डॉ.एस.एन.सुब्बाराव : युवकांचे महात्मा

सुब्बाराव यांच्या 93व्या जयंतीनिमित्ताने...

‘युवान’च्या रूपाने भाईजींनी एक सेवा बीज पेरले पण आज त्याची शेकडो सेवा बीजे तयार झाली आहेत. देशभरात हीच स्थिती आहे. माझ्यासारखे लाखो तरुण आज भाईजींमुळे प्रत्यक्ष रचनात्मक कार्याशी जोडले गेले आहेत. आजच्या कुठल्याही राजकीय आणि सामाजिक नेत्याला ही किमया जमलेली नाही. खरेतर भाईजींचे निरपेक्ष, 7 दशके समर्पित, युवा पिढीला दिशा देण्याचे आणि भारत एकसंध ठेवण्याचे सेवाकार्य ‘भारतरत्ना’स निश्चितच पात्र ठरते. किमान मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन भारत सरकारने या महापुरुषाचा यथोचित गौरव करावा, ही देशभरातील आम्हा लाखो कार्यकर्त्यांची अपेक्षा. 

माझ्या पिढीने महात्मा गांधी पाहिले नाही पण मी हे खात्रीने सांगू शकेल की, डॉ.एस.एन. सुब्बाराव यांच्या रूपाने आम्ही ‘गांधी’ जगलेली व्यक्ती अनुभवली. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी भारतासह विदेशातही युवा पिढीला गांधी विचारांशी जोडण्याचे काम केले, त्यात डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 27 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांचे निधन झाले. 7 फेब्रुवारी रोजी त्यांचा 93वी जयंती झाली. त्यानिमित्त त्यांना मानणारे माझ्यासह देशभरातील कार्यकर्ते मध्यप्रदेशातील जौरा येथील ऐतिहासिक महात्मा गांधी सेवा आश्रम येथे एकत्र येऊन आगामी वाटचाल, कार्यक्रम ठरवला होता. याच आश्रमाच्या ठिकाणी भाईजींनी 1972 साली चंबळ खोऱ्यातील खतरनाक 654 डाकूंचे ऐतिहासिक आत्मसमर्पण घडवून आणले होते. स्वातंत्र्योत्तर काळात भूदान चळवळीनंतर गांधीवादी मार्गाचा हा मोठा विजय होता.

भाईजींचे बालपण

बंगलोरमधील एका सुखवस्तू कुटूंबात भाईजींचा 7 फेब्रुवारी 1928 रोजी जन्म झाला. वडील बॅरिस्टर आणि नामांकित स्थानिक वकील. सुब्बारावांनीदेखील वकिलीचे शिक्षण घेतले. म्हणाले असते तर वडिलांच्या मार्गावर पाऊल ठेऊन मोठी खासगी प्रॅक्टिस करू शकले असते. परंतु शालेय वयातच राष्ट्रीय नेत्यांचा, विशेषतः महात्मा गांधींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. 1942 साली गांधीजींनी 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी आपल्या शाळकरी मित्रांसमवेत तिरंगा फडकविला. त्यासाठी इंग्रजांनी त्यांना तात्पुरती अटकही केली पण वय लहान असल्याने नंतर सोडून दिले. परंतु ही घटना त्यांना गांधी विचार आणि आंदोलनाला अधिक जवळून जोडणारी ठरली.

सेवादलातील योगदान

पुढे काँग्रेस सेवादलाचे संस्थापक डॉ. एन. एस. हार्डीकर यांच्या संपर्कात ते आले. त्यांच्या सल्ल्यावरून बंगलोरमधील वकिली सोडून सुब्बारावांनी दिल्ली गाठले. त्यांच्या नेतृत्वगुणांवरून पुढे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कामराज यांचे अतिनिकटचे  सहयोगी म्हणून त्यांची ओळख झाली. सेवादलात कार्यरत असताना त्यांनी आपली विशेष ओळख बनविली. देशभर फिरल्यामुळे भाईजींना 18 भारतीय भाषा अवगत झाल्या. त्यांच्यावर दक्षिण भारतात जायचे असल्यास नेहरूंच्या भाषणांचे दुभाषक म्हणून काम करण्याचीही जबाबदारी सोपविली गेली.

चंबळ खोऱ्यातील डाकूंचे ऐतिहासिक आत्मसमर्पण

काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी सेवादलाचा त्याग केला. ब्रम्हचर्य पत्करून अगोदरच त्यांनी स्वातंत्र भारताच्या सेवाकार्यास वाहून घेतले होते. महात्मा गांधींना अपेक्षित रचनात्मक कार्यासाठी 1970 साली मध्यप्रदेशमधील सध्याच्या मुरेना जिल्ह्यातील डाकुंसाठी कुप्रसिद्ध चंबळ खोऱ्याकडे भाईजींनी आपला मोर्चा वळविला. दिवसभर ते डाकूंच्या कहाण्या ऐकत आणि रात्री डाकू त्यांची भजने. अनेकदा ती भजने ऐकून डाकूंच्या डोळ्यात पाणी येई आणि ते भाईजींना विचारत, “ही भजने तुम्ही आमच्यासाठी तर नाही तयार केली?” ते हसून उत्तर देत, “नाही, महाराष्ट्रातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही भजने आहेत. मी केवळ गातो. भक्तीगीते, भजने ते लहानपणापासूनच गात... जनसामान्यांत ते ‘भाईजी’ या नावाने विशेष परिचित होते.

कुप्रसिद्ध चंबळ खोऱ्यात भाईजींनी महात्मा गांधी सेवा आश्रमाची स्थापना केली. लोकनायक जयप्रकाश नारायण, संत विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून तेथील 654 डाकूंचे ऐतिहासिक अहिंसात्मक आत्मसमर्पण भाईजींनी 1972 साली घडवून आणले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यासाठी भाईजींना सर्वतोपरी साहाय्य केले. गांधी विचारांचा हा मोठा विजय ठरला. या महान कार्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे ‘पदमश्री’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुढे याच कार्यासाठी इंदिरा गांधींच्या मृत्युनंतर भाईजींना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रीय युवा आणि सेवा योजनेची सुरवात

आश्रमाचा कायापालट करण्यासाठी भाईजींनी तेथे राष्ट्रीय स्तरावरची अनेक दीर्घकालीन युवा श्रमदान शिबिरे घेतली. आश्रमाचे कार्य आपले विश्वासू शिष्य पी. व्ही. राजगोपाल या तरुणावर सोपवून भाईजी दिल्लीला परतले. देशासमोरील एकात्मता, धार्मिक आणि जातीय सलोखा, शांतता या आव्हानांना समोर ठेऊन त्यांनी पुढे ‘राष्ट्रीय युवा योजना’ ह्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. राष्ट्रीय युवा योजना संस्थेमार्फत त्यांनी गांधी मूल्ये कृतीत उतरवणारी हजारावर ‘राष्ट्रीय एकात्मता युवा शिबिरे’ भारताच्या प्रत्येक राज्यात आणि संघशासित प्रदेशात घेतली. यापुढे जाऊन अमेरिकेत 1984 पासून 2019 पर्यंत 35 वर्षं अखंड ‘गांधी युवा शिबिरे’ घेऊन तेथील नवीन पिढीत गांधी विचार रुजवण्याचे महान कार्य केले. तेथील अनिवासी भारतीय यासाठी दरवर्षी पुढाकार घेत. भाईजींनी नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका या देशातही गांधी युवा शिबिरे घेतली.

रचनात्मक कार्यामुळे लोकनायक जयप्रकाश नारायण, विनोबा भावे यांच्याप्रमाणे बाबा आमटेंशीही भाईजींचा विशेष ऋणानुबंध होता. 1985 साली भारत पेटलेला असताना बाबा आमटेंनी काश्मीर ते कन्याकुमारी अशी ‘भारत जोडो सायकल यात्रा’ काढली भाईजींनी यात्रा यशस्वीतेसाठी पूर्ण वेळ आपले योगदान दिले. भारतातील जवळपास सर्व महाविद्यालयात असणाऱ्या आणि युवकांना गांधी मूल्यांशी जोडणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) या योजनेचाही पायाही 1984 साली भाईजींनीच रचला.

महाराष्ट्रात त्यातही अहमदनगरशी त्याचे विशेष नाते होते. तीन राष्ट्रीय कार्यक्रम त्यांनी अहमदनगरमध्ये घेतले. यात 2006 साली झालेला ‘आंतरभारती राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव’, 2011 व 2015 साली झालेली ‘राष्ट्रीय युवा एकात्मता शिबिरे’ यांचा समावेश होता. या राष्ट्रीय कार्यक्रमांच्या संयोजनाची जबाबदारी आणि संधी माझ्यासारख्या नवख्या तरुणावर भाईजींनी सोपवली. तत्पूर्वी दिल्ली (2005), झाँसी (2007), श्रीनगर (2008), चेन्नई (2009), थ्रिसूर, केरळ (2010) येथे झालेल्या ‘राष्ट्रीय युवा आणि बाल कार्यक्रमांत’ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची अहमदनगरला त्यांनी संधी दिली. त्यामुळेच माझा त्यांच्याशी परिचय झाला. शिबिरासाठी शेकडो माणसे समोर असतांनाही त्यातील माझा आणि माझ्या टीमचा प्रत्येक उपक्रमातील सक्रिय सहभाग पाहून त्यांनी मला अनेकदा जवळ बोलावून पाठीवर थाप दिली. समारोपास मोजक्या मान्यवरांमध्ये बोलण्यास त्यांनी मला सांगितले. जे माझ्यासारख्या तरुणाला मोठे प्रोत्साहन देणारे ठरले.


हेही वाचा : 'गांधी : जीवन आणि कार्य'ची प्रस्तावना (संपादित अंश) - किशोर बेडकिहाळ


त्यातूनच पुढे युवकांसाठी असे राष्ट्रीय कार्यक्रम नगरमध्ये घेण्याची विनंती मी त्यांना एका पत्राद्वारे केली होती. माझ्या पत्राची दखल घेत त्यांनी मला दिल्लीला भेटण्यासाठी बोलाविले. त्यांचे देशभरातील मोठे कार्य पाहून सुरवातीस मला त्यांचे मोठे कार्यालय असेल, दिल्लीत राहण्यासाठी फ्लॅट वगैरे असेल असे वाटले. परंतु तेथे गेल्यावर मला मोठे आश्चर्य वाटले. टॉयलेट, बाथरूम अटॅच असणारी एका लहान खोली म्हणजे त्यांचे कार्यालय होते आणि तीच त्यांची राहण्याची जागा. तीही ‘गांधी शांतता प्रतिष्ठान’ या संस्थेने त्यांना आजीवन सदस्य करून कायमस्वरूपी निवास आणि रचनात्मक कार्यासाठी सुरवातीपासून दिलेली.

कोट्यवधी रुपयांचे वैयक्तिक आणि सामाजिक पुरस्कार भाईजींना मिळाले पण त्यांनी साधेपणा सोडला नाही. सर्व ऋतूंमध्ये त्यांचा खादीची हाफ पॅण्ट आणि शर्ट असा पेहराव होता. आताच्या पिढीला हे पाहून आश्चर्यच वाटे. महात्मा गांधींच्या अशा गुणांमुळेच जगप्रसिद्ध शास्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनने म्हटले होते, “भावी पिढ्यांना खरेही वाटणार नाही, की हाडामांसाचा असा कुणी या पृथ्वीवर होऊन गेला.” पुढे दिल्लीला अनेकदा जाणे झाले. त्यांनी आपल्या खोलीतच मला जागा करून बाहेर राहण्याऐवजी मुक्काम करण्यास सांगितले. त्यामुळे जवळून भाईजींची दिनचर्या पाहायला मिळाली. सकाळी 5 ते रात्री 10 अशी देशसेवेच्या कार्यात मग्न आणि व्यस्त दिनचर्या मला पाहायला मिळाली.

युवा शिबिरांमुळे देशभर ते सतत फिरत असत. त्यामुळे दिल्लीला वर्षातून फार कमी दिवस त्यांचा मुक्काम असे. त्यांनी नगरमध्ये युवा शिबिरे आयोजित करण्याची सोपवलेली जबाबदारी माझ्या टीमने यशस्वीपणे पार पाडली. देशभरातील हजारावर युवक शांतता, एकता, बंधुभाव, धार्मिक सलोखा, सामूहिक शिस्त आणि सामाजिक बांधिलकीसाठी नगरला एकत्र आली. शिबिरातील झेंडावंदन, सामूहिक श्रमदान, गाणी, भाषा वर्ग, मान्यवरांचे यांसोबत 7 दिवस शिबिरार्थींनी नगर शहर व जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी ‘सर्व धर्म प्रार्थना’ आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिबिरात भाईजी अनेक सामूहिक गाणी घेत. आपल्या सुरेल आणि खड्या आवाजात “नौजवान आओ रे, नौजवान गाओ रे...” हे गाणे भाईजी गाताच आम्हा युवकांत वेगळा उत्साह संचारे.

तुटलेली मने पुन्हा जुळली…

या शिबिरांना सर्व स्तरातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. तुटलेली मने पुन्हा जुळली. नगरचे तत्कालीन पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश यांनी या कार्यात अतिशय मोलाचे सहकार्य केले. तसेच पद, प्रतिष्ठा बाजूला ठेऊन ते अनेकदा आमच्या उपक्रमात शिबिरार्थी म्हणून सहभागी झाले. एकात्मतेच्या, भारत जोडोच्या घोषणा हिरिरीने आणि अगदी घसा बसेपर्यंत आमच्या सोबत त्यांनी दिल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, डॉ. विकास आमटे, पद्मश्री पोपटराव पवार यांनीही या रचनात्मक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला. आम्ही कार्यक्रम केलेल्या संवेदनशील ठिकाणी पुन्हा धार्मिक जातीय तेढ निर्माण झाली नाही. ही भाईजींच्या शिबिरांची अर्थात गांधींच्या संदेशांची खरोखर मोठी जादू होती.

बालकांचे प्रिय भाईजी

भाईजी लहान मुलांनाही कायम जवळचे वाटत. त्यांच्या खिशात कायम फुगे असत. एखादा लहान मुलगा दिसल्यास अथवा जवळ आल्यास भाईजी त्याला हमखास फुगा फुगवून देत. लहान मुलांच्या मुखात चांगली गाणी असावी, हा त्यांचा कायम आग्रह असे. “हम बच्चे हिंदुस्थान के, हम भारत माँ की शान के...” हे बालगीत ते खास आपल्या शैलीत गात आणि लहान मुलांना खिळवून ठेवत. एन.वाय.पी. मार्फत दर दोन वर्षांनी ते साने गुरुजींच्या संकल्पनेतील ‘आंतरभारती राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव’ देशातील विविध ठिकाणी साजरा करत. महाराष्ट्रात लातूरसह अहमदनगरला असा राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव साजरा करण्याची आम्हाला संधी मिळाली. नगरच्या बाल महोत्सवात सार्क देशांमधूनही बालके सहभागी झाली होती. महोत्सवाच्या कालावधीत सहभागी बालकांना मंगल कार्यालय, हॉस्टेलमध्ये ठेवण्याऐवजी स्थानिक बालकांच्या घरी पाहुणे म्हणून पाठवावे, अशी भाईजींनी सूचना केली.

स्व. शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या विशेष सहयोगातून नगरमधील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे आम्ही ‘आंतरभारती राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव’ आयोजित केला होता. तिथल्याच मुलां-मुलींची, त्यांच्या पालकांची आम्ही ‘अतिथी पालक’ म्हणून यासाठी निवड केली. यामुळे स्थानिक आणि देशभरातील बालकांचे वेगळेच नाते निर्माण झाले. जात-धर्म भेद क्षणात गळून पडले. आज ती बालके तरुण झाली आहेत पण अजूनही अनेक जण एकमेकांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या बालकांपेक्षा अधिक सुंदर कोण देऊ शकेल?

अहमदनगरला ‘युवान'ची स्थापना

या शिबिरांच्या प्रेरणेतूनच 1 नोव्हेंबर 2014 रोजी अहमदनगरला आम्ही ‘युवान’ ह्या युवा सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या संस्थेची भाईजींच्या हस्ते स्थापना केली. शिक्षण, कौशल्य, रोजगार यासोबत चारित्र्यनिर्मिती, हे आणखी एक मुख्य उद्दिष्ट ‘युवान’चे उदघाटन करताना त्यांनी आम्हाला सांगितले. आज त्यांच्या मार्गदर्शनावर कार्य करून ‘युवान’मार्फत हजारो युवकांनी आपल्या आयुष्याची दिशा निश्चित केली आहे. शेकडो वंचित, उपेक्षित, विद्यार्थी स्वावलंबी होऊन आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावित आहे. नैसर्गिक आणि मानवी आपत्तीवेळी ‘टीम युवान’ मदतकार्यात नेहमी अग्रेसर असते. आज देशभरातील हजारो तरुण ‘युवान’ कार्याशी जोडले गेले आहेत.  

‘युवान’च्या रूपाने भाईजींनी एक सेवा बीज पेरले पण आज त्याची शेकडो सेवा बीजे तयार झाली आहेत. देशभरात हीच स्थिती आहे. माझ्यासारखे लाखो तरुण आज भाईजींमुळे प्रत्यक्ष रचनात्मक कार्याशी जोडले गेले आहेत. आजच्या कुठल्याही राजकीय आणि सामाजिक नेत्याला ही किमया जमलेली नाही. खरेतर भाईजींचे निरपेक्ष, 7 दशके समर्पित, युवा पिढीला दिशा देण्याचे आणि भारत एकसंध ठेवण्याचे सेवाकार्य ‘भारतरत्ना’स निश्चितच पात्र ठरते. किमान मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन भारत सरकारने या महापुरुषाचा यथोचित गौरव करावा, ही देशभरातील आम्हा लाखो कार्यकर्त्यांची अपेक्षा. सुरवातीपासून प्रसिद्धीभिमुख व्यक्तिमत्व राहिलेल्या भाईजींची त्यामुळे येणाऱ्या पिढीला अधिक माहिती होऊ शकेल.

गांधी जयंतीनिमित्त ‘युवानचा’ अखेरचा कार्यक्रम

27 ऑक्टोबर रोजी वयाच्या 93व्या वर्षी जयपूर येथे भाईजींनी अखेरचा श्वास घेतला आणि पुन्हा आणखी एका ‘गांधीयुगाचा’ अंत झाला. तत्पूर्वी नगर येथे गांधी जयंती निमित्त झालेला युवानचा ‘प्रेरणा कार्यक्रम’ त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा मोठा प्रभाव भाईजींवर होता. मोझरी जि. अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आश्रमाच्या कार्यकारी मंडळाचे ते अध्यक्षही होते. आपल्या शेवटच्या कार्यक्रमात भाईजींनी त्यांचे “सबके लिये खुला है, मंदिर है ये हमारा...!  हे सर्वधर्मसमभावाचे सुंदर भजन 93व्या वर्षीही खड्या आवाजात गायिले.

स्व-सामर्थ्य ओळखा, सर्वांवर प्रेम करा आणि पद्मश्री पोपटराव पवारांसारखे ग्रामस्वराज्यासाठी प्रयत्न करा, या 3 प्रमुख गोष्टी आपण महात्मा गांधी यांच्याकडून घ्यायला हव्यात हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. कोविडकाळात तर जगाला कधी नव्हे इतकी गांधी विचारांची अधिक गरज आहे, हे प्रकर्षाने जाणवत आहे

याच कार्यक्रमात स्वतंत्र भारतातील युवा पिढीसाठी त्यांनी हिंसामुक्त, भूकमुक्त, नशामुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आठ दशकाहून अधिक काळ आणि शेवटच्या श्वासापर्यंत भारतमातेच्या सेवेस जीवन वाहिलेल्या या महापुरुषास विनम्र अभिवादन! गांधी विचार आणि आचार कालातीत आहेत. त्यामुळे ते कालही आदर्श होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. ‘एक घंटा देह को, एक घंटा देश को.’ हा भाईजींचा संदेश राष्ट्रीय कृतीकार्यक्रम होऊ शकतो. भाईजींच्या आणि अर्थात महात्मा गांधींच्या विचार आणि कृतीकार्यक्रमास पुढे घेऊन जाणे, हीच या महामानवांना खरी श्रद्धांजली ठरेल!  जय जगत!

- संदिप कुसळकर
sandip@yuvaan.org 

(लेखक, ‘युवान’चे संस्थापक आहेत.)

Tags: गांधीवादी गांधीजी विचारवंत पी. व्ही. राजगोपाल राष्ट्रीय युवा योजना युवा शिबिरे Load More Tags

Comments:

PIYUSH Sancheti Jain

भाईजी बद्दल आम्हाला अत्यंत आवश्यक माहिती मिळाली.. संदीप जी आपण भाईजींचे कार्य अहमदनगर मध्ये पुढे न्यायायल याची आम्हांला खात्री आहे.

विष्णू दाते

खूप छान! भाईजींच्या कार्याचे सुंदर विश्लेषण ! भाईजींबद्दल आम्ही ही अनभिज्ञच होतो,त्यांच्या कार्याचे महत्त्व या लेखामुळे ज्ञात झाले, म्हणूनच संदिपजी आपले आभार!

Add Comment