प्रश्नांना जन्म देणारे अनेकजण आहेत, पण त्यांचे योग्य उत्तर देणारे कोणी नाहीत. काय सांगणार या प्रश्नांवर? तसेच 'मराठवाडा' दैनिकाबद्दलही म्हणता येईल. 'मराठवाडा' आज असता तर तो भांडवलदारी वृत्तपत्रांच्या स्पर्धेत कोणत्या पायरीवर उभा असता हे सांगणे अवघड आहे. अनेक प्रादेशिक वृत्तपत्रांची होरपळ या जीवघेण्या स्पर्धेत झाली आहे. 'मराठवाडा' होता तेव्हा तो गाजला. त्याने इतिहास घडविला. अनंतराव भालेरावांच्या लेखनाने क्रांती केली. त्यांनी भल्या भल्या वृत्तपत्रांना दिशा दिली. त्यांनी पत्रकारितेत एक मानदंड निर्माण केला.

डॉक्टरेट करणाऱ्यांसाठी आजही 'मराठवाडा आणि त्याचा संघर्ष' हा विषय उपयुक्त आहे. 'मराठवाडा' दैनिकाने समोर आणलेले प्रश्न असाही विषय एखाद्याला डॉक्टरेटसाठी निवडता येईल. मला माहीत नाही, की 'मराठवाडा' दैनिकाचे आजवरचे सर्व अंक जपून ठेवले गेले आहेत की नाहीत? ते असतील तर त्यांची आजची अवस्था काय असेल? प्रश्न तसा गंभीर आहे आणि तो समाजमनाला आरसा दाखवणाराही आहे. मी सध्या 'केसरी'चे जुने छायांकित अंक चाळतो तेव्हा असे लक्षात आले की, अनेक अंकांमध्ये पानेच्या पाने गायब आहेत. काही अंकांमध्ये रिकामे रकाने आहेत.. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी कोणती बातमी किंवा माहिती प्रसिद्ध केली गेली आहे हे सांगता येणे अवघड आहे. ज्यांनी कोणी यापूर्वी या फायली हाताळल्या असतील त्यांनी चक्क तिथल्या मजकुराला कात्री लावून आपल्या नतद्रष्टपणाची साक्ष मागे ठेवली हे असे घडते तोपर्यंत आपल्याला कोणतेही

ऐतिहासिक मूल्य जपता येणे अवघड आहे. हा वारसा आहे आणि तो आपण आपल्या मूर्खपणाने नष्ट करून टाकतो आहोत याचे भानही समाजाला राहिलेले नाही. आज ज्ञानप्रकाश, काळ, विद्याविलास, मराठा, अशा अनेक वृत्तपत्रांचे जुने अंक अभ्यासकांना मिळवायचे असतील तर ते मिळतीलच असे नाही. मी मागे मुंबईत एका मराठी वृत्तपत्राच्या कचेरीत त्यांच्या जुन्या अंकांविषयी विचारले होते, तेव्हा मला उत्तर मिळाले, की मुंबईतल्या या भागात एका चौरस फुटाच्या जागेची किंमत ३० हजार रुपये (तेव्हाचा दर) आहे. मला काय समजायचे ते समजले होते. ज्या काळात 'डिजिटायझेशन' किंवा 'इंटरनेट' हा शब्दही परिचयाचा नव्हता तेव्हाचे अंक नंतरच्या काळात नेटवर टाकावेत किंवा त्याची 'जोडणी' (लिंक) उपलब्ध करून द्यावी, असेही सध्याच्या मालकशाहीला वाटत नाही. 'मराठवाडा' दैनिकाचे अंक तरी नेटवर उपलब्ध आहेत किंवा नाही, हे मला माहिती नाही.

अनंतरावांनी अनेक प्रश्नांवर लिहिले आणि अनेकांना लिहिते केले. अनेक समस्यांवर ते जेव्हा लिहायचे तेव्हा त्यांची तुलना भल्याभल्यांशी केली जात असे. प्रसिद्ध लेखक महेश एलकुंचवार यांच्या वडलांनी त्यांच्या एका प्रश्नावर 'तो मराठवाड्याचा टिळक आहे ना' असा अनंतरावांचा उल्लेख केला होता, असे त्यांनीच म्हटले आहे. अनंतरावांना आपला असा उल्लेख कोणी केला असेल याची माहितीही असायची शक्यता नाही, पण त्यांना ते कळले असतेच तर त्यांनी विनम्रपणे त्यास नकार दिला असता. ते परखड लिहायचे. आपल्याला पटेल तेच लिहायचे. त्यासाठी त्यांनी कसलीही तडजोड केली नाही. 'मराठवाड्या'च्या रक्तातच संघर्ष हा लिहिलेला असल्याने त्याचे प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या लिखाणातच दिसायचे. मराठवाड्याच्या दृष्टीने त्यांचे लिखाण हेच मोठे भूषण होते, शिरोभूषणच जणू. अनंतरावांनंतर मात्र तसे 'टिळक' मराठवाड्यात कोणी झाले नाहीत..

होमी तल्यारखान हे नागरी पुरवठामंत्री असताना पन्नालाल सुराणांनी त्यांच्या एका कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर लिहिले होते. तेव्हा सुराणा यांच्यावर लेखक म्हणून आणि भालेराव यांच्यावर प्रकाशक म्हणून बदनामीचा खटला भरला गेला. त्यात पुरावा सादर करण्यात यश न आल्याने या दोघांनाही शिक्षा झाली, तेव्हा मराठवाडाभर खळबळ माजली होती. त्यावेळी औरंगाबादकरांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या घरापर्यंत मिरवणुकीने जाऊन समस्त जनता तुमच्या पाठीशी आहे असे त्यांना आश्वस्त केले. अशा तऱ्हेचा मोठेपणा लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे यांच्यानंतर अन्य कोणाच्या वाट्याला आला असेल असे वाटत नाही. इथे तुलना म्हणून नव्हे; पण टिळक आणि आगरकर यांना वयाच्या पंचविसाव्या वर्षी कोल्हापूरचे दिवाण माधवराव बर्वे यांच्या बदनामीच्या आरोपावरून अशीच शिक्षा झाली होती आणि एकशेएक दिवसांनी जेव्हा त्यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाली तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात महात्मा फुले यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळीही ज्यांनी त्या दिवाणाच्या विरोधात आपल्याकडे भरपूर पुरावे असल्याचे टिळक आणि आगरकर यांना सांगितले होते, त्यांनीही तेव्हा असाच काढता पाय घेतला होता. केवढे हे साम्य आहे पाहा.

आज सर्वत्र दिसते काय? वृत्तपत्रे पोटार्थी बनलेली आहेत. ती वेगळ्या अर्थाने धंदा करू लागली आहेत. निवडणुकांच्या काळात त्यांच्यापैकी बहुतेकजण आपआपल्या परीने स्वतःच्या मालकांची काळजी वाहात असतात आणि बातम्यांचे दर ठरलेले असले तरी आपण किती निःस्वार्थी आहोत, असा आव आणत असतात. वृत्तपत्रांचे संपादक कधीकधी सत्ताधाऱ्यांचे किंवा या राजकारण्यांचे भाट वाटावेत इतक्या खालच्या पातळीवर उभे असतात.

जनतेच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवणारा 'मराठवाडा' नेमका घसरला कोठे किंवा केव्हा तो खाली येऊ लागला, त्याची कारणमीमांसा या ग्रंथाच्या निमित्ताने अनेकांनी केलेली आहे. ती मला तितकीशी बरोबर वाटत नाही. याचे कारण असे की, कोणत्याही एका वा अनेक कारणांनी दैनिक वृत्तपत्र वाचकांच्या मनातून उतरते असे नाही. कारणांची अशी चळत बनते तेव्हाच वृत्तपत्रावर आपले प्रकाशन थांबवायची वेळ येत असते. विशिष्ट भूमिका पचवायची ताकद अंगी असावी लागते. ती 'मराठवाड्या'कडे होती. त्याने अनेक मोठे आगडोंब पचवलेले होते, आणीबाणी किंवा मराठवाडा विद्यापीठ नामांतरासारखा विषय. त्याबाबत मतभेद जरूर असतील, पण त्यामागल्या प्रामाणिक भावनांबद्दल कोणालाही आक्षेप घेता येणार नाही.

नामांतर प्रकरणात अनंतरावांनी एक ठाम भूमिका घेतली आणि त्याचे पडसाद सर्व मराठवाडाभर उमटले. त्यांची ती भूमिका मान्य असो वा नसो, पण त्यांनी ती घेतली, हे धाडसाचे होते. नामांतर का हवे किंवा का नको, अशा दोन्ही बाजूंनी आक्रंदन चालू होते. अगदी जवळच्यांनीसुद्धा त्या काळात अनंतरावांच्या भावना समजून घेतल्या नाहीत हा त्यातला वाईट भाग होता. अनंतरावांचे 'कळीचे शब्द' निळू दामले यांनी या ग्रंथात शब्दबद्ध केले आहेत. त्यात त्यांच्या या भूमिकेची विस्ताराने चर्चा आहे. 'मराठवाडा' स्थापनेचे दिवस त्यांनी स्पष्ट केल्याने मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर प्रकरणात नामविस्ताराला किंवा नावबदलाला त्यांचा विरोध का होता, हे आपल्याला समजावून घेता येईल. डोके थंड ठेवून त्याचा विचार करता येईल...

 - अरविंद व्यं. गोखले 


कैवल्यज्ञानी - पत्रमहर्षि अनंत भालेराव स्मरणग्रंथ
संपादक - प्रवीण बर्दापूरकर
पृष्ठे - 308  किंमत - 375 रुपये


कैवल्यज्ञानी - पत्रमहर्षि अनंत भालेराव स्मरणग्रंथाचे 14 नोव्हेंबर रोजी प्रकाशन होत आहे. पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झाली असून 15 नोव्हेंबरपर्यंत हे पुस्तक 250 रुपयांमध्ये सवलतीत उपलब्ध आहे. नोंदणीसाठी संपर्क उमेश कस्तुरे - 9823470756. 

Tags: पुस्तक नवे पुस्तक अरविंद व्यं. गोखले अनंतराव भालेराव अनंत भालेराव मराठवाडा कैवल्यज्ञानी Arvind Gokhale Anant Bhalerao Marathwada Kaivalyadnyani New book Load More Tags

Add Comment