माझी संस्था : भाषा

सन 2019 हे वर्ष युनेस्कोने ‘स्थानिक भाषा वर्ष’ म्हणून जाहीर केलं. मायबोलीचं ऋण स्मरण्यासाठी हे एक आगळं निमित्त म्हणावं लागेल. जागतिकीकरणाच्या झंझावातात होत जाणार्‍या सपाटीकरणाला कुठे तरी थांबवण्यासाठी, ‘आपलं’ म्हणून जो जगण्याचा पोत आहे तो जपण्यासाठी, जागतिक पातळीवरून बहुविधतेला घातली गेलेली ती साद... युनेस्कोच्या प्रयत्नांतलं हे या दिशेनं गेल्या दोन दशकांतील टाकलेलं अधिक ठोस, सुस्पष्ट पाऊल.

यापूर्वी, सहस्रकाच्या उंबरठ्यावर काळाची पावलं ओळखून जैववैविध्याइतकाच सांस्कृतिक वैविध्याला महत्त्व देण्याचा मोलाचा प्रयत्न युनेस्कोनं केला. सांस्कृतिक वैविध्याचा 2001 मध्ये प्रसिद्ध झालेला जाहीरनामा, त्यापाठोपाठ ‘आंतरराष्ट्रीय भाषादिना’ची घोषणा, 2008 मध्ये जाहीर झालेलं ‘आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष’ आणि त्यानंतर दशकभरानं यंदा जाहीर झालेलं ‘स्थानिक भाषा वर्ष’. एतद्देशीय भाषा जतनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला याबद्दल आनंद आणि हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर यावा याबद्दल वैषम्य वाटता-वाटता याची गरज ढळढळीतपणे अधोरेखित करणारी एक गोष्ट नुकतीच आपल्या घरात- अगदी उंबरठ्याच्या आत घडली. आठशे वर्षांची साहित्यिक-सांस्कृतिक-वैचारिक समृद्धीची दिंडीपताका मिरवणार्‍या मराठीचिये नगरीतून आयुष्याचा मोलाचा टप्पा मानल्या जाणार्‍या शैक्षणिक वर्षात- इयत्ता दहावीत मराठी या शंभर मार्कांच्या भाषाविषयात सुमारे दोन लाख साठ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची बातमी आली. अवघी शिक्षणपंधरी खडबडून जागी झाली. अकरावीच्या प्रवेशाच्या चिंतेत असणारे पालक हबकले. संपन्नतेची स्वप्नं आणि वाटा दाखवणार्‍या विज्ञान-गणित यांसारख्या विषयांवर भर देऊन निकाल उंचावण्याच्या प्रक्रियेतील शाळा हडबडल्या. हे काय होतं आहे हे कळे-कळेपर्यंत नजरेसमोर इमारत ढासळण्याची सुरुवात झाली... या इतक्या आणि अशा पडझडीला सुरुवात कुठे आणि कशी झाली?

गोष्ट नव्वदीच्या दशकातील. एक पत्रकार म्हणून काम करताना, एका अग्रगण्य दैनिकाची रविवारची ललित साहित्याची आवृत्ती काढताना स्पष्ट जाणवत गेलं की- मराठी सारस्वतात आशय आणि आविष्काराचं भलेभक्कम योगदान देणारी पिढी हळूहळू थकत चालली आहे. तिची जागा घेण्यासाठी तितकी ताकदीची, दमदार पिढी पुढे सरसावत नाहीये. दरम्यान, दिवाणखान्यात टीव्ही विराजमान झाला. अक्षराशी नातं हळूहळू बोथट होत गेलं. आपल्या भावजीवनाचा वेध घेण्याचा दावा करणार्‍या मालिका स्वयंपाकघरांतून पोहोचल्या. बाहेरचा कोलाहल वाढला. आतला संवाद संपत गेला. नवी पिढी वाचत नव्हे, तर बघत वाढली. नव्या सहस्रकाच्या दशपदीत ज्ञान-रंजनाची आणखी नवनवी साधनं परिचित होत गेली. ‘बघण्या’चे पडदे अगदी तळहातापर्यंत पोचले. अक्षरं अधिक सोप्या, सुंदर, आकर्षक, हलत्या-चालत्या रूपात नव्या पिढीपर्यंत पोचू लागली. नव्या दिशांच्या नव्या प्रलोभनांचा हा मोहमयी काळ... जागतिकीकरणाचा झंझावात खिडक्या-दारांतून आत शिरत एक नवी अभिरुची घडवत गेला.

या मॅकडोनल्डायझेशनच्या लाटेत देशी वाणांचं स्थान काय? ‘अडगुलं मडगुलं’मधून झरणारी माया... चांदोमामाला तूप-रोटी खाऊन जाण्याच्या आग्रहातून प्रकटणारं अगत्य, ओवीतून शेजीबाईंबरोबर वाटलेलं सुख-दु:ख- इथपासून ‘कठिण समय येता कोण कामास येतो?’ हे रघुनाथपंडितांचं व्यावहारिक शहाणपण आणि ‘वृक्षवल्ली आम्हाला सोयरे’ हे तुकोबाचं द्रष्टेपण... ही पिढ्यापिढ्यांची संक्रमित होत जाणारी शहाणीव... तिचं भवितव्य काय? या व्यथित करणार्‍या प्रश्‍नांचा शोध घेताना, बालसाहित्याची आंतरराष्ट्रीय अभ्यासक म्हणून सहा खंड व दोन डझनभर देश पालथे घालताना ‘आपला’ म्हणून चेहरा, ‘आपला’ म्हणून पोत, आपलं व्यवच्छेदक लक्षण असलेली भाषा जगवण्याची तगमग वाढली. जमिनीवर उभं राहून काम करण्याची गरज आहे याची जाणीव झाली. येऊ घातलेल्या अपरिहार्य पडझडीची नांदी अस्वस्थ करू लागली. पण करायचं काय? पुढे पाऊलखुणा नव्हत्याच! भाषा जपायची कुठून? घरातून.... शाळेतून.... बाजारपेठेतून... कोणत्या माध्यमातून?

भाषा जपायला हवी... ती मनातून! कुठे आणि कुणाच्या मनातून? एखादी भाषा पंचवीस वर्षं टिकवण्याच्या शक्यता कशा वाढता येतील? तर, पंचवीस वर्षं आधी सुरुवात करून! आजच्या मुलापासून. त्याच्या मनात भाषेच्या गोडीचं बी आज पेरलं गेलं, तर उद्या त्याचा वटवृक्ष बनण्याची शक्यता निर्माण होईल... एक रस्ता दिसला. आणि ओल्या मातीत भाषाप्रेमाचं बी रुजवण्याचं काम सुरू केलं, बारा वर्षांपूर्वी- एका चिमुकुल्या उपक्रमानं. ‘पुस्तकघरा’नं. आठवड्यातून एक दिवस दोन तासांच्या कालावधीत घराच्या पार्किंगमध्ये आजूबाजूच्या सहा चिमुकल्यांच्या समवेत सुरू झालं आमचं ‘भाषा पुस्तकघर!’ साप्ताहिक वाचन आणि गंमत-घर. या दोन तासांचा पूर्ण अभ्यासक्रम तयार केला आणि सहा वाचक अन् माझ्या चौदा वर्षांच्या मुलीसह मी- अशा दोन स्वयंसेवकांसह सुरू झालेली चळवळ हळूहळू रुजली. सहाची तीस मुलं झाली... हुरूप वाढला...

भाषा जगवायची हे एकट्या-दुकट्याचं काम नव्हे. म्हणून घरापासून सुरुवात करत निरनिराळ्या क्षेत्रांतील समविचारी मंडळींशी बोलत गेले आणि 2008 मध्ये पत्रकार, चित्रकार, उद्योजक, दृक्-श्राव्य माध्यमप्रमुख अशा विविध क्षेत्रांतील मंडळींना बरोबर घेऊन ‘भाषा’ या स्वप्नाला मूर्त रू दिलं- ‘भाषा : द सेंटर फॉर प्रिझर्व्हेशन अ‍ॅन्ड एन्हॉन्समेंट ऑफ रिजनल लँग्वेजेस’. प्रादेशिक भाषांचं जतन आणि संवर्धन हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून एकेक पाऊल टाकायला सुरुवात केली. सहा मुलांच्या ‘पुस्तक घरा’पासून सुरू झालेली ‘भाषा’ आज बारा वर्षांत विविध उपक्रम-प्रकल्पांच्या माध्यमातून सर्वदूर पोचली आहे. राज्यात, देशात आणि देशाबाहेरही परिचित झाली आहे.

हा प्रवास सोपा नव्हता. पायवाटच नसल्यामुळे सारा प्रायोगिक मामला. भाषाजतनाचं काम करताना पहिल्यांदा कोवळ्या पिढीचं अक्षरांशी नातं जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला. पुस्तकघरातून गोष्ट, कविता, गाणी यांतून भाषा त्यांच्या ओठापर्यंत, मनापर्यंत रुजवण्याचा घाट घातला. शहरातल्या काही आर्थिक दुर्बल वस्त्यांतून आणि नंतर वाचनसाहित्याचा पूर्ण अभाव असणार्‍या ग्रामीण आदिवासी भागांतून ही पुस्तकघरं सुरू केली. वाचनसंस्कृतीच्या जोपासनेच्या अंतर्गतच ‘थांबाल तिथे वाचा!’ हा एक अभिनव उपक्रम पुण्यातील काही लहान मुलांच्या दवाखान्यांतून पुस्तकांची ट्रॉली ठेवून सुरू केला. डॉक्टरांकडे जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलांनी रंगीबेरंगी सुंदर पुस्तकं हातात घेऊन वाचावीत अशी ही कल्पना वर्षभर चालली. परंतु ‘मोफत मिळणारी वस्तू आपलीच!’ या आपल्या संस्कृतीने पुस्तकांचा फडशा पाडायला सुरुवात केली. चाळीस-पंचेचाळीस पुस्तकांनी महिन्याच्या सुरुवातीला सजलेली ट्रॉली महिनाअखेरीस शिल्लक राहिलेल्या केवळ दोन पानांसह किंवा एखाद्या कव्हरसह बापुडवाणी दिसू लागली. अतिशय जड अंत:करणानं ही अतिशय सुंदर योजना बंद करावी लागली.

भाषेला शाळेच्या पातळीवर सक्षम करायला हवे, ही जाणीव हळूहळू होत गेली. मग शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळांची आखणी केली. शिक्षकांना त्यांच्या अतिशय व्यग्र दिनक्रमात भाषाशिक्षणासाठी थोड्या अधिक कौशल्याची मदत व्हावी, यासाठी अनेक शाळांतून शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळांची प्रारूपं बांधली. शहरी आणि ग्रामीण भागांतून त्या-त्या शाळांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे ‘कस्टमाइज्ड’ प्रशिक्षण कार्यक्रम आखले. महाराष्ट्रात या कार्यशाळा करता-करता साता नसल्या तरी एका समुद्रापार मालदीव या आपल्या शेजारी देशात- शिक्षकांच्या कार्यशाळेची संधी मिळाली. अरुणाचल प्रदेशातील आदिवासी शिक्षकांसाठीच्या अतिशय हृदयंगम कार्यशाळेचा अनुभव त्या वेळी गाठीशी होताच! प्रत्येक शाळेचा, शिक्षकांचा पोत निराळा असतो. प्रत्येक ठिकाणी तुम्ही नव्यानं शिकत जाता. अगदी परवा- डी.एस.हायस्कूल या मुंबईतील नावाजलेल्या, धारावी परिसरातील निम्नस्तरातील विद्यार्थ्यांच्या पंखांत आत्मविश्‍वासाचं बळ भरणार्‍या शाळेत- महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या मराठी शाळेत घेतलेल्या कार्यशाळेचा अनुभवही किती तरी शिकवून जाणारा ठरतो!

भले शिक्षक जिवाचं रान करून शिकवतील, पण घेणार्‍याची झोळी तितकीच ताकदीची हवी ना? याची जाणीव झाल्यानंतर ‘भाषा’नं आखला विद्यार्थी सक्षमीकरणाचा प्रकल्प. याअंतर्गत दोन अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रमांची आखणी केली. विद्यार्थ्यांना वाचनाची शिस्त लागावी आणि त्यांची संशोधनवृत्ती वाढीला लागावी, यासाठी एक खास प्रश्‍नमंजूषा स्पर्धा ‘भाषा’ने आयोजित केली. नाव ठेवलं ‘यक्षप्रश्‍न. ही दर वर्षी विशिष्ट विषयाचे वाचन व अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍नमंजूषा स्पर्धा गेली आठ वर्षे अव्याहत सुरू आहे. सुरुवातीला केवळ पुणे शहर व चौदा शाळांपुरती मर्यादित असणार्‍या या स्पर्धेत आज महाराष्ट्रातील मुंबई, सांगली, पंढरपूर, पन्हाळा अशा ठिकठिकाणचे चाळीसहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींचे संघ सहभागी होतात. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यात अभ्यासाचं, वाचनाचं, संशोधनाचं आणि आत्मविश्‍वासाचं बीज पेरणारी स्पर्धा म्हणून ‘यक्षप्रश्‍न नावारूपाला आली आहे.

विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता उंचावण्यासाठी ‘भाषा’ने आखलेला दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘मराठी भाषा ऑलिंपियाड. उद्याचा कसदार लेखक, चोखंदळ वाचक आणि चिकित्सक अभ्यासक घडविण्यासाठी ‘भाषा’ने उचललेलं हे दमदार पाऊल. अतिशय विचारपूर्वक अभ्यास-मंथनातून ‘भाषा’ने ही अभिनव, रंजक परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. मुलांना भाषेची गोडी लागावी, विद्यार्थ्यांची भाषिक बुद्धिमत्ता वाढीला लागावी आणि सर्जनशीलतेकडे त्यांच्या विचारांचा प्रवास सुरू व्हावा असा हेतू धरून या परीक्षेची आखणी करण्यात आली. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य या चार घटकांचा विचार करून शहरी, निमशहरी व ग्रामीणमधील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शिक्षकांशी चर्चा करून त्यांच्या सहकार्याने या परीक्षेची बांधणी करण्यात येते. यासाठीचा अभ्यासक्रम हा शालेय अभ्यासाला पूरक आणि उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने विकसित करण्यात आला.

पहिल्या वर्षी पुणे परिसरातील दोनशे विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असलेली ही परीक्षा आता राज्यात सर्वदूर विद्यार्थिप्रिय झाली असून यंदा राज्यातील मराठवाडा ते कोकण आणि मुंबई ते विदर्भातील निरनिराळ्या जिल्ह्यांतील सुमारे सहा हजार विद्यार्थी परीक्षा देण्यास उत्सुक आहेत. यात यंदा गोव्याच्या एका शाळेनं घेतलेला सहभाग हा या परीक्षेच्या उपयुक्ततेची खूणगाठ आहे.

यंदा इयत्ता दहावीचा मराठी विषयाचा लागलेला निकाल लक्षात घेऊन ‘भाषा’ने ऑलिंपियाड परीक्षेच्या पातळीवरच काही निश्‍चित उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे. ऑलिंपियाडच्या रंजक अभ्यासक्रमाचा, खास परीक्षातंत्राचा उपयोग विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता-वृद्धीसाठी निश्‍चित होईल, असा विश्‍वास वाटतो आहे.

‘भाषा’ ही केवळ अक्षरांपुरती द्विमितीय नसते आणि नसावी. प्राचीन काळापासूनचं भाषेचं मौखिक किंवा श्राव्य तसंच दृक् रूप लक्षात घेऊन ‘भाषा’नं विविध प्रकल्प-उपक्रम आजवर आखले आहेत. ‘चित्रांगण’ हा चित्रपट महोत्सव आणि आजच्या धकाधकीच्या जगण्यात घराघरात ‘गोष्टी’चं महत्त्व पुन्हा रुजवण्यासाठी लहान-थोरांसाठी साजरा होणारा ‘कथायात्रा’ हा राष्ट्रीय स्तरावरचा कथामहोत्सव ही त्याचीच उदाहरणं. नृत्य-नाट्य-संगीत-कथा अभिवाचन-बाहुलीनाट्य, परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन, कथा कथन स्पर्धा, लोककला, व्याख्याने अशा विविध माध्यमांतून ‘कथायात्रा’त गोष्ट साजरी केली जाते. देशातील अनेक नामवंत त्यात सहभागी होतात. भाषेच्या जतनाच्या शक्यता अधिक जोरकसपणे निर्माण करणारा हा साहित्योत्सव भारतात सर्वदूर लोकप्रिय ठरत आहे.

भाषेच्या अभिवृद्धीत महत्त्वाचा घटक म्हणजे भाषेचे अभ्यासक. भाषाविषयक संशोधनाला, अभ्यासपूर्ण विचारांना चालना मिळावी, बौद्धिक चर्चा झडावी यासाठी ‘भाषा’ राष्ट्रीय चर्चासत्रे व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करून अभ्यासकांना वैचारिक व्यासपीठ मिळवून देत आहे. आजपर्यंत भाषाने साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने चार आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या आहेत.

माय, मायभूमी आणि मायबोली- आपल्याला स्वत:ची ओळख बहाल करणारी ही शक्तिपीठं. माय आणि मायभूमीबद्दल संवेदनशील असणारे आपण मायबोलीबद्दल बेफिकीर का राहतो? या दुखर्‍या प्रश्‍नापासून सुरू झालेला प्रवास मला भाषेच्या जतन-संवर्धनासाठी गेली बारा वर्षे पूर्णपणे स्वत:च्या बळावर चालणार्‍या चळवळीपर्यंत घेऊन गेला.

सहा मुलांच्या वाचनघरापासून सुरू झालेली ही वाटचाल उत्क्रांत होत भाषाजतनाची यशस्वी प्रारूपं आणि दीर्घकालीन टिकाऊ पद्धती विकसित करण्यापर्यंत येऊन पोचली. शहरी व ग्रामीण परिसरात सर्व वयोगटांसाठी पारंपरिक आणि आधुनिक साधनांचा वापर करून समाजाभिमुख सकारात्मक उपक्रमांद्वारे भाषेच्या भविष्यकालीन जतनाच्या शक्यतांसाठी काम करणारी भारतातील महत्त्वाची स्वयंसेवी चळवळ म्हणून ‘भाषा’नं आपली ओळख आज सर्वदूर पक्की केली आहे. ‘भाषा’चे तपपूर्तीचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘स्थानिक भाषा वर्ष’ म्हणून साजरे व्हावे, हा एक सुरेल योगायोग आहे. तपपूर्तीच्या या उंबरठ्यावर, भाषा-जतनाच्या माध्यमातून संवेदनशील, सहिष्णू, सौंदर्यपूजक निरोगी समाजरचनेच्या उभारणीसाठी ‘भाषा कटिबद्ध आहे.

स्वाती राजे

Tags: स्वाती राजे संस्था परिचय swati raje bhasha लेख Load More Tags

Comments:

Geeta Manjrekar

आपल्या कामाचं कौतुक वाटतं ...मलाही या कामात सहभागी व्हायला आवडेल.

श्रीकांत धोंगडे

सहा मुलांच्या वाचनघरापासून सुरूझालेली वाटचाल , तपपूर्तीच्या उंबरठ्यावर स्वागत, अभिनंदन , शुभेच्छा आवडलेलं वाक्य " भाषेच्या अभिवृद्धीत महत्वाचा घटक म्हणजे भाषेचे अभ्यासक .

Add Comment