'ओअ‍ॅसिस', फादर आणि मी

'ओअ‍ॅसिसच्या शोधात' ही लेखमाला 'सकाळ'मधून प्रसिद्ध होत होती, त्यावेळचा अनुभव 

कर्तव्य साधना

फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले! मन आनंदानं भरून आलं... एका ऋजू पण तितक्याच कणखर प्रतिभावान  कर्त्या विचारवंत लेखकाचा हा सन्मान! 'ओअ‍ॅसिसच्या शोधात'नं खऱ्या अर्थानं सुरू झालेली ही लेखनयात्रा... तिचा आज सन्मान होतो आहे. ओअ‍ॅसिस. वाळवंटातली हिरवळ. 

१९९३-९४ ची गोष्ट. ‘रविवार सकाळ’ची जबाबदारी नुकतीच माझ्याकडे आली होती. पूर्वीच्या लेखांची उस्तवार लावताना, सॉर्टिंग करताना आमच्या लाकडी कपाटात सर्वात वरच्या फळीवर टाइप केलेले आणि दोऱ्याच्या टॅगनं बांधलेले तीन-चार लेख मला सापडले. पहिला लेख हातात घेतला. झरझर नजर टाकली... लिखाण वेगळंच वाटलं. असं यापूर्वी कधी वाचनात आलं नव्हतं. संपादक विजय कुवळेकर सरांनी मला अंदाज विचारला, “कसं आहे?” 

मी म्हटलं, “वेगळं आहे सर.”

सर स्मित करत म्हणाले, “आपल्याला हे सदर सुरू करायचंय.”

मी पडत्या फळाची आज्ञा मानून पहिला लेख एडिट करायला हातात घेतला. पहिल्या वाचनात न गवसलेला अंत:स्तर उलगडत गेला. 

मध्य-पूर्वेच्या लखलख प्रभावळीनं दिपून तिकडे खेचल्या जाणाऱ्या आणि परतीचा तिळाचा मंत्रच जाणून बुजून विसरणाऱ्या पिढीच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारं प्रवासवर्णन. प्रवासवर्णन, तरीही प्रवासवर्णन नाही. एक चिंतन. मी पुरती भारावले. हे काहीतरी वेगळंच लिखाण आहे, याची ओळख आणि जाहिरात चांगलीच करायला हवी. आणखी दोन वेळा लेख वाचला. याचा essence नीटच उतरायला हवा. भारावलेपणानं इंट्रो लिहिला आणि

लेखाला शीर्षक दिलं, 'सोन्याचा पिंजरा'. दुसरा लेख सजला 'राहिले दूर घर माझे..या शीर्षकाने... लेखमालेच्या नावासाठी संपादकांकडे गेले.

सर, यावर लेखकाने सदराच्या नावासाठी इंग्लिश शब्द वापरलाय..चांगलं वाटेल का?”

सर म्हणाले, “ त्यातून अर्थ पूर्ण ध्वनित होणार असेल तर जरूर ठेवा.” आणि पुढे वर्षाखेरीपर्यंत एक पराकोटीची लोकप्रिय ठरणारी लेखमाला सुरू झाली, ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’.

ही लेखमाला संपादित करणं हा एक विलक्षण संपन्न करणारा अनुभव असे. त्याचे इंट्रो देणं हे तर अतिशय आव्हानात्मक काम होतं. या मजकुराच्या प्रवाहात वाहत जाताना एका भारावलेपणानं मी शीर्षक आणि इंट्रो देत असे.. अतिशय वेधक, लालित्यपूर्ण, अध्यात्माचा अंत:स्तर असलेल्या मजकुराला न्याय देण्याचा ताण असे, तोही किती आनंददायी! 

ज्ञानाच्या-कलेच्या अमरत्वाचा वेध घेणाऱ्या लेखाला वाचता वाचता कुसुमाग्रजांच्या ‘कैलासलेण्या’चा संदर्भ स्मरल्यानं दिलेलं ‘पण दीप्तीला अंत नसे..’ हे शीर्षक, व्हॅटिकन मधल्या मायकेल अ‍ॅंजेलोच्या परीसस्पर्शानं मंतरलेल्या सिस्टीन चॅपलविषयीच्या लेखाला ‘देवाचं बोट’ आणि फ्रान्समधील ‘स्पर्शोत्सवा’बद्दलच्या लेखाला ‘शब्देवीण संवादिते’ अशी काही शीर्षकं दिलेली आजही आठवतायत. लेखकाचा पिंड, त्याचं व्यक्तिमत्व लक्षात घेऊन त्याचा मजकूर सजवण्याचं एक प्रशिक्षणच ‘ओअ‍ॅसिस’मुळे मिळत होतं. मात्र हा लेखक ख्रिस्ती धर्मगुरू आहे यापलीकडे काही व्यक्तिगत  माहिती नव्हती. ती मिळण्याचं कारण नव्हतं. त्यामुळे हे संपादनाचं काम तसं लेखनातून दिसणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या अंदाजानंच मार्ग काढत धाडसानं करावं लागत होतं.

एके दिवशी एक फोन आला. मी मीटिंगला जायच्या गडबडीत होते. ऑपरेटर कडून ट्रान्सफर झाला.

“थोडी माहिती हवी होती. ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’ या रविवार सकाळ मधल्या मालिकेचं काम कोण पाहातं आहे?”

मला एकाएकी प्रचंड ताण आला. काय चुकलं ते कळेना..

“काय हवं होतं आपल्याला?” मी थोडं सावधगिरीनं विचारलं.

“अं..” समोरची व्यक्ती जरा घुटमळली..

“म्हणजे एडिटिंगची जबाबदारी कोण सांभाळतं आहे?”

“मीच पाहाते..”

“आणि शीर्षकं ..आणि इंट्रो?” या माणसाला नेमकं काय पाहिजे याचा अंदाज येईना.

“मीच. काय काम आहे?”

“अतिशय अप्रतिम शीर्षकं आहेत.. फार सुंदर प्रतिक्रिया येतायत..” 

“कोण बोलताय आपण?”

“ मी फादर ब्रिटो”

“ब्रिटो? म्हणजे... दिब्रिटो?”  माझा कानावर विश्वास बसेना! मी खात्री करून घेण्यासाठी परत विचारलं.

“हो दिब्रिटो! ताई, गैर मानू नका. तुमच्या आवाजावरून तुम्ही लहान वाटता. मला वाटलं कोणी सीनिअर हे सदर संपादित करत असतील..” मी निस्तब्ध झाले. भरूनच आलं एकदम. लेखकाकडून थेट मिळालेली ही पावती.

माझी आणि फादरची ही पहिली ओळख. ‘ओअ‍ॅसिस’नं इतिहास घडवला. प्रकाशनपूर्व आवृत्ती संपली. ‘ओअ‍ॅसिस’ला त्यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट वाड्मय  पुरस्कारानं गौरवलं गेलं. फादरनी तिथेही या सदराच्या संपादनाचं, समजून उमजून वाचकांसमोर मांडलेल्या मजकुराचं, शीर्षकांचं आणि सारांशात्मक इंट्रोचं कौतुक केलं. या सदराच्या लोकप्रियतेत याचा मोठा वाटा आहे असंही  सांगितलं. मला वाटतं, ओअ‍ॅसिसच्या प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेतही त्यांनी माझं नाव आवर्जून घातलं. पंचविशी-तिशीच्या उंबरठ्यावर मला मिळालेला हा शुभंकर आशीर्वादच होता! 

फादरची आणि माझी ओळख होऊन आज पंचवीस वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. संपादक आणि लेखक अशी झालेली ओळख तेवढ्यापुरती कधीच मर्यादित राहिली नाही. मी पत्रकारिता सोडली. पण फादरचं-माझं नातं तुटलं नाही...आम्ही बोलत राहिलो...

फादर हक्कानं त्यांचं लिखाण सततच मला नजरेखालून घालायला पाठवत राहिले. ‘तू पाहिलंस एकदा, की मी निश्चिंत असतो’. असं त्यांचं म्हणणं. मीही हक्काहक्कानं फादरना काहीबाही सांगत राहिले. बर्थ डे विश.. लेकीचं केंब्रिजला जाणं.. माझ्या 'भाषा'चे कार्यक्रम..

फादर माझ्या एका फोनवर अतिशय प्रेमानं ‘भाषा’च्या ‘कथायात्रा’ महोत्सवाला आले. ‘Translations and Migrations’या विषयावर मी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आम्ही केलं. ‘बायबल’चं सुरेल, सुगम मराठी भाषांतर करणाऱ्या या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते या ‘भाषांतर’विषयक परिषदेचं उद्घाटन होणं हीच किती मोठी गोष्ट होती! संध्याकाळी बालगंधर्वच्या ‘कथायात्रा’च्या कार्यक्रमात ‘माझी संघर्षगाथा’ या शीर्षकाखाली केवळ धार्मिक गुरू म्हणून मनोऱ्यात न राहता रस्त्यावर उतरून अन्यायाविरोधात लढणाऱ्या या फादर दिब्रिटो नामक लढवय्या कार्यकर्त्याची जीवनकहाणी मुलाखतीतून उलगडली..

सतत मायेची पाखर घालणारा, नवं घर बांधलं तेव्हा आवर्जून घरी येऊन राहाणारा, घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करणारा, आजही कधी ताण आला तर मी खुशाल केलेला फोन घेत प्रेमानं “स्वाऽती! Everything will be alright. I will pray for you!” म्हणणारा, दर नववर्षी न चुकता फोन करून ‘Blessings आणि Prayers’ माझ्यापर्यंत पोचवणारा हा माझा घरचा माणूस किती मोठा आहे याची प्रचिती येत गेली.

फादरच्या जिव्हाळ्याचे, मायेचे झरे आज पंचवीस वर्षांनंतरही माझ्यासाठी असेच झुळझुळत राहिले आहेत. अजूनही काहीही कारण नसताना, फक्त आठवण आली म्हणून महिन्या दीड महिन्यातून माझं फादरशी बोलणं होतं... “तुझी गाठ वसईच्या शाळेच्या संचालकांशी घालून देतो आहे..” ते आवर्जून सांगतात. तुझी ‘रस्ता’ गोष्ट वाचताना कोकरू खांद्यावर घेऊन परतणारा धनगर पाहून मला येशूची आठवण आली... ते म्हणतात... माझे डोळे पाण्यानं डबडबतात... एक मायेचं अस्तर आणि प्रार्थनेचं वलय आपल्याभवती आहे, म्हणून मी निश्चिंत होत जाते.

‘ओअ‍ॅसिस’चं माझ्यावर फार मोठं ऋण आहे.

- स्वाती राजे

swatijraje@hotmail.com

(लेखिका, प्रादेशिक भाषांच्या जतन-संवर्धनासाठी गेली 12 वर्षे काम करणाऱ्या 'भाषा' (BHAASHAA)  या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, त्याआधी दशकभराहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता केली आहे.)

हे ही वाचा - माझी संस्था : भाषा - स्वाती राजे 

Tags: Swati Raje Literature फादर फ्रान्सिस दिब्रिटो स्वाती राजे साहित्य अनुभव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Load More Tags

Comments:

Dr.S.B.Patil

Very nice experience with legendary author.

Add Comment