सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या 'गांधींविषयी' या ग्रंथाचे तीन खंड 25 जानेवारी 2022 पासून उपलब्ध झाले आहेत. या तीन खंडांमध्ये मिळून 76 लेख आहेत, ते साधना, नवभारत, समाजप्रबोधन पत्रिका, गांधीमार्ग इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या पुस्तकांतून घेतलेले आहेत. 1915 ते 2015 या शंभर वर्षांत लिहिले गेलेले हे लेख 43 लेखकांचे आहेत (अर्थातच काहींचे लेख एकापेक्षा अधिक आहेत).गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले आहेत. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे. त्यातल्या दुसऱ्या खंडाचे (गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व) संपादन अशोक चौसाळकर यांनी केले आहे. प्रस्तुत खंडाला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश प्रसिद्ध करतो आहोत.
महात्मा गांधींचा जन्म दि. 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू दि. 30 जानेवारी 1948 रोजी झाला. या वर्षी त्यांच्या जन्मास दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. म. गांधींच्या योगदानाकडे जागतिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहत थोर कम्युनिस्ट नेते कॉ. एस. ए. डांगे असे म्हणाले होते की, ज्या वेळी म. गांधींचा जन्म झाला त्या वेळी सर्व जगावर वसाहतवादाचे वर्चस्व होते आणि 1948 मध्ये जेव्हा गांधींचा मृत्यू झाला, त्या वेळी बहुतेक सर्व जग वसाहतवादापासून मुक्त झालेले होते. हे सर्व एकट्या गांधींमुळे झाले नसेल, पण जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली साम्राज्यशाहीविरुद्धचा लढा त्यांच्या नेतृत्वाखाली लढवला गेला. गांधींनी हा जो लढवला, त्याची तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये होती व ती खालीलप्रमाणे :
1) हा लढा पूर्ण अहिंसात्मक पद्धतीने लढवला गेला आणि लढ्याचा उद्देश सरकारची अधिमान्यता काढून घेणे हा होता.
2) भारत व ब्रिटिश यांच्यातील सत्तांतर शांततेच्या मार्गाने झाले व सत्तांतरानंतर इंग्रजांचे व भारतीयांचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले.
3) या चळवळीने जनतेमध्ये आपल्या अधिकाराबाबत जागृती निर्माण केली आणि त्यातून झालेल्या नव्या वातावरणामुळे भारतात लोकशाही राजवट स्थापन झाली. घटनात्मक शासनयंत्रणा उभी राहिली. पण भारताची परकीय राजवटीपासून मुक्तता करणे हेच म. गांधींचे ध्येय नव्हते. त्यांना समाजात मूलगामी परिवर्तन घडवून आणायचे होते. व्यक्तीला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचे व हिंसा व वैमनस्यमुक्त समाज स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी पर्यायी विकासाची विचारसरणी विकसित केली. त्यामुळे त्यांच्या विचारांचा अभ्यास सातत्याने जगातील विविध देशांत केला जात आहे. आज जगापुढे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांना एक मानवतावादी पर्याय गांधी विचारातून प्राप्त होऊ शकतो याची जाणीव आज लोकांना होत आहे.
हा खंड म. गांधींचे जीवन व कार्य या विषयावर प्रस्तावित तीन खंडांपैकी दुसरा खंड असून त्यात म. गांधींच्या विचारांची परीक्षा जगातील इतर थोर विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात केली आहे. त्यात सॉक्रेटिसपासून आचार्य विनोबा भावे व जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंतच्या विचारवंतांचा समावेश करण्यात आला आहे. यातील बहुतेक लेख 1950 नंतर लिहिलेले आहेत. लेखकांमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य जावडेकर, ना. ग. गोरे, पु. ह. पटवर्धन, प्रा. मे. पुं. रेगे, श्री. वसंत पळशीकर, अम्लान दत्त यांचा समावेश होतो. हे लेख वेगवेगळ्या काळात लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यामागे कोणतेही एक सूत्र नाही. प्रत्येक लेखकाने एका विशिष्ट अशा विचारवंताच्या विचारांच्या संदर्भात गांधीविचारांची चर्चा केली आहे. त्यामुळे गांधी विचारांच्या आकलनास एक व्यापक अशी संदर्भ चौकट प्राप्त झाली आहे.
या ग्रंथातील लेखांची विभागणी मुख्यत: तीन भागात करण्यात आली आहे. पहिल्या भागातील तीन लेख प्राचीन तत्त्वज्ञांच्या संदर्भात आहेत. त्यात गांधी व गीता, गांधी व ख्रिस्त, गांधी व सॉक्रेटिस या तीन लेखांचा समावेश होतो. दुसरे तीन लेख टॉलस्टॉय, जेफर्सन, मार्क्स व लेनिन यांच्या संदर्भात आहेत. दुसऱ्या भागात गांधींच्या समकालीन विचारवंतांचा; जे त्यांच्यापेक्षा वयाने जास्त होते, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात फुले, रानडे, टिळक, गोखले, टागोर व राजचंद्र यांचा समावेश केला आहे. तिसऱ्या भागात पं. नेहरू, विनोबा, जयप्रकाश, डॉ. लोहिया, एम. एन. रॉय व डॉ. आंबेडकर यांच्यावरील लेखांचा समावेश केला आहे. त्यातील बहुतेक जण वयाने म. गांधींपेक्षा लहान होते. यातील सावरकर, गोळवलकर आणि डॉ. आंबेडकर हे त्यांचे विरोधक होते. या ग्रंथातील लेखांमध्ये गांधी आणि इतर विचारवंत यांच्या विचारांची तुलना केलेली नाही. त्या विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात गांधीविचार जास्त चांगल्या प्रकारे आपणास कसा समजून घेता येईल हे समजते.
या ग्रंथातील पहिल्या भागातील लेखांचे लेखक नामवंत विचारवंत आहेत. त्यात आचार्य जावडेकर, तर्कतीर्थ जोशी, श्री. वसंत पळशीकर, अल्डस हक्सले व आचार्य विनोबा भावे यांचा समावेश होतो.
प्राचीनकाळात जे स्थान गीतेवरील शांकरभाष्यास प्राप्त झाले, तेच स्थान आधुनिक काळात टिळकांच्या ‘गीतारहस्या’स प्राप्त झाले. म्हणून म. गांधी त्याबद्दल असे म्हणाले की, तो सार्वकालिक महत्त्वाचा ग्रंथ आहे. स्वातंत्र्यलढ्यास त्यांनी दिलेल्या योगदानापेक्षा हे योगदान जास्त महत्त्वाचे आहे. त्यानंतर गांधींनी ‘अनासक्ती योग’ हे गीताभाष्य लिहिले. आचार्य जावडेकर या दोन्ही तत्त्वज्ञांची तुलना करताना असे म्हणतात की, टिळकांची बुद्धी एका विद्वान मीमांसकाची होती, तर गांधींची बुद्धी जास्त प्रतिभाशाली व समकालीन समस्यांच्या संदर्भात गीतेचा अर्थ शोधणारी होती.
सॉक्रेटिसचे जीवन आणि कार्य याबाबत गांधींच्या मनात उत्सुकता होती. आपल्या ‘इंडियन ओपिनियन’ या साप्ताहिकात त्यांनी त्याची ओळख ‘ए स्टोरी ऑफ सोल्जर ऑफ ट्रूथ’ या नावाने करून दिली. एप्रिल-मे 1908 मध्ये सहा लेखांची लेखमाला लिहून त्यांनी त्याला आद्य सत्याग्रही असे संबोधले. ‘म. गांधी आणि सॉक्रेटिस ‘या लेखाचे लेखक श्री. वसंत पळशीकर यांचे असे मत आहे की, म. गांधी व सॉक्रेटिस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य असून त्या उभयतांचे असे मत होते की, सत्याचे ज्ञान हेच खरे शहाणपण असते आणि नीतीचे अधिष्ठान सत्य हेच आहे. या दोघांनी सखोल आणि सूक्ष्म अशी धर्मचिकित्सा केली आणि सार्वजनिक जीवनाचे अंतर्बाह्य शुद्धीकरण करण्यावर त्यांचा भर होता.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी येशू ख्रिस्त आणि म. गांधी यांची तुलना करून असे मत व्यक्त केले की, गांधींची रामराज्याची कल्पना त्यांनी यहुदी व ख्रिश्चन धर्मापासून घेतली. दोघांचाही खून स्वजनांनीच केला. ख्रिस्त राजकारणी साधू नव्हता पण गांधी राजकारणी संत होते. त्यांचा प्रयत्न राजकारणाचे शुद्धीकरण करण्याचा होता. पण राजकारण हे स्वभावत:च कुटिल असल्यामुळे त्यात भाग घेणाऱ्या साधुपुरुषास सत्त्वापासून च्युत व्हावे लागते, असे जोशींचे मत दिसते. पण म. गांधी त्यांच्या या मताशी सहमत झाले नसते.
प्रख्यात तत्त्वज्ञ, अमेरिकेचे स्वातंत्र्यवीर आणि घटनेचे शिल्पकार थॉमस जेफर्सन यांच्या विचारांची प्रख्यात विचारवंत अल्डस हक्सले यांनी गांधींच्या विचारांशी तुलना केली आहे. त्यांच्या मते अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या गांधींची अंत्ययात्रा लष्करी वाहनावरून व लष्करी इतमामाने काढण्यात आली हा राष्ट्रवादाचा प्रभाव होता. आज भारतीय राष्ट्र इतर राष्ट्रांचीच नक्कल करीत आहे! त्यांच्या मते, जेफर्सन सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा व प्रत्यक्ष लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. गांधींनी पण या दोन संकल्पनांचा पुरस्कार केला होता. अनेक बाबतीत गांधींचे विचार जास्त क्रांतिकारक आणि धर्मविषयक विचार अधिक वस्तुनिष्ठ होते.
म. गांधी काऊंट लिओ टॉलस्टॉय यास आपला आदर्श मानत होते. श्री. भगवंत क्षीरसागर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखांत उभयतांतील अनुबंध स्पष्ट केले आहेत. गांधी असे म्हणतात की, सत्याग्रहाची जाणीव मला प्रथम ‘न्यू टेस्टामेंट’मध्ये झाली. भगवद्गीतेने माझ्या विचारांना दृढ केले. टॉलस्टॉयच्या ईश्वराचे राज्य तुमच्या हृदयातच आहे’, याने मला प्रेरणा दिली. संयम, सत्याची पूजा आणि ब्रेड लेबर या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकलो. आपले ‘हिंद स्वराज्य’ हे पुस्तक त्यांनी टॉलस्टॉयकडे पाठवले होते व ते त्यांनी वाचले होते. आपल्या दक्षिण आफ्रिकेतील आश्रमाचे नाव त्यांनी ‘टॉलस्टॉय फार्म’ असे ठेवले होते.
गांधी आणि मार्क्स हे दोघेही परिवर्तनाचा विचार मांडणारे विचारवंत. 1947 मध्ये गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यलढा यशस्वी केला. रशियातील बोल्शेव्हिक क्रांती, 1949 ची चिनी क्रांती आणि आशियाई देशांत कम्युनिझमचे वाढते आकर्षण यामुळे मार्क्सच्या तत्त्वज्ञानाबद्दल अविकसित देशात एक प्रकारचे नवे आकर्षण निर्माण झाले. त्यातूनच गांधी आणि मार्क्स यांच्या विचारांची तुलना केली जाऊ लागली. तसा काहीसा प्रयत्न श्रीपाद अमृत डांगे यांनी त्यांच्या ‘लेनिन विरुद्ध गांधी ’ या इंग्रजी पुस्तकात 1921 मध्ये केला होता. 1950-51 मध्ये श्री. किशोरभाई मश्रुवाला या ज्येष्ठ गांधीवादी विचारवंताने ‘गांधी अँड मार्क्स’ या पुस्तकात दोघांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास केला. या पुस्तकाला आचार्य विनोबा भावे यांनी प्रस्तावना लिहिली. त्यात त्यांनी मार्क्सवादाच्या काही सिद्धान्तांवर टीका केली. मश्रुवाला यांचे मत होते की, यापुढे सामना हा साम्यवाद व गांधीवाद यांच्यातच होणार आहे. हे दोन्ही विचार परस्परांच्या विरुद्ध उभे आहेत. या दोन्ही गांधीवाद्यांची भूमिका आचार्य जावडेकरांना पसंत पडली नाही. विनोबा व मश्रुवाला यांच्या या विधानांवर जावडेकरांनी टीका केली आणि ‘नवभारत’ मासिकात एप्रिल 1952 ते डिसेंबर 1952 या काळात चार सविस्तर लेख लिहून त्यांच्या विचारांचे खंडन केले. त्यांच्या मते, मार्क्सचे अर्थशास्त्र, त्यात वर्णिलेला वर्गसंघर्ष व वर्गीय शोषण नष्ट करण्याचा प्रयत्न आणि गांधींचा अहिंसात्मक सत्याग्रह व नीतिशास्त्र यांचा समन्वय झाला पाहिजे. या समन्वयालाच त्यांनी सत्याग्रही समाजवाद हे नाव दिले. वर्गसंस्था व युद्धसंस्था नष्ट करून वर्गविहीन व दंडविहीन समाजरचना स्थापन करण्याचा गांधींचा आणि मार्क्सचा आदर्श होता.
राजेश्वरी देशपांडे यांनी आचार्य जावडेकरांनी गांधी आणि मार्क्सच्या विचारांचे पुनर्वाचन कसे केले हे सांगून आपला सत्याग्रही समाजवादाचा विचार समकालीन समस्यांच्या संदर्भात कसा मांडला याचे विवेचन केले आहे.
दुसऱ्या भागातील लेखात आधुनिक भारतातील काही ज्येष्ठ नेते व विचारवंत आणि गांधी यांच्यातील परस्परसंबंधांची चर्चा करण्यात आली आहे. त्यातील टिळक, गोखले, आणि राजचंद्र यांनी गांधींच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या ‘टुवर्ड्स अंडरस्टँडिंग गांधी’ या अपूर्ण पुस्तकात प्रा. दि. के. बेडेकर असे प्रतिपादन करतात की, गांधींच्यावर भारतातील प्रबोधन चळवळीचा मोठा प्रभाव पडला होता. गांधी व दादाभाई, रानडे, गोखले आणि टिळक यांच्यातील अनुबंधांची चर्चा प्रा. बेडेकर, वसंत पळशीकर, तर्कतीर्थ जोशी आणि डॉ. भारती पाटील यांनी केली आहे.
वसंत पळशीकर यांनी म. फुले व म. गांधी यांच्यातील समान तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते, दोघेही सत्याचे पुरस्कर्ते होते आणि अन्यायाचे विरोधक होते. अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी लढा दिला. शेतकऱ्यांचे दैन्य त्यांना पाहवत नव्हते. श्रमाची प्रतिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्य दोघांनाही महत्त्वाचे वाटत होते.
प्रा. बेडेकरांच्या मते, गांधी हे न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य होते. त्यांनी वास्तववादाचा मार्ग अव्हेरला आणि आपणास इष्ट वाटणारा मार्ग स्वीकारला. गोखले हे रानडे यांचे शिष्य तर गांधी हे गोखल्यांचे शिष्य. राजकारणाच्या नैतिक स्वरूपाचा गोखल्यांनी आग्रह धरला आणि त्यांच्या घटनात्मक प्रतिकारातील काही सूत्रांचा गांधींनी विकास केला. डॉ. पाटील यांनी आपल्या लेखात दक्षिण आफ्रिकेतील संघर्षात गोखल्यांनी गांधींना कसा पाठिंबा दिला हे सांगितले आहे. पण गांधी व गोखले यांत मतभेद होते. गांधी अद्वैतवादाचे पुरस्कर्ते तर गोखले अज्ञेयवादी. गोखले आधुनिकतेचे पुरस्कर्ते तर गांधी आधुनिक संस्कृतीस ‘सैतानी’ संस्कृती म्हणणार. गांधींचा सत्याग्रह जहालांच्या पुढचा, तर गोखले मवाळ व नेमस्त. पण तरीही त्यांचे जवळचे संबंध होते.
हेही वाचा : 'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश)
लोकमान्य टिळक व गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील दोन थोर नेते. टिळकांच्या हातून चळवळीचे नेतृत्व म. गांधींकडे गेले. आचार्य जावडेकर यांनी असे प्रतिपादन केले आहे की, टिळकांचा वारसा गांधींनी पुढे चालवला. पण प्रा. बेडेकर यांनी असे मत होते की, टिळकांच्या विचारात संघर्ष व त्याग यांना प्राधान्य देणारा ‘सामुराई’ राष्ट्रवाद प्रधान होता. त्यांच्या मते विविध जात, धर्म व वंश यात विभागलेल्या व परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या मानवी समाजात परस्पर संघर्षातून सामाजिक समतोल प्रस्थापित होतो. आपल्या लेखात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या दोन महापुरुषांच्या कार्याचे विवेचन करताना असे म्हटले आहे की ब्रिटिश साम्राज्यशाहीला निडरपणे तोंड देणारा टिळक हा वीरपुरुष होता व गांधींनी त्यांच्यापुढे जाऊन वसाहतवाद मोडीत काढला. टिळकांना भारतात विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारलेला आधुनिक लोकशाही समाज स्थापन करायचा होता, तर गांधींना विकेंद्रित लोकशाही व ग्रामस्वराज्य यावर आधारलेला नवा समाज स्थापन करायचा होता.
आपल्या वैचारिक जडणघडणीमध्ये टॉलस्टॉय, राजचंद्र आणि रस्कीन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असे म. गांधींचे मत होते. धर्म जाणिवेचा विचार केला तर राजचंद्र हे टॉलस्टॉयपेक्षा श्रेष्ठ होते, असेही त्यांनी म्हटले आहे. गांधी आणि राजचंद्र हे समवयस्क. गांधी पाश्चात्य शिक्षण घेऊन आलेले तर राजचंद्रांनी भारतीय तत्त्वज्ञानात प्राविण्य प्राप्त केलेले. त्यांची जिज्ञासा फार तीव्र होती. त्यांचा जैन तत्त्वज्ञानाचा खोल असा अभ्यास होता. तत्त्वज्ञानावरील विविध प्रश्नांवर गांधींनी त्यांच्याशी चर्चा केली. प्रा. बेडेकर यांच्या मते, रायचंदभाईंमुळे (राजचंद्र यांना स्नेहीमंडळी रायचंदभाई म्हणत असत.) गांधींना एक नवे आत्मभान प्राप्त झाले. अंत:करणातील स्वयंप्रेरणा व मनाचे सामर्थ्य यांचा लाभ झाला. सत्याचा शोध घेताना आत्मनिष्ठा आणि अंत:करणाची शुद्धी महत्त्वाची आहे. त्यासाठी कोणत्याही एका धर्माची वा धर्मग्रंथाची गरज नाही हे त्यांनी गांधींना सांगितले.
रवींद्रनाथ आणि म. गांधी यांचे जवळचे संबंध होते, पण दोघेही स्वतंत्र बुद्धीच्या व्यक्ती होत्या. प्रख्यात विचारवंत अम्लान दत्त यांनी त्यांच्या विचारांचा परामर्श घेताना असे म्हटले आहे की, अहिंसा, ग्रामीण विकास व शिक्षण यात त्यांना रुची होती. गांधी एका स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते आणि चळवळ चालवण्याची पद्धत आणि राष्ट्रवाद यांच्याबद्दल त्यांची स्वतंत्र मते होती. दोघेही व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असले तरी टागोरांना त्याचे महत्त्व कलावंताच्या दृष्टिकोनातून वाटत होते तर गांधींना ते विवेकसंपन्न न्यायबुद्धीतून जाणवत होते.
या विषयावरचा दुसरा लेख ‘स्वदेशी समाज व स्वराज्य’ या विषयावर श्री. वसंत पळशीकर यांनी लिहिला असून त्यांनी टागोरांच्या ‘स्वदेशी समाज’ या निबंधाची गांधींच्या ‘हिंद स्वराज्य’शी तुलना केली आहे. या दोन्हींचा उद्देश भारताचे उत्थान कशा प्रकारे करावे हाच होता. पळशीकरांच्या मते 1942 चा लढा 1930 प्रमाणे शिस्तीचा न राहता गैरशिस्त झाला. त्यात हिंसाचार झाला. त्यामुळे समाजाचे आत्मबळ वाढले नाही. म्हणूनच फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारावर अंकुश ठेवण्यास काँग्रेस हतबल ठरली. रवींद्रनाथांनी 1920 च्या असहकार चळवळीच्या वेळी बहिष्कारासारख्या उपायामुळे समाजात अंतर्विरोध कसे निर्माण होतात व त्यातून हिंसाचार कसा निर्माण होतो याचे चित्रण आपल्या ‘घरे बाहेरे’ या कादंबरीत केले होते.
सावरकर आणि गांधी यांच्यातील संबंध 1924 नंतर बिघडायला सुरुवात झाली. त्यापूर्वी व नंतरही सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर मुंबई काँग्रेसचे एक उत्साही नेते होते. सावरकर स्वत:ला टिळकांचे अनुयायी मानीत असले तरी त्यांचे हिंदुत्ववादी राजकारण अविवेकावर आधारलेले होते आणि टिळकांच्या विवेकी व राष्ट्रीय राजकारणाचा त्याचा संबंध नव्हता. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतु:सूत्री गांधींनीच पुढे नेली. टिळकांना केवळ हिंदूंचेच अभ्युत्थान करावयाचे होते, असे म्हणणे चूक आहे. त्यांना हिंदू-मुसलमानांसह सर्व भारतीयांचे उत्थान करावयाचे होते. ते सर्वधर्मसमानतेचे व धर्मसहिष्णुतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी हिंदू राष्ट्रास कधीही पाठिंबा दिला नाही. जावडेकर लिहितात, ‘लोकमान्यांचा खरा अभिमानी महाराष्ट्र व विशेषत: तरुण महाराष्ट्र त्यांच्या राष्ट्रोन्नतीकर शिकवणुकीचे सत्यस्वरूप लक्षात घेऊन या नवीन अविवेकी हिंदुराष्ट्र प्रचाराने आपली अधोगती होऊ देणार नाही, अशी आशा आम्ही बाळगतो.’
सावरकर हे गांधींच्या विचारांचा उजव्या दृष्टिकोनातून विरोध करणारे असले तर एम. एन. रॉय हे डाव्या व मार्क्सवादी दृष्टिकोनातून गांधीविचारांचा विरोध करीत होते. नंतरच्या काळात त्यांनी मार्क्सवादाचा त्याग केला आणि नवमानवतावादाचा पुरस्कार केला. ते धर्मनिपेक्षता, इहवाद व विवेकवाद यांचे कडवे पुरस्कर्ते होते. ख्यातनाम तत्त्वज्ञ प्रा. मे. पुं. रेगे यांनी रॉय व गांधी यांच्या विचारांचा सम्यक दृष्टिकोनातून आढावा घेतला आहे. प्रा. रेगे यांच्या मते, गांधी हे नैतिक साधक होते. आपल्या आदर्शांना प्रत्यक्षात आणण्यात त्यांना रस होता. व्यक्तिस्वातंत्र्य व्यक्तीची प्रतिष्ठा, सत्याची साधना याबाबत भिन्न विचारपरंपरेतून येऊनसुद्धा हे दोन महापुरुष एकमेकांच्या बरेच जवळ आले होते.
सावरकर, रॉय यांच्याप्रमाणेच डॉ. आंबेडकर हे गांधींचे विरोधक होते. ते त्यांच्या राजकारणाचे व हिंदूधर्मसमर्थक भूमिकांचे विरोधक होते. गांधींची धर्मकल्पना, वर्णाश्रमास पाठिंबा, अहिंसेचे स्तोम, त्यांची ग्रामस्वराज्याची कल्पना यांना पण त्यांचा विरोध होता. गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधाबाबत श्री. वसंत पळशीकर यांनी विस्तृत विवेचन केले आहे. बाबासाहेबांच्या काही भूमिका गांधींना मान्य नव्हत्या. त्यांनी स्वत: हरिजन उद्धाराचे काम मोठ्या प्रमाणात केले, पण पळशीकर सांगतात त्याप्रमाणे गांधींचा मार्ग हा आत्मशुद्धीचा व कर्तव्यपालनाचा होता. तर डॉ. आंबेडकरांच्या कार्यक्रमाचा आशय आत्मसन्मान आणि स्वाभिमान जागृतीचा होता. डॉ. चैत्रा रेडकर यांनी डॉ. आंबेडकर आणि गांधी यांच्यामध्ये संवादाच्या वाटा कोणत्या असू शकतात, याचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते, अनेक बाबतीत दोघांच्या भूमिका परस्परविरोधी होत्या, तर काही बाबतीत त्या परस्पर पूरक होत्या. आजच्या संदर्भात परिवर्तनाची निकड लक्षात घेता त्यांच्यामध्ये परस्परपूरक असणारे मुद्दे पुढे नेण्याची गरज आहे.
हेही वाचा : शहरे- गांधींना घडवणारी आणि गांधींनी घडवलेली - रामचंद्र गुहा
विनोबा, पं. नेहरू, सुभाषचंद्र आणि जयप्रकाश हे गांधींच्या प्रभावळीतील नेते, पण प्रत्येक जण स्वतंत्र बुद्धीचा आणि विचारांचा होता. आचार्य भावे हे जर गांधींचे आध्यात्मिक वारसदार असतील तर पं. नेहरू हे त्यांचे राजकीय वारसदार होते. विनोबांच्याबद्दल लिहिताना डॉ. पराग चोळकर असे म्हणतात की, विनोबा गांधींचे शिष्य असले तरी ते स्वतंत्र विचारांचे होते. त्यांनी गांधींच्या विचारांना सर्वांगांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. अध्यात्मक्षेत्रात विनोबांचे जे योगदान आहे, त्यात त्यांनी गांधींनी दिलेल्या अंतर्दृष्टीचा मोठा वाटा आहे. विनोबांच्या गीतेवरील टीकांत ती स्पष्ट दिसते. गांधींच्या ‘हिंद स्वराज्य’मध्ये जे विचार मांडले होते, त्याचा विकास करून त्यांनी लोकनीतीची कल्पना मांडली. सर्वोदय, ग्रामस्वराज्य, भूदान आणि ग्रामदान या सर्वच बाबतीत विनोबांनी नेमकी आणि टोकदार मांडणी केली आहे.
पं. नेहरू व गांधी यांच्यातील मनोज्ञ अशा अनुबंधांची चर्चा रावसाहेब पटवर्धनांनी त्यांच्या लेखात केली आहे. नेहरू हे समाजवादी, अज्ञेयवादी, आधुनिकतेचे पुरस्कर्ते, औद्योगिकीकरण व संसदीय राजकारण श्रेयस्कर मानणारे. गांधी या सर्व गोष्टींच्या विरोधात पण काँग्रेस नेत्यांत सर्वात जास्त जवळीक गांधी-नेहरूंच्यामध्ये! रावसाहेबांनी या दोन नेत्यांमधील साम्य व भेद यांची चर्चा करीत असता असे मत व्यक्त केले की, भारतीय राष्ट्रवाद साम्राज्यशाही विरोधी असून तो सर्वांगीण समाज स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. त्याचे स्वरूप सर्जनशील आणि विधायक आहे. नेहरूंची ध्येयनिष्ठा व सत्यनिष्ठा, त्यांचे लढाऊ व इमानदार व्यक्तिमत्त्व, साधनशुद्धीबद्दलचा त्यांचा आग्रह यामुळे गांधींनी त्यांची आपला वारस म्हणून निवड केली.
पं. नेहरू आणि सुभाषचंद्र हे काँग्रेसचे दोन तरुण नेते. दोघेही डाव्या विचारांचे व गांधीचे अनुयायी. पण 1938-39 मध्ये गांधी आणि सुभाष यांच्यात मतभेद झाले व सुभाषनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि देशाबाहेर जाऊन स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ‘आझाद हिंद फौजे’ची स्थापना केली. गांधी व सुभाष यांच्यातील संबंधांची चर्चा ज्येष्ठ समाजवादी नेते श्री. ना. ग. गोरे यांनी केली आहे. श्री. गोरे असे मत व्यक्त करतात की, ‘छोडो भारत चळवळ’ व ‘आझाद हिंद सेना’ या परस्परपूरक चळवळी होत्या आणि त्यामुळे ब्रिटिश राजवटीचा आधार कमजोर झाला. त्यांच्या मते सुभाषचंद्र हे वैराग्य व वीरता यांचे मिश्रण असणारे एक खड्गधारी संन्यासी होते.
जयप्रकाश नारायण व गांधी यांच्यातील परस्पर संबंधांची चर्चा प्रा. एस. एस. पांढरीपांडे यांनी केली आहे. जयप्रकाश सुरुवातीस काँग्रेस समाजवादी पक्षाचे व समाजवादी पक्षाचे नेते होते. नंतर सर्वोदय चळवळीत सामील झाले व शेवटच्या काळात ते आणीबाणीच्या विरुद्ध संपूर्ण क्रांतीच्या चळवळीचे नेते होते. मानवी जीवनाची एकसंधता व एकात्मता, अध्यात्म आणि राजकारणातील अभिन्नता आणि साध्य - साधन विवेक ही गांधींच्या विचारांची तीन सूत्रे जी आत्मसात करण्याचा जयप्रकाशांचा प्रयत्न होता, असे पांढरीपांडे सांगतात.
सन 1969 मध्ये गांधी जन्मशताब्दीनिमित्त बोलत असताना तत्कालीन सरसंघचालक श्री. मा. स. गोळवलकर गुरुजी यांनी गांधींना प्रात:स्मरणीय व्यक्ती आणि राष्ट्रपिता म्हणून संबोधले. यापूर्वी संघाने गांधींना फाळणीसाठी व मुस्लिम अनुनयासाठी जिम्मेदार ठरवले होते. प्रा. नरहर कुरुंदकर यांनी गुरुजी व गांधी यांच्यातील संबंधांची चर्चा एका लेखात केली आहे. त्यांच्या मते, आपल्या मूळ भूमिका कायम ठेवून जर संघाने गांधींना प्रात:स्मरणीय म्हटले असेल, तर ते म्हणणे औपचारिक ठरते. गांधींनी आजीवन इंग्रजांशी संघर्ष केला, संघाने केला नाही. गांधींनी विविध समाजसुधारणांचा पुरस्कार केला. संघाची त्या बाबतची भूमिका संशयास्पद आहे.
म. गांधी आणि इतर विचारवंत यांच्या संदर्भातील काही लेख या ग्रंथात संग्रहित करण्यात आले आहेत. गांधींच्या विचारांचा या विविध लेखकांनी जो वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास केला, विकास केला त्याचे आकलन करण्यास हे लेख साह्यभूत होतील. असा विश्वास वाटतो. म. गांधींचे विचार विश्वव्यापक आणि समृद्ध आहेत आणि या विचारांचा विकास नंतरच्या लोकांनी पण केला आहे. आजच्या आपल्या समस्या समजून घेण्यासाठी व त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा आपणास उपयोग होणार आहे.
- डॉ. अशोक चौसाळकर
सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांचा संयुक्त प्रकल्प...
गांधींविषयी
खंड 1 : गांधी : जीवन आणि कार्य
खंड 2 : गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व
खंड 3 : गांधी खुर्द आणि बुद्रुक
दर्जेदार निर्मिती व हार्डबाउंड अशा तिन्ही खंडांची एकूण किंमत 1350 रुपये.
सवलतीत 900 रुपये. पोस्टाने घरपोच हवे असल्यास 1050 रुपये.
संपर्क :
साधना प्रकाशन 431,
शनिवार पेठ, पुणे 411030
sadhana.prakashan@gmail.com
Ph. 02024459635,
Mob. 7058286753
'गांधीविषयी'चे तिन्ही खंड AMAZON वर उपलब्ध आहेत.
Tags: साधना प्रकाशन दि. के. बेडेकर नरहर कुरुंदकर Load More Tags
Add Comment