उमर शेख. कोरोनाने मत्यू झालेला हा माझा अतिपरिचयातला मित्र. खरंतर माझ्या आठवणींच्या पटलावरून उमरला मी पुसुनच टाकलेलं. अगदी परवापर्यंत मला तो दिसायचा. जॉगिंग झाल्यावर मी अण्णाच्या टपरीवर यायचो. हा माझा कॉफी अड्डा. पलिकडेच उमरची पान-सिगरेटची टपरी. तो दूरूनच मला पहायचा. माझी नजरही त्याच्या टपरीवरून भटकत कॉफीतून निघणाऱ्या वाफेवर यायची. नजरेतली ओळख अनोळखी झालेली. की मी सोईस्कर ही मैत्री विसरलेलो?
मी का असा वागत होतो? कदाचित मृत्यूचा विसर पडला असावा. पण हल्ली वातावरणावर मृत्यूचं सावट आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कोरोना आहे. इथं-तिथं हात लागला की जणू मृत्यूच तळहातांना चिकटतोय की काय असं वाटतंय. पण उमरच्या जाण्यानं माझ्या नजरेसमोर जीवनाचे तुकडे तरळू लागले. की 'आपण अमर नाही आहोत' याची आठवण जागी झाली?
उमर ज्युनियर कॉलेजातल्या 'रम्य' वर्षांतला मित्र. त्याच्या जाण्यानं त्या वर्षांतला आणखी एक मित्र आठवला. रतन घोडेराव. रतनने फाशी घेतली. वीस-बावीस वर्षं उलटली. पण रतन अजूनही आठवतो.
त्या रात्री भारत-पाकिस्तानची मॅच होती. भारतीय टिम केवळ 191 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये गेलेली. पण अनिल कुंबळेनं जबरदस्त बॉलिंग केली. कुंबळेच्या चार विकेट्समुळे भारत 75 रन्सच्या मार्जिननं जिंकला. ती डे-नाईट मॅच होती. पाकिस्तानला भारताने हरवल्याचा हँगओव्हर सकाळी निवला नव्हता. रात्री सगळे ती मॅच पाहत होते. तेव्हा रतनने गळफास घेतला. वयाच्या पंचवीशीतच रतन त्या रात्री गेला. आम्ही सगळेजण सावडायच्या विधीला गेलेलो. फार राग आलेला रतनचा. वर्गातला हा शामळू पोरगा. कॉलेजात इनशर्ट कंपल्सरी होता. मी अनेकदा रतनचं शर्ट खेचून त्याचा इनशर्ट मोडायचो. तो नुसता हसून पुन्हा पँटमध्ये शर्ट कोंबायचा. आम्ही दंगा करायचो तेव्हा हा बेंचवर पाठांतराचं रिव्हिजन करत बसायचा. असा हा पोरगा कसल्याशा लफड्यात अडकला. त्याच्या वस्तीत काहीतरी झालेलं. पोलिस केस होती. आम्ही सगळे मित्र अगदी कोवळे तरूण होतो. त्या केसमध्ये काय करू शकलो असतो? पण रतनने एक हाक तर द्यायची होती, जिवाला जीव द्यायची तयारी असते ना कोवळ्या वयातल्या मैत्रीत. मग हा असा का गेला? त्या काळात मोबाईल-व्हॉट्सअॅप नव्हतं. रतनने कुणाही मित्राची मदत मागितली नाही. अजूनही त्याच्यावरचा माझा राग निवलेला नाही. उमरनं त्या रागाची आठवण करून दिली.
उमरही तसा शामळू. त्या दिवशी रोझ-डे होता. उमरला एक मुलगी आवडायची. तिच्यासाठी त्यानं गुलाब आणलेला. पिवळा गुलाब फ्रेंडशिपचं प्रतिक नि लाल फुल लव्हशिपचं! उमरकडे लाल गुलाब होता. पण तिच्याशी बोलून फुल देण्याचं धाडस उमरमध्ये नव्हतं. म्हणून मी कॉलेज सुटल्यावर त्या मुलीच्या मागे उमरला घेवून गेलो. तिला आवाज देवून थांबवलं. ती मागे वळून 'काय?' म्हणाली. मला अजूनही तिचे घारे डोळे आठवतायत. उमर नि तिच्या मध्ये मी उभा होतो. उमर गुलाबाकडे नि तिच्याकडे पाहत थांबलेला. ती हसत जवळ आली. तिने उमरच्या हातातून गुलाब घेतला. नि पलटून गेलीसुद्धा. ती काय पुटपुटली आता आठवतही नाही. उमरचे गोरे गाल मात्र स्पष्ट आठवतायत. गुलाबाहून लाल गाल नि चमकणाऱ्या डोळ्यांचा उमर मला अजून लख्ख आठवतोय. त्या प्रसंगात मी खि खि करून हसत सुटलो. खरंतर मलाही कुणालातरी गुलाब द्यायचा होता. पण माझं धाडस नव्हतं. पुढे मी कधीच गुलाब दिला नाही, नि उमरचं प्रेमप्रकरण त्या गुलाबासोबतच एक हिरवीगार आठवण देवून संपुष्टात आलं. का कुणास ठावूक त्या प्रेमाला पालवी फुटली नाही. ते वर्ष संपलं. पण त्या प्रसंगावरून आम्ही मित्र उमरची खूप खेचायचो.
त्या अधुऱ्या प्रेमाचा राग कदाचित उमरच्या मनात असावा. कुठे भेटला की तो आयमायवरून मला शिव्या द्यायचा. बोलता बोलता खणकन् मारायचा. वर्ष सरत गेली. पण उमर कदाचित अजूनही तिथेच त्या गुलाबासोबत उभा असावा. अजूनही त्याच्या अधूऱ्या प्रेमातलं अंतर तो माझ्यात पाहत असेल का? कुणालातरी दोष द्यायचा म्हणून त्या कोमल क्षणांत त्यानं माझ्या खिदळण्याला दोष दिला असेल का? पुढे कसलासा राग तो आम्हा मित्रांवर काढायचा. जुन्या मैत्रीच्या आडून भर रस्त्यात मारायचा. त्याचा निबर हात फार लागायचा. म्हणून मग मी या रोषाला बळी पडायचं टाळू लागलो. उमर कधी दिसलाच तर मी वाट बदलली. नजर चुकवली. नंतर नंतर पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. एक मैत्री हळूहळू काळाच्या पडद्याआड गेली.
अलीकडे त्या दोन वर्षांतल्या मित्रांनी एकमेकांना पुन्हा शोधलं. व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला. उमरनं त्या ग्रुपवर आपल्या मुलाच्या साखरपुड्यासाठी सर्वांना आमंत्रण दिलं. पण सगळे आपापल्या व्यापात गुंतलेले. कुणीच गेलं नाही. उमरला पुन्हा राग आला. तो व्हॉट्सअॅप ग्रुपमधून 'एक्झिट' झाला. कुणी विचारलंही नाही. 'काय झाल? का हा मित्र असा रूसलाय?' विचारायला जायचो नि हा शिव्या घालायचा, समोर असला तर मारेलही. त्यापेक्षा कुणी काही विचारलंच नाही. नि परवा उमर कोरोनानं गेला. त्या रात्री त्याला धाप लागली. हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. नि परस्पर त्याचा अंत्यविधिही झाला. बातमी कळली तीही व्हॉट्सअॅप ग्रुपवरच. मग सगळ्यांनी आरआयपी (RIP) नि हात जुळलेले सिंबॉल पोस्ट केले. ग्रुपवर जोक्स, फॉरवर्डस् काही काळ थांबले. कोविडने आयुष्याचा हा तुकडा असा नजरेसमोर तरळून गेला.
अलीकडे माझ्या कुटुंबांतील चारजण कोरोना पॉझिटिव्ह झाले. माझा थोरला भाऊ, त्याची दोन मुलं नि माझी आई. या सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेताना, क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवताना मी अनेकजण पाहिले. घाबरलेले. भेदरलेले. मीही सुरूवातीला घाबरलो होतोच. कळत नकळत उमर शेखची मी न पाहिलेली पॅकबंद बॉडी माझ्या विचारांवर तरंगू लागली. मला उमरचा तो गुलाबाहून लाल झालेला चेहरा आठवेना.
भावाच्या मुलाला न्युमोनियाचं निदान झालेलं. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हता. काही डॉक्टर मित्रांना मी फोन करत राहिलो. ओळखीचे बिनओळखीचे अनेक संदर्भ शोधून मदतीसाठी याचना केली. कसाबसा एका दवाखान्यात बेड मिळाला. मग आम्हा सर्वांची कोरोना चाचणी झाली. दोन दिवसांनी कुटुंबियांपैकी आणखी तिघे पॉझिटिव्ह निघाले. कसा कुणास ठावूक पण पेशंटच्या अगदी जवळून संपर्कात असूनही माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. कदाचित बुद्धानं सांगितलेली मैत्री तत्त्व माझ्यात आलं असेल का?
सगळी भीती गुंडाळून मी आप्तांसाठी झटू लागलो. अर्थात हवी ती काळजी घेतोय. पण कदाचित उमर शेखच्या जाण्याने मला मैत्रीची आठवण करून दिली. माझ्या कुटुंबियांशी मी आता मैत्रीच निभावतोय! या धावपळींमध्ये मला कोरोनाने त्रासलेली माणसं दिसताहेत. मित्र हरवलेले हे जीव असहायपणे अश्रू ढाळताहेत.
हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीत एक तरूण दिसला. उंच, गोरा अगदी बलदंड. पण ऑक्सिनजनच्या मास्कवर फासफूस श्वास घेणारा. त्याची हिरवी लाईफलाईन क्षीणपणे बाजूच्या मशीनवरून सरकत होती. कदाचित कुणातरी मित्राची आठवण त्या तरुणाच्या मेंदूत येत असावी नि ती रेष थोडी उडी घेत असेल. मी जवळपास तीन तास त्या कॅज्युअलिटी वॉर्डमध्ये होतो. त्या तरुणाचं कुणीही त्याच्याजवळ नव्हतं. तो बरा आहे ना, हे विचारणारंही कुणी का आसपास नसावं? एक आजी दिसली. ती फोनवरून कुणालातरी आपल्या मुलाची अवस्था रडून सांगत होती. 'त्याला धाप लागलीय, तो श्वास घेवू शकत नाही.' हे तिचे शब्द मोबाईलवरून पलिकडची व्यक्ती ऐकत होती. नि बाई रडत होती. थोड्या वेळाने तिचा कॉल संपला. मग ती व्हॉटसॅपवरून आलेलं कुठल्यातरी डॉक्टरचं कोविड निरूपन पाहत बसली. हे व्हाटसॅपवरचे फॉरवर्डच आता तिच्या मुलाचे मित्र होते जणू.
दुसरं एक मुस्लिम कुटुंब दिसलं. त्या कुटुंबातला पांढर्या दाढीवाला वृद्ध खुर्चीत बसलेला. त्याचा जावई डॉक्टरांशी बोलत होता. डॉक्टर म्हणत होते, ''आयसीयुचा एकच बेड आमच्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला दिवसाला पस्तीस हजार रूपये द्यावे लागतील." जावयाने वळून म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हाताऱ्याने समोर बसलेल्या मुलीकडे पाहत म्हंटलं, ''चलो अब क्या करे...अल्ला सबसे बडा बादशाहा है...अल्ला खैर करेगा..." या वृद्ध माणसाला दवाखान्यात बेड मिळाला की नाही माहित नाही. पण त्यांना कुणातरी मित्राची गरज असल्याचं मला जाणवलं. अल्लाह करेल का त्यांच्यासाठी कुणा मित्राची व्यवस्था? सरकारने रूग्णांच्या मदतीसाठी जोतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 'आरोग्य मित्र' नेमलेत. कुठे असतात हे आरोग्य मित्र?
जुन्या मित्रांना आपण का टाळतो? आपल्याला वाटतं, आता हे आपल्या नव्या फ्लॅटबद्दल सांगतील, मुलांच्या शिक्षणावर किती पैसा खर्च करतोय याच्या गजाली करतील, नव्या कारसाठी घेतलेल्या लोनबद्दल सांगतील. त्या डामडौलांच्या चर्चेत मैत्री असते का? आणि कोविडच्या या काळात जेव्हा दोन प्रेमाच्या शब्दांची अत्यंत गरज आहे, तुमचा फ्लॅट नि कारचा डामडौल मैत्रीच्या आड तर येत नाही?
मला वाटतं आपण जे जे कमावलंय ते सगळं पुसून टाकावं. काही काही नकोय! भारत-चिन-नेपाळ-पाकिस्तान कुठलीही सिमारेषा नकोय आत्ता. हवीय फक्त मैत्री. आणि असाव्यात गरजू रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये सुविधा. मी मनातल्या मनात एक फडकं घेवून नकाशावरून सगळं जग पुसून टाकतोय नि सदानंद रेंगेंची एक कविता मला सारखी आठवतीये...
सर्व वस्तूमात्र
पुसून टाकलं
तरी शेवटी
हात उरलेच
नि हातातलं
हे फडकं
नि लगेच प्रश्न पडतो, 'आता हातात हे फडकं उरलंय, या फडक्याला कसं निर्जंतुक करू?'
- प्रशांत खुंटे, पुणे
prkhunte@gmail.com
(लेखक हे पत्रकार, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ता आहेत.)
Tags: अनुभव प्रशांत खुंटे कोरोना कोविड मैत्री Prashant Khunte Experience Corona COVID Friendship Load More Tags
Add Comment