अल्विरा...

अल्विराचं संगोपन करताना आमच्यासमोर ‘धर्म’ आणि ‘भाषा’ यांचं मोठं आव्हान आहेच. 

‘मायलेकी-बापलेकी’ हे राम जगताप-भाग्यश्री भागवत यांनी संपादित केलेलं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे. डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकात वेगवेगळ्या क्षेत्रातील नऊ आयांनी आणि आठ बापांनी आपल्या लेकींबद्दल लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. या पुस्तकातील आसिफ बागवान यांचा हा लेख संपादित स्वरूपात…

1.

‘आयुष्य म्हणजे आज मनसोक्त जगायचं, जमलं तर उद्याचा विचार करायचा आणि परवाबद्दल बोलायचंही नाही’ अशा मानसिकतेने आमचा संसार सुरू होता. विशेषत: माझा दृष्टीकोन असाच होता. आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दोघांच्याही घरांमधून सुरुवातीपासूनच विरोध होता. पण जेव्हा आमच्या निग्रहापुढं या विरोधाची धार बोथट होऊ लागली, तेव्हा घरातल्यांनी ‘पुढचं काय?’ असा प्रश्न समोर उभा केला. आंतरधर्मीय लग्न करायचं ठरवल्यानंतर ‘आत्ता तुम्ही कराल, पण पुढे मुलं झाली की त्यांच्या धर्माचं काय करणार? त्यांच्यावर कोणते संस्कार होणार? त्यांची नावं काय ठेवणार?’ अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्या वेळी आमच्यावर झाली. पण ‘तेव्हाचं तेव्हा’ अशी माझी भूमिका होती. 

‘हिंदू’ आणि ‘मुस्लीम’ या परस्परभिन्न धर्मांमधल्या दोन व्यक्तींनी एकत्रितपणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेणं, हे आजही आपल्या समाजात मान्य नाही. त्यामुळे आम्ही विवाहाचा निर्णय घेतला, तेव्हा आम्हांला विरोध होणं साहजिकच होतं. दोघांच्या कुटुंबांना हे लग्न मान्य नव्हतंच, पण तरीही त्यांनी एका टप्प्यानंतर आम्हांला आडकाठी न करता ते निमूटपणे होऊ दिलं. तो संपूर्ण काळ अत्यंत तणावाचा होता. नवं घर, स्वतंत्र राहणं, स्वत:चं स्वत: सगळं पाहणं हे लग्नाच्या पहिल्या दिवसापासून अंगावर आलं. 

वांद्र्याच्या कार्यालयात रजिस्टर नोंदणी करून घरी आल्यानंतर आम्ही दुपारी झुणका-भाकरीचा संसारातला पहिला घास घेतला आणि किराणा सामान भरायला त्याच दिवशी डी मार्टमध्ये गेलो. त्या वेळी लग्नाची साडी बदलण्याचीही फुरसत अर्चनाला मिळाली नाही. ‘घरात काय काय वस्तू लागतात?’ याची आपापसांत चर्चा करत आम्ही इकडून तिकडे धावत असताना आमच्याकडे कुतूहलाने पाहणारे चेहरे आठवले की, आज हसायला येतं. कारण ती तर फक्त सुरुवात होती! 

लग्न केल्यानंतर पडणाऱ्या जबाबदाऱ्या निभावण्याची आमची परीक्षा पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली. त्यासाठी आम्ही पडत-रखडत तयारही होत होतो; पण कुटुंबातल्यांचे सूर अजूनही अर्चनाशी जुळत नव्हते. क्षुल्लक कारणांवरून अधूनमधून खटके उडत होते. ते साहजिकच होतं. ‘कळपात आलेल्याला सहजासहजी सामावून न घेणं’ ही मानवी समाजाचीही प्रवृत्ती आहे. त्यामुळे हे सगळं सुरुवातीला घडणारच असल्याचं गृहीत धरून आमची जुळवाजुळव सुरू होती. त्यातच डॉक्टरांनी ‘‘बाळासाठी आताच प्रयत्न करा. नंतर खात्री देता येणार नाही’’ असं सांगितल्यावर आमच्यापुढे पर्यायच नव्हता.

चित्रपटात किंवा टीव्ही मालिकेत गरोदरपणाबाबत अनेक खोट्या कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यात ‘कुणीतरी येणारे’ असं बायको नवऱ्याला सांगते किंवा ‘अहं, ‘आता धावपळ करायची नाही’ असं डॉक्टरांनी सांगितलंय’ असं काहीतरी बोलून नवऱ्याला गरोदरपणाची वार्ता देते. मग नवरा आनंदाने बेभान होऊन नाचू लागतो किंवा बायकोला उचलून गर्रकन फिरवतो...इत्यादी इत्यादी. प्रत्यक्षात असं काही होतं, यावर माझा अजिबात विश्वास नाही. हे मी माझ्यापुरतं म्हणत नाही. कारण सर्वसाधारणपणे अशी बातमी समजते, तेव्हा जल्लोष किंवा आनंद यांपेक्षा नव्या जबाबदारीची जाणीव आणि तिचं गांभीर्य या भावना अधिक तीव्र असतात. अशा वेळी घरातल्या वडीलधाऱ्यांकडून सल्ले दिले जातात आणि पुढच्या नऊ महिन्यांची आचारसंहिता जारी केली जाते. आमच्या बाबतीत मात्र असं काही घडलं नाही. अर्चनाच्या गरोदरपणाची बातमी सांगितल्यानंतर दोघांच्या कुटुंबांमधून आनंद व्यक्त झाला; काही सल्ले, उपदेशही दिले गेले, पण नंतरचं सगळं आमच्यावरच सोडण्यात आलं. ‘तुम्ही केलं ना, आता निभवा तुम्हीच!’ असंच जणू सगळ्यांना सांगायचं होतं.

सुरुवातीला आमच्या जीवनशैलीत काही बदल झाला नाही, पण हळूहळू आमची आम्हांलाच नियमांची चौकट आखावी लागली. त्या वेळी ‘डॉक्टर’ आणि ‘गुगल’ हेच काय ते आमचे मार्गदर्शक होते! त्यामुळे अचानक काही वेगळं घडत असल्याचं जेव्हा जेव्हा जाणवलं, तेव्हा तेव्हा आम्ही सरळ गुगल केलं. कारण घरात आम्ही दोघंच! रात्री-अपरात्री कुणाला विचारण्याची सोय नाही. अशा वेळी तंत्रज्ञानाने आम्हांला हात दिला; पण गुगल म्हणजे माहितीचा महासागर! त्यावर एखादा विषय टाकला की, त्याला सतराशे साठ फाटे फुटतात. अशा वेळी ‘नेमका मार्ग कोणता?’ हे शोधण्यात जाम डोकेफोड व्हायची. ‘असं असेल का?’ की ‘तसं करावं का?’ असे प्रश्न आमच्यासमोर सतत उभे असायचे. 

खाण्यापिण्याच्या बाबतीतही तेच! सुरुवातीचे सहा महिने अर्चना ऑफिसचं बघून घरातलंही करत होती; मीही मदत करायचो, पण तिची खूप दगदग व्हायची. सकाळी सात-आठला उठलो की, आमची कामं यांत्रिकपणे चालायची. दोन वेळचं जेवण आटपून ती अकरा-बारापर्यंत घराबाहेर पडायची. माझी ड्युटी संध्याकाळी पाच ते रात्री बारा. त्यामुळे साडे तीन-चारनंतर मी घरातून निघायचो. घरी येईपर्यंत एक-दीड वाजायचा. आमचं रोजचं वेळापत्रक असं होतं. 

गरोदरपणात गर्भवतीने वेळेत जेवण घेणं, अधूनमधून काही ना काही खात-पित राहणं आवश्यक असतं, पण अर्चनाला तशी सोयच नव्हती. सकाळचंच जेवण रात्रीही जेवायचं. सकाळी जर कधी धावपळ झाली, तर न जेवता तसंच घराबाहेर पडायचं आणि संध्याकाळी आल्यावर थेट स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं. या सगळ्यात वेगळी अशी काळजी घ्यायला वेळ कुणाला होता! त्यामुळे तिच्या तब्येतीची खूप हेळसांड झाली. 

हे सगळं सुरू असतानाच आम्ही घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मोठ्या भावानं मला त्यासाठी भरीस घातलं. आज त्या निर्णयाचं समाधान आहे, पण त्या वेळी मला तो पटत नव्हता. कारण नुकत्याच मांडलेल्या संसाराच्या भिंतीच उभ्या करण्यात तेव्हा आम्ही दमत होतो. त्यात ‘स्वत:चं घर खरेदी करावं’ हा विचार मनात येणं शक्यच नव्हतं. 

‘घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून’ असं म्हटलं जातं. कारण या दोन गोष्टी करताना प्रचंड आव्हानांना, मानसिक-व्यावहारिक उलथापालथींना सामोरं जावं लागतं. पण इकडे तर आम्ही एकाच वेळी तीन आघाड्यांवर लढत होतो - लग्नाला जेमतेम सहा महिने झालेले; त्यात अर्चनाचं गरोदरपण आणि त्यात हा घरखरेदीचा खेळ! 

या सगळ्या गुंतागुंतींमुळे मानसिक ताण वाढायचा आणि आमच्यात खटके उडायचे. मग भांडणांसाठी कुठलंही कारण पुरायचं. शब्दाने शब्द वाढायचा आणि रात्ररात्रभर जुगलबंदी सुरू राहायची. पार पहाटेचे तीन-चार वाजायचे! ‘अर्चनाच्या तब्येतीसाठी ही गोष्ट चांगली नाही’ हा विचारही त्या वेळी बाजूला पडायचा. पण सकाळी उठल्यानंतर त्याची जाणीव व्हायची. मग आम्ही दोघंही त्या विचाराने चिंतित होऊन पुन्हा भांडण न करण्याचा निर्धार करायचो. अर्थात, तो केवळ रात्रीपर्यंतच टिकायचा! 

हे सगळं या ठिकाणी सांगण्याचं कारण म्हणजे, अल्विराच्या स्वभावात मुळातच एक गंभीरपणा किंवा पोक्तपणा आहे. आमच्या त्या दिवसांमधल्या ताणतणावांमुळेच तो आला आहे, असं मला राहून राहून वाटतं. मात्र केवळ तिच्या आताच्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे मला असं वाटत नाही, तर नर्सच्या हातात हिरव्या कपड्यात गुंडाळलेल्या अल्विराला पाहिल्या पाहिल्या माझ्या डोक्यात हाच विचार आला होता. 

2.

पुरुष आपल्या भावना सहजासहजी प्रकट करत नाही. किमान आपल्या समाजात तशी रीत नाही. पुरुषाने कोणत्याही प्रसंगी ताठ, संवेदनाहीन चेहऱ्यानेच वावरावं असा जणू अलिखित नियमच आहे. विशेषत: रडणं वैगेरे तर त्याच्या कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. पण माझा दावा आहे की, नव्याने बाप झालेल्या पुरुषाच्या हातात त्याचं बाळ सर्वांत आधी ठेवा. त्याच्या डोळ्यांमधून अश्रू ओघळले नाहीत, तरी त्याचे डोळे भरून आल्यावाचून राहणार नाहीत. 

‘बाप होणं’ ही केवळ एका नात्याची सुरुवात नसते, तर आपल्या जिवाचा एक अंश जन्माला आल्यानंतर होणारा तो नवनिर्मितीचा साक्षात्कार असतो. ‘बाळ जन्माला येतं, तेव्हा त्याच्यासोबत मातृत्वही जन्म घेतं’ असं म्हणतात, पण त्याबरोबर ‘बापाचाही जन्म होतो’ असं का म्हणत नाहीत? ‘बाळाचं संगोपन ही फक्त आईची जबाबदारी’ हा समज आपल्या समाजात फार पूर्वीपासून आहे. पूर्वीच्या काळी तसं होतंही, पण अलीकडच्या काळात ही संकल्पना अस्तंगत होऊ पाहते आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे म्हणा किंवा संसारातल्या जबाबदारीबाबत वाढत्या पुरुषभानामुळे म्हणा, ‘बाप’ या नात्याची जबाबदारी आणखी वाढली आहे. 

अल्विराच्या जन्मानंतर अर्चना तीनेक महिने आपल्या आईकडे गेली. मी सुटीच्या दिवशी तिथे येऊन-जाऊन होतो. पण माझ्या बापपणाची खरी सुरुवात त्या तीन महिन्यांनंतर झाली. त्यामुळे अल्विराचं बारसं झालं आणि आमच्या पालकत्वाच्या परीक्षेचा दुसरा पेपर सुरू झाला. बाळाची मालीश करण्यासाठी आम्ही एका आजींची नेमणूक केली. आजी चांगल्या होत्या, मायाळू होत्या आणि अतिशय बडबड्या होत्या. रोज सकाळी दहाच्या ठोक्याला हजर व्हायच्या. तेव्हापासून बाळाची अंघोळ ते त्याला शेक देऊन होईपर्यंत त्यांच्या तोंडचा पट्टा सुरूच असायचा. त्यामुळे एकीकडे बाळाचं रडणं, ओरडणं आणि दुसरीकडे आजीबाईंची बडबड यांमुळे घरात किलबिल एकदम वाढली. आमची धावपळ नेहमीचीच, पण आजींच्या तासाभराच्या आगमनामुळे या धावपळीला थोडीशी का होईना, एक रंजक किनार लाभायची. 

मात्र पुढे पुढे आजींनी दांड्या मारायला सुरुवात केली. तसंच ‘त्या बाळाची मालीश नीट करत नाहीत’ असं आमच्या घरात ये-जा करणाऱ्यांचं निरीक्षण होतं. शिवाय आजींच्या पगाराची तजवीज करताना आमचं बजेटही मागेपुढे होत होतं. शेवटी ठरवलं - ‘मालीश आपणच घरच्या घरी करू या’; अर्चनाही तयार होती. मग पुन्हा यू-ट्यूबची मदत घेऊन मालीश करण्याचं प्रशिक्षण घेतलं; आजीबाईंना नकार कळवला आणि आम्हीच अल्विराची मालीश, अंघोळ, शेक हे सगळं बघू लागलो. 

त्या वेळी कुठेतरी वाचल्याचं आठवतंय, ‘बाळाची मालीश आईवडलांनीच केलेली अधिक चांगली! त्यामुळे बाळ त्यांच्या स्पर्शाला सरावतं’. आम्हांला काही दिवसांमध्येच या गोष्टीचा अनुभव यायला लागला. अल्विराला मालीशसाठी मांडीवर घेताच, तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित झळकल्याचं जाणवायचं. ‘माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे’ असंच जणू ती त्या स्मितहास्यातून सांगायची. तिचा आमच्यावर विश्वास होता खरा, पण आमचाच आत्मविश्वास कमी पडायचा! अंग चोळताना जोर लावणं, तेलाचा गरमपणा, नाक चोळून त्याला आकार देणं अशा अनेक बाबतींमध्ये आमच्यात नेहमी मतमतांतरं व्हायची. पण तरी आम्हा दोघांचेही मालीशचे प्रयोग सुरू होते. 

मालीश झाल्यानंतर अंघोळ घालण्याचा सोहळाही मोठा असायचा. त्यानंतर शेक देताना धूर कधी जास्त व्हायचा, तर कधी निखारे पेटायचेच नाहीत. अशा एक ना अनेक अडचणी रोज यायच्या. खरंतर माझी ऑफिसची धावपळ, अर्चनावर स्वयंपाक आणि घर आवरण्याची जबाबदारी यांमुळे ‘मालीश, अंघोळ यांच्या भानगडीत तुम्ही पडू नका’ असा सल्ला आम्हांला अनेकांनी दिला होता. काही प्रमाणात ते खरंही होतं. पण तरीही आम्हांला हा सोहळा हळूहळू हवाहवासा वाटू लागला. नंतर नंतर तर तो रोजच्या ताणातून मिळणारा विरंगुळा वाटू लागला. 

अल्विरा थोडी मोठी झाल्यानंतर त्यातली गंमत आणखीनच वाढली. तिचं पाण्यात उड्या मारणं, साबण तोंडाला लावण्याचा प्रयत्न करताच भोकाड पसरणं, साबणाच्या फेसाचे फुगे बनवल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर फुलणारं हसू हे सगळं पाहताना वेगळाच आनंद मिळायला लागला. 

एकीकडे मालीशच्या प्रयोगांमधून आम्ही दररोज घडत असताना बाळाने आमची झोप मात्र पुरती उडवली होती. अल्विरा पोटात असताना रात्र रात्र आमची जागरणं व्हायची म्हणून की काय, पण ती रोज रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. रात्री एक-दीड वाजता मी ऑफिसमधून परतल्यावर जेवणं झाली की, तिला झोपवण्याची आमची रोजची कसरत सुरू व्हायची. थोडा वेळ आईच्या मांडीवर जोजवल्यानंतर झोप लागल्याचं समजून तिला पाळण्यात ठेवावं, तर दुसऱ्या क्षणाला जागी होऊन ती भोकाड पसरायची. मग पुन्हा मांडीवर घेणं, थोपटणं किंवा कडेवर घेऊन इकडून तिकडे हेलपाटे मारणं अशी आमची कवायत जवळपास रोज रात्रीचीच! त्यामुळे पहाटे तीन-साडे तीनपर्यंत आम्ही जागेच असायचो. 

दोघांचं जागरण नको म्हणून आम्ही आलटून पालटून जागं राहण्याचाही प्रयत्न केला, पण ते जमलं नाही. कारण मी जागा राहून अर्चनाने झोपायचं ठरवलं, तरी अल्विराला आईकडेच जायचं असायचं आणि मी झोपायचं ठरवलं, तरी अल्विराच्या रडण्याने माझी झोपमोड व्हायचीच. एकूणच, सुरुवातीचे आठ-नऊ महिने आम्हांला झोप अशी मिळालीच नाही. 

3.

बाळ जन्मल्यानंतर त्याच्यात दिवसेंदिवस होणारी प्रगती अनुभवणं, यासारखा अमूल्य ठेवा नाही. अल्विराच्या वाढीचा प्रत्येक टप्पा आमच्यासाठी एक सेलिब्रेशनचा क्षण असायचा. तिचं आमच्याकडे बघून हसणं, एका अंगावर वळणं, मला किंवा अर्चनाला पाहताच हातपाय जोरजोराने हलवून प्रतिसाद देणं... सगळंच विलोभनीय! 

अल्विरा लहान असताना घर आणि ऑफिस ही दोन ठिकाणं सोडून दुसरीकडे कुठेही जाणं मला शक्य होत नसे. अर्चनाचं घराबाहेर पडणं तर अशक्यच होतं, पण मीही कामाव्यतिरिक्त बाहेर राहणं टाळायचो. अर्चनाची त्याला आडकाठी होती असं नाही, पण ती घरात एकटी असताना, बाळ असताना आपण टाइमपास करत बाहेर फिरणं मला नको वाटायचं. 

त्या वेळी एखाद्या पार्टीला गेलो नाही की, मित्र डिवचायचे - ‘तू आता घरकोंबडा झाला आहेस’, ‘एवढं काय घरात बसून असतोस! आम्हांलापण मुलं झाली आहेत की!’ त्या वेळी त्यांना उत्तर देणं टाळायचो. कारण मलाही मनोमन तसंच वाटायचं. ‘इतरांसारखं आपल्याही घरात कुणी मोठं येऊन राहिलं असतं, तर आपल्यालाही थोडी मौजमजा करता आली असती’ असं वाटायचं. पण आज जेव्हा त्या दिवसांचा विचार करतो, तेव्हा मला माझी त्या वेळची सल गैर वाटते. कारण तसं झालं असतं, तर मी किती मोलाच्या क्षणांना मुकलो असतो, हे मला आज जाणवतं. 

अल्विरा एक वर्षाची झाल्यानंतर आमच्या पालकत्वाची परीक्षा काहीशी सोपी झाली. जणू आम्ही पहिलं वर्ष यशस्वीपणे उत्तीर्ण केल्याची ती पावती होती! आम्हीही या संगोपन पर्वात चांगले रुळलो होतो. अल्विरावर अगदी काटेकोर लक्ष द्यायची गरज भासत नसे. घरात एका बाजूला तिला खेळणी काढून दिली की, ती त्याच जागी बराच वेळ खेळत बसत असे. 

त्याच दरम्यान माझी ड्युटी बदलली आणि ऑफिसची वेळ दुपारी बारा ते संध्याकाळी सात अशी झाली. त्यामुळे रात्रीची जागरणंही कमी झाली. आमच्या सुदैवाने शेजारी चांगले मिळाले असल्याने अल्विरा त्यांच्याकडेही जायची. ती त्यांच्याजवळ असली की, आम्ही एकदम निर्धास्त असायचो. एकूणच त्याच्या पुढचा काळ आमच्यासाठी कमी कसोटीचा ठरला. अर्थात, त्याही काळात आम्हांला पुष्कळ रंजक अनुभव आले. पण सर्वसाधारणपणे प्रत्येक पालकाला हे अनुभव आले असतीलच. त्यामुळे आमच्या बाबतीत जे वेगळं आहे, ते पुढे सांगायचा माझा प्रयत्न आहे. 

4.

आम्ही दोघंही भिन्न धर्माचे. ‘‘हिंदू’ आणि ‘मुस्लीम’ हे धर्म म्हणजे पृथ्वीतलावरचे एकमेकांचे सर्वांत विरोधी धर्म’ असा विचार आज प्रखर होत चालला आहे. सर्वसामान्य जनतेत ही भावना तितकीशी तीव्र नसली, तरी दोन्ही धर्मांमधल्या अनेक मंडळींनी आपापल्या समाजांची तशी धारणा करायला सुरुवात केली आहे. 

‘धर्म ही संकल्पना प्राचीन आणि कालबाह्य झाली असल्याने तिचा त्याग केला पाहिजे’ असा विचार एकीकडे उफाळत असतानाच, ‘धर्माचरण हेच शुद्ध आचरण’ असं बिंबवण्याचा प्रयत्न करणारा विचारही धारदार होतो आहे. ही दोन्हीही आत्यंतिक टोकाची मतं! 

एक विचार धर्म हद्दपार करू पाहतो आहे, तर दुसरा धर्माचं प्रस्थ वाढवू पाहतो आहे. पण या दोन्ही विचारांच्या मधला मार्ग शोधायला कुणीच तयार नाही. मुळात ‘धर्म हा वैयक्तिक (कौटुंबिकही नाही!) मामला आहे आणि तो ज्याचा त्याने पाळावा’ ही मधली रेष आहे. हे करताना दुसऱ्याच्या श्रद्धेत हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. पण दुर्दैवाने तसं होत नाही. कारण माणूस हा कितीही बुद्धिमान प्राणी असला, तरी कळपाने राहण्याची त्याची प्राणी वृत्ती अजूनही कायम आहे. अशा वेळी ‘कळप किंवा समाज जो निर्णय घेतो, त्याचं अंधानुकरण करणं’ हेच आपण आपलं कर्तव्य मानतो. ही सगळी व्यवस्था अजून तरी बदललेली नाही आणि नजीकच्या भविष्यात ती बदलेल, अशी आशाही धूसर आहे. 

सांगायचा मुद्दा हा की, अशा व्यवस्थेत आम्ही दोघं, दोन भिन्न धर्मांची माणसं एकत्र आलो. आमचं मनोमीलन कदाचित आमच्यासाठी पुरेसं होतं. म्हणजे ‘तू तुझ्या धर्माचं बघ, मी माझा धर्म पाळतो. शक्य तेव्हा आपण दोघंही एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ’ अशी खूणगाठ बांधून मी आणि अर्चना एकत्र राहिलो. स्वतंत्र विचारांचे असल्यामुळे या बाबतीत आम्हांला कुणी हटकण्याचा प्रश्न नव्हताच. 

पण आमच्या मुलींचं काय? आत्ता तर त्या खूपच लहान आहेत. ‘त्यांच्यावर कोणते संस्कार करणार?’ असा प्रश्न अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आम्हांला विचारला. त्या वेळी आम्ही कुणालाही उत्तर दिलं नाही, पण एक गोष्ट कटाक्षाने पाळली. ती म्हणजे, आमच्या मुलींना दोन्ही धर्मांची जाणीव करून दिली. ‘धर्म’ म्हणजे काय, हे सांगण्याची वेळ त्यांच्यावर अद्याप आलेली नाही; पण मंदिरात गेल्यावर हात जोडणं आणि रोज रात्री झोपताना कलमा पढणं, हे अल्विराला सहज जमतं. किंबहुना ही गोष्ट आम्ही तिला जाणीवपूर्वक समजावण्याऐवजी आमच्या कृतीतून तिनेच ती आत्मसात केली आहे. ईद असली की, दादीकडे जायचं आणि दिवाळी, गणपतीला आजीकडे मज्जा करायची असा दुहेरी आनंद तिला अनुभवता येतो. आता ती अगदी सहजपणे हे करते, पण सुरुवातीच्या काळात, थोडं समजायला लागल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव आम्हांला खूप चिंतेत पाडायचे. 

धर्मच कशाला, भाषेचा फरकही तिला भांबावून सोडायचा. आमच्या घरात सगळ्यांना मराठी उत्तम येत असलं, तरी घरात सगळे एकमेकांशी हिंदीतच संवाद साधतात. मी आणि अर्चना दोघंही लग्नाच्या आधीपासून एकमेकांशी मराठीतच बोलायचो. अल्विरा आमच्या दोघांच्याच सान्निध्यात वाढल्यानं तिला सुरुवातीपासून मराठी व्यवस्थित बोलायला येऊ लागली. 

पण माझ्या आईवडलांच्या घरी गेल्यावर आम्ही हिंदीत बोलायचो. अल्विराला हिंदीची सवय नव्हती. त्यामुळे ती संवाद साधू शकायची नाही. मग ती आमच्या तोंडाकडे पाहत बसायची. कदाचित भाषेच्याच अडचणीमुळे सुरुवातीची तीनेक वर्षं ती माझ्याकडच्या कुटुंबाशी फारशी समरस होऊ शकली नाही. पण नर्सरीमध्ये जाऊ लागल्यानंतर तिला हिंदी उमगू लागलं आणि नंतर अल्पावधीतच तिने ती भाषाही आत्मसात केली; इतकी की, दोन्ही भाषांमध्ये लीलया संचार करणं, तिला आपसूक जमू लागलं. 

या अनुषंगाने एक किस्सा सांगतो. आम्ही सगळे कुटुंबीय, म्हणजे माझे आईवडील, भाऊ-वहिनी, त्यांची मुलं आणि आम्ही एकत्रितपणे गाडीतून कुठेतरी चाललो होतो. अल्विरा माझ्या मांडीवर होती. बसल्या बसल्या तिने मला ‘‘एक स्टोरी बोलू का?’’ असं विचारलं. मी ‘‘हो’’ म्हणताच ती सुरू झाली - ‘‘एक म्हातारी असते. ती चार दिवस लेकीकडे जाते, पण वाटेत एक जंगल लागतं...’’ गोष्ट सांगत असतानाच तिच्या अचानक लक्षात आलं की, ‘आपण आत्ता अब्बूच्या कुटुंबासोबत आहोत. हिंदीत बोलायला पाहिजे’. त्या क्षणी तिने ‘‘फिर वो डरके अंदर जाती है। वहाँ उसको टायगर मिलता है।...’’ असं सांगत पुढची गोष्ट हिंदीत पूर्ण केली. हा प्रसंग मला विशेषत्वाने सांगावासा वाटला, कारण त्यातून तिचं भाषिक कौशल्य तर दिसतंच, पण तिची समयसूचकता आणि चपळाईही दिसून येते.

तरीही अल्विराचं संगोपन करताना आमच्यासमोर ‘धर्म’ आणि ‘भाषा’ यांचं मोठं आव्हान आहेच. तिच्या शाळेतल्या अर्जावरचा धर्माचा रकाना कोरा ठेवणं ठीक आहे, पण सुरुवातीला जेव्हा मैत्रिणी तिला विचारायच्या, ‘तू हिंदी की मराठी?’ तेव्हा तिच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसायचा. तो हळूहळू दूर करण्यात आम्ही आत्तापर्यंत तरी यशस्वी झालो आहोत. कारण आता तिला कुणी हा प्रश्न विचारला, तर ‘‘मी दोन्ही आहे’’ असं ती निरागसपणे म्हणते. तो निरागसपणा आम्हीही कायम ठेवला आहे. कारण एकतर या घडीला तिला धर्मांची गुंतागुंत सांगूनही कळणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा तिला ‘धर्म म्हणजे काय?’ याची समज येईल, तेव्हा धर्माबाबतचा निर्णय तिने स्वत: घ्यावा, असं आम्हांला वाटतं. किंबहुना आत्ता ती देत असलेलंच उत्तर तिने आयुष्यभर कायम ठेवलं, तर मला आणखी आवडेल. पण अर्थात, तो निर्णय तिचा असेल.

– आसिफ बागवान
basif123@gmail.com

(लेखक दै. ‘लोकसत्ता’मध्ये सहायक वृत्त-संपादक आहेत.)


‘मायलेकी-बापलेकी’
संपादक - राम जगताप-भाग्यश्री भागवत
प्रकाशक- डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
पाने – 240, मूल्य – 295 रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा 

Tags: पुस्तक मायलेकी बापलेकी मुलगी संगोपन आसिफ बागवान अल्विरा अर्चना हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय लग्न New Book Maayleki Baapleki Asif Bagwan Girl Child Alvira Archana Hindu Muslim Inter Religious Marriage Load More Tags

Comments:

Sucheta Pendharkar

मला तुमच्याविषयी जाणून घ्यायची खूप इच्छा होती.कारण मी तुमचे बरेच लेख लोकसत्ता मधे वाचले आहेत. बरेच वाचन ,मराठी स्पष्ट लिहणे, तुमच्या लोकांच्या त बरेच कमी प्रमाणात आहे. असेच जर लोक विचार करतील तर ती दरी कमी होण्यास मदत होईल

Sandhya Chougule

सुंदर लेख.

shubhngi pang

पुस्तकिबद्दलची उत्सुकता वाढली.

Nsnda kulkarni

Eye opener.

Add Comment