रझिया मला पहिल्यांदा भेटली ती दंतेवाड्याला. आमची पहिल्या भेटीतच सहजतेने, छान मैत्री झाली. सुरवातीला अगदी सामान्य, सलवार कमीज घातलेली, मध्यम चणीची, चुणचुणीत मुलगी एवढा मोठा कामाचा व्याप सांभाळत असेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. हळूहळू हा उलगडा होऊ लागला आणि तिचा काम करण्याचा झपाटा बघून मी अवाक् झाले. एक मुस्लीम स्त्री-उद्योजक म्हणून तिचा प्रवास सर्व महिला वर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
बस्तर हा छत्तीसगढ राज्यातील एक जिल्हा. बिजापूर, सुकमा, नारायणपूर, दंतेवाडा, कोंडागाव, कांकेर आणि बस्तर मिळून पूर्वी एकच मोठा जिल्हा होता. प्रशासकीय सोयीसाठी आता हे वेगवेगळे जिल्हे झाले आहेत. या सर्वांचा मिळून बस्तर हा एक प्रशासकीय विभाग देखील आहे. आदिवासी, दुर्गम, घनदाट जंगल, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून आपल्यापैकी बऱ्याच जणांना बस्तर विभाग माहीत असेल. पण याच जिल्ह्यातील रझिया शेख ही उद्योजक ‘बस्तर फुड्स’ या तिच्या उपक्रमातून बस्तरला एक नवी ओळख देऊ पाहत आहे. 2021-22 मध्ये ‘बस्तर फुड्स’ची वार्षिक उलाढाल 50 लाख एवढी होती, तीच 2022-23 या वर्षी 80 लाख एवढी झाली आहे. Indian Institute of Food Development, Thanjavur, तसेच नीती आयोगाकडून ‘उत्कृष्ट उद्योजक महिला’ म्हणून देखील रझियाचा सन्मान झाला आहे. तर, अधिक जाणून घेऊया तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल...
प्रश्न - रझिया, तुझं कुटुंब मूळचं गुंटूर, आंध्रप्रदेशातील.. मग तुम्ही जगदलपूरला कसे स्थायिक झालात?
माझे अब्बा मस्तानभाई वीस वर्षांचे असताना कामाच्या शोधात छत्तीसगडला आले. आमचं कुटुंब व्यवसायाने शेतकरी होतं, आर्थिक परिस्थिती बेताची होती, त्यामुळे अब्बांची इच्छा असूनही त्यांना शिकता आलं नाही. विद्युत उपकरणांच्या व्यवसायात त्यांनी हळूहळू आपला जम बसवला आणि ते जगदलपुरला कायमचे स्थायिक झाले. जगदलपूरला स्थायिक झाल्यानंतर त्यांचा विवाह वयाच्या एकविसाव्या वर्षी, पंधरा वर्षांच्या माझ्या अम्मीशी म्हणजे अमीना यांच्याशी झाला.
प्रश्न - तुझ्या बालपण कसं गेलं? तुझ्या कुटुंबाबद्दल, बालपणीच्या आठवणींबद्दल सांग.
मला बालपण आठवतं ते हे की, माझे तरुण वडील सायकलवर पुढे मला आणि मागे आईला घेऊन जगदलपूरमधून फिरत आहोत. त्यावेळेसचं जीवन हे खरंच खूप सुंदर होतं. मला दोन लहान भाऊ, मी सगळ्यात थोरली. लहापणापासूनच मी अभ्यासात हुशार होते. माझी अभ्यासातील प्रगती बघून शेजारपाजारचे लोक माझ्या अब्बांना म्हणत, “मस्तानभाई जेव्हा केव्हा रझियाचे शिक्षण थांबवायचे असेल, तेव्हा आम्हाला सांगा. आम्ही हिला शिकवू, पण हिचे शिक्षण नका थांबवू”. मुस्लीम कुटुंब असल्याने कदाचित मुलीचं शिक्षण हे अर्ध्यावरच थांबवतील अशी शंका त्यांना वाटायची.
प्रश्न - तुझ्या शिक्षणाबाबत तुझ्या वडिलांचं काय मत होतं? शिक्षण घेताना तुला काही अडचणी जाणवल्या का? असतील तर त्या कोणत्या?
- ‘इस्लाम’मध्ये ‘तालीम’ला महत्त्व दिलं आहे, ही गोष्ट माझ्या अब्बांना पटली होती. उद्या कठीण परिस्थितीतसुद्धा माझी मुलगी समर्थपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे असं त्यांचं ठाम मत होते. म्हणून त्यांनी कायम आमच्या एकत्र कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा दिला. अम्मीनेही तिची शिक्षणाची अपूर्ण स्वप्नं माझ्यात पाहिली, घरकामाचं दडपण माझ्यावर टाकलं नाही. अम्मी-अब्बांनी कधीच आम्हा भावंडांना इतर धार्मिक स्थळी जाऊ नका म्हणून सांगितलं नाही, किंवा भेदाभेद शिकवला नाही. आमच्यावर रुढीवादी विचारांचा पगडा ठेवला नाही किंवा समाजाचा दबावही आम्हाला जाणवू दिला नाही. मला आठवतंय, तेव्हा घरातील म्हातारी पुरुष मंडळी, मुलगा म्हणजे ‘plus’ आणि मुलगी म्हणजे ‘minus’, गृहीत धरत असत. कारण मुलगा पैसा घरात आणतो आणि मुलगी लग्न झाल्यावर आपला पैसा दुसऱ्याच्या घरी घेऊन जाते असं त्यांचं म्हणणं होतं. मी माझ्या अमीना अम्मीला या ‘minus’चा अर्थ विचारत असे. तेव्हा संयमाने ती म्हणायची, “त्यांना प्रेमाने उत्तर दे, राग करू नको, योग्य वेळ आली की नक्की त्यांना तुझ्यावर गर्व होईल आणि तुलादेखील.”
प्रश्न - तुझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल आणि आठवणींबद्दल अधिक सांगू शकशील का? तू कुठे आणि कोणतं शिक्षण घेतलंस?
- दहावीपर्यंत मी हिंदी माध्यमात शिकले. बारावीला मी विज्ञान शाखेची निवड केली. पुढे तिने सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology) या विषयात पदवीचं शिक्षण जगदलपूरलाच ‘ख्राईस्ट कॉलेज’मध्ये घेतलं. पदवीनंतर कॉलेजातील फादरदेखील काळजीपोटी माझ्या अब्बांना म्हणाले, “रझियाला पदव्युत्तर शिक्षणासाठी बंगलोरला आमच्याच कॉलेजला पाठवा, मी सगळी व्यवस्था करतो. शिक्षण सुरु ठेवा.” अब्बा म्हणाले, “फादर, काळजी करू नका, मी तिचे शिक्षण सुरूच ठेवणार आहे.” मग पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी विमेन्स कॉलेज, विजयवाडा इथे मला पाठवले. विजयवाडाला पाठवण्याचे कारण, ते जगदलपूरपासून जवळ होते. अडचण असेल तेव्हा मी घरी किंवा अब्बा माझ्याकडे येऊ शकतील.
विजयवाडा येथील कॉलेजच्या आठवणींबद्दल सांगायचे झाले तर माझ्या विचारांचा परीघ घराच्या बाहेर पडल्यावर अधिकच विस्तारला. सुक्ष्मजीवशास्त्राचा उद्योगधंद्यांमधला उपयोग मला तिथेच लक्षात आला. माझा बराचसा वेळ प्रयोगशाळा आणि वाचनालय इथेच जात असे. महिला महाविद्यालयात शिकत असल्यामुळे मी नेहमी स्त्री वर्गातच राहिले. कॉलेजमधील पुरुष स्टाफ किंवा इतर पुरुषांसोबत माझ्या फार ओळखी झाल्या नाहीत, याचीही खंत मला वाटते. आज माझ्या कामात, कॉलेजमधील माझ्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन मला अजूनही मिळत आहे.
प्रश्न - पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर पुढे तू काय केलंस? नोकरी केलीस की अजून काही?
- हो. पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर मी नोकरी शोधायला सुरुवात केली. तेव्हा छत्तीसगढ राज्य नुकतेच तयार झाले होते. येथे देखील नोकरीच्या भरपूर संधी असतील असे अब्बांनी सांगितल्यानंतर मी जगदलपूरला घरी परत आले. इथे एका शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झाले. परंतु थोड्याच दिवसांत माझ्या लक्षात आले की, हा शिक्षकी पेशा आपल्यासाठी नाही. यापेक्षाही काहीतरी वेगळे मला करायचे होते. अब्बांनाही मी सुरक्षित अशी सरकारी नोकरी करावी असे आधीपासूनच वाटत होते. म्हणून मग मीही सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला जाण्याचे निश्चित केले. पण दिल्ली दूर होईल म्हणून अब्बांच्या सांगण्यानुसार हैदराबाद गाठले.
प्रश्न - स्पर्धा परीक्षेच्या अनुभवांबद्दल काय सांगशील? त्यानंतर तू काय केलंस?
मी तीन वर्षं मेहनत घेतली, पण यशाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिली. तेथील अनुभवाबद्दल सांगायचे झाले तर, तिथे गेल्यावर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच, कोचिंग सेंटर, वाचनालय, बुक डेपो, होस्टेल्स, खानावळ यांच्या एकंदरीत ‘बिझनेस मॉडेल’बद्दलच मला जास्त उत्सुकता वाटत होती. माझे मित्र गमतीने म्हणत, “परीक्षेच्या निकालाचे माहीत नाही, पण तुझा प्लॅन-बी (plan-B) तर फारच मजबूत आहे!”
स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र आपल्या आवाक्याबाहेरचे आहे हे लक्षात आल्यावर परत मी घरी परतले आणि काही दिवसांनी ‘Tata Trusts’ सोबतच्या ‘Save Motherhood Initiative’ या प्रकल्पात संशोधक म्हणून रुजू झाले. या नोकरीमुळे मला खऱ्या अर्थाने बस्तरचा आदिवासी बहुल दुर्गम भाग, त्यात राहणारी माणसं समजून घेण्याची संधी मिळाली. इथले घनदाट जंगल, जंगलातली विविधता मी जवळून अनुभवली! या सगळ्या अनुभवाचा मला माझा व्यवसाय उभारताना फायदा झाला.
प्रश्न - मग ‘बस्तर फुडस’ या नावाने तू स्वतःचा अन्नप्रक्रिया उद्योग केव्हा आणि का सुरु केलास?
‘Save motherhood initiative’ या प्रकल्पाचा कालावधी संपल्यानंतर ‘पुढे काय’ हा प्रश्न निर्माण झाला. एनजीओ म्हणून काम करताना नेहमीच तुम्हाला आर्थिक बाबींसाठी देणगीवर अवलंबून राहावे लागेल, ते मला नको होते. सुरवातीपासून माझी बिझनेस करण्याची सुप्त इच्छा होतीच, आतापर्यंत बरेच अनुभव गाठीशी होते.
गौण वनोपज म्हणजे जंगलातून आपल्याला मिळणारी फळे, पाने, चारा, बिया, डिंक, लाख, मध, मेण, बांबू, इत्यादी. जेव्हा बस्तरमधील या गौण वनोपज संपदेवर मी सर्व्हे केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, यावर एक चांगला अन्नप्रक्रिया उद्योग उभा राहू शकतो. त्याचं जर व्यवस्थित डिझायनिंग-ब्रॅंडिंग केलं गेलं तर मार्केटमध्ये एक चांगलं बिझनेस मॉडेल तयार होऊ शकतं. या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या कच्चा माल, मनुष्यबळ आणि जागा या गोष्टी बस्तरमध्ये उपलब्ध होत्या. अन्न व अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये काम करणे इथल्या परिस्थितीशी सुसंगतदेखील होते.
2017 ला मी ‘BASTAR FOODS (बस्तर फुडस https://bastarfoods.com/)’ ची सुरवात केली. सोबतीला गुलेश्वरी ठाकूर ही मैत्रीणदेखील होती. सुरवातीला दोन वर्षं घरातूनच व्यवसाय सुरु ठेवला. कुटुंबियानाही वाटले की, चांगले स्थळ येईपर्यंत मला हे काम करू द्यावे. सुरवातीचा हा काळ कठीणदेखील होता, मी आपली सेवा सरकारी आजीविका उपक्रमांना द्यायला देखील सुरवात केली. तिथूनच मला ‘महुआ लड्डू’ (मोहाचे लाडू) ही कल्पना सुचली. पण एका ठराविक काळानंतर सरकारी उपक्रमांतून सुरु झालेले उद्योग बंद पडत असत. त्यामुळे हा उपक्रम जरी बंद पडला तरी ‘महुआ लड्डू’ वरचं माझं काम पुढे मी सुरुच ठेवलं.
प्रश्न - ‘बस्तर फुड्स’ हे नाव तू आपल्या व्यवसायाला का दिलंस?
- बस्तरकडे पाहण्याचा लोकांचा एक ठरावीक दृष्टीकोन आहे, हा आदिवासी भूभाग आहे, येथील लोक कमी कपडे घालतात, जंगली लोक आहेत, मागासलेला, नक्षलग्रस्त भाग आहे. मला हा दृष्टीकोन बस्तर फुड्सच्या माध्यमातून बदलायचा होता. दुसरीकडे, बस्तरमधून बाजारात येणारे खाद्यान्न हे शुद्ध, कुठलीही भेसळ नसलेले, जंगलातील असते असा बाहेरच्या लोकांचा विश्वास आहे. या गोष्टी ध्यानात ठेवून मी काम सुरु केले. आज या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही जवळपास तीन हजार कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकलो ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
प्रश्न - ‘बस्तर फुड्स’च्या माध्यमातून तुम्ही नक्की कोणत्या प्रकारच्या सेवा देता?
- बस्तर फुड्सच्या माध्यमातून मी इतरांना अन्न प्रक्रिया उद्योग कसा उभारायचा याबाबत मार्गदर्शन करते. अन्न व अन्नप्रक्रिया उद्योगाची मानके काय आहेत? कायदेशीर बाबींची पूर्तता कशी करायची? तसेच पॅकेजिंग आणि मार्केटिंग संदर्भात मी मदत करते. सुरवातीला बस्तरमध्ये वरील बाबींविषयी लोकांना काहीच माहिती नव्हती, अन्नप्रक्रियेतील बारकावे समजावून सांगण्यास मी सुरुवात केली. कारखान्यात पाळण्यात येणाऱ्या नियम व अटींबाबत माझी टीम आग्रही राहू लागली. उदा. कोणतं काम केव्हा आणि कसं पूर्ण करायचं आहे, कृषी माल आणि अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये HACCP (Hazard analysis and critical control point) या पद्धतीची आवश्यकता का असते, कच्च्या मालाची गुणवत्ता खात्रीपूर्वक निश्चित कशी करायची, इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण मी आपल्या टीमच्या मदतीने स्थानिक भाषेत द्यायला सुरवात केली. कारण काम करणाऱ्यांमध्ये स्त्रिया संख्येने अधिक असत आणि त्या हलबी, गोंडी, भतरी या स्थानिक भाषा बोलत. सुरवातीला दहा महिलांच्या प्रशिक्षणापासून सुरु झालेला प्रवास मग वाढतच गेला.
सुरुवातीला आमच्या जवळ असलेला कच्चा माल आम्ही बघतो, त्यावर R&D (research and development) करतो. त्यात किती औषधी गुणधर्म आहेत ते शोधून अंतिम उत्पादन आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. अन्न हेच औषध यावर माझा ठाम विश्वास आहे.
प्रश्न - महुआ, चिंच यांसारख्या जंगलातून मिळणाऱ्या गोष्टींपासून तू तयार केलेल्या काही लोकप्रिय उत्पादनांबद्दल काय सांगशील?
- बस्तरच्या जंगलात महुआ (मोह) मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, खरेतर त्याचे गुणधर्म आदिवासी आधीपासून जाणून आहेत, पण महुआ दारूनिर्मिती (alcohol) साठी अधिक प्रसिद्ध आहे. मी महुआवर काम करायला सुरुवात केली आणि त्यापासून महुआ लड्डू, कुकीज्, चॉकलेट्स, एनर्जी विटा बार अशी मूल्यवर्धित उत्पादने तयार केली. बाजारात या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला. बस्तरच्या जंगलात चिंचदेखील मोठ्या प्रमाणावर मिळते. चिंच गोळा करणे हा येथील आदिवासींचा एक मोसमी जोडधंदा आहे. चिंच तोडा, फोडा आणि विका या पद्धतीला आम्ही थांबवू पाहतोय. एका किलोमागे 25-30 रुपये इतका भाव इथे आदिवासींना मिळतो, जो फारच कमी आहे. चिंचेचे गुणवत्तापूर्ण संकलन कसे करायचे हे मी गावातल्या महिलांना शिकवते, जेणेकरून त्यांना अधिक नफा मिळेल. चिंचेची मुबलकता पाहून मग बस्तर फूड्सच्या माध्यमातून मी इमली सॉस, इमली पावडर, कॅण्डी, पल्प, रस्सम पावडर ही उत्पादने बाजारात आणली. त्यानंतर तांदूळ, मिलेटस या पिकांवर देखील काम केले. इथे मोठ्या प्रमाणावर जे पिकतं त्यापासून मूल्यवर्धित उत्पादने बनविण्यावर भर दिला. मार्केटची गरज लक्षात घेऊनच उत्पादन तयार केले. स्त्री, पुरुष, लहान मुले या वयोगटाच्या गरजा पूर्ण होतील या दृष्टीकोनातून देखील उत्पादनं तयार केली जातात. उदा. मिलेटमध्ये लहान वयोगटासाठी एनर्जी बार, मोठ्यांसाठी रेडी टू इट मिलेट, पोषणमूल्य अधिक असलेले मिलेट खिचडी, इत्यादी.
प्रश्न - आदिवासी दुर्गम भागात काम करत असूनसुद्धा तू उत्पादनांच्या गुणवत्तेकरिता आणि मार्केटिंग करता आग्रही आहेस, असे का?
- हो. अन्नप्रक्रिया उद्योगातील गुणवत्तेबद्दल मी जास्त आग्रही आहे कारण जागतिक मार्केटमध्ये टिकायचं असेल तर उत्पादनांची गुणवत्ता टिकवावीच लागेल, नाहीतर माझी उत्पादने कधीच बस्तरच्या बाहेर जाणार नाहीत. जंगल, जंगलातील उत्पादने आणि आदिवासी संस्कृतीच्या जोडीला ग्राहकांसाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे!
आज ‘महुआ लड्डू’ आणि ‘महुआ टी’(चहा) ही दोन उत्पादने बस्तर फूड्सचा ब्रँड बनले आहेत. आतापर्यंत मी 22 उत्पादनांवर काम केलं आहे आणि त्यातील 15 उत्पादनं यशस्वीरीत्या मार्केटमध्ये आणली आहेत. यातील दीर्घकाळ टिकणारी व हाताळण्यास सोपी अशी उत्पादनं महिला बचत गटांना बनवण्यासाठी देण्यात येतात. यातून स्थानिकांना रोजगार मिळतो, तसेच उत्पादनं मार्केटमध्ये पोहचण्यास देखील मदत होते. हे बचत गट बिजापूर, दंतेवाडा, कांकेर, बस्तर, कोंडागाव या जिल्ह्यातील आहेत. येत्या काही दिवसांत माझी टीम जशपूर, कोरबा, सुरजपूर या जिल्ह्यांत देखील काम सुरू करणार आहे.
निर्यात क्षेत्रातही बस्तर फुड्सने पाऊल ठेवले आहे, लंडनस्थित ‘O’ Forest’ नामक कंपनीला गेल्या वर्षी 12 टन, चांगल्या गुणवत्तेचा महुआ निर्यात करण्यात आला. जो महुआ 35 रुपये किलोने विकला जात होता, त्याला 120 रुपये किलो भाव या प्रयत्नांतून मिळाला. यावर्षी 70 टन महुआ निर्यात होण्याच्या प्रक्रियेत आहे.
मार्केटिंगसाठी सोशल मिडियावर जाहिरात, छोट्या छोट्या प्रदर्शनांतून आपल्या उत्पादनांची विक्री व माहिती देणे तसेच गावातील आठवडी बाजारात देखील आपली उत्पादने आम्ही विक्रीसाठी ठेवली. आज बस्तर फूड्सची उत्पादने मिशो, अमेझॉन या वेबसाईट्सवर देखील उपलब्ध आहेत. चित्रकूट, रायपूर या शहरांत प्रत्येकी एक, जगदलपूर दोन, रायपूर आणि जगदलपूर विमानतळावर प्रत्येकी एक अशी बस्तर फुड्सची विक्री केंद्रं सुरु आहेत. तसेच NMDC किरंदुल, जगदलपूर CRPF कँटीनमध्ये देखील बस्तर फुड्सची सर्व उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बस्तर फुड्स किरकोळ आणि घाऊक या दोन्ही माध्यमांतून आपला व्यवसाय करते.
प्रश्न - तुझ्या टीममध्ये एकूण किती जण काम करतात आणि त्यांच्यासोबत काम करताना तुझा अनुभव काय आहे?
- आज जगदलपुरच्या माझ्या मुख्य ऑफिसमध्ये एकूण आठ स्थानिक महिला काम करतात. याबाबत रझिया तिचा अनुभव सांगते, “मार्केटिंगसाठी माझ्या ऑफिसात पुरुष रुजू व्हावा यासाठी मी बरेच प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत, आजही ‘women bossism’ आपल्या समाजात रुजलेला नाही. सर्व महिला स्टाफ त्यामुळेच तयार झाला. स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत पगाराची अपेक्षा कमी असते हेही मी अनुभवले. आज टीम म्हणून आमचं वैयक्तिक पातळीवर देखील छान घट्ट नातं तयार झालं आहे, हा मानसिक आधार मला एकटी महिला म्हणून काम करताना खूप महत्त्वाचा वाटतो.
प्रश्न - तुझं करिअर घडवताना वडिलांनी तुझ्या निर्णयामध्ये फेरफार केली असं तुला वाटतं का?
- नक्कीच नाही. मी 22 वर्षांची असताना मला जगदलपूरशिवाय दुसरं काही माहीत नव्हतं. असं समजा, मी एका बंद विहिरीत होते. त्यामुळेच त्यांनी मला त्यांच्या दृष्टिक्षेपात ठेवलं. याउलट माझा आत्मविश्वास वाढल्यानंतर बस्तरचा महुआ लड्डू घेऊन ‘पालो अल्टो- सॅफ्रान्सिकोला’ व्यवसाय प्रशिक्षणासाठी जाणारी मी एकमेव हिंदी माध्यमात शिकलेली मुलगी होते.
हैदराबादला असताना झालेल्या ब्रेकअपनंतर मी कोलमडून पडले होते, पण अम्मी-अब्बांच्या मदतीने मी स्वतःला परत उभे केले. आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून तेव्हाची रझिया आता प्रगल्भ झाली आहे. माझं जग मी स्वतः निर्माण केलं आहे, आणि या जगात माझं अस्तित्व अबाधित राखणाऱ्या जोडीदाराच्या शोधात आहे.
हेही वाचा : आदिवासी विकास - एक प्रश्नचिन्ह - मिलिंद बोकील
प्रश्न - एक महिला म्हणून काम करताना तुला काही अडचणी जाणवतात का? आणि त्याकडे तू कशी पाहतेस?
- एक महिला म्हणून काम करताना काही मर्यादा मला येतात, त्यातील काही मी स्वतः आखून घेतल्या आहेत. मी अविवाहित, एकटी महिला असून मला व्यवसाय करताना स्वतःसाठी एक सुरक्षित वर्तुळ बनवावे लागते. माझ्याकडे काम करणाऱ्या महिला वर्गासाठीही मला ही काळजी घ्यावी लागते.
मार्केटिंगच्या निमित्ताने मोठ्या शहरात फिरताना मी खात्री करून घेते की, माझी कामं रात्री फार उशिरापर्यंत लांबणार नाहीत. यात मला माझी सुरक्षितता महत्त्वाची वाटते. ऑफिसात कामासाठी मुलींना जास्त वेळ थांबावे लागत असेल तर त्यांना घरी रात्री उशिरा सोडण्याची जबाबदारी आमची असते. आमच्या उत्पादनांच्या विक्री व मार्केटींगसाठी या मुली इतर शहरांतील प्रदर्शनांत सहभाग घेतात तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेची मला जबाबदारी घ्यावी लागते. हे सर्व यासाठी की, बस्तर सारख्या आदिवासी क्षेत्रातून या मुली आपलं करिअर घडवू पाहत आहेत, त्या यशस्वी झाल्या तर स्थानिक मुलींना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणा मिळेल.
बस्तर फुड्सच्या स्थापनेपासूनच लोकांनी मला पाठिंबा दिला आहे. आदिवासी भागातील एक मुस्लीम महिला असूनही मला कायम पाठबळच मिळत आले आहे, पण तरी मी म्हणेन की काम करताना अडचणी आहेतच. जसं की गटबाजी होणे, आमचे चांगले बिझनेस प्रपोजल असूनही प्रोजेक्ट आम्हाला न मिळणे, आमच्या प्रपोजलचा गैरवापर देखील होतो. व्यवसाय ही देखील एक स्पर्धा आहे असे वाटते. मला यात लोक म्हणतात, “मॅडम खूप बिझनेस माईंडेड आहेत, पैशांवर जास्त ध्यान देतात. मॅडम उद्धट आहेत”. हे सर्व ऐकून वाईट नक्कीच वाटतं, माझी चुकीची नोंद काही लोकांनी घेतली आहे असंही वाटतं. “तिला खूप गर्व आहे, लवकर कोषातून बाहेर निघत नाही, लोकांमध्ये मिसळत नाही.” असंही मी माझ्याबद्दल ऐकते. खरं पाहता माझं लक्ष माझ्या कामावर केंद्रीत असतं. सकाळी नऊ वाजेपासून ऑफिस पाहणे, संध्याकाळी सात वाजता स्टाफला घरी पाठवल्यानंतर पेपरवर्क आणि डॉक्युमेंटेशन मी पाहते. कारण सर्व गोष्टी आम्हाला वेळेवर संपवायच्या असतात. माझ्यावर होणारी टीका दूर सारून आपलं काम न थकता करत राहणं मी आता शिकले आहे.
प्रश्न - भविष्यात तू बस्तर फुड्सला कुठे पाहतेस, तुझ्या काय योजना आहेत?
- आज छत्तीसगढसोबतच आंध्र प्रदेश, तेलंगाणा, मध्यप्रदेश राज्यात देखील ‘बस्तर फुड्स’ काम करत आहे. मला भविष्यात बस्तर फुड्सला अन्न व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील एक उच्च दर्जाची प्रशिक्षण आणि संशोधन संस्था म्हणून नावारुपाला आणायचे आहे. जिथे स्थानिक मुला-मुलींना या विषयात प्रशिक्षण दिले जाईल, जे बस्तरमध्येच राहून त्यांना शिकता येईल आणि काम देखील करता येईल. बाहेरच्या दुनियेत ही मुले पार बुजून जातात; भाषेचा, राहण्या-खाण्याचा न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण होतो हे मी जाणून आहे. स्थानिक संसाधनांतून स्थानिक लोकांना रोजगार कसा मिळेल यावर आम्हाला काम करत राहायचे आहे.
प्रश्न - तुझ्या व्यवसायाचा, पर्यावरणीयदृष्ट्या तू कसा विचार केला आहेस?
पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने देखील आम्ही आतापासूनच पाऊले उचलली आहेत. बस्तर मधील गावकऱ्यांना जंगलातून शाश्वत आजीविका मिळावी यासाठी आम्ही मिळून काम करत आहोत. आमच्या व्यवसायाचा परिणाम स्थानिक जंगलावर नक्कीच होणार आहे. गौण वनोपजासाठी बेसुमार जंगल तोड होऊ नये यासाठी गावकऱ्यांसोबत काम करत आहोत. गुणवत्तापूर्ण गौण वनोपज वेचणी कशी करावी, गौण वनोपज विक्री कुठे करावी म्हणजे योग्य भाव मिळेल यासाठी देखील आम्ही मदत करतो. वन विभागासोबत काम करून, स्थानिक जातीच्या वृक्षांचे संवर्धन करण्याकरता काम करत आहोत.
***
भविष्यात रझिया काम करत असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बस्तरमध्ये देखील स्पर्धा वाढेल, मोठे उदयोगसमूह तिथे येतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. याबाबत ती म्हणते, “या स्पर्धेला मला तोंड द्यावेच लागेल, ते अटळ आहे. त्यातूनच माझ्या उणिवा मला समजतील, आणि अंतिमतः या अनुभवांतून आमचा व्यवसाय समृद्ध होईल असा विश्वास मला वाटतो!”
मुलाखत आणि शब्दांकन : ऋतगंधा अशोक देशमुख
hrt.deshmukh@gmail.com
(कृषी आजीविका या क्षेत्रात कार्यरत)
- रझिया शेख
https://bastarfoods.com/
Tags: आदिवासी वनोपज बस्तर उद्योग रझिया शेख महिला उद्योजक युवा Load More Tags
Add Comment