विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमध्ये आपण कितीही पुढे गेलो असलो तरीही या क्षेत्रात महिला वैज्ञानिकांचं प्रमाण तसं पाहता आजही कमीच आहे. यूआयएसच्या म्हणजे युनायटेड इन्स्टिट्यूट फॉर स्टॅटिस्टिक्सच्या माहितीनुसार जगभरातल्या संशोधकांमध्ये महिलांचं प्रमाण हे तीस टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, ही जेंडर गॅप कमी करण्यासाठी खरी गरज आहे ती या आकड्यांपलीकडे जाऊन स्टेममध्ये म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी का आहे याची कारणं समजून घेण्याची.
आपण अगदी अठराव्या शतकापासूनचा कालखंड पाहिला तरी लक्षात येतं की, महिला वैज्ञानिकांना मिळणारी वागणूक ही पुरुष वैज्ञानिकांच्या तुलनेत तशी कमीपणाची होती. वैज्ञानिक जगतामध्ये अत्यंत मानाचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार देताना त्या काळी काही महिला वैज्ञानिकांना डावललंसुद्धा गेलं आहे.
बायोलॉजिकल सायन्सेस या क्षेत्रात मूलभूत संशोधन करून महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मात्र फारशा प्रकाशझोतात न आलेल्या तीन महिला वैज्ञानिकांची ओळख आज विज्ञानदिनाच्या पार्श्वभूमीवर आपण करून घेऊ या...
अमेरिकेत जन्मलेल्या नेटी स्टिवन्स (7 जुलै 1861 ते 4 मे 1912) या जेनेटिक्समध्ये काम करणाऱ्या संशोधक. स्टँफर्ड विद्यापीठात हिस्टोलॉजी (उतिशास्त्र) हा विषय शिकून मग त्यांनी सायटॉलॉजी या विषयामध्ये पीएच.डी. केली. सायटॉलॉजी हा तसा अत्यंत मूलभूत विषय. आपल्या शरीरातलं सगळ्यात महत्त्वाचं युनिट म्हणजे सेल ज्याला आपण पेशी असं म्हणतो. तर या पेशीचा आकार, त्यांचं कार्य या सगळ्याचा अभ्यास सायटॉलॉजी या विषयामध्ये केला जातो. 1900मध्ये मेंडेलने अनुवंशशास्त्रामधला शोधनिबंध प्रकाशित केला. त्यानंतर लॅबमध्ये मिलवर्मवर काम करत असताना नेटी यांचं लक्ष दोन गुणसूत्रांवर गेलं.
हे मिलवर्म्स दोन प्रकारचे स्पर्म्स (शुक्रजंतू) तयार करत होते. त्यात एका स्पर्ममध्ये मोठे गुणसूत्र होते आणि दुसऱ्यामध्ये छोटे. जेव्हा मोठे गुणसूत्र असलेले शुक्रजंतू बीजांड फर्टिलाइझ करायचा तेव्हा मादी संतती उदयास यायची आणि गुणसूत्र छोटे असेल तर पुरुष संतती. यावर मग नेटी यांनी काम केलं आणि लिंगनिदानासाठी दोन गुणसूत्रं असतात असं त्यांच्या निदर्शनास आलं.
1904-05मध्ये त्यांनी याबाबत शोधनिबंध लिहिला. नंतर या गुणसूत्रांना एक्स आणि वाय अशी नावं देण्यात आली. यानुसार जेव्हा दोन एक्स गुणसुत्रे एकत्र येतात तेव्हा स्त्रीसंतती निर्माण होते आणि जेव्हा एक्स आणि वाय असे गुणसुत्रे एकत्र येतात तेव्हा पुरुष संतती निर्माण होते. लिंग निदानाचं हे मूलभूत ज्ञान नेटी स्टिव्हन्स यांच्या संशोधनामुळे उलगडलं.
वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षापासून त्यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि पुढे अकरा वर्षं त्यांच्या संशोधनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा काळ राहिला... मात्र या कमी काळातही नेटी यांनी लिंगनिदान या विषयामध्ये प्रचंड संशोधन केलं. या संशोधनामध्ये एडमंड बीचर विल्सन हे त्यांचे सहकारी सामील होते.
क्रोमोसोमल सेक्स डिटरमिनेशन (गुणसूत्र लिंगनिदान) या विषयात या दोघांनीही एकत्र काम केलं असलं तरीही कित्येक ठिकाणी फक्त विल्सन यांनाच श्रेय दिलं गेलं. साधारण याच काळात थॉमस हंट मॉर्गन यांचंसुद्धा याच विषयामध्ये काम सुरु होतं.
विल्सन आणि मॉर्गन हे दोघंही नेटी यांचे सहकारी होते. संशोधनात एकत्रित मेहनत घेत होते... मात्र नेटी यांना त्यांच्या संशोधनाबाबत कुठेही श्रेय दिले जात नव्हते. एकदा 1906मध्ये एका कॉन्फरन्समध्ये मॉर्गन आणि विल्सन या दोघांनाच बोलवण्यात आलं. या दोघांनी आपापल्या कामावर भाष्य केलं... पण या ठिकाणी नेटी स्टिवन्स यांना साधं निमंत्रणसुद्धा दिलं गेलं नव्हतं.
लिंगनिदानाबाबत मूळ संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव सर्व पाठयपुस्तकांत मॉर्गन हेच आहे. असं म्हणतात की, मॉर्गन यांनी नेटी यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या प्रयोगाबाबत सगळी माहिती काढून घेतली होती. वयाच्या पन्नाशीत नेटी स्टिवन्स यांचं निधन झालं. त्यांच्या कामाचा काळ तसा कमीच होता... पण त्यातही त्यांनी जवळपास चाळीस शोधनिबंध प्रकशित केले. महिला वैज्ञानिकांसाठी जीवशास्त्राची दारं खऱ्या अर्थानं उघडणाऱ्या संशोधकांपैकी नेटी स्टिवन्स या एक होत्या... हे मात्र नक्की!
इस्थर लीडरबर्ग (18 डिसेंबर 1922 ते 11 नोव्हेंबर 2006) या अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रतज्ज्ञ आणि जिवाणू अनुवंशशास्त्रामध्ये अग्रेसर संशोधन करणाऱ्या पहिल्या महिला वैज्ञानिक. लॅम्डा हा बॅक्टरियोफाज ज्यांनी शोधून काढला... त्या म्हणजे इस्थर लीडरबर्ग! स्टँडफर्ड विद्यापीठातील प्लास्मीड रेफरन्स सेंटर ज्यांनी उभारलं आणि प्लास्मिड्सचे वेगवेगळे प्रकार आणि नामकरण ज्यांनी केलं... म्हणजे अँटिबायोटिक रेझिस्टन्स, ट्रान्सपोझोन्स इत्यादी... त्या संशोधक म्हणजे लीडरबर्ग!
युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन इथं पीएच.डी. विद्यार्थिदशेत असतानाच इस्थर यांनी बॅक्टरियोफाजसंबंधी पहिलं संशोधन केलं. त्याबाबतचा पेपर त्यांनी 1951मध्ये प्रकाशित केला आणि मग त्यात अधिक संशोधन करून 1953मध्ये त्यांनी सखोल मांडणी करणारा शोधनिबंध प्रकशित केला.
लॅबमध्ये इतर सर्व सहकाऱ्यांपेक्षा त्या सरस असल्या तरीही एकोणीसशे पन्नासच्या आणि साठच्या दशकांमध्ये त्यांना लिंगभेदाला सामोरं जावं लागलं. त्यांचा विवाह जोशुआ लीडरबर्ग या अत्यंत हुशार वैज्ञानिकाशी झाला होता. स्वतः जोशुआ हेसुद्धा याच विषयात संशोधन करत होते. वयाच्या तेहतिसाव्या वर्षी म्हणजे 1958मध्येच त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला... पण इस्थर लीडरबर्ग यांचं काम मात्र डावलण्यात आलं.
लीडरबर्ग आणि त्यांच्या पतीने विकसित केलेली रेप्लिका प्लेटिंग ही पद्धती आजही सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये काम करत असताना वापरली जाते. प्रयोगशाळेत काम करत असताना जिवाणूंच्या वसाहती एका पेट्रिप्लेटमधून दुसऱ्या पेट्रिप्लेटमध्ये हस्तांतरित करण्यासाठी ही पद्धत कामी येते.
जेव्हा आपल्याला एखादा संसर्ग होतो... उदाहरणार्थ एखाद्याला श्वसनाचा आजार झाला आणि खूप कफ जमा झाला तेव्हा कोणतं अँटिबायोटीक द्यायला हवं याकरता टेस्ट केली जाते. ज्यामध्ये रुग्णाच्या कफामधून जिवाणूंच्या कॉलनीज प्लेट केल्या जातात आणि त्यावर वेगवेगळे अँटिबायोटिक्स ॲप्लाय करून मग कोणतं अँटिबायोटीक त्या जिवाणूला मारू शकतं हे पडताळून पाहिलं जातं आणि त्यावरून त्या रुग्णाला कोणतं औषध द्यायचं हे डॉक्टर ठरवतात. हे प्लेटिंग करत असताना लीडरबर्ग यांनी शोधलेली पद्धत वापरली जाते. त्यानंतरसुद्धा कित्येक ठिकाणी इस्थर लीडरबर्ग यांना दुय्यम वागणूक मिळत राहिली. एकीकडे त्यांचा नवरा जेनेटिक्स विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत होता आणि यांना साधी पूर्ण वेळ प्राध्यापकाची जागाही तिथे मिळत नव्हती...
त्यांना वनस्पतिशास्त्र या विषयातसुद्धा प्रचंड रस होता. जैवविज्ञानशास्त्रामधलं त्याचं संशोधन फार महत्त्वाचं होतं. कमालीच्या हुशार आणि अतिशय अभ्यासू असूनही त्यांच्या कामाचा लौकिक जेवढा व्हायला हवा होता तेवढा त्या वेळी झाला नाही.
त्या वैज्ञानिक तर होत्याच... शिवाय अत्यंत उत्तम संगीतकारसुद्धा होत्या... मात्र स्टॅनफर्ड विद्यापीठात आपल्या कामानं स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना प्रचंड धडपड करावी लागली... पण आजही त्यांचं नाव फार विद्यार्थ्यांना माहीत नसतं. वयाची इतकी वर्षं संशोधन करूनसुद्धा जर नाव पोहोचणार नसेल तर लिंगभेद हा किती खोलवर रुजलेला आहे असा कदाचित याचा अर्थ असावा.
इंग्लडमध्ये जन्मलेल्या रोझालिंड फ्रॅंकलीन (25 जुलै 1905 ते 16 एप्रिल 1958) यांनी त्यांच्या संशोधनामुळे जैवविज्ञानशास्त्राचा पाया रोवला. डीएनएन - ज्यात मनुष्याची अनुवंशिकतेची आणि जीन्सची कुंडली मांडलेली असते त्या डीएनएनचा फोटो एक्स-रेच्या साहाय्यानं त्यांनी काढला. आज ही गोष्ट फार मोठी वाटत नसली तरीही त्या काळी हे काम अफाट महत्त्वाचं होतं... यामुळे डीएनए कसा दिसतो, त्याचा आकार, त्याचं कार्य काय, या सगळ्या बाबींवर अभ्यास करणं शक्य झालं.
पन्नासच्या दशकातील विज्ञान संशोधनातल्या खरंतर त्या हिरो होत्या... पण डीएनएची रचना कोणी शोधून काढली असं जेव्हा मी आज वर्गात शिकवताना विचारते तेव्हा अगदी पहिल्या वर्षापासून ते पदव्युत्तर पदवीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळे जण एकच नाव घेतात ते म्हणजे वॉट्सन आणि क्रिक. इतकंच काय तर सर्व पाठयपुस्तकांत डीएनएच्या मॉडेलचं नाव वॉट्सन अँड क्रिक मॉडेल असंच आहे. इतकं महत्त्वाचं संशोधन करूनसुद्धा साधं आपलं नावसुद्धा घेतलं न जाणं याचं या स्त्रीला किती शल्य असेल?
1962 मध्ये वॉट्सन आणि क्रिक यांना डीएनएनच्या स्ट्रक्चर इल्युसिडेशनकरता मेडिसीनमधलं नोबेल पारितोषिक जेव्हा दिलं गेलं तेव्हा रोझालिंड फ्रॅंकलीन यांच्या नावाचा साधा उच्चारसुद्धा कोणी केला नाही. अर्थात 1958मध्ये अवघ्या अडोतिसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला तरीही त्यांचं साधं नावसुद्धा न घेतलं जाणं हे अतिशय दुर्दैवी आहे. असं म्हणतात की, रोझालिंड यांनी डीएनएच्या स्ट्रक्चरचा एक्स-रे अतिशय अचूक रितीने काढला होता आणि वॉट्सन आणि क्रिक यांच्याकडे जो एक्स-रे होता तो खरंतर फार उपयोगाचा नव्हता.
या दोघांनी जेव्हा रोझालिंड यांचं डीएनए स्ट्रक्चर पाहिलं तेव्हा त्याला प्रमाण मानून त्यांनी स्वतःचं मॉडेल पूर्ण केलं. जेव्हा त्यांनी आपल्या संशोधनाबाबतचा शोधनिबंध प्रकाशित केला तेव्हा त्यांनी रोझालिंड यांना त्यांच्या कामाचं योग्य ते श्रेय दिलं नाही. एक्स-रे क्रिस्टलोग्राफी, एक्स-रे डिफ्रॅक्शन स्टडीज् हे फ्रॅंकलीन यांच्या संशोधनाचे आवडते विषय. 1945 मध्ये त्यांनी पीएच.डी. मिळवली. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी होतं आणि त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. किंग्ज कॉलेज लंडन या ठिकाणीत्यांनी बरीच वर्षं संशोधन केलं. त्यांनी आरएनए विषाणूंवरसुद्धा फार प्रभावी आणि उत्तम संशोधन केलं.
आज जैवविज्ञानामध्ये शिक्षण घेऊ पाहणाऱ्या, त्यात करिअर करू पाहणाऱ्या हजारो मुलींसाठी या सर्व संशोधकांनी एक एक करत दरवाजे उघडे केले आहेत. आजही अनेक छोट्या-छोट्या गावांमधून जिद्दीनं शिक्षण घेणारी प्रत्येक मुलगी, विज्ञानाची कास धरून पुढे अभ्यास करत चालणारी प्रत्येक मुलगी ही तिच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी छोट्या-छोट्या पायवाटा तयार करत आहेत. आपण सगळेच लिंगभेद न मानता येऊन अभ्यास, संशोधन करत राहिलो तर लिंगभेद नष्ट होईल. आणि संशोधक, शास्त्रज्ञ इतकचं शिल्लक राहील. त्याच्या आधी महिला असं लेबल लावावं लागणार नाही.
- सानिया भालेराव
saniya.bhalerao@gmail.com
(सानिया भालेराव या संशोधक असून पाणी, प्रदूषण या विषयांवर काम करतात. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांमधून त्या विविधांगी लेखन करतात.)
Tags: मराठी विज्ञान तंत्रज्ञान सानिया भालेराव महिला लिंगभेद संशोधन Science Technology Research Saniya Bhalerao Load More Tags
Add Comment