परंपरा समजून घेतली तरच परिघाबहेरचा विचार करता येतो

दिवाळी 2024 निमित्त मुलाखत 4/5

दिवाळीनिमित्त कर्तव्य साधना वरून पाच विशेष मुलाखती घेऊन येत आहोत. 

1. टीव्ही या माध्यमाचा सखोल अभ्यास असलेली अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले
2. भाषांवर आणि अभिनयावर प्रेम करणारा अभिनेता-अभिवाचक नचिकेत देवस्थळी
3. 'जेन झी'साठी भूगोल, पर्यावरण, तत्त्वज्ञान असे जड विषय रंजक कथा-कादंबऱ्यांतून मांडणारी लेखिका मृणालिनी वनारसे
4. कथक
ची परंपरा आणि आजच्या काळाला सुसंगत कथनं यांचा मेळ घालणारी नृत्यांगना मानसी गदो 
5. नवोदित लेखक-कवी-नाटककार-दिग्दर्शक-बालसाहित्यिक मुक्ता बाम

या पाच विचारशील, प्रयोगशील कलाकारांना आजपासून सलग पाच दिवस त्यांच्या मुलाखतींतून आपण भेटणार आहोत. 

त्यातील आजची ही चौथी मुलाखत.


मानसी गदो ही पुण्यात राहणारी प्रयोगशील कथक नृत्यांगना आहे. गुरू मनीषा साठे यांची शिष्या असलेली मानसी ही अभ्यासू नर्तकी आहे. गेली सुमारे 35 वर्षे ती नृत्य शिकते आहे आणि 20  हून अधिक वर्षे नृत्य शिकवते आहे. नृत्यासोबत संगीत, भाषा आणि साहित्य यांचाही तिचा अभ्यास आहे. पारंपरिक नृत्य आणि आधुनिक काळातले आशय-विषय यांची सांगड घालून ती अभिनव प्रयोग करते. विज्ञान, इतिहास, पर्यावरण असे महत्त्वाचे विषय ती नृत्याच्या माध्यमातून मांडते. तिच्या या कामाविषयी तिच्याशी चर्चा केली. त्यातून नृत्याच्या क्षेत्राचा तिचा अभ्यास आणि शांतपणे लक्षणीय स्वरूपाचे काम करत राहण्याची तिची तळमळ दिसली.

मानसी प्रथम तुझी नृत्याची आवड आणि नृत्यशिक्षणाची सुरुवात याविषयी सांग.
साधारण दुसरी-तिसरीत असताना मला असं वाटलं की आपण नाच शिकावा. कदाचित शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये नाच शिकणाऱ्या मुलींना नाचात सहज भाग घेता येतो असं काहीतरी मनात असू शकेल. मी आईला सांगितलं की मला नाच शिकायचाय. तिने नृत्यवर्ग, गुरू यांच्याविषयी अभ्यास केला आणि कथक गुरू पंडिता मनीषा साठे यांच्याकडे मला पाठवायचं ठरवलं. त्या वेळेला आठ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मनीषाताई नृत्यवर्गात प्रवेश द्यायच्या नाहीत. मग मी आठ वर्षाची झाल्यानंतर त्यांच्याकडे जायला लागले. त्यांचा प्रेमळ, शांत स्वभाव आणि सुंदर नृत्य यामुळे त्यांनी मला आपलंसं करून घेतलं. त्यामुळे असं म्हणता येईल की पहिल्यांदा इच्छा मला आतून वाटली होती, आईने उत्तम गुरू मिळवून दिले आणि त्यांच्याकडे पाहून, त्यांच्या प्रेरणेने पुढचा सगळा प्रवास सुरू आहे.

माझे आईवडील दोघेही कलाकार. आईच्या अंगी अनेक कला होत्या. काही काळ ती संगीत शिकत होती. याशिवाय शिवणकाम, भरतकाम, विणकाम, बागकाम अशा अनेक कला तिने जोपासलेल्या होत्या. माझे वडील (हेमंत गोविंद जोगळेकर) हे कवी आहेत. मी नृत्य शिकायला लागल्यापासून माझा प्रत्येक कार्यक्रम आईने पाहिला. आज मला त्या प्रोत्साहनाचं मोल खूप वाटतं. माझ्या घडणीतले अगदी बारीक सारीक बदल हे आई आणि गुरु या दोघींनीही टिपले, माझी प्रगती खूप कौतुकाने पाहिली. आई आता नाही पण वडील मात्र अजूनही माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. गुरुकडून उत्तम शिक्षण आणि घरातून बिनशर्त प्रोत्साहन असं दोन्ही मला मिळत गेलं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे.

आपल्याला नृत्यातच करिअर करायचं आहे असं तू कुठल्या टप्प्यावरती ठरवलंस?
मला भाषांचीही आवड होती. त्यामुळे इंग्लिश मध्ये बी ए आणि नंतर एम ए चालू ठेवलं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत भाषेत पण बी ए आणि एम ए केलं. आणि गांधर्व कथकचे विशारद अलंकार करत गेले. एम ए झाल्यावर अक्षरनंदन शाळेत चार वर्षं इंग्लिश शिकवत होते पण नृत्य हा आपल्या आयुष्याचा कायमच अविभाज्य भाग असणार आहे आणि असं कुठेतरी कायमच माहिती होतं. लग्न ठरल्यानंतर एक काहीतरी गोष्ट निवडायची वेळ आली तेव्हा मी नृत्य निवडलं कारण नृत्याच्याच माध्यमातून आपण शिकवण्याची आणि नृत्याची दोन्ही आवडी जोपासू शकतो, असं मला वाटलं.

नृत्यासोबत दोन भाषांतील साहित्य शिकण्याचा तुला नृत्यासाठी उपयोग कसा झाला? 
खरं म्हणजे नृत्य बसवताना आणि करताना कशा कशा आणि किती किती गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो, आपल्या बुद्धीवरचे कोणते संस्कार कधी आणि कसे साकार होतात, ते नेमकेपणाने सांगता येत नाही. पण साहित्याचा अभ्यास मात्र निश्चितच पूरक ठरतो.

जेव्हा संरचना बसवतो, किंवा मुळापासून एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा आपल्याला वाचलेल्या, अभ्यास केलेल्या गोष्टी, पाहिलेल्या-ऐकलेल्या गोष्टी, त्यातलं काही ना काही उपयोगी पडतंच. मुलींना शिकवतानाही जो विषय घेतला असेल त्या अनुषंगाने त्यांना वाचन सुचवणं किंवा वर्गातच एकत्र वाचन असं पण आम्ही करतो.

सुचलेल्या सर्व कल्पना एकाच वेळी रचनेत असतील असं नाही, पण ते डोक्यात राहतं, आणि कुठे ना कुठे त्याचं प्रतिबिंब पडत राहतं. साहित्य आणि भाषा शिकण्याने आपण संदर्भाने समृद्ध होतो, आणि त्यामुळे आपलं नृत्य समृद्ध होतं.

तू तुझी शिकवण्याची पद्धत कशी विकसित केलीस? नव्या विद्यार्थ्यांसाठी आणि अनुभवी विद्यार्थ्यांसाठी शिकवताना काय विशेष करतेस?
साधारण 2002 पासून मनीषाताईंच्या हाताखाली प्राथमिक पातळीवरच्या मुलींना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीपासून त्यांचं शिकवणं बघत आल्याने तो प्रभाव होताच. आणि त्यांच्या क्लासमध्ये त्यांच्या हाताखाली शिकवणं हा अनुभव खूप मोठा होता. मी सात वर्षं तिथे शिकवत होते. शिकवायचं कसं हेही त्यांच्या मार्गदर्शनात शिकले. नंतर माझी एक ज्येष्ठ गुरुभगिनी मंजिरी कारुळकर ही आयसीसीआरकडून चार वर्षांसाठी रशियाला गेली तेव्हा तिचा नृत्यवर्ग मी स्वतंत्रपणे सांभाळला. तो पहिला स्वतंत्र अनुभव होता. 2007 मध्ये मी माझं स्वतःचं ‘नृत्यरती’ नृत्य विद्यालय कोथरूडमध्ये सुरू केलं. महेश विद्यालय (बालभवन) या ठिकाणी 2010 पासून जायला लागले.

मनीषाताई आम्हाला “कायम सकारात्मक राहायचं, आपल्याकडून विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे” असं सांगायच्या, ते मनामध्ये ठसलेलं होतं. आणि दुसरं त्यांचं एक सांगणं शिक्षक म्हणून मला खूप महत्त्वाचं वाटतं की "समोरच्याला आपण शिकवतोय ते आलं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला येणार नाही असं समजायचं नाही. प्रत्येकाची गती वेगळी असू शकते, आपण पेशन्स ठेवायचे आणि सकारात्मकपणे त्याच्याकडे बघायचं. जे चांगलं जमतं त्याचं आवर्जून कौतुक करायचं आणि जे जमत नाही ते एकेक हळूहळू कसं जमेल यासाठी प्रयत्न करायचे." ही गोष्ट मी काटेकोरपणे पाळत आले आहे. माझ्या शिकवण्याच्या पद्धतीचा तो पाया आहे. वर्गात जेव्हा विद्यार्थी सादरीकरण करतात, तेव्हा त्यांनी एकमेकांना काय आवडलं, हे आधी सांगायचं आणि अजून छान कसं करता येईल, ते नंतर सांगायचं अशीच सवय मी लावली आहे.

छोटयांसाठी मी तालाचे, लयीचे खेळ घेते. त्यातून त्यांना गोडी लागते. नाचात पण खेळ असतात, मजा येते असं कळल्यावर मुले उत्साहाने येतात. लहान वयात शिकणं जास्त सहज होतं. मातृभाषा शिकल्यासारखं.

काही मोठ्या वयाच्या विद्यार्थिनी लहान वयात जमलं नाही, पण आवड आहे म्हणून शिकायला येतात. त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. मोठ्या वयात जरासा अवघडलेपणा असतो. एखादी गोष्ट समजली नाही, जमली नाही तर दडपण येतं. मग त्या मागे राहायला लागतात आणि त्यांचा ताण वाढायला लागतो. त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी वर्गाचा वेग, काठिण्यपातळी यावर सतत विचार करावा लागतो, एकदा आत्मविश्वास आला, अवघडलेपणा गेला, की मग मात्र त्या छान आनंद घेत शिकतात.

तुझ्या काही विशेष महत्त्वाच्या सादरीकरणांचे अनुभव सांगू शकशील?
मनीषाताई साधारण 1990 पासून जपानी कलाकार श्री. यासुहितो ताकिमोतो यांच्याबरोबर काम करतात. ते एक संगीतज्ञ आहेत. ते इलेक्टोन वाजवतात आणि त्यांचे अनेक शिष्य ‘तायको’ नावाच्या जॅपनीज ड्रमचं वादन करतात. त्यांच्यासोबत 2006 मध्ये वर्ल्ड पीस आर्ट फेस्टिवलमध्ये आम्ही सहभागी झालो होतो. त्यात चायनीज जॅपनीज आणि भारतीय असे तीन देशातले कलाकार एकत्र आलेले होते. त्याची रंगीत तालीम करण्यासाठी आम्ही शांघायला गेलो होतो, मुख्य कार्यक्रम  बुद्धगयेला आणि पुण्यामध्ये शनिवारवाड्यावर झाला. त्या कार्यक्रमाची प्रक्रिया खूप समृद्ध करणारी होती. वेगवेगळ्या देशातले कलाकार, आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला जाणारा प्रयोग आणि अक्षरशः अहोरात्र मेहनत यांचा अनुभव सुंदर होता. प्रयोगासाठी प्रकाशयोजनेसाठी तांत्रिक तालीम आम्ही रात्रभर केली होती. रात्रीतून पहाट कशी होते ते स्टेजवर उभं राहून पाहिलं.

त्या काळात ताकिमोतोजींना आमच्या हिंदी बंदिशींचे शब्द चालीसकट पाठ झालेले होते आणि आम्हीसुद्धा तायको वाजवायला शिकलो. तायको हे काठ्यांनी वाजवायचे जपानी चर्मवाद्य आहे. ते वाजवण्याची पद्धत हेही एक लयबद्ध नृत्यच आहे. कथकचे बोल त्यावर कसे वाजवायचे हेही आम्ही शिकलो. एका रचनेत सभोवती 108 तायको वाजवत आम्ही नृत्य केलं होतं. तो अविस्मरणीय अनुभव होता. 

स्वतंत्रपणे कार्यक्रम करायला लागल्यापासून माझ्या दोन गुरुभगिनी पूर्वा शहा ,पद्मश्री जोशी आणि मी अशा आम्ही तिघी मिळून काम करतो. 2018 मध्ये असीम नावाचं एक नृत्यनाटक आम्ही बसवलेलं होतं. 2023 मध्ये दिल्लीला त्याचा प्रयोग करण्याची संधी मिळाली. 'इंटरनॅशनल फेस्टिवल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स' मध्ये 15 जणांची टीम घेऊन गेलो होतो. त्यात भक्ती भावाच्या विविध छटा दाखवल्या. हनुमान, एकलव्य आणि राधा-मीरा संवाद अशा तीन रचना होत्या. त्या महोत्सवात आमचे एकमेव नृत्यनाट्य होते. हनुमान एक नर्तक आहे अशा प्रकारे त्याच्याकडे बघितलं होतं, त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि अंगातील ताकदीचा विचार करून देहबोली आखली. एकलव्याच्या कथेत पांडवांची बाजू शास्त्रीय नृत्याने तर एकलव्याची बाजू उत्स्फूर्त लोकनृत्याने दाखवली होती. त्या गोष्टीतला प्रस्थापित विरुद्ध वंचित हा संघर्ष शास्त्रीय आणि लोकनृत्याच्या स्पर्धेतून दाखवला. एकलव्याचा उपजत उत्स्फूर्तपणा आणि तंत्र शिकण्याची त्याची तळमळ हे या विरोधातून दाखवलं. मीरा के गिरिधर-राधा के श्याम या रचनेत नाटकासारखे संवाद आणि नृत्यातल्या हालचाली अशी सांगड घातली होती.

दरवर्षी पंडित बिरजू महाराज यांच्या स्मरणार्थ लखनऊला अनंत कला महोत्सव होतो. 'कालका बिंदादीन महाराज की ड्योढी' हे लखनौमधील घराणेदार नर्तकांचं राहतं घर होतं. आता शासनाने त्याला स्मारकाचं स्वरूप दिलं आहे. ती महाराजजींच्या रियाजाची जागा होती. घराणेदार नर्तन वडिलांकडून मुलांकडे परंपरेने जिथे दिलं गेलं,महाराजजी स्वतः जिथे नृत्य शिकले आणि त्यांच्या पूर्वजांनी जिथे साधना केली त्या ठिकाणी नृत्य करण्याची संधी मिळाली. छोटीशी जागा होती, तिथे सगळीकडे लखनऊ घराण्यातल्या नर्तकांचे नृत्य करत असतानाचे फोटो लावलेले होते. बिरजू महाराज यांचे जिवंत भाव असलेले फोटो होते. आणि त्या छोट्याशा खोलीमध्ये छोट्याशा प्रेक्षक समूहासमोर नृत्य करणं भारावून टाकणारं होतं. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' ही महारताच्या युद्धाचा वेध घेणारी रचना माझ्या विद्यार्थिनींसह सादर केली.

कथक नृत्यशैली साधारण 25 वर्षं तू शिकते आहेस आणि शिकवते आहेस. त्या शैलीविषयी तुझं काय मत आहे? कथकची काय वैशिष्ट्ये आहेत? इतर नृत्यशैलींपेक्षा कथक नेमकं कसं वेगळं आहे?
गुरु पंडिता रोहिणी भाटे यांचं खूप छान वाक्य प्रसिद्ध आहे की “सर्व शास्त्रीय नृत्य शैली ह्या तालात नाचल्या जातात पण कथकमध्ये ताल नाचला जातो.”. भारतीय संगीत तालाधिष्ठित असल्यामुळे सगळ्या शैली जरी तालबद्ध असल्या तरी एक ताल घेऊन तोच आपल्या प्रस्तुतीचा विषय करणे ही एक कथकची खूप मोठी खासियत आहे. आणि मग त्रिताल, झपताल, एकताल, धमार हे प्रचलित ताल आणि त्याचबरोबर अनेक अनवट ताल – लक्ष्मीताल, रासताल, गजझंपा इत्यादी तालांत कथक सादरीकरण केलं जातं, तालाची कथा रंगवली जाते. म्हणजे काय तर प्रत्येक ताल म्हणजे ठराविक मात्रांचं चक्र असतं; सम हा त्यातला आनंदाचा उत्कर्ष बिंदू. पण त्या समेपर्यंत येणं, तिथे पोहोचेपर्यंत समेचा वेध लागणं, समेच्या किंचित आधी रचना संपणं (अनागत) किंवा समेपलीकडे जाऊन रचना संपणं (अतीत) अशा प्रयोगांतून तालाचं स्वरूप उलगडून दाखवलं जातं. अनवट तालांची प्रस्तुती ही मनीषाताईंची खासियत आहे. मलाही ते बाळकडू मिळालं आहे.

कथकचे हावभाव हे अत्यंत सहजसुंदर, नैसर्गिक आणि प्रवाही असतात. प्रत्येक शैलीच्या मुद्रा आणि हावभाव यांची एक ओळख असते. कथकची ओळख सहजता ही आहे. ओडिसीमध्ये लालित्य असेल किंवा छाऊ मधला जोरकसपणा असेल इत्यादी.

पूर्वीच्या नर्तकांनी गोपीकृष्णजींनी वगैरे भरतनाट्यम्, कथकली याचंही शिक्षण घेतलेलं होतं. ते स्वतंत्रपणे पूर्ण कार्यक्रम कथक, भरतनाट्यम् शैलीत करू शकत होते. रोहिणी भाटे यांनी भरतनाट्यम् शैलीचा अभ्यास केलेला होता. या मोठ्या गुरूंनी दाखवून दिलं की विविध नृत्यशैलींचा डोळसपणे अभ्यास केला तर तो उत्तम नर्तकाला समृद्ध करतो. 

वेगवेगळ्या नृत्यशैली एकत्रितपणे मंचावर सादर करण्याचे काही प्रयोग तू केले आहेस, त्याविषयी सविस्तर सांग.
वेगवेगळ्या कार्यशाळांतून इतर काही गुरूंकडे इतर नृत्यशैलींचे विशिष्ट विषय शिकणं सुरू असतं. बिरजू महाराजजी, पंडित राजेंद्र गंगाणीजी यांच्या कार्यशाळांत मी सहभागी होते. श्रीमती कनक रेळे या मोहिनीअट्टमच्या गुरू होत्या त्यांच्याकडून नायिकांचे प्रकार शिकले. त्या मोहिनीअट्टमच्या देहबोलीतून शिकवत होत्या आणि आम्ही ते आपापल्या नृत्यशैलीच्या देहबोलीत बसवून घेत शिकत होतो. तो एक खूप अनुभव सुंदर होता.

मुंबईमध्ये आर्ट ऑफ लिविंगचा कार्यक्रम होता तेव्हा आम्ही भरतनाट्यम्, कथक आणि ओडिसी असं एकत्रित सादरीकरण केलं होतं. आशयाला साजेशा आणि मंचावर एकत्र पाहताना पूरक किंवा विरोधी स्वरूपात पण सुसंगत दिसतील अशा मुद्रा, रचना, बसवताना वेगळा विचार करायला लागलो. हालचालींचं आणि हावभावांचं संयोजन, संगीताचे नियोजन, हेदेखील सर्व शैलींना पूरक होईल असं करण्याची दृष्टी मिळाली.

पुण्यामध्ये 'शास्त्रीय नृत्य संवर्धन' संस्था आहे. ही संस्था गुरू शमाताई भाटे, गुरू मनीषाताई साठे आणि गुरू सुचेताताई भिडे चाफेकर यांनी सुरू केलेली आहे. आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या मंचावर कथक, भरतनाट्यम्, कुचीपुडी आणि ओडिसी या शैलींच्या कलाकारांनी एकाच मंचावरून सादरीकरण केलं.

फ्यूजनचं काम केलं की एक समावेशक, वेचक दृष्टिकोन येतो असं मला वाटतं.

आयझॅक न्यूटनच्या वैज्ञानिक शोधांच्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम तू केला होतास, किंवा अशा प्रकारच्या अपारंपरिक कल्पना पारंपरिक नृत्यातून मांडण्याचे इतरही प्रयोग तू केले आहेस. त्याविषयी जरा सविस्तर सांग. 
क्लासच्या वार्षिक कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थिनी त्यात सहभागी असते. वेगवेगळ्या गटांच्या वेगवेगळ्या रचना बसवण्यासाठी कायमच विषयांचा शोध मी घेत असते. त्यांचं नृत्यशिक्षण आणि शालेय शिक्षण यांची सांगड घालता येईल का असा एक विचार आला आणि माझी फिजिक्स मधली डॉक्टरेट असणारी मैत्रीण दीप्ती सिधये हिने मला विज्ञानातला विषय निवडायला प्रोत्साहन दिलं. न्यूटनचा विषय डोक्यात आल्यावर पहिल्यांदा क्लासच्या मुलींची शालेय पुस्तकं वाचली. आणखी माहिती काढली. हे नियम नाचातून दाखवणं आणि नाचाच्या हालचालींतून ते कसे सिद्ध होतात हे अनुभवणं आणि त्यातून खरंच ते नियम पक्के शिकणं हा प्रवास फार सुंदर होता. वेगळा विषय म्हणून आम्हाला कधी त्याचा बाऊ वाटला नाही.

आपण जे विषय शिकतो ते एकमेकांशी जोडलेले असतातच, आपण उगाच कप्पे करतो, असंही वाटतं. म्हणजे तुम्ही जमिनीवर नृत्य करू शकता कारण गुरुत्वाकर्षण तुमच्या मदतीला येतं आणि जमिनीला पायाने रेटा देऊन चक्री घेता तर क्रिया-प्रतिक्रियेचा नियम त्यात अनुभवाला येतो. तेच नृत्याच्या भाषेतून दाखवलं. तो खूप छान अनुभव होता.

मग पुढे आम्ही ‘ही रचना कशी बनली’ या विषयावर एक डॉक्युमेंटरी बनवली – ‘आर्ट मीट्स सायन्स’ (कला आणि विज्ञान यांचा संगम) भोपाळमध्ये नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवलला त्या फिल्मची एंट्री पाठवली. तिचं स्क्रीनिंग तिथे झालं होतं.

लहानपणी गुरू झेलम परांजपेजींनी बसवलेलं लीलावती या गणित ग्रंथावरचं सादरीकरण मी पाहिलेलं होतं. खूप सुंदर बॅले होता. त्यात गणिती कोडी नृत्यातून उलगडून दाखवली होती. मनीषाताईंनी आम्हाला घेऊन एक प्रयोग केला होता आर्टिस्ट्स ऑन अंटार्क्टिका. आणखी एका रचनेत मानवी प्रगतीतला एक महत्त्वाचा टप्पा – चक्राचा शोध – यावर 'व्हील्स' ही रचना बसवली होती. गुरू शमा भाट्यांनी कस्तुरबांवरती एक बॅले केला आहे. आणि आत्ता नुकताच त्यांनी थिमक्का या पर्यावरणरक्षणाचा ध्यास घेतलेल्या बाईंच्या कार्याविषयी कार्यक्रम बसवला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती भरतनाट्यम् गुरू वैभव आरेकर यांचा श्रीमंतयोगी हा एक प्रयोग आहे. अशा प्रकारे शास्त्रीय नर्तक केवळ पारंपरिक विषयांच्या चौकटीत काम करत नाहीत, तर कालसुसंगत विषयही हाताळतात हे प्रत्ययाला येतं. 

मी एका कार्यक्रमात ग्रेटा थुनबर्गच्या कामावर आधारित रचना बसवली आहे. वीरबाला सयाल हिच्यावर एक रचना मी स्वतः काव्य लिहून नृत्यात बसवली होती.

गुरू शमाताई ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट’ चालवतात. त्यात नर्तकांना एका म्हणीवर आधारित संरचना करायची असते आणि तिथे असं बंधन आहे की पारंपरिक पौराणिक थीम घेऊन रचना करायची नाही. मी त्या महोत्सवात नव्हे पण त्यावरून प्रेरणा घेऊन मी “जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” ही म्हण घेऊन एक रचना केली होती. त्यात गॅलिलिओ, कोपर्निकस, ब्रूनो यासारख्या शास्त्रज्ञांना त्यांच्या प्रगत वैज्ञानिक दृष्टिकोनाची किंमत जिवानिशी मोजावी लागली, नंतर त्यांच्या शोधांची किंमत जगाला कळली, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारार्ह वाटायला लागला. आणि पुढे न्यूटन वगैरे शास्त्रज्ञांची मते, शोध अधिक सहजतेने स्वीकारले गेले. अशी संकल्पना घेऊन ती म्हण सिद्ध केली होती.

आजच्या काळातल्या घटना, कल्पना मांडताना हस्तमुद्रा, पदन्यास, हावभाव यांचा पुनर्विचार करावा लागत असेल, ते नाविन्य आणण्यासाठी काय प्रक्रिया असते?
सगळ्याचाच विचार करायला लागतो. आपला विषय ज्या काळातला आणि ज्या ठिकाणचा असेल, त्याचा विचार वेशभूषा, केशभूषा, संगीत, वाद्यं हे निवडताना करावा लागतो.

शास्त्रीय नृत्य शैलीचा आहार्य अभिनय म्हणजे वेशभूषासुद्धा ठरलेली असते. व्यक्तिरेखा दृश्य स्वरूपात उभी तर राहिली पाहिजे पण कथकच्या ड्रेस कोडमध्येही बसली पाहिजे अशा पद्धतीची वेशभूषा आम्ही करतो. न्यूटनच्या वेळेस तर माझा नवरा समीर गदो याने ते ड्रेस डिझाईन केले. कला ही अशी गोष्ट आहे की, कलाकारच्या कुटुंबालाही वेध लावते. याचा मला फार आनंद होतो.

संगीताचा पण वेगळा विचार करायला लागतो. एकूण त्या अनुभवाचा नाद, लय काय असायला हवे याचा विचार करावा लागतो. वेगळा वाद्यमेळ, वेगळ्या सुरावटी, काही विशिष्ट प्रकारचे सूचक आवाज, पारंपरिक वाद्यं आणि ताल यांच्याशी या सगळ्याचा मेळ बसवणं आवश्यक असतं.

आणि देहबोलीचा तर खूपच विचार करावा लागतो. नृत्याची देहबोली ठरलेली आहे, ठरलेल्या मुद्रा आहेत, पण त्यात बसणाऱ्याच सर्व संकल्पना असतील असं नाही, मग थोडा नवा विचार करावा लागतो. कथकमध्ये मुद्रासुद्धा नैसर्गिक अंगाकडे जाणाऱ्या असल्यामुळे ते एक स्वातंत्र्य आपल्याला आहे. आशयाला पूरक असे प्रयोग त्यात करता येतात. 
वेगळ्या मंडणीसाठी मुळातून आणि थोडं परिघाबाहेर जाऊन विचार करायला लागतो हे मात्र खरे.

आजचा विचार करता शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमांतून पारंपरिक रचना सादर करण्यावर भर असतो की, अशा पद्धतीच्या अभिनव रचना मांडण्याकडे कल वाढला आहे?
तुमचं शिक्षण सुरू होतं तेव्हा तुम्ही ती कला समजून घेता आणि पारंपरिक रचना शिकता, त्या आत्मसात करता, त्या स्वतःच्या अंगी मुरवता आणि त्या सादर करता. जेव्हा तुम्ही काही स्वतः बसवायला लागता तेव्हा तुम्ही तुमच्या आवडी-निवडीप्रमाणे वेगळे विचार मांडायला सुरुवात करता. परंपरा समजून घेतली तरच परिघाबहेरचा विचार करता येतो.

असा विचार पूर्वीपासूनच होतो आहे. पण अशा प्रस्तुतीसाठी साहित्य आणि संगीतयोजना याचा वेगळा जामानिमा दरवेळेस जमवता येत नाही. आणि त्यामुळे एकदा केलेला प्रयोग वारंवार करत राहणं शक्य होईलच असं नाही. त्या मानाने पारंपरिक रचनांसाठीची टीम, व्यवस्था, तयारी, याचं गणित बसलेलं असतं. त्यामुळे ते कार्यक्रम अधिक होतात. पण प्रत्येकच पिढीत नवा विचार मांडण्याची ऊर्मी मात्र नक्कीच असते.

नृत्यासाठी आवश्यक असणाऱ्या काव्यरचना तू स्वतः लिहितेस. तसा कवितेचा वारसा तुला वडिलांकडून मिळालेला आहेच. पण नृत्यासाठी कविता लिहिणं ही वेगळी प्रक्रिया आहे. तिच्याविषयी थोडं सांग.
तो वारसा आहे, आणि कविता वाचनाची आवडही आहे, पण त्या अर्थाने मी कवी नाही. मी फक्त नृत्यासाठी कविता म्हणजे कवित्तरचना करते. नृत्यात जे काही आपण सादर करतो ते तालबद्ध असतं. म्हणजे शेवटी ते एका तिहाईच्या मदतीने समेला येतं. त्यामुळे आपण निवडलेल्या तालात ती रचना नीट बसावी लागते. आपल्या आशय-विषयाशी सुसंगत असा ताल, लय आणि शब्द यांची योजना करावी लागते.

दुसरं एक महत्त्वाचं भान बाळगावं लागतं ते म्हणजे साहित्य आणि नृत्य या दोन्ही भाषांमधून समतोलपणे अभिव्यक्ती करायची आहे याचं. सर्वकाही शब्दांतून मांडलं तर नृत्य हे फक्त भाषांतर होईल. तसं करून चालत नाही. साहित्याची भाषा आणि नृत्याची भाषा या एकमेकांना पूरक ठरतील, त्यांची बलस्थानं दिसतील, पण कुरघोडी होणार नाही अशा पद्धतीने लेखन करावं लागतं. साहित्यातून जो शब्दशः अर्थ लोकांपर्यंत पोहोचतोय तोच अर्थ मुद्रांच्या सहाय्याने दाखवण्यापुरती मर्यादित भूमिका नर्तक घेत नाही. पण त्याचा गर्भितार्थ मात्र नृत्यातून दाखवायला पूर्ण वाव राहतो.

दुसऱ्या कवींच्या रचनाही मी त्या पद्धतीने सादर करते, पण कधीतरी आपल्याला जे म्हणायचं असतं ते नेमकेपणाने मांडण्यासाठी स्वतःच लेखन करणं गरजेचं असतं हे अनुभवातून मी शिकले. त्याचा आपल्या अभिव्यक्तीला फायदाच होतो. नृत्य आणि शब्द एकमेकांचं सौंदर्य कसं खुलवतील याचं भान राखत कवित्त आणि बंदिशी लिहिणं मला आवडायला लागलं. गेली 10-12 वर्षं मी आवश्यक तेव्हा लिहिते आहे.

एक नाटक बसवलं की त्याचे अनेक, अगदी शेकडोही प्रयोग होतात. पण एक कार्यक्रम बसवला की त्याचे अनेक प्रयोग करण्याकडे नर्तकांचा कल कमी दिसतो. तुझ्या मते याचं कारण काय असावं? 
या संदर्भात सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला असा जाणवतो की, नाटकाचा प्रेक्षक संख्येने खूपच जास्त आहे. नाटक कसं बघायचं, यासाठी नाटक कळावं लागतं असं कोणाला वाटत नाही. शास्त्रीय नृत्याच्या बाबतीत मात्र “त्यातलं आम्हाला काही कळत नाही” असं लोक परस्पर म्हणून टाकतात. कार्यक्रमाचा अनुभव घेतलेला असो वा नसो. त्यामुळे मला असं वाटतं की, नृत्य सर्वत्र पोहोचवण्यासाठी, त्याचे रसिक निर्माण करण्यासाठी आणि ते कसं बघायचं हे लोकांना माहीत व्हावं यासाठी प्रयत्न आधी करावा.

माझ्या क्लासच्या वार्षिक कार्यक्रमात मुलींचे पालक आवर्जून कार्यक्रम बघायला येतात. नव्याने शिकायला लागलेल्या मुलींचे पालक हे मुख्यतः आपली मुलगी आहे म्हणून येतात, नृत्याचा कार्यक्रम म्हणून येत नाहीत. पण कार्यक्रम बघून अनेकजण सांगतात की, “आम्हाला कथकमधलं काहीच समजणार नाही असं वाटलं होतं, पण हे पूर्णपणे समजलं आणि खूप आवडलं, पुढच्या वर्षी इतरही लोकांना घेऊन येऊ.” असे एकातून एक नवे रसिक निर्माण होण्याची प्रक्रिया संथ आहे, पण सुरू आहे. आणि त्यातून रसिक वाढले नर्तकांनाही एकेका कार्यक्रमाचे भरपूर प्रयोग करायला नक्कीच आवडेल, असं मला वाटतं.

दुसरं असं की, नाटकासारखं नृत्याचं एक प्रॉडक्शन युनिट नसतं. किंवा एकेक रचना ही संपूर्ण कार्यक्रम व्हावा इतक्या लांबीची नसते. अशा काही रचना एकत्र करून कार्यक्रम करायचा तर अनेक नर्तक, गायक, पढंत म्हणणारे, वादक अशी मोट बांधावी लागते. त्यासाठी लागणारा वेळ, ऊर्जा आणि आर्थिक तयारी यांचं गणित दरवेळी बसतंच असं नाही.

तिसरं कारण असं असावं की, नृत्याचे कार्यक्रम हे बरेचदा काहीतरी ठराविक निमित्ताने होतात. त्या कार्यक्रमात विशिष्ट विषय अपेक्षित असतो. त्याप्रमाणे कार्यक्रम बांधले जातात. ते इतरत्र तितके स्वीकारले जातीलच असं नसतं.

याशिवाय कलाकारांना आपली सर्जनशीलता, क्षमता आणि प्रयोगशीलता सातत्याने नवनव्या प्रस्तुती बसवून दाखवायची असते. एकच कार्यक्रम अनेक वेळा करत राहण्यात वेळ आणि ऊर्जा खर्ची पडल्यास नवनिर्मितीवर परिणाम होईल, असा विचार करणारे अनेक नर्तक आहेत.

अशा सगळया परिस्थितीमुळे नृत्याच्या एकेका कार्यक्रमाचे नाटकासारखे मोठ्या प्रमाणावर प्रयोग सध्या तरी होताना दिसत नाहीत. पुढे कदाचित हे चित्र बदलेल.

शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या पुरुषांची संख्या सध्या कमी आहे. याबाबत तुझी काय मतं आणि निरीक्षणं आहेत? तुझ्या विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण कसं आहे? 
कथकचा इतिहास पाहिला तर पूर्वी पुरुष नर्तकांची संख्या जास्त होती. मुलींना नृत्य शिकवायला पालक तयार नसत. नृत्य हे घरंदाज स्त्रीसाठी नाही असा समज होताच. त्या परिस्थितीत अपवादानेच ज्या काही जणी नृत्य शिकल्या, त्यांतलं महत्त्वाचं नाव म्हणजे पंडिता रोहिणी भाटे. त्या अक्षरशः घरोघरी जाऊन मुलींना जातीने स्वतः नृत्यशाळेत घेऊन यायच्या आणि घरी सोडायच्या. त्यांची नृत्यशैली आणि सचोटी पाहून मग लोक मुलींना स्वतःहोऊन पाठवायला लागले. पण आता पूर्ण उलटं चित्र आहे. नृत्य शिकणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा खूपच जास्त आहे.

गोपीकृष्णजींकडे पुरुष आणि स्त्री असे दोघेही नर्तक शिकायचे. ते पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने हालचाली आणि हावभाव शिकवायचे. या संदर्भातली एक वेगळी दृष्टी त्यांना होती. या दृष्टीने शिकवण्यासाठी स्वतंत्र अभ्यास लागतो. शिक्षकाने तो चांगला केलेला असेल तर चांगले शिष्य तयार होतात. 

पुण्यात तत्पुरुष नावाची पुरुष नर्तकांची संस्था आहे आणि त्यांनी मध्यंतरी एक ‘मेल डान्स फेस्टिवल’ पण आयोजित केला होता. आजही दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी पुरुष नर्तक आणि गुरू अधिक आहेत.

आता थोडी संख्या वाढली आहे शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या मुलांची. पण माझ्याकडे सध्या कोणी मुलगे येत नाहीत कथक शिकायला. मात्र पूर्वी काही मर्यादित काळासाठी मी दोन मुलांना शिकवलं आहे.

आगामी काळात तुझ्या काय योजना आहेत? शास्त्रीय नृत्याच्या विशाल क्षेत्रात तुझं विशेष काम काय असावं असं तुला वाटतं?
नृत्य ही सादरीकरणाची कला आहे. त्याचा सैद्धांतिक अभ्यास आणि प्रस्तुती यांची सांगड आपण घालावी, आणि विद्यार्थ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं. नृत्यासंदर्भात लेखन करावं, जी कवित्तं मी लिहिलेली आहेत ती पुस्तकस्वरूपात प्रसिद्ध करावी अशा काही योजना आहेत.

‘नृत्यं गीतं तथा वाद्यं त्रयं संगीतमुच्यते’ असं म्हणतात. नृत्य, गायन आणि वादन या तिन्हीमधलं ऐक्य अनुभवावं, असं मला वाटतं. मी शिवशांभवी चतरंग म्हणून एक रचना लिहिली आणि सादर केली आणि त्याला चाल पण मी स्वतः लावली त्यासाठी रागाचा अभ्यास करून, तज्ञ गायक वादकांना विचारून काम केलं.

एखाद्या विषयावरती प्रस्तुती करताना त्या विषयाचा अभ्यास शक्य तितक्या सर्व बाजूंनी करावा, कारण तरच आपल्याला जे म्हणायचं आहे ते आपण प्रभावीपणे पोहोचवू शकतो. जिथे शक्य तिथे ओरिजिनल साहित्य वाचावं, पारंपरिक रचना असतील तर मूळ ग्रंथात संबंधित व्यक्तिरेखा किंवा घटना कशी मांडली आहे, आणि इतर साहित्यात त्याची काही वेगळी रूपं / व्हर्जन्स दिसत असतील त्याचा अभ्यास करावा. कथानक सत्यावर आधारित असो किंवा काल्पनिक, आपल्या प्रस्तुतीतून ते तर्कशुद्ध रीतीने दिसावं यासाठी तज्ञांचा सल्ला मी वेळोवेळी घेते. एक विचारी, अभ्यासू नर्तक अशी आपली ओळख असावी असं मला वाटतं.

धन्यवाद मानसी. खूप छान दृष्टिकोन मांडलास तू. तुझी नृत्यरती सर्वार्थाने वाढत राहो ही सदिच्छा.

संवाद आणि शब्दांकन - ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com

Tags: kathak dance classical dance experimental dance Load More Tags

Comments: Show All Comments

माधुरी जोगळेकर

मानसी अतिशय सुंदर मुलाखत...सखोल अभ्यास केल्यास कसा विकास होतो याच उदाहरण घालून दिलस...शाब्बास

Devendra Muley

उत्कृष्ट मुलाखत! नृत्यामध्ये इतका सखोल अभ्यास केला जातो , खुप विशेष आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा

वृषाली गटणे

मला खरंच नृत्यातलं काही कळत नाही, असं मलाही वाटायचं. पण मानसी, तुझे जे कार्यक्रम पाहिले त्यामुळे नृत्य थोडं फार उमजू लागलं. या मुलाखतीमुळे अजून थोडं समजलं. तुझ्या आराधनेसाठी शुभेच्छा!

Aparna Joshi

उत्कृष्ट मुलाखत! नृत्यातील होणारे इतके प्रयोग वाचुन खुप आनंद झाला आणि ह्या क्षेत्रातील व्याप्ती लक्षात आली.......

रोहित गोडबोले

खूप सुंदर मुलाखत! कथक मधल्या प्रयोगांच्या संदर्भातील बर्‍याच गोष्टी कळल्या. पुण्यातील तीन नाट्यगुरू फार मोलाचे कार्य करीत आहेतच आणि त्यात आपल्यासारख्या ज्येष्ठ शिष्यांनी पुढे नेलेल्या प्रयोगांच्या परंपरेचे खूपच महत्व आहे. आपले हे उत्तुंग काम असेच पुढे सुरू राहो आणि नवीन पिढीला प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा!!

हेमंत गोविंद जोगळेकर

फारच सुंदर आणि नृत्याचा सर्वांगीण विचार देणारा लेख. मानसी गदो आणि ऋचा मुळे दोघींचेही अभिनंदन!

Add Comment