एक छोटा संस्मरणीय कार्यक्रम : राष्ट्रीय विजेत्यांचा विद्यापीठात सत्कार

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (11/22)

बिजलीमल्ल संभाजी पवार

अवघा 40 मिनिटांचा हा कार्यक्रम आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, नेटका आणि सुटसुटीत. खेळाडूंना सुखविणारा आणि स्वतःचे श्रम सार्थकी लागले असे समाधान देणारा. राष्ट्रीय पातळीवर चमकणारे हे वीर आता या कार्यक्रमातून स्फूर्ती घेतील आणि पुढील वर्षी नेपाळला जाणाऱ्या कबड्डीसंघात अथवा आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या मैदानात प्रवेश मिळवण्यासाठी कंबरा कसतील असे त्यांच्या उल्हसित चेहऱ्यावरून वाटले खरे!

“तुम्ही खेळाडू मोठे भाग्यवान आहात, केवढे तुमचे कौतुक आणि काय तुमची सरबराई! येण्याजाण्याचा, राहण्याजेवण्याचा खर्च देऊन तुम्हांला निमंत्रणे, चांदीचे चषक आणि सुवर्णपदकांची तुम्हांला बक्षिसे. आमच्या वेळी पदरमोड करून सामन्याला जावे लागे आणि बरोबर बांधून आणलेले शिळे तुकडे चार दिवस खावे लागत. राणासंगाएवढ्या जखमा झाल्या तरी साधे आयोडीन लावायला मिळायची मारामार.’’ सातारचे बबनराव उथळे, सोलापूरचे यल्लापा जेनुरे अथवा मुंबईचे जामसंडेकर असे कबड्डीक्षेत्रातील 15-20 वर्षांपूर्वीचे रथी-महारथी भेटले की बऱ्याच वेळा त्यांच्या बोलण्यात वरील सूर उमटतो. शिवाजी विद्यापीठातील समारंभात सहभागी होताना मला पुन्हा त्यांच्या या उद्गारांची आठवण होत होती. खेळाडूचे यश हे त्याला नेहमीच आनंददायी असते. पण त्याचे जाणीवपूर्वक कौतुक झाले, की तो आनंद वेगळाच असतो. विद्यापीठ स्तरावर खेळाडूला पोषक वातावरण तयार झाले तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजविणारे खेळाडू तयार होतील असे नेहमी बोलले जाते. पण या उपक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी प्रयत्नपूर्वक करणारी जी थोडी विद्यापीठे आहेत त्यांत शिवाजी विद्यापीठाचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल.

या सर्व कार्यक्रमांतील एक प्रमुख उपक्रम म्हणजे आंतरविद्यापीठ स्पर्धेत आणि अखिल भारतीय स्पर्धेत कुठल्याही खेळात चमकणाऱ्या खेळाडूंचा सत्कार. भारतातील सर्व विद्यापीठांचा पराभव करून अजिंक्य ठरलेला संघ अथवा खेळाडू किंवा महाराष्ट्रातील नामवंत व्यावसायिक खेळाडूंच्या बरोबरीने कौशल्य दाखवून कॉलेजात असतानाच महाराष्ट्र राज्याच्या संघात समावेश करून घेणारा क्रीडापटू ही निश्चितच आशास्थाने असतात.

कार्यक्रम अत्यंत वक्तशीरपणे चालू झाला. आपल्या सुरुवातीच्या छोट्या प्रास्ताविकात मेघनाथ नागेशकरांनी विद्यापीठाने क्रीडाक्षेत्रातल्या उत्कर्षासाठी चालवलेल्या प्रयत्नांची माहिती सांगितली. दोन उपक्रम मला नवीन वाटले आणि अनुकरणीय. शिवाजी विद्यापीठ दोन आठवड्‌यांचे एक प्रशिक्षण शिबिर दरवर्षी कॉलेजच्या सुरुवातीला, संलग्न असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात घेते. खोखो, कुस्ती, अ‍ॅथलेटिक्स अशा खेळांचा त्यात समावेश असतो. जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने संख्या फार नसते आणि नवोदित खेळाडूंना दरवर्षी अधिकारी माणसाकडून सुरुवातीचे धडे गिरवावयास मिळतात, ज्याचा फायदा त्यांना वर्षभर होतो. पण विद्यापीठ यापेक्षाही अलीकडच्या पायरीपासून प्रयत्न करते. विद्यापीठाने नेमलेले क्रीडा प्रशिक्षक उन्हाळ्याचे दोन महिने शाळांतील होतकरू मुलांना स्वत: जिल्ह्याच्या गावी जाऊन मार्गदर्शन करतात. याशिवाय विद्यापीठातील सर्व चांगल्या खेळाडूंना एकत्रित करून देण्यात येणारे शिक्षण निराळेच. निरनिराळ्या कॉलेजांत खेळाडूंना संधी देत असतील, पण वर्षभर सूत्रबद्धपणे विद्यापीठ म्हणून खेळासाठी धडपडणारे असे महाराष्ट्रातले दुसरे विद्यापीठ तरी माझ्या माहितीत नाही.

साधारणपणे सर्व ठिकाणी बक्षीससमारंभ हा कार्यक्रम सगळयात शेवटी ठेवलेला असतो. (कारण त्यानंतर कार्यक्रमाला प्रेक्षक थांबतो कोण? या वर्षीच्या सांगलीच्या राज्य क्रीडामहोत्सवात तर आभाराचा सर्व मामलाही बक्षीससमारंभाच्या आधी उरकण्यात आला होता. बक्षिसे देण्याआधीच पारितोषिक वितरण केल्याबद्दलचे आभार मानण्याची कल्पना विनोदी नाही काय?) या कार्यक्रमात मात्र सुरुवातीला बक्षीससमारंभ पार पडला.

कोल्हापूरचे आणि मल्लांचे नाते अतूट आहे. कोल्हापूरला स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठानेही ही परंपरा सांभाळली आहे. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सामन्यांत अजिंक्य ठरलेल्या या चौघांच्या कुस्तीगीर संघाचा पहिल्यांदा ब्लेझर देऊन सन्मान झाला. आंतरराष्ट्रीय कुस्तीचे दार ठोठावणारा संभाजी पवार हा या चमूचा नायक होता. (विद्यापीठाच्या ‘कलर-ब्लेझर’च्या कोटाचे कापड बहुधा नुसते दिले जाते. बाकीची जबाबदारी खेळाडूवर टाकून. या ठिकाणी कोट तयार करून त्यावर विद्यापीठाचे मानचिन्ह लावून देण्यातील संयोजकता निश्चितच कौतुकास्पद होती.) यानंतर दयानंद कॉलेजच्या दोन व्हॉलीबॉलच्या विद्यार्थिनी, आणि खोखोची एक खेळाडू. कबड्डीमध्ये सांगलीचे झांबरे आणि दाभोळकर, सोलापूरच्या औरंगाबादकर आणि बास्केटबॉलमध्ये वालचंद इंजिनिअरिंग विद्यालयाचा विद्यार्थी यांच्या कर्तृत्वाचे कौतुक झाले. प्रत्येकी 250 रुपयांचे रोख पारितोषक देऊन बक्षीस घेताना घेणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही कसे घसघशीत वाटले. यानंतर कुलगुरूंनी आपल्या भाषणात ‘या स्वरूपाचा समारंभ घडवून आणणारे शिवाजी विद्यापीठ हे भारतात एकमेव आहे’ याची कल्पना दिली आणि ‘कार्यक्रमापासून मिळालेली स्फूर्ती टिकवा, नवोदितांत रुजवा आणि विद्यापीठाचा नावलौकिक वाढवा’ असे आवर्जून सांगितले. सत्कार झालेल्या एका खेळाडूने शेवटी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘यश कर्तृत्वाने मिळते हे अर्धसत्य असते. पूर्णसत्य हे असते की, क्रीडारसिकांच्या शुभेच्छा आणि इथे जमलेल्या थोरा-मोठ्यांचे शुभ आशीर्वाद यांचा वाटा त्यात नेहमीच मोठा असतो... विद्यापीठातून बाहेर पडल्यावरही मिळालेल्या यशाचा पक्का पाया हा या विद्यापीठाच्या मैदानावर घातला गेला याची आम्ही सदैव कृतज्ञापूर्वक जाणीव ठेवू’ हे त्याचे मनोगत सर्वांनाच समारंभाचे मर्म ओळखणारे वाटले.

समारंभातील काही गोष्टी मात्र निश्चित खटकल्या. शिवाजीचे नाव असलेल्या आणि बहुसंख्य खेळाडू राष्ट्रीय खेळातील विजेते असताना सर्व समारंभ इंग्लिशमधून चालविण्याचा सोस कशाला? शिवाजीच्या विद्यापीठाला मातृभाषा परकी वाटावी? परीक्षेचे दिवस झपाट्याने जवळ येत असताना समारंभाचा दिवस निवडलेला. त्यामुळे उपस्थितीही बेताचीच. ज्या कॉलेज-विद्यार्थ्यांना असल्या कार्यक्रमांतून स्फूर्ती मिळावी त्यांना प्रचंड संख्येने येता येईल अशी वेळ आणि जागा निवडण्याची दक्षता यापुढे तरी घेतली जावी. सर्व खेळाडूंना एकमेकांचा परिचय अनौपचारिकपणे व्हावा असा एखादा छोटासा कार्यक्रम - कोणत्याही स्वरूपाचा - मुख्य कार्यक्रमाच्या आधी वा नंतर असावयास हवा होता. बक्षीस मिळवणाऱ्या खेळाडूंत सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतला एकही खेळाडू नव्हता. पुढल्या वर्षीच्या कर्तृत्ववान खेळाडूंत साऱ्या जिल्ह्यातील खेळाडू असतील आणि त्यांची संख्याही वाढली असेल अशी आशा करू या!

अवघा 40 मिनिटांचा हा कार्यक्रम आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, नेटका आणि सुटसुटीत. खेळाडूंना सुखविणारा आणि स्वतःचे श्रम सार्थकी लागले असे समाधान देणारा. राष्ट्रीय पातळीवर चमकणारे हे वीर आता या कार्यक्रमातून स्फूर्ती घेतील आणि पुढील वर्षी नेपाळला जाणाऱ्या कबड्डीसंघात अथवा आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या मैदानात प्रवेश मिळवण्यासाठी कंबरा कसतील असे त्यांच्या उल्हसित चेहऱ्यावरून वाटले खरे!

शुभेच्छा !

कबड्डी हा खेळ गिरणी कामगाराचा आणि खेडवळांचा, असा समज बरेच दिवस रूढ होता. आजही काही प्रमाणात तो आढळून येतो. कबड्डीच्या मैदानावर ज्यांची जडणघडण झाली, ज्यांनी कबड्डी क्षेत्रावर मनापासून प्रेम केले अशा व्यक्ती जर समाजात मान्यता मिळवून उभ्या राहिल्या तर हा समज खोटा ठरण्यात निश्चितच मदत होईल.

सांगलीचे तरुणभारत व्यायाम मंडळ ही सांगलीमधील कबड्डी क्षेत्रात अनेक वर्षे नावाजलेली क्रीडासंस्था आहे. त्याचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब गोटखिंडे हे आज सांगली जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. कबड्डीतील एक अत्यंत निष्णात पंच म्हणून त्यांची ख्याती आहे. कबड्डी संघाचे व्यवस्थापक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांची कामगिरी किती मोलाची ठरते, याचा अनुभव अलाहाबादला राष्ट्रीय सामने खेळताना मी स्वतः घेतला आहे. सांगली भाग हा महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यामुळे ते निश्चितपणे निवडून येतीलच. लोकसभेतील खासदार म्हणून काम करताना राष्ट्रीय प्रश्नाबरोबर राष्ट्रीय खेळाच्या प्रश्नालाही ते चालना देतील ही खात्री आहे.

रतन पार्टे या कोल्हापूरच्या गोखले कॉलेजच्या विद्यार्थिनी. इंदूरच्या कबड्डी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्या दक्षिण महाराष्ट्राकडून खेळल्या होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या महिला कबड्डी संघातही त्यांची यंदा निवड झाली होती.

भालजी पेंढारकरांच्या ‘सुनबाई’ या आगामी चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत त्या रुपेरी पडद्यावर पदार्पण करतील. आज कबड्डीचे मैदान गाजविणाऱ्या या भावी चित्रतारकेची उद्याची रुपेरी कारकिर्दही यशस्वी ठरो हीच सदिच्छा!

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 20 फेब्रुवारी 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना संभाजीराव पवार Load More Tags

Add Comment