ऐश्वर्या स्वत: व्यवसायाने स्त्रीरोग तज्ञ आहे. ती स्वत:कडे आरपार बघत स्वत:च्या आयुष्यातील अनुभवलेल्या असंख्य घटना, प्रसंग व व्यवहारास अतिशय संवेदनशीलतेने भिडते, चिकित्सक प्रश्न विचारते आणि वाचकास अंतर्बाह्य विचार करण्यास प्रवृत्त करते. ‘बाई’ला आपण स्पर्श कसा करावा याबाबत ‘आपल्याला’ ज्ञान नाही असा प्रश्न लेखिका उपस्थित करते, तेव्हा लक्षात येतं की, आपल्या समाजात नाती मनापर्यंत कशी गेलेलीच नाहीत. एकूणच पुरुषांचे भावभावनाविषयक प्रबोधन आणि सक्षमीकरण करण्याची आवश्यकता लेखिका मांडते.
प्रत्येक व्यक्तीस सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा, आयुष्याचा आनंद घेण्याचा, प्रेम करण्याचा तसेच विविध पद्धतीने अभिव्यक्त होण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. लिंग, धर्म, जात, वंश, रंग, लैंगिकता इत्यादी आधारांवर भेदभाव करण्यास कायद्याने मनाई आहे. असे असले तरी आपल्याला रोज विविध प्रकारच्या विषमतांना सामोरे जावे लागते. राज्यघटना लागू होऊन पाऊण शतकाचा काळ लोटला तरी विषमता टिकून का आहे? तिच्या मुळाशी कोणते अंतर्विरोध आहेत? हे समजून घेण्यासाठी धर्म, संस्कृती, परंपरा, चालीरीती, तत्वज्ञान, साहित्य एवढेच नव्हे तर विज्ञान-तंत्रज्ञान अशा सर्व घटकांची चिकित्सक पडताळणी करणे आवश्यक ठरते. विशेष म्हणजे, हे जग पुरुषांनी स्वतःला केंद्रस्थानी ठेवून घडविले आहे. त्या जगाला स्त्रियांनी सडेतोड प्रश्न विचारायला हवेत. पुरुषकेंद्री व्यवहारांची चिकित्सा करायला हवी. पुरुषसत्ताक जगाचे दुटप्पी विचार सर्व पातळीवर उघडे पाडायला हवेत. उन्नत आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यायला हवा. डॉ. ऐश्वर्याचे ‘पाळीचं पॉलिटिक्स’ हे पुस्तक या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल आहे.
हे पुस्तक मासिक पाळीच्या बाबतीत पारंपरिक धारणांची चिकित्सा करते. स्त्रीची दडपणूक करणाऱ्या विचारसरणीला कटघऱ्यात उभे करते. तसेच स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता, जातिव्यवस्था, विज्ञान, विविध शास्त्रे आणि धार्मिक दृष्टिकोनांच्या बाबतीत ठोस दृष्टिकोन भूमिका मांडते. केवळ शारीरिकच नव्हे तर भावनिक पातळीवर होणारी स्त्रीची कोंडी आणि त्यामागे असलेल्या पुरुषी राजकारणाचे तर्कनिष्ठ विश्लेषण ऐश्वर्या मांडते. पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या समाजात बाईचं दुय्यमत्व आणि अनेक प्रकारच्या लैंगिकतांची झालेली दडपणूक लेखिका धारदारपणे मांडते.
एकूण पुस्तकाचे तीन विभाग पाडलेले आहेत. पहिल्या विभागात मासिक पाळी आणि लैंगिक राजकारण, दुसर्या भागात स्त्री आरोग्य आणि धर्म, तर तिसर्या विभागात विज्ञान आणि लिंग आंधळेपणा, अशा एकूण तीन भागांत पुस्तकाची मांडणी केली आहे.
सुरुवातीला स्त्री–पुरुषांमधील शारीरिक भिन्नत्वाला लिंग (Sex) मानले जात होते, तर त्यांच्या सामाजिक भूमिका आणि धारणा यासाठी लिंगभाव (Gender) ही संकल्पना वापरण्यात आली. मात्र, नंतरच्या स्त्रीवादी अभ्यासकांच्या मते, लिंग हे फक्त जीवशास्त्रीय नसून ती एक सामाजिक उत्पत्ती आहे. कारण शारीरिक भिन्नत्वावर आधालेली विषमता नैसर्गिक नसून ती समाजाच्या सत्तासंबंधांमुळे निर्माण होते. समाजातील प्रभुत्वशाली गट स्त्री-पुरुषांमधील शारीरिक भिन्नत्वाला नैसर्गिक मानत असले तरी त्या शारीरिक भिन्नत्वाला सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेमधूनच आकार दिला जात असतो.
थोडक्यात लिंग आणि लिंगभाव हे दोन्हीही समाजरचित आहेत. शारीरिक भेदांना समाजात सत्तासंबंधानुसार अर्थ दिला जातो. स्त्रीवाद्यांनी स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिकीकरण म्हणून मांडल्या गेलेल्या संकल्पना व मांडणीला आव्हान देऊन लिंग–लिंगभाव या द्वैताला मोडीत काढले. जैविक निर्धारवाद हा तात्विक तर्क आहे जो विविध प्रकारच्या विषमताना नैसर्गिक म्हणून ठरवतो. लिंगभाव हा फक्त समाज रचित नसतो तर व्यक्ती जेव्हा सामाजिक भूमिका पुन्हा-पुन्हा वठवतो पार पाडतो किंवा भूमिका सादर करण्यामधून त्या-त्या व्यक्तीचा लिंगभाव ठरत असतो आणि त्यामुळेच लिंगभाव आणि लैंगिकता हे ‘फ्ल्यूड’ बदलू शकणारे व प्रवाही असतात.
डॉ. ऐश्वर्या विज्ञान व त्यातील स्त्रीविषयक ज्ञानव्यवहाराची झाडाझडती घेते. विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्राच्या पुरुषकेंद्री, द्वैती (स्त्री-पुरुष) पद्धतीच्या ज्ञानव्यवहाराची ती चिकित्सा करते. कोणतीही ज्ञानशाखा जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा ती ज्ञानशाखा म्हणजे काय? त्या ज्ञानशाखेचे प्रयोजन काय? ती ज्ञानाची निर्मिती कशी करते? तिची अभ्यासपध्दती आणि सिध्दांत कोणते? हे समजून घ्यावे लागते. स्त्रीवाद्यांनी फक्त विज्ञान व वैद्यकीय शास्त्राची चिकित्सा केली नाही तर आधुनिक काळातील सामाजिक शास्त्रांचीही चिकित्सा केली. सामाजिक शास्त्रे व समाजशास्त्र यामधील ज्ञानाचा पाया हा बुद्धिवाद (Reason) मानला गेला. परंतु बुद्धिवाद या कल्पनेला स्त्रीवाद्यांनी आव्हान दिले. जो बुद्धिवाद तुम्ही ज्ञानाचा आधार मानता त्या बुद्धिवादाच्या केंद्रस्थानी पुरुष असतो. त्यामुळे पुरुष विवेकी ठरतात व स्त्रिया अविवेकी ठरतात. थोडक्यात सामाजिक शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या पध्दती, तंत्रं व सिध्दांतात स्त्री नावाचा घटक समाजात आहे, तिचे स्वतंत्र अस्तित्व, अनुभवविश्व आहे, हेच मुळात नाकारलेले आहे. म्हणजे एकीकडे विज्ञान, वैज्ञानिक पध्दत, वस्तुनिष्ठता असे आपण म्हणतो परंतु समाजाचा अभ्यास करताना केंद्रस्थानी पुरुष व त्यांचे अनुभव आणि विचार गृहीत धरले जात होते. समाजातील अर्धा भाग असलेल्या स्त्रियांच्या अनुभवविश्वाचा विचारच केला जात नव्हता. प्लेटो, अॅरिस्टॉटलपासून ते सामाजिक शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक विचारवंतानी स्त्री-पुरुष विषमतेचे नैसर्गिकीकरण केले आहे. अशा प्रकारची सामाजिक शास्त्रे जर आज ही आपण शिक्षण संस्थांमधून शिकत व शिकवत असू तर २१व्या शतकात आपण एकप्रकारे स्त्रीविषयक विषमतांचं पुनरुत्पादन करीत आहोत, असं म्हणता येईल. यामुळे स्त्रीविषयक आधुनिक मूल्यविचारापासून आपलं सार्वजनिक व्यवहारविश्व दूर आहे. स्त्रिया दैनंदिन व्यवहारात कौटुंबिक हिंसाचार ते सार्वजनिक मानखंडना याचं नैसर्गिकीकरण असलेला समाज स्त्रिया दैनंदिन व्यवहारात अनुभवतात. ऐश्वर्या अगदी हेच डॉक्टर असलेल्या पुरुष सहकाऱ्यांच्या स्त्री विषयक- आरोग्य विषयक ज्ञानापासून ते विनोद, भाषा, शरीर, स्पर्श इत्यादी बाबींमधून ऐश्वर्या अगदी हेच आपल्याला उलगडून दाखवते.
१९८० च्या दशकापासून भारतीय स्त्रीवादी चळवळीने महिलांवरील हिंसेची दखल घेण्यास सुरवात केलेली दिसते. त्यामुळे लैंगिकतेचा प्रश्न सार्वजनिक चर्चेत आला. अनघा तांबे याच्या मते स्त्री चळवळीचा लैंगिकतेच्या मांडणीचा प्रवास लैंगिक हिंसाचार विरोधी आंदोलन ते स्त्रियांच्या लैंगिक सुखाचा आणि , कृतीशीलतेचा मुद्दा मांडण्यापर्यंत झाला. मात्र स्त्री चळवळीने योनिशुचितेबद्दल पवित्र-अपवित्रतेच्या पुरूषी वर्चस्वाच्या कल्पना स्त्रियांमध्येही मुरलेल्या आहेत हा मुद्दा पुढे आणला. तसेच सर्व स्त्रिया समान नाहीत तर त्या जातींत, वर्गांत विभाजित आहेत. त्यामुळे परिघीकरण झालेल्या देवदासी, कृष्णवर्णीय स्त्रिया, देहविक्रय करणार्या किंवा विवाहबाह्य संबंध असणार्या स्त्रियांवर लैंगिक हिंसाचार होणारच अशी चुकीची भूमिका आपल्या समाजात घेतली जाते. इतकेच नव्हे, तर दंगलीमध्ये आपल्या कुटुंबातील, जातीतील पुरुषांना इतर धर्मातील, जातीतील स्त्रियांच्या बाबतीत हिंसा करण्यास प्रवृत्त करणार्या स्त्रियांचा लैंगिक सत्तासंबंधातील सहभागही चळवळीने अधोरेखित केला. लैंगिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करत असताना लैंगिक कृतीशीलपणाचा एकच एक साचा या चळवळींनी नाकारला व लैंगिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचारांची मर्यादा पुढे आणली.
लैंगिकता ही स्त्रियांच्या शोषणाच्या मुळाशी राहून कळीची भूमिका निभावते अशी मांडणी लेखिका विविध उदाहरणांतून करते. अर्थात ही लैंगिकता जात, वर्ग, लिंगभाव यांच्या मुशीत व सहसंबंधातून घडते हे आकलन स्त्रीवाद्यांनी विकसित केलेलं आहेच.
हेही वाचा - मला पुरुषांच्या जगाचा कंटाळा आला आहे. - डॉ. ऐश्वर्या रेवडकर
ऐश्वर्या स्वत: व्यवसायाने स्त्रीरोग तज्ञ आहे. ती स्वत:कडे आरपार बघत स्वत:च्या आयुष्यातील अनुभवलेल्या असंख्य घटना, प्रसंग व व्यवहारास अतिशय संवेदनशीलतेने भिडते, चिकित्सक प्रश्न विचारते आणि वाचकास अंतर्बाह्य विचार करण्यास प्रवृत्त करते. ‘बाई’ला आपण स्पर्श कसा करावा याबाबत ‘आपल्याला’ ज्ञान नाही असा प्रश्न लेखिका उपस्थित करते, तेव्हा लक्षात येतं की, आपल्या समाजात नाती मनापर्यंत कशी गेलेलीच नाहीत. एकूणच पुरुषांचे भावभावनाविषयक प्रबोधन आणि सक्षमीकरण करण्याची आवश्यकता लेखिका मांडते.
या पुस्तकाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भाषा अत्यंत प्रवाही व संवादी आहे. लेखिका वाचकाला सहजच सहप्रवासी बनवते आणि अतिशय गंभीर विषय सोप्या-सरळ पद्धतीने मांडत दैनंदिन जगण्यातल्या व्यवहाराला भिडवते. तप्त उन्हाळ्यात एखादी थंड वार्याची झुळूुक अंगावर यावी तसा अनुभव हे पुस्तक वाचकाला देते. ते महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देतेच; पण पुरुषांनाही त्याबाबतचा योग्य तो दृष्टिकोन प्रदान करते. महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृतीसाठी होणाऱ्या शिबिरे आणि चर्चासत्रांमध्ये या पुस्तकातील आशयाचा खूप उपयोग होऊ शकतो. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये हे पुस्तक सहज उपलब्ध असावे. स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून अशा पुस्तकाचा चांगला वापर होऊ शकतो त्यासाठी हे पुस्तक एक प्रभावी मार्गदर्शक साधन ठरेल, असा विश्वास वाटतो.
डॉ. ऐश्वर्याने पितृसत्ताक व्यवस्थेचे विविध पदर उघड केले आहेत. पितृसत्ताक मूल्ये, प्रतीके, आणि विचारांवर सखोल टीका केली आहे. स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा पुरस्कार करत, त्या पुरुषी प्रजोत्पादन व लैंगिक विषमतेच्या नैसर्गिकीकरणाला या पुस्तकात ठाम नकार दिलेला आहे. या चिकित्सक आणि वाचनीय मांडणीद्वारे लेखिकेने लैंगिकतेसारख्या महत्त्वाच्या विषयाला सार्वजनिक पटलावर आणले आहे. तसेच स्त्रियांच्या नियंत्रणाच्या मूळ कारणांची उकल करून, पितृसत्ताक व्यवस्थेविरोधात ठोस हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली आहे.
१९७५ साली युनोने आंअंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केले होते. २०२५ हे वर्ष महिला चळवळीचे पन्नासावे वर्ष आहे. या टप्यावर हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मासिक पाळी, स्त्री आरोग्य, पितृसत्ता, धर्म, जात आणि लैंगिकता या काहीशा दुर्लक्षित प्रश्नांवर सार्वजनिक चर्चा घडावी व समाजाची निकोप दृष्टी तयार व्हावी आणि हे पुस्तक त्यासाठी निमित्त ठरावे, ह्या अपेक्षेसह डॉ. ऐश्वर्याचे मनापासून अभिनंदन.
- अनिल जायभाये
विभागप्रमुख समाजशास्त्र विभाग,
सामाजिक शास्त्रे संकुल,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ,
उप-परिसर, लातूर
इमेल: ajaybhaye@gmail.com
संदर्भ:
1. मेनन निवेदिता, लैंगिकता आणि स्त्रीवादी राजकारण, द वायर, मराठी, मार्च २०१९.
2. तांबे अनघा, स्त्री चळवळीतील लैंगिकतेच्या राजकारणाचे बहुसूरी कथन, भागवत वंदना व इतर (संपा.), संदर्भासहित स्त्रीवाद स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व, शब्द प्रकाशन, मुंबई, २०१४.
3. नरे–पवार संध्या,बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात, भागवत वंदना व इतर (संपा.), संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व, शब्द प्रकाशन, मुंबई, २०१४.
4. Nivedita Menon, Seeing Like a Feminist, New Delhi: Zubaan & Penguin Books India, 2पुस्तक शीर्षक
प्रकाशनपूर्व नोंदणी सवलत
Tags: period politics पाळीचं पॉलिटिक्स स्त्रीवाद मासिक पाळी स्त्रियांचे सामाजिक प्रश्न Load More Tags
Add Comment