फ्रान्समधील दंगली आणि काळा-गोरा समाजवाद

फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूल्यांची सांगड विविधतेशी घालण्याची गरज फ्रान्सच्या बुद्धिजीवी वा सत्ताधारी वर्गाला वाटत नाही, त्यातून हा वांशिक संघर्ष फ्रान्सच्या वाट्याला आला आहे.

indiatoday.in

‘आतले आणि बाहेरचे’ हा प्रश्न आजही फ्रान्समध्ये धुमसत असतो. त्यातून हा हिंसाचार उसळला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन मूल्यं फ्रेंच क्रांतीने मानवजातीला दिली, हे अर्धसत्य आहे. कारण ही तिन्ही मूल्यं मुळात राष्ट्रवादाशी जोडलेली होती. फ्रान्स वगळता सर्व युरोपियन देशांत राजेशाही होती. जॅकोबिन क्लबनी नेपोलियनच्या आक्रमणाचं स्वागत केलं होतं. ‘राजेशाहीपासून, चर्चपासून मुक्ती देण्यासाठी आपण आक्रमण करतो आहोत’ अशीच नेपोलियनची धारणा होती. फ्रेंच क्रांतीतील या साम्राज्यवादी राष्ट्रवादाकडे अनेक धुरीणांचं दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे आजही फ्रेंच संस्कृतीचा अभिमान असणारे फ्रेंच लोक आफ्रिकनांचा तिरस्कार करतात.

इजिप्तवर स्वारी करण्यापूर्वी नेपोलियन बोनापार्ट आपल्या सैन्याला म्हणाला, “सैनिकहो, तुम्ही आज जो विजय मिळवाल त्याचे परिणाम अतिशय दूरगामी असतील, त्याच्या लाभ-हानीचा हिशेब करणं अशक्य असेल.” 1799 साली नेपोलियनने केलेली ही भविष्यवाणी आज शब्दशः खरी ठरली आहे. 

डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणारा नाहेल हा 17 वर्षांचा अल्जिरीयन मुलगा एक कार चालवत होता. पॅरीसच्या एका उपनगरात ही कार पोलिसांनी थांबवली, कारण बससाठी राखीव असलेल्या मार्गिकेमधून ती जात होती. त्याच्या डोक्यावर पिस्तुल रोखून पोलिसांनी त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं. फ्रान्समध्ये 17 वर्षांच्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जात नाही. त्यामुळे असेल कदाचित; परंतु नाहेलने कार सुरु केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसाने पिस्तुल झाडलं आणि नाहेल ठार झाला. ही घटना घडली 27 जूनला. नाहेलकडून गुन्हा घडला होता, परंतु त्यासाठी त्याला मिळालेली शिक्षा भीषण होती. संबंधित पोलिसाला अटक करण्यात आली.  

मात्र या घटनेनंतर फ्रान्समध्ये दंगली उसळल्या. दंगेखोर दुकानांना, इमारतींना, वाहनांना आगी लावू लागले. खासगी आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले करू लागले. दोन आठवडे फ्रान्स अक्षरशः जळतो आहे. 

अल्जिरीया, मोरोक्को, ट्युनिशिया या तीन आफ्रिकन देशांतून आलेले काही लाख लोक फ्रान्समध्ये स्थायिक झाले आहेत. त्यापैकी दुसर्‍या पिढीतील स्थलांतरितांची संख्या सुमारे 29 टक्के आहे. नेपोलियनने इजिप्तवर स्वारी केल्यानंतर अल्पकाळ इजिप्त व सिरीया फ्रान्सच्या अधिपत्याखाली होते. अल्जिरीया तर फ्रान्सची वसाहतच होती. त्याशिवाय मोरोक्को आणि ट्युनिशिया हेही फ्रान्सच्या वर्चस्वाखाली होते. भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावरील हे देश आफ्रिका खंडात आहेत. पहिल्या महायुद्धात फ्रेंच सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जिरीया या देशांतले लाखो सैनिक लढले होते. मात्र युरोप आणि अमेरिका (गोरे) वगळता अन्य सर्व समाज मागासलेले, अप्रगत आहेत. परंपरेच्या जाळ्यात अडकून कुंठित झालेले आहेत अशीच आधुनिक युरोपची समजूत होती आणि आजही मोठ्या प्रमाणावर आहे. फ्रान्समध्ये उसळलेल्या हिंसाचाराबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क कार्यालयाने आपल्या अधिकृत निवेदनात असं म्हटलं आहे की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांमध्ये खोलवर रुजलेल्या वंशवादाच्या समस्येचं निराकरण करण्याची संधी फ्रान्सला मिळाली आहे. 

हेन्री एस्टीयर यांच्या बीबीसीवरील वृत्तांतानुसार, 2012 ते 2020 या काळात फ्रान्सच्या सुरक्षा दलांचे 36 सैनिक आपलं कर्तव्य बजावत असताना मारले गेले आहेत. सुमारे 5000 जखमी झाले आहेत. नाहेलची हत्या ही अपवादात्मक घटना नाही, कार थांबवली नाही म्हणून गेल्या वर्षी 13 व्यक्ती पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्या आहेत. प्रत्येक हत्येनंतर असंतोष उसळतो. 2005 मध्ये दोन परदेशी नागरिक पोलीसांच्या भयाने इलेक्टिक सबस्टेशनमध्ये लपायला घुसले आणि शॉक लागून मेले. त्यावेळी एवढ्या भीषण दंगली उसळल्या की, देशात आणीबाणी जाहीर करावी लागली होती. या खेपेलाही दोन आठवडे फ्रान्समध्ये हिंसाचार सुरु आहे. 

‘असोसिएटेड प्रेस’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेला हा नकाशा पाहा. फ्रान्समधील जवळपास प्रत्येक मोठ्या शहराच्या उपनगरांत रातोरात दंगली सुरु झाल्या. फ्रान्समध्ये शहर आणि उपनगर यांच्यात फरक असतो. ज्याला सिटी सेंटर वा शहराचं केंद्र म्हणतात, तिथे सर्व आर्थिक व्यवहार केंद्रीत झालेले असतात. तिथे सुबत्ता असते; शाळा, महाविद्यालयं, सांस्कृतिक केंद्रं असतात. उत्तम निवासी इमारती असतात. याउलट उपनगरांमध्ये गरीबी असते. तिथली निवासी व्यवस्था निकृष्ट दर्जाची असते. तिथे बेकारी, दारिद्र्य, अंमली पदार्थ, गुन्हेगारी टोळ्या यांचं पालनपोषण होतं. तिथे शाळाही नसतात, असं बीबीसीचा वृत्तांत सांगतो. या वस्त्यांमध्ये उत्तर आफ्रिकेतून आलेले स्थलांतरीत राहतात. त्यांना हरघडी वंशद्वेषाचा, हेटाळणीचा सामना करावा लागतो. त्यातून येणारं नैराश्य, संताप, चीड यांचा कधीतरी स्फोट होतो, असं समाजशास्त्रज्ञ सांगतात. 

फ्रान्सच्या क्रांतीदरम्यान बॅस्तीलचा पाडाव झाला त्या घटनेला 14 जुलै 2023 रोजी 234 वर्षं पूर्ण होत आहेत. वास्तविक फ्रेंच क्रांती एका रात्रीत वा एका दिवसांत घडलेली नाही. अमेरिकन राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये क्रांती होणं अटळ होतं. फ्रान्सच्या राज्यकर्त्यांनी अमाप पैसा इंग्लंडच्या विरोधात लढण्यात खर्च केला होता. सोळाव्या लुईने अमेरिकन राज्यक्रांतीला पैसा पुरवला. फ्रान्सच्या आर्थिक मदतीशिवाय अमेरिकन राज्यक्रांती अशक्यच होती, असं काही इतिहासकारांचं मत आहे. ह्या खर्चामुळे फ्रान्सची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. कॅथॉलिक चर्च आणि उमराव यांच्याकडे बहुतेक सर्व जमीन आणि संपत्ती होती. त्यांना करातून सूटही देण्यात आली होती. त्यामुळे राज्य चालवण्याचा भार बहुसंख्य गरीबांवर होता. 

आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की, राजवाड्याचा खर्च निघत नव्हता. त्यामुळे करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय लुईने घेतला. त्याच्या अर्थमंत्र्याने राजीनामा दिला तेव्हा फ्रान्सचा राजा सोळावा लुई हताशपणे म्हणाला, “मला राजीनामा देता येत नाही.” 

अमेरिकेची राज्यघटना प्रसिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांनी फ्रान्सच्या जनतेने राजाच्या विरोधात बंड केलं. बास्टीलचा तुरुंग आंदोलकांनी फोडला तेव्हा सोळाव्या लुईने विचारलं, “हे बंड आहे का?” त्यावर त्याचा एक मंत्री उत्तरला, “नाही महाराज, ही क्रांती आहे.”

तिसर्‍या महिन्यातच हजारो उपाशी महिला व्हर्सायच्या राजवाड्यावर मोर्चाने आल्या. ‘आमच्या मुलांना पाव द्या’, अशा घोषणा त्या करत होत्या.  त्याच वेळी राणीने ते जगप्रसिद्ध उत्तर दिलं—‘पाव मिळत नसेल तर केक खा.’

क्रांतीचे चटके बसू लागल्यावर लुईला समजून चुकलं की, आपला अंत जवळ आलाय. ‘ते माझा खून करणार नाहीत तर मृत्युदंड देण्याचा वेगळाच मार्ग शोधतील’ असं तो एका दरबार्‍याला म्हणाला. ह्या काळात सोळावा लुई इंग्लंडचा इतिहास वाचत होता. इंग्लंडमध्ये पहिल्या चार्ल्सच्या वेळी जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती फ्रान्समध्ये होतेय, अशी लुईची समजूत होती. त्यामुळे चार्ल्सने केलेल्या चुका आपण कशा टाळायचा याचा तो विचार करत होता. “राजाला कदाचित सोडतीलही ते, पण मी तर परदेशी. मला नक्कीच ठार करतील,” राणी म्हणाली. ‘पण माझ्या गरीब बिचार्‍या मुलांचं काय होईल?’ असा प्रश्न राणीला पडला होता.

अखेरीस राजाला कोर्टापुढे उभं करण्यात आलं आणि मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. एक दिवस राजाने आपल्या कुटुंबासोबत घालवला. ‘उद्या पुन्हा भेटू’ असं म्हणून तो आपल्या कोठडीत गेला. दुसर्‍या दिवशी गिलोटीनवर त्याची मान धडावेगळी करण्यात आली. गिलोटीन चालवणार्‍याने राजाचं मुंडकं केसाला पकडून उंच धरलं, त्यावेळी जमावाने क्रांतीचा जयजयकार केला. 

काही दिवसांनी राणीला — मारी आंत्वानेनला — गिलोटीनवर चढवण्यात आलं. राणीने सफेद रंगाचा पोषाख केला होता. तिला गिलोटीनकडे नेताना लोक शिव्याशापांचा वर्षाव करत होते. हसत होते. गिलोटीनवर चढवणार्‍यांकडे तिने क्षमायाचना केली. चर्चच्या कळसाकडे पाहून म्हणाली, “मी आता नवर्‍याला भेटायला जाते.” काही क्षणात तिचं शिर जमिनीवर पडलं.

त्यानंतर गिलोटीनने क्रांतीकारकांचीही मुंडकी उडवली. विचारवंतांनी भले क्रांतीला प्रेरणा दिली असेल, वैचारिक आशय दिला असेल, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या मूल्यांची द्वाही फिरवली असेल; पण क्रांतीची सूत्रं जमावाच्या हाती गेली होती. क्रांती आपल्या पिलांना खाऊन टाकते, हा वाक्प्रचारही फ्रेंच राज्यक्रांतीमुळे प्रचारात आला. त्यानंतरही फ्रान्समध्ये राजकीय स्थैर्य नव्हतं. मात्र 'बॅस्तील'चा तुरुंग लोकांनी फोडला तो दिवस—14 जुलै 1889, हा क्रांतीदिन मानला जातो.

18 व्या आणि 19 व्या शतकात युरोपची राजकीय, आर्थिक, आणि सांस्कृतिक सत्ता जगभर दृढ झाली. तिच्या द्वारा आधुनिकतेचे (मॉडर्निझम) लोण जगभर पसरले. इतर समाज—उदाहरणार्थ भारतीय, चिनी, इस्लामी इत्यादी समाज—आधुनिक समाजाच्या विरोधात पारंपरिक समाज ठरले. ‘या समाजातील अनेक विचारवंत धुरिणांनाही आपापल्या समाजात सुधारणा केली पाहिजे ही गोष्ट मनोमन पटली’ असं मे. पुं. रेगे यांनी नोंदवलं आहे. या काळात नेपोलियने इजिप्तवर स्वारी केली होती. युरोपियन संस्कृतीचं श्रेष्ठत्व आणि इस्लामी वा आफ्रिकन संस्कृतीबद्दलचा तिरस्कार नेपोलियनमध्ये आणि नेपोलियनच्या सैन्यात भिनला होता. मात्र आधुनिकतेला साजेशी अभ्यासाची परंपराही होती. त्यामुळे ‘इजिप्टॉलॉजी’ नावाचं शास्त्र फ्रेंच अभ्यासकांनी विकसित केलं. अरबांना सुसंस्कृत करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. प्रत्यक्षात या सर्व फ्रेंचांच्या वसाहती होत्या. 

नेपोलियनने इजिप्त पादाक्रांत केला 1799 मध्ये, 1830 सालात फ्रेंच सैन्याने अल्जिरीया ताब्यात घेतला. तिथून उत्तर आफ्रिकेत फ्रेंचांचा शिरकाव झाला. साम्राज्यवादी शोषण सुरु झालं. तेव्हापासून उत्तर आफ्रिकेचा इतिहास, भाषा, साहित्य, संस्कृती यांचा अभ्यास युरोपने सुरु केला. आजही ती परंपरा कायम आहे. आल्बेर काम्यू हा फ्रेंच लेखक अल्जिरीयन होता. आपण फ्रेंच आहोत की अल्जिरीयन हा गुंता त्याला सोडवता येत नव्हता. त्याने फ्रेंच संस्कृती आत्मसात केली होती मात्र तो जन्माने आणि संस्कृतीने अल्जिरीयन होता.

युरोपात तीन सांस्कृतिक आंदोलनं झाली. पहिलं ‘रेनेसां’ वा पुनर्जन्माचं. या काळात ग्रीक आणि रोमन संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला. ख्रिश्चन धर्माने नाकारलेल्या ऐहिक जीवनाला ग्रीक-रोमन संस्कृतीच्या प्रेरणेने मध्यवर्ती स्थान देण्यात आलं. हा आविष्कार कलेच्या क्षेत्रात झाला. राफाएल, मायकेल एंजेलो, लिओनार्दो दा व्हिन्ची हे रेनेसांचे शिल्पकार होते. त्यानंतर ‘रिफॉर्मेशन’ वा धर्मसुधारणेचं आंदोलन झालं. कॅथॉलिक चर्च हे ख्रिश्चन श्रद्धेचं विश्वस्त होतं. बायबलचा अर्थ लावण्याचा अधिकार केवळ चर्चला होता. गुटेनबर्गने छपाईयंत्राचा शोध लावल्यानंतर बायबल मागास भाषांमध्ये म्हणजे इंग्लिश, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषांमध्ये अनुवादित झालं. बायबलचा अर्थ लावण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे, कॅथॉलिक चर्च हे पाखंड आहे असं मार्टिन ल्यूथर किंगने जाहीर केलं. तिथून प्रॉटेस्टंट धर्माची स्थापना झाली. त्यानंतरचं आंदोलन होतं ‘एनलायटन्मेंट’ वा ज्ञानोदय. त्याचा प्रवक्ता होता, आयझॅक न्यूटन. निसर्गाचे नियम असतात, हे नियम सजीव आणि निर्जीवांना सारखेच असतात. त्या नियमांचा अभ्यास, निरीक्षण आणि प्रयोगांनी करायचा असतो. हा अभ्यास प्रसिद्ध करायचा जेणेकरून पृथ्वीच्या पाठीवर कुठेही त्यांचा पडताळा घेता येईल, असं न्यूटनने मांडलं. त्यातून तंत्रज्ञान विकसित झालं. जेवढं सूक्ष्म ज्ञान, तेवढं प्रगत तंत्रज्ञान रचता येतं. प्रगत तंत्रज्ञान रचल्याने उपभोग्य वस्तूंचं भरपूर उत्पादन करता येतं. त्यांचा उपभोग घेतल्याने मानवी जीवन सुखी होतं, हा आहे युरोपातील मन्वंतराचा अर्थ. 

फ्रान्समधील राज्यक्रांती दलित-श्रमिकांनी केली; परंतु त्याचं नेतृत्व मध्यमवर्गाकडे म्हणजे वकील, वैज्ञानिक, व्यापारी, उद्योजक यांच्याकडे होतं. त्यांच्यासाठी कार्ल मार्क्सने ‘बुर्ज्वजी’ हा शब्द वापरला. मार्क्सवादाचे नियम न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे विश्वव्यापी आहेत अशी मार्क्सवाद्यांची धारणा आहे. त्यामुळे जगातील सर्व समाजांत मध्यमवर्ग पुरोगामी असतो अशीही मार्क्सवाद्यांची धारणा आहे. 


हेही वाचा : काही संस्कृती इतरांपेक्षा अधिक चांगल्या असाव्यात - युवाल नोआ हरारी


युरोपशिवाय अन्य संस्कृती जेव्हा या दृष्टीतून आपल्याकडे पाहतात तेव्हा त्या स्वतःलाच परक्या होतात. आपली संस्कृती म्हणजे सुधारावी अशी एक वस्तू आहे असं त्यांना वाटतं. आपल्या संस्कृतीला वस्तूरुपात पाहिल्यामुळे त्या स्वतःची आविष्कारशीलता गमावतात. हाच पेच आल्बेर काम्यूला पडला होता. फ्रान्सची संस्कृती आत्मसात करून त्याने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि अल्जिरीयापासून तो दुरावला. भारतातील अनेक पुरोगामी फ्रेंच राज्यक्रांतीची तत्त्वं विशेषतः धर्मनिरपेक्षता वा ‘सेक्युलॅरिझम’चं तत्त्व भारतातही तसंच्या तसं लागू करावं असा आग्रह धरतात. तेव्हा ते वास्तविक भारतीय संस्कृतीपासून तुटलेले असतात, दुरावलेले असतात. 

उत्तर आफ्रिकेतून फ्रान्समध्ये स्थायिक झालेले लाखो लोक धर्माने मुस्लीम आहेत. ताज्या घटनेत मारला गेलेला कोवळा मुलगाही अल्जिरीयन होता. तो मुस्लीम होता की नाही, याचा शोध मी घेतलेला नाही. परंतु तो अल्जिरीयन होता म्हणून फ्रान्समध्ये दंगली पेटल्या. उत्तर आफ्रिकेतून आलेले मुस्लीम मागासलेले आहेत, त्यांनी फ्रेंच संस्कृती आत्मसात केलेली नाही म्हणून ते दंगेधोपे करतात अशी सर्वसामान्य फ्रेंच लोकांची धारणा आहे. फ्रेंच राज्यक्रांतीत राजा, उमराव, धर्मगुरु यांना ठार करण्यात आलं. कारण लोकांच्या शोषणात राजासोबत चर्चही सामील होतं. त्यामुळे क्रांतीपश्चात फ्रान्समध्ये असा कायदा करण्यात आला की, कोणत्याही सार्वजनिक स्थळी म्हणजे सरकारी कार्यालयं, शाळा वा महाविद्यालयं इथे कोणीही कोणत्याही धर्माचं एकही चिन्ह वा प्रतीक अंगावर बाळगता कामा नये. उत्तर आफ्रिकेतून स्थलांतरित झालेले लाखो लोक मुस्लीम होते. आज फ्रान्समध्ये दीड हजारापेक्षा जास्त मशिदी आहेत. काही मुस्लीम मुली हिजाब घालून शाळेत गेल्या तेव्हा शाळा आणि महाविद्यालयांनी त्यांना बडतर्फ केलं. 1989 मध्ये या मुद्द्यावरून फ्रान्समध्ये जनक्षोभ उसळला होता. अनेक वर्षं हा प्रश्न धुमसत होता. न्यायालयाने शाळा-महाविद्यालयांचा निर्णय रद्द केला आणि मुस्लीम मुलींचा हिजाब घालून शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 

पोलिसांच्या गोळीने झालेल्या नाहेलच्या मृत्यूमुळे सुरु असलेली आंदोलने

मात्र ‘आतले आणि बाहेरचे’ हा प्रश्न आजही फ्रान्समध्ये धुमसत असतो. त्यातून हा हिंसाचार उसळला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन मूल्यं फ्रेंच क्रांतीने मानवजातीला दिली, हे अर्धसत्य आहे. कारण ही तिन्ही मूल्यं मुळात राष्ट्रवादाशी जोडलेली होती. ‘आपण एका राष्ट्राचे नागरिक आहोत म्हणून आपण समान आहोत. राजा, उमराव, धर्मगुरू यांना विशेषाधिकार असता कामा नयेत, आपण सर्व नागरीक आहोत म्हणून सर्वांना सारखंच स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आपल्यामध्ये बंधुता असायला हवी. कारण जन्माधिष्ठीत विषमता आता संपुष्टात आली आहे’ या विचारधारेचा प्रसार करणारे ‘जॅकोबिन क्लब’ युरोपातील अनेक देशांत स्थापन झाले होते. फ्रान्स वगळता सर्व युरोपियन देशांत राजेशाही होती. या जॅकोबिन क्लबनी नेपोलियनच्या आक्रमणाचं स्वागत केलं होतं. ‘राजेशाहीपासून, चर्चपासून मुक्ती देण्यासाठी आपण आक्रमण करतो आहोत’ अशीच नेपोलियनची धारणा होती. फ्रेंच क्रांतीतील या साम्राज्यवादी राष्ट्रवादाकडे अनेक धुरीणांचं दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे आजही फ्रेंच संस्कृतीचा अभिमान असणारे फ्रेंच लोक आफ्रिकनांचा तिरस्कार करतात.

औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाची पद्धत बदलली. उपभोग्य वस्तूंचं ठोक उत्पादन होऊ लागलं. त्याआधी विकेंद्रीत उत्पादन पद्धती होती. विकेंद्रीत उत्पादन पद्धतीला अनुरुप अशी विकेंद्रीत राज्य व्यवस्था होती. त्यामध्ये सरदार वा उमराव यांची सत्ता होती. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन, वितरण आणि उपभोग यांची केंद्रीय व्यवस्था उभी राहिली. साहजिकच, त्याला साजेशी राज्यव्यवस्था अटळ होती. त्यामुळे सरदार, त्यांची स्वायत्त राज्यं, सैन्यं इतिहासजमा झाली. केंद्रीय सत्ता म्हणजे अर्थातच राष्ट्र-राज्य व्यवस्था अस्तित्वात येऊ लागली. उत्पादन-वितरण-उपभोग यांच्या केंद्रीय व्यवस्थेमुळे एकजिनसी वस्तूंची निर्मिती होऊ लागली. ‘मॅक्डोनाल्ड’ या रेस्त्रांच्या साखळीमधील प्रत्येक रेस्त्रामध्ये ‘बर्गर’ वा ‘फ्रेंच फ्राईज’ची चव सर्वत्र तीच असते. अमेरिकेत, ब्रिटनमध्ये वा भारतात. औद्योगिक संस्कृती एकजिनसी समाजाची निर्मिती करते.

डॉ. राममनोहर लोहिया यांनी ‘समाजवाद : काळा-गोरा’ अशी मांडणी केली होती. भांडवलशाही आणि समाजवाद हे दोन्ही युरोपियन संस्कृतीचे आविष्कार आहेत. या दोन्ही व्यवस्था अविकसित असलेल्या बिगरयुरोपियन राष्ट्रांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत. भारताने, विशेषतः आशियाने आपला वेगळा समाजवाद सिद्ध करायला हवा, अशी मांडणी डॉ. लोहियांनी केली होती. कारण आशियायी देशांमध्ये विकेंद्रीत अर्थव्यवस्था, विकेंद्रीत राज्यव्यवस्था आजही अस्तित्वात आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या आधुनिक मूल्यांची सांगड विविधतेशी अर्थातच विकेंद्रीत अर्थ-राज्य व्यवस्थेशी घालायला हवी हा लोहियांच्या विचारांचा कंद आहे. महात्मा गांधींच्या विचाराला आधुनिक परिभाषेत मांडण्याचा प्रयत्न डॉ. लोहिया करत होते. त्यात त्यांना यश मिळालं की नाही, हा वेगळा मुद्दा आहे. परंतु फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूल्यांची सांगड विविधतेशी घालण्याची गरज फ्रान्सच्या बुद्धिजीवी वा सत्ताधारी वर्गालाही वाटत नाही ही समस्या आहे. त्यामुळे वांशिक संघर्ष फ्रान्सच्या वाट्याला आला आहे. विविधतेला सामावून कसं घ्यायचं हा धडा फ्रान्सने भारत सोडा पण इंग्लंडकडून तरी शिकायला हवा. फ्रेंच राष्ट्रवाद वा हिंदू राष्ट्रवाद दोघांनाही आपापल्या देशातील विविधतेला सामावून घेता येत नाही. 

- सुनील तांबे
suniltambe07@gmail.com

(लेखक,  मुक्त पत्रकार असून राजकीय-सांस्कृतिक घडामोडींचे भाष्यकार आहेत.)  

Tags: फ्रान्स वंशवाद वांशिक भेदभाव वर्णभेद वसाहतवाद समाजवाद आंतरराष्ट्रीय घडामोडी इतिहास युरोपियन संस्कृती सुनिल तांबे sunil tambe Napolean socialism fundamentalism cast race racism france international affairs rammanohar lohiya mahatma gandhi Load More Tags

Comments: Show All Comments

Ujwala Mehendale

मी उज्ज्वला मेहेंदळे. आपण साधना दधिचच्या घरी भेटलो होतो. मला तुमचे लेखन नेहमीच आवडते. तुमचे इंडी. Journal वरचे व्हिडिओ देखील मी आवर्जून पाहते.

sharmishtha Kher

मार्टिन लुथर किंग ही अजून एक गफलत. केवळ मार्टिन लुथर हवे.

शर्मिष्ठा खेर

रेनेसाँ आणि पुनर्जन्म ? भलतीच गफलत आहे .

अनिल कोष्टी

लेख आवडला. खूप सखोल विश्लेषण केले आहे.

दीपक पाटील

इंग्रजांची इंग्रजी भाषा ही जग जोडणारी ठरली आहे. तदवत् सेक्युलरीजम् सर्व वंशांना..धर्मांना जोडणारा किमान कार्यक्रम आहे,तो भारतात लागू होणारा नाही व आपण संस्कृतीपासून तुटू हे तर्क पटत नाहीत. बदलासाठी..संमिश्रासाठी जोड गरजेचाच..कलम गरजेचंच ! मग काप ही बसणारच ना... एकूण लेख उत्त्तम पण परिघावर फिरणारा...गाभ्यापासून समदूर वाटला.

Sadhana Dadhich

I completely agree with Meghnad kulkarni comment. Dr.Lohiya and Gandhi truly standout.

डॉ अनिल खांडेकर

फ्रांस मधील दंगली -- त्या मागील कारणे आणि उपाय योजना यांचा आढावा घेतला आहे. मार्मिक आणि नेमक्या शब्दात मांडणी केली आहे. सर्वच यूरोपियन देशात मोरोक्को , अल्जीरिया , ट्यूनिशिया अशा देशातून आलेले शेकडो लोक राहतात . त्याच बरोबर पूर्व युरोपातून -- रशियन जोखडातून परागंदा झालेले लोक पण आहेत . ही सर्व मंडळी फ्रांस , ब्रिटन , जर्मनी इत्यादि देशातील स्थानिक लोकांपेक्षा आचार विचाराने वेगळे आहेत . आर्थिक, सामाजिक , शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत आहेत . नोकरी धंदे नाहीत . त्यात धर्म पण वेगळा आहे. अशा वेळी इतर यूरोपियन देशांनी त्यांना बर्‍या पैकी सामावून घेतले . परंतु फ्रांस मध्ये वेळोवेळी दंगली का उफाळून येतात ? हा प्रश्न आहे. कट्टर धार्मिकता आहे का ? नोकरी धंदे -शिक्षण यातील रस्सीखेच आहे का ? दोन्ही समाज घटकांमधील असहिष्णुता आहे का ? फ्रांस या यूरोपियन देशात फ्रेंच भाषा येत नसेल तर - अनुभव चांगला नाही .

Nitin Wagh

मा. सुनील सर, अतिशय महत्त्वाचा आणि सविस्तर मांडणी असणारा लेख आहे. राष्ट्रवाद हा विविधता समजावून घेत नाही, हे निरिक्षण वर्तमानातील सगळ्याच देशांना लागू होते. उत्कृष्ट लेख. नितिन भरत वाघ

Meghnad Kulkarni

In depth analysis. Thought provoking. Original. That is Sunil Tambe

Add Comment