शिंडलर्स लिस्ट : हादरवून सोडणारा चित्रपट

युद्धपटांवरील लेखमाला : 2

1993 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता 30 वर्षं पूर्ण होतील. या चित्रपटानंतर आणि या चित्रपटाच्या आधी दुसऱ्या महायुध्दातलं होलोकॉस्ट आणि ज्यूंची हत्या यावर शेकडो चित्रपट, डॉक्युमेंटरीज्, वेबसिरीज आल्या आहेत. डायरी ऑफ अ‍ॅनी फ्रॅंक, सोफीज् चॉईस, द पियानिस्ट, द बॉय इन स्ट्राईप्ड पजामाज्, द रीडर, लाईफ इज ब्युटिफूल, द सन ऑफ सॉल, इडा, युरोपा युरोपा ही त्याची काही निवडक उदाहरणं. मात्र शिंडलर्स लिस्ट त्या विषयावरच्या चित्रपटांमध्ये सर्वात वरचं स्थान पटकावून बसला आहे.

थॉमस केनॉली हा एक प्रख्यात ऑस्ट्रेलियन कादंबरीकार आणि पटकथालेखक आहे. 1980च्या ऑक्टोबर महिन्यात थॉमन केनॉली काही काळ अमेरिकेत राहिला होता. अमेरिकेच्या वास्तव्यात आपल्या नवीन कादंबरीच्या प्रतींवर स्वाक्षरी करुन देणं असा त्याचा एक कार्यक्रम पुस्तकांच्या दुकानानं आयोजित केला होता. त्या कार्यक्रमानंतर तो जवळच्याच एका दुकानात ब्रीफकेस घ्यायला थांबला. त्या दुकानाचा मालक ज्यू होता. त्याचं नाव होतं पोल्डेक फेफरबर्ग.

केनॉली हा एक कादंबरीकार आहे असं तेव्हा फेफरबर्गच्या लक्षात आलं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण सत्यघटना आपल्या आयुष्यात घडल्याचं त्यानं केनॉलीला सांगितलं. फेफरबर्ग दुसऱ्या महायुध्दाच्या काळात पोलंडमध्ये रहात होता. तेव्हा फेफरबर्ग आणि इतर काही ज्यूंना जोखीम पत्करुन ऑस्कर शिंडलर या उंचापुर्‍या, देखण्या नाझी उद्योजकानं वाचवलं होतं. ती कहाणी फेफरबर्गनं केनॉलीला सांगितली. फेफरबर्गची बायको मिला ही तर शिंडलरच्या कृपेनं ऑसविचच्या (Auschwitz) गॅस चेंबरमधून परत आली होती. फेफरबर्गकडे त्यासंबंधात काही कागदपत्रंही होती. “माझ्यासाठी तर शिंडलर येशू ख्रिस्तच ठरला” असं फेफरबर्ग केनॉलीला म्हणाला. केनॉलीनं लगोलग या विषयावर एक कादंबरी लिहायचं पक्कं केलं. यानंतर ऑस्कर शिंडलर यानं वाचवलेले ज्यू जगभरात जिथे जिथे होते तिथे जाऊन केनॉली त्यांना भेटला.

त्या अनुभवांवर आधारित ‘शिंडलर्स आर्क’ ही कादंबरी थॉमस केनॉली यानं 1983 मध्ये लिहिली. या कादंबरीचे हक्क ‘युनिव्हर्सल स्टुडिओज’नं विकत घेतले. स्टीव्हन स्पीलबर्ग या अमेरिकन दिग्दर्शकाला ‘दुसऱ्या महायुद्धातलं ज्यूंचं शिरकाण’ या विषयावर चित्रपट काढायचा आहे हे युनिव्हर्सल स्टुडिओजचा तेव्हाचा अध्यक्ष शेनबर्ग याला ठाऊक होतं. हे जाणून शेनबर्गनं ‘शिंडलर्स आर्क’ ही कादंबरी स्पीलबर्गला वाचायला दिली. स्पीलबर्गला या विषयावर चित्रपट काढायचा होता त्याची मुळं त्याच्या बालपणात होती.

शुमेल आणि रिबेका हे स्पीलबर्गचे आजीआजोबा अमेरिकेतल्या सिनसिनाटी शहरात रहात होते. तेव्हा सिनसिनाटीमध्ये तिथल्या लोकसंख्येच्या 5% म्हणजे 22000 ज्यू होते. त्यातले अनेकजण हिटलरच्या छळछावण्यांमधून वाचलेले होते. स्पीलबर्गचे काका, आत्या, मावश्या असे अनेकजण छळछावण्यांमध्ये मारले गेले होते. स्पीलबर्गच्या आजीकडे इंग्रजी शिकायला येणारे ज्यू लोक कायम तिकडच्या छळाच्या गोष्टी सांगायचे. उदाहरणार्थ, पियानो वाजवणाऱ्या, जर्मनीतल्या एका ज्यू तरुणीची कहाणी स्पीलबर्गनं लहान वयात ऐकली होती. तिनं महायुद्धाच्या काळात जर्मनीतल्या एका कार्यक्रमात एक सिंफनी वाजवली. त्या अपराधाची शिक्षा म्हणून नाझी जर्मन लोकांनी तिच्या हातांचं प्रत्येक बोट चिरडलं होतं. स्पीलबर्ग या गोष्टी ऐकतच मोठा झाला.

शेनबर्गनं ‘शिंडलर्स आर्क’ वाचायला दिल्यानंतर पुढची दहा वर्षं स्पीलबर्ग, मनावर जीवघेणं ओझं आणणार्‍या या विषयावरच्या चित्रपटाचं दिग्दर्शन आपण करावं की नाही’ यावरच विचार करत होता. खरं तर, ‘शिंडलर्स लिस्ट’ या चित्रपटाची संहिता प्रथम रोमन पोलान्स्की या दिग्दर्शकाकडे गेली होती. पोलान्स्की स्वत: ज्यू होता आणि आपल्या लहानपणी पोलंडच्या घेट्टोत राहिला होता. 13 मार्च 1943 ला तो तिथून कसाबसा निसटला. त्याच दिवशी घेट्टोतून सगळ्या ज्यू लोकांना हिटलरनं छळछावण्यात हलवलं होतं. पोलान्स्की नंतर लपूनछपून राहिला. त्याची आई ऑसविचमध्ये जाळली गेली. स्पीलबर्गनं त्याला हा चित्रपट दिग्दर्शित करायची विनंती अनेकवेळा केली पण पोलान्स्कीला ते सगळं भयंकर आयुष्य चित्रपटरुपानंही परत जगायचं नव्हतं. बिली वाईल्डर या दिग्दर्शकालाही ‘शिंडलर्स लिस्ट’ करायचा होता. बिली स्वत: ऑस्ट्रियात जन्माला आला होता आणि तोही ज्यू होता. हिटलर 1933 मध्ये सत्तेवर आल्यानंतर तो ऑस्ट्रियातून पळून अमेरिकेत आला होता. त्याचेही बहुतेक कुटुंबीय ऑसविचमध्ये मरण पावले. त्यांना अभिवादन म्हणून त्याला आयुष्यात शेवटचा हा चित्रपट करायचा होता. पण तेही जमलंच नाही. अखेरीस स्पीलबर्गनं या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत:च करायचं ठरवल्यावर तो एकदा बिलीला भेटला होता. शिंडलर्स लिस्ट पाहिल्यानंतर बिलीनं स्पीलबर्गला एक दीर्घ पत्र लिहून त्याचं कौतुक केलं होतं. ‘यापेक्षा चांगला माणूस या चित्रपटाला दिग्दर्शक म्हणून मिळणं शक्यच नव्हतं. हा एक परिपूर्ण चित्रपट बनला आहे’ असं बिलीनं त्या पत्रात लिहिलं होतं.

‘शिंडलर्स लिस्ट’बद्दल स्पीलबर्ग विचार करत असण्याच्या काळात, ‘हिटलरच्या छळछावण्या घडल्याच नाहीत’ असं मानणारे म्हणजे ‘डिनायर्स’बद्दलचे भरपूर कार्यक्रम टीव्हीवर दाखवले जायचे. असाच एक कार्यक्रम टीव्हीवर पाहून अस्वस्थ झालेल्या स्पीलबर्गनं एकदा मध्यरात्री अर्धवट झोपेत असलेल्या आपल्या बायकोला उठवून सांगितलं, ‘माझा पुढचा चित्रपट असेल शिंडलर्स लिस्ट’!

स्पीलबर्गनं 1989 साली ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट काढायचं पक्कं केलं. पण रंगीत चित्रपटांच्या जमान्यात त्यानं तो चित्रपट कृष्णधवल काढायचा ठरवलं. ‘तीन तासांचा कृष्णधवल चित्रपट’ ही ‘युनिव्हर्सल’ला एक धोकादायक योजना वाटत होती. यावर ‘युनिव्हर्सलनं या चित्रपटाच्या निर्मितीत घातलेले पैसे त्यांना मिळेपर्यंत आपण त्यातला नफा घेणार नाही आणि या चित्रपटासाठी मानधनही घेणार नाही’ असं स्पीलबर्गनं त्यांना कबूल केलं. 1 मार्च 1993 रोजी ‘शिंडलर्स लिस्ट’चं चित्रीकरण पोलंडमध्ये चालू झालं.


हेही वाचा :  नो मॅन्स लॅंड - विजय पाडळकर


‘शिंडलर्स लिस्ट’ची कथा जाणून घेण्यासाठी जर्मनीतली दुसर्‍या महायुद्धाच्या आसपासची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. 1933 साली अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि ‘नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स (नाझी) पार्टी’ यांनी जर्मनीत इतर देशांविरुद्ध युद्धाची तयारी चालू केली. तसंच आर्य हा श्रेष्ठ वंश आहे त्यामुळे इतर म्हणजे ज्यू, जिप्सी, समलिंगी, अपंग अशा लोकांचा पृथ्वीवरुन खात्मा करुन टाकायचा असं त्यांनी ठरवलं. 1935 साली जर्मन सरकारनं ‘न्यूरेंबर्ग कायदा’ केला. यानुसार एखादा माणूस ख्रिश्चन म्हणून वाढला असला आणि त्याच्या चार आजीआजोबांपैकी तिघं जरी ज्युईश वंशाचे असले तरी तो माणूस ज्यू आणि अशुद्ध ठरणार होता! याच कायद्यानुसार आर्य वंशाचे लोक ज्यू लोकांपेक्षा वेगळं काढणं गरजेचं झालं होतं. 1938 सालापासून मग जर्मनीतल्या ज्यू लोकांचे उद्योगधंदे बंद करण्यात आले. त्यांच्या सिनॅगॉग्ज या प्रार्थनास्थळांवर हल्ले व्हायला लागले. जर्मनीनं 1939 साली पोलंडवर हल्ला केला. तेव्हा वंशभेदाचं जहरी लोण तिथेही पसरलं होतं. ज्यू लोकांना तिथेही उद्योगधंदे करता येत नव्हते, त्यांना हातावर ज्यू धर्माचं प्रतीक असलेल्या डेव्हिडच्या तार्‍याचं चित्र असलेला एक विशिष्ट बँड घालावा लागत असे. त्यांना सगळ्यांपेक्षा वेगळं, घेट्टोमध्ये राहावं लागत असे. घेट्टोतल्या ज्यू लोकांचे नाझी सैनिक हाल करत असत. 1941 साली ज्यू लोकांचा नायनाट करण्यासाठी त्यांना ऑसविच या ठिकाणी नेऊन गॅस चेंबर्समध्ये मारुन टाकायला सुरुवात झाली. इतिहासातलं हे लांच्छनास्पद आणि काळं पर्व आहे. तेव्हा गॅस चेंबरच्या धुराड्यातून बाहेर पडणार्‍या धुरानं आजूबाजूची गावंच्या गावं चक्क काळी पडली होती!

ऑस्कर शिंडलर हा महायुद्धाच्या काळात फॅक्टरी चालवून पैसे मिळवणारा नाझी व्यावसायिक होता. त्यानं त्याच्या कारखान्यात काम करणार्‍या 1000 ज्यू लोकांचे प्राण स्वत:ची संपत्ती आणि स्वतःचं आयुष्य पणाला लावून वाचवले. ‘शिंडरलज्युदेन’ (शिंडलरचे ज्यू) या नावानंच ही माणसं ओळखली जात. ही शिंडलर्स लिस्ट या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

‘प्रेक्षकांना संपूर्ण अपरिचित असणारे काही हात सब्बाथ हा ज्यूंचा धार्मिक विधी साजरा करण्यासाठी मेणबत्त्या पेटवतायत’ अशा दृश्यानं शिंडलर्स लिस्ट हा चित्रपट सुरु होतो. या कृष्णधवल चित्रपटातल्या काही मोजक्या रंगीत दृश्यांपैकी हे पहिलं दृश्य रंगीत आहे. पुढच्या दृश्यात पडद्यावर एका रेल्वे स्टेशनवर घडीची टेबल्स दिसतात. तिथे टेबल्स उघडून नाझी अधिकार्‍यांकडून ज्यू लोकांची नोंदणी होताना दिसते. क्राकोव्ह या पोलंडमधल्या ठिकाणी असंख्य ज्यू लोक रहायला येतायत हे प्रेक्षकांना कळतं.

त्या पुढच्या दृश्यात पडद्यावर चित्रपटाचा नायक ऑस्कर शिंडलर क्राकोव्ह या ठिकाणच्या हॉटेलच्या रुमवर दिसतो. इथे त्याचा चेहरा दिसत नाही. फक्त त्याच्याकडचं भारी घड्याळ, सोन्याचे कफलिंक्स, नाझी पार्टीचं लाल स्वस्तिक असलेली टायपीन आणि खूप सार्‍या नोटा दिसतात. शिंडलर नंतर एका नाईटक्लबमध्ये जातो. युद्धकाळात काही चांगला धंदा मिळावा यासाठी तो नाझी अधिकार्‍यांना उंची दारु आणि खर्चिक खाणं पुरवतो. शिंडलर सगळ्या बड्या अधिकार्‍यांसोबत आपला एकतरी फोटो येईल अशी काळजीही घेतो.

यानंतर शिंडलर अ‍ॅल्युमिनियमची भांडी बनवणार्‍या कारखान्यासाठी भांडवल पुरवणारे ज्यू शोधण्यासाठी इझ्झाक स्टर्न या ज्यू अकाउंटंटची मदत घेतो. ज्यूंना आता आपल्या पैशानं व्यवसाय करण्यावर बंदी आलेली असते. त्यांनी त्यांच्याकडचे पैसे शिंडलरला दिल्यानं त्यांना तसाही फरक पडणार नाही हे तो स्टर्नला समजावून सांगतो. स्टर्न सुरुवातीला ऐकत नाही.

मात्र 20 मार्च 1941 ही ज्यू लोकांना क्राकोव्हमधल्या घेट्टोमध्ये जाण्याची शेवटची तारीख दिलेली असते. तसे हजारो ज्यू घेट्टोंमध्ये जातात. ज्यू भांडवलदारांच्या मदतीनंच शिंडलर अखेरीस फॅक्टरी चालू करतो. त्यात ज्यू कामगार भरले जातात.

तेव्हाच क्राकोव्हमध्ये लेबर कँप सुरु होतो आणि अमॅान गोथ हा नाझी अधिकारी तिथे येतो. गोथ हा त्या लेबर कँपचा प्रमुख अतिशय विकृत असतो. खिडकीतून रायफल चालवून एखाद्या मंदगतीनं चालणार्‍या ज्यू माणसाला सहज मारणं हा त्याचा छंद(!) असतो. यातल्या एका दृश्यात एका कामगाराला मारताना तर, तो कामगार गुडघे टेकून बसतो. मागून गोळी लागेल याची वाट पहातो. गोथ आपलं पिस्तूल काढतो पण ते चालत नाही. मग तो तिथल्या एका सैनिकाचं पिस्तूल घेतो तेही चालत नाही. शेवटी तो खिशातून छोटं पिस्तूल काढतो. इतका सर्व वेळ मरणाची वाट पहात तो कामगार तस्साच बसलेला असतो. चित्रपट पाहताना या दृश्यांतली असहाय्यता आणि अमानुषपणा यानं एकाचवेळी हताश वाटतं आणि चीडही येते.

क्राकोव्हमधले सगळे ज्यू आता या लेबर कँपमध्ये हलवले जातात. या वेळी परत एकच रंगीत दृश्य येतं आणि एक लाल कोट घातलेली मुलगी सगळ्या ज्यू लोकांबरोबर प्लासझाऊला जाताना दिसते. ज्यू लोकांची ती अस्वस्थ परेड शिंडलर भांबावून बघत असतो. शिंडलर आता कारखान्याच्या आत त्याच्या कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था करतो. तशी व्यवस्था करताना शिंडलर आपल्याकडच्या मौल्यवान वस्तू नाझी अधिकार्‍यांना लाच देण्यासाठी स्टर्नला देतो.

यानंतर गोथला तो लेबर कॅंप रिकामं करण्याच्या म्हणजे ज्यू लोकांना मारुन टाकण्याच्या ऑर्डर्स निघतात. सुरुवातीला तो आजारी आणि वृध्द माणसांना नग्न परेड करायला लावून त्यांच्यापैकी अनेकांना निवडून ऑसविचला पाठवायला वेगळं काढतो. आपण आजारी दिसू नये यासाठी कित्येक बायका हाताच्या बोटावर टाचणीनं टोचून रक्त काढतात. ते रक्ताचे थेंब गालावर चोळून लालसर गाल दिसावेत आणि आपली प्रकृती उत्तम आहे असं वाटावं यासाठी प्रयत्न करतात. यानंतर 10000 ज्यू लोकांना मारुन त्यांची प्रेतं जाळली जातानाचं एक दृश्य शिंडलर पाहतो. तेव्हा त्याला तो लाल कोट दिसतो. म्हणजे ती मुलगी मरण पावली असं सांकेतिक पध्दतीनं प्रेक्षकांना कळतं.

आपल्या कामगारांवर असं मरण्याची वेळ येऊ नये यासाठी मग शिंडलर एक यादी करतो. गोथला भरपूर लाच देऊन पटवतो आणि ती यादी मंजूर करुन घेतो. त्या यादीतल्या ज्यू लोकांना ऑसविचला मरण्यासाठी पाठवलं न जाता शिंडलरच्या झेकोस्लोव्हाकियातल्या फॅक्टरीत पाठवलं जाणार असतं. हीच ती शिंडलर्स लिस्ट! ‘ही यादी म्हणजे साक्षात आयुष्य आहे’ असं एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य या चित्रपटात स्टर्नच्या तोंडी आहे.

शेवटी शिंडलरच्या फॅक्टरीतल्या पुरुष आणि स्त्रिया यांना दोन वेगवेगळ्या ट्रेननं झेकोस्लोव्हाकियाला पाठवलं जातं. पुरुषांची ट्रेन झेकोस्लोव्हाकियाला पोचते. तिथे शिंडलर जातीनं त्यांच्या स्वागताला हजर असतो. पण बायकांची ट्रेन कुणाच्या तरी चुकीनं ऑसविचला पोचते. त्यांना तिथे उतरवलं जातं. केस कापून त्या सगळ्याजणींना गॅस चेंबरमध्ये पाठवलं जातं. पण दरम्यान शिंडलरच्या हे लक्षात आलेलं असतं. तो परत वेगवेगळ्या नाझी अधिकार्‍यांना त्याच्याकडचे दागिने, हिरे वगैरे लाच देऊन त्या बायकांची सुटका करायचे आदेश मिळवतो. इकडे ऑसविचला वरच्या पाईपमधून विषारी वायू येऊन आपण मरणार या भीतीनं त्या बायका तिकडे केविलवाण्या नजरेनं पहात असतात. पाईपमधून अचानक साधं पाणी पडायला लागल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर जे सुटकेचे आणि हायसं वाटल्याचे भाव दिसतात त्यानं प्रेक्षकांचा जीव घुसमटून जातो. त्या स्त्रियांची सुटका होऊन त्या ट्रेनमध्ये जाताना त्या काळोख्या रात्री, वरुन बर्फ पडत असताना, गॅस चेंबरच्या दिशेनं प्रवास करणारे इतर ज्यू त्यांना दिसतात. आसमंत धुरकट तर असतोच पण डोळ्यातल्या पाण्यानं या प्रसंगात समोरचा पडदाच धुरकट भासतो!

शेवटी सर्व स्त्रिया झेकोस्लोव्हाकियाला पोचतात. युद्ध संपेपर्यंत सर्वजण तिथेच राहतात. युद्ध संपल्यावर नाझी असल्यामुळे युद्ध गुन्हेगार म्हणून शिंडलरही पकडला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला झेकोस्लोव्हाकियातून पळून जाणं भाग असतं.


हेही वाचा : नीलांबरी जोशी यांचे साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले काही निवडक डॉक्युमेंटरीजवरील लेख


त्या रात्री एका कामगाराच्या दाढेत भरलेलं सोनं काढून सगळे कामगार मिळून एक सोन्याची रिंग बनवतात. त्यावर ‘हूएव्हर सेव्हज वन लाईफ सेव्हज द वर्ल्ड एंटायर..!’ असं तालमुड या ज्यूंच्या धर्मग्रंथातलं एक वाक्य कोरतात. ती अंगठी ते शिंडलरला भेट म्हणून देतात. मात्र ती अंगठी घेऊन आनंद व्हायच्याऐवजी शिंडलरला दु:ख होतं. तो स्टर्नच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडतो आणि रडतारडता म्हणतो ‘हा माझा रेशमी कोट, माझी गाडी अशा वस्तू दिल्या असत्या तर अजून काही ज्यू लोकांचे प्राण वाचले असते. मी पुरेसं काही करु शकलो नाही!’ स्टर्न त्याला धीर देताना म्हणतो ‘तू खूप केलंस!’ आपलं सगळं आयुष्य, भोवताली जमवलेल्या वस्तू फोल वाटायला लावणारा शिंडलर्स लिस्ट चित्रपटातला हा सर्वात हृदयस्पर्शी प्रसंग आहे.

या चित्रपटात दोन ऋणनिर्देश आहेत. एक, ‘60 लाख ज्यू मारले गेले त्यांच्या स्मरणार्थ’ आणि दुसरा ऋणनिर्देश म्हणजे ‘फॉर स्टीव्ह रॉस’! ‘टाईम वॉर्नर’चा चेअरमन स्टीव्ह रॉस याला या चित्रपटासाठी इतकं मानाचं स्थान स्पीलबर्गनं देणं अनेकांना पटलं नाही. पण शिंडलर उभा करताना रॉसनं स्पीलबर्गला खूप मदत केली. लियाम नेसन या चित्रपटात शिंडलरचं काम करणार्‍या अभिनेत्याला स्पीलबर्गनं रॉसचे अनेक फोटो दाखवले होते. धडाडीचा, देखणा आणि ‘लार्जर दॅन लाईफ’ भासणारा रॉस ही शिंडलरची प्रतिमा स्पीलबर्गच्या डोक्यात पक्की होती. अनेकदा दोन्ही हात फैलावून वावरणारा, उंचापुरा, देखणा शिंडलर लियाम नेसननं यात उत्कृष्ट सादर केला आहे.

रॉसच्या ऋणनिर्देशनामागे अजून एक कारण होतं. ते म्हणजे, रॉसनं अनेक सेवाभावी संस्थांना मदत केली होती आणि त्याबद्दल तो वाच्यताही करत नसे. स्पीलबर्गनं रॉसवरुन प्रेरणा घेऊन स्वत: अशीच अनेकांना मदत केली आणि त्याबद्दल कुणालाच माहिती नव्हतं. ‘हे मला रॉसनं शिकवलं’ असं स्पीलबर्ग म्हणायचा. शिंडलर्स लिस्ट या चित्रपटातून मिळालेले सगळे पैसे स्पीलबर्गनं मानवाधिकार संघटना, ज्युईश संस्था आणि होलोकॉस्ट मेमोरियल म्युझियम्सना दिले.

शिंडलर्स लिस्ट या चित्रपटातलं स्टर्न या ज्यू अकाऊंटटचं काम ‘गांधी’ चित्रपटातल्या महात्मा गांधींच्या भूमिकेनं गाजलेल्या बेन किंग्जले या अभिनेत्यानं अप्रतिम केलं होतं. ‘हेर डायरेक्टर’ असं शिंडलरला म्हणणारा स्टर्न फार कमी संवादांतून, देहबोलीनं आणि चेहर्‍यावरच्या हावभावांनीच बोलतो. अमानुष भासणाऱ्या गोथचं काम राल्फ फिआन्सनं अप्रतिम केलं होतं. नंतर तो जेम्स बॉंडच्या चित्रपटातला ‘एम’ म्हणून गाजला. शिंडलर्स लिस्टची सिनेमॅटोग्राफी आणि स्पीलबर्गचा लाडका संगीतकार जॉन विल्यम्स याचं संगीत यावर एक वेगळा स्वतंत्र लेख लिहावा लागेल इतकं दोन्ही सुरेख आहे.

सिनेमॅटोग्राफरला या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल काय वाटलं, त्याची युट्यूब लिंक.

1993 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता 30 वर्षं पूर्ण होतील. या चित्रपटानंतर आणि या चित्रपटाच्या आधी दुसऱ्या महायुध्दातलं होलोकॉस्ट आणि ज्यूंची हत्या यावर शेकडो चित्रपट, डॉक्युमेंटरीज्, वेबसिरीज आल्या आहेत. डायरी ऑफ अ‍ॅनी फ्रॅंक, सोफीज् चॉईस, द पियानिस्ट, द बॉय इन स्ट्राईप्ड पजामाज्, द रीडर, लाईफ इज ब्युटिफूल, द सन ऑफ सॉल, इडा, युरोपा युरोपा ही त्याची काही निवडक उदाहरणं. मात्र शिंडलर्स लिस्ट त्या विषयावरच्या चित्रपटांमध्ये सर्वात वरचं स्थान पटकावून बसला आहे.

पाच कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला! नॅशनल टेलिव्हिजनवर त्याचा स्पेशल शो साडेसहा कोटी लोकांनी पाहिला. बॅाक्स ऑफिसवर हा चित्रपट किती चालेल याबद्दलच्या सर्व अपेक्षांना मागे टाकत शिंडलर्स लिस्टनं 32.12 कोटी डॉलर्स कमावले! ब्रिटनमधल्या संस्थेनं शिंडलर्स लिस्टला जगभरातल्या दहा हादरवून टाकणार्‍या चित्रपटांमध्ये स्थान दिलं आहे. या चित्रपटाला सहा ऑस्कर पारितोषिकं मिळाली.

दुसऱ्या महायुध्दात हिटलरच्या नाझींनी 60 लाख ज्यू लोकांना मारलं. शिंडलरनं वाचवलेल्या ज्यू लोकांचे 6000 वंशज जगभरात आज जिवंत आहेत. “कोणालाही ठार का मारावं याचं समर्थन करणारी कारणं मनात असताना आपण कोणालाच ठार न करणं हे खरं सामर्थ्य.. !” शिंडलर्स लिस्टमधलं हे वाक्य शिंडलरनं खरं केलं हेच खरं..!

- नीलांबरी जोशी
neelambari.joshi@gmail.com 

(लेखिका, मुख्यतः संगणकतज्ज्ञ म्हणून परिचित असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची 15हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. त्याचबरोबर जागतिक साहित्य, चित्रपट, मनोविकार, औद्योगिक मानसशास्त्र अशा अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.)


शिंडलर्स लिस्ट या सिनेमाचा ट्रेलर 

 

Tags: युद्ध हिटलर ज्यूंचे शिरकाण महायुद्धे जर्मनी हिंसा चित्रपट सिनेमा Load More Tags

Add Comment