श्रेणीबद्ध समाजाच्या संदर्भात सावित्रीबाईंचे चरित्र

अरुणा दिवेगावकर लिखित 'सावित्रीबाई फुले - संपूर्ण जीवनचरित्र'

सावित्रीबाई फुले या व्यक्तिमत्त्वाची चर्चा महाराष्ट्रात खूप उशिरा म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास सव्वाशे वर्षानंतर सुरू झाली ही वस्तुस्थिती आहे. याला कारण महाराष्ट्रातील सर्वणांची मानसिकता. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रातील बहुजनांसमोर  १९६०-७० पर्यंत अजिबात आलेले नव्हते.  १९९२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जनशताब्दी वर्ष आणि फुलेंच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने या दोघांची चरित्रे हिंदीत प्रकाशित करायचा निर्णय त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला. आणि त्याच काळात फुले दांपत्यावर मराठीतून भरपूर लिहून आलं आणि त्याच वेळी हिंदीतून देखील या दोघांसंबंधीची चर्चा सुरू झाली.  त्यामुळे १९६० च्या पूर्वीच्या पिढीला या दोघांच्याबद्दलची फारशी माहिती नव्हती. पश्चिम महाराष्ट्रात सत्यशोधक समाज सर्वत्र गेलेला असल्यामुळे तेथे मात्र यांच्याबद्दलची माहिती बहुजनांना  होती. पण मराठवाडा आणि विदर्भात मात्र फारशी माहिती नव्हती .

मला फार चांगलं आठवतंय की,  १९६५ मध्ये मी प्राध्यापक म्हणून ज्यावेळी लातूरला आलो, त्यावेळी कित्येक वर्षं कुठल्याही वर्तमानपत्रात महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीबद्दल किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल फारसं लिहिलं जात नव्हतं.  ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाबदेखील आहे. 

साधारणपणे १९८० नंतर त्यांची चरित्रे येऊ लागतात. माझ्या संग्रही कुलवंता बाई झोडगे यांचे ‘सावित्रीबाई फुले’, राजाराम सूर्यवंशी यांचे ‘युगस्त्री सावित्रीबाई फुले’ ) व मा. गो. माळी यांची दोन पुस्तके आहेत. त्यात सावित्रीबाई फुले : कार्य आणि कर्तृत्व आणि सावित्रीबाई फुले : समग्र वाङ्मय ही पुस्तकेही आहेत. याशिवाय सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेक छोटी मोठी चरित्रे लिहिली गेलेली आहेत. इतकी चरित्रे असताना देखील पुन्हा सावित्रीबाईंच्यावर लिहावं असं अरुणाबाईंना का वाटलं असावं हा पहिला प्रश्न.

त्याचे उत्तर असे आहे की, भूतकाळात जे महामानव / महान स्रिया होऊन जातात, ज्या कणखर  मनाच्या स्त्रिया होऊन जातात, त्यांची चरित्रे प्रत्येक काळात येणे गरजेचे असते. कारण जी चरित्रे येतात ती एका  पिढीला त्यांची माहिती देऊन जातात. मात्र नव्या पिढीस त्यांचा परिचय होणे अत्यंत गरजेचे असते. अशा चरित्र लेखनामागे हा एक उद्देश असतो. पण हा एवढा एकच उद्देश नसतो. त्याशिवाय चरित्र लेखनाचे आणखीन तीन-चार उद्देशही  असतात.

एक- त्या महामानवाने / त्या स्रीने जी स्वप्ने पाहिलेली असतात ती आपण प्रत्यक्षात किती उतरवली याचा धांडोळा घेण्यासाठी असे  चरित्र लेखन आवश्यक असते.

दोन-  वर्तमानाची तुलना भूतकाळाशी करण्यासाठी म्हणून देखील चरित्रे लिहिली जातात.

तीन- सामाजिक, सांस्कृतिक  व स्री-पुरुष-समानतेचा आपला प्रवास कुठपर्यंत आलेला आहे, मागच्या पिढीपेक्षा आपण आज कुठे उभे आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे याचा धांडोळा प्रत्येक पिढीला घ्यावा लागतो. तेव्हाच कुठेतरी समाज पुढे जात असतो अशा चरित्रातून प्रेरणा घेऊन पुढील प्रवास व्हावा हा ही उद्देश अशा चरित्र लेखनाच्या मूळात असतो.

चार- आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आजच्या पिढीला आत्मपरीक्षण करायला लावण्यासाठी ही अशी चरित्रे लिहिली जातात; किंबहुना लिहावी लागतात. प्रत्येक पिढीला त्याची गरज असते.

महापुरुषांची खूप चरित्रे  लिहिली गेली पण भूतकाळात ज्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या त्यांच्याबद्दल मात्र पुरुषसत्ताक व्यवस्था ही त्या त्या काळात मौन धारण करून होती आणि नंतरच्या लेखकांनीदेखील त्यावर फारसा काही प्रकाश टाकलेला नाही हे आपल्याला लक्षात येईल. कित्येक क्षेत्रात स्त्रियांनी विलक्षण असे कार्यकर्तृत्व केलेले आहे. पण पुरुषसत्ताक व्यवस्थेने त्याचा फारसा गाजावाजा केलेला दिसत नाही.  कदाचित ही बाब अरुणाजींना  खटकली असावी आणि म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आजच्या पिढीला नव्याने उपलब्ध करून दिलेले आहे.

आजपर्यंत सावित्रीबाई फुले यांची जी चरित्रे लिहिली गेली त्यापेक्षा अरुणाजींच्या या चरित्र लेखनाची वेगळी काही वैशिष्ट्ये आहेत काय, याचा तपास ज्यावेळी मी करू लागतो त्यावेळी मला काही ठळक गोष्टी/ वैशिष्ट्ये जाणवतात.

एक: सावित्रीबाईंवरची आतापर्यंतची जी चरित्रे मी वाचलेली आहेत, ती वर्णनात्मकआहेत. त्या व्यक्तीसंबंधीची जी माहिती लेखकाला मिळत गेली त्यास एका  क्रमाने मांडून ठेवण्यातच त्यांनी धन्यता मानली. पण अरुणाबाईंनी सावित्रीबाई फुले यांचे चरित्र लिहिताना त्या काळची सामाजिक, आर्थिक, राजकीय संस्कृती टिपलेली आहे व त्यासोबत श्रेणीबद्ध समाजाच्या संदर्भात या चरित्राची मांडणी केलेली आहे. किंवा त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्त्व त्या तपासून पाहतात.

दोन: वाचकांना सतत आत्मपरीक्षणासाठी त्या प्रवृत्त करतात. वृत्त करतात. अधे-मधे त्या वाचकांना वर्तमानकाळात घेऊन येतात. वर्तमानकाळात आपला प्रवास कुठपर्यंत आलेला आहे, आणि वर्तमानकाळातल्या स्त्रियांच्या तुलनेत सावित्रीबाई ही किती उजवी ठरते हे त्या पुरावे देऊन सिद्ध करतात. म्हणजे आजची तथाकथित सुशिक्षित स्री व सुशिक्षित सावित्री यांची तुलना त्या कधी अप्रत्यक्षपणे तर कधी प्रत्यक्षपणे करतात किंवा वाचकांना अशी तुलना करण्यासाठी त्या प्रवृत्त करतात. एकविसाव्या शतकातील स्त्री व सावित्रीबाई यांची तुलना नकळत वाचक आपल्या मनात करीत जातो व सावित्री किती संस्कारक्षम व दृढ विचारांची स्त्री होती हे त्याला जाणवत जाते.
या चरित्रलेखनाचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सावित्रीबाई फुले या व्यक्तिमत्त्वाचे अतिशयोक्तीपूर्ण उदात्तीकरण त्या करीत नाहीत. ज्या घटना त्यांच्या जीवनात घडल्या त्या घटनांना त्या कशा सामोऱ्या गेल्या याचा अत्यंत तटस्थपणे त्या वेध घेतात. त्यामुळे सावित्रीबाई फुले म्हणजे कोणी देवी आहे अशा पद्धतीची प्रतिमा तयार न करता ती हाडामांसाची एक स्त्री आहे व एक स्त्री म्हणून ती आपल्या वर्तमानाला कशी सामोरी गेली आणि जे काही भयानक प्रश्न विरोधकांनी तिच्यासमोर उभे केले होते त्यांचा सामना किती धीटपणे तिने केला, याचे त्या अत्यंत तटस्थपणे चित्रण करतात. ही फार जमेची बाजू आहे, असे  मला वाटते.

चौथी महत्त्वाची बाब म्हणजे या लेखनाचे शेवटचे प्रकरण "झंजावाती अखेर". ते आहे केवळ तीन पानांचे. पण यात जी काही माहिती देण्यात आलेली आहे, ती पहिल्यांदा माझ्या वाचनात आली. फुले दांपत्याच्या वंशजाचे पुढे काय झाले याचा आढावा इतर कुठल्याही पुस्तकात दिसून येत नाही. पण यांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक याची माहिती मिळवली. बाबा आढावांनी या संदर्भात जी काही माहिती मिळवली तिचा वापर करून अत्यंत हृदयदावक शब्दांत त्यांनी ही मांडणी केलेली आहे. त्यांच्या मुलाची आणि सुनेची जी काही अखेर झालेली आहे ती वाचताना वाचक सुन्न होऊन जातो. या महामानव दांपत्याला त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या समाजाने व इतरांनी किती प्रकारे त्रास दिला हे त्या समोर आणतात. आज जो माळी समाज फुले दांपत्याचे भांडवल करून राजकारण करत आहे किंवा जागोजागी त्यांचे पुतळे उभे करीत आहे त्यांनी ते जिवंत असताना त्यांच्याशी कसा व्यवहार केला याचा कधी ते विचारच करीत नाहीत. केवळ फुले दांपत्यासोबतच नव्हे, तर अनेकांच्यासोबत हा असा व्यवहार समाज करीत असतो.

अरुणा दिवेगावकरांची गद्य शैली अत्यंत प्रभावी आहे. वाचकांना ती खिळवून ठेवते. सत्यशोधक समाजाने आपल्या काळात अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना घडवलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे. एक वाचक म्हणून अरुणाबाईंना माझी अशी विनंती आहे की, त्यांनी पुढील काळात डॉक्टर रखमाबाई राऊत, तानुबाई बिर्जे, पंडिता रमाबाई यांच्यावर अशी स्वतंत्र पुस्तके तयार करावीत. डॉक्टर आनंदी जोशी यांच्यावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांच्या जीवनावर नाटक लिहिले गेले, कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. पण डॉक्टर रखमाबाई राऊत या बहुजनांच्या असल्यामुळे त्यांचा फारसा उल्लेख कोठे होत नाही आणि बहुजनांतील अनेकांना या झुंजार स्रीविषयी अजिबात माहिती नाही. त्यामुळे डॉ. रखमाबाई राऊत यांच्या संबंधीची सगळी माहिती गोळा करून त्यावर या अशाच खिळवून ठेवणाऱ्या शैलीत त्यांनी पुस्तक लिहावे ही विनंती. पंडिता रमाबाईंवर इंग्रजीतून भरपूर लिहिले गेलेले आहे. मराठीतूनही आहे. या कर्तृत्ववान स्रियांचा पुढच्या पिढीस परिचय व्हावा म्हणून अरुणाजींनी यावर विचार करावा ही विनंती.वर्णव्यवस्थेइतकीच बहुजनांतील पुरुषसत्ताक मानसिकतादेखील त्यांच्या उपेक्षेसाठी कारणीभूत आहे. आणि त्यामुळे एक नवीन दृष्टी घेऊन त्यांनी ज्याप्रमाणे सावित्रीबाईंवर हे पुस्तक लिहिले आहे तशी छोटेखानी पुस्तके या स्त्रियांच्यावरही लिहावी ही अपेक्षा.

महाराष्ट्रातील बहुजन समाजासमोर सावित्रीबाई फुलेंचे चरित्र यायला शंभर-एक वर्षे लागली. तर इतर भारतीय भाषांबद्दल न बोललेलंच बरं. त्यातही हिंदी भाषेत फुले आणि आंबेडकर १९६० नंतर जातात. जरी आंबेडकरांची राजकीय कारकीर्द हिंदी भाषिकांना माहीत असली तरी त्यांच्याबद्दल प्रचंड असे गैरसमज होते व आजही आहेत. फुल्यांच्याबद्दल तर कसलीच माहिती तेथील विचारवंताना नव्हती. त्यामुळे फुलेंसंबंधी अधिकृत अशी पुस्तके हिंदीत जावीत यासाठी मी धडपड करतोय. माझे स्नेही डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी लिहिलेले फुलेचरित्र लवकरच हिंदीत येणार आहे. पण सावित्रीबाईंबद्दल इतकी विस्तृत माहिती देणारे एकही पुस्तक हिंदीत नाही. त्यामुळे या पुस्तकाचा हिंदी अनुवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. हिंदी अनुवाद झाल्यानंतर इतर भारतीय भाषांत सावित्रीबाईंना घेऊन जाणे सोपे जाईल. सावित्रीबाईंचा अवकाश महाराष्ट्राच्या बहुजनांपर्यंत मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतीय भाषांचा अवकाश त्यांना मिळवून देण्याची जबाबदारी येथील संवेदनशील लेखकांची / लेखिकांची आहे, आणि त्यामुळे हे पुस्तक लवकरात लवकर हिंदीत येईल असा प्रयत्न व्हावा. हिंदीत आल्यानंतर त्याला इतर भारतीय भाषांत कसे घेऊन जाता येईल यावर मी भरपूर सहकार्य करू शकेन.

या लेखनाला न्याय देणारी प्रस्तावना डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी लिहिलेली आहे. ही  प्रस्तावना म्हणजे एका अर्थाने सावित्रीबाई फुलेंना समजून घेण्यासाठी निश्चित अशी पृष्ठभूमी त्यांनी तयार केलेली आहे आणि म्हणून या पुस्तकाचे मोल या प्रस्तावनेमुळेदेखील वाढलेले आहे. इतकी महत्त्वाची व विषयाला न्याय देणारी ही प्रस्तावना लिहिल्याबद्दल डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे अभिनंदन!!!

आणि पुन्हा एकदा या चरित्राच्या लेखिका अरुणा दिवेगावकर यांचे अभिनंदन!!

हे पुस्तक अत्यंत आकर्षकरीत्या व दर्जेदार कागदावर प्रकाशित केल्याबद्दल हरिती पब्लिकेशनचे पुन्हा पुन्हा अभिनंदन!! अलीकडे हरिती प्रकाशनाने वैचारिक साहित्य प्रकाशित करून एक नवीन परंपरा प्रकाशन व्यवसायात सुरू केलेली आहे. आतापर्यंतची त्याची पुस्तके पाहता त्यांची सौंदर्यदृष्टी, कागदाचा दर्जेदारपणा, भाषेची शुद्धता या अलीकडील प्रकाशनांत जवळपास सापडत नाहीत त्या बाबी येथे आहेत, म्हणून त्यांचे अभिनंदन!!

------------------------------------------------------

सावित्रीबाई फुले: संपूर्ण जीवन चरित्र

लेखिका: अरुणा दिवेगावकर
प्रकाशक: हरिती पब्लिकेशन, पुणे
पृष्ठे:११२,
मूल्य:  १५०/- रु.

लेखिकेशी संपर्क: 7666509174
------------------------------------------------------

- सूर्यनारायण रणसुभे
संपर्क: 8378080660

Tags: savitribai phule mahatma phule ambedkar phule book review ransubhe arunadevgaonkar Load More Tags

Add Comment