जदि तोर डाक शुने केउ ना आशे...

रमेश ओझा आणि श्याम पाखरे लिखित 'नोआखाली – माणुसकीचा अविरत लढा' या कादंबरीचा परिचय

‘जोदि तोर डाक शुने केऊ ना आशे तोबे ऍकला चालो रे’ हे गीत रवीन्द्रनाथांनी जेव्हा लिहिले तेव्हा त्यांना काही वर्षांनी जगातील आणि त्यांच्याच देशातील एक महामानव, त्यांच्याच प्रदेशात काम करताना त्यापासून स्फूर्ती घेईल हे ठाऊक असेल का? कवीची दूरदृष्टी म्हणतात ती हीच असेल का? जरी ह्या गीतापासून असंख्य लोकांनी आजपर्यंत स्फूर्ती घेतली आणि अजूनही घेत आहेत, तरी ते तंतोतंत लागू पडले ते गांधीजींना.. 16 ऑगस्ट 1946 रोजी मुस्लीम लीगने प्रत्यक्ष कृति दिन जाहीर केला. पाकिस्तान हवा म्हणून ते इरेस पेटले होते. त्यावेळी भारतीय उपखंडात जे नृशंस हत्याकांड झाले, त्याने फक्त भारताच्या स्वातंत्र्यालाच नव्हे तर उभ्या माणुसकीलाच काळिमा लागला. अशा परिस्थितीत गांधीजींनी वयाच्या 77 व्या वर्षी हिंसाग्रस्त भागातून फिरून केवळ आपले स्वतःचे प्राणच नाही तर भारतीय संस्कृती, मूल्ये आणि उभ्या विश्वाच्या भूत-वर्तमान-भविष्यातील मानवता कशी पणाला लावली त्याचे विराट दर्शन घडवणारी ‘नोआखाली’ ही कादंबरी मनोविकास प्रकाशन, पुणे ह्यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे.

गांधीजींच्या आयुष्यातील अंतिम पर्व ही खऱ्याखुऱ्या शौर्याची, नाट्यमय कहाणी आहे. तिने आजपर्यंत अनेक भाषांतील कवि-लेखकांना आकर्षित केले आहे. त्या सर्वांमध्ये आपल्या वेगळेपणाने उठून दिसणारी ही कादंबरी रमेश ओझा आणि श्याम पाखरे अशा दोघांनी लिहिली आहे. रमेश ओझा हे गुजरातीतले ज्येष्ठ गांधीवादी पत्रकार आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे गांधीविचारावर स्तंभलेखन केले आहे. सध्या ते भारतीय विद्या भवन, मुंबई येथे कार्यरत आहेत.  श्याम पाखरे हे मुंबईतील के. सी. महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक आणि गांधीवादी लेखक आहेत. दोघांचेही हे पहिलेच कादंबरीलेखन आहे. एक जुन्या पिढीचा गुजराती लेखक व दुसरा तरुण पिढीचा मराठी लेखक ह्यांनी मिळून केलेला हा प्रयत्न खचितच स्तुत्य आहे. ह्या कादंबरीने, मराठी साहित्यात गांधीजीवनाची पदचिह्ने उमटलेली नाहीत हे वैगुण्य धुऊन काढले आहे. माडखोलकर-खांडेकरांच्या नंतर अलीकडेच गांधींनी मराठीत पुनःप्रवेश केला. (‘गंगेमध्ये गगन वितळले’सारखा एखाददुसरा अपवाद सोडता) त्यामध्ये रत्नाकर मतकरींच्या ‘अंतिम पर्व’ ह्या नाटकासोबत ‘नोआखाली’चाही समावेश करावा लागेल. ‘अंतिम पर्व’ला महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वि. दा. सावरकर ह्यांच्या कटकारस्थानाची पार्श्वभूमी आहे, तर नोआखालीला बंगाल - पूर्व बंगाल येथील हिंदू- मुस्लीम वैमनस्याची. ‘नोआखाली’तील काळ हा ‘अंतिम पर्व’च्या आधीचा आहे. “त्यामध्ये ह्या याजकाच्या पूर्णाहुतीची सुरुवात झाली आहे – जिचा अंत दिल्लीला झाला” असे लेखक म्हणतात. “मानवाच्या इतिहासात सत् आणि असत् शक्तींमध्ये अखंड चाललेल्या संघर्षात चिरंतन सत् मूल्यांच्या रक्षणासाठी गांधीजींच्या नोआखाली येथे जाऊन राहण्यास फार मोठे महत्त्व आहे. त्यांनी तसे केले नसते तर तो मानवतेचा पराभव ठरला असता.” असे सांगून “आज आपला समाज स्वातंत्र्योत्तर काळातील सांप्रदायिक वैमनस्याच्या सर्वात कठीण आह्वानाला सामोरा जात असताना त्या पर्वाचे स्मरण करून आपल्या सर्वांना मानवतेचे रक्षण करण्यासाठी प्रेरणा मिळावी” म्हणून ही कादंबरी लिहिली असल्याचे सांगून, लेखकद्वयांनी, “गांधींचे टीकाकार - मग ते कोणत्याही विचारसरणीचे असतील, त्यांनी नोआखाली पर्वाचा अभ्यास करावा” असे आवाहन केले आहे.

कादंबरीची सुरुवात 1971 मधील बांगला देशनिर्मिती आणि निर्वासितांचे लोंढे भारतात येण्याच्या काळापासून होते. त्यानंतर ती फ्लॅशबॅक तंत्राने पुढे (मागे) जाते ती 1946 च्या काळात. प्रत्यक्ष कृति दिनाच्या निमित्ताने कोलकात्यात भीषण सांप्रदायिक दंगे उसळले. त्याचे लोण दूरवर पूर्व बंगालातील नोआखाली जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचले. नोआखालीतील अल्पसंख्य हिंदूंचे अश्रू पुसण्यासाठी गांधीजी तिकडे जाण्याचे ठरवतात. बंगालमधील सोदपूरपर्यंत ते आगगाडीने येतात. तेथे सतीशचंद्र दासगुप्तांचा आश्रम आहे. ते व त्यांच्या पत्नी हेमप्रभादेवी आश्रमात अनेक तरुण मुलांचा सांभाळ करतात, त्यांना विद्याभ्यास, जीवन शिक्षण देतात. अनेक ग्रामोपयोगी कौशल्यांमध्ये प्रवीण करून त्यांच्या रोजगारनिर्मितीचा मार्ग सुकर करतात. तेथील एका तरुणाला गांधीजींचे सहायक, सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ निर्मलकुमार बोस ह्यांच्यासोबत गांधीजींच्या नोआखाली यात्रेत पाठविण्यात येते. तोच ह्या कादंबरीचा निवेदक कबीर. तो त्या दोघांबरोबर राहून, निर्मलबाबू सांगतील त्यानुसार गांधीजींसाठी व इतरांसाठी स्वयंपाक करणे, त्यांचा पत्रव्यवहार बघणे, आजूबाजूच्या लोकांशी बंगालीतून संवाद साधणे इत्यादी कामे करणार आहे. साथीसोबती- अनुयायी दुरावलेले असताना, क्षणोक्षणी स्वतःची सत्त्वपरीक्षा पाहण्याच्या त्या काळात गांधीजी पावलोपावली सत्य, अहिंसा आणि मानवता ह्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करतात ते कबीरच्याच नजरेने वाचक बघतो. हा कबीर वास्तविक निर्मलबाबूंचा ‘आल्टर इगो’ असला, तरी त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व देण्यात लेखकांना यश आले आहे.

नोआखालीमध्ये मुस्लिमांकडून हिंदूंवर अत्याचार झाले होते. त्या दोघांनाही एकमेकांच्या जवळ, पूर्वपदावर आणून त्यांच्यातील सद्भाव वाढीस लागावा ह्यासाठी गांधीजींचा प्रयत्न सुरू होता. मुस्लिमांना ते आलेले अजिबात आवडले नव्हते. ते परोपरीने त्यांच्या मार्गात काटे पसरवीत होते. ‘आम्हाला तुम्ही नको आहात’ असे सूचित करीत होते. मागची 30 वर्षे समस्त हिंदुस्थानातील मनामनावर अधिराज्य गाजवणाऱ्या महामानवाला त्यामुळे किती दुःख व नैराश्य येत असेल! परंतु ते सारे निकराने बाजूला सारून गांधीजी आपले सारे शौर्य, धैर्य आणि अंतरात्म्यावरील विश्वास एकवटून एकेक पाऊल पुढे टाकत होते. नोआखालीतील मुक्कामात अनेक बऱ्यावाईट घटना घटल्या. अनेक लोक भेटले, चर्चा झाल्या. तेथील काही लोकांनी चांगले अनुभवही दिले. त्यानंतर चार महिन्यांनी, डॉ. सय्यद मेहमूद ह्यांच्या पत्रावरून बिहारची परिस्थिती समजल्यावर गांधीजींनी बिहारला जाण्याचा निर्णय घेतला, ह्या टप्प्यावर कादंबरी संपते. बिहारमधील परिस्थिती नोआखालीच्या उलट होती. तो हिंदुबहुल प्रदेश होता व तेथे मुस्लिमांवर अत्याचार झाले होते. परंतु सर्व दंगलींची मूळ कारणे समान होती. नोआखालीला गेल्यावर गांधीजींवर “तुम्ही हिंदूंचे पक्षपाती आहात. त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही गेलात. मुस्लिमांवर अन्याय झालेल्या बिहारमध्ये का जात नाही?” असा आरोप व विचारणा अनेक वेळा करण्यात आली. त्यावर त्यांनी शांतपणेच उत्तर दिले. नोआखालीमधील दंगलींची भीषणता अधिक होती आणि तो प्रदेश स्वातंत्र्यानंतर हिंदूंपासून तुटून मुस्लीम म्हणून वेगळा होणार होता. एकमेकांबद्दल असे वाईट अनुभव घेऊन दोन धर्मांच्या लोकांनी एकमेकांपासून दूर होऊ नये असे त्यांना वाटत होते. शिवाय बिहारसंबंधी फारशी माहितीही त्यांच्यापर्यंत पोहोचू देण्यात आली नव्हती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणताही धर्म अन्याय- अत्याचार करायला, आपल्या आयाबहिणींची अब्रू लुटायला शिकवत नाही आणि धर्माच्या नावावर अशी कृत्ये केली जात असतील तर ती ताबडतोब थांबवली पाहिजेत म्हणून ते तेथे गेले होते. 

नोआखालीच्या वास्तव्यात कबीरची बाबू राजेंद्रप्रसाद, जवाहरलाल नेहरू, राममनोहर लोहिया, ठक्कर बाप्पा, डॉ. सुशीला नय्यर, मनु गांधी, हुसेन शाहीद सुऱ्हावर्दी, शरदचंद्र बोस इ. अनेक लोकांची भेट झाली. त्या सर्वांचे यथायोग्य व्यक्तिचित्रण व गांधीजींशी असलेल्या नातेसंबंधांचे वर्णन ह्या कादंबरीत येते. त्याशिवाय रा. स्व. संघाचा मकरंद बापट, आदिल, विनय, गांधीजींचे लघुलेखक व सहायक परशुराम, पत्रकार रंगास्वामी व शैलेन्द्र, हिंदुत्ववादी अनिरुद्ध, सत्यप्रिया.... अशी कितीतरी व्यक्तिचित्रे त्यांनी सजीव केली आहेत. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गांधींच्या प्रेरणेने फाळणीनंतरदेखील नोआखालीत राहून समाजसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या चारू चौधरी, देबेन्द्रनाथ सरकार, मदनमोहन चट्टोपाध्याय, अजितकुमार डे– ज्यांची पाकिस्तानी सैनिकांनी 1971 मध्ये (वास्तवात) गोळ्या झाडून हत्या केली आणि (कादंबरीत) निवेदक कबीर त्यांच्या आठवणीत चूर झाल्यावर फ्लॅशबॅकने नोआखाली पर्वाची सुरुवात झाली, ते सोदपूर आश्रमातील सहकारी. ही कादंबरी त्यांच्या व त्यांच्यासारख्या इतर अनेक अज्ञात कार्यकर्त्यांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी चारूदा व अजितकुमार ह्यांची पात्रे कादंबरीत थोड्या विस्ताराने आली आहेत. गांधीजी भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेले तरी संपूर्ण भारताचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असायचे. सर्व ठिकाणांहून त्यांना साथ देण्यासाठी कार्यकर्ते यायचे ही गोष्ट कादंबरीत यथायोग्यपणे प्रतिबिंबित झाली आहे. 

कादंबरीची भाषा सुगम आणि अर्थवाही तर आहेच, पण मुख्य म्हणजे फार नेमकी आणि प्रभावी, हातोड्याच्या एका फटकाऱ्यात खिळा एकदम जागेवर बसावा तशी. मानसिक विश्लेषणाच्या फारशी फंदात न पडता ती घटना- प्रसंग ह्यांमधून पुढे पुढे जाते. गांधीजींच्या आयुष्याप्रमाणेच ती प्रसंगवर्णनेही सुबक, आखीवरेखीव व टापटिपीची झाली आहेत. गांधीजींची काटकसर, वेळेची बचत, नेमके नियोजन आणि शिस्त ह्यांचे प्रत्यंतर भाषेतही जागोजागी येते. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर लोकांमध्येही तशाच प्रकारची शिस्त बाणलेली आहे. तसाच कामाचा झपाटा आहे. ते सर्वजण मिळून एका साम्राज्यवादी शक्तीपासून देशाला मुक्त करून नवराष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न पाहत आहेत. गांधीजींकडे नेतृत्वाचे किती थोर गुण आहेत हेही ह्या भाषेमधून कळते.

समीक्षा करण्यासाठी कलाकृतीची काही वर्गवारी करावी लागते. पण ह्या कादंबरीची वर्गवारी करणे कठीण आहे. ही इतिहासावर आधारलेली आहे आणि त्या इतिहासातील जास्तीत जास्त पदर कादंबरीत आणण्यात आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तत्कालीन भारताचा राजकीय पट. त्या राजकारणाच्या एका टोकाला आहेत ब्रिटिश सत्ताधीश. त्यांना एवढा मोठा उपजाऊ व विविधरंगी प्रदेश भारतीयांना सगळाच्या सगळा परत करण्यापेक्षा, किमान त्याचे तुकडे करून मग ते देण्यात स्वारस्य आहे. दुसरे टोक म्हणजे ह्या प्रक्रियेतून आपल्याला मुस्लीम राष्ट्र वेगळे मिळेल व सत्ता उपभोगता येईल असा विचार करणारी मुस्लीम लीग. तिसरीकडे फाळणीला विरोध करून अखंड हिंदुस्थानची मागणी करणारा, त्याचवेळी हिंदु आणि मुस्लीम हे एकत्र राहू शकत नाहीत म्हणून द्विराष्ट्रवाद मान्य करणारा परंतु स्वातंत्र्यलढ्यात न उतरता स्वतःला सुरक्षित ठेवणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. चौथ्या टोकाला, तीन दशकांच्या संघर्षाने थकलेला व जे मिळते आहे ते तरी घ्यावे असा, थोडा व्यवहारी विचार करणारी काँग्रेस आणि ह्या सर्वांच्या मधोमध आहे, तो द्वेष आणि हिंसाचार वाढीस लागू नये म्हणून जीवाचे रान करणारा एकटा, एकाकी पडलेला एक म्हातारा....  असेही म्हणता येईल की ही कादंबरी राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, वैचारिक वगैरे बरीच ‘इक’ असली तरी माणुसकीच्या फक्त एका करंगळीवर तोललेली आहे. निवेदकाचे नावही कबीर. हिंदू-मुस्लीम ऐक्य, भक्तिरस, अध्यात्म, संगीत साऱ्यांचेच ते प्रतीक.

पुस्तकाचे मुखपृष्ठ मात्र काहीसे वेगळे वाटते. मुखपृष्ठाचा लालचुटुक रंग कशासाठी हे कळत नाही. हिंसाचाराचा म्हणावा तर तो काही रक्ताचा तांबूस रंग नाही.  गांधीजींचा काठीच्या आधाराने एकटे चालत असल्याचा नोआखालीमधील प्रसिद्ध फोटो त्यावर आहे, परंतु मागचा पूल कशाचा आहे ते कळत नाही. पद्मा नदी नावेने ओलांडल्याचा उल्लेख पुस्तकात येतो. पूर्व बंगाल हा नद्या-ओहोळांचा प्रदेश आहे आणि तेथे सुपारीच्या बुंध्यापासून बनवलेल्या ‘शंको’ (शंक्वाकृती?) पुलावरून एकट्याने चालण्याचा सराव गांधीजी करत होते असाही उल्लेख आहे. त्या पुलाचे किंवा नदीच्या प्रवाहाचे चित्र दाखवता आले असते. ‘नोआखाली – माणुसकीचा अविरत लढा’ ही अक्षरेही बंगाली वळणाची घेता आली असती.


हेही वाचा : गांधींवर गरळ ओकण्याची प्रथा कधी संपणार? - मॅक्सवेल लोपीस


बंगालमधल्या सांप्रदायिक दंगलींमध्ये स्त्रियांवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. पुरुषांच्याच काय, तर समजत नसलेल्या लहान मुलांच्याही देखत हे प्रकार घडले. बलात्कार हे नेहमीच त्या स्त्रीला आणि तिच्या पालक पुरुषाला अवमानित करण्यासाठी असतात. त्यामध्ये तिला वस्तू म्हणून वापरणे आणि मानव म्हणून कलंकित करणे असा दुहेरी उद्देश असतो. हे कोणत्या एका धर्मावरचे किंवा प्रदेशावरचे लांच्छन नसून अखिल मानवजातीवरचे लांच्छन होते. चांगुलपणावरचा, माणुसकीवरचा विश्वास उडून जावा अशीच ही घटना होती. तो डाग आपल्या मनातील करुणेने, किंवा आणखी स्पष्ट बोलायचे तर आपल्या आहुतीने धुवून टाकण्यासाठी गांधीजी नोआखालीला आले होते. एक भारतीय माणूस, एवढेच काय तर पुरुष असण्याचा अपराधगंड त्यांना काढून टाकायचा होता. त्यासाठी त्यांनी अपार परिश्रम घेतले. गांधीप्रणीत सत्याग्रहाची (गांधीप्रणीतच) पूर्वअट म्हणजे चित्तशुद्धी. ती साध्य करण्यासाठी त्यांनी अतिशय कठोर असा ब्रह्मचर्याचा प्रयोग त्यांनी तेथे केला. बरे केला एवढेच नाही, तर तो सर्वांसमोर जाहीरही केला. तो इतका आगळावेगळा होता, की त्यानंतर, आधीच कमी झालेले त्यांचे चाहते-साथी आणखी कमी झाले. पण त्याने गांधीजी नाउमेद झाले नाहीत. स्वतःचा तळापर्यंत शोध घेऊन शुद्धी घडवून आणण्यासाठी ते सर्वथा बद्धपरिकर होते. असा प्रयोग लोकांना समजणे कठीणच, तर त्यांना तो सांगू नये असे कुणी म्हणतील. तेव्हाही अनेक जण म्हणालेच. परंतु माझे आयुष्य हाच माझा संदेश असे म्हणणाऱ्या गांधीजींनी ते ऐकले नाही... तर ह्या प्रयोगाचे सर्वंकष अध्ययन करून यथायोग्य असे मूल्यमापन लेखकांनी केले आहे. कबीर, निर्मलबाबू आणि ठक्कर बाप्पा ह्यांच्या संवादामधून त्यासंबंधीचा विमर्श मांडण्यात आला आहे -

गांधीजींच्या ब्रह्मचर्याबद्दल कोणालाही शंका नाही. त्यासाठी हा प्रयोग करण्याची काय आवश्यकता होती असे विचारल्यावर ठक्कर बाप्पा म्हणतात, “ब्रह्मचारी मनुष्याला सतत जागृत राहिले पाहिजे. ती कधीही न संपणारी तपश्चर्या असते. गांधीजी त्याला यज्ञ म्हणतात. ब्रह्मचर्याचे व्रत घेतल्यानंतरदेखील जेव्हा कधी गांधीजींच्या मनात वैषयिक भावना निर्माण झाली, तेव्हा त्यांनी त्याची सार्वजनिकरीत्या कबुली दिली आणि आत्मपरीक्षण करून त्या भावनेचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. कलकत्ता, नोआखाली व बिहारमध्ये जे भीषण दंगे झाले, ते थांबविण्यात आपण अपयशी कसे ठरलो, आपल्या अहिंसेची जादू तेथे का चालत नाही ह्याचे कारण ते शोधत होते. गांधीजी ज्या पाच तत्त्वांचे पालन करतात - अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य - ह्या पाचही तत्त्वांमध्ये आंतरसंबंध आहे. ह्या पाचपैकी चार तत्त्वांची जर ते परीक्षा घेऊ शकतात, तर ब्रह्मचर्याचीदेखील परीक्षा घेणे त्यांना नैतिकदृष्ट्या आवश्यक वाटते.”  “वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या ह्या निर्णयामुळे गांधीजी आणि कस्तुरबा शरीराच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या मनांचा शोध घेऊ शकले आणि मनाने एकत्र आल्यामुळे त्यांना उच्च प्रतीचा, चिरस्थायी आनंद एकमेकांच्या संगतीत अनुभवायला मिळाला. त्याचबरोबर सार्वजनिक जीवनामध्ये ब्रह्मचर्य ह्या मूल्याची प्रतिष्ठापना केल्यामुळे, लैंगिक भिन्नतेच्या पलीकडे जाऊन पुरुष आणि स्त्री ह्यांच्यामध्ये व्यक्ती म्हणून निखळ संबंध निर्माण होऊ शकतील” अशी टिप्पणी कबीर करतो. हिंसाचाराशी विषयवासनेचा फार जवळचा संबंध आहे आणि एकाचे उच्चाटन करण्यासाठी दुसऱ्याचेही करणे आवश्यक आहे असाही एक अंतःप्रवाह गांधीजींच्या ब्रह्मचर्यविषयक चिंतनात जाणवतो. खरा वाटतो तो. रोजच्या बातम्यांकडे नजर टाकली असता आजदेखील घडलेले सर्वाधिक गुन्हे हे कामाचाराशी संबंधित असल्याचे आढळून येतात. मानवाच्या षड्रिपूंमध्ये पहिल्या स्थानावर ‘काम’ आहे. स्त्रियांचा आपसातला मत्सरही आवडत्या उमद्या पुरुषाचा दुसरीला मिळत असलेला संग ह्या मुद्द्यावरूनच सर्वाधिक होतो. पुरुषांची वासनांधता आणि स्त्रियांचा मत्सर ह्या पुरुषसत्तेने जन्माला घातलेल्या अत्यंत हिंसक प्रवृत्ती आहेत. कादंबरीतील तरुण नायिका सत्यप्रिया हिच्यावर झालेल्या बलात्संभोगामुळे तिला बसलेल्या मानसिक हादऱ्याचेही फार जवळून चित्रण कादंबरीत केले आहे. तिच्या पुनर्वसनाची सरस कहाणी सांगून हे दुःख कसे कृत्रिम व मानवनिर्मित आहे, ह्याचेही विवरण लेखक करतात. सर्व वयाच्या स्त्रियांमध्ये पुरुषाकडून आक्रमण होण्याची भीती कायम वसती करत असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी गांधीजींनी स्त्रियांना निर्भय होण्याचा संदेश दिला, तर पुरुषांना ब्रह्मचर्याची दीक्षा. (मात्र नोआखालीमध्ये केलेला प्रयोग इतर कुणी करू नये हेदेखील त्यांनी निक्षून सांगितले आहे.) त्याबद्दलची टिप्पणी मनूच्या तोंडून अशी येते -

“बापूजींनी आम्हा स्त्रियांमधील आत्मबल जागृत केले. त्यामुळे आम्ही घराभिंतीबाहेर येऊ शकलो. त्यांनी सार्वजनिक जीवनात अहिंसेची प्रतिष्ठापना केली नसती तर आम्हाला घरातच बसून रहावे लागले असते. स्वराज हे केवळ पुरुषांसाठी नसून स्त्रियांसाठीदेखील आहे ह्याची जाणीव त्यांनी करून दिली आहे.”

गीते हेदेखील कादंबरीतील एक महत्त्वाचे अंग आहेत. रवीन्द्रगीते, बाउल (ललन फकीराची गीते गात सर्वत्र भटकंती करणारा बंगालमधील एक आध्यात्मिक सांप्रदाय) गीते ह्या कथानकात फार नजाकतीने गुंफली आहेत. ही सर्व गीते गायलेली आहेत, त्यामुळे त्याच्या काव्यासोबत त्याचे संगीतही आस्वाद्य आहे. यात्रा करीत असताना अशांत मनाचा कबीर एकदा उद्गारतो, “दूरवरून कबिराचे दोहे आणि बाउल गीते ऐकू येत होती..”  ह्यामधून धीरगंभीर वातावरणनिर्मिती आणि कथानकाला तत्त्वज्ञानाचे अस्तर पुरवणे असे दोन उद्देश साध्य झाले आहेत. ही गीते कोणा थोर गायकांच्या वा महान व्यक्तींच्या तोंडी नसून सामान्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या तोंडी आहेत. आपल्या मनस्थितीचे वर्णन करण्यासाठी, दुसऱ्याची समजूत घालण्यासाठी गीतांजलीतील गीते मोठ्याने म्हणणे ही बंगालमधील जुनी परंपरा आहे. (सुनील गंगोपाध्यायांच्या ‘प्रथम आलो’ मध्ये एक प्रसंग आहे. त्रिपुराच्या राजदरबारातील एक सरदार, पत्नीवियोगावरून राजाचे सांत्वन करण्यासाठी, त्याला ऐकू जाईल अशा उच्च स्वरात एक रवीन्द्रगीत गातो. ते ऐकून महाराज भानावर येतात आणि आपली नित्यकर्मे करू लागतात.) बाउल गीते बाउलांच्या तोंडी आहेत व ते ती नाचून, गाऊन दाखवतात. तो त्यांचा ‘परफॉर्मन्स’ नसून जगण्याचाच भाग आहे. सगळ्यांच्याच तोंडी असल्यामुळे ती गीते आणि त्यातून स्रवणारे तत्त्वज्ञान सगळ्यांचे होऊन गेले आहे. गाण्याने होणारा श्रमपरिहार आणि तत्त्वज्ञानातून येणारी आयुष्याची समज ह्या दोहोंसाठी ते गात आहेत... बंगालच्या संस्कृतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदू-मुस्लीम एकता. धर्माने वेगळे असले तरी ते एका बंगाली परंपरेचे पाईक आहेत आणि त्याबद्दल अभिमान आहे त्यांना. दंगलींच्या पार्श्वभूमीवर हे वाचताना वाचकांना आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. ह्याची अनेक उदाहरणे कादंबरीत ठायी ठायी विखुरलेली आहेत. कुठलेतरी पिशाच्च मानगुटीवर येऊन बसावे तसा त्यांना धार्मिक उन्मादाचा ज्वर चढतो. तेव्हा ते काय करून जातात ते त्यांनाही कळत नाही. ही गीते त्यांना (आणि वाचकांनाही) धार्मिक ऐक्याची जाणीव करून देतात. उदाहरणार्थ, काझी नझरुल इस्लाम ह्यांची ही कृष्णभक्तिपर रचना पहा - 

अगा पद्मेच्या लहरींनो,
घेऊन जा हे रिक्त हृदयकमल तुमच्यासोबत...
कारण
मेघवर्णी चरणकमल ज्याचे होते त्यावर उभे,
त्याला बसले आहे मी कायमची गमावून
नाही माझा प्रियतम माझ्याजवळ आणि
नाही मधु आता ह्या हृदयपद्मातून
माझ्या अंतरंगात आता अजिबात नुरला सुवास
जरी बाहेर घोंघावतोय वारा दहा दिशांतून
बघा कसा चमकतोय माझ्या सजणाचा श्याम वर्ण
जसा चंद्राचा प्रकाश नाचतोय तुमच्यावरून
बासरीमधून प्रेमाची साद घालत विहरतोय तो
दुसऱ्या – तिसऱ्या तीरावर, एका तीरावरून
अगा पद्मेच्या लहरींनो,
तुम्ही त्याला भेटलात तर एक विचाराल का?
... प्रेमाग्नी प्रज्वलित करून मग हा असा विरह का?

इतिहासाच्या पायऱ्यांनी वर चढत जाणारी ही कादंबरी सर्व प्रकारची अस्वस्थता, अशांति, संताप, अविश्वास ह्यांची समाप्ती करून एका परम शांतीचा अनुभव देऊन संपते. त्याची वर्णने अत्यंत प्रत्यकारी उतरलेली आहेत.... नोआखालीत दूरदूरच्या गावाखेड्यांमध्ये गांधीजी पदयात्रा करीत आहेत. अतिशय अरुंद व दवाने निसरड्या झालेल्या पायवाटेवरून त्यांना जावे लागत आहे. तेथील रहिवाशांचा तिरस्कार झेलावा लागत आहे. परात्मभावाच्या खोल दरीला बुजवण्याचे अथक प्रयत्न ते करत आहेत. एकदा तर त्यांच्या रस्त्यात पसरवून ठेवलेली मानवी विष्ठा झाडाची पाने घेऊन ते स्वच्छ करतात. कार्यकर्त्यांनी आदल्या दिवशी ती पायवाट स्वच्छ केल्यानंतर मुसलमानांनी ती पुन्हा खराब केली होती. हे करताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण स्थितप्रज्ञ भाव आहेत... 

परंतु एवढ्या कठीण परीक्षा पार करून जेव्हा ते त्यांच्या आराध्य जनताजनार्दनाला भेटायला गेले, तेव्हा त्याचाही काही परिणाम झालाच ना! पुढच्या वाटेत अनेक ठिकाणी त्यांचे स्वागतही झाले. “सगळे लोक कोलकात्यात बसून राजकारण करत असताना इथे येऊन आम्हाला भेटणारे गांधीजी हेच आमचे खरे नेते आहेत” असे मुस्लिमांनी म्हटले. मुरियम गावातील मौलवी हबीबुल्लाह ह्यांनी तर आपल्या घरातील महिलांना पर्दा दूर करायला लावून, त्यांची गांधीजींशी गाठ घालून दिली. ते म्हणाले, “हिंदूंची हत्या करण्याचा कलंक आपल्या समुदायावर लागला आहे. पण महात्माजींसारख्या देवदूताच्या आगमनाने आज आपण शुद्ध झालो आहोत. त्यांच्या दृष्टिक्षेपाने पवित्र होण्याची दुर्मिळ संधी मिळाली असताना तुम्ही पर्दा करून ती वाया घालवू नका.”

हळूहळू नोआखालीतील वातावरणही बदलले. ते आले तेव्हाच्या तुलनेत, ते जाताना सुधारणा नक्कीच झाली होती. दंगलग्रस्त हिंदूंचे मनोधैर्य वाढले होते. निर्वासित आपापल्या गावांना परतू लागले होते. ह्या कालचक्राचे कादंबरीतील प्रतीक म्हणजे चरखा. गांधीजी सोदपूर आश्रमात आले तेव्हा त्यांच्या चरख्याची हरवलेली लय नोआखालीमधून निघताना त्यांना परत सापडली होती. बाबा आणि माँ ह्यांच्या गांधीवादी आश्रमात लहानाचा मोठा झालेल्या आणि कारावासात समाजवाद्यांच्या संपर्कात आल्यावर त्या विचारसरणीने प्रभावित होऊन तिकडे वळलेल्या कबीरला निव्वळ राज्यसंस्थेत बदल केल्याने खरा समाजवाद प्रस्थापित होणार नाही हे कळून चुकले. म्हणून लोकांच्या मध्ये जाऊन काम केल्यानेच प्रेम, करुणा आणि समता प्रस्थापित होऊ शकतात, अन्यथा दुसरी वाट हिंसेकडेच नेण्याची शक्यता अधिक असे त्याच्या लक्षात येते. कलकत्त्याच्या मुसलमानांवर केलेल्या अत्याचारांमुळे आसुरी समाधान मिळवणाऱ्या अनिरुद्धला, आपली खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली तरी मनाला शांती का वाटत नाही? झोप का लागत नाही? असे प्रश्न पडतात. कलकत्त्यात आपापल्या घरांमध्ये दडून बसलेल्या हिंदु महासभेच्या नेत्यांपेक्षा इथे येऊन छातीवर वार झेलणाऱ्या गांधीजींच्या अहिंसेतच खरे शौर्य आहे हे त्याला उमगते. कबीरच्या मनातील करुणेमुळे सत्यप्रियाला तिच्या आयुष्याची वाट सापडते आणि पुढे ते दोघे सहयात्री बनतात. पण ह्या सगळ्यापर्यंत येण्यासाठी कठोर वाटचाल करावी लागते. अनेक संकटे झेलावी लागतात...

काळ आणखी पुढे सरकतो. एका धर्माचे असले तरी बंगाली लोक पाकिस्तानचा अन्याय सहन करू शकत नाहीत. धर्मापेक्षा त्यांना बंगाली संस्कृती जास्त जवळची वाटते. पाकिस्तानचा एक तुकडा बांगला देश बनून वेगळा होतो. कादंबरी फ्लॅशबॅकमधून वर्तमानात येते. 1971 मध्ये निर्वासितांचा लोंढा पुन्हा भारतात येतो. बिघडलेल्या परिस्थितीत सत्य, अहिंसा आणि मानवता रुजवण्याचे काम आता कबीर आणि सत्यप्रिया करीत आहेत. त्यासाठी ते क्लेश सहन करीत आहेत. ही वाटचाल चालूच राहणार आहे.

... त्यांनी तुझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला नसेल,
तरी तू एकटाच चालत रहा.
ते भयभीत झाले असतील,
वास्तवाकडे पाठ फिरवून मूकपणे दबकून बसले असतील,
तरी तुझ्या हृदयाचे द्वार उघड
आणि आपल्या मनातील गोष्टी स्वतःशीच बोलून तू मन मोकळे कर.
दुर्गम मार्गावर तुला एकाकी सोडून ते निघून गेले असतील,
तरी वाटेवरचे काटे आपल्या रक्तबंबाळ पावलांनी तुडवीत,
तू एकटाच पुढे चालत रहा.
वादळवाऱ्याच्या काळोख्या रात्री,
आपल्या घरांचे दरवाजे बंद करून त्यांनी तुला प्रकाश नाकारला असेल,
तर आभाळातल्या विजेने आपल्या अंतरंगातील ज्योत पेटवून,
तिच्या उजेडात तू एकटाच चालत रहा.

गुरुदेवांनी ही कविता ज्याला उद्देशून लिहिली, त्यासाठी ‘ओ रे ओ अभागा’ असे संबोधन वापरले. पण ते त्यांनी व्याजनिंदेने वापरले आहे. खरे अभागी तर ते आहेत ज्यांनी ‘तो’ रस्त्यावरून चालत असताना आपल्या घराची, मनाची कवाडे लावून घेतली...

नोआखाली – माणुसकीचा अविरत लढा 
रमेश ओझा आणि श्याम पाखरे 
मनोविकास प्रकाशन, पुणे 
पाने: 207, मूल्य: रु. 270/-

- अनुराधा मोहनी
anumohoni@gmail.com


साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला भेट द्या :

 

Tags: mahatma gandhi ramesh oza shyam pakhare anuradha mohoni hindu muslim novels Load More Tags

Add Comment