लाखो दलितांचे उद्धारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या हयातीतच मराठवाड्यातील परभणी येथील पाथरी गावच्या, मातंग समाजातील देवीदासराव नामदेवराव कांबळे नावाच्या एका स्वयंघोषित तरुण पुढाऱ्याने आव्हान दिले होते. ‘मी मातंग समाजातील पाहिला शिकलेला विद्यार्थी आणि मातंग समाजाचा भावी पुढारी असून मातंग समाजातील सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शीरावर आहे’ असा अभिनिवेश कांबळेंच्या लेखनात स्पष्ट दिसतो. गंमत म्हणजे कांबळेंनी बाबासाहेबांना पत्राचे उत्तर देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. ह्या मुदतीत उत्तर न दिल्यास थेट वेगळा मार्ग निवडण्याचा इशारादेखील दिला होता. काबळेंनी त्याही पुढची मजल गाठत "उत्तर संक्षिप्त देऊ नका. सविस्तर देणे" अशी तळटीप देखील लिहून ठेवली होती. कांबळेंच्या ह्या पत्रामुळे बाबासाहेबांचे मन दुखावले असावे. पण तरीही आपला तोल ढळू न देता त्यांनी हे पत्र आपल्या जनता ह्या पत्राच्या दिनांक १४ जून १९४१ च्या अंकात छापले. आणि विशेष म्हणजे त्याच अंकात थेट अग्रलेख लिहून अतिशय संयत भाषेत, मुद्देसूद आणि खुमासदार उत्तरदेखील दिले.
तडाखेबंद सुरुवात, कांबळेंनी उपस्थित केलेल्या एकेका मुद्याला वास्तविक उत्तर, आणि अभिनिवेशी भाषेला उपहासाने दिलेले चोख प्रत्युत्तर ही या अग्रलेखची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. ठिकठिकाणी वक्रोक्ती आणि अतिशयोक्ती यांचा अगदी मुक्तहस्ते वापर करून बाबासाहेबांनी कांबळेंना अगदी जेरीस आणले. त्यांचे तिरकस बाण वाचकाला गालातल्या गालात हसवल्याशिवाय राहत नाहीत. एरवी कठोर व धीरगंभीर वाटणारे बाबासाहेब अंतर्यामी किती संवेदनशील व विनोदी स्वभावाचे होते याचे सुरेख दर्शनच ह्या अग्रलेखात घडते. चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांनी या संदर्भात “या पत्रातून बाबासाहेबांचा महारेतर जातीतील समाजसेवकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण कसा होता व तो तसा का होता याचेही चित्र पाहावयास मिळते.” अशी मार्मिक टिपण्णी केली आहे. (संदर्भ: चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी संकलित-संपादित केलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर चरित्र - खंड ८)
काल परवाचे कांबळे थेट बाबासाहेबांचा उत्तराधिकारी होण्यासाठी बाबासाहेबांच्या हयातीतच उतावीळ झाले होते. त्याबद्दलही महाभारतातल्या द्रोण-अर्जुनाचा दाखल देऊन एक बारीकसा चिमटा बाबासाहेब कांबळेंना काढतात. "डॉ.आंबेडकर हे केवळ महार समाजासाठी नव्हे तर सर्व अस्पृश्यांसाठी काम करतात, स्वतंत्र मजूर पक्षात महार-महारेतर भेद नाही" अशी निःसंदिग्ध ग्वाही बाबासाहेब देतात. अग्रलेखाचा समारोप करताना मांगांनी आपली उन्नती करताना महारांशी काडीमोड करून केवळ सनातनी हिंदू आणि काँग्रेस यांची गुलामगिरी करण्याची चूक करू नये, असे बाबासाहेब आंतरिक तळमळीने सांगतात. मात्र “आपण उत्तर सविस्तर आले पाहिजे, असे फर्मावल्यामुळे संक्षिप्त लिहिता आले नाही" अशी कोपरखळी मारूनच अग्रलेखाचा समारोप करतात.
संकलन आणि भाष्य :
स्वप्निल गायकवाड, नाशिक
ईमेल : sggaikwad1975@gamial.com;
(लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कार्यरत आहेत.)
दे. ना. कांबळे (मातंग) यांचे पत्र
ॐ
पाथ्री, ३०-५-४१
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस देवीदास बुवा पाथ्रीकर याचा सादर प्रणाम.
वि. वि. लिहिण्यास कारण की, आपणांस पत्र पाठवून पूर्ण खुलासा करून घेण्याचा माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून विचार आहे. याबद्दलचा सोक्षमोक्ष तो काय आताच करून घ्यावा व मनातील खुडखुडी काढून टाकावी असे वाटले म्हणून आपणास हे पत्र पाठवीत आहे. हे पूर्ण वाचून, विचार करून, खरे उत्तर देणे. जर पत्राचे उत्तर आले नाही तर आपण विलायतेस जाताना १७ पानांचे पत्र गांधीस पाठविले होते, पण गांधीने अधिकाराच्या मदाने, अहंकाराने किंवा तुच्छतेने आपणास निष्काळजीपणाने उत्तर दिले नाही, त्या वेळी आपणास जसे वाईट वाटले व गांधीबद्दल आपणास जसा तिरस्कार उत्पन्न झाला त्यापेक्षाही हजारपट तिरस्कार मला आपणाबद्दल उत्पन्न होईल.
मी निजाम इलाख्यातील मराठवाडा भागातील मातंग समाजातील शिकलेला पहिला विद्यार्थी असून मातंग समाजातील सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे. मी आपणास सामान्य विद्यार्थी या नात्याने पत्र पाठवीत नसून निजाम स्टेटच्या मातंग समाजाचा भावी पुढारी म्हणून पत्र पाठवीत आहे. म्हणून आपण उत्तर देण्यास अनमान करू नये.
मातंग समाज व महार समाज यांमध्ये देव-दानवासारखे हाडवैर आहे व आपापसात वैर, तिरस्कार, द्वेष, मत्सर आणि वाईट भावना आहेत त्याची कारणे-
(१) महार समाज मातंग समाजास तुच्छ व हलका समजतो. (२) मातंग समाज डुकरास पवित्र मानतो व ते जनावर शूर व मर्द असल्यामुळे त्याची (रानडुक्कर) शिकार करतो, पण महार समाज मुसलमानापेक्षाही डुकरास अपवित्र समजतो. ह्या व इतर क्षुल्लक कारणांवरून आपसात विनाकारण झगडे होतात. (३) मातंग समाजास मराठ्याप्रमाणे सर्वजण व लग्नसमारंभ व मिरवणुकी काढण्याचा हिंदू धर्मशास्त्रदृष्ट्या अधिकार आहे, म्हणून ज्या वेळी मातंग लोकांचा नवरदेव गावामधून घोड्यावरून मारुतीला जातो त्या वेळो महार लोक त्याला वेशीमध्ये अडवतात व पंचारतीमध्ये भुंकतात. यामुळे भयंकर मारामारी होऊन डोकी फुटतात व वैरभाव वाढतो. (४) कोणतीही सुधारणेची गोष्ट मांग लोक करीत असता महार लोक ती करू देत नाहीत व ती हाणून पाडण्यासाठी कसून विरोध करतात. म्हणून मांग व महार यांचे वाकडे आहे. (५) लोकसंख्येच्या मानाने महार लोकांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक गावी महारांची जास्त आबादी आहे व मांगांची कमी आहे. जर लोक महारांच्या मनाप्रमाणे न वागले तर महार लोक विनाकारण त्रास देतात व त्यांना वाटते की, ज्याप्रमाणे हिंदू लोकांची गुलामगिरी अस्पृश्य समाज करतो, त्याप्रमाणे मातंग समाजाने महार समाजाची गुलामगिरी करावी. (६) अस्पृश्य समाजात शिकलेले व पुढे गेलेले महार लोक आहेत, हे स्वार्थी व आपमतलबी असून इतर समाजातील लोकांस पुढे जाण्यास व सुधारण्यास वाव देत नाहीत. याची साक्ष म्हणजे जितक्या बोर्डिंग्ज आहेत, त्यात महार विद्यार्थ्यांचाच भरणा जास्त आहे. जितके एम. एल. ए. आहेत ह्यात महार मेंबरांचाच भरणा जास्त आहे. फक्त नावाकरिता काही ठिकाणी कळसूत्री बाहुल्यांसारखे मांग मेंबर निवडले असून ते बिनबुडाच्या भांड्याप्रमाणे आहेत. (७) आपणाबद्दल मातंग समाजात असा गैरसमज उत्पन्न झाला आहे की, आपण स्वतः महार समाजाच्या कल्याणाची जास्त काळजी घेता. दुसऱ्या समाजाची तितकी घेत नाही. म्हणून मातंग परिषद मध्यप्रांताने आंबेडकर फक्त महार समाजाचे पुढारी आहेत, मातंग समाजाचे नाहीत असा ठराव पास केला. (८) आपली वृत्ती जो प्रथम येऊन (शिकायत) करील त्याचीच बाजू न्यायाची आहे अशी मानणारी असल्यामुळे प्रथम महार समाजातील लोक आपल्याकडे येतात व आपण त्यांची बाजू उचलून धरता. म्हणून इतर समाजास आपण पक्षपाती आहात असे भासते व आपण महार समाजाचे हितचिंतक आहात असे वाटते.
जर आपणास अस्पृश्य समाजाचे खरे कल्याण करावयाचे असेल व महार व मातंग समाज यांची एकी करून सांगड घालून नवा मार्ग आखावयाचा असेल तर खालील शर्तीवर विशेष लक्ष घालणे व त्याप्रमाणे मनःपूर्वक लक्ष देऊन कार्य करणे. कारण महार समाज आपणास देवतुल्य मानतो व आप्ला शब्द प्राणाचे पण लावून पूर्ण करण्याचा कसून प्रयत्न करतो.
माझ्या मनाने ज्याप्रमाणे नॉर्मन (Norman) आणि सॅक्सन (Saxon) यांच्या मिश्रणाने रिचर्ड लायन हार्ट यांच्या कारकीर्दीत या परस्परविरुद्ध जातींच्या संमीलनाने अर्वाचीन धैर्यशाली, वीर्यशाली व सुधारलेली इंग्रज जात निर्माण झाली त्याप्रमाणे करावी की जिचे नाव ऐकताच सर्व जातींवर व समाजावर दरारा बसावा, जिचा धर्म व कर्म इतरांहून भिन्न असावा, यासाठी आपण खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे.
[(१) हा मुद्दा गाळलेला दिसतो.] (२) मातंग समाजास महार समाजाने बरोबरीच्या व समानतेच्या नात्याने व बंधुभावाने वागवावे. (३) मातंग समाजातील होतकरू मनुष्याला पुढे येण्यास वाव द्यावा. (४) मातंग लोकांचा नवरदेव वेशीमध्ये अडवू नये व समारंभ व मिरवणुकी यामध्ये अडथळे आणू नयेत. (५) महार समाजाने मातंग लोकांकडून कोणत्याही प्रकारचे वतनदारीसंबंधीचे हक्क घेऊ नयेत (जसे महार लोक हिंदू समाजाकडून घेत असत) (६) आपण महार समाजाच्या सुधारणेची जशी काळजी घेता तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त कळकळ मातंग समाजाबद्दल घेणे. कारण आपण महार समाजामध्ये जन्मला असल्यामुळे आपणावर जातीयतेचा आरोप येतो व म्हणूनच आपण महारांचेच हितचिंतक आहात अशी कोल्हेकुई होते. (८) डुकराबद्दल महारांच्या मनात तिरस्कार व इतर क्षुल्लक कारणांवरून झगडे, द्वेषभाव निर्माण करणारी जी साधने आहेत ती मिटविण्याची व आपापसात प्रेम व बंधुभाव निर्माण करणाऱ्या साधनांची योजना करणे. (८) श्रद्धेने व अज्ञानाने महार समाज आपणास ईश्वरी अवतार मानून आपल्या फोटोचे पूजन करतात व आपणाशिवाय दुसरा कोणी होणारच नाही असा बुद्धिमंतास वाव न देणारा समज करून घेतात, तो मला पसंत नाही व हे अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण मी मातंग समाजास करू देणार नाही.
जर या सर्व अटी मान्य असतील व आपणास अखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे पुढारीपण करावयाचे असेल तर मी आपला शिष्य होण्यास तयार आहे. आपल्या व्याख्यानावरून 'मी गेल्यावर कसे होईल?' ही काळजी आपल्याला वाटत आहे ती आपल्या कृपेने मी दूर करीन व आपल्या मनाप्रमाणे सूर्य्य करून दाखवीन. म्हणून उत्तर पूर्ण विचार करून आपल्या स्वाक्षरीने देणे. मी १५ दिवस वाट पाहीन. उत्तर न आले तर मी असे समजेन की, आपला मार्ग निराळा व माझा मार्ग निराळा. म्हणून अवमान न करता आपले मत, विचार सविस्तर पत्र पाठवून खुलासा करणे. कारण अजून एक महिन्यानंतर हैद्राबाद दलितवर्ग परिषद हैद्राबादी आंबेडकर बी. एस. व्यंकटराव यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे व मी मातंग समाजाचा प्रतिनिधी या नात्याने जाणार आहे. म्हणून लवकरच महार व मांग यांच्या भावी जीवनाबद्दल खुलासा करणे किंवा एकदम वेगवेगळे गट करणे. पण असे अर्धवट इकडे ना तिकडे, कच्चे ना पक्के ठेवू नये, कळावे.
आपला कृपाभिलाषी,
देवीदासराव नामदेवराव कांबळे
ताः पाथ्री, मैहलामाळी वाडा, जि. परभणी (निजाम स्टेट)
नोट : पूर्ण पत्र वाचणे व पूर्ण विचार करून अनमान न करता उत्तर देणे. मी आतुरतेने वाट पाहत आहे. उत्तर संक्षिप्त देऊ नका. सविस्तर देणे. नाहीतर तुमचा-आमचा मार्ग भिन्न.
____________________________________________________________________________________________
सदर पत्रास बाबासाहेबांचे उत्तर-
एका मातंग गृहस्थाच्या पत्रास उत्तर
रा. रा. देवीदासराव नामदेवराव कांबळे यांस अनेक, आपणास काय मायना लिहावा याबद्दल मी बुचकळ्यात पडलो आहे. नमस्कार म्हणावा तर आपण दोघेही ब्राह्मण नाही, जोहार म्हणावा तर आपण मांग, फरमान म्हणावे तर मी महार, आशीर्वाद म्हणावा तर मांगाला आशीर्वाद देणारा महार श्रेष्ठ कोण असा अपवाद यायचा, म्हणून काहीच न लिहिता चांगदेवासारखी कोरी जागा ठेवून, आपल्या पत्राचे उत्तर देत आहे. महार समाज व महार पुढारी मातंग जातीवर अन्याय करीत आहेत त्याबद्दल आपल्या मनातील 'खुडखुडी' (मला वाटते, खुमखुमी या मराठी शब्दाचा हा निजामशाही अपभ्रंश असावा) काढून टाकण्याकरिता व एकदाचा 'सोक्षमोक्ष' करून घेण्याकरिता पत्र लिहिण्याचे योजिले, यात आपण काहीच वावगे केले नाही. आपण मला 'परमपूज्य' या शब्दसमुच्चयाने संबोधिले आहे, त्याबद्दल मी आपला फारच ऋणी आहे. महार लोक नेहमीच 'परमपूज्य' हे विशेषण लावून मला संबोधितात. पण त्यात विशेष असे काही नाही. महारांनी महाराची स्तुती केली, याला काय किंमत? आपण मांग आणि मी महार असूनही आपण मला 'परमपूज्य बाबासाहेब' म्हणालात यातले प्रेम आणि त्याचे स्वारस्य काही और आहे. इतके की, ते सांगता नये.
माझ्या पत्राचे उत्तर न दिल्यामुळे मी गांधींचा तिरस्कार करतो, हा आपला गैरसमज कोणी करून दिला, ते मला समजत नाही. गांधींचा मी तिरस्कार करीत असलो, तरी त्याची कारणे दुसरी आहेत. माझ्या पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही हे नव्हे. मला आपल्याप्रमाणे अनेक लोक पत्र लिहितात. पण त्यांना कधी उत्तर देण्याचा क्रम मी ठेवलेला नाही. याबद्दल पुष्कळ लोकांस वाईट वाटते, पण ते त्यामुळे माझा तिरस्कार करीत नाहीत. त्यांना ठाऊक आहे की, मी रात्रंदिवस कामात असतो. मला शानशौक, ऐषाराम माहीत नाहीत. नाटक, सिनेमात मी वेळ घालवीत नाही. माझा धंदा, वाचन किंवा सार्वजनिक कार्य या व्यवसायात मी सतत गुंतलो आहे. मला गांधींसारखे सेक्रेटरी नाहीत. माझे काम मलाच करावे लागते. हे जाणूनच पत्र लिहिणारे माझे मित्र, माझे सहकारी मला क्षमा करतात, माझा तिरस्कार करीत नाहीत. 'उत्तर न दिल्यास मी तुमचा तिरस्कार करीन' असे आपण जे म्हटले आहे, ते मनुष्यस्वभावास धरूनच आहे. आपली योग्यता काय आहे, हे मला माहीत नाही. 'मी निजाम इलाख्यामधील मराठवाडा विभागातील मातंग समाजातील शिकलेला, सर्वात पहिला विद्यार्थी आहे' असे आपले वर्णन आपण केले आहे. तिरस्कार करण्याची पाळी यावी हे वाईटच, पण आपण केवळ विद्यार्थीच असता तर आपल्या तिरस्काराची फारशी मातब्बरी वाटली नसती. पण आपण बजावले आहे की, 'मातंग समाजाच्या सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे. मी आपणास सामान्य विद्यार्थी या नात्याने पत्र पाठवीत नसून निजाम स्टेटच्या मातंग समाजाचा भावी पुढारी म्हणून पत्र पाठवीत आहे. म्हणून आपण उत्तर देण्यास अनमान करू नये' ज्यू लोकांमध्ये जसा मोझेस तसे मातंग समाजात आपण आहात, हे आपल्या भाषेवरून उघड आहे. आपल्या पत्राला कोण उत्तर देणार नाही? आपल्या मनात माझ्याविषयी तिरस्कार उत्पन्न झाला, तर सर्व मातंग समाज माझा तिरस्कार करू लागेल. तो टाळला नाही तर तो माझ्या अनर्थाला कारणीभूत होणार नाही, असे कोण म्हणेल? मला तरी म्हणता येणार नाही. तो टाळण्याकरिता माझा शिरस्ता मोडून मी आपल्या पत्राचे उत्तर देत आहे.
पहिल्या प्रथम दोन गोष्टींबद्दल आपले आभार मानल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. महार लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही असा समज करून घेतात, यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे, तो आपण कृतीत आणावा, अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. मी समतेचा मोठा भोक्ता, नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही, असे सांगून थकलो. पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही. आपण मांग लोकांना माझ्या फोटोची पूजा करू देणार नाही, हे तर चांगलेच आहे. मांग लोकांनी अवस, पुनव, ग्रहण मागण्यापेक्षा माझ्या फोटोचे पूजन करणे वाईट आहे, याबद्दल मला काही संदेह नाही. आपण आपली दृष्टी संकुचित केली आहे, याबद्दल मला वाईट वाटते. आपण महार लोकांतूनही हे माझ्या फोटोपूजनाचे खूळ नाहीसे करण्याचे व्रत पत्करले पाहिजे, असे आपल्याला सांगणे मला आवश्यक वाटते. हा आपला मोठाच पराक्रम होईल यात काही शंका नाही. कदाचित एवढा पराक्रम केल्यावर, मातंग समाज आपल्या फोटोची पूजा करू लागेल अशी आपल्याला भीती वाटत असेल, तरी भीती बाळगू नये. आपल्या फोटोची पूजा करण्याची प्रथा माझ्या फोटोची पूजा करण्याच्या प्रथेइतकी कधीच वाईट, दुष्परिणामी होणार नाही.
दुसऱ्या एका अभिवचनासाठीही मी आपला आभारी आहे. मी मेल्यावर कसे होईल, अशी चिंता मी अनेक वेळा प्रसिद्ध केली आहे, हे खरे आहे. महारांपैकी एकाही तरुणाला मला सांगावयाला हिंमत झाली नाही की, "काही हरकत नाही, तुम्ही मरा, आम्ही चालवू." आपले अभिवचन वाचून आमचे समाधान झाले. द्रोणाने कौरव-पांडवांना धनुर्विद्या शिकविल्यानंतर "मला गुरुदक्षिणा कोण देईल?" असा प्रश्न केला. त्याला कोणीच उत्तर देईना. गुरू काय मागतो, कोण जाणे ! प्राण मागतो की काय ? अशा भयाने सगळेच गप्प बसले. एकट्या अर्जुनाला धैर्य झाले. तो म्हणाला, "मागा काय मागावयाचे आहे ते, मी देतो.” द्रोणाच्या ठायी मी व अर्जुनाच्या ठायी आपण आहात असे वाटून माझ्या मागून कोणीतरी आहे, या विश्वासाने मला शांती वाटते. द्रोणाने पण केला होता की, राजा द्रुपदाला शिष्याहाती धरून आणीन म्हणून, तसे ब्राह्मण्य नष्ट करणे हा माझा पण आहे. तो माझ्या आयुष्यात माझ्या हातून पुरा होणे शक्य नाही. आपण तो पुरा करण्यास सिद्ध आहात, हे माझे मी मोठे भाग्य समजतो व त्याबद्दल मी आपले आभार मानतो. ही गोष्ट जर आपल्याला करता आली तर मांग जातीला इतिहासात मोठे स्थान प्राप्त होईल. नमनाला फारच तेल गेले! आता आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत आहे आपले आरोप दोन प्रकारचे आहेत. काही माझ्यावर व्यक्तिगत लागू असणारे असे आहेत. बाकीचे महार समाजाला लागू असणारे असे आहेत. माझ्यावरचा प्रत्यक्ष आरोप काय आहे हे मला अजूनही समजले नाही. मी फक्त महारांचाच पुढारी आहे, असा मध्यप्रांतातील मांग लोकांनी ठरावरूपाने केलेला माझ्यावरचा आरोप मी वृत्तपत्रांतून वाचला आहे. त्यांतील विधानासंबंधाने मी ता. ४ जानेवारी १९४१ च्या जनतेत लिहिले आहे, ते आपण अवश्य वाचून पाहावे. मी महारांचाच पुढारी ही काँग्रेसची ओरड, त्याची री मांगांनी ओढली. असे किती पोटार्थी मांग-महार आहेत की, जे पैशासाठी वाटेल ते करतील? 'पुणे करार' झाला, त्या वेळी काँग्रेस मला 'सर्व हिंदुस्थानातील अस्पृश्यांचा पुढारी' म्हणून मान्य करीत असे. त्यानंतर मी नुसता मुंबई इलाख्यातील अस्पृश्य लोकांचा पुढारी आहे, असे म्हणू लागली, त्यानंतर नुसत्या महारांचा पुढारी आहे, असे म्हणू लागली. माझी खात्री आहे की, काही दिवसांनी मी कोकणस्थ महारांचाच पुढारी आहे व त्यानंतर मी दापोली तालुक्यातील महारांचा पुढारी, असा प्रचार काँग्रेस करील व त्याला महारांतूनच माणसे सापडतील असे म्हणावयास हरकत नाही. कोणौही काँग्रेसला विरोध करून पाहावा, म्हणजे मी म्हणतो त्याची सत्यता कळेल. चांभारांतील एखादा पुढारी काँग्रेसला विरोध करायला निघू द्या, म्हणजे हाच मासला दिसून येईल. तो दाभोळ्या जातीचा असला, तर तो चांभार जातीचा पुढारी नसून दाभोळ्या जातीचा पुढारी आहे, असे ते म्हणतील. हरळ्या जातीचा. असला तर हरळ्यांचा पुढारी म्हणतील आणि चेवल्यांच्या जातीचा असला तर चेवल्यांचा पुढारी म्हणतील. मांगामध्ये काही १२ पोटजाती आहेत, असे मला समजते. मांगामध्ये काँग्रेसला विरोध करणारा कोणी पुढारी निघाला तरी त्याचीदेखील तीच गत होणार. तो ज्या जातीचा, त्या जातीचा पुढारी, असा गिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती मला माहीत असल्यामुळे महारांचा पुढारी म्हटल्याने मला काही नवल वाटत नाही. शिवाय बाकीच्यांनी माझे पुढारीपण सोडले आणि नसते महारांनी मानले, तर त्यात काही खेद करण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. कोठे तरी कार्य करण्यास संधी असल्यास पुरे. महारांची दुर्दशा काही कमी नाही. नुकत्याच महाराष्ट्र प्रांतिक हरिजन सेवक संघाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टात 'सर्वांत महारांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे', असे कबूल केले आहे. त्यांची दुस्थिती नाहीशी करण्याची मला संधी राहिली तरी परे आहे असे मानून काम करण्याची माझी तयारी आहे. 'नामके वास्ते आणि कामके वास्ते' असे दोन प्रकारचे पुढारी आहेत. मी नामके वास्ते असलेल्या पुढाऱ्यातला नाही. मला काम पाहिजे. मी पुढारी आहे. मी समाजसेवक नाही. पुढारी या नात्याने चालना देणे, लोकमत तयार करणे, एवढेच माझे काम आहे. त्यात मी जातिभेदाला जागा दिली असे कोणीही माझा शत्रूदेखील म्हणणार नाही. मी अस्पृश्य जातीतील सर्वांघरी जेवलो आहे. अस्पृश्यांत सहभोजन व्हावे, सहविवाह व्हावा याचा पुरस्कार मी केला आहे. आणि सहविवाह जरी जारी झाला नसला, तरी चांभार लोक सहभोजनाला तयार नहीत, पण महारमांगात, महारभंग्यांत सरसहा सहभोजन सुरू आहे. हा माझ्या शिकवणुकीचा परिणाम आहे. असे मी निर्भयपणे म्हणू शकतो. माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभांतून महारांपुरते ठराव कधीच पास झालेले नाहीत, मी महार जातीचे भांडण भांडलो नाही आणि या भांडणांतून जो लाभ झाला त्यातला मोठा भाग महारेतर जातींनी घेतला हेही सिद्ध करून देता येईल. मी जी बोर्डिंगे काढली त्यात जातिभेद कधीच ठेवला नाही, इतर महारांनी जी काढली त्यात त्यांनीही जातिभेद ठेवलेला माझ्या कानावर आलेला नाही.
स्वतंत्र मजूर पक्ष हा महारांचा पक्ष आहे, असे म्हणण्यात येते. परंतु ते खोटे आहे. स्वतंत्र मजूर पक्षात महार-महारेतर असा भेद नाही. स्वतंत्र मजूर पक्ष जात पाहत नाही, गुण पाहतो. गुणाला उतरला तर त्याला त्याच्या लायकीची जागा स्वतंत्र मजूर पक्षात मिळू शकते. राजकारण हे काही पंक्तिभोजन नव्हे. मांग कोणी नाही म्हणून मांग घ्या, भंगी कोणी नाही म्हणून भंगी घ्या, असा नियम स्वतंत्र मजूर पक्ष मानीत नाही. कोणताही राजकीय पक्ष मानू शकणार नाही. नुसत्या शिक्षणाला राजकारणांत काही महत्त्व नाही. 'मी मॅज्युएट आहे, मला कौन्सिलात घ्या' हा नियम स्वतंत्र मजूर पक्षाला कबूल नाही. कोणाही राजकीय पक्षाला तो नियम मान्य होऊ शकणार नाही. राजकारणात शिक्षण पाहिजे, पण शिक्षणापेक्षा शीलाची जास्त जरुरी आहे. स्वतंत्र मजूर पक्ष जात, शिक्षण, शील या तिन्ही गोष्टी पाहून कौन्सिलचे उमेदवार ठरवतो. अस्पृश्यांचे भांडण भांडण्याकरिता स्वतंत्र मजूर पक्ष उभा केला आहे, त्यात एखाद्या मांगाला जागा मिळाली नसेल, तशी अस्पृश्यांतील नाशिक जिल्ह्यातील एक सधन व कार्यकर्त्या अमृतराव रणखांब्यासारख्या माणसाला व सातारा जिल्ह्यातील एका सधन गृहस्थाला स्वतंत्र मजूर पक्षात जागा मिळाली नाही. यावरून स्वतंत्र मजूर पक्ष मांगांच्या व चांभारांच्या विरुद्ध आहे, असे म्हणण्यात काही अर्थ नाही. स्वतंत्र मजूर पक्ष नालायकांच्या विरुद्ध आहे, मग ते कोणत्याही जातीचे असोत. मांग-चांभार स्वतंत्र मजूर पक्षात नसले म्हणून मांग जातीचे किंवा चांभार जातीचे काही नुकसान झाले आहे, असे मला दिसत नाही. स्वतंत्र मजूर पक्ष महारांचा असला तरी तो महारांकरता भांडत नाही, तो भांडतो साऱ्या अस्पृश्यांकरता. भांडणामुळे जो लाभ होतो, त्याचे वाटप करणे हे त्याच्या हाती नाही. ते हाती आहे काँग्रेसच्या. महारांच्या पदरात शून्य, असे वाटप जर कॉग्रेसने केले नाही, तर ती काँग्रेस कसली? स्वतंत्र मजूर पक्षाने हानी केली असेल तर ती महारांचीच. आपण, महार लोक मांगांवर जुलूम करतात असे लिहिले आहे. तो प्रकार आमच्याकडे नाही. आमच्याकडे उलट प्रकार आहे. चांभारांनी, मांगांनी काही खोडी काढली तरी महार गप्प असतात. त्यांना ठाऊक आहे की, मी या बाबतीत त्यांचा पक्ष घेणार नाही आणि आपण बहुसंख्यांक आहोत तेव्हा सोसले पाहिजे, अशी जबाबदारी त्यांना वाटते. आपल्याकडे उलट प्रकार आहे, याबद्दल खेद वाटतो. महारांविरुद्ध निजाम सरकारकडे दाद मागावी अगर आपण सत्याग्रह कंरावा. त्याला माझा पाठिंबा राहील.
शेवटी येंव करा, त्येंव करा नाहीतर तुमचे-आमचे मार्ग भिन्न अशी आपण जी निकराची भाषा वापरली आहे. तिच्यासंबंधी दोन शब्द लिहिणे आवश्यक आहे. अशी भाषा आपण वापरली नसती तर बरे झाले असते. गोवेकरीण जशी वाटेल तेव्हा अडते किंवा बेगुमान झालेली बायको उल्या, पुल्या करून 'घे मेल्या तुझे मंगळसूत्र' (असे म्हणून) तोडावयास तयार होते. मग कंटाळून 'जाव जहन्नमें' असे म्हणण्याची पाळी (नवऱ्यावर) येते, तसा प्रकार होऊ देणे बरे नाही. भिन्न मार्गाने जावयाचे असेल तर जावे. त्याला मी हरकत करू शकणार नाही किंवा त्याबद्दल मी काही उदास होऊन मला जे करावयाचे ते बंदही करणार नाही. मात्र भिन्न मार्ग कोणता याचा विचार करून मग तो पत्करावा. मांगांची उन्नती करून त्यांचा स्वाभिमान जागृत करणे, हा या भिन्न मार्गाचा उद्देश असेल तर तो स्तुत्य आहे. पण महारांशी काडीमोड करून, केवळ सनातनी हिंदू किंवा काँग्रेस यांची गुलामगिरी करणे, हाच जर या भिन्न मार्गाचा उद्देश असेल, तर त्यात काही मांग व्यक्तींचा लाभ होईस, पण त्यात 'मांग जातीचा' अनर्थ आहे, यात मला तरी काही शंका नाही. तरी मर्जीनुसार मार्ग चोखाळणे. पत्र बरेच लांबले, पण आपण उत्तर सविस्तर आले पाहिजे, असे फर्माविल्यामुळे संक्षिप्त लिहिता आले नाही.
ता. १३-६-४१
आपला कृपाभिलाषी,
(सही) भीमराव रामजी आंबेडकर
Tags: babasaheb ambedkar dr ambedkar ambedkar डॉ. आंबेडकर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर जनता अग्रलेख 1941 महार मातंग asprushya अस्पृश्यता जातिभेद आरोप प्रतिवाद महार -मांग भेदाभेद पत्र प्रतिसाद Load More Tags
Add Comment