कलाकार आता अ-पोलिटिकल राहिलेले नाहीत...

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक भवतालाविषयी अभिनेता गिरीश कुलकर्णीसोबत केलेली बातचीत 

Netflix

 'देश संकट में है!' हा डायलॉग म्हंटला की, 'सॅक्रे गेम्स'मधला मंत्री भोसले आठवतो..

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरीश कुलकर्णी या कलाकाराने ही भोसलेची भूमिका साकारली आहे.

गिरीश कुलकर्णीने मराठी-हिंदीत मोजके पण उत्तम सिनेमे केले आहेत. देऊळ, वळू, विहीर, गाभ्रीचा पाऊस यांसारख्या मराठी सिनेमांत; तर अग्ली, दंगल, काबिल अशा हिंदी सिनेमांत भूमिका साकारल्या आहेत. 'देऊळ' या मराठी सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट पटकथालेखक अशा दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्याआधी 'गिरणी' या लघुपटासाठी नॉन-फिचर विभागात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नेटफ्लिक्स या ऑनलाईन स्ट्रीमिंग माध्यमावर 15 ऑगस्टला 'सॅक्रेड गेम्स'चा दुसरा सीझन रिलीज झाला. 'सॅक्रेड गेम्स’ या विक्रम चंद्रा यांच्या पुस्तकावरच ही वेबसीरिज आधारित आहे.

या वेबसिरीजमधील मंत्री भोसलेचा ‘देश संकट में है’ हा डायलॉग चांगलाच लोकप्रिय झाला. त्यावर अनेक मिम्सही बनवण्यात आले. 'सॅक्रेड गेम्स' त्याच्या पहिल्या भागापासूनच तरुणाईच्या चर्चेचा विषय राहिला आहे. या सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्येही वर्तमान वास्तवाचा स्पष्ट वेध घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातूनच नेटफ्लिक्स बंदी किंवा अभिव्यक्तीवरचा हल्ला हे विषय पुन्हा 'इन' झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनुराग कश्यपसारख्या निर्भीड दिग्दर्शकासोबतचा अनुभव, अभिव्यक्ती व सेन्सॉरशिपच्या कात्र्या आणि एकूणच समकालीन वास्तवाचं कलाकार म्हणून असणारं भान याबाबत गिरीशसोबत मोकळ्या-ढाकळ्या गप्पा मारायला त्याच्या घरी पोहोचले.

माध्यमपटलावर या ना त्या मार्गे बंदीची मागणी करत 'देश संकट में है'च्या घोषणा देणाऱ्या संस्कृतिरक्षकांच्या आक्रोशात कितपत तथ्य आहे, हे जाणून घेण्यासाठी गिरीश कुलकर्णी या लेखक अभिनेत्याला भेटणं तर गरजेचंच होतं. भेटीचा पहिला अर्धा तास त्याने निवांत गप्पा मारून छान ओळख करून घेतली. कुठलाही अभिनिवेश न ठेवता त्याच्याशी ज्या गप्पा झाल्या, त्यातून लक्षात आलं की हरघडी विचार करणारा हा सर्जनशील माणूस आहे. प्रश्नांच्या प्रत्येक उत्तरात तो किती खरा आहे, हे जाणवत राहिलं... 

प्रश्न : अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी हे सॅक्रेड गेम्सचे दिग्दर्शक. सॅक्रेड गेम्स सिरीज विशेषतः दुसरा सीझन अँटी-हिंदू असल्याची कुजबुज आहे. दिल्लीचे भाजपचे प्रवक्ता तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी अनुराग कश्यप यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. खरं तर तुम्ही पहिला हिंदी सिनेमा ‘अग्ली’ केला, तो अनुराग कश्यपसोबतच. त्यातला १४-१५ मिनिटांचा पोलीस स्टेशनमधला प्रसंगही फारच गाजला. तर, एकूणच अनुरागसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे? व्यक्ती म्हणून तो कसा आहे?

गिरीश कुलकर्णी : मी पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करत होतो. अर्थात, आमची ओळख होती. त्याने आमचे सिनेमे वळूविहीर पाहिले होते. त्याने तो इम्प्रेस आणि इन्स्पायर्डदेखील झाला होता.  वेगवेगळ्या फेस्टिव्हलमध्ये आम्ही भेटलो होतो, सिनेमाविषयी चर्चा झाल्या होत्या. 'तुम्ही मराठी सिनेमा रिव्हाइव्ह करत आहात', असं तो म्हणाला होता. दिलदार माणूस आहे अनुराग. जिवंत माणूस आहे. तो संवेदनशील आहेच आणि पोलिटिकली इन्करेक्ट व्हायला न घाबरणारा आहे. पण त्याच्यातलं माणूसपण इतकं साजिरं-गोजिरं आहे की, त्याच्या प्रेमात पडावं. तो सर्वांना समान दृष्टीने अॅप्रोच होतो. समान विचारांमुळे आमची मैत्री होती.

'अग्ली'मधल्या त्या प्रसंगाचं शूटिंग करताना अनुरागने फक्त तीन-चार संवाद लिहिले होते. तुझं नाव काय? अमुक-ढमुक. इतकंच. मग तो प्रसंग इम्प्रूव्हाइज केला. तो एकच वाक्य म्हणाला, 'बाकी डायलॉग वगैरा छोड दो सर. बस आप उनकी ले लो.' 

चांगल्या दिग्दर्शकाला ठाऊक असतं- चांगला कलाकार त्याच्या कॅरेक्टरच्या पार्श्वभूमीविषयी, समाजाविषयी, आजूबाजूच्या गोष्टींविषयी जागरूक असतो.. पोलिसांशी माझा कधीही संबंध आला नव्हता, पण निरीक्षण होतं. पोलिसांच्या प्रश्नांविषयीदेखील माझा अभ्यास-वाचन होतं.  बेहेरहाल, मी माझ्या पद्धतीने ते घडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक संवाद आहे की- 'हे बघा हे असं आहे. हे करणार लफडे!' यात पोलिसांचा दृष्टिकोन येतो:तुमचं चारीठाव नीट चाललेलं आहे. तुम्ही दूरदुरून येणार इथं, काही तरी लफडे करणार आणि कामाला आम्ही लागणार. शिवाय त्यांची तुटपुंजी साधनं, त्यांचा कमी पगार, विरंगुळ्याचे साधन नाही आणि फक्त ड्युटी. मग एकमेकांत जोक करून त्यांचं काही तरी चालू राहतं. त्यांचं भावविश्व तेवढंच. त्यातही तो इन्स्पेक्टर स्वतःच्या मुलीचा उल्लेख करतो... त्या एका सीनमधून पोलिसांचं अख्खं कॅरेक्टर उभं राहतं.

यावर दिवाकर बॅनर्जी या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया फार सुंदर होती. 'कान'मध्ये हा सिनेमा पाहून दिवाकर मला म्हणाला, 'इट्स ऑल्मोस्ट लूक्स लाइक अ काफ्का ट्रायल.' 

मुद्दा असा की, सलग पंधरा मिनिटे आम्ही तो सीन शूट केला. अनुरागने मधे थांबवलं नाही. कॅमेरा चालूच होता. आम्ही आपलं करतोय-करतोय. प्राण कानात आले होते की, अनुराग 'कट' कधी म्हणतोय. त्याने 'कट' म्हटल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. लोक बघतच बसलेले. डीओपी (कॅमेरामन) पण मला म्हणाला की, 'सर, मैने छोड दिया था कॅमेरा, मुझे मालूम नही शॉर्ट कैसे हुआ है. मै सिर्फ सीन देख रहा था.'

अनुरागने येऊन आमचं कौतुक केलं. मग म्हणाला की, 'ओके सर, अभी आपका क्लोज है, फिरसे करना है. सेम करना है.'

मी म्हंटलं, ‘काय? सेम कसं करणार?’

तो म्हणाला, 'चिंता नहीं. खाली ये कुछ पॉइंट इम्पॉर्टन्ट है, बाकी आप नया बॅटिंग करो.'

चारएक वेळा आम्ही वेगवेगळ्या अँगलने तो सीन परत केला. आरती बजाज या उत्तम एडिटरने ते एडिट केलं आणि तुमच्यापुढे आलं. असा सुखद अनुभव होता.

चांगल्या कलाकाराला योग्य ते स्वातंत्र्य दिलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, कॅमेराच्या कक्षेतच मुक्त अंगण दिलं; तर तो चांगलं काही तरी करू शकतो. अनुराग हा दुसऱ्यावर बिनदिक्कत विश्वास टाकणारा आहे. तो कॅमेरामनला कलाकाराला रिस्ट्रिक्शन घालू देत नाही. जसे- 'ये मार्क है इधर खडा रहना है. इधर जाना है' असं काही नाही. माझा नट जिथे येईल तिथे येईल, तू तिथे त्याला कॅप्चर कर- असं कॅमेरामनला सांगतो.

अग्ली सिनेमाच्या वेळी त्याने कोणाला स्क्रिप्टच दिलं नव्हतं. मुलीचं अपहरण झालेलं आहे. तिचा शोध घ्यायचा आहे, हीच अग्लीची कथा. मुलीचा शोध घेणारे पोलीस क्लूलेस असणार की नाही? तसंच मग तुम्हाला पुढचा सीन सांगून त्यातलं आश्चर्य का कमी करायचं? तुम्हाला पुढचे टप्पे कळले की, तुम्ही कसं वागायचं हे आधीच ठरवाल. त्यामुळे पुढचं काही माहितीच नाही, अशा मुक्त पद्धतीने आम्ही अग्लीमध्ये काम केलं. मजा आली.

प्रश्न : आणि सॅक्रेड गेम्सचा भोसले तुमच्याकडे कसा आला? ही निवड कशी झाली?

गिरीश कुलकर्णी : त्याची एक गंमतच आहे. माझ्याकडे आधी काटेकरचा रोल आला होता. (आता ती भूमिका जितेंद्र जोशीने केली आहे.) मी म्हटलं, परत पोलीस नको. दुसरं असं की, पहिल्या सीझनमध्ये पोलिसांची म्हणजे सरताजची बाजू विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित करणार होता आणि नवाजुद्दीनची बाजू अनुराग. मला दोघांकडं काम करायचं होतं. 'जे कॅरेक्टर दोन्ही ट्रॅकमध्ये आहे ते मला दे' असं मी अनुरागला सांगितलं. मग पारुलकरच्या रोलसाठी विचार झाला, पण नीरज कबीची पर्सनॅलिटी पारुलकरच्या भूमिकेला जास्त सूटेबल असल्यामुळे ती भूमिका त्याला दिली. माझ्याकडे मग भोसलेची भूमिका आली.

प्रश्न : सॅक्रेड गेम्समधला भोसलेदेखील इम्प्रूव्हाइज्ड होता का?

गिरीश कुलकर्णी : अनुरागकडे बरंचसं काम असंच होतं. स्क्रिप्टचा आराखडा डोक्यात असतो, ते कसं घडवायचं हे त्याला माहिती असतं आणि मग ते सगळं पडद्यावर उतरवण्यासाठी तो स्क्रिप्ट बाजूला ठेवतो. कधी कधी त्यात सुधारणा करतो किंवा नवंच लिहितो. कारण तिथे प्रत्यक्ष लोकेशनवर एक स्पेस तयार झालेली असते, ती जागा काही तरी बोलते, तिथे कुठून तरी प्रकाश येत असतो, कुठून तरी सावली पडत असते, कुठून तरी वारा येत असतो, कुठे तरी गवाक्ष असते... तिथली म्हणून काही तरी एक केमिस्ट्री असते. त्याच्यावर अनुराग रिअॅक्ट होतो. त्यामुळे जिवंतपणा येतो. ऐन वेळेस तो रचना बदलतो किंवा घडवतोही.

प्रश्न : भोसलेचे बरेचसे संवाद मराठी आहेत. अमराठी लोकांना संवाद समजण्यात अडचण येईल, असं नाही वाटलं का? भाषेबाबत काय विचार केला होता?

गिरीश कुलकर्णी : भोसले हा माणूस जसं बोलेल तसंच त्यानं पडद्यावरही बोलायला हवं. प्रेक्षकांना कळणं-न कळणं ही फक्त माझी जबाबदारी नाही, प्रेक्षकांचीदेखील आहे. मुळातच आमच्या कलेविषयीच्या जाणिवा उथळ आहेत. फक्त रंजन एवढं एकच दायित्व आम्ही कलेसाठी ठेवलं आहे. जाण वाढवणे, अर्थ लावणे हे आपल्याला माहीतच नाही. चिंतन करून काही कुटे सोडवावी लागतात; तुमचे, तुमच्या आजूबाजूच्या अस्तित्वाचे अर्थ शोधावे लागतात. त्याच्या संवर्धनाचं काही तरी गणित मांडावं लागतं. स्थिती, उत्पत्ती, लय याच्या चक्राबद्दल विचार करावा लागतो. त्यातील तुमचा रोल समजून घ्यावा लागतो, ही गोष्टच आपल्याला माहीत नसते. कलेकडे अनेकानेक गोष्टीचं दायित्व येतं. ती स्वप्न दाखवते, नव्या क्षितिजाकडे घेऊन जाते, भवतालाशी कनेक्ट करते, सांधून घ्यायला शिकवते. म्हणून कला वेगवेगळ्या पद्धतीने रिसिव्ह करायची असते. तिचा आस्वाद वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या पातळ्यांवर घ्यायचा असतो. त्यासाठी मोकळं राहायचं असतं, पूर्वग्रहदूषित न होता कलेकडे पाहायचं असतं. तर तुम्हाला काही तरी मिळते. अशा वेळी भाषा ही अडचण ठरत नाही; ठरायला नको.

मी स्वतःसुद्धा कलाकार म्हणून आयुष्यातला असा किती वेळ काम करतो? त्यापेक्षा जास्त प्रेक्षकच असतो. तेव्हा लक्षात येतं, प्रेक्षकांना कळ्तील अशाच गोष्टी कलाकारांनी कराव्यात, असं म्हणता येणार नाही. बेहेरहाल, असा न्याय दिल्याने लक्षात येतं की, आमच्यामध्ये अत्यंत एकारलेपण आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी दुसऱ्या बाजूने पाहिलेल्याच नसतात. जे तुला येतं, तुला माहिती आहे, तेच मी जर सतत सांगत राहिलो; तर कसं चालेल? अज्ञाताची आस लागल्याशिवाय ज्ञानाचा प्रवास कसा होईल? 

अज्ञान हे कुतूहलाला जन्म देणारं असायला हवं. एखादा सीन नीट मन लावून पाहिलात-ऐकलात की, त्या भाषेतले काही तरी छोटे-मोठे बारकावे तुमच्या लक्षात येतात. भाषा दुय्यम होऊन जाते आणि चित्रांची भाषा तुम्ही वाचायला लागता. 'नार्कोज'सारखी परकीय सिरीज इथेही गाजते किंवा बाकीही इंग्रजी मालिका पाहिल्या जातात, त्याचं कारण भारतीय माणसांचं इंग्रजी चांगलं आहे म्हणून नव्हे, तर लोक अंदाजानेच चित्रभाषा समजून घेऊ लागतात. 

माझ्या पहिल्या चित्रपटापासून प्रेक्षकानुनय काही करायचा नाही, हे माझं ठरलं होतं. उलट प्रेक्षकांना म्हटलं की, ‘गड्या, आम्ही या मस्त अज्ञात टेकडीवर चाललोय, माहीत नाही वाट कुठे नेईल; तू येतो का?’ इतका साधा भाव आहे त्यातला. आम्ही तोंडावर पडण्याची तयारी ठेवली आहे, तशी तूही ठेव. ‘विहीर’ सिनेमात इंटरव्हलनंतर संवाद ‘न के बराबर’ आहेत. संवाद नसल्यामुळे चित्रपट कळतच नाही म्हणणारे प्रेक्षक खूप भेटले. चित्रभाषा खरं तर तुम्हाला कळते. आता बघा, निवांत आसमंतात धनगर लोक बोलत नाहीतच. त्यांचा निसर्गाशी संवाद सुरू असतो. दुरून येणाऱ्या लांडग्यांची चाहूल त्याला लागते. तुला-मला दाखवूनही दिसणार नाही ते त्यांना दिसतं-समजतं. असं असताना सिनेमात संवाद कसे येणार? किंवा वळू चित्रपट घ्या त्यातली पात्रं खूप बोलतात, कारण गावाकडच्या माणसांना शहरी माणसांपेक्षा जास्त बोलायला लागतं. आता एखाद्याला वर्षासहल काढता यावी म्हणून निसर्ग काही एखादं लोकेशन सेट करत नाही; ती सौंदर्यनिर्मिती आपसूक होत असते. तशी कलेमधूनसुद्धा आपसूक सौंदर्यनिर्मिती व्हायला हवी. जर त्याची निर्मिती करणारे कलाकार निर्व्याज बुद्धिजन्य पद्धतीने भोवतालाला सांधणारं काही निर्माण करतील, तर सौंदर्यनिर्मिती होऊ शकते. 

प्रश्न : ऑनलाईन स्ट्रीमिंग माध्यमातून येणाऱ्या सिरीजमधून हिंदू संस्कृतीवर हल्ले होत आहेत, अशी एक ओरड आहे. या माध्यमाला सेन्सॉर लावण्याची मागणी केली जात आहे. तर, सेन्सॉरशिपविषयी तुमचे काय मत आहे? असे नियम असावेत का?

गिरीश कुलकर्णी : कलेच्या अभिव्यक्तीवर नियमन नको; मात्र समाजाने असे कलाकार घडवले पाहिजेत की, ज्यांना फ़क्त सृजनच करायचं आहे. आमच्या समाजघडणीच्या संदर्भातल्या अनेक जबाबदाऱ्या स्वयंप्रेरणेने पूर्वी अनेकांनी स्वतःकडे घेतल्या. अनेक शहाण्या लोकांनी अनेक मांडण्या करून आम्हाला शहाणं करण्याचा प्रयत्न झाला. आगरकर, लोकहितवादी, फुले, साने गुरुजींपासून अनेकांनी या पद्धतीचं काम केलं. त्यातले उजवे डावे आणि डावे उजवेही होते. आमच्या मागच्या पिढ्यांनी चिंतनातून ज्ञान निर्माण केलं. त्यातून समाज घडावा, अशी त्यांची अपेक्षा. आम्ही मात्र फार काही घडवू शकलो नाही, कारण आमचं राजकारण करंटं होत गेलं. तंत्रज्ञान-विज्ञान यांचा प्रकोप झाला. या गोंधळातून समाज आणि व्यक्ती यांची मांडणी विपरीत होत गेली.

हा सगळा क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ आहे. आत्ताच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, त्या क्रिया होऊन उद्या त्यांच्या प्रतिक्रिया उमटणार आहेत. असं सातत्याने होत राहतं. मुदलात आमचा समाज परिपक्व नाही. त्यामुळे एका बाजूने नियमनाची गरज आहे की काय, असा एक विचार येतो. उदाहरणार्थ- सिग्नल लावल्याने थांबतात का लोक? आता गलेलठ्ठ दंड करायचं ठरत आहे, ते ठरल्याने थांबतील का? थांबतील थोडे दिवस, रिॲक्शन म्हणून. पण समाजाचा रिस्पॉन्स काय आहे? चिरीमिरी देण्याच्या रिस्पॉन्सची शक्यता जास्त वाटते. आता या पद्धतीचा विचार करणारा समाज जर आम्ही निर्माण करत असू, तर मग कुठलं नियमन आहे जे आम्हाला असं बंधनात ठेवू शकेल?

भारतात पोर्न पाहण्यासाठी इंटरनेटचा जास्त वापर होतो. माणूस एकटा असताना त्यानं कसं वागावं याबद्दलच्या प्रेरणा या त्याचं शिक्षण आणि संस्कारांतूनच येतात. त्याबाबतीत आम्ही निसर्गाच्या खूप मागे आहोत. आम्ही निसर्गातून काहीही शिकलो नाही.. समंजस, सुसंस्कृत, संवेदनशील माणसांनी सतत संघर्ष केलेला आहे. तो तसा मांडलाही गेला.

आता 'स्पॉटलाईट'सारखा ऑस्कर मिळालेला सिनेमा आहे. त्यामध्ये ते ख्रिश्चॅनिटीविरुद्ध बोलत नाहीत, ते चर्चच्या सिस्टीमविरुद्ध बोलतात. मुळात कोणाच्याही धर्माची गरिमा, त्याचं तेज हे एखाद्या फिल्ममेकरच्या कामानं उद्ध्वस्त कसं होईल? तुम्ही-आम्ही चिरकुटावानी काही तरी केल्याने फार काही बदलत नसतं आणि भावना दुखावतात म्हणजे काय होतं नक्की? कुठली अशी तुझी भावना? ही तुझी भावना इतर वेळी सामाजिक दृष्ट्या काही विपरीत घडताना का दुखावली जात नाही? तेव्हा तू का नाही रस्त्यावर येत? का नाही जात कोर्टात? तुला कोणी दिलं माझ्या धर्माचं मुखत्यारपत्र? हा माझाही धर्म आहे. माझ्या हिंदू धर्माबद्दल मी बोलीनच,  मी चिकित्सा करीन. तुझ्या वैयक्तिक भावना दुखावल्या असतील, तर त्या तुझ्यापाशी ठेव. तू मुखत्यारपत्र घेऊ नकोस. 

बरं, मग सगळेच कलाकार जबाबदारीने कलाकृती बनवतात का? तर, तसं नाही. अत्यंत उठवळ आणि सुमार बुद्धीचेही कलाकार असतात. कलाकार म्हणण्यापेक्षा त्या कळपात घुसलेले, चुकार मेंढरांप्रमाणे ते काही तरी विचित्र-विपरीत बनवतात. त्यासाठी हवं सेन्सॉर. पण माणसाठायी आम्ही एवढा विवेक जागृत का करू नये की, चांगलं ते पाहीन. मी माझ्या फोनमध्ये काय बघावं याचा सारासार विवेक माझ्याकडे असायला हवा. धर्माचा संबंध नसणारे, पण खूप हिंसा असणारे अनेक सिनेमे आहेत. वॉर फिल्म्स आहेत, असुरी संहार आहे. तो तुमची छाती दडपून टाकत नाही? तुमच्या भावना त्यामुळे दुखावत नाहीत?

सगळ्या धर्मांमध्ये अमानवी व्यवहार चालतात. त्या धर्मातली जी माणसे शहाणी-विचक्षण असतात, ती त्यामध्ये बदल करत-करत पुढे नेत असतात. पण त्याला वेळ लागतो.

प्रश्न : कलाकृती हे समाजाचं रिफ्लेक्शन असतं. सॅक्रेड गेम्समध्ये हिंदू-मुस्लिम संबंध किंवा राजकारण याच्या काही गोष्टी दाखवल्या आहेत... याविषयी काय सांगाल?

गिरीश कुलकर्णी : अरे, तो लिंचिंगचा सीन पाहिल्यानंतर मला त्याची नेमकी आच जाणवली. आपण वृत्तपत्रात वाचतो, कोणाचं तरी लिंचिंग झालं. मला वाटतं, हे इतिहासापासून खदखदत असतं. हिंदू-मुस्लिम असण्यापेक्षा एकमेकांविषयीची भीती हा एलिमेंट मला मोठा वाटतो. ती भीती का आहे, कारण ती इंजेक्शनं सातत्यानं दिली गेली आहेत. आपण एकमेकांशी जर मोकळेपणाने बोलू लागलो, तर ती भीती काचेसारखी खळकन फुटून जाईल.

सॅक्रेड गेम्समध्ये दाखवलेलं लिंचिंग बघताना माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मग वाटलं की, माझ्या धर्मात असं होता कामा नये गड्या. कुठल्याही हिंदूने लिंचिंग करता कामा नये-बास, संपला विषय! मी हिंदू म्हणून माझ्या धर्मातले अंतर्गत विरोध, अंतर्गत चुकीच्या गोष्टी आधी मांडीन ना! कारण मुस्लिम कॉन्स्टिट्युशनमधून येणारं जगणं, तिथले ताणतणाव याच्याशी मी अवगत नाही. बेहेरहाल, मी जाणीवपूर्वक काही मुस्लिम मंडळी जोडली आहेत; त्यांच्याकडून मला थोडं फार काही कळत असतं. तेव्हा त्यांच्याशी बोलताना लक्षात येतं की, त्यांच्या-माझ्यात तसा तर काहीच फरक नाही. कळप करण्यासाठी म्हणून स्वतःच्या धर्माच्या आयडेंटिटी टोप्या वापरल्या जातात. आर्थिक हितसंबंधांचा यात फार मोठा वाटा आहे. आर्थिक हितसंबंध सत्तेशी जोडलेला असतो.

प्रश्न : मगाशी आपण सेन्सॉरशिपविषयी बोललोच... पण मला हे जाणून घ्यायचं आहे, थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांना सेन्सॉर सर्टिफिकेट लागतं आणि ऑनलाईन माध्यमांत सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी लागत नाही; यातला नेमका फरक काय जाणवतो?

गिरीश कुलकर्णी : कंझम्पशनचं माध्यम बदललेलं आहे. ही ओटीपी म्हणजे 'ओव्हर द टॉप' माध्यमं आहेत तिथे वैयक्तिकरीत्या सिनेमा अनुभवणं अपेक्षित आहे. थिएटरमध्ये लागलेला सिनेमा हा एक सामाजिक अनुभव आहे. मोठ्या सभागृहात जायचं, तिथं मोठा स्क्रीन असणार, अंधार होणार आणि मग सगळ्यांबरोबर बसून सिनेमा पाहिला जाणार. त्यामुळे तिथं सर्वांसोबत पाहता येईल असा सिनेमा द्यावा लागणार, त्यासाठीचे नियम ठरवून घ्यावे लागणार. कुठला सिनेमा कुठल्या वयात पाहावा याचा संकेत प्रमाणपत्रे देतात. अठरा वयाच्या वरचा सिनेमा असेल, तर लहानग्यांनी थांबावं.

आता ऑनलाईन माध्यमांना सेन्सॉर नाही, कारण सामाजिक अभिव्यक्ती आणि वैयक्तिक अभिव्यक्ती याचे नियम वेगवेगळे असणार. ऑनलाईन स्ट्रीमिंग तुम्ही मोबाईलवर पाहता. त्यामुळे वैयक्तिकरीत्या सिनेमा किंवा सिरीज पाहण्याचे नियम भिन्न असणार आणि म्हणून त्याची निर्मितीही. सतत तुम्ही तुमच्या खऱ्या आणि खोल भावना दडपू शकत नाही. सेक्स आणि हिंसा हे एलिमेंट्स माणसांमध्ये आहेत यार. नैसर्गिक आहे ते. तुम्ही किती झाकणार? आणि समाजातल्या विकृतींचं काय? तुम्हाला बलात्कार बंद करता आलेत का? तुम्हाला चाइल्ड मॉलेस्टेशन बंद करता आलं का? एखाद्या कलाकाराला वाटलं की- चाइल्ड मॉलेस्टेशनवरती सिनेमा बनवावा, त्यातून या समाजातील विकृतीवरती भाष्य करावं,  चिमटा काढावा; तर त्यानं काय दाखवायचं? कसं दाखवायचं? त्यामुळे तुम्हाला तिथं सेन्सॉरच्या कात्र्यांमधून मोकळीक लागणारच.

प्रश्न : सेन्सॉर सर्टिफिकेटमधून सिनेमांचं जे बायफर्गेशन अपेक्षित असतं, ते पाळलं जातं का?

गिरीश कुलकर्णी : सर्टिफिकेटचं बायफर्गेशन कशासाठी आहे? काही वयोगटापर्यंत माणसाचं उन्नयन व्हायला वेळ जातो. काही गोष्टी वेळेच्या आधी नीट उमगत नाहीत, म्हणून प्रेक्षकांना त्यात स्पष्टता असावी यासाठी असतात. आता अनेक गोष्टी माणसाला मरेस्तोवर कळत नाहीत, तो भाग वेगळा. नियम पाळण्याच्या बाबतीत आम्ही भुक्कड आहोत. समाज म्हणून, देश म्हणून साठ-सत्तर वर्षांत आपल्याला नियम पाळता येत नाहीत, याची आपल्याला एकत्रित लाज वाटली पाहिजे.

कुठलेच नियम पाळले जात नसताना जे कोणी ज्याला-त्याला सेन्सॉरशिपची मागणी करतात, ते कुठल्या तोंडाने? सेन्सॉरचे नियम माहिती आहेत का जनतेला? सेन्सॉरशिप हे इतकं थोतांड आहे की, ज्याचं नाव ते. सरकार बदललं की त्या-त्या विचारांची माणसं तिथे आणून बसवली जातात. त्या विषयातले तज्ज्ञ तिथे नसतातच. आता गजेंद्र चौहान यांना फिल्म इन्स्टिट्यूटचं अध्यक्ष केलं. ती त्या वर्षातील सगळ्यात मोठी कॉमेडी होती. कोण आहे रे तिकडे? तू रिकामा आहेस का? जा त्या इन्स्टिट्यूटचा  अध्यक्ष हो-  अशा नियुक्त्या होतात. हे सर्व विचारांच्या पक्षांनी केलेलं आहे. काँग्रेसने ज्या पद्धतीचा मनमानी कारभार केला आणि टोकाचे निर्णय घेतले त्याला दिलेल्या या टोकाच्या प्रतिक्रिया आहेत.  त्यामुळे चिडण्यापेक्षा संयम दाखवला पाहिजे. भूमिका घेतलीच पाहिजेच पण संयमही दाखवला पाहिजे.

प्रश्न : टेलिव्हिजनकडे पाठ फिरवणारे बरेच सिनेमाचे कलाकार ऑनलाईन माध्यमांमध्ये सर्रास दिसतात. हे कसं काय?

गिरीश कुलकर्णी : अरे, कारण त्या कामाचं क्वांटम वाढलेलं आहे, म्हणून तिथं लोक काम करायला येतात. टेलिव्हिजनचं सॅच्युरेशन झालेलं आहे. इथे मला डायरेक्ट कम्युनिकेशन करता येतं. मी जेव्हा एखाद्या ऑनलाईन सिरीजमध्ये येतो, तेव्हा वन-टू-वन तू माझा चाहता होतोस. थिएटरमध्येसुद्धा तसा व्यवहार होत होता. टीव्हीवर तसं होत नाही. कारण टेलिव्हिजन बाय अपॉइंटमेंट कन्झ्युम केलं जात नाही. त्यामध्ये कॅज्युअल ॲप्रोच असतो. तंत्रज्ञान तुम्हाला स्वतंत्र करतं.

ऑनलाइन माध्यमांमध्ये एकाच वेळी सर्व प्रेक्षकांना आवडेल असं काम करण्याची गरज नसते. मला ठरावीक लोकांसाठी ठरावीक पद्धतीची कलाकृती बनवता येते. कलाकार म्हणून असणाऱ्या स्वातंत्र्यात पडलेली ही खूप मोठी भर आहे.. नव्या गोष्टी आल्याने इनसिक्युरिटी वाढायची गरज नाही. मात्र त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम जाणून घेऊन मग पुढे जाणं गरजेचं आहे.

कंझम्पशनची माध्यमं बदलत आहेत. ती तुम्हाला चार भिंतींत कोंडून टाकत आहेत. सामुदायिकतेतून वैयक्तिकतेकडे आपण चाललो आहोत. अनुभव ही गोष्टच कमी होत चालली आहे.

प्रत्येक पावलागणिक क्षितिज नवं होऊन जातं. त्याचं भय काय बाळगायचं? माणसाचा प्रवास तसाच होत आलेला आहे. तुम्ही मोडून पडणार असाल, तर मोडून पडणार आहात. तगणार असाल, तर टिकणार आहात. अशी विविधं माध्यमं उपलब्ध असल्याने अस्सल कलाकारांना वर येणं शक्य आहे. खरं तर समाजातील ओंजळभर कलाकारांमध्येच फक्त सृजनाची ताकद असते. मग ते ओंजळभर कलाकार माझ्या राजकीय विचारांचे नसतील तरी चालतील. पण आपण समाज म्हणून त्यांना जोपासलं पाहिजे. आणि याचं भान देणारा समाज तयार करणं, हे तुमचं-आमचं कर्तव्य आहे. Let’s keep our differences frozen for a while, lets work on common agenda and let’s go forward.

प्रश्न : कलाकारांनी भूमिका घ्यावात का? अनेक वेळा कलाकार सेफ गेम खेळताना आणि भूमिका न घेताना दिसतात..

गिरीश कुलकर्णी : मला उलट वाटतं की, कलाकार आता अ-पोलिटिकल राहिलेले नाहीत. ते उघड-उघड बाजू घेताना दिसतात. काही जण तर झेंडे घेऊन उभे आहेत; कारण त्यामध्ये सुरक्षित वाटतं, त्यामध्ये पैसा, स्थिरता आहे. आणि हे अगदी पूर्वीपासून होत आलं आहे.

पूर्वीसारखं आता कलाकारांच्या शब्दांना काय किंमत आहे? पूर्वी शिरवाडकर काही तरी बोलले, तर भाषा-कोशाची निर्मिती होत होती. एक वकूब होता. पु. ल. देशपांडे बोलले, तर लोक येत होते. दुर्गा भागवत भाषणाला उभ्या राहिल्या, तर लोक चिडीचूप ऐकत होते. ताकद होती. ज्ञान होतं. अनुभव होता. कलाकार सरकारच्या मागे लागले नव्हते. बेहेरहाल, याची परंपराही पूर्वापार आहे; याचं कारण स्वतंत्र मार्ग काट्याकुट्यांचा असतो.

भूमिका नसणं, तटस्थ असणं हा मला आदर्शवाद वाटतो. कारण भूमिका नसण्यातूनही मी एक भूमिका घेत असतो. कुणीही कुणाचा पाईक बनू नये. तर उलट, मी माझा प्रवास करताना त्याच्यामध्ये काही गाठीशी बांधतो आहे, शिकतो आहे, नव्या-नव्या चुका करतो आहे; माझे सांगाती बना, माझे मित्र बना, सहप्रवासी बना- असा भाव आपल्या सगळ्यांचा असायला हवा. सहप्रवासामध्ये समानता असते. राजकारणात सत्ता एकाकडे जाते. असे राजकारण मी नाकारत असेन, तर त्यात वाईट काय? त्या अर्थाने अ-पोलिटिकल असावं, पण घाबरून राजकीय होऊ नये. माझ्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नाही, तर मी मोकळेपणाने स्पष्टपणाने सांगीन की- तुम्ही चुकत आहात. भूमिका घ्याव्यात. निर्भय राहण्यात अडचण नसावीच कधी.

(मुलाखत व शब्दांकन : मृदगंधा दीक्षित)

हेही वाचा : आर्टिस्ट पॉलिटिक्ससे हटकर हो ही नही सकता-झीशान अयुब

Tags: गिरीश कुलकर्णी वेब सिरीज web series netflix interview मुलाखत Load More Tags

Comments:

Ravi Jagtap

समृद्ध करणारी, आणि विचार करायला लावणारी मुलाखत.

Add Comment